दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
26 Sep 2011 - 6:38 am

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक
माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ||

कामं त्याचं हाय सुताराचं
आणतो लाकूडं सागाचं
करवतीनं कापत बसतो
रातीबी तसंच करतो
काय करावं समजना झालं
कामासाठी नुसता झालाय वेडापीसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१||

एकदा पलंग करायला लागला
मोजमाप करीत तो बसला
मी घरकामात गुंतलेली
मला बोलावलं त्यांनं तरीबी
जवळ ओढूनं चावट बोलला असातसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||२||

होतं वंगाळ त्याचं कधीकधी वागणं
खोड त्याची छन्नी मारीत राहणं
पटाशीनं खिळे उपटीत बसणं
ड्रिल मारून होल खोल पाडणं
पॉलीश करायला व्हर्नीश वापरे भसभसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||३||

लई दया मला त्याची येते
दुकानी डबा मी घेवून जाते
कानाची पेन्सील काढून ठेवते
करवत खाली ठेव त्याला म्हणते
तरीबी म्हणतो "तेवढी पाचर मारतो आता"
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||४||

त्या सच्च्याच्या नादाला तो लागलाय
कामं करायसाठी नुसता हापापलाय
इथंतिथं घरीदारी, कामं करून पडल आजारी
मी एकटीच बाई घरी, नाही कुणी शेजारी
बाहेर काढा त्याला यातनं, माझा तुमच्यावर भरवसा ||५||

ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक......................

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०११

प्रेमकाव्यकविताविनोदजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2011 - 4:45 pm | अविनाशकुलकर्णी

समस्त सुतार समाजा तर्फे निशेध....