एक दिवस असाच आपला घरी बसून निवांत टिवल्याबावल्या करत होतो. तेव्हढ्यात इमारतीमधले वय वर्ष ७-८ असे एक बालकृष्ण फिरत फिरत आमच्या घरी प्रवेश करते झाले. एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी". मी चमकुन त्याच्याकडं पाहिलं, तर ह्याला कशाचं काहीच नाही. गातोय आपला जोरजोरात. काय ही पोट्टी, काय काय पाहतात त्या टिव्हीवर, कळो न कळो, आपलं म्हणतच सुटायचं! मग मीच खेकसलो, " एऽ गप रे. तुझं वय काय, तू गातोयस काय? आँ? जरा चार चांगल्या गोष्टी ऐकाव्या माणसानं." त्या बाळासाहेबांनी एकदम 'अरे! आत्ता तर बरा होता की हा...' असा एक दयाद्र कटाक्ष टाकला, आणि बिफिकीरपणे दुसरी घरं उंडारायला निघून गेले.
ह्या "कोलावरी डी" ओळख झाली ती ही अशी. मग हळूहळू रोज उठून कुठे ना कुठे, काही ना काही कानावर पडायला लागलं. टिव्ही, एफ.एम.वालेही चेकाळले, उठसुठ त्या कोलावरीचा रतीब सुरु झाला. घरात, बाहेर, टपरीवर, हापिसात्..सगळीकडं आपलं 'कोलावरी डी'! म्हणलं, सरकारी खात्यानंही जाहिरातबाजीमध्ये चांगलीच बाजी मारलीन की. हापिसात दुपारी क्यांटिनात गेलो तर मागच्या टेबलावर चारेक ललना (काकवा हो काकवा..लगेच कान टवकारु नका.) जेवण कमी अन चिवचिव जास्त ह्या नियमाचं पालन करत होत्या. त्यांच्याही चर्चेत पुन्हा 'कोलावरी डी'च. आयला! म्हणलं, सरकारच्या प्रयत्नांना चांगलं यश येतंय हों. जनशिक्षण उत्तम चालू आहे. हल्ली ह्या बायका आजिबात भीडभाड न बाळगता स्पष्ट चर्चा करताहेत. छान छान!
आणि मग, ते हरविंदरसिंग आणि पवार प्रकरण घडलं. त्यानंतर पुन्हा तेच्..कोलावरी कोलावरी कोलावरी डी! आता मात्र गडबडलो. आपण समजतोय तसं हे दिसत नाहीये तर. मग जरा नेटवर नेटानं शोध घेतला तर कळालं, हे तामिळ की तेलुगु की कायसं गाणं आहे. अन् ह्या गाण्याचा आणि 'स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार' ह्यांचा दुरान्वयानंही संबंध नाही.. जरी नावात 'डी' असलं तरी ते डी आणि हे डी..दोन्ही वेग़ळे आहेत.
शोधाशोधीत कळालं की म्हणे ह्या गाण्याला सिक्स्टी मिलियन (होय! असंच म्हणायचं असतं म्हणे.) पेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. जगभरातून ह्या गाण्याचं कौतुक होतंय, खूप लोकांना आवडलंय वगैरे वगैरे वगैरे! झालं? म्हणजे आता हे एव्हढं लै लै भारी गाणं ऐकलं नाही तर जीवाला चैन पडेल काय? मग रीतसर गाण्याचा दुवा मिळवला आणि अगदी पदरची ब्यांडविड्थ खर्चून आख्खं गाणं ऐकलं. परत ऐकलं, परत परत ऐकलं! हरे राऽऽम! इतकी प्रचंड 'हाईप' केलेलं हे गाणं ऐकून भिंताडावर डोकं आपटुन घ्यावंस वाटलं .
काय ते गाणं तिच्यायला! त्याला ना आई ना बाप. ना धड शेंडा ना बुडखा. त्या ढोल-पिपाणीच्या गजरात तर आमचं सुखकर्ता-दुखहर्ताही सुप्परहिट होईल की.
एव्हढं कवतिक चाललेलं हे गाणं, ते गाणारा असा कळवळून कळवळून का गातोय हेच कळेना. सूर असा लावलाय, जणू सहनशक्तीपलिकडं एक चार-सहा वेळा परसाकडं धावावं लागलं आणि थकव्यानं कण्हत, कुंथत गायला बसलंय. मध्येच एकदम मुरडा आल्यासारखं एखादी कळ देऊन जातो हा बाबा. कोण तो गायक- धनुष्य की बाण की भाता (ह्याला बहिण असेल तर तिचं नाव प्रत्यंचा असेल का हो?) त्याला बहुतेक आवाजात दर्द आणायचं असावं, पण ते 'असं' नसून 'तसं' दर्द वाटतंय. असो! आता नसतं एखाद्याला गाण्याचं अंग , पण जरा चार पै गाठीशी असले तर करताही येतं काहीबाही. आमच्या संजूबाबानं नाही गायली चार दोन गाणी? टुकार असली म्हणून काय झालं, लोकांनी ती टुकारच आहेत म्हणून सोडून दिली. इथे भलतंच. बरं,नवखा बिवखा असेल,नसेल गायकाला पेललं म्हणावं अन पुढे जाऊन छानपैकी गाण्याचे बोल ऐकावेत,तर तिथंही च्यायला ह्यांचा तांब्या पालथाच!
काय तर म्हणे
डिस्टन्स ला मुन्नं..मुन्नं
मुन्नं कलरं वैट्टं वैट्टं (वैट्टं? हां हां...व्हाईट.)
ब्याग्रौंड नैट्टं (वैट्टंमुळं हे नैट्टं बरोबर कळलं...शिकतोय मी हळूहळू..जमेल.)
नैट्टं कलरं ब्लॅक्कं (ते ब्लॅक्कं ऐकलं की 'वॅक्कन ओकला' वगैरे आठवायला लागलं. छ्छे... फारच अवघड आहे. )
वै दिस क्वॉलावरी क्वॉलावरी क्वॉलावरीऽऽ डी...
हे असले झकडम बोल गाण्याचे. जरा तिसरी-चौथीतल्या पोरांचं गुणगुणणं वगैरे ऐकलं तर कळेल,त्यांच्या गाण्यांमध्ये आणि ह्या गाण्यात फार काही मोठा फरक नाही.हां,वयोमानापरत्वे स्कॉच (ह्म्म्..रजनीकांतचा जावई ना हो हा?),गर्ल,लौव्व वगैरेचा फरक आहे. पण तेव्हढाच. गाण्याचं काहीतरी व्याकरण असतं म्हणे, ते मरुद्या.निदान ज्यावर गाणं बेतलंय त्या कवितेला तरी भाषेचं किमान व्याकरण असावं असा आमचा आपला समज. हल्ली हे गीतकार वगैरे व्हायला मेंदू गुडघ्यात उतरावा लागतोय काय? की डायरेक्ट डोक्यातूनच पांगळं असलं तरी चालतं? एकुणच सध्याच्या गाण्यांची क्वालिटी पाहून नेहमी पडणारा हा खदखदता प्रश्न एकदम भीषण वगैरे होऊन माझ्यासमोर उभा ठाकला.
लौव्वं लौव्वं ओ मै लौव्वं (अरे धड लव्ह, निदान लव तरी म्हण रे टोणग्या...)
यु शौड मी बौव्वं.. (बोंबला! काय दाखवलं कोण जाणे!)
कौव्वं कौव्वं...होली कौव्वं...
आयच्चा घ्घो! एव्हढं ऐकुन जे काय हसता हसता गडाबडा लोळायला लागलो...ऑबॉबॉ.फिनीश!!!
हे काय कौव्वं कौव्वं करतंय ते आधी कळेनाच, पण ते पुढं होली आहे म्हणजे बहुतेक त्याला काऊ म्हणायचं असावं. आता ह्याच्या 'लौव्वं' मध्ये ती कौव्वं काय दुध घालायला आली होती की चारा खायला? खुळं तिच्यायला..गाणी लिहितायत.
आधीच लिरिक्स एव्हढे भीषण, त्यात त्या बाब्याचं अस्सल तामिळी तर्खडकरी इंग्रजी! एकाचवेळी तुफ्फान करमणूक आणि भयानक वैताग ह्याचा संयोग अनुभवायला मिळाला म्हाराजा! च्यायला,मी विचार केला,हे असलं काहीही खपून जातंय तर मग आपलं 'अडगुळं मडगुळं' सुध्दा हिट्ट होईल की. पण लगेच लक्षात आलं,आपले सासरेबुवा एक साधेसुधे मध्यमवर्गिय मराठी मनुष्य आहेत. त्यांना पंचा, विडी, पिस्तुलं वगैरे काहीही गोल गोल फिरवून झेलता येत नाही. ताबडतोब अडगुळं मडगुळंचा विचार बाजूला सारला अन निमूट मूग गिळून बसलो.
आपल्याला गाण्यागिण्यातलं काही कळत नाही हे खरंय. कोणी संगीततज्ज्ञांनी चार ज्ञानकण पदरी घातले तर बरं होईल. निदान कळेल तरी की हे गाणं इतकं लै लै भारी म्हणून का मिरवतंय.
तोवर मी आपला असा निष्कर्ष काढून मोकळा झालोय की एकतर पब्लिकची आवड तद्दन फालतु झालीए, किंवा लोकांनी कौतुक केलंय ना, मग मला नाहीच आवडलं पाहिजे असा आड्मुठा पवित्रा पाहून मलाच अकाली मिड-लाईफ-क्रायसिस झाला असावा. काय असेल ते असेल्..मी अगदी भर लकडीपूलावर उभं राहून जाहीरपणे 'नाही नाही नाही...त्रिवार नाही! हे गाणं चांगलं नाही!' असं स्पष्ट मत मांडायलासुध्दा तयार आहे.
ते असो. अॅप्रेझल्सचे दिवस चालू आहेत त्यामुळं सध्या आम्ही आपलं, 'गणा धाव रे, गणा पाव रे..' अशा विनवण्या करतोय. अॅप्रेझल्सचा निकाल लागला की म्यानेजराकडं पाहून आम्हीही गाऊ... 'वै दिस क्वॉलावरी क्वॉलावरी क्वॉलावरी डीऽऽ
प्रतिक्रिया
2 Dec 2011 - 6:45 pm | गणपा
हायला धमु चक्क मेन बोर्डावर.
पुण्यात सुर्य कुणीकडे उगवाला म्हणे आज?
असो आता वाचतो निवांत.
हा हा हा पंचनामा जबर्या.
तरी म्हटल इतक जबरद्स्त 'पोटेंशियल' असलेल्या गाण्याच रसग्रहण अजुन कुण्या मिपाकरानं कसं बर केल नाही.
बाकी गाण्याच्या बोला बद्दल आवाजाबद्दल आम्हाला कै देणं घेणं नै.
आपल्याला तर 'मुजीक'* लै आवडंल बॉ.
* श्रेयअव्हेर भप्पीदा
2 Dec 2011 - 7:17 pm | प्रशांत
अगदि .....
4 Dec 2011 - 3:58 pm | पियुशा
आपल्याला आवड्ल भो हे गाण ;)
व्हाय धीस कोलावरी कोलावरी डी :)
8 Dec 2011 - 5:56 pm | किचेन
पण कळल का?
कोलावारीचा अर्थ काय?माहित नाय.
मून कलर व्हेट.(मून चा कलर लहानपणापासून सगळ्यांना माहित आहे. नवीन काय आहे त्यात?आता मूनच्या कालारला तो वाईट बोलत असेल तर ते नवीन आहे.ठीक आहे तुम्ही सोयीनुसार अर्थ लाऊ शकता!)
नवीन ती लव्ह च्या मध्ये घुसणारी काऊ.त्याच प्रेम काउ वर होत का?
2 Dec 2011 - 6:53 pm | अन्या दातार
तुफ्फान चिरफाड. धम्या, नेमकं काय बिनसलं रे तुझं?
व्हाय दिस कोलावरी कोलावरी डी?
असो. तुझे कोल्हापुरवरचे प्रेम तु प्रतिसादात कबूल केलेच होतेस, तर या गाण्यावर उतारा म्हणून कोल्हापुरी रस्सा गीत घे.
2 Dec 2011 - 6:53 pm | मोहनराव
लई फालतु गानं आहे ते!! आजकाल काय लोकप्रिय होईल काही सांगता येत नाही.
2 Dec 2011 - 6:56 pm | मेघवेडा
तामिळ तर्खडकरी इंग्लिश
अकाली मिलाक्रा
वगैरे टर्म्स बेष्ट!
गाणं टुकारै.. पण मुजिक मस्तै.. टून लै कॅच्यै.. त्यामुळेच तर हिट झालै! :)
2 Dec 2011 - 7:10 pm | स्मिता.
खरडी लिहायला वेळ नसलेल्या धम्याने चक्क लेख लिहायला वेळ काढला म्हणजे किती महती असावी त्या गाण्याची ;)
बाकी ते गाणं तद्दन फालतू या प्रकारात मोडतं. आधी तर ते धनुष आणी त्याच्या टिमने थोडं फार प्रसिद्ध केलं असणार. नंतर अर्ध्या पब्लिकने फॅशन असल्यासारखं 'लाईक' केलं असणार आणि उरलेल्या पब्लिकने सगळे करतात म्हणून आपणही 'लाईक' केलं असणार. त्यापेक्षा हे वरचं 'कोल्हापुरी' बरंच बरंय...
ते असो... लेख एकदम मस्त झालाय. मनातल्या भावना उतरवल्यास.
2 Dec 2011 - 7:18 pm | मनीषा
गाण्याबद्दलच्या तुमच्या सर्व मतांशी सहमत .
पण तरीसुद्धा
why this kolaveri kolaveri .. D :)
2 Dec 2011 - 7:59 pm | यकु
खि:खि:खि:!!!
हि: हा: हा: !!!
=)) =)) =))
गाणं पाहून हसूही आलं नव्हतं आणि रडूही आलं नव्हतं... खरं म्हणजे काहीच झालं नव्हतं.
गाणं तर अजाबाद लक्षात राहिलं नव्हतं.
गाण्यात त्या पांढर्या शुभ्र दिसणार्या मुली तेवढ्या बर्या वाटल्या होत्या.
पण ही चिरफाड वाचून पार गडाबडा लोळतोय..!!
या गाण्यावर उतारा म्हणून हा विडो पाहून घ्या एकदा:
2 Dec 2011 - 11:04 pm | अप्पा जोगळेकर
'घटं भिंद्यांत, पटं छिंद्यांत......' अस काहीसं ऐकलंय त्याची यथार्थता पटली.
5 Dec 2011 - 9:27 am | माझीही शॅम्पेन
च्या मारी डोक्याची पार भाजी झाली हा वीडू पाहून :)
2 Dec 2011 - 8:17 pm | ब्रिटिश टिंग्या
काहीही असो, आपल्याला आवडलं बॉ गाणं!
तो धनुष की बिनुषच्या नरड्यात मज्जा आहे बॉ ;)
अवांतर: अॅपरेजलचे दिस आहेत! हा धागा टायपताना आम्ही जे शब्दामृत 'वॅक्कन ओकले' होते ते ध्यानात असु द्या म्हणजे झालं! ;)
3 Dec 2011 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार
तेज्यायला !
काय वेळ आलीये भेंडी.. आज ह्या भिकारचोट टिंग्याशी सहमत व्हावे लागत आहे.
त्या धनुषच्या नरड्यात खरंच मज्जा आहे बॉ. आपल्याला तर लै बेदम आवडले हे गाणे. दिवसातून एकदा तरी ऐकतो किंवा पाहतो.
बाकी एकमेकांचे पाय ओढण्यात निवासी लोक कायम आघाडीवर असतातच म्हणा. अर्थात हे गाण लेडी गागा, जस्टिनचे वैग्रे असते तर ह्या निवाशांनी डोक्यावर घेऊन नाचायला सुरूवात केली असती.
असो...
आता इकडे 'थ्री' कधी झळकतोय ह्याची वाट बघणे आले.
3 Dec 2011 - 7:08 pm | तिमा
लेख वाचल्यावर उत्सुकता इतकी ताणली गेली की त्वरेने तू नळीवर गाणं ऐकलं. आवडलं गाणं , धनुष सुरात गायलाय. हल्ली जी इतर भीषण गाणी ऐकू येतात त्यापेक्षा निदान मेलडी असलेलं!
बाकी आम्हाला त्यातली सरगम उलगडू नाही बाबा सांगता येत! पण तात्यांना रिक्वेस्ट केली तर ते व्यवस्थित लिहू शकतील यावर. कुणीतरी या कोलावरी वर कौलही काढावा.
2 Dec 2011 - 8:28 pm | रेवती
मी ३ वेळा ऐकलं. त्यावेळी असं वाटलं होतं की रोज एकदा तरी ऐकलं जाईल.
नंतर विसरून गेले. त्या लोकांनाही माहित असेल की आपण एक फालतू गाणं तयार करतोय म्हणून.
तरीही लोकांच्या गळी उतरवलं ना त्यांनी!
हा प्रकार नक्की आहे काय? हे पाहण्यासाठीच निम्मेअर्धे लोक गेले असतील, आपणही त्यातलेच.
आपण असा प्रकार करायला धजावू का? आता सगळेजण तपासणार की आपापले सासरे कोण आहेत.;)
2 Dec 2011 - 8:43 pm | टवाळ कार्टा
>>आपले सासरेबुवा एक साधेसुधे मध्यमवर्गिय मराठी मनुष्य आहेत. त्यांना पंचा, विडी, पिस्तुलं वगैरे काहीही गोल गोल फिरवून झेलता येत नाही
ही ही ही ही :D
2 Dec 2011 - 9:29 pm | योगी९००
धमू,
अगदी माझ्या मनातल्या भावना उतरवल्यात..मलाही हे गाणे लोकांना का म्हणून आवडले हेच कळले नाही...आयला जो तो आपला "वै दिस क्वॉलावरी क्वॉलावरी क्वॉलावरीऽऽ डी...".. माझ्या ओळखीचा एकजण तर दिवसभर हेच ऐकत असतो.. आपल्या पब्लिकची लेव्हल खालावलीय हे काही अतिटूकार चित्रपट मेगाहीट झाल्यामुळे लक्षात आले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले.
आपले सासरेबुवा एक साधेसुधे मध्यमवर्गिय मराठी मनुष्य आहेत. त्यांना पंचा, विडी, पिस्तुलं वगैरे काहीही गोल गोल फिरवून झेलता येत नाही. ताबडतोब अडगुळं मडगुळंचा विचार बाजूला सारला अन निमूट मूग गिळून बसलो.
हॅ हॅ हॅ हॅ ...
2 Dec 2011 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, मागच्या आठदिवसात अधून मधून मला हे 'कोलावेरी' ऐकु यायला लागलं होतं. आणि आज दै. सकाळ ला '' आप कोलावेरी दी नही जानते ? माय गॉड ! '' अशा शीर्षकानं लक्ष वेधून घेतलं होतं. या कोलावेरीच्या पीढीने म्हणे एक कोटीच्या वर या गाण्याला हिट्स दिल्या. पण, मी आपलं बातमी वाचून दुर्लक्ष केलं. पण, माझ्या नशीबात गाणं ऐकणं होतं आणि काळाच्या मागे राहू नये म्हणून आत्ता धमालच्या लेखामुळे 'कोलावरी दी' ऐकावं लागलं.
गाण्यातले शब्दाबद्दल धमु ने भावना व्यक्त केल्याच आहेत. मुझीक मात्र बरं आहे, बरं यासाठी की, दोन पेग टाकून आपल्या गाडीत आपल्याच नादात, गाण्याच्या अर्थाबद्दल काहीही न कळता, मान हलवत, झुलवत आणि मानेला मस्त लयदार झटके देत 'व्हाईट स्कीन्न' आणि 'माय फ्युचर डार्क' म्हणत एकट्या माणसाचा किती तरी वेळ प्रवासात निघून जाईल यात काही वाद नाही. :)
बब्बा बै.
-दिलीप बिरुटे
2 Dec 2011 - 10:59 pm | किचेन
गाण ऐकून जाम गोंधळले होते.....आयला काय काळातच नव्हत काय आहे.....चेपू वरच्या एका ठिकाणी त्याचच मराठी भाषांतर 'कोल्हापुरी कोल्हापुरी दि' अस होत.मला वाटल कोकणी गाण असेल. हे फालतू तर आहे पण हिट आहे!(यातच रजनीकांत पिकाचारच्या बाहेर काहीही करू शकतो हे आल)
हे हिट झालाय कळल्यावर मला फिट यायची बाकी होती !
2 Dec 2011 - 11:03 pm | पाषाणभेद
छान लेख
गाणं मोठ्या लोकांच्या संबंधीतांच्या संबंधी असल्याने जास्त प्रसिध्द पावले असावे.
काव काव होली काव!
2 Dec 2011 - 11:05 pm | दादा कोंडके
चार दिवसापुर्वीच हे गाणं यु-ट्युबवर ४-५ वेळेला ऐकलं. च्यामारी काल परत एकदा ऐकावं म्हणलं तर,
"This video is not available in your country because GEMA has not granted the respective music publishing rights" असा मेसेज येतोय. फिमेल वर्जन-रिमिक्स मध्ये ती मज्ज नाहे राव. यु-ट्युबशिवाय इतरत्र कुठे हा विडिओ आहे त्याचा शोध घेतला पाहिजे!
2 Dec 2011 - 11:10 pm | पैसा
धम्या, अकाली मिलाक्रा काय? असो, पण प्रेरणा पॉवरफुल असल्यामुळे साक्षात बारामतीकरांना लेख लिहावासा वाटला, हे छान. प्रेरणेचं महत्त्व गेल्या २/३ दिवसात परत परत बघायला, वाचायला मिळतंय!
2 Dec 2011 - 11:58 pm | मन१
पुचाट, दळभद्री, वैतागवाडी आहे नुस्ता हा प्रकार.
*हा प्रकार म्हणजे सदर लेख नव्हे तर ते कोलावेरी डी :) *
मीही आधी पवारसाहेबांच्या किश्श्याच्या वेळेसच ऐकलं.
असले गाणे ऐकायला लावणे म्हणजे त्या ए के हंगल काकाला किशोरवयीन हिरो दाखवून "दिल चाहता है" बनवणे किंवा आपण अगदि सुलभच्या एका कुबत शौचालयात कोंडलो गेलो आहोत अशी स्वप्ने पडून ऐन रात्री झोपेत किंचाळत उठणे.
...प्रचंड 'हाईप' केलेलं हे गाणं ऐकून भिंताडावर डोकं आपटुन घ्यावंस वाटलं .
भिंतीवर डोके आपतून घेतल्यानी जो आवाज होइल, तोसुद्धा ह्या गाण्यापेक्षा बराच असेल रे.
अर्थातच ह्या गाण्याचे एक अनंत उपकार माझ्यावर झाले आहेत ते हेच की कान किटवणार्या व बेंबीच्या देठापासून केकाटल्या जाणार्या हल्लीच्या बॉलीवूडी-पंजाबी गाण्यांपेक्षा किम्वा कंटाळवाण्या/मोनोटोनस सूफी गाण्यापेक्षाही, राखी सावंतच्या टीव्हीवरील दर्शनापेक्षाही, अभिषेक बच्चनच्या दिव्या नृत्य कलेपेक्षाही,दवणेंच्या बोथट लेखणीपेक्षाही
भयंकर त्रासदायक,वैतागवाडी काही असतं ह्याची जाणीव करून देणं.
काल परवाच तामिळनाडूची कनिमोझी तिहारमधून सुटली म्हणे. कुनाची टाप लागलिये अडवायची मायला, तिच्या कार्यकर्त्यांनी "तिला सोडेपर्यंत इथेच वाजवत राहू" म्हणून हे गाणं नक्की जेलरच्या समोर वाजवलं असेल.
सोडतो नाही तर काय.
असो,
आमच्या मनातील वैतागाला वात मोकळी करून दिल्याचं पुण्या तुला मिळतय.
पुन्हा जगात कुठेच असल्या गाण्यासारखे शोध न लागोत हीच तुझ्यासाठी आमची ईश्वरचरणी प्रार्थना.
3 Dec 2011 - 12:53 am | नेत्रेश
सगळे गाण्याला शिव्या घालतायत, पण कमीत कमी ५ ते १० वेळा ऐकुन / पाहुन झाल्यावर.
ऑफिसातील अर्ध्या लोकांना हे गाणे अतीशय आवडले आणी बाकीचे नावे ठेवत आहेत. मात्र सगळ्यांनी हे गाणे कमीत कमी १० वेळा तरी पाहीले आहे.
3 Dec 2011 - 9:19 am | दिपक
3 Dec 2011 - 11:51 am | ५० फक्त
गाण्यापेक्षा गाण्याच्या मध्ये जे तामीळ बोलतो ना धनुष ते जास्त गोड वाटतं, यावरुन तामीळ अजुनही संस्क्रुतच्या जास्त जवळ आहे हे जाणावतं.
बाकी ह्रिदम एकदम मस्त आहे, पण मद्यपानाची खुली जाहिरात केल्यानं गाण्यावर बंदी घालतील का काय ?
3 Dec 2011 - 2:26 pm | मिहिर
हे कसे काय म्हणे? कोणाच्या तुलनेत जवळ? मला तर आजपर्यंत ऐकलेल्या भारतीय भाषांमध्ये सर्वांत कमी संस्कृत तमिळमध्ये आढळले.
बाकी गाण्याबद्दल म्हणाल तर, पहिल्यांदा बोगस वाटले पण नंतर आवडले. पण तुमच्या परिक्षणाची सर नाही कशाला. हसून हसून वेडा झालोय.
3 Dec 2011 - 2:01 pm | डावखुरा
गाणं आवडेल हाय भो...तसेच त्या व्हाईट पॉरी बी..त्यात ती रजनिकांत्ची बी पोर हाये म्हन्तात...आणि त्यो रजनीचा जावई हाय..धनुष्कोटी...
काय बोलाय्चे न्हाय बर्का...न्हायतर जाउन सांगेल रजनीला..
पुण्यात पीएम्टी वाले संप कर्तीन बर्र्का मग मला नका सांगायला येउ...
3 Dec 2011 - 2:29 pm | इरसाल
मेर्कु गाना आवड्या.
धमुने बऱ्याच दिवसानंतर लिखाण कामात पुनर्पदार्पण केले आहे.
साहेब असेच लिहित जा आनंद वाटतो.
3 Dec 2011 - 2:33 pm | विनायक प्रभू
मी आपला बोव्व बोव्व बा ह्या गाण्याला.
3 Dec 2011 - 2:35 pm | विनायक प्रभू
आण्खी एक.
त्या धनुष आणि धम्या मधले साम्य कुणाच्या लक्षात आले का?
3 Dec 2011 - 3:53 pm | आनंदी गोपाळ
आप्ला तो धम्या. त्यांचं ते धनुष्य.
बाकी ते गाणं फडतूस हाय याबद्दल सहमत.
3 Dec 2011 - 4:56 pm | क्रान्ति
हसून हसून मेले....... वेड लागायची वेळ आलीय अगदी.
काय काढली आहेस त्या गाण्याची धमू! झक्कास ! :)
कोलापुरी रस्सा लै लै लैच झ्याक ;)
3 Dec 2011 - 6:46 pm | तर्री
जाम हसलो रे...
3 Dec 2011 - 11:08 pm | हितु
@हर्षद
आपण त्याचे सिनेमे नाही बघितले , मी येथे त्याचे पोस्टर्स बघितले आहेत , आणि काही सिनेमे पण , तो पुण्यातल्या रिक्षावाल्या पेक्षा हि घाणेरडा दिसतो
बाकी गण्या बद्दल स्वत धनुष चे मत पण हेच आहे कि, या गाण्याला काहीही अर्थ नाहीये, त्याला ते फक्त ५मिन सुचले , आणि हे गाणे सिनेमा तील एका situation साठी आहे,
आणि त्या situation मध्ये हे गाणे बरोबर बसते, गाण्याचे बोल फालतू आहेतच. तरी गाण्यामधील भावना ज्याला समाजातील त्याला खरे गाणे आवडेल.
या गाण्याला फक्त दुसर्याला आवडले म्हणून आपल्याला पण आवडले एवढ्याच कारणांनी publicity मिळाली आहे.
3 Dec 2011 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> पुण्यातल्या रिक्षावाल्या पेक्षा हि घाणेरडा दिसतो
पुण्यातले रिक्षावाले दिसायला कसे आहेत माहिती नाहीत.
पण, आमचे औरंगाबादेतले रिक्षावाले त्याच्यापेक्षा दिसायला बरे आहेत.
-दिलीप बिरुटे
5 Dec 2011 - 9:20 pm | रेवती
तो पुण्यातल्या रिक्षावाल्या पेक्षा हि घाणेरडा दिसतो
तुम्हाला मराठी नीट येत नाही म्हणता म्हणता बरच बोलता कि हो.
रिक्षावाले कसे का दिसेनात, तुम्हाला कुठं संसार करायचाय त्यांच्याबरोबर?
उगीच एखाद्याच्या दिसण्याबद्दल कशाला बोलावं?
ते आपल्या हातात असतं का?
असणं आपल्या हातात असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर देव आनंद यांना श्रद्धांजलीचा धागा काय किंवा हा काय, नीट व्यक्त होणं हे तुम्ही करू शकताच. रिक्षावाल्यांच्या उर्मट असण्याबद्दल स्वतंत्र धागा काढा आणि चर्चा करा.
तुम्ही मदनाचे पुतळे असाल म्हणून धनुष काय किंवा आणखी कोणाला वाईट का म्हणावं?
5 Dec 2011 - 11:21 pm | गणपा
एकदम खण्खणीत वो रवतीतै.
13 Dec 2011 - 7:43 pm | सुहास..
आपण त्याचे सिनेमे नाही बघितले , मी येथे त्याचे पोस्टर्स बघितले आहेत , आणि काही सिनेमे पण , तो पुण्यातल्या रिक्षावाल्या पेक्षा हि घाणेरडा दिसतो >>
आपण त्याचे सिनेमे पाहिले नाहीत , ओक्के ! पुण्यातले किती हॅन्डसम रिक्षावाले दाखवु आपल्याला ? उगा आपले का ही ही !
मी एक पोल्लवधन नावाचा चित्रपट पाहिला त्याचा , एक नक्की ,दिसत कसाही असला तरी एक चांगला अभिनेता आहे तो ,(उद्या लेको अशोक सराफ ला नावे ठेवाल ;) ) उगा दक्षिणात्य हिरोज सारखा एक्स्ट्रा अभिनय करत नाही. त्याच्या कडे एका नव्हे दोन चित्रपटांचे नॅशनल अवार्ड आहे. !
बाकी गाण्याच्या बाबतीत : ते शीला की जवानी, मुन्नीपेक्षा , रिदम मध्ये नक्कीच चांगले आहे !
13 Dec 2011 - 8:24 pm | सोत्रि
सुहासभौ,
लैच भारी! लै वेळा सहमत!
- (मिपा सर्टिफाइड काड्याघालू) सोकाजी
4 Dec 2011 - 1:41 am | इंटरनेटस्नेही
गाणं कसही असो! त्यानिमित्ताने धमाल लिहिता झाला हे महत्त्वाचं! ;) परीक्षण आवडले रे!
4 Dec 2011 - 10:27 am | शिल्पा ब
पवारांच्या कानाखाली वाजवली तेंव्हा युट्युबवर पहील्यांदा हा प्रकार ऐकला म्हणजे नाव वाचलं. मग इथं म्हणजे मिपावर त्याची टीमटीम टीमकी वाजतेय म्हंटल्यावर गाणंसुद्धा ऐकलं...बोल भयानक आहेत पण र्हीदम बरा आहे...
बाकी आजकाल लोकांना ज्याचा भडीमार करु ते आवडतंय.
4 Dec 2011 - 12:04 pm | चिंतामणी
मग तु नळीवर हे आले.
म्हणून बारामतीकर लिवते झाले.;) ;-) :wink:
असो.
लिहायला लागले हे चांगले आणि चांगले लिहीले आहे.
4 Dec 2011 - 1:09 pm | अविनाशकुलकर्णी
गाण आवडल...
निदान यात..अल्ला..गरीब नवाज..खुदा. रेहमतुल्ला.....तरी नाहि..
आता
मिसळ्पाव..मिसळ्पाव.. कांदा लिंबु रस्सा पाव डी..
भज्जी नक्को .. वडा नक्को...मिसळ्पाव मले हवा.. डी
असे गाणे यावे हि ईच्या...
4 Dec 2011 - 4:14 pm | नगरीनिरंजन
लै भारी रे. आक्षी सेम टू सेम वाटत होतं. तू बरोब्बर लिहीलंस.
चेपुवर प्रत्येक जण तेच चिकटवतोय आजकाल.
हे लै भारी. मी एकटा नाही हे पाहून बरं वाटलं.
4 Dec 2011 - 6:00 pm | वेताळ
मी माझ्या मोबाईल मध्ये टाकले व माझ्या २ वर्षाच्या पोरीला ते एकवले त्यावर ती मस्त नाचते.
बाकी संगीत म्हणजे मनाला क्षणभर विरंगुळा देणारे एक मनोरंजन साधन आहे.गाण्यात जास्तीत जास्त पारंपारिक वाद्याचा वापर केला आहे. संगीत फक्त रागदारीवर अंवलबुन असते हा गैसमज सोडला तर आपल्याही आवडेल.
आपले अतुल आणि अजय देखिल असेच फर्मास संगीत बनवतात.
5 Dec 2011 - 9:53 am | सुहास झेले
अणुमोदन :) :)
5 Dec 2011 - 3:39 pm | रम्या
धमाल मुलग्या ! हसून हसून मेलो रे ! इकडे माझं हसणं बघून लोकं तोंडाकडे पाहतायत माझ्या :)
8 Dec 2011 - 5:57 pm | चिंतामणी
>>>एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी"
असा होता का रे तो ७-८ वर्षाचा बाळकृष्ण
6 Dec 2011 - 12:30 am | राघव
झक्कास चीरफाड!! चालु देत! :)
राघव
6 Dec 2011 - 2:35 am | विकास
6 Dec 2011 - 7:50 am | माझीही शॅम्पेन
:)
खपलो :)
6 Dec 2011 - 10:12 am | प्यारे१
क्लास्स्स विडंबन.
10 Dec 2011 - 3:54 pm | प्रदीप
हा जेनेरिक हिटलर व्हिडीयो छान आहे, अनेक प्रसंगावर त्याला बेतता येते.
'सिरी'चा उल्लेख विशेष वाटला (अति अवांतरः सिरी अॅबोर्शन क्लिनीक्सचा पत्ता सांगत नाही, म्हणून अॅपलवर निदर्शने होणार आहेत म्हणे!)
7 Dec 2011 - 11:21 pm | पक पक पक
व्हाय धीस गालावरी गालावरी ..गालावरी डी
बारांमतीच्। बटाटा....
8 Dec 2011 - 5:47 pm | किचेन
>>हे काय कौव्वं कौव्वं करतंय ते आधी कळेनाच, पण ते पुढं होली आहे म्हणजे बहुतेक त्याला काऊ म्हणायचं असावं. आता ह्याच्या 'लौव्वं' मध्ये ती कौव्वं काय दुध घालायला आली होती की चारा खायला?
मला पण हि काऊ (त्याच्या भाषेत कावं) कळलेली नाही.आयला लव च्या मध्ये कावं कशाला?
पहिल्यांदा अस वाटल कि कदाचित ती चांन्दीच्या पेल्यात दुध द्यायला आली असेल.पण इथे याचा तर प्रेमभंग झालाय.म्हणून तर तो दारू पितोय.
काऊ वसुबारसेला लागते.होळीला नै.
शेवटी तो म्हणतो तेच खर 'वी हव नो चोइस'
----------------------------------
का लिहील हे कोलावारी कोलावारी दि.
---------------------------------
10 Dec 2011 - 2:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
साल १९५७
परवाच आपला घरी बसून निवांत टिवल्याबावल्या करत होतो. तेव्हढ्यात चाळीतला वय वर्ष ७-८ चा कार्टा फिरत फिरत आमच्या घरी प्रवेश करता झाला. एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "ईना मीना डिका, डाय डामानिका". मी चमकुन त्याच्याकडं पाहिलं, तर ह्याला कशाचं काहीच नाही. गातोय आपला जोरजोरात. काय ही पोट्टी, काय काय ऐकतात त्या रेडिओवर, कळो न कळो, आपलं म्हणतच सुटायचं! मग मीच खेकसलो, " एऽ गप रे. तुझं वय काय, तू गातोयस काय? आँ? जरा चार चांगल्या गोष्टी ऐकाव्या माणसानं." त्या बाळासाहेबांनी एकदम 'अरे! आत्ता तर बरा होता की हा...' असा एक दयाद्र(?) कटाक्ष टाकला, आणि बिफिकीरपणे दुसऱ्या खोल्या उंडारायला निघून गेले........
(ज्याला हौस असेल त्याने मूळ लेखातले इतर परिच्छेद पण याच वळणाने बदलून वाचावेत )
साल २०११
कालच युट्युब वर टिवल्याबावल्या करत होतो. असाच किशोर कुमार ची गाणी ऐकताना ईना मीना डिका चा व्हिडीओ दिसला. अनेकदा ऐकलेले हे गाणे परत ऐकले. काय मस्त गायलेय हे गाणे किशोरदाने. जियो किशोर आणि आशा.....
10 Dec 2011 - 2:26 pm | गणपा
प्रचंड सहमत. :)
11 Dec 2011 - 4:41 pm | पक पक पक
बोलले ! बाळा साहेब बोलले !!
12 Dec 2011 - 7:51 pm | आत्मशून्य
आता सूरूवातच जर ही असेल तर गाणं स्पश्ट, सहज,व मस्त असणारच ना, सर्वसामान्य लोकांच्या वेदना व भावना किती मिश्कीलपणे व्यक्त केल्यात, म्हणूनच याला लोकांचा इतका सपोर्ट मिळालाय.... आपल्याला त्यांचे तमीळ उच्चार जरी विचीत्र वाटले तरी गाणं मस्तच आहे.
हँडला ग्लास, ग्लासला स्कॉच, आइस फूल्ल ओफ बिअर्र....
एकदम मित्रांची मैफीलच डोळ्यासमोर येते ना राव....
एम्टी लाइफ गर्ल कम्म लाइफ रिवस गीअर्र....
आहाहा यात "लाइफ रिवस गीअर्र" हे वाक्य त्याने अशा काय आर्ततेने म्हटलयं त्याने की थेट काळजालाच जाऊन भिडतं....
तसचं
ग्वाडं आय्य्म डाइंग नॉव्व, शी इज हॅप्पी हॉव्व ?
बसं.... सरळ देवदासच आठवतो.... आहे का कोणी आदलं मधलं ?
धिस साँग इज फॉर सूप ब्वाइज्ज
वि डोंट हॅव च्वाइस....
सूप्पर... एखाद्याची मनाला भिडणारी विवशता / कैफीयत व्यक्त व्हावी तर ती अशीच, हवच कशाला शब्दांच काव्यमय जंजाळ ?
13 Dec 2011 - 6:50 pm | सोत्रि
आ.शू.
मस्तच रे! असेच म्हणतो.
- ( सोकाजी त्रि) सोकाजी
13 Dec 2011 - 4:16 pm | चिगो
र्हिदम चांगला आहे रे गाण्याचा.. एकदम ढिच्यँग-ढिच्यँग.. आणि आजकाल थोडाफार टैमपास करणारी, येडचाप गाणीच आवडतात पब्लिकला.. सिरीयस व्हायला पवार, अण्णा, लोकपाल वैग्रे आहेतच की...
मलाही टाईमपास म्हणून आवडलं हे गाणं.. आणि पोराटोरांना काय, वारंवार ऐकायला मिळाली की तीच ती गाणी म्हणतात..
माझा पुतण्या (वय वर्षे ४) " बचपन तो गया, जवानी भी गयी" हे त्यातल्या "ला ला लाला" मुळे म्हणत असतो.. मी ते एंजॉय करतो, आणि त्याला पसायदान, मंत्र वगैरे पण येतात ह्याचंही कौतूक आहेच...
13 Dec 2011 - 7:43 pm | चिंतामणी
यात अजून एक भर पडली आहे.
Enjoy :) :-) :smile: