डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
16 Sep 2011 - 10:09 pm

"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्‍यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही.

"Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्‍या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं. सबटायटल्सशिवाय समजणारा हा चित्रपट अशी एक टुकार ओळख मी करून देऊ शकते. चित्रपटाची गोष्ट विकिपीडीयावर, आयएम्डीबीवर आहे तर मी ती ही सांगत नाही. या चित्रपटाची गोष्ट सांगण्यापेक्षा त्यातल्या छोट्याश्याच विनोदी गोष्टी सांगून चित्रपट बघण्यासाठी वाचकांना उद्युक्त करावं असा माझा विचार आहे. फक्त त्यासाठी चार ओळींची पार्श्वभूमी: शीतयुद्धाच्या काळात हा चित्रपट घडतो. रश्या आणि अमेरिकेची शस्त्रास्त्र स्पर्धा, अंतराळ स्पर्धा आणि शांतीस्पर्धाही जोरदार सुरू आहे. एक म्याड अमेरिकन ब्रिगेडीयर जनरल रिपर, रश्याच्या आण्विक भट्ट्यांवर हल्ला करण्याचा फतवा काढतो. बराचसा चित्रपट अमेरिकेत घडलेला दाखवला आहे.

  • दोघांचं भांडण सोडवण्यासाठी तिसरा त्यांना ओरडतो, "Gentlemen, you can't fight in here! This is the War Room!"
  • डॉ. स्ट्रेंजलव्ह अमेरिकन राष्ट्राध्यक्षाही संबोधताना दोनदा 'माय फ्यूरर' असं म्हणतो आणि स्वतःची चूक सुधारत 'द प्रेसिडंट' म्हणतो. त्याचा एक हात नाझी झालेला असतो. दुसर्‍या हाताने तो हा नाझी हात सतत दाबायचा प्रयत्न करत असतो. पीटर सेलर्सचा डॉ. स्ट्रेंजलव्ह झबरदस्तच आहे.
  • पीटर सेलर्सच्या एकूण तीन भूमिका या चित्रपटात आहेत. त्याने रंगवलेला ब्रिटीश आर्मीतला 'एक्सचेंज ऑफिसर' मँड्रेकही तेवढाच मजेशीर आहे. आपला बॉस रिपर याने विमानं मागे बोलवावीत यासाठी सदैव त्याचे क्षीण प्रयत्न सुरू असतात
  • मँड्रेकला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लवकरात लवकर फोन करून कोड सांगायचा असतो. इतर सर्व फोन लाईन तुटल्यावर तो पे-फोनचा वापर करतो. खिशातली नाणी संपत आली म्हणून तो अमेरिकन ऑफिसरला कोकाकोलाच्या मशीनवर गोळी घालून नाणी काढायला सांगतो. त्या ऑफिसरने मँड्रेकला "राष्ट्राध्यक्षाला तुझ्याशी बोलायचं नसेल तर कोका कोला कंपनी तुझ्यावर नुकसानीचा दावा गुदरेल" अशी धमकी देणं 'प्रसंगानुरूप'च म्हणायचं.
  • टर्जीड्सन हा कडवा राष्ट्रवादी जनरल शांतताप्रेमी राष्ट्राध्यक्षाला सतत उचकवण्याचा प्रयत्न करत असतो. जेणेकरून रश्यावर आता एवीतेवी हल्लाबोल केलेला आहे तर मग आणखी बॉम्ज टाकू या. त्याचे संवाद इथे देण्यात अर्थ नाही आणि जॉर्ज स्कॉटच्या हावभाव, देहबोली, अभिनयाबद्दल लिहीणं अशक्य आहे.
  • अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि (ऐकू न येणारा) रशियन प्रीमीयर यांच्यातले सगळेच फोन-संवाद (का मोनोलॉग्ज?) हहपुवा आहेत. अमेरिका आणि रश्याने एकत्र येऊन अमेरिकन विमानांनी रश्यावर हल्ला करू नये याची उपाययोजना करणं हा त्यातला महान प्रकार.
  • एअरफोर्स पायलट्सना 'इमर्जन्सी'साठी जो किट दिलेला असतो त्याची यादी वाचली जाते. प्रत्यक्षात काय दिलं जातं याची मला कल्पना नाही. तो भयंकर मोठा विनोद आहे; त्यावर तो वाचणाराच म्हणतो, "एवढ्या सामुग्रीवर व्हेगासमधे चिक्कार मजा करता येईल."
  • शेवटी काही ठराविक लोकांनी खोल खाणीत जाऊन लपावं असं डॉ. स्ट्रेंजलव्हच्या सूचनेवरून ठरतं. मानवजात वाचवण्यासाठी खाणीत रहाणार्‍या पुरूषांना एक-स्त्री-व्रत तोडावं लागेल काय असा प्रश्न अमेरिकन टर्जीड्सनला पडतो. मूळचा जर्मन, नाझी डॉ. स्ट्रेंजलव्ह त्याला 'खेदाने' होकार देतो. आणि या सर्व कल्पनेला उचलून धरतो तो रश्यन राजदूत, " I must confess, you have an astonishingly good idea there, Doctor."

तुम्हीच तो चित्रपट पहा, पोटभर हसा आणि थोडा विचारही करा.

१९६४ साली "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आला. चित्रपट संपूर्णतः कृष्ण-धवल आहे. दृष्टीसुख म्हणावं तर फारसं काही नाही; विमानांचे शॉट्सही अगदी साधे आहेत. पण हा चित्रपट त्याहीपेक्षा वरच्या स्तराचा आहे, ज्याचं वर्णन इंग्लिशमधे सेरेब्रल मूव्ही असं करतात. शिस्तबद्ध आर्मी ऑफिसर्स असले तरीही ती माणसंच असतत, आपले हेवेदावे, आपले विचार, आपलं युद्धखोर तत्वज्ञान इतरांवर लादून ते सर्वनाशही घडवून आणू शकतात. शांतताप्रेमी युद्धविरोधक अशा माणसांच्या हाताखाली असूदेत वा देशाचा सर्वेसर्वा युद्धखोरांमुळे होणारं नुकसान टाळता येत नाही. आपला अजेंडा पुढे रेमटवण्यासाठी पोकळ तत्वज्ञानाच्या बढाया मारणारा रिपर आणि विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या गफ्फा हाणताना विरोधकांच्या बुद्धी-शक्तीला कमी लेखून सर्वच जगावर संकट आणणारा टर्जीड्सन या वृत्ती प्रत्यक्ष आणि आभासी जगातही दिसून येतात. त्यांचा तोंडावर विरोधक दिसणारा रश्यन राजदूतही त्यांच्याच कंपूत सामील होणारा निघतो आणि "कोणत्याही प्रकारे आपण आधी विध्वंस करायचा नाही" असं म्हणणारा राष्ट्रध्यक्ष असूनही हतबल होतो.

स्वतःवरच हसणार्‍या, विनोद करणार्‍या, भडक उजव्या विचारसरणीच्या रिपर आणि टर्जीड्सनला बराचसा हास्यास्पद आणि थोडासा खुनशी दाखवणारा, आपल्या देशाच्या न पटणार्‍या पॉलिश्यांवर विनोदी, विसंवादी पद्धतीने टीका करणारा स्टानली कुब्रिक आणि त्याचा "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आवडला नाही तरच नवल.

चित्रपटप्रकटनविचारशिफारसआस्वाद

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

16 Sep 2011 - 11:02 pm | सुमीत भातखंडे

हा हा हा!
वन ऑफ ऑल टाइम फेवरिट्स.
पीटर सेलर्स अप्रतिम.

स्वतःवरच हसणार्‍या, विनोद करणार्‍या, भडक उजव्या विचारसरणीच्या रिपर आणि टर्जीड्सनला बराचसा हास्यास्पद आणि थोडासा खुनशी दाखवणारा, आपल्या देशाच्या न पटणार्‍या पॉलिश्यांवर विनोदी, विसंवादी पद्धतीने टीका करणारा स्टानली कुब्रिक आणि त्याचा "डॉ. स्ट्रेंजलव्ह" आवडला नाही तरच नवल.

++++++१

हे जाम आवडलं बुवा. बाकी काही नीट समजलं नाही. बघावा लागेल बहुतेक.

बादवे, घरमित्र म्हणजे मराठित room-mates म्हणतो तेच का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 11:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही रे, मराठीतले house-mates. माईक नावाची व्यक्ती अदिती या व्यक्तीची room-mate होती असं लिहीलं तर संस्कृतीरक्षकांचा हल्ला नाही का होणार माझ्यावर? ;-)

नीट सांगितलं आणि चित्रपट बघण्याचा उत्साह संपला तर अशा भीतीपोटी विनोदी वाटतील अशा छोट्या गोष्टी लिहील्या आहेत.

अनामिक's picture

16 Sep 2011 - 11:37 pm | अनामिक

जरुर बघावा लागेल... नेटफ्लिक्सात टाकल्या गेलाय!

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 12:03 am | पाषाणभेद

गेल्या काही दिवसांपासून पाहतोय. येथे बरेच जण "टाकल्या गेलाय" "केल्या गेलाय" आदी शब्दप्रयोग करत आहेत. वाचतांना ते डोळ्यात खडे गेल्यासारखे वाटते. "टाकला गेला" "केला गेला" असा योग्यशब्दप्रयोग आहे.
मिपावर शुद्धलेखनाला फाट्यावर मारले जाते हे मान्य आहे पण होता होईल तेवढे शुद्ध प्रमाणभाषेतले लिहा.

अर्थात लोकं सुधरावी म्हणून मी हा सल्ला देतो आहे असे नाही. मी केवळ एक निरीक्षण नोंदवले. अन्यथा एकाच्या सांगण्याने कित्येकांना काही फरक पडत नाही म्हणा.

अवांतरः चुकीचे लिहीले जाणारे शब्दः आणी, कि (पत्रास कारण कि,)
बरोबर शब्दः आणि, की

मन१'s picture

17 Sep 2011 - 12:11 am | मन१

तुमच्याशी सहमती दर्शवल्या गेली आहे. :)

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 12:16 am | पाषाणभेद

तुमच्या शुद्धलेखनाला नेहमीप्रमाणे फाट्यावर मारल्या गेल्या आह्ये.

कळकळ समजली. बरोबर टायपायचा प्रयत्न केल्या जाईल.

तिमा's picture

17 Sep 2011 - 10:35 am | तिमा

शुध्दलेखनाच्या चुका खड्यासारख्या बोचणार्‍या सभासदांना 'रश्या' हा शब्द बरोबर वाटला आणि उच्चविद्याविभूषित आदितीताईंनी तो इतक्या वेळा बिनचूक लिहिला त्याअर्थी रशियाचा खरा उच्चार रश्या असाच असला पाहिजे असा मी समज करुन घेत आहे.

नगरीनिरंजन's picture

17 Sep 2011 - 10:40 am | नगरीनिरंजन

रशियाचा रशियन उच्चार रश्या आहे हे माहित होते. मराठी उच्चारही रश्या आहे हे आज समजले.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2011 - 6:42 pm | अत्रुप्त आत्मा

आमास्नी बी 'रश्या' म्हाईतीए..पर तो ह्यो न्हव...''आज सांच्याला रश्या'ला काय ह्ये रे,का नीस्तच खुळगाट नी भाकर'' ह्यो 'रश्या' आमच्या लै वळखीचा हाय... :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2011 - 9:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या ओळखीतली रश्यन लोकं त्यांच्या देशाच्या नावाचा उच्चार जो काही करतात तो मला नागरी लिपीत लिहीताना रश्या (रश्या आणि राश्या मधला काहीसा उच्चार) असा वाटतो, रशिया नव्हे. जॉर्ज बुशने 'इराक'चा 'आय-रॅक' असा उच्चार केल्यावर कसंतरीच वाटतं असं म्हणायचं आणि आपणही अशाच चुका करायच्या हे मला पटत नाही, म्हणून रश्या.

तिरशिंगराव, रशियाच्या जागी मी रश्या लिहीलं (जो आपल्या भाषेतला शब्द नाही) म्हणून तुम्हाला दाताखाली खडा आल्यासारखं केलं आहेत, पण माझ्या नावाची (जो शब्द आपल्याच भाषेतला आहे) काशी घातलीत तर मी धोंडा आल्याची कुरबूर करू का?

मराठीची जी बोली मी बोलते त्यात "रश्श्यात फार तेल नको" असा काहीसा उच्चार होतो.

शहराजाद, तुझ्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे. डाऊनलोड करणार्‍यांनो, तुम्हाला चित्रपट आवडला का ते जरूर सांगा.

अवांतरः शुद्धलेखन का शुध्दलेखन?

तिमा's picture

18 Sep 2011 - 10:46 am | तिमा

दोन्ही चुका मान्य करतो.

आदिती नव्हे अदिती.
शुध्द्लेखन नव्हे शुद्धलेखन.
अवांतरः रश्या शब्दाने खडा आल्यासारखे नाही वाटले., मराठी उच्चार वाचण्याची संवय झाल्याने नजरेला ठेच लागली. ती तशी माझ्या मुलीच्या 'काऊच' सारख्या उच्चारांनीही लागतच असते. काय करणार जुनी खोडं!

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2011 - 2:06 pm | नगरीनिरंजन

>>माझ्या ओळखीतली रश्यन लोकं त्यांच्या देशाच्या नावाचा उच्चार जो काही करतात
त्यांना करु द्या हो कसाही. आपण कशाला बदलायचं लगेच? तुम्ही पुण्याला पुणे म्हणता म्हणून कोणी इतरदेशीय पुणे म्हणायचा प्रयत्न करत नाही, फारतर पुने म्हणतात. त्यांच्यात्यांच्यात बोलताना तर नाहीच नाही.
त्यांची जशी भाषा तसे त्यांचे उच्चार.
असो. रश्या आणि श्या मध्ये मला उगाचच साम्य वाटतं.
"किती रश्या देतूस तू?" असं जर कोणी म्हटलं तर लगेच "असं नाही बाळ, 'किती रे शिव्या देतोस तू' असं म्हणावं" असं म्हणणारे खूप असतील नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2011 - 7:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांना करु द्या हो कसाही. आपण कशाला बदलायचं लगेच?

उद्या म्हणाल माझं नाव अनेकांना उच्चारता लिहीता येत नाही म्हणून मी ते ही बदलायचं. इवलासा मेंदू आहे माझा, कधीतरी तरी मलाच तो मेंदू वापरून ठरवू द्यात मी कसे उच्चार करायचे ते!

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2011 - 8:56 am | नगरीनिरंजन

>> मी ते ही बदलायचं
बदलायचं नाही असंच मी म्हणालो. तुमचं नाव कोणाला उच्चारता येत नसेल तर तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही. आपण रश्या म्हणालो नाही म्हणून रशियन लोक देशाचं नाव बदलणार असं नाही.
खरा आक्षेप 'रश्या' या उच्चाराला नसून उगाच जिथे सगळे लोक रशिया म्हणतात तिथे तो मिरवण्याला आहे. शिवाय 'रश्या' या शब्दात त्यांचा तो उच्चार पकडता येत नाहीय असंही आहेच. पण ज्याची त्याची मर्जी हे एकदा मान्य केलं की वाद संपतो हे एक बरंय.

अवांतरः चिनी लोक भारताला इंदू म्हणतात. जपानी इंदो म्हणतात. आणखी कोणत्या भाषेत कोण कोण काय म्हणतात कोण जाणे. त्यांना इंडिया किंवा भारत म्हणताच येत नाही की प्रयत्नच करत नाहीत हा वादाचा विषय आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Sep 2011 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते

आज दुपारीच डाऊनलोड केला आहे. बघतो. :)

इंटरनेटस्नेही's picture

17 Sep 2011 - 12:24 am | इंटरनेटस्नेही

चांगला लेख. आवडला.

Nile's picture

17 Sep 2011 - 12:27 am | Nile

एरवी पहायलाही सिनेमा छान आहे, पण शीत युद्धाचे काही संदर्भ माहित असले तर सिनेमा पाहण्यात जास्त मजा येते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2011 - 1:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला तरी असं वाटत नाही. शीतयुद्धाचे संदर्भ माहित नसले तरीही मला हा चित्रपट पहाताना मजा आली. त्याचं मुख्य कारण माझ्या मते असं की शीतयुद्धाचा काळ, वॉर रूम वगैरे सर्व डीटेल्स आहेत. महत्व मुद्द्याला आहे. "misery acquaints a man with strange bedfellows", आणि त्यातून शांतताप्रेमी माणसांचा होणारा पराभव हे सर्व विचार मला महत्वाचे वाटले.

त्यातून तुला असं का वाटलं हे सविस्तर लिहीलंस तर वाचायला आवडेल.

शीतयुद्धाचे संदर्भ माहित नसले तरी उपहास कळेल याबाबत वाद नाही. पण सिमेनातल्या अनेक प्रसंग/सवाद खर्‍या संदर्भांवरती(उपहासाकरताच) आहेत (डॉ. चे चित्र विचित्र प्लान्स वगैरे). आता सगळे आठवत नाही (आणि फारसे लिहणारही नाही ;-) ). पण यावर एक पुस्तही लिहलेले आहे असे वाटते.

आदिजोशी's picture

17 Sep 2011 - 12:28 am | आदिजोशी

डाऊनलोड करायला लावला आहे

प्रास's picture

17 Sep 2011 - 3:40 pm | प्रास

छान माहिती वजा लेख.

धन्यवाद अदितीबाई (या उपाख्याबद्दल अडचण नसावी ;-) )

मन१'s picture

17 Sep 2011 - 11:21 pm | मन१

>> छान माहिती वजा लेख.
मला समजलेला ह्याचा अर्थः-
म्हणजे वरच्या लिखाणातून लेख म्हणुन जे काय आहे तेच एकदा वजा केल्यावर जी माहिती शिल्लक राहते तेव्हढीच काय ती ठिकठाक वाटते!

पळा आता.....

शुचि's picture

17 Sep 2011 - 1:10 am | शुचि

परीक्षण आवडले. कोका कोला वाला विनोद मस्तच.

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2011 - 1:31 am | पिवळा डांबिस

डॉ. स्ट्रेंजलव्ह हा मस्त चित्रपट आहे...
पीटर सेलर्सचा 'पार्टी' हा अजून एक धमाल चित्रपट आहे...

चिंतातुर जंतू's picture

17 Sep 2011 - 2:53 am | चिंतातुर जंतू

अहो पार्टीमध्ये आपल्या महान संस्कृतीवर टीका आहे. आपल्या हजारो वर्षं जुन्या भारतराष्ट्राला आपल्यावरची अशी टीका पचत नाही. त्यामुळे पीटर सेलर्सचा हा धागा, आपलं पिच्चर, आपल्याकडे काही वर्षं बॅन होता म्हटलं. 'तो पहा' असं म्हणून फुका सत्ताधार्‍यांशी पंगा कशाला घ्या? ;-)

बाकी कंपूबाजांनी कंपूबाजीसाठी काढलेले धागे आणि त्यावरचे एकेक +१ प्रतिसाद वाचतो आहे. :-)

- स्फोटांवर प्रेम करणारा स्ट्रेंजलूप जंतू
(A strange loop arises when, by moving up or down through a hierarchical system, one finds oneself back where one started.)

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2011 - 3:03 am | पिवळा डांबिस

टीका, बॅन वगैरेचं काही माहिती नाही पण आमच्या आवडत्या नेत्या इंदिरा गांधी यांना तो चित्रपट आवडायचा...
बाकीचे सत्ताधारी गेले तेल लावत!
:)

चित्रपट अफलातून होता.त्यातला तो निरागस,वेंधळा 'हृंडी बक्शी' विसरणे कठीण. हो आणि तेव्हाच्या सरकारला त्यावर बंदी आणावी लागली कारण तेव्हाच्या विरोधी पक्षांनी 'ह्या चित्रपटातून पवित्र भारतीय संस्कृतीची टवाळी केली गेली आहे' या मुद्द्यावर चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली.चित्रपटगृहांचे नुकसान होऊ नये यासाठी काही थिएटर मालकांनी तो 'आपखुशीने' खाली उतरवला तर इतरांना तो लोकेच्छेला दबून आणि लोकेच्छेला चुचकारण्यासाठी सरकारने काढलेल्या निर्बंधादेशामुळे खाली उतरावा लागला.(त्यावेळी प्रोजेक्टर आणि रिळे असायची म्हणून खाली उतरवणे वगैरे.)

..... लवकरच पाहिला जाईल.

धन्यवाद, पिडांकाका आणि इतर दोस्त लोक.....

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2011 - 7:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थे पर्त्य लवकरच बघण्यात आल्या जाईल. पिडांकाका, राही आणि जंतू यांचे आभार.

शहराजाद's picture

17 Sep 2011 - 4:47 am | शहराजाद

परीक्षण शेवटपर्यंत वाचलं नाही. आधी चित्रपट बघून मग वाचेन म्हणते.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2011 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

बघतोच आता लवकर.

ऋषिकेश's picture

17 Sep 2011 - 12:47 pm | ऋषिकेश

बघायला हवा! डाऊनलोडायला लावतो!

डाऊनलोडला लावण्यात आला आहे... पंधरावीस मिनिटांत सुरु करण्यात येईल. :)

http://thepiratebay.org/torrent/4115570/

ह.ह.पु. वा.!!

हॉटलाईनवरुन अमेरिकेचा अध्यक्ष रशियाच्या प्रिमियर सोबत-

Hello?... Uh... Hello D- uh hello Dmitri? Listen uh uh I can't hear too well. Do you suppose you could turn the music down just a little?... Oh-ho, that's much better... yeah... huh... yes... Fine, I can hear you now, Dmitri... Clear and plain and coming through fine... I'm coming through fine, too, eh?... Good, then... well, then, as you say, we're both coming through fine... Good... Well, it's good that you're fine and... and I'm fine... I agree with you, it's great to be fine... a-ha-ha-ha-ha... Now then, Dmitri, you know how we've always talked about the possibility of something going wrong with the Bomb... The *Bomb*, Dmitri... The *hydrogen* bomb!... Well now, what happened is... ahm... one of our base commanders, he had a sort of... well, he went a little funny in the head... you know... just a little... funny. And, ah... he went and did a silly thing... Well, I'll tell you what he did. He ordered his planes... to attack your country... Ah... Well, let me finish, Dmitri... Let me finish, Dmitri... Well listen, how do you think I feel about it?... Can you *imagine* how I feel about it, Dmitri?... Why do you think I'm calling you? Just to say hello?... *Of course* I like to speak to you!... *Of course* I like to say hello!... Not now, but anytime, Dmitri. I'm just calling up to tell you something terrible has happened... It's a *friendly* call. Of course it's a friendly call... Listen, if it wasn't friendly... you probably wouldn't have even got it... They will *not* reach their targets for at least another hour... I am... I am positive, Dmitri... Listen, I've been all over this with your ambassador. It is not a trick... Well, I'll tell you. We'd like to give your air staff a complete run-down on the targets, the flight plans, and the defensive systems of the planes... Yes! I mean i-i-i-if we're unable to recall the planes, then... I'd say that, ah... well, ah... we're just gonna have to help you destroy them, Dmitri... I know they're our boys... All right, well listen now. Who should we call?... *Who* should we call, Dmitri? The... wha-whe, the People... you, sorry, you faded away there... The People's Central Air Defense Headquarters... Where is that, Dmitri?... In Omsk... Right... Yes... Oh, you'll call them first, will you?... Uh-huh... Listen, do you happen to have the phone number on you, Dmitri?... Whe-ah, what? I see, just ask for Omsk information... Ah-ah-eh-uhm-hm... I'm sorry, too, Dmitri... I'm very sorry... *All right*, you're sorrier than I am, but I am as sorry as well... I am as sorry as you are, Dmitri! Don't say that you're more sorry than I am, because I'm capable of being just as sorry as you are... So we're both sorry, all right?... All right.

अर्थात, ज्याची त्याची आवड हे तर आहेच.

जगातील सर्वोत्तम विनोदी चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा क्रमांक नेहमी वरचा असतो.ब्लाक ह्युमर प्रकाराशी जवळीक आहे असे वाटते

फारएन्ड's picture

19 Sep 2011 - 11:45 am | फारएन्ड

मजा आली वाचताना :) या पिक्चर बद्दल बरेच वाचलेले आहे पण पाहिलेला नाही अजून. आता नक्कीच पाहणार. कधी कधी एखाद्या वरकरणी जड वाटणार्‍या कलाकृतीची कोणीतरी ओळख करून दिली की बरे असते :)

युद्धावरच्या काही चित्रपटात "टॉप सिक्रेट" हा सुद्धा एक चांगला आहे. कदाचित याच्याएवढा हाय लेव्हल नसेल पण धमाल आहे.

मूकवाचक's picture

21 Sep 2011 - 12:27 pm | मूकवाचक

असेच म्हणतो.

स्मिता.'s picture

19 Sep 2011 - 2:19 pm | स्मिता.

अदितीने करून दिलेली ओळख आणि सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून हा चित्रपट बघणारच.
आजच डाऊनलोड करायला लावते.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Sep 2011 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते

चित्रपट आवडला. टर्जिडसन कहर आहे. पीटर सेलर्स अप्रतिम. पण नुसत्या अभिनय वगैरे पेक्षाही, हा चित्रपट ज्या पद्धतीने भडक विचारसरणीवर हल्ला करतो त्यासाठी महान आहे.

क्रेमर's picture

20 Sep 2011 - 1:38 am | क्रेमर

चित्रपटाची अभिनव ओळख आवडली.

विनीत संखे's picture

21 Sep 2011 - 12:47 pm | विनीत संखे

हॉलीवूडच्या सटिरिकल चित्रपटांत १९७० चा "मॅश" M*A*S*H सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

सविता's picture

22 Sep 2011 - 5:10 pm | सविता

ह्ह्म्म्म......... बघायला पाहीजे!