पार्श्वभूमीकरिता पहा - विष्णुगुप्त २
(भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे -
"विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे. किती वर्षांनंतर भेटतो आहोत आपण!"
"खरंच रे!" विष्णु मिठी सोडवत म्हणाला, "तुम्ही सर्वांनी मगध सोडलंत, आणि आम्ही एकटे पडलो."
"त्या नीच धनानंदाच्या कारभाराला कंटाळून. सर्व-सामान्यांना जगणंच कठीण करून ठेवलं आहे त्यानं. फक्त पाटलीपुत्रच नाही, तर मगधाच्या खेडोपाड्यात राहणार्या आचार्यांनाही स्थलांतर करावं लागलं आहे."
"ठाऊक आहे मला. तुम्ही पाटलीपुत्र सोडलंत, पण तुमची कुशलवार्ता मला अजेय कडून कळत होती. शिवाय तक्षशिला ही तर ज्ञानभूमी आहे. इथे तुम्हाला चिंतेचं काही कारण नसावं."
"खरं आहे. पण पाटलीपुत्र ते तक्षशिला हा प्रवास काही सुखद नव्हता, त्याचा प्रत्यय तुलाही आला असेलच की. ह्या दोन शहरांना जोडणार्या मुख्य राजमार्गावर - उत्तरापथावर ठिकठिकाणी लुटारूंची वसती आहे. त्यामुळी आम्हाला लपत-छपत आडमार्गाने छोट्या छोट्या गावांमधून मार्गक्रमणा करत यावं लागलं"
हे ऐकून विष्णुची मुद्रा एकदम उग्र झाली. "अरे लुटारू कसले! त्या लुटारू राजाचेच सैनिक आहेत ते. राज्य सोडून जाणार्या नागरिकांचं धन हडप करून राज्याची तिजोरी भरण्याचे आदेश देण्यात येतात. मी इथे येताना कर्मधर्मसंयोगाने एका व्यापार्यांच्या कळपाबरोबर मिसळलो, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ह्या व्यापार्यांकडे स्वतःचं सैन्य असतं आणि शिवाय दरवर्षी राज्याला त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असल्यामुळे राजा त्यांना अजिबात हातसुद्धा लावत नाही."
"पण विष्णु, मला खरंच तुमचं आश्चर्य वाटतं. इतक्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा तुम्ही पाटलीपुत्रामध्येच रहात आहात. तुझे वडील अगदी निर्भयपणे राजाविरुद्ध जनमत संकलित करत आहेत."
"आहेत नाही ... होते.."
"क्काय??? म्हणजे ... मला समजलं नाही."
एक प्रदीर्घ श्वास घेऊन विष्णु म्हणाला, "इन्दु, माझे आई आणि तात, दोघेही आता ह्या जगात नाहीत."
इन्दुशर्माचे दोन्ही नेत्र विस्फारले. "काय!!!! अरे हे काय सांगतो आहेस तू विष्णु!".
विष्णुच्या चेहर्यावर आता कुठलेच भाव नव्हते. हृदयामध्ये अतीव दु:ख, त्वेष दाबून ठेवला असतानाही डोळ्यांमध्ये कुठल्यातरी विचारांचा दृढनिश्चय दिसत होता. इन्दुशर्माला विष्णुकडे त्या अवस्थेत पाहणं अशक्य झालं. त्याच्या खांद्यावर आपले हाताचे पंजे ठेऊन, त्याला बोलतं करावं म्हणून तो पुढे म्हणाला, "अरे विष्णु, काहीतरी बोल! राजाने काही... "
"होय. राजानेच. अगदी सर्व काही.... अगदी सर्व काही हिरावून घेतलं. भासुरकाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याच्या निमित्तावरून महामंत्री शकदाल आणि आमच्या घरावर दुष्टचक्र आलं. माझ्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना कुणालाही भेटणं निषिद्ध करण्यात आलं. राज्यामधला असंतोष अत्यंत बळाने दाबून टाकण्यात आला. अशातच राज्यात दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळेना. पण राजवाड्यातली कारंजी आणि पंचपक्वान्नांच्या पंक्ती ह्या दुष्काळाच्या दिवसांमध्येही जनतेकडून गोळा केलेल्या कराच्या जिवावर चालूच होत्या. माझ्या वडिलांनी अन्न-पाणी वर्ज्य केलं आणि काही दिवसातच तुरुंगातच प्राण सोडले. ही वार्तासुद्धा आमच्यापर्यंत खूप उशीरा पोहोचली. इकडे तुरुंगाबाहेरही आमचे अन्न-पाण्याविना हाल झाले आणि तशातच आई गेली. माझं असं कुणीच उरलं नाही. आमच्या कुटुंबाला पहिल्यापासूनच वाळीत टाकल्यामुळे तेथे काही शिक्षणाची आशाही उरली नाही. म्हणून मी इथे आलो."
इंदुशर्माच्या डोळ्यात पाणी तरारलं. "विष्णु, अरे माणसानं किती सोसावं, ह्यालाही काही मर्यादा असते रे!"
"पण असा मी एकटा नाहीये. माझ्या कितीतरी बांधवांनी हे सोसलंय, अजूनही सोसताहेत. सार्या भरतवर्षावर अवकळा आली आहे. राज्यकर्ते उन्मत्त होऊन स्वैराचार करत आहेत. आणि याचं मुख्य कारण संपूर्ण भरतवर्षातला शिक्षक समाज हा दुर्बळ झाला आहे. जो वर्ग आजपर्यंत समाज घडवत आला, तो ही ह्या राज्यकर्त्यांप्रमाणे स्वार्थी होत चालला आहे. राजाच्या मुलांना शिक्षण देताना स्वतःच्या मुलाला पिठाचं दूध प्यायला देऊन वाढवणार्या शिक्षकांची पिढी जाऊन आता शिष्यांकडून दाम घेऊन स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावण्यात तल्लीन होणार्या शिक्षकांची पिढी आली आहे. कदाचित त्यात चूक काहीच नसेल, त्यांच्या दृष्टीने, पण तो त्याग कुठेतरी हरवला आहे. माझा दृढसंकल्प आहे, की मी इथे सोळा वर्ष शिक्षण घेऊन अशी योग्यता मिळवेन, की ह्या संपूर्ण शिक्षकसमाजाला एकत्र करून एक न्यायी, संस्कारक्षम राष्टृ निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरीत करू शकेन."
विष्णुच्या या उद्गारांवर इन्दुशर्मा अगदी भारावून गेला. तो म्हणाला, "तू म्हणतो आहेस ते पटतंय मला, पण इथे तक्षशिलेत पाहशील, तर इथे तुला असेच त्यागी आणि आपल्या कामाला वाहून घेतलेले गुरुजन पहायला मिळतील."
"म्हणून तर मोठ्या आशेने मी इथे आलो आहे. माझा विचार आहे की आजच मी इथल्या कुलपतींना भेटतो आणि इथे शिक्षण लवकरच सुरू करण्याची अनुमती घेतो."
"अवश्य. पण आत्ता लगेच जाऊन काही उपयोग नाही. ते दुपारी भोजनापूर्वी काही काळ भेटू शकतील. तोपर्यंत आपण ह्या आवारात जरा फेरफटका मारून येऊ म्हणजे तुला या जागेचीही थोडी माहिती होईल."
प्रतिक्रिया
21 Nov 2011 - 5:32 pm | मदनबाण
सर्व भाग वेळ मिळताच वाचले जातील ! :)
इतक्या सुंदर लेखमाले बद्धल आभारी आहे.
हल्लीच एक पुस्तक वाचनात आले होते त्याची लिंक इथे देत आहे.
http://goo.gl/7P8ub
चाणाक्य मालिका पुन्हा पहायला मिळावी अशी फार इच्छा आहे. :)
21 Nov 2011 - 5:46 pm | मस्त कलंदर
इतकी मोठी गॅप घेऊ नका
21 Nov 2011 - 6:00 pm | प्रास
रोज एक शब्द टायपत होता ओ? ;-)
तरी छान लिहिता. हा भाग देखिल मस्त!
पुलेप्र (पण पुन्हा वर्ष घेऊ नका)
:-)
21 Nov 2011 - 8:56 pm | पैसा
ही मालिका मी वाचलेली आठवत कशी नाही! १८/१२/२००७ मग १/७/२०१० मग २१/११/२०११!! फारच गॅप पडली, पण तुमचं लेखन छान आहे. तुम्ही फार मोठा कॅनव्हास घेतला आहे. यातून आर्य चाणक्याचं सुंदर चित्र उभं राहील असं वाटतय. पुढचे भाग जरा लवकर द्यायला जमेल का?
21 Nov 2011 - 9:45 pm | चैतन्यकुलकर्णी
विष्णुगुप्तांचे वडील सामान्य शेतकरी होते असे कुठेतरी वाचले होते व त्यांच्याकडे मुलाला शिक्षण देण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्यांनी विष्णुगुप्तांना भिक्षुकीचे शिक्षण घेऊन कमवायला लागायला सांगितले होते. परंतु विष्णुगुप्तांना अधिक ज्ञान मिळ्वायचे असल्यामुळे ते पाटलीपुत्रात आले होते, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
आपण अधिक माहिती द्यावी.
लेखन मालिका लवकर पुर्ण करावी ही विनंती.
22 Nov 2011 - 10:16 am | पुष्कर
मलाही निश्चित अशी काही माहिती नाही. पण मी जे काही संदर्भ वाचले आहेत, त्यात असा उल्लेख कुठेही आढळला नाही. वडिलांच्या नावाबाबत दुमत आहे, परंतु ते शिक्षक असल्याचा उल्लेख मी पहिला. माझं वाचन फार नाही हे खरं आहे. पुढच्या भागात भासुरकाच्या मृत्यूचं गूढ ह्याबाबत लिहिणार आहे, तेथे चाणक्यच्या वडिलांबाबत आणखी थोडी माहिती येईल.
मी लिहीत असलेली लेखमाला ही, मी वाचलेले संदर्भ आणि दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका यांवर आधारित आहे. त्यातील गोष्टींची सत्यासत्यता मी पडताळून घेतलेली नाही. किंबहुना तसा माझा उद्देशही नाही. ऐतिहासिक संदर्भ असलेली एक कथा म्हणून तिचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ही कथा वाचून कोणतेही ग्रह मनात बनवू नयेत. यातील तपशिलांबाबत अधिक माहिती असल्यास/ काही तपशील चुकीचे निघाल्यास ते कृपया सप्रमाण लक्षात आणून द्यावेत ही विनंती. त्याचा नक्कीच उपयोग होईल.
22 Nov 2011 - 12:32 am | प्राजु
पुष्कर,
काय किती दिवस नमन करायचं बाबा?
हा विषय फार मोठा आहे.. आणि अतिशय गहन आहे.
नक्की पूर्ण कर लिहून. मागचे भाग वाचल्याचे आठवत नाहीयेत. एकदम सगळे वाचेन आणि प्रतिक्रिया लिहिन.
मात्र आता गॅप घेऊ नकोस. :)
22 Nov 2011 - 10:06 am | गार्गी_नचिकेत
लेखन शैली खूप छान आहे. ऐतिहासीक कथेचा बाजही जमून आल आहे. वाचताना प्रसंग डोळ्या समोर उभे राहिले. तिनही भाग मस्त आहेत. आणि त्यात "चाणक्य" म्हणजे, मेजवानीच. फक्त पुढचे भाग जरा लवकर लवकर लिहा.
22 Nov 2011 - 10:27 am | पुष्कर
सर्वांचे मनापासून आभार. ह्या लेखमालेमध्ये मी लावत असलेला अती वेळ ही खरंच चिंतेची बाब आहे. आपणा सर्वांचा राग मी समजू शकतो. उशीर होण्यामागची २ कारणे आहेत -
- एक तर मला पटापट काही सुचत नाही.
- शिक्षण चालू असल्यामुळे जेव्हा सुचेल अशी वेळ असते तेव्हा या विषयावर विचार करण्याजोगा मोकळा वेळ मिळतोच असं नाही.
तरीपण आपले सर्व व्याप सांभाळून वेळाच्या वेळी आपले साहित्य प्रकाशित करणार्या सदस्यांबद्दल मला आदर आहे, गैरसमज नसावा.
22 Nov 2011 - 10:31 am | पुष्कर
मदनबाण, सीडी रूपामध्ये ही मालिका उपलब्ध झाली आहे. आपल्या ओळखीचे कुणी आय.आय.टी मध्ये असल्यास तिथे तुम्हाला चाणक्य मालिकेचे सर्व भाग मिळू शकतील. लिंक बद्दल धन्यवाद.
मस्तकलंदर, प्रास, पैसा, प्राजक्ता, गार्गी_नचिकेत - सर्वांचे आभार. पुढील भाग लवकर देण्याचा प्रयत्न करीन.