बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील द्वैवार्षिक अधिवेशनात 'चौफुला - २०११ काव्य जुने - शब्द नवे' हा मराठी कवितांचा कार्यक्रम दि २३ जुलै २०११ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमात अमेरिका आणि कॅनडा येथील १२ प्रथितयश कवी-कवयित्रींनी आपल्या सर्वोत्कृष्ठ अशा प्रत्येकी २ कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष्या सौ माधुरी जोशी यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर सौ माधुरी जोशी यांनी उपस्थित सर्व कवी-कवयित्रींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक श्री निखील कुलकर्णी (peoria, illinois ) आणि सौ प्राजक्ता पटवर्धन (manchester,connecticut) यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली. मराठी मधल्या लावणी, पोवाडा, भारुड, वासुदेव, गवळण या सारख्या जुन्या काव्य प्रकारामध्ये नवीन काव्य निर्मिती करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
काव्य वाचनाची सुरुवात सौ कुंदा जोशी यांच्या 'ब्रह्मसुते' या सरस्वती स्तवनाच्या कवितेने झाली. त्यांनी अतिशय सुंदर आवाजात हि कविता सादर केली.
"घे वंदन ब्राम्हसुते तुज सारे नमती | उजळू दे ज्ञान दिवा अंधाऱ्या राती || "
अशा समर्पक शब्दात विद्येचे आराध्य दैवत असणाऱ्या सरस्तीची आळवणी केली.
त्यानंतर सौ राणी लिमये यांनी "दूर क्षितीजावरी | मन माझे संचारी ||" हे भक्तीगीत सादर केले. अहोरात्र भटकणाऱ्या मनाला थोपवशील का अशी आर्त विनवणी त्यांनी विठ्ठलाला केली.
त्यानंतर सौ प्राजक्ता पटवर्धन यांनी अनोखा 'वासुदेव' सादर केला. अतिशय समर्पक शब्द योजना आणि सुरेल सादरीकरण याने प्रत्यक्ष वासुदेव अवतरल्याचा भास होत राहिला.
"घुंगुर बाजे, घुंगुर बाजे, वासुदेव हो नाच नाचे" अशी पंच लाईन घेत पहाटेच्या मंगल वेळेच चित्रच त्यांनी सादर केलं. त्यानंतर "ठेवी चित्त समाधानी | दारी लक्ष्मी भरेल पाणी ||" असा भाबडा संदेश देऊन या वासुदेवानं निरोप घेतला.
त्यानंतर वृद्धांच्या मनातील नेमकी खंत श्री बाळकृष्ण पाडळकर यांनी त्यांच्या 'देवाची शिकार' या कवितेतून मांडली. त्यातल्या व्यथेने मन हेलावून जात होते.
समाज जरी बुद्धीप्रामाण्यवादी होत असला तरी तो रक्ताची नाती विसरत चालला आहे. याची खंत त्यांनी देवाजवळ मांडली.
त्यानंतर सौ हेमांगी वाडेकर यांनी कवितेवरची कविता 'माझी कविता' सादर केली. काव्य करणे हि एक अद्भूद्त शक्ती आहे. आणि ती नेमके कवीला काय देते याचा विचार त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडला.
"या हव्याचा हव्यास माझा आणि हव्यासाचा मी गुलामी" अशा सारखी अतिशय नेमकी शब्द रचना करत त्यांनी खूप मोठा अर्थ या कवितेतून मांडला.
त्यानंतर श्री विनायक गोखले यांनी त्यांची 'मन्वंतर' हि कविता सादर केली. अमेरिकेत आलेल्या मराठी माणसाची मनस्थिती दिवसागणिक कशी बदलत जाते याचे अगदी यथार्थ चित्रण त्यांच्या कवितेत होते.
"मनी चाले द्वंद्व माझ्या, होम स्वीट होम कुठे?
त्यांनी व आम्ही भोगले, दु:ख कुणाचे मोठे?"
अशा सारखी मनाला चटका लावणारी काव्य रचना रसिकांना मोहवून गेली.
त्यानंतर अमेरिकेतील मराठी आणि हिंदी भाषेतील अग्रगण्य लेखिका सौ उषादेवी कोल्हटकर यांनी त्यांची 'ते सूर्याला ठरवू दे' हि कविता सादर केली. त्यांच्या निवेदनात त्यांनी कवितेचे माणसाच्या मनातील नेमके स्थान समजावून सांगितले. आयुष्यातली अंतरे सुखावह व्हायची असतील तर कविता सोबतीला असू देत. असा त्यांचा सारांश होता. या वर्षीचा बृहन महाराष्ट्र मंडळा तर्फे दिला जाणारा 'कला साहित्य संस्कृती पुरस्कार / जीवन गौरव पुरस्कार' सौ उषादेवी यांना देण्यात आला. पृथ्वीवरती निसर्गाचा सर्वात श्रेष्ठ अधिकार आहे. त्यात माणसाने हस्तक्षेप करू नये. असा त्यांच्या कवितेचा सारांश होता.
'कोणी करायची दिवसाची सुरुवात? जाऊ दे मित्रा ते सूर्याला ठरवू दे' अशा समर्पक ओळीने त्यांनी त्याची उत्कटता मांडली.
त्यानंतर सौ सोनाली जोशी यांनी 'फिरून त्या जुन्या चुका' हि कविता सादर केली. कवीला भावना जितकी महत्वाची, तितकाच व्यवहार देखील महत्वाचा आहे असा त्यांच्या कवितेचा आशय होता. बर्याच वेळेला आपण ठरवतो की जुन्या चुका परत करायच्या नाहीत. पण तरीही त्या होतात हे तितकेच सत्य आहे. म्हणून त्या म्हणतात
"अखेर चातकासही कळेल हेच एकदा | अशी नभास आर्जवे करून काय फायदा ||
कधीतरी कळेलही तुलाच या मनातले | उगाच हट्ट वेगळा धरून काय फायदा ||"
त्यानंतर श्री संदीप चित्रे यांनी त्यांची 'अमिगो' हि अप्रतिम कविता सादर केली.
कडाक्याची थंडी, बोचरे वारे या कशाचीच परवा न करता प्रसंगी उपाशी राहत कष्ट करणाऱ्या जीवांच्या वेदनांची अतिशय नेमकी जाणीव यांनी कवितेत करून दिली. या कवितेमध्ये अमेरिकेत बाहेरून आलेल्या मेक्सिकन लोकांची व्यथा काळजाला भिडणाऱ्या शब्दात, आणि तितक्याच सुंदर सादरीकरणात त्यांनी सादर केली आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.
त्यानंतर विद्या हर्डीकर सप्रे यांनी रवींद्रनाथ टागोरांची 'जीवन जेव्हा सुकून जाय' हि अनुवादित कविता सादर केली. विद्या ताईनी आधी रवीन्द्रनाथांची मूळ बंगाली कविता वाचून दाखवली आणि नंतर त्यांनी केलेला अनुवाद सादर केला. अतिशय उत्कट अशा भावनांचे तितकेच उत्कट सादरीकरण रसिकांना भावून गेले.
त्यानंतर सौ लीना जोशी यांनी त्यांच्या 'अंगत-पंगत' आणि 'माझा भारत' या दोन कविता लगोलग सादर केल्या. 'अंगत-पंगत' या कवितेमध्ये अमेरिकेत आलेल्या भारतीय मनाचे अगदी यथार्थ चित्रण होते. अमेरिकेतील छान-छोकी जीवनाचे भारतीय मनाला असलेले आकर्षण, त्या आकर्षणापोटी अनेक-विध तडजोडी करण्याची तयारी, त्यातून होणारी मनाची घाल-मेल लीना ताईनी अतिशय नेमक्या शब्दात मांडली. त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने कवितेची मांडणी केल्याने रसिकांना हसून हसून पुरेवाट झाली.
त्यानंतर 'माझा भारत' या कवितेमध्ये अमेरिकेत बरीच वर्षे राहिल्यानंतर विटलेल्या भारतीय मनाचा भारतामध्ये भारत शोधण्याचा प्रयत्न शब्दात मांडला होता. भारतात होत असलेल्या वेगवान बदलात कवीच्या मनातील भारत कुठेतरी हरवतो आहे की काय असे वाटत राहते. पण हृदयाला हात घालणाऱ्या शेवटाने भारतीय मन आणि विचार कसे जसेच्या तसे शिल्लक आहेत याची खात्री पटली. अत्यंत समर्पक मांडणीने सर्व उपस्थित हेलावून गेले होते. भारतीय पणाचे एक व्यवच्छेदक लक्षण देताना त्या म्हणतात
"जीवांसाठी जीव देणारा भारतीय मला ज्या क्षणी दिसला, मला हवा असलेला भारत मला त्या क्षणी मिळाला
आणि बदलेल्या भारतातही त्यांच्या मनातला भारत शोधताना त्या म्हणतात
"झगमगते दिवे आले तरी निरांजनाची वात तिथे तेवते आहे, समाजाचे ऋण समाज आजही तिथे फेडतो आहे."
आणि त्या नंतर
"नको मिळू देत ती ऑलिम्पिक ची ३६ मेडल्स, माझ्या भारताला मिळालाय मानवतेचं एकाच मेडल"
असा दुर्दम्य आशावाद व्यक्त करत त्यांनी कवितेचा समारोप केला.
यानंतर श्री निखील कुलकर्णी यांनी भागीचे भारुड सादर केले. भारुड हि एकनाथ महाराजांनी मराठी भाषेला दिलेली एक अजोड भेट. लोकांना समजेल अशा भाषेत, त्यांच्याशी संवांद साधत, त्यांना हसवत-खेळवत, विचार करायला लावत एखादे ज्ञान लोकांना द्यायचे. असा भारुडाचा उद्देश असतो. श्री कुलकर्णी यांनी अमेरिकेत आलेल्या कॉम्पुटर इंजिनियरच्या बायकोची फरफट 'भागीचे भारुड' मधून अतिशय समर्पक शब्दात मांडली. केवळ नवरा अमेरिकेत आला म्हणून हि भागी अमेरिकेत येते. सगळी नाती, सगळे बंध तोडून अमेरिकेतली होऊन वागायला शिकते. पोरं होतील. आई म्हणतील एवढी एक छोटीशी अपेक्षा असते. पण जेव्हा अमेरिकेत झालेली पोरं भागीशी बोलायलाच नाही म्हणतात, त्यांना मराठी येत नाही म्हणून मराठीत बोलत नाहीत आणि भागीला इंग्रजी येत नाहीत म्हणून भागीला इंग्रजीत बोलू नको म्हणतात, तेव्हा भागीला भाषाच उरत नाही. आणि संवाद संपून जातो.
नवर्याबरोबर भागी परत गावाला यायला निघते, तेव्हा पोरं गावाला येणार नाही म्हणतात, तेव्हा मात्र भागीला रडू कोसळते आणि भागी अधांतरी होते. हि भागीची व्यथा रसिकांना हेलावून गेली.
त्यानंतर विद्या हर्डीकर सप्रे यांनी एक समश्लोकी अनुवादित कविता सादर केली. 'या मुलानो चला जाऊ या' या कवितेमध्ये त्यांनी 'आओ बच्चो' या कवितेतले भाव अगदी जसेच्या तसे मराठीत आणून दाखवले. त्यांच्या बरोबर कविता म्हणत असताना रसिक मंडळी रंगून गेली होती. एक अतिशय छान अनुभव!
यानंतर श्री निखील कुलकर्णी आणि सौ प्राजक्ता पटवर्धन यांनी आभार प्रदर्शन केले. कवितांचे समीक्षण सौ क्रांती सडेकर, प्राध्यापक भास्कर ढोके, डॉ पुरुषोत्तम काळे यांनी केले. तंत्रज्ञान सहाय्य सौ अस्मिता कुलकर्णी आणि श्री जगदीश पटवर्धन यांनी केले. कला सहाय्य सौ राधिका परमानंद आणि सौ अस्मिता कुलकर्णी यांनी केले. सौ मीनल गद्रे यांनी विशेष सहाय्य केले. कार्यक्रमाची संकल्पना सौ माधुरी जोशी यांची होती.
यानंतरच्या सत्राची सुरुवात सौ उषादेवी कोल्हटकर यांच्या 'एक काल असा होता' या कवितेने झाली.
माणसाच्या आयुष्याचा रस्ता खरे तर एक मार्गीच.. मागे पडलेली वळणे, स्थाने परत भेटतात ती फक्त स्मृतींनी. त्यांना परत जाता येत नाही. आणि मग उरते ती एक हळवी आठवण. अशी हळवी आठवण उशादेवींनी त्यांच्या ह्या कवितेत सादर केली. शेवटी त्यांनी पाकळ्यांच्या रंगांची आणि फुलांच्या सुगंधाची भाव कथा सांगितली तेव्हा रसिकांचे डोळे पाणावले. कविता का करावी हे सांगताना त्या म्हणाल्या
प्रज्ञा की आंस हैं कविता , खुबसुरत एह्सांस हैं कविता, कवी का आत्मविश्वास हैं कविता .
यानंतर श्री बाळकृष्ण पाडळकर यांनी 'मला वाटते' हि कविता सादर केली. एका प्रियकराला कधी वारा होऊन प्रेयसीच्या मोकळ्या केसांशी खेळायचे आहे. तर कधी त्याला श्रावण धारा होऊन प्रेयसीला चिंब करायचे आहे. अतिशय नाजूक आणि तरल भावना श्री पाडळकर यांनी अतिशय नेमके पणे मांडल्या. त्यांचे सादरीकरण देखील अतिशय समर्पक होते.
यानंतर सौ हेमांगी वाडेकर यांनी 'दुरावा' हि कविता सादर केली. यामध्ये मानवी नात्यांचे विविध रंग त्यांनी अत्यंत अलंकारिक भाषेतून मांडले. नातं कितीही जवळचं असलं तरी कधी कधी दुरावाही आवश्यक ठरतो. त्या दुराव्याच दुस्वास न करता, तोही नात्यातलं अविभाज्य भाग आहे. याची जाणीव ठेवावी. असा त्याचा मतीथार्थ होता. अतिशय सुंदर कविता.
यानंतर सौ प्राजक्ता पटवर्धन यांनी एक गवळण सादर केली. ब्रिज मोहनच्या दर्शनाला आतुरलेल्या राधेचे एक अतिशय नेटके वर्णन त्यांनी यात केले.
"वाट हि अधीर पावले वेगात | गुंतला जीव हा मयूर पंखात ||" असो किंवा
"भिजल्या धारात निजल्या रानात | श्रीहरी मनात भिनला तनात ||"
यासारखे एकाहून एक सुंदर अनुप्रास त्यांनी सादर केले. त्यांच्या छंदबद्ध रचने इतकेच त्यांचे सादरीकरण देखील लवचिक आणि उत्कट होते.
यानंतर श्री विनायक गोखले यांनी 'मधुरा भक्ती' हि भक्ती पर कविता सादर केली. पांडुरंगाची आठवण येते तेव्हा मनाची नेमकी काय अवस्था होते त्याचे वर्णन या कवितेमध्ये त्यांनी केले. पांडुरंगाची आठवण आली की साऱ्या समृद्धीचा, वास्तवाचा विसर पडून सारे जीवन अपूर्ण वाटायला लागते. अतिशय मृदू भावना आणि तितकेच संयुक्तिक सादरीकरण रसिकांना खूपच भावले.
यानंतर सौ राणी लिमये यांनी 'नाम महिमा' हा अभंग सादर केला. हि कविता म्हणजे नामाविषयी वाटणारे प्रेम आणि नाम साधनेतून येणारे अनुभव यांचे एक सुरेख मिश्रण होते.
"आहे कृपाळू पांडुरंग | कशी सोडू मी त्याचा संग | झाले नामात मी दंग ||"
एक अतिशय अप्रतिम रचना आणि तितकेच सुंदर सादरीकरण.
यानंतर सौ सोनाली जोशी यांनी 'दुरावा' हि कविता सादर केली. अनेक प्रकारच्या नात्यांमध्ये अनेकानेक कारणांनी दुरावा येतो. आणि मग याच दुराव्यातून ओढ जन्म घेते. आणि ओढीत प्रेम लपलेले असते. अशा आशयाची त्यांची कविता अतिशय सुंदर सादर केली.
यानंतर श्री संदीप चित्रे यांनी 'यादों की बारात ' हि अतिशय हळवी कविता सादर केली. काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे असे म्हणत संदीप सगळ्यांना मनाने हलकेच शाळेच्या दिवसात घेऊन गेले. काय हरवले काय विसरले हे आज कळत आणि बालपण देगा देवा हे खरं वाटायला लागतं. एक अतिशय सुंदर सादरीकरण आणि तितकाच मनस्वी अनुभव.
यानंतर सौ कुंदा जोशी यांनी 'गुलाब कालिका' हि अफलातून लावणी सादर केली. हि होती आधुनिक लावणी एक तरुण मुलीचे वर्णन करणारी.
"अथांग जीवन पुढे पसरले, घे निर्भय तु उडी| दिग्विजयाच्या बघुनी पताका, कृतार्थ होईल कुडी |"
असा दुर्दम्य आशावाद त्यांनी दाखवला. आणि मग पुढच्याच ओळीत
"ययातीसम मग कशास मागू, यौवन मग परतुनी | कुशाग्रमती तु शक्ती शालिनी विविध कला दर्शिनी || "
अशी आयुष्याची कृतार्थता मांडली. अनुप्रासांचा चौफेर वापर आणि अतिशय नेटकी शब्द रचना यांनी हि लावणी नटली होती. त्याच्याच जोडीला सौ जोशी यांचे सटीप सादरीकरण याने तिची लज्जत उत्तरोत्तर वाढत गेली. एक अतिशय सुखद अनुभव.
यानंतर श्री निखील कुलकर्णी यांनी 'शिवमंत्राचा पोवाडा' सादर केला. शिवाजी राजांनी दिलेला शिवमंत्र थोरल्या बाजीराव साहेबांनी म्हटला आणि मराठी सत्ता अटकेपार गेली. काशी, प्रयाग हि तीर्थे मुक्त झाली. इतकेच काय तर प्रत्यक्ष दिल्ली मराठी सत्तेखाली आली. पण जसेजसे सत्ता गवसली तसा या शिवमंत्राचा मराठी सत्तेला आणि सत्ताधीशांना विसर पडत गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसलो. याचं अतिशय नेमकं वर्णन या पोवाड्यात केलं होतं. समर्पक शब्द योजना, पद्मावर्तनी वृत्त आणि तितकेच मर्दानी सादरीकरण यांनी पोवाडा अतिशय आकर्षक ठरला.
यानंतर 'पसायदान' म्हणून चौफुला - २०११ ची सांगता झाली.
धन्यवाद
निखील कुलकर्णी, प्राजक्ता पटवर्धन
प्रतिक्रिया
1 Aug 2011 - 1:06 am | शुचि
छान तपशीलवार वर्णन आहे. कार्यक्रम पाहू न शकल्याची खंत वाटते आहे.
1 Aug 2011 - 4:04 am | रेवती
छानच झालेला दिसतोय कार्यक्रम!
सर्वांचे अभिनंदन!
1 Aug 2011 - 4:08 am | इंटरनेटस्नेही
अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण केला गेलेला अहवाल.
1 Aug 2011 - 5:21 pm | गणेशा
अप्रतिम वृत्तांत दिला आहे, छान वाटले वाचुन.
"अखेर चातकासही कळेल हेच एकदा | अशी नभास आर्जवे करून काय फायदा ||
कधीतरी कळेलही तुलाच या मनातले | उगाच हट्ट वेगळा धरून काय फायदा ||"
मस्त आहेत या ओळी .. आवडल्या खुप
1 Aug 2011 - 7:28 pm | प्रभो
कार्यक्रम भारी झालेला दिसतोय!! अभिनंदन!