तेव्हा आम्ही इचलकरंजीमध्ये दि. डेक्कन को-ऑप स्पिनिंग मिल इथे रहात होतो. बाबा तेव्हा दि. डेक्कन स्पिनिंग मिल मध्ये नोकरीला होते. डेक्कन मिल चा उल्लेख तेव्हा इचलकरंजीमध्ये 'डेक्कन' असाच व्हायचा. म्हणजे, 'तू कुठे राहतेस?' असं विचारलं की, 'डेक्कनला' इतकंच उत्तर पुरे व्हायचा. डेक्कन हा सीटीबस चा स्टॉप होता. तमाम टांगेवाल्यांसाठी घोडातळ(वाहनतळ तसं घोडा तळ) होता. म्हणजे डेक्कनला लोकं घेऊन आलेला टांगेवाला तिथे घोडा सोडून, त्याला चारापाणी वगैरे करायचा. तर असं हे डेक्कन. तेव्हा माझे तीन मामा इचलकरंजीतच रहात होते. काकाही गावभागात रहायचा. पण ही चुलत, मामे भावंडं 'उद्या डेक्कन ला येतो आम्ही' असं म्हणायची. 'आत्त्याकडे' किंवा 'काकाकडे' असं म्हणायची नाहीत. हे सगळं सांगायचं कारण इतकंच की तेव्हा डेक्कन हे प्रस्थ फ़ार फ़ार मोठं होतं. आशिया खंडातली ती तेव्हाची सगळ्यात टॉपला असलेली को-ऑप सेक्टर मधली मिल होती. आईचे वडील म्हणजे माझे आजोबा हे त्या मिल्स चे फ़ाऊंडर मेंबर आणि पहिले चेअरमन. योगायोगाने माझे बाबाही टेक्स्टाईल मध्येच आले आणि लग्नानंतर आई पुन्हा डेक्कनलाच आली. माझा जन्मही तिथलाच. इतक्या सगळ्या प्रकारे ते डेक्कन मनाच्या कोपर्यात अखंड पिंगा घालत असतं. ती मिल बंद पडली.. कामगारांची वाताहात झाली हा नंतरचा इतिहास..!! पण माझ्या आयुष्यातले फ़ुलपाखरी दिवस या डेक्कनच्या सान्निध्यात गेले. थोडीथोडकी नव्हे माझ्या वयाच्या १५ वर्षापर्यन्त मी डेक्कन मध्ये होते. प्रशस्त क्वार्टर्स, आजूबाजूला मोठी बाग, आंबा, पेरू, जांभूळ, चिंच, पपई, सीताफ़ळ ,रामफ़ळ , चिकू.. अशी सगळी झाडं त्या बागेमध्ये. लाल चुटूक मिरचीच्या फ़ुलापासून, मोगरा, जाई-जुई, देशी गुलाब, निशिगंध, कण्हेरी, कर्दळी अशी सगळी फ़ूल झाडं. बागकाम करायला, बाथरूम्स धुवायला नेमलेली माणसे.. असा सगळा जामा निमा होता. आम्हाला खेळायला प्रचंड मोठी लॉन्स होती. पंचगंगेपासून डेक्कन ने स्वत:ची पाण्याची पाईप लाईन घेतलेली असल्यामुळे.. संपूर्ण गावात पाण्याची बोंब असली तरी डेक्कन मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कधीच जाणवलं नाही. उंचच उंच डोलणारि नारळाची झाडं ही डेक्कन जवळ आल्याची खूण. गेट वर कायमच ४-५ वॉचमेन. त्यामुळे डेक्कनला रहात असणे ही अतिशय अभिमानाची बाब होती. डेक्कन होतीच तशी!!
अशा या डेक्कनचा गणपतीही तिच्या लौकिकाला साजेसा!! मूर्ती काही फ़ार मोठी नसायची पण देखावे इतके अप्रतिम की, डेक्कन तेव्हा गावाच्या बरीच बाहेर असूनही लोकं रिक्षा -टांगे करून देखावे पहायला यायचे गावभागातून. संभाजी औरंगझेब.. तो डोळे काढलेला सीन, एकदा मत्स्यकन्या आणि राक्षस, हनुमानाचा मेरू पर्वत उचलून आणलेला सीन, द्रौपदी वस्त्रहरण.. अशा सारखे देखावे होत असत. आणि गणपतीमध्ये १० दिवस कार्यक्रमही इतके क्लास.. मोरूची मावशी, शांतेचं कार्ट चालू आहे, टूर-टूर अशी भन्नाट नाटके, पंडीत भीमसेन जोशींचे गाणे, .. अशी सगळी दिग्गज मंडळी या डेक्कनच्या गणपतीत कार्यक्रम सादर करायला येत असत. हे कार्यक्रम डेक्कन च्या सगळ्याच नोकरदार वर्गाला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफ़त असत. तर या 'डेक्कनच्या गणपती'चे विसर्जनही इतके थाटामाटात व्हायचे.. की ज्याचं नाव ते!! डेक्कनचे स्वत:चे ट्रक्स होते दोन. त्यातला एका ट्रक च्या टपावर गणराज विराजमान होत आणि सगळा ओफ़िसर वर्ग आणि कामगार वर्ग.. कोणतेही स्पिकर्स वगैरे न लावता.. फ़क्त ढोल ताशाच्या ठेक्यावर.. झांझ आणि लेझिम च्या सोबतीने नाचायचा! बघणारे बघतच रहायचे!
असो... नमनाला घड्यापेक्षा जास्तीच तेल झालं हे!! पण हे सांगणं गरजेचं होतं.
माझे आजी-आजोबा (बाबांचे आई-वडील) तासगांवला असत. तिथे आम्ही दीड दिवसाच्या गणपतीला जात असू आणि ऋषी पंचमीला तासगांवचा रथोत्सव करुन डेक्कन ला परतत असू. आणि मग पुढे आठ दिवस डेक्कनच्याच गणपतीची धूम! इतरवेळी अधून मधून बाबा मोटरसायकल वरूनच तासगांवला सकाळी जाऊन संध्याकाळी परतत असत. असेच एकदा कधितरी गणपतीच्या आधी बाबा तासगांवहून परतले. तुफ़्फ़ान पाऊस होता. त्यामुळे बाबांसाठी लगबगीने दार उघडायला गेलेली आई.. मागच्या दारात साठलेल्या पाण्यावरुन पाय घसरून पडली आणि पाय फ़्रॅक्चर झाला. २१ दिवसांचे प्लास्टर बसले पायाला. गणपती तोंडावर आलेला. झालं!! आता आईला तासगांवला जाणे जमणार नव्हते. त्यामुळे मी, बाबा आणि भाऊ गणपतीसाठी २ दिवस तासगांवला जायला निघालो. शांताबाई म्हणून आमच्याकडे येणारी कामवाली आईजवळ थांबली. आई साठी बाबांनी दोन बांबूच्या काठ्या खालच्या बाजूला रबरी बूचे मारून आणून दिल्या होत्या. त्यामुळे त्या हातात घेऊन टेकत टेकत आई थोडं थोडं चालू शकत होती. पण तरीही.. तिला तसे तिथे सोडून फ़क्त २ दिवसासाठी सुद्धा तासगांवला जायला माझं मन तयार होत नव्ह्तं. तासगांवला न्यायसाठी आईने बरंच सामन सुमान, आमचे कपडे अस एका बॅगेत भरून दिले होते. निघायच्या आधी मी कशासाठी तरी स्वयंपाक घरात आले तर.. आई देवापुढे उभी होती आणि हात जोडून रडत होती.."या वर्षी काय माझ्याहातून सेवा नको आहे का रे तुला?" असं विचारलं तिने.. वयाच्या ७ व्या वर्षीही तिला तसं पाहून मला गलबलून आलं. पण मी बाहेर आले पट्कन. आणि आम्ही जाताना पुन्हा तिचे डोळे भरून आले. दोन दिवसांनी आम्ही परत डेक्कन ला आलो.. पुन्हा डेक्कनच्या गणपतीच्या धामधूमीत मश्गुल झालो. तशाही स्थितीत आईने दरवर्षी प्रमाणे उकडीच्या मोदकांचा नैवेद्य डेक्कनच्या गणपतीसाठी केला होता. यावेळी रात्री जेवणे आटोपून नाटके पहायला मी बाबा-भाऊच गेलो फ़क्त. सकाळ-संध्याकाळच्या आरतीलाही, यावेळी आई नव्हती. खूप काहीतरी खोल रूतत होतं. आई सोबत नाही म्हणून असेल किंवा माझं वय असेल.. किंवा दोन्ही असेल.. ! कारण डेक्कन मध्ये तशी चोर्यामार्याची भिती नव्हती.. रहदारीची भिती नव्हती. त्यामुळे मी एकटी डेक्कन मध्ये कुठे फ़िरत नव्हते असं नव्हे.. पण गणपती होता आणि जे चाल्लं होतं सगळं ते आईशिवाय चाललं होतं! कोणाशी बोलावं समजत नव्हतं.. आईशी बोलू शकत नव्हते, मी किती गम्मत जम्मत करतेय तिच्याशिवाय हे ऐकलं तर तिला वाईट वाटेल म्हणून सांगतही नव्हते. बाबांशी बोलले तर बाबांनी जवळच घेतलं त्यामुळे पुन्हा काय तेच बोलणार असंही वाटलं त्यामुळे घुसमट मात्र होत होती. आणि... तो गणपति जाण्याची वेळ झाली. अनंत चतुर्दशीला!!
सकाळ पासून अख्ख डेक्कन मिरवणूकीच्या तयारीला लागलं होतं. सगळे बागकाम करणारे माळी लोक फ़ुलांच्या माळांनी दोन्ही ट्रक सजवत होते.. ढोल-ताशे, झांझ पथकं, तयारीत उभी होती. लेझिम चे ढिगच्या ढीग गणपतीच्या आवारात येऊन पडले होते. मांडवात १०००च्या घरात कामगार लोकं जमली होती. सगळे साहेब लोक.. वेगवेगळ्या सूचना करत होते. गुलालाची पोती येऊन पडली होती. पताकानी ट्रक सजले होते. गणेश मूर्ति घेऊन बसणारे जास्तच ताठ मानेने फ़िरत होते. सुंठवडा, खोबर्याची बर्फ़ी, पेढे, चुरमुरे यांचा एकत्रीत वास दरवळत होता. जिथून ट्रक निघणार त्याच्या बाजूलाच डेक्कनचे भले मोठ्ठे गेस्ट हाऊस होते.. तिथल्या बाल्कनीत सगळ्या साहेब लोकांच्या बायका येऊन थांबल्या होत्या. आम्ही मुले.. चुरमुरे, फ़ुटाणे, बर्फ़ी तोंडात टाकत शेवटच्या आरतीची वाट पहात होतो... आरती चालू झाली.. आणि मंत्रपुष्प झाल्यावर मूर्ती हलवली. आणि मग ५-६ कामगारांनी मिळून ती ट्रक च्या टपावर जिथे गणराजांसाठी आसन केलं होतं तिथे.. 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..' च्या गजरात सावकाश ठेवली. पुन्हा एकदा गणपती बाप्पाचा गजर झाला.. आणि ढोल ताशे घुमू लागले.. झांझ आणि लेझिम च्या तालावर पाय थिरकू लागले.. वेगवेळ्या ठेक्यांच्या त्यांच्या कवायती झाल्या, गुलाल उधळला जात होता. बाबा त्यांच्या मित्रांसोबत आपला पदाचा आब राखत.. हलके हलके.. ठेक्यावर नाचत होते. आम्ही मुले ट्रक च्या मागच्या हौद्यात.. जमेल तसे नाचत होतो. सगळि धामधूम चालू होती. नदीवर बाप्पाला सोडायला जायचं होतं. ते ही हा डेक्कन चा बाप्पा होता. ट्रक हलला.. अगदी संथ गतीने... सरकू लागला. पुढे झांझ पथक, लेझिम खेळणारे.. नाचणारे.. मागे बाप्पाचा ट्रक आणी त्यामागे.. जे चालू शकत नव्हते, थोडे वयाने मोठ्ठे होते अशा लोकांना घेऊन जाणारा दुसरा ट्रक. अशी ही शानदार मिरवणून डेक्कन च्या गेटमधून बाहेर पडायलाच अर्धातास लागला. बेहोष असा माहोल होत..! वेड्यासारखं स्वत:ला झोकून देऊन नाचत होती सगळी मंडळी आणि आम्ही मुले सुद्धा. मात्र... गेट मधून ट्रक बाहेर पडताना.. मला आई दिसली. त्या गेस्टहाऊसच्या भल्या मोठ्या बाल्कनीत, पाठमोर्या झालेल्या या गणराजाला विसर्जनापूर्वी शेवटचा नमस्कार करताना.. हातातला काठ्या सांभाळत, अवघडून उभी राहिलेली आणि तशाही परिस्थितित दोन्ही हात जोडून पाठमोर्या गणेशाला मनोभावे नमस्कार करणारी आई... मला तेव्हा खूपच केविलवाणी, असाह्य वाटली. नाचणारे माझे पाय थांबले.. वाटलं ती आताही असंच म्हणाली असेल का.. 'बाप्पा.. माझ्याकडून सेवा करुन घ्यायची नव्हती बहुतेक यावर्षी तुला!!" राहून राहून मला आई आठवायला लागली. ती अशी असताना मी बाप्पाच्या मिरवणूकीत नाचू?? मन खायला लागलं. ढोल-ताश्यांचे आवाज मला ऐकू यायचे बंद झाले.. लेझिमवर थिरकणारे पाय मला दिसेना झाले. आणि परतवायचा लाख प्रयत्न करूनही अश्रू पापण्याबाहेर पडलेच. आणि मग कोण्या एका काकाने मला ट्रक मधून खाली उतरवले. आणि मी त्या गर्दितून वाट कढत बाबांच्या कानाशी जाऊन.. 'मी घरी जतेय' असं सांगून गेस्ट हाऊसकडे धूम ठोकली. तोपर्यन्त सगळ्या बायका गेस्टहाऊस बाहेर पडल्या होत्या. आई सुद्धा काठ्या टेकत टेकत घरापर्यन्त पोहोचली होती. पट्कन जाऊन तिला बिलगले.. आई म्हणाली.."काय गं जाणार नाहीस का मिरवणूकीत?" तसच तिला बिलगलेल्या अवस्थेत सांगितलं.. "अंहं!! मला नाही जायचा.. कंटाळा येतो मला." आता मात्र अश्रू परतवण्यात मी यशस्वी झाले होते.
हा प्रसंग आहे साधासाच पण आजही लख्ख आठवतो मला... नुकत्यात घडल्यासारखा. मनावर कोरला गेला असावा. या डेक्कन च्या आठवणी खूप आहेत. आता कधी इचलरंजीला जाणं झालं मामांच्याकडे, तर डेक्कन वरून जाताना नारळाच्या झाडांचे नुसतेच उरलेले बुरखुंदे काळजाला घरं पाडतात. एकेकाळी प्रचंड ऐश्वर्य पाहिलेली ही मिल... आता नामशेष झाली आहे!
- प्राजु
प्रतिक्रिया
28 Oct 2011 - 6:58 pm | प्रास
गणपतीतला लक्षात राहिलंसा प्रसंग छान उतरलाय.
काळाच्या ओघात काही गोष्टी हातातून निसटूनच जातात, आपण कितीही धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी, आणि राहतात त्या फक्त आत्ता तुम्ही व्यक्त केल्या तशा आठवणी. या आठवणीच आता सोबतीला राहतील पण त्यातली निरागसता आणि व्याकूळता एकदम चांगल्यापैकी प्रकटनात उतरली आहे.
आवडलं लेखन, तुमच्या कवितांसारखंच!
फक्त एक सोडून.
इथे बहुतेक द्रोणागिरी म्हणायचं असावं.
बाकी हा आठवणीतला गणपती आवडला....
:-)
28 Oct 2011 - 7:07 pm | स्मिता.
प्राजुताई, वाचता वाचता डोळ्यात पाणी तरळून गेलं.
वयाच्या ७व्या/८व्या वर्षीही किती संवेदनशील होतात तुम्ही. बहुदा या वयाच्या मुलांना अश्या गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे ही आठवण अगदी हळवी करणारी आहे.
28 Oct 2011 - 7:51 pm | गणपा
सुरेख लिहिलयस.
मिरवणुकीच वर्णन तर अस की प्रत्यक्ष त्या गर्दीचा एक भाग होऊन सार चित्र डोळ्यासमोर घडतय.
28 Oct 2011 - 8:32 pm | रेवती
हम्म...
लेखन आवडले. बंद पडलेली मील पाहवत नसणार आता.:(
29 Oct 2011 - 8:24 pm | इंटरनेटस्नेही
वा! वा! चान!! चान!!
29 Oct 2011 - 10:04 pm | पैसा
सगळ्या आठवणी हे अगदी कालपरवा घडलंय इतक्या सहज ओघात आल्या आहेत, मस्त!
मी परवाच्या दिवाळीत सांगलीला गेले होते, अगदी लहान असताना माझ्या वडिलांबरोबर सांगलीच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आता ते नाहीत, आणि गणपतीच्या देवळातले २ पगडीवाले गणपती, चिमण्यांचे थवे, हत्ती हेही सगळं नव्हतं. पाहून एकदम वेगळंच काहीतरी वाटलं.