पाढेपुराण

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in जनातलं, मनातलं
16 Sep 2011 - 4:27 pm

आमच्या ओळखीतले एक देवधर आजोबा होते. आता वारले ते बिचारे. आयुष्यभर पोष्टात कारकुनी केली; पुढे पेन्शनीत निघाले आणि काही वर्ष पेन्शन खाऊन एके दिवशी वैकुंठाला गेले. म्हणजे तसं पाहायला गेलं तर देवधर हा एक सामान्य मध्यमवर्गीय गृहस्थ. ओढाताण असली तरी तसा खाऊनपिऊन सुखी. दोन मुलांचा संसार केला. पण एक गोष्ट मात्र विशेष होती देवधर आजोबांच्यात, आणि ती म्हणजे देवधर आजोबांना पाढे पाठ होते. केवळ १ ते ३० नव्हे, तर चांगले १ ते ५००..!

विश्वास नाही ना बसत? पण ती वस्तुस्थिती होती. आम्ही पोरंबाळं मग गंमतीने देवधर आजोबांची परिक्षा घ्यायचो.

"आजोबा, सांगा पाहू ३५३ त्रिक किती? २५५ अठ्ठे किती? ४६८ चोक किती?"

देवधर आजोबांना असे कुठलेही, कितीही प्रश्न विचारा. आजोबा अक्षरश: क्षणात उत्तर सांगत! मग आम्ही मुलं खरोखरंच ३५३ ला तिनाने गुणून पाहायचो, २५५ ला आठाने गुणून पाहायचो! :)

"तपासा, तपासा, नीट तपासून पाहा लेको. हा देवधर १ ते ५०० च्या पाढ्यात कधी चुकायचा नाही बरं!" आजोबा मिश्किलीने म्हणत!

परवाच आमच्या कार्ट्याचे पाढे पाठ करून घेत होतो आणि देवधर आजोबांची आठवण झाली! पण तरीही आमच्या लहानपणापासूनच पाढ्यांबद्दल आमच्या मनात काही प्रश्न आहेत, विलक्षण तेढ आहे. खास करून १९ च्या आणि २९ च्या पाढ्याबाबत! :)

मुळात पाढे एक ते तीसपर्यंतच असतात. आणि असतात तर फक्त तीसापर्यंतच का असतात? तिसाच्या पलिकडे पाढेच नसतात का? मग अलिकडे वीसापर्यंतच का नकोत?

पाढ्यांबाबत पाठांतराकरता नेमका तीस हा आकडा का, कसा, कधी ठरला? कुणी ठरवला?!

१९ आणि २९ या दोन पाढ्यांमुळे आमचे गाल अनेकदा रंगले आहेत. या दोन पाढ्यांचं आणि बालमनाचं नेमकं मानसशास्त्र काय आहे?! :)

"हां, सांग रे शिंच्या, सोळीन् नव्वं किती?" बाप गुरगुरायचा.

मग लगेच रामनाम घेतल्यासारखं आमचा १६ एके १६, १६ दुणे बत्तीस... असा सोळीन नव्वं पर्यंतचा प्रवास सुरू व्हायचा. साट्कन मांडी रंगायची!

"असं नाही, सोळीन नव्वं किती ते डायरेक्ट सांग. त्याकरता सबंध पाढा कशाला म्हणून पाहायला पाहिजे?!" -- पुन्हा एक जोराचा फटका!

पाढ्यांवरून मुलांना अत्यंत वाईट वागणूक देणं हे भारतीय घटनेनं नेमून दिलेलं काम बाप अगदी चोख बजावत होता! :)

"पण १६ चा पाढा म्हणून उत्तर सांगितलं तर कुठे बिघडलं?" -- अपमानाने पुटपुटत रंगलेलं तोंड घेऊन आम्ही आईकडे दयायाचना करायचो.

"मला काही सांगू नकोस, अन् काही विचारू नकोस. तुला बहुतेक पिठाची गिरण काढून द्यावी लागणार! -- इति आई!

एकंदरीतच आमच्या लहानपणी पाढे हा प्रकार घरादारात केवळ अन् केवळ अशांतता निर्माण करणारा होता! :)

"पाढे पाठ कर रे बाबा! मोठ्ठेपणी चांगलं डॉक्टर-इन्जिनियर व्हायचंय ना?"

आता आज्जी संभाषणात एन्ट्री घ्यायची..

'पाढे पाठ करून डॉक्टर-इंजिनियर होता येतं? मग १ ते ५०० पाढे पाठ असणारे देवधर आजोबा पोष्टात कसे?' - आमच्या बालमनाला पडणारा प्रश्न! :)

पाढ्यांची भाषाही मोठी विलक्षण. दुणे, त्रिक, चव्वे, पंचे, सक, सत्ते, अठ्ठे, नव्वे या शब्दांचं उगमस्थान काय? मूळ भाषा फारसी का?

२४ नव्वं दोनशे सोळा असं का नाही म्हणायचं? 'सोळीन दोन' असंच का म्हणायचं?

एक बन्याकाका तेवढा होता, ज्याला पाढ्यांच्या बाबतीत आमची करुणा यायची.

"काळजी कशाला करतो रे? २ ते ९ पाढे पाठ असले म्हणजे सगळे पाढे येतात. समजा तुला अठ्ठावीस अठ्ठे हवे आहेत. सोप्पं आहे. आठाचा पाढा पाठ असल्याशी कारण! म्हणजे बघ - आठी आठी ६४, ६४ शी ४, हातचे आले ६ आणि आठ दुणी सोळा, सोळान् सहा २२. म्हणजे उत्तर २२४. अठठावीस अठ्ठे च्चव्वीस दोन! हाय काय अन् नाय काय..!" असं म्हणून बन्याकाका छानशी टपलीत मारायचा!

बन्याकाकादेखील २२४ ऐवजी 'च्चव्वीस दोन' असं का म्हणायचा हाही एक प्रश्नच होता! :)

"बन्या, तू मध्ये पडू नकोस आणि पोरांना भलते शॉर्टकट शिकवू नकोस. नाहीतर तुलाही हाणीन!"

बाप बन्यालाही हाग्या दम द्यायचा! बापाने असा दम भरल्यावर बन्याकाका गंमतीने आमच्याकडे पाहात पट्टदिशी गच्चीत विडी शिलगावायला निघून जायचा! :)

असं हे छोटेखानी पाढेपुराण. आज मात्र पाढ्यांचा विषय निघाला आणि आम्ही लहानपणात रमलो. २९चा पाढा चुकल्यावर फाडदिशी कान रंगवणारा बाप आठवला, मिश्किल बन्याकाका आठवला आणि २१९ चा पुरा पाढा न म्हणता २१९ सक १३१४ असं पट्टदिशी सांगणारे देवधर आजोबाही आठवले आणि मन एवढुस्सं झालं..! :)

काय विचारलंत, २९ नव्वे किती? थांबा हां, सांगतो..

सोप्पं आहे २९ नव्वं २६१. नव्हे नव्हे, २९ नव्वं एकसष्ट दोन! :)

-- कॉमॅ.

वाङ्मयमुक्तकमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

कच्चा पापड पक्का पापड's picture

16 Sep 2011 - 5:25 pm | कच्चा पापड पक्क...

'पाढे पाठ करून डॉक्टर-इंजिनियर होता येतं? मग १ ते ५०० पाढे पाठ असणारे देवधर आजोबा पोष्टात कसे?'

१ नंबर !!! बालमनाला पडणारा प्रश्न! :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2011 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही...मस्त लेख.. :-)

मृत्युन्जय's picture

16 Sep 2011 - 6:18 pm | मृत्युन्जय

सहज साधा लेख. आवडला.

चित्रा's picture

16 Sep 2011 - 6:18 pm | चित्रा

मस्त लेख.

माझी पाठांतराची बोंबाबोंबच असे. मला कोणी फटके कधी दिलेले नाहीत पण रोज संध्याकाळी असे पाढे पाठ करून फार कंटाळा यायचा. संध्याकाळची वेळ कधी टळते असे व्हायचे. मीही बर्‍याचदा तुमच्या बन्याकाकांसारखेच गणित करत असे. :-)
मी पाढ्यांवरून कटकट केली की सांगितले जाई की आमच्या वेळी अडीचकी, निमकी, पावकी असे पाढे असत ते तरी नाहीत हे तुझे नशीब समज.

५० फक्त's picture

16 Sep 2011 - 6:24 pm | ५० फक्त

माझे बाबा शिक्षक होते..... यापुढे याबाबतीत काही लिहिलं तर ती रडकथा होईल.

मस्त लेख. १९ आणि २९ खरच भयानक पाढे आहेत =))

योगी९००'s picture

16 Sep 2011 - 9:20 pm | योगी९००

मी केवळ २० आणि ३० चा पाढयामुळे १९ आणि २९ च्या पाढ्यांपासून वाचलो.

कसे..? ते एकदम सोपे आहे..

समजा १९ नव्वे किती? असे विचारले तर २० नव्वे करून नऊ वजा करायचे ..

आणि १८ आणि २८ च्या वेळी ही ट्रिक वापरताना कधी कधी चुका व्हायच्या...कारण तुम्हाला २८ नव्वे किती असे विचारले तर ३० नव्वे करून त्यातून ९ दोन वेळा (किंवा १८ एकदा) वजा करायचे...यात कधी कधी चुका व्हायच्या...

रेवती's picture

16 Sep 2011 - 7:14 pm | रेवती

अगदी पटले हे लेखन!
रोज संध्याकाळी सक्तिचा असलेला परवचा/पाठांतर हा प्रकार अजूनही भिती दाखवतो.
आम्हाला तर पावकी ते अडीचकीही पाठ करायला लावली होती.
माझ्या मुलालाही पाढे पाठ करायला आवडत नाही.

विकास's picture

16 Sep 2011 - 7:14 pm | विकास

लेख एकदम आवडला. १९-२९ शी सहमत.

पाढे म्हणायची दुणे, त्रिक, चव्वे, पंचे, सक, सत्ते, अठ्ठे, प्रमाणे विशिष्ठ पद्धत असते. मला आठवते पहीली दुसरीत जेंव्हा पहीले पाढे शिकायचो, तेंव्हा "सात सक्कं बेचाळ" असे म्हणायचो. हे सक्कं फक्त सातालाच लागू! मग कधी कधी कोणी तरी मोठे गमतीत पकडयाला प्रश्न विचारणार, साही सक्कं किती? आणि चुकवायचा प्रयत्न करणार :-)

बाकी पाढे तीसपर्यंत पाठ करायचा प्रयत्न केला आणि कुठेतरी चुकले की "पहीले पाढे पंचावन्न" असेच वाटायचे! :-)

योगी९००'s picture

16 Sep 2011 - 9:23 pm | योगी९००

सात सक्कं बेचाळ हे ऐकून ऐकून मी बर्‍याच वेळेला "साही सक्कं बेचाळ" असे म्हणायचो..

मोहनराव's picture

16 Sep 2011 - 7:40 pm | मोहनराव

"पाढे म्हणा" अस कोणि म्हणाल तर धडकी भरायची आमची!!!
गणित आणि माझा ३६ चा आकडा ठरलेला असायचा!!
लेखन आवडले!!!

तिमा's picture

16 Sep 2011 - 8:21 pm | तिमा

पाढे हे रुक्ष व क्लिष्ट वाटू नयेत म्हणून ते एका लयीत व साधारण चालीवर पाठ करुन घेत असत. तर त्यातली गेयता टिकवण्यासाठी, सोळ नव्वं चव्वेचाळासे, असे सुरांत म्हणण्याची पध्दत होती. पाढे पाठ केल्याने तोंडी गणिते पटकन करता येतात व कॅलक्युलेटर ची जरुर भासत नाही.बाजारात गेल्यावर व्यवहारात न फसण्यासाठीही पाढ्यांचा उपयोग होतो हे मी स्वानुभवावरुन सांगतो.

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 12:44 am | पाषाणभेद

अन असले पाढे सामुहिकरित्या म्हणायला लावले तर चुकण्याचा प्रश्नच नसायचा वर्गात. आरती म्हणतांना कसे पुढले कडवे कोणते ते लक्षात नाही राहीले तरी चालते तसे.
मस्त लेख. घरात भिंतींवर पाढे-मुळाक्षरांचे तक्ते लावलेले आठवले.

नितिन थत्ते's picture

16 Sep 2011 - 8:40 pm | नितिन थत्ते

२० च्या पुढचे पाढे पाठ करायची मुळीच गरज नाही असं आमचे (इंजिनिअर) आजोबाच सांगायचे. :) पण त्यांनी गीतेचे अठरा अध्याय का पाठ केले होते ते विचारायचं राहिलं त्यांना.

सिद्धार्थ ४'s picture

16 Sep 2011 - 8:55 pm | सिद्धार्थ ४

लेख आवडला.

आत्मशून्य's picture

16 Sep 2011 - 9:04 pm | आत्मशून्य

.

प्रभो's picture

16 Sep 2011 - 10:26 pm | प्रभो

लेख आवडला.

इंटरनेटस्नेही's picture

16 Sep 2011 - 11:35 pm | इंटरनेटस्नेही

मला खालील पाढे येतात.
१, १०, १००, १०००, १००००, १००००० आणि सो ऑन अ‍ॅण्ड सो फोर्थ. :D

-
(पहिली पासुन कॅल्क्युलेटर वापरणारा) इंट्या टेकफ्रीक.

पान्डू हवालदार's picture

16 Sep 2011 - 11:54 pm | पान्डू हवालदार

लेख आवडला.

साती's picture

16 Sep 2011 - 11:57 pm | साती

लेख आवडला.
आम्ही सव्वीस दोन असे न म्हणता सव्वीशी दोन असं तालासूरात म्हणायचो.
बारोदर्शे म्हणजे ११२ हे तेव्हा कसं समजायचं ते आत्ता समजत नाही. :)

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2011 - 1:11 am | पिवळा डांबिस

....एके दिवशी वैकुंठाला गेले. विश्वास नाही ना बसत?
खरंच विश्वास नाही बसत. पोष्टात कारकुनी करून, पेन्शन खाऊन आणि पाढे पाठ करून मनुष्य डायरेक्ट वैकुंठाला जाऊ शकतो यावर खरंच विश्वास नाही बसत!! :)

बाकी पाढे ही एक बाळपणाला लागलेली पीडा आहे याबद्दल सहमत आहे. पाढे विचारणारा अगदी बाप, काका, भाऊ जरी असला तरी त्याच्याशी नातं तोडून टाकावं!!!! ;)

ब्रिटिशांनी गांधीजींना जर सारखे पाढे विचारले असते तर तेही अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग सोडून नक्षलवादी बनले असते असं मला नक्की वाटतं!!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2011 - 1:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम पिडाकाका प्रतिसाद.

पाढे म्हणायला लहानपणी काही वाटलं नाही, तेव्हा मी फार गुणी (पक्षी: बावळट) बाळ होते. पुढे कंटाळा यायला लागला. कधीमधी असंही लक्षात येतं की आता सव्वीसाचा पाढा आठवला तर कष्ट वाचतील, पण आता पाढे म्हणायचे, लिहायचे कष्टही कंटाळवाणे वाटतात.

हा व्हिडीओ लहानपणी दाखवला असता तर बरं झालं असतं.

कधीतरी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दिवसातली गोष्ट. वर्गात एक गणित घातलं होतं. मी कोणतातरी स्थिरांक विसरले; काही केल्या आठवेना. मग त्याची एककं आठवून अंदाजपंचे गणित केलं. तर उत्तर ६X१०३० च्या जागी ३X१०३० असं काहीसं आलं. आमच्या मास्तराने ते बरोबर आहे असं जाहीर केलं वर मला कसं केलंस ते विचारलं. मी स्थिरांक विसरले याकडे साफ दुर्लक करून तो पुढच्या मेथडवर ते खूष झाले.

कॉमॅ, तुमच्या आजीचं लॉजिक आवडलंच.

विकास's picture

17 Sep 2011 - 3:44 am | विकास

बाकी पाढे ही एक बाळपणाला लागलेली पीडा आहे याबद्दल सहमत आहे.

मला आधी वाटले की आपण "पिडा" असे म्हणत स्वतःलाच दुषण देत आहात का काय! ;)

बाकी मूळ मुद्याशी सहमत. तरी बरं आपण शाळेत जाईपर्यंत पावकी, दिडकी, अडीचकी या पुलंच्या भाषेतील चेटकींचे प्रमाण कमी झाले होते... :-)

ब्रिटिशांनी गांधीजींना जर सारखे पाढे विचारले असते तर तेही अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग सोडून नक्षलवादी बनले असते असं मला नक्की वाटतं!!!!
मला उलटे वाटते. गांधीजी स्वतःला गणितवाल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांचे शिष्य समजत. त्यामुळे जेंव्हा केंव्हा त्यांच्याशी वाटाघाटी करायचा प्रयत्न सरकारने केला अथवा त्यांना अटक करून ठेवायचा प्रयत्न केला तेंव्हा तेंव्हा त्यांनी बे एके बे सुरू केले असावे. त्यामुळे घ्या स्वातंत्र्य, हा मी चाललोअसा पवित्रा ब्रिटीशांनी घेतला असावा. :-)

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2011 - 8:08 pm | पिवळा डांबिस

मला आधी वाटले की आपण "पिडा" असे म्हणत स्वतःलाच दुषण देत आहात का काय!
विकास आणि ||विकास|| यांत फरक आहे ना?
तसाच पिडां आणि पीडा यात ही फरक आहे....
:)

चित्रगुप्त's picture

17 Sep 2011 - 2:58 am | चित्रगुप्त

सुंदर लेख. बालपणाच्या अनेक आठवणींपैकी एक पाढ्यांचीही असतेच.

पाढ्यांच्या अभावी हल्ली दुकानदार अगदी सोपे, ३ गुणिले ७ असे हिशेब सुद्धा कॅल्क्युलेटर वर करतात, हे बघून हसावे की रडावे, हेच कळत नाही.

तुमचा हलकाफुलका लेख जाम आवडला. एकदम बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.
मी सुद्धा ३० पर्यंत पाढे पाठ केलेले होते. पावकी, निमकी बरी वाटायची पण पाऊणकी, सवायकी वगैरे म्हणजे जरा जास्तच व्हायचे त्यामुळे ते ऑप्शनला टाकले होते! ;) पाढे पाठ करताना आकड्यांशी खेळण्याची गंमत काही और असते हे खरे. विशिष्ठ अंकाच्या पटींचा आणि एकं, दशं अशा स्थानांचा संबंध लक्षात यायला लागला की पाढे चटचट पाठ होतात. माझे आजोबा रँग्लर परांजप्यांकडून गणित शिकलेले होते आणि ते आनंदाने मला गणित शिकवीत त्यामुळे लहानपणापासूनच गणित नावडते राहिले नाही हे मला चांगले वाटते.
आकड्यांशी खेळण्याच्या सवयीमुळे मी दिसेल त्या गाडीच्या नंबरांची झटपट बेरीज करुन शेवटी एका अंकापर्यंत ती रिड्यूस करुन आणायचा खेळ कितीतरी वर्षे खेळत होतो.

(अंक*प्रेमी)रंगानुजम
(* अंक म्हणजे आकडा ह्या अर्थी, अन्यथा अतिचौकसपणे भलतेच अर्थ काढाल! ;) )

प्रास's picture

17 Sep 2011 - 3:22 pm | प्रास

अगदी हाच अर्थ काढत होतो....

ढिस्क्लेमर दिलात ते उत्तमच केलंत नाहीतर...... ;-)

असो.

कॉमँचा लेख हलका फुलका आणि छानच आहे हे वेसांन.

:-)

पैसा's picture

17 Sep 2011 - 8:05 am | पैसा

काहीही एकदा वाचलेलं/ऐकलेलं माझ्या लक्षात रहात असल्यामुळे पाढ्यांची कटकट वाटली नाही. मात्र पावकी, निमकी, पाउणकी, सवायकी आणि औटकी ही मंडळी* अंकलिपीतच राहिल्यामुळे केवळ गंमत म्हणून पाठ केल्याचं आठवतं!

* ही मंडळी आमच्या शाळेत येत नव्हती, (कारण आमच्या गुर्जीनीच गणित ऑप्शनला टाकून एस.एस.सी.पार केली होती.) पण आईवडील दोघेही हायस्कूलमधले शिक्षक असल्यामुळे आई संध्याकाळी न चुकता पाढे म्हणून घेत असेच!

नगरीनिरंजन's picture

17 Sep 2011 - 8:50 am | नगरीनिरंजन

माझी दुखरी आठवण (आणि पाठीखालचा दुखरा अवयवही) जागी झाली. २६ ते २९ या पाढ्यांनी बालपणातल्या कोवळ्या रंगीत दिवसांचा करपवून काळा केलेला कोळसा आठवला की अजूनही तोंड काळवंडतं.
एकदा बापाने सकाळी सांगितलं की संध्याकाळ पर्यंत २८ चा पाढा पाठ व्हायला हवा आणि कामावर निघून गेला. तो दिवस मी मरेपर्यंत विसरणे शक्य नाही. :-)
आजकाल टिचभर पोरापुढे आईबाप नाकदुर्‍या काढताना पाहिले की त्या पोरांचा अतिशय हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.

ऋषिकेश's picture

17 Sep 2011 - 3:46 pm | ऋषिकेश

लेख मस्तंय! :)

नारयन लेले's picture

17 Sep 2011 - 4:00 pm | नारयन लेले

आगदी लहान पणाच्या आठवणी॑ जाग्या झाल्या.
लेख आवडला.

विनित

दिपक's picture

17 Sep 2011 - 4:13 pm | दिपक

छान हलका फुलका लेख आवडला.!
गणिताच्या बाबतीत आम्ही ’मार्क्सविरोधी’ गटात असल्यामुळे १० पर्यंतच पाढे असावे असे वाटायचे.

इयत्ता ९वी
२५ पैकी ०
विषय गणित
टाचणी परिक्षा :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2011 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला लेख. बाकी, पाढ्यांचा तक्ता दिल्यामुळे वीसाच्या पुढील पाढ्यांसाठी काही खास युक्ती आहे की काय असे वाटले होते.

पाढे पाठ करून डॉक्टर-इंजिनियर होता येतं? मग १ ते ५०० पाढे पाठ असणारे देवधर आजोबा पोष्टात कसे?'

स्सही.....!!!

माझ्या शाळेत गणित मन लावून शिकवणार्‍या एका शिक्षकाला एक भयंकर नाद होता. वर्गात गणित शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी वर्गातल्या कोणत्याही पोराकडे बोट करुन, चल तु सांग, तेवीस त्रिक किती ? चल तु सांग अठ्ठावीस सखं किती ? उत्तर नाही आलं की, पाठीवर धपा-धप दणके बसायचे. परंतु अवघड पाढा विचारल्यावर आपल्याकडे बोट येऊ नये म्हणून माझा मात्र देवाचा धावा चाललेला असायचा. (देवाचा नाद असा जुना आहे.) शाळेत होतो तेव्हा अशा भीती मुळे पाढे पाठ होत गेले. सध्या पंचवीसच्या पाढ्यापर्यंत बरी अवस्था आहे.

-दिलीप बिरुटे

ह्या पंचवीसच्या मागचे रहस्य काय ?

मिहिर's picture

18 Sep 2011 - 11:40 am | मिहिर

चौथीपर्यंत ३० पर्यंत यायचे. नंतर हळूहळू कमी होत गेले. पण पाढे पाठ करणे त्रासदायक नाही वाटले कधी. आम्हाला पावकी निमकी वगैरे कधीच नव्ह्ती. पण जुनी माणसे उगाच त्याचा बाऊ करतात असे वाटते. पाठ नसले तरी ते म्हणतानाच तयार करत पाढ्याच्या वेगाने सहज म्हणता येतात (हे पावकी निमकी बद्दल). :)

आशु जोग's picture

18 Sep 2011 - 11:58 am | आशु जोग

बाय द वे

कुणाचा कॅल्कुलेटर चालत नसेल तर मला सांगा

आम्हाला ५०१ चा पाढा उत्तम येतो

पिलीयन रायडर's picture

1 Dec 2011 - 4:46 pm | पिलीयन रायडर

मलाही पाढे कधी आवडले नाहीत.. पण बर्‍यापैकी पाठ होते..
पण का कोण जाणे मला १२ * ४ = ३६ वाटायच.. मला न माझ्य मैत्रिणीला पण..
आम्ही गणितं नेहमी मोठ मोठ्याने चर्चा करत सोडवायचो..
१२*४ आलं की कुणी तरी ओरडायचं ३६...
की सगळे ३६ घेउन पुढे सोडवायचे.. मग अर्थात उत्तर चुकलं की जेव्हा घोळ कळायचा तेव्हा "कोण ओरडलं रे ३६????? " अशी भांडण पण व्हायची...
अजुनही मे "बार चोक छत्तीस " असच म्हण्ते...