कापसाचा उत्पादन खर्च.

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
18 Nov 2011 - 9:08 pm

कापसाचा उत्पादन खर्च.  

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.

उत्पादनखर्च १० एकर कापूस पिकाचा खालील प्रमाणे:

अ] भांडवली खर्च :

१) शेती औजारे-खरेदी/दुरुस्ती :           २०,०००.००

२) बैल जोडी :                                      ८०,०००.००

३) बैलांसाठी गोठा :                           १,००,०००.००

४) साठवणूक शेड :                           १,००,०००.००

--------------------------------------------------------------

अ] एकूण भांडवली खर्च :                 ३,००,०००.००    

-------------------------------------------------------------

ब] चालू खर्च (खेळता भांडवली खर्च)

१) शेण खत :                                                   १,२०,००० रु

२) नांगरट करणे :                                                 ८,००० रु

३) ढेकळे फ़ोडणे, सपाटीकरण :                             ४,००० रु.

४) काडीकचरा वेचणे :                                           ८,००० रु.

५) बियाणे :                                                        १८,६०० रु.

६) लागवड खर्च :                                                  ८,००० रु.

७) खांडण्या भरणे :                                               २,००० रु.

८) निंदणी/खुरपणी खर्च (दोन वेळा) :                   १५,००० रु.

९) रासायणीक खत मात्रा                                    २४,००० रु.

१०) रासायणीक खत मात्रा-मजूरी खर्च :                ८,००० रु.

११) सुक्ष्म अन्नद्रव्य :                                          ७,००० रु.

१२) किटकनाशके :                                             ३०,००० रु.

१३) फ़वारणी मजूरी :                                           ६,००० रु.

१४) कापूस वेचणी (६० क्विंटल) :                        ५२,००० रु.

१५) वाहतूक/विक्री खर्च :                                       ५,००० रु.

१६) बैलाची ढेप/पेंड :                                             ३,००० रु.

१७) बांधबंदिस्ती/सपाटीकरण खर्च :                    २०,००० रु.

--------------------------------------------------------------------------

ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                      ३,३८,०००.००

--------------------------------------------------------------------------

.

१) भांडवली खर्चावरील व्याज :                       ३२,०००.००

२) चालु गुंतवणुकीवरील व्याज :                      ५,०००.००

३) भांडवली साहित्यावरील घसारा :                ३२,०००.००

---------------------------------------------------------------------------

क] एकूण उत्पादन खर्च १+२+३      :              ९४,०००.००

---------------------------------------------------------------------------

अ] भांडवली खर्चावरील व्याज आणि घसारा :                    ६६,०००.००

ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                                    ३,३८,६००.००

क] एकूण उत्पादन खर्च १+२+३                                        ९४,०००.००

----------------------------------------------------------------------------------------------

एकूण उत्पादन खर्च अ+ब+क   :                                    ४,९८,६००.००   

----------------------------------------------------------------------------------------------

निष्कर्ष :

१) १० एकरात ६० क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :             ४,९८,६००.०० 

२) १  एकरात ६  क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :                  ४९,८६०.००

म्हणजेच

प्रती क्विंटल कापसाचा किमान उत्पादनखर्च  :  ८३१०.०० रु.   एवढा निघतो.

टीप :

१) दर चार वर्षांतून एकदा शेतीमध्ये ओला किंवा कोरडा दुष्काळ हमखास पडतच असतो. त्यामुळे उत्पादन खर्च काढताना चार वर्षाच्या लागवडीचा खर्च तीन वर्षाच्या उत्पादनावर/पीकावर लावणे गरजेचे आहे.  अशा तर्‍हेचा निकष औद्योगीक उत्पादनाचे मुल्य ठरविताना लावले जातच असते. त्या हिशेबाने प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १०,४००/- रुपयावर जातो.    

२) लागवडी खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, बैलांचा व पीकाचा इंन्शुरन्स धरला तर प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च ११,५००/- रुपयावर जातो.    

३) दुष्काळामुळे, महापुरामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी तसेच माकड, डुक्कर व वन्य श्वापदापासून होणारे नुकसान हिशेबात धरल्यास प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १३०००/- रुपयावर जातो.    

   

              वरिलप्रमाणे मी काढलेला कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.    

उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.    

१) १ शेतकरी व १ बैलजोडी १० एकर कापसाची शेती करु शकतो, असे गृहित धरले आहे.    

२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.    

३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.    

४) शेण खत, नांगरट, बियाणे, रासायनीक खते, किटकनाशके, सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षाही कमी खर्च हिशेबात धरला आहे.    

५) शेतमजुरीचा दर २००/- रू. धरलेला आहे.      

६) कपाशीच्या दुबारपेरणीचे संकट निर्माण झाल्यास त्यापोटी वाढणारा बियाणाचा खर्च हिशेबात धरलेला नाही.    

७) शेत जमीनीची किंमत आणि त्या भांडवली गुंतवणुकीवरील व्याज हिशेबात धरलेले नाही. त्यामुळे वडिलोपार्जीत शेतजमीन ज्यांच्याकडे नाही, त्यांनी शेतजमीन खरेदी करून कापसाची शेती करायची म्हटले तर उत्पादन खर्च आणखी वाढेल. 

८) वरील उत्पादनखर्चात काटकसर आणि बचत करायचा प्रयत्न केल्यास उत्पादन घटत जाते. तसेच खर्च वाढवायचा प्रयत्न केल्यास उत्पादनात वाढ होण्याची शक्यता बळावत जाते.
९) शेतीमधील खेळत्या भांडवल तुटवड्याचा पहिला मार जमीनीच्या पोत सुधारणीच्या कामावर पडतो. आर्थिक टंचाईमुळे शेणखत किंवा सेंद्रियखताचा वापर टाळला किंवा कमी केला जातो. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो पण उत्पन्नातही घट येते.
९) बागयती शेतीत उत्पन्नात वाढ होत असली तरी ओलिताची सुविधा निर्माण करण्यास लागणारी भांडवली गुंतवणूक, ओलितासाठी लागणारा मजुरी खर्च आणि विद्युत/डिझेलचा खर्च वाढत जातो म्हणून शेवटी जिरायती शेती असो की बागायती शेती; उत्पादनखर्च सारखाच निघतो.

तोट्याच्या शेतीचे दुष्परिणाम :

१) शेतीत येणारी तुट भरून काढताना शेतकर्‍याचे कुपोषण होते, म्हणून शेतकरी शरीराने कृश दिसतो.
२) सुखाचे व सन्मानाचे जीवन जगता येत नाही.
३) मुलभूत गरजा पूर्ण करता येत नाही.
४) ग्रामीण भाग ओसाड आणि भकास होतो.
५) शेतीत येणारी तुट भरून निघत नाही म्हणून शेतकरी वारंवार कर्जबाजारी होतो.
६) कापसाची शेती करताना कधीच भरुन निघणार नाही एवढी तूट आली आणि सातजन्मात फ़ेडता येणार नाही एवढ्या कर्जाचा डोंगर उभा  राहिला की, शेतकर्‍यात नैराश्य येते.
७) आयुष्य जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले की, तो मग नाईलाजाने विषाची बाटली किंवा गळफ़ासाशी सोयरीक साधून तुम्हा-आम्हा-सर्वांना सोडचिठ्ठी देतो.

   

                                                                                       -  गंगाधर मुटे    

--------------------------------------------------------------------------------------------------------

अर्थव्यवहारसमाजजीवनमानअर्थकारणराजकारण

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

19 Nov 2011 - 1:03 am | अर्धवटराव

जर एव्हढा खर्च येतो तर आज आंदोलक ६००० चाच भाव का मागताहेत?

अर्धवटराव

अश्फाक's picture

19 Nov 2011 - 9:11 pm | अश्फाक

प्रति एकर ६ क्विंटल , असे कोन म्हनतो ?
जमीन कोरड आहे कि बागायत ?
कोरड शेतकरी तुम्हि सान्गीतल्या प्रमने खर्च करु शकत नाही.
बागायत शेतकर्याचा उतारा इतका कमी येत नाही.
मी स्वत यंदा १२ एकर ठिंबक वर कापुस लावला ,आज पर्यन्त ( या सिझन चा )
खर्च ३ लाख , आजच ६५८४ किलो विकला ४४ च्या भवने = २९०००० / -
अजुन फर्दळ आनि उरलेला माल धरुन अंदाजीत ८००० किलो अपेक्षित आहे .

मला असे मुळीच म्हनायचे नाही कि कपसाचे भाव वाढायला नको ( माझच फायदा आहे ) , पन
वरिल विश्लेशन म्हनजे कै च्या कैच वाटले म्हणुन हे टंकन श्रम .

आगाउ सल्ला = आवाझ उठवायचाय तर रातो रात दुप्पट झालेल्या खतांच्या किंमती बद्दल उठवा ,
हे नक्किच पुढच्या सिझन चे बजट बिघडवनार आहे.

एक शेतकरी.. अश्फाक

तिमा's picture

20 Nov 2011 - 1:02 pm | तिमा

'अश्फाक' यांच्या बोलक्या प्रतिक्रियेने वास्तव कळले.

अश्फाक's picture

20 Nov 2011 - 2:54 pm | अश्फाक

शेत तवा मारुन ढेकाळ फोडुन सपाट करने ( आम्ही नांगरटी दर ३ वर्शांनी करतो )
८०० रु एकर = ९६०० /- ( भाड्याच्या ट्रेक्टर ने )
यंदा ४.५ एकर ला ठिंबक केले ( सबसिडि सहसह ) = ७०००० /- ( बाकीचे ठिंबक मागील ३ सत्रात स्टेप बाय स्तेप केले आहे )
बियाने ( राशी & मल्लिका ) = १६००० /-
रासायनीक खते ( एकरी २ युरिया - २ पोटेश - २ डि ए पी / २०-२०-० ) = २९००० /-
( शेन्खत असावेच असा काही कयदा आहे का ? आमच्या पुर्ण गावात फक्त २ धनिक शेतकरीच वापरतात त्याने
उतारा वाढतो निशित पन सर्वांना पेलवत नाही आणि दर वर्शी देने गरजेचेअसते असे ही नाही आम्ही सुधा फक्त
रासायनीक वरच अवलंबूण आहोत )
लागवड खर्च = ३००० /- ( तुमचा ८००० कसा? म्हनजे मजुराने एक रोज मधे किति कापुस टोचला , कळेल ?
निंदनी - कोळपनी ( ३ वेळा ) = ७०००० /- मजुर आनि भाड्याच्या औत ने .. ( इथे आपला हिशेब सपशेल चुकला आहे . )
कि टक नाशाक & फवारनी खर्च = १५००० /- ( )
कापुस वेचनी ४ रु किलो = २५००० नविन कापुस वजन्दार असतो म्हनुन कमित होतो जसा जसा सिजन पुढे जातो भाव वाढतात
सालदार चा साल = ४०००० /-
( इतर किर्कोड खर्च ३०-४०००० जसे मोटर दुरुस्ती , एलेक्ट्रीक बिल , .......... )

गैर समज नको पन मी स्वत शेती करतो आनि याच खर्चात करतो ,

तुमचे दोन्ही प्रतिसाद आवडले. माहितीपूर्ण आहेत.

>>लागवडी खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, बैलांचा व पीकाचा इंन्शुरन्स धरला तर प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च ११,५००/- रुपयावर जातो.

मुटे सर, जर पिकांचा इंन्शुरन्स असतो तर,दुष्काळामुळे, महापुरामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी इंन्शुरन्स कव्हर होत नाही का? जर होत असेल तर चार वर्षाच्या लागवडीचा खर्च तीन वर्षाच्या उत्पादनावर/पीकावर लावणे गरजेचे असू नये.

नेत्रेश's picture

19 Nov 2011 - 4:14 am | नेत्रेश

१) शेती औजारे-खरेदी/दुरुस्ती : २०,०००.००
२) बैल जोडी : ८०,०००.००
३) बैलांसाठी गोठा : १,००,०००.००
४) साठवणूक शेड : १,००,०००.००

यातील १ ठीक आहे. पण शेतकरी १ बैलजोडी अनेक वर्षे वापरतो. गोठा आणी साठवणुक शेड काही दर वर्षी नवी बांधावी लागत नाही. तो खर्च एकदाच केला तरी चालतो.

आणी या भांडवली साहित्यावरील घसारा रुपये ३२,०००.०० लावलेला आहे तो वेगळा.

एकदा हा घरारा लावल्यावर २, ३ आणी ४ हे वन्-टाईम खर्च वार्षीक खर्चाच्या हीशोबात पकडण्यात काहीच अर्थ नाही.

अन्या दातार's picture

19 Nov 2011 - 8:32 am | अन्या दातार

हेच टंकायला आलो होतो.

तसेच वरती अर्धवटराव विचारतात तो प्रश्नही मोलाचा आहे.

रेवती's picture

20 Nov 2011 - 9:16 pm | रेवती

अगदी हेच मनात आले.

मीनल's picture

19 Nov 2011 - 4:18 am | मीनल

कधी न वाचलेली माहिती आज कळली.
काही गुंतवणूक जास्त काळाची तर काही वार्षिक.त्यानुसार नफ्याचा विचार केला.

मन१'s picture

19 Nov 2011 - 10:04 am | मन१

शेतीमध्ये दहाएक एकर जागा असूनही ट्रॅक्टर का वापरला जात नाहीये?
टीव्हीवर तर हल्लीचे शेतकरी ट्रॅक्टर वापरताना दाखवतात.(ते खरेदी करण्याचीही जरूर नाही. भाड्याने मिळतात असे ऐकून आहे.)

तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी कशावर सबसिडी वगैरे मिळते का किंवा अल्पदराने कर्जपुरवठा वगैरे होतो का?
साठवणूकीसाठी सहकारी तत्वावर कुठेतरी किफायतशीर पद्धतीने प्रयोग झाल्याचे ऐकले आहे.
(साथवणुकीचे उत्पादन माहित नाही. )

नितिन थत्ते's picture

19 Nov 2011 - 10:30 am | नितिन थत्ते

ठोस माहिती पुरवल्याबद्दल मुटे साहेबांना लाख लाख धन्यवाद.

नीट वाचून पाहून मग प्रतिसाद देतो. सध्या हे आकडे बरोबर आहेत असे समजून वाचतो.

या ठिकाणी कापसाची उत्पादकता एकरी २.७ क्विंटल सांगितली आहे. तुम्ही ६ क्विंटल घेतली आहे. या हिशेबाने खर्च सरळ दुप्पट होईल.

'बैलाचा चारा' हा खर्च मुटे साहेबांनी जर-तर मध्ये का धरला आहे हे समजत नाही. तो तर खेळत्या खर्चात धरायलाच हवा.

त्या खेरीज फिक्स्ड कॉस्ट मध्ये शेतकर्‍याच्या कुटुंबाचा जगण्याचा खर्चही (किमान १ लाख रुपये?) धरायला हवा. तो धरलेला नाही. तो धरला तर खर्च अजून वाढेल.

आंदोलक इतका कमी भाव का मागत आहेत हा प्रश्न निर्माण होतो. परंतु वरचे डिटेल अभ्यासल्यानंतरच हे ठरवता येईल.

दादा कोंडके's picture

19 Nov 2011 - 1:15 pm | दादा कोंडके

दर वेळच्या लेखापेक्षा हा लेख आवडला. उगिचच हे नाही ते नाही म्हणण्यापेक्षा एव्हडा खर्च आहे म्हणून एव्हडी उचल मिळाली पाहिजे असं म्हणणं लॉजिकल आहे. अर्थात हे वरचे आकडे कमी जास्त वाटणार्‍या जाणकारांच्या प्रतिक्रीयांची उत्सुकता आहेच.

अविनाश खेडकर's picture

19 Nov 2011 - 1:02 pm | अविनाश खेडकर

मुटे साहेब सर्वप्रथम आपले आभार मानतो कि आपण शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी चर्चेसाठी घेतला आहे
आमचे आजोबा नेहमी म्हणायचे कि जुगार खेळणे वाईट. जुगाराने मांणुस जिवनातुन उठतो. जसजसा मोठा होत गेलो तेव्हा कळले की आजोबा ज्याला वाईट म्हनायचे तो जुगार शेतकरी किती शतकांपासून खेळ्तोय. भारतात शेती म्हणजे जुगारच! जुगारात माणुस आपल्या जवळील पैसा डावावर लावतो, जास्त पैशासाठी! शेतीतही शेतकरी मातीवर पैसा लावतो जास्त पैशासाठी. भारतात शेतीला व्यावसाय कधीच म्हनता येनार नाही. कारण व्यावसायामध्ये धोका फार कमी असतो. वातावरण व्यावसायावर तेव्हढा परिणाम करत नाही. व्यावसायिक हा बाजारानुसार उत्पाद्न करतो. पण शेतीत सगळे धोकेच आहेत. वातावरणाचा धोका, बाजारभावाचा धोका, व जुगाराव्यतिरिक्त शेती हा एकमेव प्रकार आहे जिथे कधी कधी तुमचा १००% लॉस होतो,म्हणजे लावलेल्या भाडवलातील एक रुपयाही परत मिळत नाही. त्यामुळेच की काय आज कित्येक शेतकरी आयुषातुन ऊठ्त आहेत.
तुम्ही जो खर्च मांडला आहे तो बर्‍याच अंशी बरोबर आहे पण काही मुद्याविषयी सहमत नाही. मी एका नामांकित बियाणेकंपनीत उत्पाद्न अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तरी खर्चाविषयी सविस्तर मी चर्चा करेल. आता तेव्हढा वेळ नाही. तेव्हा पुन्हा भेटुच

अविनाश खेडकर

अशोक पतिल's picture

19 Nov 2011 - 10:51 pm | अशोक पतिल

१) शेण खत : १,२०,००० रु
५) बियाणे : १८,६०० रु.
९) रासायणीक खत मात्रा २४,००० रु.
११) सुक्ष्म अन्नद्रव्य : ७,००० रु.
१२) किटकनाशके : ३०,००० रु.
इतका खर्च केला तर एकरी १०-१२ क्विन्टल उत्पादन यायला पाहिजे. हा खर्च बागायती शेतीला लागु होतो.

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2011 - 10:01 am | सर्वसाक्षी

गंगाधरराव

सविस्तर ताळेबंद आवडला. शेतकर्‍याला कष्टाचा मोबदला मिळालाच पाहिजे हे अगदी खरे.

पण एका प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. जर क्विंटलमागे ६०००-७००० रुपयांचा रोख तोटा होत असेल तर कुठला शेतकरी कापूस उगवेल आणि का? आणि समजा त्याने अट्टाहासाने कापूस उगवायचाच ठरवला तर पुढील वर्षीचा चार लाखाचा खर्च + गेल्या वर्षीचा चार लाखाचा तोटा असे आठ लाखांचे भांडवल तो कुठुन आणणार? आणि का आणणार? समजा त्याने आपली जमीन भाजीपाल्याला लावली तरी अधिक उत्पन्न मिळेल. अगदी जमीन पडीक ठेवली आणि पती-पत्नींनी मजुरी केली तरी वर्षातले फक्त अर्धे दिवस काम मिळुनही दोघे मिळुन महिना ६००० कमवु शकतात. मग शेतकरी असला भयानक तोटा सहन करुन कापूस पिकवतो हे पटत नाही.

अनेकदा कामगाराला काढायचे असले तर त्याची बदली दूरवर केली जाते. शहरातुन बाहेर ग्रामीण भागात गेले तर पगार घटतो, शिक्षणाचा प्रश्न येत असल्याने कुटुंब हलवता येत नाही आणि दोन संसारांचा खर्च पेलत नाही. मग तो कामगार नोकरी सोडतो आणि चार पैसे कमी असलेली दुसरी स्थानिक नोकरी शोधतो.

ज्या शेतकर्‍याकडे दहा एकर जमीन आहे तो अन्य काही पिकवेल, किमान कमी जोखमीचे व कमी गुंतवणुकीचे पीक शोधेल. किंबहुना अर्थचक्र गतिमान असेलेले पीक घेईल. कापसाला वर्षात एकदाच पैसे मिळतात त्या ऐवजी तो दररोज कमी पण रोख पैसे देणारी भाजी-पाला/ फळबागाईत वा फूलशेती करेल.

असे असूनही शेतकरी कापूस का पिकवतो? मी शहरी माणूस. मला शेतीतले ज्ञान नाही पण सामान्य माणूस म्हणुन साधा विचार केला असता हा प्रश पडतो

जयंत कुलकर्णी's picture

20 Nov 2011 - 9:02 pm | जयंत कुलकर्णी

अश्फाकजी,
आपल्या प्रामाणिकपणाचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. असली खरी गणिते मांडून तुम्ही राजकारणात यायचा मार्ग स्वतःच रोखला की वो !

असो. आपल्या सारख्या प्रामाणिक शेतकर्‍याची उन्नती व्हावी हीच प्रार्थना.

शेतकर्‍यांचे अजूनही अनेक किस्से येथे देता येतील. परवाच पेपरमधे आलेली विजबिलाची थकबाकीचे आकडे तर फारच बोलके आहेत. कित्येक म्हणजे लाखो शेतकर्‍यांनी विज जोडणी घेतल्यापासून बीलच भरलेले नाही. एकून १८०० कोटी असे अडकलेले आहेत. कसा भाव वाढवून द्यायचा हेच कळत नाही. :-(

मी ही अनेक शेतकरी फायद्यात शेती करतात हे बघितले आहे. विशेषतः हरियाना, आंध्र प्रदेश, व अगदी कोकणात सुद्धा. नाशीक पट्यात आता बिहारी मजूरांच्या टोळ्या द्राक्षाची शेती भाडेपट्याने करतात आणि त्यांना ती परवडते कारण ते पानाच्या दुकानावर चकाट्या पिटत उभे रहात नाहीत. त्यांना असा वेळच नसतो घालवायला. याच्या उलट तुम्ही आळंदीला/किंवा आजूबाजूच्या खेडेगावात जा. तुम्हाला रस्त्यामधे ठिक्ठिकाणी अनेक लोक सकाळपासून चकाट्या पिटत असताना दिसतील. मधे दुरदर्शन वर एका शेतकर्‍याची मुलाखत लागली होती. त्याने आंध्र प्रदेश मधील एका शेतकर्‍याला आपली शेती करायला दिली होती. त्याला जेव्हा विचारण्यात आले की तुम्हाला परवडत नाही तर त्यांना कशी परवडते तेव्हा त्याने पटकन खरे उत्तर दिले " आहो त्यांच्या घरातले सर्व तेथेच काम करतात नव्हं !"

भाव कितीही वाढवून दिला तरी उपयोग होणार नाही कारण २०,००० भाव कोणाला नको आहे ? तोट्यात जाणारा सरकारी उद्योग फायद्यात आणायचा सरकारी कंपन्यांचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ग्राहकावर स्वतःच्या अकार्यक्षमतेची किंमत लादणे. हे थोडे फार तसेच आहे.....

अर्थात कोरडवाहू गरीब शेतकर्‍यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते सोडवायलाच पाहिजेत याबद्दल दूमत नाही. पण आजवरचा अनुभव असा आहे की श्रीमंत शेतकरीच मलिदा खाऊन जातात आणि गरीब शेतकरी टाचा घासतो......

शेतकरी सहकाराने कसे पैसे खातात हे आपण साखरकारखान्यांमधे आणि सूत गिरण्यांमधे बघितलेच. (सूत गिरण्यांमधे कापसाचे शेतकरी आहेत आणि साखरकारखान्यांमधे उसाचे शेतकरी ) पवार साहेबांनी एका फटक्यात आपल्या खिशातील ६०० कोटी रुपये काढून त्यांना दिले. साखर कारखान्यांच्या निवडणूकात तर शेतकरीच लढवतात आणि मतदान करतात.... तेथे काय दिवे लावले जातात हेही आपण बघतोच.

या सगळ्याला मर्यादा आहे. करदात्यांचा पैसा आहे आणि ते ठरवू शकत नाहीत तो कसा खर्च करायचा, हा खरा कळीचा मुद्दा आहे, कारण त्यांची संख्या फारच कमी आहे व त्यांच्या मताची किंमत शून्य आहे. त्यांच्या फक्त पैशालाच किंमत आहे.

कोणाला या पैशाची पर्वा आहे... ?.....