सीमोल्लंघन

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
7 Oct 2011 - 5:17 am

दसरा!

रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.

पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह. आणि एका नवीन लढ्याची तयारी सुरू झाली.

रामासाठी युद्ध संपलं, तर पांडवांसाठी सुरू झालं. रामायणात विजयादशमी वादळानंतरची शांतता म्हणून येते. नवीन युगाची नांदी घेऊन येते. महाभारतात ती वादळापूर्वीची शांतता नोंदते. नवीन काहीतरी घडवण्यासाठीच्या अटळ लढ्याची ग्वाही घेऊन येते. इतरही काही समांतर स्थळं आहेत. रामाला त्याची पळवलेली सीता परत मिळाली. पांडवांना नाईलाजाने लपवून ठेवावं लागणारं त्यांचं स्वत्व परत मिळालं. अयोध्येच्या राज्याला राम परत मिळाला, तोही पांडवांच्या स्वत्वासारखा अयोध्येपासून नाईलाजाने दूर गेला होता.

म्हणून दसरा हा नवीन सुरूवातीचा दिवस. आपल्या आयुष्यावर पडलेल्या, स्वतःच घालून घेतलेल्या सीमा ओलांडायचा दिवस. नवीन राज्य घडवण्याचा दिवस. त्यासाठी लढण्याची शस्त्र हाती घेण्याचा दिवस.

अशी नवीन सुरूवात करणं हे सोपं नसतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.

कधी कधी नवीन सुरूवात म्हणजे केवळ कात टाकणं असतं. कधी ते अनोळखी प्रदेशात जाणं असतं. तर कधी ओळखीचा प्रदेश सोडून देणं असतं. कधी नवीन राज्याची घडी बसवणं असतं तर कधी हरवलेलं, जुनं राज्य ताब्यात घेण्यासाठी शस्त्र हातात घेणं असतं. कधी नवीन अक्षरं गिरवणं असतं, तर कधी पूर्वीची पुसून टाकणं असतं. कधी आहे त्याचा विस्तार करणं असतं तर कधी शून्यापासून सुरूवात करावी लागते.

इंग्लिश म्हण आहे, काही जण थोर म्हणूनच जन्मतात, काही थोरवी प्राप्त करतात तर काहींवर थोरपणा लादला जातो. तसंच सीमोल्लंघनाची गरजेच्या बाबतीतही म्हणता येतं. काही लोक जन्मजात भटके असतात, काही भटकेपणा शिकतात, तर काहींवर ही भटकण्याची गरज लादली जाते. जे काही कारण असेल, त्या कारणासाठी या दसऱ्यानिमित्त सर्वांनाच आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी, कुठच्या ना कुठच्या प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी शुभेच्छा.

विशेषतः प्रियालीला.

संस्कृतीसमाजप्रकटनविचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

शुचि's picture

7 Oct 2011 - 5:34 am | शुचि

लेख खूप आवडला. आजचा माझा दिवस वाईट गेला. राहून राहून हेच वाटत राहीलं की -

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: | स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: | व्यशेम देवहितं यदायु: || ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||.

म्हणूनच तो धागा ......

सुंदर स्फुट. ओघवतं झालं आहे लेखन.

आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.

कंफर्ट झोनमधून बाहेर पडायचं केवळ या एव्हढया एकच कारणासाठी आम्ही सहा महिन्यांपूर्वी आमची जुनी नोकरी सोडली. कंपनीने आम्हाला साडेचार वर्षांत भरभरुन दिलेलं. आम्हीही कंपनीवर एकनिष्ट पत्नी पतीवर जितकं प्रेम करेल त्यापेक्षा जास्त प्रेम केलेलं. कितीही वाईट दिवस आले तरी आपल्याला गुलाबी प्रेमपत्र मिळणार नाही याची खात्री झालेली. मॅनेजर, त्यांचे मॅनेजर हे बॉस न राहता नऊ - सहाच्या पलिकडे हाक मारता येतील असे मित्र झालेले.

पण तरीही कहीतरी खटकायला लागलं. आता जूनी झालेली कात टाकायला हवी याची जाणिव झाली आणि एका नाजूक दिवशी आम्ही सीमोल्लंघन केलं...

जाता जाता, तुम्ही प्रियालीतैंच्या सार्‍या लेखांचे दुवे दिले आहेत. पण तिथे तर सार्‍या लक्ष्मणरेखा दिसत आहेत. तैंनी या लक्ष्मणरेखा ओलांडून सीमोल्लंघन केलं असं समजायचं का? ;)

मुक्तसुनीत's picture

7 Oct 2011 - 6:20 am | मुक्तसुनीत

लेख अतिशय आवडला.

प्रवासाची मेटाफर जशी एकंदर सर्व गोष्टींना चपखल बसते त्यामधे स्थित्यंतर आलंच. मग त्याला सीमोल्लंघन म्हणा , स्थित्यंतर म्हणा. इंग्रजीतला चपखल वाक्प्रचार आहे "Overstaying one's welcome". तेही लागू आहेच.

असो. प्रत्येक सीमोल्लंघनात नव्या वाटा, नवी ठिकाणे आणि नवी क्षितिजे यांची हाक ऐकू येते. जोवर ही वृत्ती आपल्या आत आहे तोवर नव्या गोष्टींना मरण नाही.

क्रेमर's picture

7 Oct 2011 - 6:32 am | क्रेमर

नव्याच्या आशेने केलेले सीमोल्लंघन बळ देते. जुन्याला कंटाळून केलेले सीमोल्लंघन दुबळे करते. समस्त मानवजातीला विजयादशमीच्या शुभेच्छा.

कवितानागेश's picture

7 Oct 2011 - 3:49 pm | कवितानागेश

जुन्याला कंटाळून केलेले सीमोल्लंघन दुबळे करते.
सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2011 - 6:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संपूर्ण लेखातला आशावाद आणि पॉझिटीव्हीटी आवडली. अल्पकाळासाठी वाईट दिसणारी कृतीही दीर्घकालीन फायद्याची ठरू शकते आणि तसे निर्णय घेण्याची दृष्टी आणि क्षमता असावी.

व्यक्तीशः मला कंफर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा या स्फुटामधून लक्षात आलं. त्याबद्दल औपचारिक आभार मानत नाही.

प्रियालीचेही काही चांगले प्लॅन्स असतील त्यासाठी मनापासून शुभेच्छा.

आवडलं विशेषतः आरामक्षेत्रातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

अप्पा जोगळेकर's picture

7 Oct 2011 - 1:35 pm | अप्पा जोगळेकर

अशी नवीन सुरूवात करणं हे सोपं नसतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते.
हे तर भारीच.

स्वानन्द's picture

7 Oct 2011 - 1:41 pm | स्वानन्द

छान लिहीलंय.... आखीव चौकटीतून बाहेर येणं हे आवश्यकच. पण एक चौकट मोडली किंवा सोडली या आनंदात नवीन चौकटीत रमण्याची शक्यताही आहेच. तेव्हा.. थोडक्यात एका चौकटीची जागा दुसर्या चौकटीने घेतली एवढाच फरक होणार असेल तर तो फारसा मौल्यवान म्हणता येणार नाही.... खर्‍या अर्थाने कोणत्याही चौकटीच्या बंधनाचीच गरज भासणार नाही तो दिवस सोन्याचा!!

समीरसूर's picture

7 Oct 2011 - 1:48 pm | समीरसूर

शुभेच्छा आवडल्या.

कंम्फर्ट झोन शत्रू खरा...

--समीर

स्मिता.'s picture

7 Oct 2011 - 2:14 pm | स्मिता.

दसर्‍याच्या निमित्ताने लेखात मांडलेले विचार आवडले.

नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.

बहुतेक वेळा हे असंच होत असतं आणि आपण सहज शक्य असलेले बदल नाकारत जातो. आपल्या सुरक्षीत चौकटीबाहेर पाऊल टाकणे म्हणजेच खरे सीमोल्लंघन हे पटले.

जाता जाता प्रियालीताईंच्या लेखांचा दुवा का दिला ते कळलं नाही.

विचार प्रकटन खरोखरीच चिंतनीय .

कंफर्ट झोन सोडून बाहेर येणं याची नेहमीच गरज असतेच का?

मला सीमोल्लंघन जमेल का याचा विचार करते आहे ......

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2011 - 5:28 pm | राजेश घासकडवी

कंफर्ट झोन सोडून बाहेर येणं याची नेहमीच गरज असतेच का?

थोडक्यात उत्तर 'गरज नसते'. मात्र आपण आपल्यासाठी जे क्षेत्र आखून घेतलेलं आहे त्याची सीमा ओलांडायची भीती वाटते की त्या क्षेत्रावर आपलं इतकं प्रेम आहे की बाहेर जाण्याची गरज भासत नाही यावर ती गरज ठरते. लेखन करण्याची मनस्वी आवड असणाऱ्याला, 'जा, तू बंजी जंपिंग करून बघ' म्हणण्याचा उद्देश नाही. पण लेखनाच्याच क्षेत्रात आपण नेहमी लिहितो त्यापेक्षा काहीतरी वेगळं लिहून बघणं हे सीमोल्लंघन ठरू शकतं. तेही करण्याची गरज असतेच असंही नाही. पण स्वतःला ती गरज आहे का हा किमान प्रश्न तरी विचारून बघावा, इतकंच.

मराठी_माणूस's picture

7 Oct 2011 - 2:52 pm | मराठी_माणूस

बर्‍याच लोकांचा असा सुध्दा अनुभव असतो कि , त्यांनी कंफर्ट झोन सोडुन बर्‍याच गोष्टी मिळवल्या पण पुर्वीचे समाधान मात्र हरवले

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Oct 2011 - 3:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मस्त प्रकटन, राजेश. कंफर्ट झोन बद्दल लिहिलेले पटले. गेले बरेच दिवस याचाच विचार करत होतो.
काल सीमोल्लंघन करायचा निर्णय घेतला आहे. दान मनासारखे पडले तर ....

विमे

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2011 - 8:41 pm | प्रभाकर पेठकर

नक्कीच मनासारखे दान पडेल. आत्मविश्वास हवा आणि संघर्षाची मानसिक तयारी हवी.

शुभेच्छा....!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Oct 2011 - 10:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

धन्यवाद काका. सल्ला लक्षात ठेवीन.

प्रभो's picture

7 Oct 2011 - 8:47 pm | प्रभो

मस्त प्रकटन

जागु's picture

7 Oct 2011 - 3:46 pm | जागु

छान लेख. आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2011 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

फारच उत्क्रुष्ठ .... आपला गुर्जींना सलाम........... :-)

अविनाशकुलकर्णी's picture

7 Oct 2011 - 5:40 pm | अविनाशकुलकर्णी

बर्‍याच लोकांचा असा सुध्दा अनुभव असतो कि , त्यांनी कंफर्ट झोन सोडुन बर्‍याच गोष्टी मिळवल्या पण पुर्वीचे समाधान मात्र हरवले
+१

फार किंमत मोजावि लागते..
काहि वेळा घाट्यात येतो माणुस

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2011 - 5:54 pm | राजेश घासकडवी

बरोबर. मराठी_माणूस व अविनाशकुलकर्णी यांनी उत्तम मुद्दा मांडलेला आहे. आपलं आधी चांगलं चाललं होतं, कशाला या मृगजळाच्या मागे धावून हाती होतं तेही घालवून बसलो, असा प्रश्न पडू शकतो. पण तो दोष सीमोल्लंघनाचा म्हणता येत नाही. आपल्याला नवीन काहीतरी हवं आहे असं एके काळी मनापासून वाटलेलं असतं. ते हाती येईल असंही वाटलेलं असतं. हातचं किती मौल्यवान आहे याची पूर्ण कल्पना आलेली नसते. दुर्दैवाने स्वप्नांच्या मागे धावणं हे वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांनी भरलेलं असतं. ते धोके आहेत म्हणून प्रवास थांबवावा का? जर हाती आहे तेच सर्वोत्तम आहे अशी खात्री असेल तर तुम्हाला स्वप्नांच्या सायरेनपासून धोका नाहीच, कारण तुम्हाला हवं आहे त्याच क्षेत्रात तुम्ही आहात. मात्र 'माझं स्वप्न दूर तिथे कुठेतरी आहे, पण काय करू, या कंफर्ट झोनमध्ये बरं वाटतं', अशी परिस्थिती असेल तर स्वप्नांच्या दिशेने किमान पावलं टाकावीत एवढाच संदेश आहे.

मराठी माणूस यांची शंका आणि घासूगुरु़जींचे शंका समाधान दोन्हींना +१.

कधी कधी स्वप्नांच्या मागे धावताना "आ बैल मुझे मार" होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशा वेळी गुरुजी म्हणत आहेत तशी आपली "अ‍ॅसेसमेंट" चुकली म्हणायची.

वपाडाव's picture

11 Oct 2011 - 10:46 am | वपाडाव

माझं स्वप्न दूर तिथे कुठेतरी आहे, पण काय करू, या कंफर्ट झोनमध्ये बरं वाटतं', अशी परिस्थिती असेल तर स्वप्नांच्या दिशेने किमान पावलं टाकावीत एवढाच संदेश आहे.

वाह !! वाह !!!
काय निरसन केलंय.....
लाजवाब.....
गुर्जी लेख तर झ्याक झालायंच अन त्यावर हे वाक्य म्हणजे सोने पे सुहागा......
लगे रहो.....

सन्जोप राव's picture

7 Oct 2011 - 6:13 pm | सन्जोप राव

लेख रुढार्थाने आवडला. त्यातून क्रिप्टिक अर्थ अभिप्रेत असेल तर त्यात रस नाही. क्षमस्व.
सुरक्षिततेचे वलय भेदून बाहेर पाऊल टाकणे, सतत नवनवे धोके पत्करत राहाणे यात एक नशा, झिंग असली तरी ते प्रत्येकालाच जमते किंवा जमावे असे नाही. ती एक मानसिकता असते. कानकाप्या गॉफ, जुगारी दायस्तोवस्की, लिंगपिसाट मोपासां हे एका बाजूला आणि मचूळ, कोमट आयुष्ये रेटत राहाणारी जनता दुसर्‍या बाजूला यांत खरे-खोटे, चूक-बरोबर असे ठरवता येणार नाही. सीमोल्लघंनाची गरज असलेल्यांनी ते जरुर करावे. ( दिल्लीत दूरदर्शनवर पुलं फारच रमताहेत असे ध्यानात आल्यावर त्यांना तसा सावधानतेचा इशारा देणार्‍या सुनीताबाई आणि ताबडतोब जेवणाच्या टेबलावर राजिनामा खरडणारे पुलं - हे अस्सल मराठी उदाहरण आहे.) एरवी काहीतरी फक्त जुने झाले आहे म्हणून ते मोडण्याचा अट्टाहास करण्यात अर्थ नाही. पण परत वर म्हटले तसे. काही लोकांना हे जमते, नव्हे आवश्यकच वाटते; काही सरळ रेषेसारखी आयुष्ये जगत असतात. यांतील दोहोंना दुसरा विचित्र आहे असे वाटते.

चतुरंग's picture

7 Oct 2011 - 6:46 pm | चतुरंग

कित्येकदा इतरेजन जसे उंदीरशर्यतीत उरस्फोड करुन धावत असतात तसे न धावणे आणि आपल्या मनाला जे १००% पटते आहे तीच गोष्ट करणे हे सुद्धा एकप्रकारचे सीमोल्लंघनच म्हणायला हवे.
कंफर्ट झोन कधी सुरु होतो? तो सुरु झाला आहे की नाही? हे प्रश्न स्वतःकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकणार्‍या प्रत्येकाला पडतात किमान पडायला हवेत. नेहेमीच्या दिनक्रमातला उत्साह, न समजणार्‍या कारणाने, भिजलेल्या कागदासारखा लुळा पडत असला तर तुम्ही कंफर्टझोन मधे आहात असे समजायला हरकत नाही. बदलाची भीती ही प्रत्येकाला असते. प्रत्येक बदलात काही मिळवणे आणि काही गमावणे हे सुद्धा असतेच.
काहीवेळा परिस्थितीने तुमच्यावर सीमोल्लंघन करण्याची वेळ येते आणि ते खरोखरंच अवघड असते. यात एकतर आगीतून तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखा माणूस झळाळून उठतो किंवा साफ कोलमडून पडतो.
करायचे म्हणून सीमोल्लंघन करणे यालाही फारसा अर्थ नाही. जोपर्यंत ती जाणीव तुम्हाला आतूनच अस्वस्थ करत नाही तोपर्यंत असे लादलेले बदल फारसे उपयोगी ठरत नाहीत.

-चतुरंग

सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा

दिपक's picture

8 Oct 2011 - 9:39 am | दिपक

कधी कधी नवीन सुरूवात म्हणजे केवळ कात टाकणं असतं. कधी ते अनोळखी प्रदेशात जाणं असतं. तर कधी ओळखीचा प्रदेश सोडून देणं असतं. कधी नवीन राज्याची घडी बसवणं असतं तर कधी हरवलेलं, जुनं राज्य ताब्यात घेण्यासाठी शस्त्र हातात घेणं असतं. कधी नवीन अक्षरं गिरवणं असतं, तर कधी पूर्वीची पुसून टाकणं असतं. कधी आहे त्याचा विस्तार करणं असतं तर कधी शून्यापासून सुरूवात करावी लागते.

हे वाचुन एक जुना लेख आठवला !

यंग ऍण्ड एनर्जेटिक.. रहायला तर हवं...पण कसं? भारंभार क्रीम चोपडलं,हजारदा केल्या पार्लर्च्या वार्‍या तरी वयाच्या सुरकुत्या कधी ना कधी चेहर्‍यावर चढणारच ना? कितीही घातले ट्रेण्डी कपडे आणि वापरल्या कार्गो पॅण्टस तरी लागतेच ना धाप चार जिने चढल्यावर? ट्रेकिंगसाठी तुडवलेल्या वाटा आता दमचाक करवतातच...

प्रश्न करायचं काय?..........करता येईल खरं तर............

तुमच्या मोबाईल मध्ये वर्षानुवर्षे सेव्ह केलेले काही नंबर्स आहेत? काही मेसेजेस? ताबडतोब डिलीट करुन टाका.

जे मोबाईलचं तेच डोक्याचं. जुन्या तारखा , जुनी भांडणं , कधी काळी कमी असलेल्या वजनाचे आकडे, कुणाला कोणत्या तारखेला भेटलो ते तपशील काढुन टाका डोक्यातुन हे सारं कोंबलेलं. बघा ..... हलकं वाटेल. नवं काही सेव्ह करायचं तुमच्या मेमरी मध्ये तर स्पेस नको तयार करायला? अपडेट करा तुमची सिस्टिम!!!!!

कोणाशी मैत्री आहे तुमची? जे सारखे किरकिर करतात? त्यांना जगण्यात रस वाटत नाही ? सतत उदासवाणी रडगाणी गातात? आपलं काहीच कसं खरं नाही , सगळं जगच कसं वाईट आहे. लोक कसे वाईट्ट आहेत , आपल्या वाईटावर टपले आहेत अशी सतत भुणभुण करतात तुमच्या डोक्याशी? ताबडतोब मैत्री तोडुन टाका त्यांच्याशी. असे उदास जंतु तुमचं आयुष्य कुजवुन टाकतात. त्यापेक्षा भरभरुन आनंदी जगणार्‍याम्च्या सहवासात रहा. आनंदी रहा... आणि हो तुम्ही कोणत्या गटात येता? ते पण एकदा तपासुन पहा.

शिकत रहा. मजा येते शिकताना. काय वाट्टेल ते शिका. तुम्हाला येत नसलेली अगदी लहानात लहान गोष्ट शिका, मेंदुवर गंज चढु देउ नका. मेंदुला सतत उद्योग असलेला बरा. तो खुष, आपण खुष. रिकामं डोकं भुताचं घर असतं माहितेय ना? मेंदुला काम दिल की तो रंग भरायला लागतो.

तुम्हाला पाणी पुरी खायला आवडते? भेळ? लालचुटुक बरआहा गोळा? बुढ्ढी के बाल खाताना अजुनही मजा येते? मग करा ना ते !!!!! अगदी लहान छोट्यात छोटी गोष्ट करायला आवडत असेल ते मनापासुन करा. मजा येईल. आपण मोठ्ठे झालो , आता अमुक तमुक करणं बरं दिसेल का असा फ़ालतु विछा आजिबात करायचा नाही. मनापासुन हसा. हसत रहा. ज्यांच्याबरोबर राहुन तुम्हाला हसावसं वाटतं त्यांच्याबरोबर रहा. इतरांना हसवा,दिलखुलास हसा. दिवसातुन एकदा तरी.......!!!!!!!!

त्रास होतोच ना..! माणसांचा होतो घटनांचा होतो,शब्दांचाही होतो. पण त्रास झाला की सोडुन द्यायचं. उगीच मन कुरतडत बसायचं नाही. ज्याने त्रास दिला तो एकदाच दिलेला असतो; पण ते सतत आठवुन स्वताचा त्रास वाढवायचा,वागवायचा. त्या त्रासाच्या आणि चिडचिडीच्या ओझ्याने आपलं जगणं गुदमरतं. "गेला उडत" असा बेदरकारपणा इथे वापरायला हरकत नाही.

काय मनापासून आवडते तुम्हाला? यादी करा आणि जीव लावून ते करा. आवडतो का तुम्हाला हिमेश रेशमिया ? मग लोक काही का म्हणेनात ऐका न त्याची गाणी ! आवडतात का तुम्हाला चित्र काढायला ? मग चित्र काढा. तुम्ही महान चित्रकार नाही होणार. पण चित्र तर काढा !

मनात काही सलतयं का ? डोळ्यात येतय उगाच पाणी ? कसली तरी लागलीय बोचणी? मग बोलून टाका. काढून टाका तो गिल्ट मनातून . मागायची का कोणाची माफ़ी ? आज मागा. छान हलके वाटेल मनात. कसलीही गिल्ट घेउन जगु नका..... कशाला छाळायचं उगीच स्वत:ला ?

प्रेमांच्या माणसांशी बोलून किती दिवस झाले?
" तुला ती साडी छान दिसते ! ही नको तीच साडी नेस" आसा आग्रह आईला कधी केला होता? बाबांच्या मित्राच्या तब्बेतीची चौकशी कधी केली, आठवतयं? करा. ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्याना ते जाणवू द्या.
"आय लव्ह यु" म्हणणे सोपे असते म्हणून तर पहा. आणि नसेलच म्हणायचे तर द्या हातात हात..... तो ही पुरेसा बोलका आसतो.....

तुमचे घर वाट पाहत तुमची, तिथल्या भिंती, पडदे, खिडक्याच नाही तर भांडीकुंडीही तुमच्या साठी आतुर आसतात. घरी परता. घरात रहा. घराचे होटेल झाले माणसांची मुळं तुटतात ....
घरट्यातल्या उबेला विसरु नका.... जगण्यातली उर्जा तिथूनच येते......

वपाडाव's picture

11 Oct 2011 - 11:10 am | वपाडाव

कोणत्यातरी पेपरात वाचला आहे असं वाट्टंय,
कदाचित या लेखाचे नाव "करुन टाका डिलिट" असं काहीसं होतं.......

पैसा's picture

9 Oct 2011 - 10:02 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच सुरेख लिहिलंय. कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हीच फार कठीण गोष्ट आहे. जे हे सहज करू शकतात, तेच असामान्यत्वाच्या एक पाऊल आणखी जवळ जातात.

प्रियालीला आणि सीमोल्लंघन करू इच्छिणार्‍या सार्‍यानाच माझ्या मनापासून शुभेच्छा! फक्त हे सीमोल्लंघन खरोखरच सीमा ओलांडणारं ठरू दे.

मन१'s picture

11 Oct 2011 - 10:09 am | मन१

आवडले.
जे मनापस्सोन करावेसे वाटते, ते नक्कीच करावे; ह्या अर्थाने "सीमोल्लंघन " असेल तर नक्कीच करावे.
पण "आता काहितरी नवीन करून दाखवतो" असा अभिनिवेश किंवा उसने अवसान आणणे हे चौकटित राहून जगण्यापेक्षाही अधिक घातक असते हे जवळच्या व्यक्तिच्या अनुभवातून शिकलोय.

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Oct 2011 - 4:59 pm | चेतन सुभाष गुगळे

सीमा म्हणजे मर्यादा हा अर्थ लावला तर आपल्या मर्यादांचा आदर करायला सांगणारा हा संदेशही निश्चितच दखल घेण्याजोगा आहे.