त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं.
मला अत्यंत आवडणार्या चित्रपटांपैकी असलेला तो चित्रपट संपला तरीही ते गाणं माझ्याभोवती रुंजी घालतच होतं. चित्रपटात त्याचं एखादं कडवंच ऐकू आलं असलं तरी आता माझ्या मन:पटलावर अथपासून इतिपर्यंत पुन्हा पुन्हा ते वाजत होतं आणि गाण्याच्या प्रत्येक आवर्तनानंतर त्याचा परिणाम अधिकाधिक गडद होत राहिला. का होऊ नये तसं? ते गाणं माझ्या अत्यंत आवडत्या संगीतकार - गायकाचं होतं. ते लिहिलंही त्यानेच होतं. त्याचे स्वतःचे विचार त्यात टोकदारपणे व्यक्त झालेले. तो अगदी भावविभोर होऊन गात होता.
गाणं होतं 'Imagine' आणि त्या गाण्याचा गीतकार - संगीतकार - गायक - सादरकर्ता होता, जॉन लेनन.
हे गाणं प्रकाशित झालं १९७०-७१ च्या सुमारास, तेव्हा जॉन बीटल्सपासून वेगळा झालेला. त्याचा स्वतःचा एकल सांगीतिक प्रवास सुरू झालेला. त्याची कलाकार पत्नी योको ओनो त्याच्या सोबत होती आणि तिच्या प्रेरणेने जॉन नवी गाणी रचत होता.
जन्माने जपानी असलेल्या योकोबद्दल जनमानसात बहुतांशी वाईटच बोललं गेलेलं आहे. तीच 'द बीटल्स'च्या फुटण्याला कारणीभूत होती असंच मानलं जातं. बीटल्स आणि जॉनशी संबंधीत असल्याने योकोच्या स्वतःच्या सृजनशीलतेकडे आणि कलेच्या अभिव्यक्तिकडे लोकांचं फारसं लक्ष गेलं नाही ही मात्र वस्तुस्थिती होती. १९६४ साली योकोचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं, त्याचं नाव होतं Grapefruit. या पुस्तकात तिने एखाद्या विशिष्ट विषयबीजाला कलाकृतीचं स्वरूप कसं देता येतं यावर विस्तृत भाष्य केलेलं. यालाच 'कंसेप्च्युअल आर्ट' म्हंटलं गेलं. यात तिने काव्य, चित्रकला अशा अनेक कलांच्या अभिव्यक्तींबद्दल लिहिलं होतं. तिचं लिखाण तेव्हाही काळाच्या पुढचंच होतं कारण तिने जे लिहिलेलं तेच काही वर्षांनंतर कलाविश्वात गोर्या युरोपियनांनी अनुसरलं आणि त्याबद्दलचं श्रेय घेतलं.
असो. पण या पुस्तकात योकोने आपल्या काही कविताही दिलेल्या आहेत. त्यातलीच तिने रचलेली एक तीनोळी होती, The Cloud Piece -
Imagine the clouds dripping.
Dig a hole in your garden to
put them in.
1963 Spring
ही तीनोळी जॉनच्या तत्काळ पसंतीला उतरली आणि तिच्यावरून प्रेरणा घेऊन जॉनने 'Imagine' रचलं. काय होतं त्यात? तर त्या गीतातले शब्द एका अशा जगाचं वर्णन करत होते जे जॉनने कल्पलं होतं. कसं होतं त्याच्या मनातलं जग? ते असं होतं -
एक असं जग, जिथे स्वर्ग नाही,
पायाखाली नाही पाताळ आणि डोईवर केवळ आकाश,
जगतोय प्रत्येक माणूस केवळ आजच्यादृष्टीने आजच्यासाठी.
जिथे कोणतेही वेगवेगळे देश नाहीत,
जिथे मरण नाही नि मारणंही, आणि नाही धर्म,
कल्पा असं जग जिथे माणसाने शांततापूर्वक जगणं हेच कर्म.
तुम्ही म्हणाल की मी स्वप्नाळू आहे,
पण मी एकटा नाही, केव्हातरी तुम्हीही माझ्यात सामील व्हाल,
आणि सार्या जगाचा एक विशाल देशच बनलेला पहाल.
बघा, जिथे नसेल कुणाचं स्वामित्व,
नसेल कशाची गरज आणि भूक, नसेल कशाचा लोभ,
बंधुभावाने हे सारे जगच, वाटून घेतील लोक.
तुम्ही म्हणाल की मी स्वप्नाळू आहे,
पण मी एकटा नाही, केव्हातरी तुम्हीही माझ्यात सामील व्हाल,
आणि सार्या जगाचा एक विशाल देशच बनलेला पहाल.
आणि ते जॉनने असं सादर केलेलं -
गीताचे बोल -
Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people living for today
Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion too
Imagine all the people living life in peace
You, you may say
I'm a dreamer, but I'm not the only one
I hope some day you'll join us
And the world will be as one
Imagine no possessions
I wonder if you can
No need for greed or hunger
A brotherhood of man
Imagine all the people sharing all the world
You, you may say
I'm a dreamer, but I'm not the only one
I hope some day you'll join us
And the world will live as one
छायचित्र आंतरजालावरून साभार
प्रतिक्रिया
13 Jan 2012 - 1:24 pm | अन्या दातार
सुंदर ओळख करुन दिलीत प्रास. :)
13 Jan 2012 - 1:58 pm | गणेशा
ओळख छान !
मराठीत दिल्याने छान वाटले
13 Jan 2012 - 2:15 pm | पियुशा
छान ,मस्त :)