विमान उडवताना दिशा कशी शोधायची आणि न्येमकं जिथे पोचायचं तिथे पोचायचं कसं? याचं उत्तर म्हणून एअर नॅव्हिगेशन हा विषय काढण्यात आलाय. मी माझ्या बायकोच्या दिग्दर्शनाशिवाय मंडईपासून घरी येऊ शकत नाही असं माझं दिशाज्ञान आहे. तेव्हा आकाशातल्या पोकळीत दिशा ओळखण्याविषयी काय अवस्था असेल ते सांगायलाच नको.
हा विषय मी शिकायला लागलो तेव्हा जाम भंजाळलो होतो. सगळं डोक्यावरुन जात होतं. डोळ्यासमोर अनेक तबकड्या आणि त्यांचे काटे गरागरा फिरायचे. शीर्षासन करुन आंधळी कोशिंबीर खेळल्यागत अवस्था.
म्हणून मी या विषयातल्या काही शब्दांना आणि त्यामागच्या कल्पनांना हात घालण्यापूर्वीच ठरवलंय की डोक्याची मंडई होईल असे तपशील द्यायचे नाहीत. तत्वसत्व समजलं की झालं.
थोडीशी नमुन्यादाखल नॅव्हिगेशनच्या पूजेची काही उपकरणी बघू..
एनडीबी अन एडीएफ..
एनडीबी म्हंजे नॉन डायरेक्शनल बीकन. कोणताही रेडिओ वेव्ह ट्रान्समिट करणारा टॉवर किंवा अँटेना हा तात्विक दृष्ट्या एनडीबीच असतो.
बर्याच विमानतळावर हे प्राथमिक नॅव्हिगेशनला उपयोगी पडणारे साधेसुधे एनडीबी असतात. त्याच्या फ्रीक्वेन्सी काय वगैरे कपटे आता इथे काढत नाही.
गंमत म्हणजे आपली रेडिओ स्टेशन्सही एनडीबीच असतात. आणि विमानाने त्यांना ट्यून केलं तर ते आकाशवाणी केंद्राच्या ट्रान्समिटरपर्यंत दिशा काढून पोहोचू शकतात. नव्हे..बाकी सर्व यंत्रणा बंद पडल्यावर एखाद्या शहराचं आकाशवाणी केंद्र ट्यून करुन शहरापर्यंत मार्ग काढला आणि मग व्हिज्युअल लँडिंग केलं अशी उदाहरणं आहेतही.
बरं.. तर अशा एनडीबीकडून येणार्या रेडिओ सिग्नलवरुन त्या सिग्नलचं मूळ ठिकाण अतएव एअरपोर्ट कुठल्या दिशेला आहे ते दाखवण्यासाठी एडीएफ (ऑटोमॅटिक डायरेक्शन फाईंडर) नावाची तबकडी कॉकपिटात असते.
ही बघा ती तबकडी. तबकड्यांची चित्रं जालावरुन घेऊन फोटोशॉपात संस्कारित केली आहेत. बाकी सर्व स्वतः बनवली आहेत हे आधीच एकदा सांगतो.
नॅव्हिगेशन रेडिओवर ठराविक विमानतळाच्या एनडीबीची फ्रीक्वेन्सी ट्यून केली की त्या विमानतळाचा मोर्सकोड मधला आयडी सतत ऐकू येत राहतो. जसं मुंबईचा कोड BOM आहे.. म्हणून मुंबईच्या एनडीबीवरुन -... --- --
म्हणजेच
_... डा-डिट्ट्-डिट्ट्-डिट्ट (बी)
--- डा-डा-डा (ओ)
-- डा-डा (एम)
अशी बीपमालिका सतत ऐकू येईल. यामुळे तुम्हाला खात्री होईल की मी ट्यून केलेलं स्टेशन ऊर्फ एनडीबी मुंबई विमानतळाचाच आहे.
मग उपरिनिर्दिष्ट एडीएफ डायलवर तुम्हाला आत्ता मुंबई कुठल्या दिशेत आहे ते कळेल.
पण यात अडचण अशी की तुमचं तोंड आत्ता कुठे आहे हे माहीत नसल्याने नेमके तुम्ही मुंबईकडे चाललायत की तिजपासून दूर हे कळायला मार्ग नाही. त्यासाठी नस्त्या आकडेमोडी आणि अंदाज करावे लागतात. म्हणून मग..
व्हीओआर किंवा व्हीएचएफ ओम्नी रेंज.. (व्हेरी हाय फ्रीक्वेन्सी ओम्नीडायरेक्शनल रेडिओ रेंज)
हे यंत्र जास्त डायरेक्शनल आहे. म्हणजे व्हीओआर तुम्हाला तुमचं विमान विमानतळापासून कुठल्या दिशेत आहे याचसोबत फ्रॉम आणि टू असे इंडिकेटर्स दाखवतं आणि विमानाची विमानतळापासूनची पोझिशन (बेअरिंग) सोबत तुमच्या विमानाची आत्ताची उडण्याची दिशा (हेडिंग) हिचाही विचार करुन तुलनेत सोप्या पद्धतीने गाईड करतं.
व्हीओआरचं प्रिन्सिपल सांगू की नको अशा संभ्रमात होतो. पण जमेल तितकी सोपी आकृती काढली आणि म्हटलं सांगूच थोडक्यात.
मध्यभागी काळा गोल दिसतोय तिथून दोन सिग्नल ट्रान्समिट होतात. एक सर्व दिशांना सारखा आणि एकसमान, एकाच फेजमधे.
दुसरा सिग्नल गोल फिरणार्या काट्यासारखा शार्प डायरेक्शनल सिग्नल. एका पूर्ण रोटेशनमधे एक वेव्हलेंग्थ पूर्ण करणारा.
आता साधी गोष्ट, जी मी या वरच्या आकृतीत दाखवली आहे ती पहा. उत्तरेकडे, शून्य डिग्रीत दोन्ही सिग्नल एकत्रच अतएअव एकदम जुळलेले (फेजमधे) असतील. पूर्वेकडे म्हणजे नव्वद डिग्रीवर पोचताना स्थिर सिग्नल आणि डायरेक्शनल सिग्नल यात नव्वद डिग्रीचा फरक पडला असेल. दक्षिणेकडे १८० अंशाचा फरक असेल & सो ऑन.
हा फरक मोजला की डायरेक्शन परफेक्टली कळते. या तत्वाचा वापर करुन व्हीओआर चालतो. वर दिलेल्या आकृतीसारखे ट्रान्स्मिटर विमानतळांवर असतात. कॉकपिटात व्हीओआरची डायल असते.
जिथे जायचं त्या विमानतळाची व्हीओआर फ्रीक्वेन्सी ट्यून केली की त्यातली मधली सुई आपल्याला नेमकं दाखवत राहते की तुम्ही इष्ट दिशेच्या डावीकडे आहात की उजवीकडे. सुईच्या दिशेत विमान वळवून सुई मधोमध ठेवत आपल्याला आपला नवसाचा एअरपोर्ट गाठता येतो.
एअरपोर्टजवळ आलो म्हटलं तरी अजून फार अंतर बाकीच असतं च्यायला. प्रत्यक्ष रनवे दिसेस्तोवर काय खरों नसा. रात्रीअपरात्री कुठे कळणार काही बाहेर बघून?
म्हणून मग आयएलएस (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम) वापरायची.
तुम्ही कुठेही असलात तरी तिथून तुम्हाला मुळात या आयएलएसजवळ घेऊन येण्यासाठी डीएनबी किंवा व्हीओआर तंत्रावर चालणारा एक लोकेटर बीकन असतो. तिथपर्यंत पोचलात की मग पुढची लाईन लावून ठेवलेली असते. अगदी रनवेपर्यंत आणून सोडते ही सिस्टीम.
पुन्हा एकदा थोडक्यात तत्व. डोक्याचे दही झाल्यास माफी असावी.
रनवेच्या ज्या टोकाला उतरायचं त्याच्या उलट टोकाला बसवलेल्या ट्रान्समिटरमधून दोन लंबगोल आकाराचे सिग्नलचे "झोत" रनवेच्या डाव्या आणि उजव्या अंगाला फेकले जातात. उजवीकडचा झोत नव्वद हर्टझनी "जडवतात" (मॉड्युलेटला काय शब्द वापरावा बरं?) आणि डावीकडचा १५० हर्टझनी..
त्यांचा ओव्हरलॅप होणारा भाग रनवेच्या बरोब्बर मध्यरेषेवर पडतो. डिफरन्स इन डेप्थ ऑफ ऑफ मॉड्युलेशन वगैरे स्पॅघेटी वर्डजमधे न जाता एवढंच म्हणूया की विमानात असलेल्या सेन्सरमधे हे झोतरुपी सिग्नल तपासले जातात. त्यात जर नव्वदअण्णांचा प्रभाव दिसला तर आपण रनवेच्या डावीकडे भरकटलोय आणि दीडशेअप्पांचा जोर जास्त असेल तर आपण रनवेपासून उजवीकडे फिसलतोय हे समजायचं. रनवे सेंटरलाईनवर हा फरक शून्य असतो आणि दोन्हीचा प्रभाव एकसारखा होतो.
कॉकपिटमधली आयएलएस डायल अशी दिसते:
त्यातली ती उभी सुई आपण रनवेपासून कुठल्या साईडला भरकटलोय आणि किती ते दाखवते. सुई मधे ठेवत सरळ उतरत रहायचं. सुई मध्यावर म्हणजे तुम्ही रनवे सेंटरलाईनशी जुळलेले.
आउटर मार्करवर आलात की त्याच्या बरोब्बर वर तुम्हाला डा डा डा अशा मोर्स कोडच्या लाँग डॅशेसचा आवाज सतत ऐकू यायला लागेल. रनवेपासून प्लस मायनस करुन साधारण सात किलोमीटरवर हा मार्कर असतो.
सुई मध्यावर ठेवत एक्झॅक्टली मिडल मार्करच्या वर आकाशात आलात की डा डिट्ट डा डिट्ट असा डॅश-डॉट-डॅश-डॉट पॅटर्न ऐकू येईल. मिडल मार्करवर येईस्तोवर मात्र तुम्हाला रनवे डोळ्यांनी दिसला पाहिजे. नाहीतर हाच पॉईंट असतो लँडिंग अबॉर्ट करुन पुन्हा वर झेप घेण्याचा. रनवे दिसला नाही आणि तसेच पुढे गेलात तर सगळी काशी. हा मार्कर ऑन अॅन अॅव्हरेज एखादा किलोमीटर दूर असतो रनवेपासून.
पुढे उतरत आलात की डिट्ट डिट्ट असा हाय फ्रीक्वेन्सी कर्कश आवाज करुन जाम टिवटिव करणारा इनर मार्कर येतो. याचा अर्थ आता तुम्ही रनवेच्या उंबर्यापासून पाव किलोमीटर अंतरावर आहात. लँडिंगची वेळ झालीच आहे.
अरेच्च्या. पण खाली उतरत या, खाली उतरत या म्हणताना नेमकं कितपत खाली येत राहायचं हे कसं कळणार? आपण ज्याविषयी बोलतोय ते सर्व फ्लाईंग हे इंस्ट्रुमेंट फ्लाईंग आहे. म्हणजे बाहेर काहीही न बघता (किंवा दिसत नसताना) केलेलं फ्लाईंग. हे फ्लाईंग सर्व कमर्शियल एअरलाईन्समधे बाय डिफॉल्ट आहे.
तर आपण रनवेवर पोचण्याच्या दृष्टीने योग्य तिरक्या रेषेत उतरतोय ना? हे पाहण्यासाठी आयएलएसमधे ग्लाईडस्लोप असतो. मगाशी सांगितलेल्या प्रिन्सिपलनेच पण इथे दोन झोत उभ्या दिशेत सोडलेले असतात. हे पहा असे:
इथे विमानातला सेन्सर पुन्हा एकदा ९० आणि १५० चं प्रमाण पाहतो. ९० चा जोर असेल तर आपण आवश्यक ग्लाईडस्लोपच्या वर आहोत आणि १५० डॉमिनेटिंग असेल तर ग्लाईडस्लोपच्या खाली आहोत. (म्हणजे रनवेच्या आधीच आपटणार..) तेव्हा वर दाखवलेल्या आयएलएस डायलमधली आडवी सुई आपल्याला ओरडून हेच सांगत असते की शुंभा, ग्लाईडपाथच्या वर आहेस तू.. खाली घे विमान अजून.. किंवा ग्लाईडपाथच्या खालून कुठे उडतोस.. मरशील फुकट..वर उचल विमान..पुल अप.. पुल अप.. फास्ट..
आडवी सुई मध्याच्या वर असेल तर आपण आवश्यक स्लोपच्या खालून उडतो आहोत. विमान वर पुल केले की रेष हळूहळू मध्याकडे येईल. सुई मध्याच्या खाली असेल तर आपण आवश्यक स्लोपच्या वर आहोत. विमानाचा खाली जाण्याचा रेट वाढवला नाही तर रनवे ओव्हरशूट होईल.
वरच्या चित्रात आपण ग्लाईडस्लोपवर बरोबर आहोत पण उभी सुई पाहिलीत? आता कोणती अॅक्शन आवश्यक आहे सांगाल?
मग भरुन पावलो.
............................................
आता बास करतो..
प्रतिक्रिया
30 Sep 2011 - 2:38 pm | विनायक प्रभू
सर्व फंडाज नीट समजले.
गवि धन्यवाद.
मी पण ह्याच विषयावर लिहीणार होतो.
पण.....
जाउ दे.
30 Sep 2011 - 2:39 pm | बिपिन कार्यकर्ते
_/\_ अतिशय माहितीपूर्ण आणि रंजकही! बोजडपणा अजिबात येत नाहीये... लगे रहो...
एक प्रश्न आहे : विमान जमिनीवर चालत असते तेव्हा त्याचे पुढचे चाक एका पिवळ्या रेषेवरून बरोब्बर जात असते... तसेच वळण घेतानाही वळल्यावर ते चाक बरोब्बर त्या रेषेवर येते... मला नेहमी हा प्रश्न पडतो की पायलटला हे कसे सांभाळता येते?
30 Sep 2011 - 2:43 pm | गवि
टॅक्सीवे आणि रनवेची सेंटरलाईन विंडशिल्डच्या मधून विमानाच्या नाकासमोर थोडी दूर दिसत असते. तिच्याकडे लक्ष ठेवून पायाने रडर पेडलवर नृत्य करत मध्यरेषा सांभाळली जाते. कधीकधी थोडे बाजूलाही जाते हो. असं काही नाही.
30 Sep 2011 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते
ओके... कळले.
आणि जाऊ दे हो इकडे तिकडे थोडं.. पायलट झाला म्हणून काय झालं? पाय थोडा वाकडा पडणारच, माणूस आहे तो पण! ;)
30 Sep 2011 - 2:49 pm | विनायक प्रभू
प्रत्येक लँडींग मधे टॉलरन्स ला जागा असते हो बिका.
30 Sep 2011 - 7:58 pm | प्रभो
मास्तरांचा सिक्सर!!
30 Sep 2011 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते
आपण रनवेच्या खूपच डाव्या बाजूला आहोत का? ते सरळ रेषेवर आले पाहिजे. बरोबर?
30 Sep 2011 - 2:47 pm | गवि
रनवेच्या खूपच उजव्या बाजूला आहोत. डावीकडे वळले पाहिजे.. :(
30 Sep 2011 - 2:54 pm | बिपिन कार्यकर्ते
ओके ओके! कळले... म्हणजे ती उभी रेषा रनवे आहे... मला वाटले की आपल्या नाकासमोरची दिशा आहे.
30 Sep 2011 - 9:07 pm | रेवती
माझाही बिकासारखाच समज झाला होता.
खरं तर अजूनही ९० चाच जोर जास्त वाटतोय.
पण तुम्ही म्हणाल ते बरोबर!
इतकं मस्त वाटलं वाचताना.....दही वगैरे झालं नाही.;)
30 Sep 2011 - 10:36 pm | गवि
"फॉलो द नीडल" असं लॉजिक असतं.
धन्यवाद..
30 Sep 2011 - 2:53 pm | ऋषिकेश
वा! तुम्ही घेतलेली मेहनत रंग लायी है!
उत्तम माहिती, सोपी भाषा आणि नेमक्या आकृत्या!
मजा येतेय वाचायला.. येऊ द्यात अजून
30 Sep 2011 - 4:38 pm | जे.पी.मॉर्गन
लई म्हंजी लईच झ्याक्क मालिका बघा.... आता फुडच्या टायमाला (काक)पिटातलंच तिकीट काडतो !
त्याआधी गवि गुर्जींना _/\_
माझी एक शंका... ग्लाईडस्कोपचा जो उभा सेक्शन तुम्ही दाखवला आहे... त्यात त्या दोन्ही झोतांचं "ओरिजिन" रनवेच्या शेवटी आहे. त्याऐवजी ते रनवेच्या आधी.. म्हणजे टचडाऊन पॉइंटला असायला हवं का?
एकदा येवढं समजलं की मी निघतोच ;)
जे.पी.
30 Sep 2011 - 4:44 pm | गवि
अर्र.. आकृती चुकलीच की.
अगदी बरोबर. रनवेच्या उतरण्याच्या टोकालाच असतो ग्लाईडस्लोपवाला अँटेना. पण मधोमध नाही, रनवेच्या थोडा एका बाजूला.
रनवे उजव्या बाजूला बराच खेचायला हवा होता आणि अँटेना असलेला भाग हे त्याचे शेवटचे टोक आहे असं दाखवायला हवं होतं. (तो भाग टचडाऊन पॉईंट आहे. पूर्ण रनवे नव्हे) पण वरच्या आकृतीतल्या रनवेशी तुलना झाल्याने जास्तच घोळ होत आहे. बदलतो आता.
अनेक धन्यवाद.
30 Sep 2011 - 5:03 pm | जे.पी.मॉर्गन
आंगाश्शी... आता येकदम झ्याक समजलं म्हंजे ! :)
उद्या सक्काळं हुटून PNQ गाठतो ! ;)
जे.पी.
30 Sep 2011 - 3:23 pm | सुनील
मस्त!
एक शंका - विमान आपल्या इच्छित उंचीवर पोचले आणि बराच वेळ पुन्हा उतरायचे नसेल तेव्हा पायलट विमानाला "ऑटो पायलट" मोडवर टाकतात असे समजते. हा "ऑटो पायलट" मोड म्हणजे नक्की काय?
30 Sep 2011 - 10:38 pm | गवि
दिलेली फ्लाईट लेव्हल (आल्टिट्यूड) आणि कोर्स मेंटेन करत राहणारी यंत्रणा म्हणजे ऑटो पायलट. सतत अॅडजस्टमेंट करत राहण्याचा पायलटचा ताण त्यामुळे नाहीसा होतो.
30 Sep 2011 - 3:33 pm | स्मिता.
वाचता वाचता माझ्या तरी डोक्याचं दही होता होता वाचलं हे प्रामाणीकपणे नमूद करते. पण सगळी माहिती मस्त कळली.
आजकाल तर एखादं विमान टेक ऑफ किंवा लँडिंग करताना आकाशात दिसलं की आता पायलट काय काय करत असावा असे विचार अपोआप सुरु होतात :)
हा ही लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
30 Sep 2011 - 4:07 pm | मदनबाण
उत्तम लेखन... :)
डोक्याचे दही होईल या भितीने लेख उडत उडत वाचला आहे,लॅड करायची सवड मिळताच परत वाचला जाईल. ;)
30 Sep 2011 - 5:03 pm | मी-सौरभ
हे आपल काम नाही हे समजलं....
30 Sep 2011 - 4:23 pm | गणपा
एकदम 'हाय'क्लास. :)
किचकट विषय सोप्पा करुन मांडलाय.
स्तुत्य उपक्रम.
30 Sep 2011 - 4:27 pm | स्वाती२
वाचत आहे. सोप्या भाषेमुळे ही लेखमाला खूप आवडली.
30 Sep 2011 - 7:12 pm | जाई.
+१
30 Sep 2011 - 4:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
झक्कास माहीती!
पण आता ईमानात बसल्यावर उगीच भिती वाटत राहणार.... च्यायला त्या काकपिटातल्या सगळ्या सुया निट वागल्या तर बरं नाहीतर आम्ही सुळावर!!
30 Sep 2011 - 4:53 pm | सुहास झेले
सही... हापिसात घाईघाईने वाचलं, सगळं बाऊन्सर गेलं. ;-)
आता शांतपणे वाचलं आणि डायरेक्ट डोस्क्यात घुसलं...अप्रतिम लेखन. असेच लेख येऊ द्यात !! :)
30 Sep 2011 - 7:42 pm | निमिष ध.
गवि साहेब अत्यन्त क्लिष्ट विषय सोप्प्या शब्दात सान्गितल्याने आवडले !
अजुन येउ द्या.
पुलेशु
30 Sep 2011 - 7:59 pm | प्रभो
मस्त माहिती!!
30 Sep 2011 - 8:40 pm | ५० फक्त
विमान तिन वेळा फिरवावं लागलं वरुन गोल गोल मग कुठं समजलं, पण समजलं. धन्यवाद.
30 Sep 2011 - 9:04 pm | चतुरंग
पहिल्याच वाचनात आमच्या विमानाला रनवे सापडला! :)
अजून येऊद्यात गवि.
एक शंका - ९० आणि १५० हर्ट्झ अशाच दोन फ्रिक्वेन्सीज वापरण्यामागे काय कारण असेल?
-रंगा
30 Sep 2011 - 10:41 pm | गवि
कन्व्हेन्शन असावं बहुधा. ९० च का? कारण माहीत नाही. असा विचार केलाच नाही कधी..
30 Sep 2011 - 9:44 pm | जगड्या
एक छोटीशी शंका.
एवढी अद्ययावत उपकरणे असताना सुद्धा, धुक्या मुले उड्डाणे रद्द का होतात ?
पायलट ला नसेल दिसत तर ठीक आहे. विमान तर बरोबर उतरतेच ना !
30 Sep 2011 - 10:46 pm | गवि
टेकऑफला फार रिस्ट्रिक्शन नसते. एनरूट वेदर फार खराब असेल तर (वादळ वगैरे) फ्लाईट रद्द किंवा पोस्टपोन होतात.
लँडिंगसाठी मात्र भारतात उपलब्ध आयएलएसच्या ग्रेडनुसार तरीही त्या एअरपोर्टसाठी आवश्यक किमान रनवे व्हिजिबिलिटी असावीच लागते. १००० फूट ते ५००० फूट डिपेंडिंग ऑन एअरपोर्ट फॅसिलिटीज.
3 Oct 2011 - 10:35 am | ऋषिकेश
एक अनइन्फॉर्म्ड अंदाज : (बहुतेक चुकीचा आहे पण तरी देतोच) :)
एकतर त्यांना 'असे दोन लो फ्रिक्वेन्सी सिग्नल हवे होते जे एकमेकांना छेदल्यावर 'शुन्य' फ्रिक्वेन्सी देतील व त्यांना डिटेक्ट करणारे रिसिव्हर (डिटेक्टर) उपलब्ध असतील). असा डिटेक्टर बनविणार्यांनी या फ्रिक्वेन्सीज निवडल्या :) व त्या रुढ झाल्या असे दिसते. १९६७ मधे या तंत्रज्ञानाचे पेटंटमधे आलेले दिसते .
तेव्हा "याच फ्रिक्वेन्सी का?" याला खास काही कारण असल्यापेक्षा सुरवातीला जे वापरले तेच रुढ झाले अश्या धर्तीचे कारण असावे असा एक अनइन्फॉर्म्ड अंदाज :)
30 Sep 2011 - 9:49 pm | मिसळ
गवि, हा देखिल लेख मस्त. समजून घेताना आमच विमान थोडे हेलकावे खातय पण तो आमच्या यन्त्रणेचा दोष समजावा.
1 Oct 2011 - 5:59 am | अभिज्ञ
मस्तच झालाय हा लेख.
खुपच नवीन माहिती समजली.
अभिज्ञ.
1 Oct 2011 - 1:19 pm | इरसाल
मामा रडार विभागात असल्याने थोडीफार माहिती होती.पण तुम्ही दिलेल्या डिटेल माहितीमुळे ज्ञानात जास्तीची भर पडली.
विषय हाताळण्याची तुमची कला आवडली अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून दिलेत.
1 Oct 2011 - 2:37 pm | मन१
काहिसा समज्ला. पुन्हा एकदा नीट वाचतोय.
मला स्वतःला हे तांत्रिक लिखाण आवडलेच; पण ते अजूनही आपण काही किस्से, घटना, कथा सांगणार होतात, त्यात अधिक रस आहे.
1 Oct 2011 - 4:45 pm | श्यामल
पहिल्या फेरीत खरंच दही झालं देवा ! नंतर मोजुन पाचवेळा घुसळल्यावर लोणी गवसलं.......... हुश्श ! माठ आहोत ओ
आम्ही शेवटी !
पण इतका क्लिष्ट विषय माझ्यासारख्या मंदबुद्धींनाही कळेल अशा सोप्या आणि सुलभ भाषेत समजावुन
सांगितल्यावद्दल धन्यवाद गवि !
3 Oct 2011 - 12:06 am | jaypal
काय नाय कल्ला
3 Oct 2011 - 1:27 am | नंदन
ऋषिकेशशी सहमत आहे.
लँडिंगची तयारी होण्यापूर्वी व्हीओआरचे डायल महत्त्वाचे आणि रनवे जवळ आल्यावर आयएलएसचे (त्याच तत्त्वावर किंवा डीएनबीवर चालणारे) डायल महत्त्वाचे, बरोबर?
3 Oct 2011 - 10:44 am | शिल्पा ब
सोप्या भाषेत सांगितलेली माहिती. आवडली.
ती सुईची भानगड समजली नाही. :(
3 Oct 2011 - 10:55 am | मैत्र
गवि, सर्वसामान्यांना सहसा कधीही पत्ता लागणार नाही आणि काही वाचनात आलं तर फारसं काही डोक्यात शिरणार नाही इतकी क्लिष्ट माहिती विलक्षण सोपी आणि रंजक करून सांगितल्या बद्दल धन्यवाद !
काल दुपारी कुठल्यातरी चॅनेलवर डाय हार्ड २ लागला होता ज्यात व्हिलन्स एअरपोर्टचा कंट्रोल पूर्णतः हायजॅक करतात त्यांचं एक विमान उतरवण्यासाठी आणि दुसरं विमान घेऊन पळून जाण्यासाठी.. काही तास उतरण्याच्या तयारीत असलेली सर्व विमाने घिरट्या घालत ठेवायला भाग पाडतात कारण कंट्रोल टॉवरला वैमानिकांशी संपर्कच साधता येत नाही किंवा थोडा काळ तरी होल्ड करायला भाग पाडतात. हे व्हिलन्स स्वतः आदेश देऊन त्यांना उतरू देत नाहीत. त्यात नेहमीप्रमाणे धमकी देण्यासाठी एक प्रवासी विमान मुद्दामून क्रॅश केलं जातं. तेव्हा आउटर मार्क, ग्लाईड पाथ वगैरे थोडं तरी समजलं या लेखामुळे.
त्या चित्रपटात दोन गोष्टिंबद्दल शंका वाटली क्रिएटिव्ह लिबर्टी स्वरुपाची --
१. जे विमान क्रॅश केलं जातं त्याला २०० मीटर खाली असलेला ग्लाईड पाथ देतात. जवळजवळ शून्य व्हिजिबिलिटी मुळे आणि रनवेचे दिवे बंद असल्याने वैमानिकाला दोनशे मीटर खाली येईपर्यंत रनवे दिसत नाही आणि विमान सरळ रनवे मध्ये घुसतं ... हे शक्य आहे का? आणि असं फक्त ग्लाईड पाथ वापरून उतरवता येतं का?
२. आउटर मार्कचा वापर कंट्रोल टॉवर बीप बंद करून सरळ वैमानिकांशी संपर्क साधण्यासाठी रेडिओ सारखा करतात. हे शक्य आहे का?
3 Oct 2011 - 11:04 am | गवि
१. जे विमान क्रॅश केलं जातं त्याला २०० मीटर खाली असलेला ग्लाईड पाथ देतात. जवळजवळ शून्य व्हिजिबिलिटी मुळे आणि रनवेचे दिवे बंद असल्याने वैमानिकाला दोनशे मीटर खाली येईपर्यंत रनवे दिसत नाही आणि विमान सरळ रनवे मध्ये घुसतं ... हे शक्य आहे का? आणि असं फक्त ग्लाईड पाथ वापरून उतरवता येतं का?
हो. असंच उतरलं जातं.
आयएलएसच्या हाय एंड वर्शनमधे जमिनीशी टचडाऊन करेपर्यंत गाईडन्स मिळतो. रनवे दिसला नाही तरी चालतं. अर्थात या लेव्हलच्या सिस्टीम्स फार थोड्या ठिकाणी आहेत. भारतात तर नाहीतच माझ्यामते.
पण त्यातही ग्लाईडस्लोप चुकीचा दाखवला गेला तर असा अपघात शक्य आहे.
२. आउटर मार्कचा वापर कंट्रोल टॉवर बीप बंद करून सरळ वैमानिकांशी संपर्क साधण्यासाठी रेडिओ सारखा करतात. हे शक्य आहे का?
कोणतीही रेडिओ फ्रीक्वेन्सी ट्यून केलेल्या अवस्थेत असताना बोलण्यासाठी वापरली जाऊ शकते. एरवी तिथी बीप वगैरे ऑडिओ सिग्नल वाजत असतात.