चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म
माझ्या एका चित्रावर सहज यांनी सुरु केलेल्या धाग्याला अनेक प्रकारचे प्रतिसाद लाभले. या चित्राबद्दल खुद्द चित्रकाराची काय भूमिका आहे, अशी काहींनी पृच्छा केली, त्यावर हे लेखन करतो आहे.
प्रत्यक्ष माझ्या त्या विशिष्ट चित्राविषयी काही सांगण्याआधी चित्रकलेविषयी थोडी पूर्वभूमिका:
चित्रकलेचे अनेक प्रकार, पंथ, शैली, विचारसरणी असल्या, तरी सुरुवात म्हणून एकंदर चित्रांना दोन प्रकारात विभाजित करूया:
१. वर्णनात्मक चित्रे, आणि
२. केवल चित्रे ( वा केवलात्मक चित्रे).
या दोन प्रकारच्या चित्रांची उदाहरणे: (तिन्ही चित्रे माझी)
चित्र १: एका खेडेगावातील दृश्य: हे कोणते गाव आहे, कुठे आहे, कोणत्या काळातील आहे, यात दिसणारे घर कुणाचे आहे, अश्या प्रकारचे प्रश्न विचारले जाउ शकतात, व त्यांची उत्तरेही शोधली जाऊ शकतात.
चित्र २ व ३ : केवलचित्रे :
वर्णनात्मक चित्रात एखादी घटना, व्यक्ती, वस्तू, निसर्ग, किंवा काही विचार, कल्पना, कथा इ. चे चित्रण केलेले असते. असे चित्र बघून त्या गोष्टी विषयी आपल्याला माहिती तर मिळतेच, शिवाय कलावंताच्या कलात्मक करामतीतून आनंद, विस्मय, दु:ख, कुतूहल, शांती वगैरे भावना वा रस ही उद्दीपित होऊ शकतात.
केवल चित्रात असले काहीच नसते. चित्र बनवण्याची (व बघण्याची) क्रिया हीच यातील घटना, व पूर्ण झालेले चित्र हीच एक वस्तू. असे असल्याने अश्या चित्रातून काही अर्थ व आशय शोधणे व्यर्थ असते. असे चित्र हे 'कशाचे तरी चित्र' नसून त्याचे एक स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण अस्तित्व असते. असे चित्र बघताना कोणतीही माहिती मिळत नसली, तरी सौंदर्यबोध, कलात्मक आनंद, विस्मय, वा अन्य भावनात्मक अनुभव येत असतात.
वर्णनात्मक चित्रांचा इतिहास हजारो वर्षांचा असून त्यात अनेक काळातील, अनेक देशातील, अनेक शैलीतील अनेक प्रकारची चित्रे समाविष्ट करता येतात. केवलात्मक कला त्यामानाने बरीच अलिकडची आहे.
वर्णनात्मक चित्रकलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दीर्घ परिश्रम व साधनेची गरज असते. रेखाटन, स्थिरवस्तू चित्रण, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, छाया-प्रकाशाचा आभास, पर्स्पेक्टीव्ह, शरीर शास्त्र, रंगलेपनपद्धती, मानावाकृतीचे संयोजन असे अनेक विषय दीर्घ प्रयत्नानेच साध्य होतात. हे सर्व शिकून त्यावर आधारित स्वत:ची अशी चित्रपद्धती विकसित करण्यात आयुष्य खर्ची पडते. एक एक चित्र पूर्ण करायलाही भरपूर वेळ लागतो. उदाहरणार्थ व्हरमीर चे हे चित्र बघा.
(Johannes Vermeer - Girl with a Pearl Earring)
आकाराने लहानसे असे एक चित्र करायला त्याच्या सारख्या दिग्गज कलावंताला वर्ष-सहा महिने लागत.
या 'Girl with a Pearl Earring' चित्रावर एक कादंबरी व एक सुंदर चित्रपट देखील आहे.
व्हरमीर ची आणखी काही चित्रे:
आता नेपोलियनच्या राज्याभिषेकाचे हे भव्य चित्र बघा (चित्रकार: Jacques-Louis David) असे चित्र बनवणे बरेच अवघड असते.
अश्या महत्वाच्या, प्रत्यक्ष घटनेवर आधारित चित्रात सर्व तपशील मुळाबरहुकुम असणे आवश्यक असते. उदा. नोत्रदाम या प्राख्यात चर्च मध्ये हा सोहळा झाला तेथील तपशील, तसेच तिथे उपस्थित सर्व व्यक्ती त्या काळातील मान्यवर असल्याने त्यांची चेहरेपट्टी हुबेहूब चित्रित करणे आवश्यक. एवढेच काय, राज-मुकुटात कोणकोणती रत्ने जडवलेली होती, मखमली, लोकरी वा सुती कपड्यातील फरक, असले तपशील. मामला प्रत्यक्ष सम्राटाच्या राज्यारोहणाचा असल्याने चित्रात काही कमीजास्त झाल्यास सम्राटाची खपामर्जी होण्याची शक्यता. तसेच प्रत्यक्षात नसलेले काही तपशील सम्राटाच्या मर्जीखातर रंगवणे. उदा. या प्रसंगी नेपोलियनची आई हजर राहिली नव्हती, तरी तिला या चित्रात उपस्थित दाखवलेले आहे.
डेव्हिड याचे रोमन ऐतिहासिक घटनेवर आधारित आणखी एक चित्र: यातील तपशील काल्पनिक असले, तरी जणुकाही ते चित्रकाराने प्रत्यक्ष बघून रंगवले आहेत, असे वाटावे. चित्रात डावीकडे किंकर्तव्यमूढ अवस्थेत बसलेली व्यक्ती म्हणजे ब्रूटस आहे. स्वतःच्या मुलाला म्रुत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचे कठोर कर्तव्य त्याला करावे लागलेले आहे. त्या मुलाचा मृतदेह घरात आणला जात असता त्याची पत्नी विलाप करत आहे, असा या चित्राचा विषय आहे.
केवलचित्रे बनवणे त्या मानाने सोपे असते. काही तांत्रिक युक्त्या-प्रयुक्त्या योजून केवलचित्रे अल्पावधीत बनवता येऊ शकतात. अर्थात वरील सर्व विषयांचा अभ्यास न करता केवलचित्रे बनवणे शक्य असले, तरी त्यात पारंगतता मिळवण्यास सुद्धा दीर्घ साधना लागते.
गंमत म्हणून खालील युक्ती बघा:
सपाट मैदानात भला मोठा कान्व्हास पसरवून त्यावर बादल्यातून वेगवेगळे रंग ओतावेत. मग कुणाकडून तरी त्यावर वाटेल तशी झाडू, पोछां, वायपर वगैरे खुशाल चालवून घ्यावेत. मुलांना त्यावर मनसोक्त हुंदडू द्यावे, अथवा म्युनिसीपाल्टीचा रोड रोलर फिरवून घ्यावा.यातून काहीतरी केवलचित्र बनेलच.
यातील विनोदाचा भाग सोडून दिला, तरी एखादी युक्ती हाती लागली, की केवल चित्र बनवणे तसे कठीण नसते.(यामुळेच की काय, कैवल्यवादी कलावंतांचे अमाप पीक हल्ली आलेले दिसते) मात्र कलावंताची आकलनक्षमता व संवेदनशीलता जर तीव्र असेल, तर अश्या प्रयत्नातून सुंदर, प्रभावी केवलचित्रे निर्माण होऊ शकतात. (इथे थोर संगीत दिग्दर्शक ओपी नैय्यर आठवतात. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांना शास्त्रीय संगीतातले फारसे काही कळत नसले, तरी त्यांनी अद्भुत सौंदर्याने नटलेली अप्रतिम गाणी दिलेली आहेत).
आपण इथे चित्रांचे दोन टोकाचे प्रकार बघितले, परंतु अनेक चित्रे या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतात. गंमत म्हणजे केवलात्मकता ही आधुनिक गणली जात असली, तरी सर्व प्राचीन संस्कृतीतील चित्रे ही वर्णनात्मक असूनही केवलात्मकतेकडे बरीच झुकलेली असतात.
खालील चित्रे बघा:
प्रागैतिहासिक कला
जपानची कला:
इजिप्तची चित्र कला:
भारतीय कला
मैथिली कला:
जगभरात हजारो वर्षे या प्रकारची कलाच प्रचलित होती.
छाया-प्रकाश,पर्स्पेक्टीव्ह, वगैरे युक्त चित्रकला साधारणत: सोळाव्या ते विसाव्या शतकात युरोपमध्ये प्रचलित झाली. यात इटलीतील उत्खननातून मिळू लागलेल्या प्राचीन ग्रीक व रोमन कलेचा प्रभाव तर होताच, शिवाय ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी चर्चेसमधून येशू, मेरी व बायबलातील प्रसंगाची अगदी हुबेहूब, खरीखुरी वाटतील, अशी भव्य चित्रे रंगवण्याचेही आव्हान होते. उदा. खालील चित्र:
(भारतात ती राजा रविवर्माच्या छापील चित्रांच्या स्वरूपात घरोघर पहुचली, आणि इंग्रजी राजवटीत त्यांनी उघडलेल्या आर्टस्कूल्स मधून भारतभर पसरली). अजून सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनावर या कलेचा पगडाच जास्त असलेला दिसून येतो.
....फोटोग्राफीच्या उदायानंतर मात्र चित्रकला पुन्हा केवलात्मकते कडे वळलेली दिसते.
आता माझ्या या चित्राबद्दल:
हे चित्रही असेच वर्णनात्मकता व केवलात्मकता यांच्या सीमारेषेवरचे चित्र आहे. चित्रात काही स्त्रिया, मोर वगैरे जरी दिसत असले, तरी यथातथ्य शरीररचना, छाया-प्रकाशाचा आभास, प्रमाणबद्धता वगैरे गोष्टींना चित्रात स्थान न देता (मिपाकरांच्या भाषेत 'फाट्यावर मारून') चित्र- अवकाशाचे विभाजन, रेषांचा प्रवाहीपणा, रंगा - आकारांचा तोल, काल्पनिक रंगसंगती, अश्या केवलात्मक तत्वांना प्राधान्य दिले आहे.
यातील स्त्रिया कुणी विशिष्ट व्यक्ती नाहीत, यात कोणताही प्रसंग चित्रित केलेला नाही वा यातून कोणतेही मत, विचार, कल्पना, कथा इत्यादी व्यक्त केलेले नाही. यातील आकृती या केवळ निमित्तमात्र असून चित्राचा हेतु रंग - रेषा - आकारांच्या संयोजनातून एक वेगळा दृश्यानुभव निर्मित करणे, असा आहे.
या चित्रावर जे विविध प्रतिसाद आले त्यातील बहुतांश, हे एक वर्णनात्मक चित्र आहे, या दृष्टीकोनातून लिहिलेले असल्याने बऱ्याच मनोरंजक कल्पना लढवण्यात आलेल्या दिसतात. श्री धनंजय, राजेश घासकडवी, विसुनाना, पंगा, पैसा, शशिकांत ओक इ. ना चित्रातली केवलात्मकता जाणवल्याने त्यांनी केलेले चित्राचे रसग्रहण माझ्या भूमिकेशी जास्त जवळचे वाटले.
माझी अन्य चित्रे:
http://www.flickr.com/photos/sharad_sovani/
मी चित्रकार कसा बनलो:
http://misalpav.com/node/18587
चित्रकलेविषयी काही प्रश्न असल्यास जरूर विचारावेत, त्यांची उत्तरे देण्याचा यथाशक्ति प्रयत्न करेन.
आणखी पुढे कधीतरी...
प्रतिक्रिया
8 Aug 2011 - 4:10 am | अभिज्ञ
अतिशय सुंदर लेख.
चित्रकलेबद्दलचे विवेचन आवडले.
लेख वाचनखुणेत साठवला आहे.
अभिज्ञ.
8 Aug 2011 - 5:21 am | शुचि
सुंदर लेख. आवडला.
8 Aug 2011 - 6:39 am | बहुगुणी
सोदाहरण केलेलं वर्णन समजलं.
विशेषतः ...'चित्र बनवण्याची (व बघण्याची) क्रिया हीच यातील घटना, व पूर्ण झालेले चित्र हीच एक वस्तू. असे असल्याने अश्या चित्रातून काही अर्थ व आशय शोधणे व्यर्थ असते. असे चित्र हे 'कशाचे तरी चित्र' नसून त्याचे एक स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण अस्तित्व असते...' हे केवलचित्रांचं विश्लेषण आवडलं. म्हणजे थोडक्यात केवलचित्र काढणं म्हणजे 'राह बनी खु़द मंज़िल' असंच म्हणायचं!
['मैथिली कला' म्हणजे नेमकी कुठली? ('भारतीय कले'पेक्षा वेगळा उल्लेख केला आहे म्हणून विचारतो आहे.) बिहारच्या मधुबनी भागातल्या चित्रकलेलाच 'मैथिली' म्हणतात ना?]
8 Aug 2011 - 10:23 am | चित्रगुप्त
.......बिहारच्या मधुबनी भागातल्या चित्रकलेलाच 'मैथिली' म्हणतात ना?
होय, अगदी बरोबर, हे चित्र वेगळे देण्यात, पूर्वीच्या (काही प्रमाणात राज्याश्रयाने बहरलेल्या) भारतीय कलेप्रमाणेच 'लोककला' सुद्धा केवलात्मकतेचा प्रयोग करते, हे दाखवण्याचा हेतु होता.
8 Aug 2011 - 6:58 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
लेख वाचला. लेखाबद्द्ल लिहीण्या आधी मला हे सांगितले पाहिजे की आपली चित्रे व त्याची स्टाईल मला आवडली. लेखही सुंदर आहे. मला वाटते आपण जगातील चित्रकलेच्या प्रवासाबद्दल जरूर लिहावे.
अवांतर : मला रविवर्मा मुळीच आवडत नाहीत. तुमची चित्रे व अनेकांची चित्रकला मला त्यांच्यापेक्षा अनेक पटीने आवडते.
पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा स्विकार करावा. ( चित्रकला + लेखन )
मी केलेला एक केविलवाणा प्रयत्न........
9 Aug 2011 - 2:01 am | चित्रगुप्त
......."जगातील चित्रकलेच्या प्रवासाबद्दल जरूर लिहावे".
जरूर प्रयत्न करेन, त्या निमित्ताने माझापण अभ्यास होईल.
.........."मी केलेला एक केविलवाणा प्रयत्न"........
उत्तम प्रयत्न, लगे रहो. रंगांचा तोल चांगला साधला आहे.
फक्त ब्रश वापरता कि आणखी काही ? आणखी साधने वापरून प्रयोग करून बघा.
........."मला रविवर्मा मुळीच आवडत नाहीत"..........
मलापण त्यांची चित्रे फारशी आवडत नाहीत, परंतु कलेचा एक विद्यार्थी व अभ्यासक म्हणून कुतुहल आहे.
एक मात्र खरे, की रविवर्मा मुळे भारतात अगदी घरा-घरात चित्रकला पहुचली होती, आजवर एवढ्या व्यापक प्रमाणात कोणत्याही कलावंताच्या बाबतीत असे घडलेले नाही.
तसेच प्रत्येक कलावंतामागील परंपरा (असणारी वा नसलेली देखील), त्याचा आवाका आणि मर्यादा, लाभलेल्या व हुकलेल्या संधी, त्या-त्या काळची सामाजिक परिस्थिती (उदा. रविवर्मा यांना सनातनी लोकांच्या क्षोभाला तोंड द्यावे लागले होते,त्यापायी कोर्टाचे खेटे घालावे लागले होते....) या गोष्टी लक्षात घेऊनच मूल्यमापन करणे श्रेयस्कर. आजच्या प्रेक्षकाला दादासाहेब फाळक्यांचा 'राजा हरिश्चंद्र' कितपत आवडेल, याची शंकाच आहे, तरी त्यांचा कार्याचे महत्व कमी लेखता येणार नाही.
.....शुभेच्छांबद्दल आभार.
9 Aug 2011 - 9:06 am | जयंत कुलकर्णी
........."मला रविवर्मा मुळीच आवडत नाहीत"..........
मलापण त्यांची चित्रे फारशी आवडत नाहीत, परंतु कलेचा एक विद्यार्थी व अभ्यासक म्हणून कुतुहल आहे.
एक मात्र खरे, की रविवर्मा मुळे भारतात अगदी घरा-घरात चित्रकला पहुचली होती, आजवर एवढ्या व्यापक प्रमाणात कोणत्याही कलावंताच्या बाबतीत असे घडलेले नाही.
तसेच प्रत्येक कलावंतामागील परंपरा (असणारी वा नसलेली देखील), त्याचा आवाका आणि मर्यादा, लाभलेल्या व हुकलेल्या संधी, त्या-त्या काळची सामाजिक परिस्थिती (उदा. रविवर्मा यांना सनातनी लोकांच्या क्षोभाला तोंड द्यावे लागले होते,त्यापायी कोर्टाचे खेटे घालावे लागले होते....) या गोष्टी लक्षात घेऊनच मूल्यमापन करणे श्रेयस्कर.
असहमत !
द लास्ट सपर मला अजूनही आवडते ! यावेळीही वादळे उठली होतीच की ! अर्थात आवड ही व्यक्तीसापेक्ष असते हेही नाकारून चालणार नाही.
8 Aug 2011 - 7:30 am | सहज
सर्वप्रथम विनंतीला मान देउन इतकी सुंदर विवेचनात्मक लेख , किंबहुना लेखमाला सुरु केलीत त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
केवल म्हणजे अमूर्त (abstract) का? वर दिलेल्या केवलचित्रात (क्रमांक २, ३) मधे ते काहीतरी हटके चित्र आहे हे कळते पण ते चार स्त्रिया व मोर वाटते सामान्य दर्शकासाठी तितके केवल नाही त्यामुळे यात काहीतरी कथा आहे असे वाटत रहाते. :-) एखाद्या सामान्य श्रोत्याला एखाद्या रागदारी गायकाचे गाणे ऐकून ताना, चढ उतार लक्षात रहातात तसे तुमचे (स्त्रिया, मोर) चित्र बघताना रेषांचा व रंगाचा प्रवाह दिसत होताच त्यामुळे कलाकार एका वेगळ्याच अवस्थेत भुमीकेत ते चित्र निर्माण करत आहे हे भासत होते पण प्रकार नक्की काय आहे ते समजत नव्हते.
नवकवी हा इसम जितका शिव्याशाप खातो त्यामानाने चित्रकार मात्र हुच्चाभ्रु म्हणुन भाव खाउन जातो असे मला वाटते. खरे तर जितक्या बर्याच कविता टुकार वाटतात तितकीच नवचित्रे देखील. शिवाय तुमच्या शब्दात आले आहे की
वर्णनात्मक चित्रकलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दीर्घ परिश्रम व साधनेची गरज असते. रेखाटन, स्थिरवस्तू चित्रण, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, छाया-प्रकाशाचा आभास, पर्स्पेक्टीव्ह, शरीर शास्त्र, रंगलेपनपद्धती, मानावाकृतीचे संयोजन असे अनेक विषय दीर्घ प्रयत्नानेच साध्य होतात. हे सर्व शिकून त्यावर आधारित स्वत:ची अशी चित्रपद्धती विकसित करण्यात आयुष्य खर्ची पडते. एक एक चित्र पूर्ण करायलाही भरपूर वेळ लागतो.
यावरुन वाटते की केवलचित्र ही तुलनेत सोपा मार्ग चोखाळण्याचा प्रकार आहे त्यामुळे इतका भाव का द्यायचा किंवा दिला जातो? ५० वर्षापूर्वीच्या चांदोबा मासीकात एका रेषेतील चित्र म्हणून जे नक्षिकाम , आकार निघायचे ते मला मोठ्या गाजावाजा करुन रंग उधळून केलेल्या अमूर्त कल्पनांपेक्षा जास्त कौशल्याचे काम वाटते. मेहेंदी, रांगोळी, शिल्पकला, मूर्तीकला, काच, लाकूड यावर कलाकुसर मला अमूर्त पेंटींग पेक्षा वरचढ / श्रेष्ठ वाटते. मॉडर्न आर्ट पेंटींग हा एक ओव्हररेटेड प्रकार आहे असे वाटते पण याचा दोष मी कायम मला चित्रकलेतले काय कळते ह्या कारणावर माझ्यापाशीच थांबवतो. तुमचे अश्या तुलनेबद्दल काय मत आहे?(आता याच्या स्पष्टीकरणात शब्दछल व्हायची प्रबळ शक्यता) कारण कुठली कला समजायला विशिष्ट अनुभव, शिक्षण, नजर पाहीजेच हे मला थोडे हुच्चभ्रु / भेदभाव प्रकरण वाटते. किमान प्रत्येक चित्रकाराने वर्णनात्मक तसेच केवलात्मक दोन्ही प्रकारच्या चित्रात प्रभुत्व सिद्ध करावे असे तुम्हाला वाटते का? वर्णनात्मक चित्र हे प्रभुत्व सिद्ध करणे, लोकांची दाद मिळवणे याकरता तर केवलात्मक चित्र प्रामुख्याने स्वातंसुखाय प्रकरण आहे का?
8 Aug 2011 - 1:53 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
बाकी संगीत आणि चित्रकला यातल माझ ज्ञान अगाध असल्याने, जो नियम मी संगीताला लावतो (जे कानाला गोड लागते ते सर्वोत्त्म) तोच मी चित्रकलेलाही लावतो (म्हणजे जे डोळ्यांना भावतं ते सर्वोत्तम.) त्यामुळे कितीही मॉर्डनआर्ट असेना का, पण डोळ्याच्या जागी नाक आणि बेंबीच्या जागी डोळा आला की आपली सटकते. (मग भले तो चित्रकर एम. एफ. का असेना.)
सदर लेखातली तुमची चित्रे, त्या साकारताना त्यामागची भुमिका आणि इतर चित्रांवरिल विवेचन आवडले.
अधिक काय बोलु? पुलेशु आणि पुलेप्र.
8 Aug 2011 - 2:39 pm | चित्रगुप्त
....................."केवल म्हणजे अमूर्त (abstract) का?"..............
होय, त्याच अर्थाने केवल हा शब्द इथे वापरला आहे.
....................."स्त्रिया व मोर वाटते सामान्य दर्शकासाठी तितके केवल नाही त्यामुळे यात काहीतरी कथा आहे असे वाटत रहाते. "
..........असे वाटणे साहजीकच आहे, तसेच त्यामुळे अनेक प्रकारच्या स्वैर कल्पना करणे, यातही काहीच गैर नाही. कलेचा आस्वाद ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने घ्यावा. मात्र मुळातच कलावंताला अभिप्रेत नसलेल्या गोष्टी गृहित धरून केलेली समीक्षा चुकीच्या मार्गी लागल्यासारखे होते. आस्वाद आणि समीक्षा यातील फरक लक्षात घेतला गेला पाहिजे.
........."नवकवी हा इसम जितका शिव्याशाप खातो त्यामानाने चित्रकार मात्र हुच्चाभ्रु म्हणुन भाव खाउन जातो"........
.....खरे आहे. अलिकडील काळात चित्रांच्या किंमती अफाट वाढल्याने या हुच्च्भ्रूपणातही अफाट वाढ झाली.
...."केवलचित्र ही तुलनेत सोपा मार्ग चोखाळण्याचा प्रकार आहे त्यामुळे इतका भाव का द्यायचा किंवा दिला जातो ?"......
यात कलावंतांपेक्षाही जास्त फायदा दलाल लो़कांना (किंवा ज्यांनी कलावंताच्या हलाखीच्या परिस्थितीत अत्यल्प किमतीत चित्रे विकत घेऊन ठेवलेली असतात, अश्या लोकांना) मिळत असतो. कलावंताची प्रतिष्ठा व त्याच्या चित्रांच्या किमती वाढवत वाढवत वर नेत राहणे, हे अश्या लोकांच्या फायद्याचे असते...... अर्थात हा अर्थशास्त्र व जाहिरातकला, यांचा भाग झाला, खरेतर कलेशी याचा तसा संबंध नाही. त्यामुळे अनेकदा कीर्ती व संपत्ती यात खूप यशस्वी असे कलावंत कलेच्या दर्दी लोकांना टुकार वाटतात. अनेक अत्यंत थोर, प्रतिभावंत कलावंत जन्मभर विपन्नावस्थेत राहून कर्जबाजारी होउन मेले, अशी उदाहरणे खूप आहेत.
8 Aug 2011 - 3:52 pm | सहज
चांगली माहीती मिळत आहे.
कोणत्याही चित्रप्रदर्शनात अमूर्त चित्रप्रकारात काय पहावे? किंवा दोन वेगळ्या चित्रकारांची अमूर्त चित्रे बघताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे? वरच्या चित्र क्रमांक २ व ३ मधे एकसंध वेध घ्यावा की तुकड्या तुकड्यात आस्वाद घ्यावा?
9 Aug 2011 - 6:33 am | चित्रा
कोणत्याही चित्रप्रदर्शनात अमूर्त चित्रप्रकारात काय पहावे? किंवा दोन वेगळ्या चित्रकारांची अमूर्त चित्रे बघताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे? वरच्या चित्र क्रमांक २ व ३ मधे एकसंध वेध घ्यावा की तुकड्या तुकड्यात आस्वाद घ्यावा?
सहजरावांची हुच्चभ्रूपणाकडे वाटचाल. आता खरेखुरे हुच्चभ्रू होण्यात अगदी थोडे अंतर बाकी आहे :)
असो.
लेख अतिशय उत्तम. खूप सुंदर लिहीला आहे. तुमच्या केवलात्मकतेकडे झुकलेल्या चित्राबद्दल वाचायला आवडले. युरोपिय चित्रांमध्ये वापरलेले काळसर रंग आणि भारतीय चित्रकलेत वापरलेले गेरूसारखे /मातकट रंग याची काही खास कारणे असतील का?
मैथिली कला म्हणून दिला आहे तोही नमुना आवडला.
मी जमले तर माझ्याकडच्या एका चित्राचा फोटो टाकीन. ही कला आदिवासींची आहे म्हणून मला सांगितले गेले होते पण फारशी माहिती मिळाली नाही. जर माहिती मिळाली तर आनंद होईल. ती मधुबनी नसावी.
10 Aug 2011 - 8:53 pm | चित्रा
" alt="" />
कदाचित अवांतर होईल, पण ही कोणती शैली असू शकेल?
13 Aug 2011 - 12:08 am | चित्रगुप्त
काही कळत नाहिये शैली बद्दल...
परंतु मला हे मूळ आदिवासी कलेपेक्षा कुणा अलिकडील चित्रकर्त्याने केलेले वाटते आहे, विशेषतः डावीकडील आकृतीच्या पायांवरून.
15 Aug 2011 - 10:04 pm | चित्रा
तसेच असावे.
मुंबईच्या फोर्ट भागातून विकत घेतलेले चित्र आहे. कलाकाराचे नाव माहिती नाही.
12 Aug 2011 - 4:07 pm | चित्रगुप्त
....."युरोपिय चित्रांमध्ये वापरलेले काळसर रंग आणि भारतीय चित्रकलेत वापरलेले गेरूसारखे /मातकट रंग याची काही खास कारणे असतील का ?...............
युरोपिय चित्रांमध्ये वापरलेले काळसर रंग ... यावर विचार करता दोन कारणे सुचतात:
१. या चित्रातील काळसरपणाचे एक कारण, ही चित्रे पुष्कळ जुनी असल्याने काळवंडून गेलेली असतात, हे.
युरोपमधील जुन्या चर्चेस मध्ये सोळाव्या-सतराव्या शतकापासून भिंतीवर असलेली काही चित्रे तर इतकी काळवंडलेली आहेत, की त्यात आता काहीही ओळखू येत नाही. थोडी आणखी माहिती:
Jan Van Eyck (1395-1441) याने तैलरंगात चित्रे बनवण्यास सुरुवात केली, त्यानंतर युरोपात मोठ्या प्रमाणावर हे माध्यम (यापूर्वीच्या 'टेम्परा' पेक्षा हे अनेक प्रकारे वरचढ असल्याने) वापरले जाऊ लागले. यात रंगाची पूड 'लिन्सीड ऑइल' मध्ये घोटून रंग बनवले जातात. लावलेला रंग पाच-सात दिवस तरी ओला रहात असल्याने चित्रे सावकाशपणे, जास्त तपशीलात जाऊन बनवता येऊ लागली, तसेच छाया - प्रकाशाचे सूक्ष्म बारकावे अचूक पणे चित्रित करता येऊ लागले.
परंतु जसजसा काळ जाईल, तसतसे लिन्सीड ऑइल तपकिरी-काळे पडत जाते. त्यामुळे काही शतकानंतर चित्र खूपच काळपट दिसू लागते. पूर्वी फ्रान्स वगैरे देशातील निवडक चित्रकारांना 'Prix de Rome' नामक शिष्यवृत्ती देउन रोमला जुन्या महान इटालियन चित्रकारांच्या कलाकृती अभ्यासण्यासाठी पाठवत. ते अश्या काळपट पडलेल्या चित्रांना आदर्श मानून चित्रे बनवत, हेही या रूढी मागचे एक कारण.
पुढे एकोणीसाव्या शतकात पॅरीस, लंडन वगैरे शहरातील संग्रहातली चित्रे कोळश्यावर चालणाऱ्या आगगाड्या, कारखान्यांचा धूर, यामुळे अधिकच काळवंडली.
२. दुसरे म्हणजे चित्रातील मुख्य विषय वा आकृती, यांना उठाव मिळून चित्र अधिक परिणामकारक व्हावे, म्हणून मुद्दामच पार्श्वभूमी गडद तपकिरी , काळपट रंगात रंगवली जात असे. उदाहरणार्थ, वरील येशू व मेरी मॅदेलीन चे चित्र.
31 Aug 2011 - 5:25 pm | चित्रगुप्त
खरंच, त्या काळात चांदोबात जी चित्रे बघितली, त्याची गोडी काही औरच होती.
हे बघा चांदोबाचे १९६१ च्या अंकाचे मुखपृष्ठः
१९५२ पासून चे चांदोबाचे अंक इथे बघा.
8 Aug 2011 - 8:22 am | पाषाणभेद
लेख अन चित्रेही पाहिली. एकदम मस्त आहे.
8 Aug 2011 - 8:32 am | प्रचेतस
खूपच सुंदर चित्रे आणि चित्रांचा आढावा देखील.
चित्रकलेतील काही कळत नसले तरी तुमच्या लेखाने थोडीशी तरी कल्पना आली.
पुढच्या भागाची वाट पाहतो आहेच.
8 Aug 2011 - 10:49 am | विसुनाना
चांगली लेखमाला. या लेखमालेत मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावीत ही अपेक्षा आहे.
१.मुळात केवलचित्रे म्हणजे अॅब्स्ट्रॅक्ट (अर्क)चित्रे असे म्हणायचे का?की केवलचित्रे म्हणजे 'कलेसाठी कला'?
२. 'अॅब्स्ट्रॅक्ट' चित्र काढताना केवळ एक प्रयोग म्हणून असे चित्र काढले जाते की त्यामागे काही विशिष्ट विचारमाला असते? (उदा. मी मागील प्रतिसादात उल्लेखित केलेले तुमचे 'कबुतर मुली')
३. 'अॅब्स्ट्रॅक्ट' चित्र काढताना केवळ एक प्रयोग म्हणून असे चित्र काढले जाते की त्यामागे काही विशिष्ट विचारसरणी असते? (उदा. 'क्युबीजम')
४. अॅब्स्ट्रॅक्ट आणि रिअॅलिस्टीक (वास्तवदर्शी) चित्रकला यांच्यात रिअॅलिस्टिक चित्रे ही चित्रकाराला जास्त कष्टदायी असतात असे आपले मत दिसते. किंबहुना एखाद्या चित्रकाराला प्रथम वास्तवदर्शी चित्र चांगले काढता आले पाहिजे, मगच त्याची अॅब्स्ट्रॅक्ट चित्रे उल्लेखनीय ठरतात. (उदा. आपले 'एका खेडेगावातील दृश्य' हे पूर्णपणे वास्तवदर्शी नसले तरी त्यातून तुमच्या उत्तम चित्रकारितेचा पुरावा मिळतो.) तसे असेल तर वास्तवदर्शी चित्रकला हीच श्रेष्ठ आहे का?
५. उत्तम वास्तवदर्शी चित्रकला ही उत्तम छायाचित्रणापेक्षा श्रेष्ठ आहे का? कशी?
इ.इ.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत -
9 Aug 2011 - 2:21 am | चित्रगुप्त
१. केवलचित्रे म्हणजे अॅब्स्ट्रॅक्ट (अर्क)चित्रे असे म्हणायचे का? की केवलचित्रे म्हणजे 'कलेसाठी कला'?
इथे केवल चित्रे हा शब्द 'अमूर्त' वा 'अॅब्स्ट्रॅक्ट' या रूढ शब्दांऐवजीच वापरला आहे.
'कलेसाठी कला' हा माझे मते कलावंताचा आपल्या कलेच्या प्रयोजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. उदाहरणार्थ 'कलेसाठी कला' च्या विरुद्ध 'उपजीविकेसाठी कला' एखाद्या विचारसरणीच्या, धर्माच्या, व्यक्तीच्या, वस्तूच्या 'प्रचारासाठी' कला, वगैरे.
'कलेसाठी कला' म्हणजे अश्या एखाद्या हेतूच्या ऐवजी निव्वळ कलेतून मिळणार्या आनंदासाठी, समाधानासाठी केले जाणारे कलाकर्म, असे ढोबळ पणे म्हणता येइल.
अशी कला वर्णनात्मक वा केवल कशीही असू शकते, हे त्या त्या कलावंतावर अवलंबून असणार. असे करताना कलावंतावर अन्य प्रयोजनाचे ओझे नसल्याने ती जास्त सकस, प्रामाणिक होते, असे दिसून येते.
२. अॅब्स्ट्रॅक्ट' चित्र काढताना केवळ एक प्रयोग म्हणून असे चित्र काढले जाते की त्यामागे काही विशिष्ट विचारमाला असते?
....माझ्या अनुभवाप्रमाणे प्रयोगशीलता असते, परंतु ज्या चित्रकारांची चित्रे मोठ्या प्रमाणात विकली जाउ लागतात, त्यांची प्रयोगशीलता कमी होत जाऊन ते त्या साच्यात अडकत जातात, असे दिसते. 'कबुतर मुली' हे चित्र 'अॅब्स्ट्रॅक्ट' नाही, त्याबद्दल तुम्ही केलेले निरिक्षण अचूक आहे.
३. 'क्युबिझम' वगैरेंचे बाबतीत माझे मते खालील प्रमाणे घडून येत असते:
मुळात एखादा प्रयोगशील कलावंत काहीतरी नवनवे प्रयोग करतच असतो. त्यातून त्याला काही नवीन गवसले आणि भावले, की तो तसे आणखी प्रयोग करतो, आणखी चित्रे निर्माण होतात. ती बघून आणखी काही चित्रकार तसे करू लागतात. इथे समिक्षक मंडळींना काहीतरी नवीन सिद्धांत मांडायला वाव मिळतो, आणि ते लिहून तो सिद्धांत प्रचारित करतात. अशी गाडी चालू पडते, मग त्या लाटेवर आणखी मंडळी आरूढ होतात, आणि 'अमूकीझम' कलेच्या इतिहासात स्थान मिळवून बसतो....
उदाहरणार्थ, "इंप्रेशनिझम" हे नाव मोने याच्या खालील चित्रावरील हेटाळणीपूर्वक शेर्यावरून रूढ झाले.
9 Aug 2011 - 10:24 am | चित्रगुप्त
................."किंबहुना एखाद्या चित्रकाराला प्रथम वास्तवदर्शी चित्र चांगले काढता आले पाहिजे, मगच त्याची अॅब्स्ट्रॅक्ट चित्रे उल्लेखनीय ठरतात" ........
तसे पाहिले तर ज्याला केवलचित्रेच करायची आहेत, त्याला वर्णनात्मक चित्रकला शिकायची गरज नाही.
आपल्याइकडे ज्या कलाशाळा आहेत, त्यात जो एक विशिष्ट अभ्यासक्रम असतो, त्यात अश्या विद्यार्थ्यांना रस वाटत नाही.
माझ्या बघण्यातील अश्या काही मंडळींना यशस्वी व्हायची, नाव व पैसा मिळवण्याची घाई झालेली असते, त्यामुळे त्यांना केवलचित्रे हा झटपट मार्ग आहे, असे वाटते.
कलाशाळेतील चार-पाच वर्षांच्या शिक्षणाने एक शिस्त लागते, माध्यमांशी ओळख होते, नजर तयार होते. परंतु कधी कधी एका साच्यात अडकल्यासारखेही होते.
...............................................................................................................
....."वास्तवदर्शी चित्रकला हीच श्रेष्ठ आहे का? उत्तम वास्तवदर्शी चित्रकला ही उत्तम छायाचित्रणापेक्षा श्रेष्ठ आहे का? कशी?
अमूक एक कला दुसर्या एखाद्या कलेपेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हणता येत नाही. प्रत्येक प्रकारच्या कलेची परंपरा, तिचा आवाका, मर्यादा व प्रभाव निरनिराळा असल्याने अशी तुलना करु नये, हेच बरे.
प्रत्येक प्रकारच्या कलेत श्रेष्ठ व दुय्यम दर्जाचे कलावंत व कलाकृती आढळतात.
मला स्वतःला वास्तवदर्शी कलेपासून केवलात्मक कलेपर्यंतचे सर्व प्रकार बघायला आणि करायला आवडतात. प्रत्येकाची वेगवेगळी मजा असते.
8 Aug 2011 - 10:54 am | मृत्युन्जय
सुंदर लेख. आवडला. चित्रेही आवडली :)
8 Aug 2011 - 11:12 am | किसन शिंदे
लेख आणी चित्रे दोन्हीही अतिशय सुंदर.
अवांतर : पाप-पुण्याचा हिशोब ठेवता ठेवता हि सुंदर चित्रं आणी तितकेच सुंदर लेख लिहायला तुम्हाला इतका वेळ कसा काय मिळतो ब्वॉ. ;)
8 Aug 2011 - 12:01 pm | मुलूखावेगळी
सुंदर लेख आनि तुमची चित्रे पण छान ते ३ नं. चे जास्त आवडले.
तुमच्या विश्लेषणा मुळे थोडेफार कळतंय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
8 Aug 2011 - 1:15 pm | स्वानन्द
असेच म्हणतो.
8 Aug 2011 - 1:45 pm | स्मिता.
लेख आवडला. सविस्तर आणि सचित्र स्पष्टीकरणामुळे वेगवेगळ्या चित्रांना वेगवेगळ्या नजरेतून कसे पहायचे याचे थोडेफार आकलन होतेय.
आणखी लिहा. पु. ले. शु.
8 Aug 2011 - 2:45 pm | चित्रगुप्त
"वेगवेगळ्या चित्रांना वेगवेगळ्या नजरेतून कसे पहायचे"
हे कळणे अतिशय महत्वाचे ठरते. सर्व चित्रांना एकच मापदंड लावणे योग्य नसते.
8 Aug 2011 - 2:30 pm | यकु
सुंदर चित्रे व लेखही!
8 Aug 2011 - 2:55 pm | धमाल मुलगा
कंबख्त त्या चित्रकलेतलं काही कळण्याची काडीमात्रही अक्कल नसलेल्या माझ्यासारख्या जातिवंत औरंगजेबाला हा लेख आणि त्यातील चित्रांनी खिळवून ठेवलं! ह्यापेक्षा मोठं यश ते काय असेल ह्या धाग्याचं? :)
चित्रगुप्त महाराज,
थोडा वेळ त्या पाप-पुण्याच्या जमाखर्चाच्या चोपड्या बाजूला सारुन असंच ज्ञानामृत आमच्यासारख्या अज्ञ प्राण्यांच्या वाट्याला आणत चला हो.
8 Aug 2011 - 3:43 pm | गणेशा
अप्रतिम धागा. छान चित्रे
(अवांतर : काही चित्रे मातर मला दिसली नाही म्हणुन थोडी निराशा झाली)
8 Aug 2011 - 4:36 pm | चित्रगुप्त
......."काही चित्रे मातर मला दिसली नाही".....
कोणती चित्रे दिसत नाहीत, कळवावे, बघतो काय प्रकार आहे ते.
10 Aug 2011 - 1:53 pm | गणेशा
मला दिसलेली चित्रे :
केवलचित्र ३ (मस्त आवडले एकदम)
रोमन इतिहासिक डेव्हिड यांचे चित्र ( एकदम लाईव्ह फिल आहे)
सर्व प्राचिन सांस्कृतिक चित्रे (मैथीली कले पर्यंत)
अशी एकुन ८ च चित्रे मला दिसली आहेत.
पुन्हा रिप्लाय देण्यामुळॅ पुन्हा एकदा थ्रेड वाचला. छान वाटले.
11 Aug 2011 - 10:54 pm | चित्रगुप्त
पुन्हा जेंव्हा लेख वाचलात, तेंव्हा दिसली का सर्व चित्रे ?
आज आणखी दोन चित्रे समाविष्ट केली असल्याने मूळ लेखात आता १५ चित्रे आहेत.
अजून दिसत नसल्यास कुणा तज्ञ मंडळींना विचारा बुवा. इथे तर सर्व चित्रे व्यवस्थित दिसत आहेत.
8 Aug 2011 - 4:22 pm | विनायक प्रभू
विवेचन आवडले.
8 Aug 2011 - 6:08 pm | विजुभाऊ
एकाच लेखात भरपूर चित्रे देण्यापेक्षा एका लेखात एक दोनच चित्रे देवून त्यांचे विश्लेषण द्या.
खूप माहिती मिळेल
8 Aug 2011 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन आवडले.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2011 - 7:29 pm | शैलेन्द्र
सुंदर लेख..
चित्र क्रमांक एक खुप आवडले..
9 Aug 2011 - 1:37 am | कौशी
अतिशय सुंदर चित्रे व लेखही
9 Aug 2011 - 9:53 am | श्रावण मोडक
या लेखमालेमुळे माझ्यासारख्यांचा चित्रांच्या संदर्भात बालवाडीतील प्रवेश नक्की झाला आहे.
हे विधान माझ्या आणि माझ्यासारख्यांच्या पात्रतेविषयी आहे. लेखमाला किंवा लेखक यांच्याविषयी नाही.
समजावून सांगण्याची पद्धत अतीशय आवडली. अगदी मध्येच ते फाट्यावर मारणे वगैरे शब्द पाहून तर हे गुरूजी लोकप्रिय गुरूजीही होणार या चाहूलखुणा पक्क्या झाल्या.
वर्णनात्मक चित्र म्हणून तुम्ही दिलेले पहिले चित्र चित्र म्हणूनच मला गुंडाळून घेऊन गेले. मला त्या चित्रात प्रश्न विचारावा असे काहीही वाटलेच नाही. चित्र मी बाहेरून पहातच नव्हतो, तर पाहू लागल्यानंतर काही वेळातच माझा त्या चित्रात प्रवेश झाला. सुरवातीला, आपण बाहेरून ज्या बिंदूवरून चित्र पाहतो त्या बिंदूच्या पुढं पण चित्रात. नंतर त्या डावीकडच्या लाल दरवाजाच्या शेजारी असलेल्या ओट्यावर बसलो थोडा वेळ. कारण - हे चित्र मला लहानपणी भेट दिलेल्या एका गावी घेऊन गेलं. किंचितशा डोंगरी चढावर तिथं अशीच घरं होती. अगदी अशीच.
अर्थ आणि आशयाविना अस्तित्त्व, किंवा अर्थ आणि आशयाविना सौंदर्यबोध हे कसे शक्य आहे, असा माझा अज्ञानापोटीच आलेला प्रश्न आहे.
9 Aug 2011 - 1:24 pm | चित्रगुप्त
........"अर्थ आणि आशयाविना अस्तित्त्व, किंवा अर्थ आणि आशयाविना सौंदर्यबोध हे कसे शक्य आहे, "............
अर्थ आणि आशय, याचा इथे अर्थ काहीसा " ते चित्र बघताना होणारी चित्रबाह्य अश्या एखाद्या गोष्टीची (वस्तु, व्यक्ती, घटना, विचार इ.) आठवण वा त्याविषयी मिळणारी माहिती" असा आहे, आणि अशी माहिती वा आठवण सौंदर्यानुभूतिसाठी आवश्यक घटक नाही, हे पटावे. म्हणजे वाद्यसंगीत ऐकताना त्यात काही शब्द, काव्य नसूनही सौंदर्याची, आनंदाची अनुभूति व्हावी, तसे.
केवलचित्रातील रंगांची उधळण, तोल, आकारांची रचना, गतिमानता, बघताना आपल्या नजरेचा होणारा त्या चित्रावरील प्रवास, या आणि अश्या अन्य गोष्टी हाच चित्राचा आशय, असेही म्हणता येइल.
9 Aug 2011 - 7:08 pm | श्रावण मोडक
थोडं कळतंय. थोडं हुकतंय. उगाच प्रश्न उभे राहतात. त्यापेक्षा मी चित्रं पहात राहीन.
पुढच्या लेखाची वाट पाहतोय. :)
9 Aug 2011 - 11:41 am | आत्मशून्य
चित्रे तर अप्रतीमच. चित्रकला करणे आपला प्रांत नाही याची हूरहूर मात्र उगीचच दाटून येतेय.
10 Aug 2011 - 12:39 am | चित्रगुप्त
चित्रकला करणे आपला प्रांत नाही याची हूरहूर मात्र उगीचच दाटून येतेय.....
हा आत्मशून्य यांचा अगदी वेगळा प्रतिसाद वाचून खूप चांगले वाटले.
..........मग सुरु करा या प्रांताची मुशाफिरी पण....
केवलचित्रासाठी युक्ती वर सांगितली आहेच, किंवा रेखाटनापासून सुरुवात करा.....
10 Aug 2011 - 3:25 am | धनंजय
लेख अतिशय आवडला.
वर्णनात्मक शैलीचे अधिक टोकाचे उदाहरण म्हणजे तुम्ही दाखवलेले "नेपोलियनचे राज्यारोहण" वाटते.
तुमचे पहिले गावाचे चित्र त्या मानाने अधिक केवल-अवयवांनी बनलेले वाटते. म्हणजे काही आकृती आणि रचना, रंगांची निवड ही स्वतःहून ठळकपणे समोर येते.
11 Aug 2011 - 8:18 am | निनाद
अतिशय साध्या शब्दात सुंदर ओळख करून देत आहात.
मी तुम्हाला मराठी विकीपिडियावर लेखन करण्यासाठी आमंत्रण देतो!
तेथे चित्रकला हा लेख तुमची वाट पाहत आहे. लेखनात कोणतीही मदत लागल्यास नि:संकोचपणे संपर्क साधा, मी तेथे आहेच!
11 Aug 2011 - 10:49 am | चित्रगुप्त
मराठी विकीपिडियावर लेखन करण्यासाठी आमंत्रणाबद्दल आभारी आहे, परंतु मला यातील काहीच माहित नाही, तरी व्यनि द्वारे कळवाल का?
11 Aug 2011 - 8:41 am | ५० फक्त
चित्रकला म्हणजे शाळेतल्या दोन परिक्षा आणि त्या नापास झाल्याबद्दल बाबांचा खाल्लेला मार, या पलिकडं काही संबंध आलेला नाही, त्यामुळं हा लेख दोन तीन वेळा वाचुन कळाला, खुप छान झालाय लेख. आवडला.
एक विनंती दर आठवड्याला एक चित्र व त्याचं विवेचन अशी लेखमाला टाकाल का चित्रगुप्त.?
11 Aug 2011 - 9:54 am | ऋषिकेश
अश्या चर्चा, लेख कळतंय असं वाटतं पण जरा विचार करताच काहिच कळलेलं नाहि असं समजतं :( (अर्थात दोष माझ्या अज्ञानाचा) असो.. कळत नसली तरी अशी चित्रे बघायला, चर्चा-लेख वाचायला आणि समजण्याचा प्रयत्न करायला आवडते हे नक्की
तेव्हा येऊद्या पुढला भाग!
11 Aug 2011 - 11:33 am | विलासराव
आता या लेखातुन जी माहिती मिळाली तिचा उपयोग करुन बघतो.
आमच्या चित्रे पहाण्याच्या कलेत काही प्रगती झाली तर कळवतोच.
बाकी तुमचे जहांगीरला प्रदर्शन कधीपर्यंत आहे?
आज उद्या मी जाउ शकतो.
11 Aug 2011 - 1:35 pm | चित्रगुप्त
मूळ लेखात आज व्हरमीरची आणखी चित्रे घातली आहेत.
11 Aug 2011 - 2:22 pm | पैसा
लेखातली उदाहरणं आणि विवेचन खूप आवडलं. चित्रकला ही कला अशी आहे, की एखादं चित्र एका माणसला खूप आवडेल, तर दुसर्याला अजिबात आवडणार नाही. म्हणजेच पाहणार्याला काय जाणवलं हेच जास्त महत्त्वाचं ठरतं. गाण्यात, किंवा न्रूत्य, पाककला अशा कलांत एखाद्या सादर करणार्याची चूक झाली तर जाणकाराला लगेच लक्षात येइल, पण चित्रकला हे वेगळंच असं माध्यम आहे, की त्यात चुका करायला वाव आहे! ;)
या पुढचे लेख वाचायची उत्सुकता आहेच, पण मोठ्या चित्रकारांच्या वास्तविक फसलेल्या, पण जगाने डोक्यावर घेतलेल्या चित्रांबद्दल वाचायला नक्की आवडेल!
11 Aug 2011 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते
_/\_
वर काही दिग्गजांनी दिलेल्या प्रतिसादांशी सहमत आहे. वेगळे काय लिहू. काही चित्रं (दोन्ही प्रकारची) खरंच खूप आवडली, अगदी बघता क्षणीच. किंचितशी मोडकांसारखीच अवस्था झाली. पुढील सर्व लेखन वाचायला उत्सुक आहे.
अवांतर १ - चित्रकलेबद्दल किंबहुना एकूणच सर्व दृश्यकलांबद्दल असे प्रबोधन सामान्य जन्तेचे केले गेले तर हुसेनसारखा किंवा एकूणच कलाकारांवर होणार्या हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल असे वाटते. कित्येकदा कलाकारांना किंवा कलेच्या जाणकारांनाही कला जेवढी गूढ राहिल / जितकी सामान्यांपासून लांब राहिल तितकी ती चांगली असे वाटते की काय असे वाटते.
अवांतर २ - एकंदरीत जागतिक इतिहासाच्या वाटचालीत आफ्रिकेची दखल खूपच कमी घेतली जाते. मानवप्राण्याची उत्क्रांती तिथून सुरू झाली असे आपण वाचतो. आणि मग गाडी थेट मध्ययुगातच पोचते. मधले काहीच कोणी बोलत नाही. खरं तर तिथेही मोठमोठी साम्राज्यं, समृद्ध संस्कृती वावरल्या. (आफ्रिकेशी थोडाफार संबंध आल्यामुळे) तिथल्या सांस्कृतिक वाटचालीबद्दल कुतूहल आहे. म्हणून तुम्हाला विनंती की आफ्रिकेतील दृश्यकलांबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल काही लिहिता आल्यास बघा.
12 Aug 2011 - 10:36 am | चित्रगुप्त
........"जागतिक इतिहासाच्या वाटचालीत आफ्रिकेची दखल खूपच कमी घेतली जाते..... आफ्रिकेतील दृश्यकलांबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल काही लिहिता आल्यास बघा"
खरे आहे, गेल्या काही शतकात जगावर युरोपियनांचे वर्चस्व राहिल्यामुळे त्यांच्या कला-संस्कृतिचा जसा प्रसार-प्रचार झाला, तसे आफ्रिकेबद्दल झाले नाही, असे दिसते...
इथे दोन-तीन संग्रहालयांमधे आफ्रिकन कलेचे शेकडो नमुने आहेत, परंतु सर्व पाट्या फ्रेंच मध्ये असल्याने वाचता येत नाहीत.
तुम्ही आफ्रिकेविषयी लेख लिहूनन त्या संस्कृतीची तोंडओळख करून दिलीत, तर काहीतरी दिशा मिळेल.
11 Aug 2011 - 11:40 pm | प्राजु
लेख अतिशय आवडला.
चित्राचे विवेचनही आवडले.
खूप वेगळी माहिती मिळाली. :)
11 Aug 2011 - 11:47 pm | शशिकांत ओक
मित्रा चित्रगुप्ता,
तुझ्या वरील विधानातून सर्व कलांचे सार आले आहे.
नजर तीच, जाणीवपुर्वक जागतिक मान्यतेची कलाकृती पहाताना, फुलांची निरागसता निहारताना, उंच उंच जाऊन बेधडक उडी घेताना,
पाण्याखालील जगाचा कानोसा घेताना, मी पणा विसरायला लावणारे क्षण सांभाळायचे तर त्या त्या रोलमधून आस्वाद घेताना नजरेत, जाणिवेत बदल करून घेता यायला हवा.
ओपीची ठेकेबाज गाणी, मदन मोहनच्या गझला, लताच्या गळ्यातील दर्द, भीमसेनांची गडगडाटी तान, रविशंकरांचे लडिवाळ सतारीचे दिडदा बोल....
कमाल हसन प्रेक्षकांना विविध नजरांतून सादर होताना भन्नाट भावतो. देवआनंद ज्या सिनेमात देव आनंदच्या व्यक्तिमत्वात वावरतो तेंव्हा तो उबाऊ होतो.
बालवाडीतील चिमुर्ड्यांसमोर बालकांसारखे होऊन, स्टेडियमच्या गदारोळात टपोरी बनून, थेटरात वीज गेली की शिट्ट्यांचा गोंगाट करून मिळवायचा आनंद त्या त्या रोलमधे प्रवेशल्या शिवाय मिळणार नाही. याची जाण ज्याला त्याला दुनियेच्या आनंदाचा राज़ कळला असे म्हणावे नाही का?
13 Aug 2011 - 12:10 am | जागु
खुपच सुंदर.
13 Aug 2011 - 11:05 am | चिंतातुर जंतू
युरोपिअन चित्रांत काळसर रंग वापरण्याची पद्धत सदासर्वकाळ आणि सर्व युरोपात नव्हती. उदा. फ्रा अॅन्जेलिकोचा झगझगीत निळा (चौदावं शतक, इटली):
किंवा वर्मीरचे स्किन टोन्स आणि फॅब्रिक टोन्स (सतरावं शतक; हॉलंड):
आणि अर्थातच स्टेन्ड ग्लासचे शार्त्रसारखे नमुने (१२-१३वं शतक, फ्रान्स) डोळ्यात भरतात.
नाट्यमयता साधण्यासाठी कारावाज्जिओनं (सोळा-सतरावं शतक; इटली) ज्या प्रकारे किआरोस्कुरो वापरला त्यामुळे युरोपिअन चित्रांवर गडदपणाचा प्रभाव आला असं मानतात.
पण अर्थात नंतर इम्प्रेशनिस्ट आणि फोव लोकांनी प्रचंड झगझगीत रंग वापरले.
13 Aug 2011 - 11:26 am | विसुनाना
वर्मिरच्या लेखात दिलेल्या चित्राचे विडंबन की भारतीयीकरण? -
(This painting was inspired by ‘The Kitchen Maid’ by Vermeer.)
गोपाल खेतान्ची या चित्रकाराने काढलेले हे चित्र पाश्चात्य खिडकी आणि टेबलामुळे वास्तव भारतीय वाटत नाही. त्याचे पूर्ण भारतियीकरण करायचे असते तर सारवलेली जमीन, चूल, चौकट नसलेली खिडकी, जमिनीवर अथवा चौरंगावर ठेवलेल्या वस्तू असे दाखवायला हवे होते.
बाकी सर्व बाबतीत चांगल्या अशा या चित्रकारितेला काय म्हणावे?
13 Aug 2011 - 2:15 pm | चित्रगुप्त
हे चित्र बघून जुन्या हिंदी चित्रपट संगीताची आठवण आली. भारतीय, अरबी व पाश्चात्य शास्त्रीय संगीतातून प्रेरणा घेऊन वा उचलेगिरी करून चांगली चांगली गाणी निर्माण केली गेली. एका अर्थाने हे कार्य देखील चांगलेच असे म्हणता येइल. भारताच्या खेड्या-पाड्यात व शहरातही राहणारा सर्वसामान्य माणूस मोझार्ट वा अरबी संगीत कुठून ऐकणार? त्याकाळी तर ते उपलब्धही नसायचे. (एयर इंडियचे पायलट संगीत दिग्दर्शकांसाठी परदेशातून संगीताच्या तबकड्या आणत असे ऐकले आहे).
अमूक चित्र वा संगीतरचना मौलिक आहे वा नाही, हे त्या क्षेत्रातील मोजक्या मंडळींच्याच आस्थेचा विषय असतो. सर्व सामान्य रसिकांना त्याचे फारसे सोयरेसुतक नसते.
हे चित्र कोणत्या काळात काढले गेलेले आहे?
14 Aug 2011 - 9:13 pm | राजेश घासकडवी
वर्णनात्मक चित्रशैलीपेक्षा मला कायमच अमूर्त शैली आवडत आलेली आहे. या दोन्हींमधला फरक स्पष्ट करून दाखवल्याबद्दल आभार. बऱ्याच पूर्वी तुम्ही दृक्कलेविषयी काहीतरी लिहायचा मानस व्यक्त केल्याचं आठवतं. ते मनावर घेऊन नुसती चित्रं दाखवण्याऐवजी त्यांमधले बारकावे समजावून सांगायला सुरूवात केली हे बरं वाटलं.
वर्णनात्मक शैलीत मी पोर्ट्रेट्सचा देखील अंतर्भाव करतो. आपली छबी असावी, कायम रहावी यासाठी अनेक लोक चित्र काढून घेत असत. फोटोग्राफी आल्यावर अर्थातच हे मागे पडलं. काही वेळा मला इंप्रेशनिझम, क्युबिझम वगैरे चित्रकलेतले प्रवाह फोटोग्राफी पुढे येण्याने निर्माण झाले असावे अशी शंका येते. हुबेहुब वर्णन करण्यासाठी इतकं प्रभावी माध्यम असताना चित्रकलेतून यापलिकडे काहीतरी आलं पाहिजे अशी गरज निर्माण झाली असावी. फोटोग्राफीमुळे चित्रकलेवर एकंदरीत माध्यम म्हणून काय परिणाम झाला याविषयी काहीतरी वाचायला आवडेल.
15 Aug 2011 - 9:19 am | स्पंदना
सर्व प्रथम तुमचे आभार या लेखाची लिंक दिल्याबद्दल.
अन आता चित्रे ! मला वाटतय मी तुमची चित्रे या आधी पाहिली आहेत, मुंबईत असताना जमेल तेंव्हा जे.जे. आर्ट गॅलरीला जायचो आम्ही दोघेही.
वरील तुमच्या शेवटच्या चित्राला पाहुन काहिस आठवतय, बट नॉट शुअर.
वर तुम्ही जे ब्रूटस च चित्र दिलय ते पाहुन मला राजा रविवर्म्यान , बडोद्याच्या राजघराण्यासाठी काढलेल्या खाजगी चित्रांची आठवण आली.
त्यात एक चित्र होत, सीतेच्या भुमी प्रवेशाच, काय नव्हत त्या सीतेच्या नजरेत ? रामा बद्दलचा राग, अपमनाची भावना, दोन मुलांकडे पसरलेले हात, जणु त्यांना सोडुन जाण ........
ते तैल चित्र पहाता क्षणी मला अगदी पहिल्यांदा सीतेच्या दु:खाची एक स्त्री म्हणुन जाणिव झाली, इतर्वेळी मी एक कथा म्हणुनच या गोष्टी ऐकल्या . तीच गोष्ट, राजा भरत अन मस्त्यगंधेच्या चित्राची, यु कॅन सी द नोव्हाइस्नेस ऑफ मस्त्यगंधा अन एक चाळीशीचा स्त्री देहाच नाविन्य नसलेला पन लोलुप असा राजा. मला स्वतःला कोणताही चित्रकार ज्या पद्धतिने एक्सप्रेस् होतो त्याला दाद द्याविशी वाटते, अर्थात बालिश चित्र सोडुन, पण आपल्या शी बोलणारी चित्र मला कायम आवडतात.
15 Aug 2011 - 9:30 am | चित्रगुप्त
रविवर्माचे हे चित्र म्हणता का?
या चित्रावर काही दिवसांपूर्वी मिपावर एक मनोरंजक धागा चालला होता:
http://misalpav.com/node/18646
15 Aug 2011 - 9:20 am | चित्रगुप्त
फोटोग्राफीमुळे चित्रकलेवर एकंदरीत काय परिणाम झाला, याचेविषयी मला पण कुतुहल वाटते. याचा आढावा घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करेन.
दुसरे म्हणजे पंधराव्या-सोळाव्या शतकातील युरोपात नेमके काय घडले असावे, ज्यातून चित्रकारांना हुबेहुब, वास्तवदर्शी चित्रे काढ्ण्याची गरज वा तातडी निर्माण झाली ?
मी वरील लेखात ग्रीक-रोमन कलेचा प्रभाव व खिस्ती धर्माचा प्रसार ही कारणे दिली आहेत, ती पुरेशी वाटत नाहीत. याबद्दल काही वाचण्यात आले आहे का?
प्रतिसादाबद्दल आभार.
15 Aug 2011 - 7:05 pm | राजेश घासकडवी
वास्तववाद सुरू कसा झाला याबाबत काही माहिती नाही. फोटोग्राफी व चित्रकला संबंधांबद्दल आधी काही वाचलेलं नव्हतं, पण थोडा शोध घेतल्यावर काही लेख मिळाले.
http://www.artrev.com/blog/blogentry.asp?bid=156
यात एक विचार असा आहे की 'फोटोग्राफीमुळे चित्रकलेला स्वातंत्र्य मिळालं. चित्रकाराला वास्तववादाच्या बंधनातून मुक्ती मिळाली. व अमूर्ततेकडचा प्रवास सुकर झाला. '
मला नेहेमीच प्रश्न पडत आला आहे की ही बंधनमुक्ती आहे की आपल्या क्षेत्राचं आकुंचन आहे? हाच विचार असाही मांडता येईल 'फोटोग्राफीमुळे चित्रकाराची वर्णनात्मक माध्यमावरची मक्तेदारी संपली. वास्तववादीच चित्र काढायचं तर ते फोटोपेक्षा फार वेगळं कसं येणार? यामुळे केवळ अमूर्ततेचाच मार्ग चित्रकारांसाठी खुला राहिला.'
अजून काही लेख
http://www.helium.com/items/1039535-the-impact-of-photography-on-art
http://main.uab.edu/show.asp?durki=48203
http://www.agorajournal.org/2010/Markwood.pdf
या लेखात प्राथमिक फोटोग्राफी ही चित्रकला सुधारण्यासाठी वापरली गेली होती याचा उल्लेख आहे.
18 Aug 2011 - 12:28 am | मनिष
लेख 'पहायला' खूप आवडला, रंगसंगती, वेगवेगळ्या काळातील चित्रे आवडली. वाचून कितपत समजला हे अजून समजले नाही :-)
श्रामोंच्या ह्या प्रतिक्रियेशी सहमत आहे! तुम्ही लिहा - समजून घ्यायचा प्रयत्न करायला आवडेल.
'दिसते/असते तसे' चित्र काढण्यापेक्षा (जे फोटोंमुळे तसेही मागे पडलेय) 'वाटते/भासते तसे' चित्र काढणे हे जास्त रंजक वाटतय. पण त्यातून नेमके काय अभिप्रेत आहे, किंवा असे चित्र कसे 'पहावे' हे तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल.
- मनिष
19 Aug 2011 - 2:25 am | चित्रगुप्त
चित्र कसे 'पहावे' हे तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल......
यावरून आठवले, वर्ष-दीड वर्षापूर्वी काही फोटोंचे रसग्रहण करणारा एक धागा मी सुरु केला होता, त्यातील हे उतारे काहीसे याच विषयी आहेतः
.......खालील दृष्य बघताना अपली नजर डावीकडून खाली वेगाने उतरत, ठेचाळत, गहिर्या हिरवेपणात चिंब भिजत, लाल-सोनेरी उन्हात न्हाणार्या घरापाशी थबकत, अगदी उजवीकडल्या दाट झाडीत पहुचते न पहुचते, तोच तिथले इंद्रधनुष्य आपल्याला उंच उंच आकशात भरार्या घ्यायला लावते....तिकडून ढगांमध्ये रमत गमत आपण डावीकडल्या जुन्या घरांच्या चिमण्यांमधून खाली उतरतो, आणि परत त्याच अटळ, पण हव्या हव्याश्या वाटणार्या उताराच्या प्रवासाला लागतो....यंदा आपण थोडेसे जास्त तपशील बघतो, जसे दोन्ही झाडांचं एकमेकांशी चाललेलं हितगुज, आणि खालच्या हिरवाईवर इथे तिथे लाजत लाजत पसरलेलं थोडंस ऊन्ह.... आकाशाचा पसारा मोठा असला, तरी जमिनीच्या हिरव्या गहिराईमुळे आणि त्यातील अनेक बारकाव्यांमुळे एकंदरित तोल बरोबर साधला जातो, आणि या दोघांना जोडणारे इंद्रधनुष्य ढगांमध्ये शिरता शिरता आपल्याला अलगदपणे तिथे सोडून स्वतः मात्र हळुच हरवून जाते...
.......खालील चित्राचे चार भाग, म्हणजे आकाश, दूरचा डोंगराळ प्रदेश, खालील जमिनीचा उतार, घरे आणि त्याभोवतालची झाडे, खडक.... या चारी भागात एक सुंदर समतोल तर आहेच, शिवाय या सर्वांवर असलेले धुक्याचे एक हलकेसे आवरण या चारी भागांना बांधून ठेवते. अगदी समोरील झुडुपांचा, घराखालच्या खडकांचा, तसेच घरांच्या छपरांच्या सावलीचा भाग, लहान झाडांचे खुंट आणि मोठ्या झाडांच्या फ़ांद्या...या सर्व चित्रात विखुरलेल्या गहिर्या जागा, आणि तश्याच विखुरलेल्या प्रकाशमान जागा... मुख्यतः झाडां-झुडुपांवरील ऊन्ह आणि दूरची पायवाट, हे या चित्राला विषेश उठाव देणारे भाग, पण तेही अगदी हवा तेवढाच, त्यात भडक नाट्यमयता अगदी नाही......घरे मानवनिर्मित असली, तरी त्यांच्यावर वर्षानुवर्षे झालेल्या निसर्ग-चक्रांच्या परिणामी त्यांचे भोवतालच्या निसर्गाशी घडून आलेले अतूट नाते....आता निसर्गाने त्यांना आपल्या उबदार कोषात आपलेपणाने सामावून घेतलेले आहे.....खरंच, अश्या ठिकाणी रहायला किती छान वाटेल.....
धागा: कधीतरी .... कुठेतरी....
http://misalpav.com/node/11635#
1 Sep 2011 - 12:46 am | सूड
तुमची चित्रे व रसग्रहण दोन्ही आवडले. हल्ली ब्रश आणि रंग यांचा संबध तुटलाच आहे जवळपास.
तरी वर्ष- दोन वर्षांपूर्वी काढलेली चित्रे डकवण्याचा आगाऊपणा करीत आहे.
हे चित्र काढून नक्कीच तीनेक वर्ष लोटलीत.
1 Sep 2011 - 9:28 am | प्रचेतस
सूड, चित्रे एकदम सुरेख.
आता रेवती आज्जेला द्यायच्या तुझ्या प्रोफाईल मध्ये चित्रे चांगली काढतो या गुणाचीही नोंद घेतल्या गेली आहे.
1 Sep 2011 - 9:43 am | अर्धवट
मस्त मस्त मस्त...
मला जे काही सांगायचंय ते श्रामोंनी म्हणून ठेवलेलंच आहे. मलाही त्यांच्यासारखाच केवलचित्राबाबत प्रश्न पडला होता.
तुमचं रसग्रहण खूपच छान आहे.
माझ्यासारख्या अडाण्याला एक नवीन 'नजर' दिल्याबद्दल धन्यवाद, अजून खूप नजार्यांची वाट पहातोय.
27 Jul 2012 - 2:03 am | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
27 Jul 2012 - 5:11 am | चौकटराजा
नवीन मिपाकरांसाठी धागा वर आणल्याबद्द्ल धन्यवाद ! ज्यात अर्थ असतो व ज्यात अर्थ नसला तरी आनंद असतो अशी दोन प्रकारची चित्रे असतात. तीच आपण उदाहरणासह वर्णिलेली आहेत. यावरून संगीतातील एक उदाहरण आठवले. शास्त्रीय संगीताच्या बंदिशी अर्थपूर्ण असाव्यात की नसाव्यात हा मोठा च वाद पूर्वी पासून असून त्यात टोकाचे मतमतांतर आहे. कुमार गंधर्व ही अर्थाच्या बाजूने आग्रही होते तर गोविंदराव टेंबे म्हणत असत की शव्द हे शास्त्रीय संगीतात तरी स्वर टांगण्याच्या खुंट्यांचे काम करतात. मी स्वता: टेंबे यांच्या बाजूचा आहे. कारण बंदिशीत सरगम, ताना, आलापी आंदोलने मींडी , लयकारी, फिरत , या अंगांच्या मदतीने शब्दांशिवाय आनंद मिळविता येतो. तसा अमूर्त चित्रात, लय, पुनरावव्ट्ती, रंगसंगति, फटकारे, पोत, आकार, यांच्या साह्याने मस्त आनंद मिळविता येतो. साहित्य याचा पाया शब्दांचा आहे, अर्थाचा आहे . तसा चित्रकला व संगीत यांचा पाया अर्थ व शब्दांचा नाही. त्याठिकाणी अर्थ व शब्द " चार चांद " लावतात हे बरोबर आहे. पण त्या वाचून कला अडत नाही. साहित्य मात्र अचूक शब्दांच्या अभावी अपुरे व हिणकस ठरू शकते. आपल्याला काय वाटते ?
25 May 2013 - 7:27 pm | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी.
14 Nov 2015 - 7:52 pm | मारवा
अत्यंत सहज शैलीत
सामान्य माणसाला ज्याचा चित्रकलेशी कधी संबंध आला नसेल
त्यालाही मोहवेल असे सुंदर विवेचन.
चित्रे तर निखळ नेत्रानंद !