होमी भाभा यांचा कलासंग्रह – चुकवू नये असे काही

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
31 May 2011 - 6:26 pm

शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात. होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं. आधुनिक (विसाव्या शतकातल्या) भारतीय कलेतले अनेक उत्तम नमुने एकत्र येऊन हा कलासंग्रह प्रातिनिधिक आणि अद्वितीय बनला आहे. होमी भाभा यांनी आपल्या हयातीत आपली कलाभिरुची सतत जोपासली होती. भारतीय कलेत त्या काळात फार महत्त्वाचे बदल घडत होते. हे बदल घडत असताना त्यांतलं काय विशेष महत्त्वाचं आहे हे ओळखणं सोपं नव्हतं. पण आपल्या काही कलोपासक मित्रांच्या मदतीनं भाभांनी त्याचा उत्तम अंदाज बांधला आणि हा कलासंग्रह हळूहळू आकाराला आला. संस्थेच्या आवारात विखुरलेला हा संग्रह आज आपला एक महत्त्वाचा राष्ट्रीय वारसा आहे. गेले काही दिवस हा अमूल्य ठेवा राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, मुंबई इथे पहायला ठेवला आहे.

प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप हा स्वतंत्र भारतातला सर्वात महत्त्वाचा कलाकारगट होता. एम. एफ. हुसेन, सय्यद हैदर रझा, फ्रान्सिस न्यूटन सूझा, वासुदेव गायतोंडे, सदानंद बाकरे, अकबर पदमसी, तय्यब मेहता असे अनेक रथी-महारथी या गटात होते. या सर्वांच्या कलेचे अनेक नमुने या प्रदर्शनात पहायला मिळतात. या कलाकारांच्या अनेक वर्षांच्या कालखंडातल्या अनेक कलाकृती इथे आहेत. त्यामुळे त्यांच्या कलाजाणीवेत आणि शैलीत झालेले बदल इथे पहायला मिळतात. उदा: गायतोंडे आणि रझा यांच्या सुप्रसिद्ध अमूर्त शैलीतली चित्रं इथे आहेतच, पण त्याहून वेगळ्या प्रकारची त्यांनी पूर्वी काढलेली चित्रंही इथं पाहायला मिळतील. अशी चित्रं एकत्र पाहायला मिळणं हा खरोखर दुर्मिळ योग आहे.

याशिवाय के. जी. सुब्रह्मण्यन्, प्रभाकर बरवे, बी. प्रभा अशा अनेक कलाकारांचं निवडक आणि सुरेख काम या संग्रहात पहायला मिळेल. ज्यांना आधुनिक भारतीय कलेशी ओळख करून घ्यायची आहे अशांनी हे प्रदर्शन आवर्जून पाहावं आणि ज्यांना आधुनिक भारतीय कलेविषयी आत्मीयता वाटते त्यांनी तर हा अनमोल खजिना अजिबात चुकवू नये.

प्रदर्शन ५ जूनपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी पहा: http://ngmaindia.gov.in/e-invite.pdf

जाताजाता: तिथपर्यंत जात असाल तर समोरच्या छत्रपती शिवाजी (पूर्वीच्या प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझिअममध्ये नवीनच सुरु झालेलं जहांगीर निकोलसन दालनसुद्धा पाहून या. यातही भारतीय कलेचे काही उत्तम नमुने पाहायला मिळतील. अधिक माहितीसाठी पहा: http://www.facebook.com/pages/Jehangir-Nicholson-Art-Foundation/20268849... किंवा http://www.themuseummumbai.com/Collection_category.aspx?link=Modern%20an...

कलासंस्कृतीशिफारसमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

विकास's picture

31 May 2011 - 7:31 pm | विकास

माहितीबद्दल धन्यवाद! तिथे नसल्याने प्रदर्शन बघू शकणार नाही, मात्र चित्र येथे लावता आली तर अवश्य दाखवावीत.

ज्यांना आधुनिक भारतीय कलेशी ओळख करून घ्यायची आहे अशांनी हे प्रदर्शन आवर्जून पाहावं आणि ज्यांना आधुनिक भारतीय कलेविषयी आत्मीयता वाटते त्यांनी तर हा अनमोल खजिना अजिबात चुकवू नये.

या बद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.