नवाज शरीफ सही बोलले!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
22 May 2011 - 8:40 pm

नवाज शरीफ सही बोलले!
(माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख)
गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले. दुवा आहे (http://tinyurl.com/3lhesqp)*
हे उद्गार आहेत पकिस्तानच्या भूतपूर्व पंतप्रधानांचे! भारतीयांना आठवत असेल कीं या नवाज शरीफ यांनीच वाजपेयींसह भारत-पाक मैत्रीचे पहिले पाऊल म्हणून "लाहोर-दिल्ली बस सेवा" सुरू केली होती.(*१) वाजपेयींचे स्वागत करायला ते लाहोरला आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे उद्गार फारच मोलाचे असून वार्‍याच्या एकाद्या सुखद झुळुकेसारखे आहेत. पाकिस्तानी जनतेला त्यांचे हे म्हणणे पटवून देण्यात आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी मनोवृत्तीत बदल करण्यात शरीफना ज्यादिवशी यश येईल तो दिवस सोन्याच्या अक्षरात लिहिला जाईल यात शंका नाहीं. भारतच आपला खराखुरा आणि सर्वोत्तम मित्र आहे हे पाकिस्तानी लोकांना ते पटवून देऊ शकतील अशी आशा सर्व भारतीयांच्या मनात आहे.
अशा धीट आणि लोकमताच्या सद्यप्रवाहाच्या विरुद्ध भासणार्‍या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याचे आणि मुत्सद्दीपणाचे (Statesmanshipचे) मला खरेच कौतुक वाटले. कारण या भावनेने जर मूळ धरले तर ही एक परस्परसहकार्याची मुहूर्तमेढच ठरेल. भारताने जरी मैत्रीचा हात नेहमीच पुढे केलेला असला तरी दोन्ही देशात कांहीं अंशी एक अविश्वासाची भावना आहे. (हल्ली त्यासाठी Trust deficit हा फॅशनेबल शब्द वापरण्यात येतो!) त्या भावनेला ओलांडून पाकिस्तान आपलाही मैत्रीच हात पुढे करेल काय? मला सध्या सर्व बाजूंनी घेरला गेलेला पाकिस्तान भारताच्या सद्यपरिस्थितीवरून योग्य तो बोध घेऊन असे पाऊल उचलेल अशी आशा मला वाटते.
पण भारताबरोबर मैत्री करायची असेल तर पाकिस्तानला फुकटेपणाची संवय सोडावी लागेल! आजपर्यंत पाकिस्तानला करावा लागणारा खर्च कधीच कमवावा लागलेला नाहीं. मग तो खर्च लष्करी सामुग्रीवरचा खर्च असो, आपल्या देशातील मूलभूत सोयी (infrastructure) असोत भूकंप, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, पण यापुढे फुकट मदत बंद! पाकिस्तानने कर्ज जरूर काढावे, ते दोन्ही पक्षांनी केलेल्या करारानुसार परत करावे पण फुकटची मदत घेऊ नये! कारण फुकटच्या मदतीबरोबर देशाच्या स्वातंत्र्यावर अनेक मर्यादा येतात व एक तर्‍हेचा मिंधेपणाही येतो. तो कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे.
पाकिस्तानी लोक भारतीयांसारखेच कल्पक, मेहनती आणि कुशल आहेत. शिवाय आपण कित्येक बाबतीत सारखे आहोत. चेहरेपट्टी, पोषाख, विचार करण्याची पद्धत आणि (गोमांस सोडल्यास) खाण्या-पिण्याच्या आवडी अशा अनेक बाबतीत आपण सारखे आहोत. ज्या दिवशी देश या नात्याने पकिस्तान (आणि पाकिस्तानी जनता) कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या पायांवर उभे रहाण्याचा निर्णय घेईल त्या दिवसापासून तेही आपल्यासारखेच यशस्वी होऊ लागतील.
भारताने टाकलेल्या एका अनुकरणीय पावलाचे उदाहरण मला इथे द्यावेसे वाटते. १९९१साली भारतालाही एका दारुण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. भारताकडे असलेली विदेशी चलनाची गंगाजळी संपली होती व रोजच्या गरजा भागविण्याचीही भ्रांत पडली होती. अशा परिस्थितीत भारताला आपल्याजवळचे तारण म्हणून राखलेले सोने हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गहाण म्हणून पाठवायची नामुष्की सहन करावी लागली होती. तरीही भारताने मदतीचा स्वीकार न करता, मिंधेपणा न पत्करता ते पाऊल उचलले व पाठोपाठ नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आर्थिक धोरणात अमूलाग्र व क्रांतिकारक बदल घडवून आणला व भारताला प्रगतीपथावर आणून उभे केले. अशा तर्‍हेच्या निर्णयामुळे भारत आज एक कणखर, काटक आणि निग्रही देश बनला आहे.
पाकिस्तानही भारताच्या अशा धोरणांचे अनुकरण करून स्वत:ला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो. "डॉन" व "एक्सप्रेस ट्रिब्यून" सारख्या वृत्तपत्रातील वाचकांच्या प्रतिसादांचा मागोवा घेतल्यास आज पाकिस्तानची जनता अमेरिकेची मदत नाकारून तिच्याबरोबरचे गुलामीसदृष संबंध तोडून पाकिस्तानने स्वत:च्या पायावर उभे रहावे अशा मताचे आहेत असेच आढळून येईल.
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं. याबाबतचा जो गैरसमज पाकिस्तानी जनतेच्या मनात आहे तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. सध्या चालू असलेल्या पंचायतीच्या निवडणुकीत गिलानीसारख्या फुटीरवाद्यांच्या चिथावणीला धिक्कारून ७०-८० टक्क्याच्या प्रचंड प्रमाणात मतदान करून जम्मू-काश्मीरच्या जनतेने आपल्या मनाचा कौलही दाखवून दिला आहे. दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच भरघोस मतदान झाले होते. ही सत्य परिस्थिती समजावून सांगून पाकिस्तानला सद्यपरिस्थितीची जाणीव करून द्यायची हीच योग्य वेळ आहे व पोलाद गरम असतानाच ते घडविले पाहिजे.
पाकिस्तानात काय पद्धतीची ’हवा’ चालू आहे, तेथील विचारवंत कसा विचार करत आहेत हे वाचणे मनोरंजक आहे. डॉन व एक्सप्रेस ट्रिब्यून नेहमी वाचत असल्यामुळे मला त्याची बरीच कल्पना आहे. माझ्या आधीच्या लेखात मी असे अनेक दुवेही दिले होते. खाली दिलेला दुवा वापरून वाचकांना डॉ. तारीक रहमान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात लिहिलेला लेख वाचता येईल. माझ्या मते प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने हा लेख वाचला पाहिजे.
आता पाकिस्तान-चीन मैत्रीकडे वळूया. युसुफ राजा गिलानी या मैत्रीला ’सदाबहार’ मैत्री म्हणतात, तसेच चीनहून निघता-निघता गिलानींनी तिचा ’निरंतर मैत्री’ असाही उल्लेख केला. चिनी लोक निमंत्रणाला मान देऊन एकाद्या देशात आले कीं ते त्या देशाला ’निरंतरपणे’ व्यापून टाकतात. खरे तर त्यांना यासाठी निमंत्रणही लागत नाहीं हा अनुभव आपल्याला अक्साईचिनबाबतीत आलेलाच आहे.
माझ्या मते "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या कालबाह्य प्रणालीवर आधारलेले चिनचे हे धोरण कधीच यशस्वी होणार नाहीं. पाकिस्तानने आपण बांगलादेश युद्धानंतर त्या देशातून आपले सैन्य बाहेर काढून सत्ता मुजीबुर रहमान यांना बहाल केली हे विसरू नये. या उलट चीनने तिबेटवरची आपली मगरमिठी आणखीच घट्ट आवळून त्यांच्या 'निरंतन मैत्री'चे उत्कृष्ठ उदाहरण आहे हेही विसरू नये. आपला मित्र नीट पारखून निवडावा. सर्वांगीण विचार करता पाकिस्तानला भारताच्या मैत्रीशिवाय पर्यायच नाहीं हे त्यांना पटेल यात मला तरी शंका वाटत नाहीं.
(*१) पुढे त्यांना विचारता ज. मुशर्रफ यांनी केलेल्या "कारगिल" मोहिमेच्या फाजील दुस्साहसाने ही मैत्री रुळावरून जवळ-जवळ खाली उतरलीच होती. पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली. लाहोरला वाजपेयींच्या स्वागताला न आलेल्यात सर्वात नजरेत भरणारी अनुपस्थित व्यक्ती होती पाठीत वार करू पहाणारे मुशर्रफ हीच! पुढे त्यांच्याबरोबर उगीचच समेटाची बोलणी करण्यासाठी त्यांनाच आग्रा शिखर परिषदेसाठी बोलावून त्यांना अस्थानी प्रतिष्ठा देऊन, त्याच्या CEO या बिरुदावलीचे राष्ट्राध्यक्ष (President) मध्ये रूपांतर करायची संधी देऊन वाजपेयींनी एक घोडचूकच केली होती!)

धोरणराजकारणविचारसद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

22 May 2011 - 10:11 pm | प्रास

'एकदा एका कुत्र्याची शेपूट टणक ट्युबमध्ये घालून सरळ करून ठेवलेली असता काही दिवसांनंतर त्या ट्युबने शेपटीचा मूळ आकार धारण केला असल्याचं आढळून आलं होतं.......'

याची आठवण झाली.

बाकी पाकिस्तानची जनता आणि तिचे नेते कडक आर्थिक धोरण स्विकारतील आणि आर्थिक मिंधेपणा टाकतील असं काही घडू शकेल याची चिह्न नाहीत कारण अमेरीकेकडचा मिंधेपणा जाऊन चीनचा मिंधेपणा स्विकारण्याकडे सदर देशाचा कल होताना दिसत आहे.

एकदा मिंधेपणाने आणि फुकटेपणाने मिळवलेली गोष्ट ही पौष्टिकच असते हे समजण्याची सवय लागली की ती सुटता सुटत नाही म्हणे....

आंबोळी's picture

22 May 2011 - 10:20 pm | आंबोळी

एकदा मिंधेपणाने आणि फुकटेपणाने मिळवलेली गोष्ट ही पौष्टिकच असते हे समजण्याची सवय लागली की ती सुटता सुटत नाही
अगदी अगदी......
त्यामुळे कितिही अशावादी वाटला तरी काळेकाकांचा विचार ( सर्वांगीण विचार करता पाकिस्तानला भारताच्या मैत्रीशिवाय पर्यायच नाहीं हे त्यांना पटेल यात मला तरी शंका वाटत नाहीं.) प्रत्यक्षात येण्याची शक्यता खुपच धुसर वाटते.

'एकदा एका कुत्र्याची शेपूट टणक ट्युबमध्ये घालून सरळ करून ठेवलेली असता काही दिवसांनंतर त्या ट्युबने शेपटीचा मूळ आकार धारण केला असल्याचं आढळून आलं होतं.......'

LOLS ह्या ह्या ह्या.. मला वाटलं, हि प्रतिक्रिया लेखकाबद्दल होती कि काय :D

काश्मीर - पाकिस्तान राजकारण फेम (बधीर ढोणी)

सुधीर काळे's picture

23 May 2011 - 9:08 am | सुधीर काळे

पण चीन चिक्कू आहे! तो पैशाची मदत देणार नाहीं. आपले सैनिक पाठवेल, तंत्रज्ञ पाठवेल पण पैसे? तिथे मात्र नन्नाचा पाढा!
पूर्वी पगार म्हणून शिधा द्यायची पद्धत होती तीच गत!
पूरग्रस्तांना चीनने जी मदत देऊ केली तीही भारताने दिलेल्या निधीपेक्षा अर्ध्याहून कमी होती.

प्रदीप's picture

24 May 2011 - 6:16 pm | प्रदीप

पण चीन चिक्कू आहे! तो पैशाची मदत देणार नाहीं. आपले सैनिक पाठवेल, तंत्रज्ञ पाठवेल पण पैसे? तिथे मात्र नन्नाचा पाढा!
.....पूरग्रस्तांना चीनने जी मदत देऊ केली तीही भारताने दिलेल्या निधीपेक्षा अर्ध्याहून कमी होती.

चीनला पैसे कुठे गुंतवायचे व केव्हा हे बरोबर समजते. पाकिस्तानला अनेक प्रकारच्या शस्त्रात्रांची मदत, तेथे अनेक लोकोपयुक्त प्रकल्प उभारण्यास करीत असलेली मदत, गदर बंदर उभारणी हे सर्व काय दर्शवते? (नक्की गुंतवणूकीची अधिक माहिती गुगलून देता येईल, पण हे सर्व सूर्वप्रकाशासारखे स्वच्छ असतांना तसे आताच देण्याची जरूरी वाटत नाही). चीनसाठी पाकिस्तान भौगोलिक व राजकीय दृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तिथे चीन, (आफ्रिकेत तेलासाठी करते तशी) व्यवस्थित गुंतवणूक गेली अनेक दशके करीत आलेले आहे. पूरग्रस्तांसाठी मदत वगैरे किती दिली माहिती नाही. तशी देण्याची त्यांना फारशी जरूरही भासत नसावी. गेल्याच आठवड्यात गिलानी ह्यांच्या चीनभेटीत दोघा देशांनी आपल्या जुन्या मैत्रीचा जोरदार निर्वाळा दिला व चीनने गदर येथे त्यांचा नाविक स्थळ उभारावा अशी विनंति गिलानींनी केली.

भारतास पूरग्रस्तांसाठी जागतिक राजकारणाच्या संदर्भामुळे मदत द्यावी लागली. ती देऊनही तसे कुणी फारसे प्रभावित होत नाहीत, आपली पाठ थोपटत नाहीत, हा भाग वेगळा!

चिरोटा's picture

22 May 2011 - 10:46 pm | चिरोटा

या पार्श्वभूमीवर त्यांचे हे उद्गार फारच मोलाचे असून वार्‍याच्या एकाद्या सुखद झुळुकेसारखे आहेत

अशा प्रकारची वाक्ये पाकिस्तानी(आणि भारतिय) राजकारणी अधून मधून फेकत असतात. मुशर्रफ ह्यांनी ही अशी वाक्ये पूर्वी फेकली आहेत. तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांना 'ईशारे' देणे, अधून मधून परत 'अमन की आशा' म्हणत हस्तांदोलन करणे , परत सीमेवर गोळीबार करणे ह्या पलिकडे फार काही घडलेले नाही.

अशा तर्‍हेच्या निर्णयामुळे भारत आज एक कणखर, काटक आणि निग्रही देश बनला आहे.

बापरे!

चिंतामणी's picture

23 May 2011 - 12:34 am | चिंतामणी

थोडी दुरूस्ती करून म्हणतो.

नवाज शरीफ पहील्यांदा सही बोलले!

चुकुन सत्तेवर आले तर ते या मताला चिकटुन राहतील अशी आशा करू.

जरा अवांतर होत आहे, पण भारताची इतकी सर्वांगीण प्रगती कां झाली याबद्दल मी अनेक ठिकाणी-मुख्यतः जकार्ता पोस्टमध्ये-लिहितो कीं भारताच्या प्रगतीला भारतीयांची कल्पकता, मेहनती स्वभाव, कौशल्य आणि चिकाटी हे गुणच जबाबदार आहेत! याच गुणांचा काल रतन टाटा यांनी एका मुलाखतीत खास उल्लेख केला. हा मुद्दा मी येथे माझ्या इंडोनेशियन सहकार्‍यांनाही सांगत असतो.
टाटांचे भाष्य वाचा या दुव्यावरः http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/8497118.cms

चिरोटा's picture

23 May 2011 - 9:37 am | चिरोटा

भारताच्या प्रगतीला भारतीयांची कल्पकता, मेहनती स्वभाव, कौशल्य आणि चिकाटी हे गुणच जबाबदार आहेत

जरा अवांतरच पण हे गुण ईतर राष्ट्राच्या नागरिकांमध्ये नाहीत किंवा तुलनेने कमी आहेत असे आपल्याला सुचवायचे आहे का?तसे असेल तर असहमत्.

असे नाहीं. जपानला मी बर्‍याचदा गेलो आहे. १९७५-८० च्या दरम्यान रात्री ८-९ पर्यंत काम करणार्‍या जपानी लोकात हे गुण मी पाहिले आहेत, पण नंतर १९९० साली गेलो तेंव्हां घड्याळ बघून घरी जाणारे जपानीही पाहिले! कदाचित् त्यामुळेच जपान आता मागे पडला असेल काय हे न कळे!
एक गोष्ट नक्की! भारतीयांच्या या गुणांमुळे आज भारतीय सर्व जगात यशस्वी होत आहेत! कुणी सांगावे? कात्रीना, BP Oil Leak व सध्या मिसिसिपी नदीला आलेला महापूर यासारख्या नैसर्गिक/मानवनिर्मित संकटांना तडफदारपणे तोंड देणारा एक भारतीय वंशाचा अमेरिकन व लूझियानाचा सध्याचा गव्हर्नर बॉबी जिंदल २०१६ साली त्या देशाचा राष्ट्रपतीसुद्धा होईल.
जय हो!

नगरीनिरंजन's picture

23 May 2011 - 2:36 pm | नगरीनिरंजन

जपान मागे पडला आहे आणि भारत पुढे गेला आहे हे एकमेकासापेक्ष की आपापल्या आधीच्या अवस्थेच्या सापेक्ष?
आणि ते कसे ठरवले? म्हणजे फक्त अर्थव्यवस्थेची वाढ आणि आकारमान यावरून की आणखी काही निकष?

बॉबी जिंदल अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारतीयांना अभिमान वाटण्यासारखे काय आहे? फार तर ते भारताशी सहानुभूतिने वागून धोरणे ठरवतील अशी आशा वाटणे ठीक आहे.

अर्थात् आपापल्या आधीच्या अवस्थेच्या सापेक्ष!

मृत्युन्जय's picture

23 May 2011 - 10:21 am | मृत्युन्जय

नवाझ शरीफ बोलले आणि लागोपाठ ओबामा तेच बोलले हा निव्वळ योगायोग समजावा काय? ज्या देशांमध्ये अराजक माजवायचे असेल, शासनकर्त्यांना कानपिचक्या द्यायच्या असतील, सरकारे उलथवायची असतील तिथेतिथे अमेरिकी सरकार काय काय करते हे आताशा शेंबडा पोरगाही सांगेल. लागोपाठ येणारी वक्तव्ये वाचुन तर आता खात्रीच पटली.

बाकी कोणी काहीही बोलो पाकिस्तान सुधारणार नाही. तिथली जनता राजकारण्यांना सुधारु देणार नाही आणि राजकारणी जनतेला. दोन्ही देशांमधुन एकमेकांविषयी द्वेष भिनलेला आहे. एखादा राजकारणी काही बोलला म्हणुन काही फरक पडेल असे वाटत नाही किमान पाकिस्तानात तरी नाही.

सध्या पाकड्यांच्या कराचीतील एयर बेसवर अतिरेक्यांनी धुमाकुळ घातला आहे आणि त्यात अमेरिकेने मोठ्या उदार मनाने देउ केलेले दोन Orions विमाने फुकली गेली आहेत. ;)

(चित्र जालावरुन घेतले आहे.)
भविष्यात अमेरिका याच उदार मनाने अजुन Orion विमाने भेट म्हणुन सुद्धा देइल.
बाकी पाकड्यांवर हिंदुस्थानाने कधीच विश्वास ठेवु नये. च्यामारी हे पाकडे तर मला भस्मासुराचीच अवलाद वाटते,जो वर देइल (मैत्री करेल) त्याच्याच मस्तकावर हे हात ठेवायला कमी करणार नाहीत !!!
बाकी नवाज शरीफ किती शरीफ आहेत हे पाकी जनतेला ठावुक आहेच, मग आपण कशाला त्यांच्या विधानांवर विश्वास ठेवावा ?
सध्या पाकड्याच्या हाती असलेली अणवस्त्रे किती सुरक्षित राहिली आहेत याचीच चिंता तिकडच्या नेते मंडळींनी आणि जनतेने केली तर फार उत्तम.सध्या चीन डाव पेचातील कुठली प्यादी हलवतोय याकडेच हिंदुस्थानाने जास्त लक्ष द्यावे असे वाटते.

जाता जाता :--- अग्नीपथ चित्रपटातील एक संवाद आठवला :--- गलत चीज बनाया टेलिफोन,उधरसे आदमी सोचता कुछ है,बोलता कुछ है,करता कुछ है | हे पाकड्यांच्या बाबतीत देखील लागु आहे.

नवाझ शरीफ ह्यांचे हे विधान अन पाकिस्तानचे आर्थिक धोरण कसे असावे ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध पुरेसा कळाला नाही.

पण भारताबरोबर मैत्री करायची असेल तर पाकिस्तानला फुकटेपणाची संवय सोडावी लागेल

?????

तुमचे हा मुद्दादेखील काही उमजला नाही.

अभिज्ञ.

सुधीर काळे's picture

23 May 2011 - 2:42 pm | सुधीर काळे

त्याचा संबंध नक्कीच आहे! फुकाची मदत घेत राहिल्यास त्या देशाचे मिंधेपण येते मग इतर कुठल्याही देशाशी मैत्री कशी होईल?
पण हे माझ्या हयातीत होईल असे मला वाटत नाहीं. पण निदर्शनास आणण्याजोगा एक वेगळा विचारप्रवाह मात्र दिसला म्हणून लिहिले. मागे 'नवहिंद टाइम्स'मध्येही मी "छोटे उस्ताद" या कार्यक्रमाला पाठिंबा देताना मी म्हटले होते कीं हा जो आजचा विखार लोकांच्या मनात आहे तो या पिढीत जाईल कीं नाहीं कुणास ठाऊक. पण जी कोवळी पाकिस्तानी मुले इथे अशा कार्यक्रमात भाग घ्यायला येत होती त्यांना जर इथल्या वास्तव्यात कळले कीं आपल्याला सांगितले गेले होते तसे भारतात नाहीं. मग मोठेपणी हीच मुले एका नव्या मानसिकतेचा एक nucleus होऊ शकतील.
शरीफ यांचे म्हणणे किती पाकिस्तान्यांना पटेल देव जाणे पण जसे आताच मदनबाण-जींनी उल्लेखलेली नाविक तळावरचा अतिरेक्यांचा हल्ला व असेच इतर हल्ले किती दिवस जनता सहन करील?
याच भाषणात शरीफ पुढे म्हणाले होते कीं ते राज्यावर असतांना पाकिस्तानी लष्कराची शक्ती पूर्ण खच्ची करता आली नाहीं हेच त्यांचे दु:ख आहे! हे खरेच आहे कारण पाक लष्कर मुलकी राजकारण्यांना राज्य करूच देत नाहीं! मग अशी प्रगती कूर्मगतीनेच होणार!
ज्यांनी माझी न्यूक्लियर डिसेप्शन मालिका वाचली आहे त्यांना आठवेल कीं नवाज शरीफ हे पहिल्यांदा लष्कराचेच समर्थन घेऊन IJI या पक्षातर्फे निवडणूक लढले होते पण त्यावेळी बेनझीरबाई निवडून आल्या. बेनझीरबाईंना लष्कराने कसे खेळविले तोही भाग या पुस्तकात आलेला आहे. ज्यांना रस आहे त्यांनी जरूर वाचावा.
या वर्षी देवाच्या दयेने मुलकी सरकार सत्तेवर आले पण ते इतके फालतू आहे कीं सारा पाकिस्तान महापुराने धुतला जात असताना जरदारी इंग्लंड-फ्रान्सला भेट द्यायला गेले. गिलानीही असेच कुठे तरी भटकत होते. मग काय आदर असणार अशांच्या बाबतीत?
सध्याची पाकिस्तानी वृत्तपत्रे वाचणार्‍यांच्या लक्षात येईल कीं एक नवी मानसिक घडण तिथे बनत आहे. मला तरी असे वाटले.

विजुभाऊ's picture

23 May 2011 - 12:16 pm | विजुभाऊ

काळेकाका पाकिस्तानच्या लश्कराला बंगला देशाचा पराभव इतका जिव्हारी लागलेला आहे की त्याना स्वप्ने देखील त्या घटनेचीच पडतात.
पाकिस्तानी लश्कर त्या गंडातून ज्या वेळेस बाहेर येईल तो दिवस सुदीन.
पाकिस्तान सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीत एकतर खंबीर लश्कर किंवा प्रचंड सार्वभौम लोकमताचा पाठींबा असणारा खंबीर नेताच त्या देशाला एकत्र ठेवू शकेल. सध्यातरी असा नेता पकिस्तानात अस्तित्वात नाही. इम्रान खान आहे पण त्याला दक्षीण पाकिस्तानात स्थान नाही.
नवाज शरीफ त्यामानाचे सौम्य आहेत. त्याना जनतेचा सार्वभौम पाठिंबा मिळाला तर काही तरी आशादायक घडू शकेल.

तिमा's picture

23 May 2011 - 8:08 pm | तिमा

याच नवाज शरीफ यांनी त्यांच्या काळात अल कायदाशी संबंध ठेवले होते असे नुकतेच कुठेतरी वाचल्याचे स्मरते.
पाकिस्तानची व भारताची मैत्री ही कधीही होऊ शकणार नाही. द्वेषाने पेटलेला खलनायक फक्त हिंदी सिनेमात उपरती होऊन नायकाचे पाय धरतो. वास्तवात नाही.

आत्मशून्य's picture

23 May 2011 - 11:32 pm | आत्मशून्य

फाजील आशावाद सदोदीत बाळगण्यासाठी कारणे हूडकणारा...

माझीही शॅम्पेन's picture

24 May 2011 - 12:57 am | माझीही शॅम्पेन

लेखात सपूर्णपणे एकांगी भाबडा आशावाद दिसतोय जो कधीही अस्तिवात येऊ शकत नाही. सध्या पाकिस्तान लष्कर , आय-एस-आय आणि कट्टरवाड्यांच्य़ा तावडित सापडला आहे. दोनचार वा दोन-चारशे लोकांनी वृत्तपत्रात प्रतिक्रिया देऊन काहीही बदलणार नाही.
शब्द आणि कृती ह्या मधला फरक न समजण्या एवढे मूर्ख राष्ट्र आपण नाही आहोत. भारताने सतत आपली युध्ध सज्जता ठेवली पाहिजे तसेच वेळ-प्रसंग पडल्यास पाकिस्तान वर हल्ला करून त्याचे आण्विक तळ उध्धवस्त करण्याच लक्ष नेहमी समोर ठेवल पाहिजे. ज्या प्रकारे कराचिवर मूल-तत्ववाद्यने / अतिरेक्यानी हल्ला केला तसा आण्विक तळांवरही होऊ शकतो.

सतत पाकिस्तानकडे डोळे लावून बसलेल्या तथा-कथित विचारवांतांना हे नक्कीच कळेल तो सू-दिन !

विकास's picture

24 May 2011 - 1:49 am | विकास

भारतच आपला खराखुरा आणि सर्वोत्तम मित्र आहे हे पाकिस्तानी लोकांना ते पटवून देऊ शकतील अशी आशा सर्व भारतीयांच्या मनात आहे.

हे जर खरे असले तर मी निराशावादी भारतीय आहे. :-) बाकी विळा-आवळ्याची मोट बांधणे दुरापास्त आहे असे वाटते.

पुढे त्यांना विचारता ज. मुशर्रफ यांनी केलेल्या "कारगिल" मोहिमेच्या फाजील दुस्साहसाने ही मैत्री रुळावरून जवळ-जवळ खाली उतरलीच होती. पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली.

मुशर्रफ हे कार्गिलच्या वेळेस शरीफच्या हाताखाली काम करत होते. कितीही म्हणले तरी केवळ मुशर्रफकडे बोट दाखवून शरीफना जबाबदारी झटकता येणार नाही.

लाहोरला वाजपेयींच्या स्वागताला न आलेल्यात सर्वात नजरेत भरणारी अनुपस्थित व्यक्ती होती पाठीत वार करू पहाणारे मुशर्रफ हीच!

A KNOWN ENEMY IS ALWAYS BETTER. मी काही मुशर्रफचा चाहता नाही, पण किमान त्यांनी आपल्या भावना लपवल्या नव्हत्या. शरीफ यांनी आधी भारताचा विश्वासघात केला. नंतर जेंव्हा लक्षात आले की सगळे महागात पडेल तेंव्हा क्लिंटन व्हाईटहाऊस मध्ये जाऊन अमेरीकेशी करार करत "शांतीला एक संधी देतो" असे म्हणत मुकाट्याने माघार घेतली. अर्थात पाकीस्तानी नागरीकांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांचा आणी त्यांच्या देशाचा देखील विश्वासघात केला. असला माणूस परत कधी टोपी पलटेल हे सांगता येईल असे वाटते का? शिवाय शरीफ म्हणजे काय गांधीजी आहेत का जयप्रकाश, ज्यांचे, प्रत्यक्ष सत्तेत नसताना देखील जनता ऐकत होती, म्हणून त्यांच्या एका विधानाला भाव द्यावा?

पुढे त्यांच्याबरोबर उगीचच समेटाची बोलणी करण्यासाठी त्यांनाच आग्रा शिखर परिषदेसाठी बोलावून त्यांना अस्थानी प्रतिष्ठा देऊन, त्याच्या CEO या बिरुदावलीचे राष्ट्राध्यक्ष (President) मध्ये रूपांतर करायची संधी देऊन वाजपेयींनी एक घोडचूकच केली होती!

सहमत. फक्त त्यावेळेस आपल्या माध्यमांनी (येण्याआधीपासूनच) मुशार्रफला डार्लींग केले होते, हे विसरता कामा नये. वाजपेयींच्या राजकीय सल्लागारांना (आणि पर्यायाने सरकारला) याचे नकळत प्रेशर आले असले तरी आश्चर्य नाही. अर्थात ते योग्यही नाही आणि तसे वाटून मुशर्रफना (आपण उजवे असलो तरी) मुशर्रफशी करार करत आहोते असे दाखवण्याचा प्रयत्न करणे, यात नेतॄत्वही दिसत नाही. मात्र नंतर रात्रीच्या अंधारात चालू पड म्हणत जायला लावून केलेली चूक काही अंशी दूर केली असे वाटते.

अमित देवधर's picture

24 May 2011 - 2:20 am | अमित देवधर

नमस्कार.

लेख वाचला. नवाज शरीफ यांच्या विधानाचा व संबंधित गोष्टींचा चांगला आढावा घेतला आहे. भारत-पाकिस्तान मधील संबंध हा एक नेहमीचा चर्चेचा विषय आहे, आणि पेपरातही या विषयाला (भारत-पाक सुधारते / 'खेळकर' / सामाजिक मैत्रीचे संबंध) धरून लेख येत असतात. या संबंधांबद्दल काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, असं दिसतं (ज्या लक्षात घेतल्या जात नाहीत.).

१. लेखात म्हटल्याप्रमाणे, शरीफ यांचं यावेळी असं बोलणं, मुत्सद्दीपणाचं आणि धीटपणाचंही आहे. खरा धर्मनिरपेक्ष असा विचार त्यांनी मांडला आहे. पण त्यावरून, ते पाक जनतेला हा विचार पटवून देतील, आणि मग भारत - पाक मैत्री होईल; इतकी लांबची आशा धरणं आणि तो एक भारत-पाक च्या 'सध्या'च्या राजकीय संवादातला एक महत्त्वाचा मुद्दा मानणं हे कितपत संयुक्तिक आहे? ( हे संयुक्तिक नाही.) हे म्हणजे कधीतरी हे देवदयेने जग सुखी होइलच, त्यात आपणही होऊच की, असं म्हणून आराम करण्याजोगं आहे.

२. वर शरीफ यांनी मांडलेल्या विचाराला पाठिंबा देणारे फार कमी लोक पाकिस्तानात आहेत, व त्यांची ताकद, तिथल्या धर्मांध जनमतापेक्षा बलवान होईल अशी शक्यता नजीकच्या भविष्यकाळात नाही. (तालिबान, तिथलं लष्कर, पाकिस्तानची आर्थिक अवस्था व परावलंबित्व बघता.) एक आणखी गोष्ट लेखांमध्ये अप्रत्यक्षपणे मांडली जाते, की स्थानिक पाक लोक आपल्यासारखेच आहेत (उदा. साधे, सहिष्णू, भारतीयांशी सुद्धा मित्रत्वाने वागणारे इ.) आणि त्याचं उपप्रमेय निघतं, की जे वाईट शासन आहे ते फक्त लष्कर, आय एस आय, तालिबान, मुल्ला इ. नी लादलेलं आहे. हाच मुद्दा बरेचदा लेखाचं मूळ असतो. पण पाकिस्तानात खरंच कोणी जाऊन या दॄष्टीने निरीक्षण केलं आहे का (सर्व ठिकाणी, उदा. श्रीमंत वस्त्या, गरीब वस्त्या, पहाडी भाग, खेडी, शहरं, मध्यमवर्ग (असल्यास), पाकव्याप्त काश्मीर या सर्व ठिकाणी)? असल्यास सांगावे. ते निरीक्षण खरं मानता येईल. पण लष्कर, आय एस आय, मुल्ला इ. ना कोणाही जनतेचा पाठिंबा नाही असं तर्कशुद्ध विचाराने म्हणता येत नाही, सध्यातरी.

३. लेखात मांडल्याप्रमाणे भारत हा सगळ्यात चांगला मित्र होईल, ही गोष्ट खरीच आहे. पण समाज हा सर्वसाधारणपणे तर्कशुद्ध बुद्धीने चालत नसून मानसिक इच्छेला अनुसरून चालतो. ती समाजाची मानसिक इच्छा जितकी तर्कशुद्ध तत्वज्ञानावर आधारित असते, तितकं त्याचं वागणं तर्कशुद्ध असतं. त्यासाठीच धर्म, राजकारण यांचं अस्तित्व आहे. नाहीतर तर्कशुद्ध विचाराने चालणार्‍या व्यक्ती / समाजाला यांची गरजच काय? निव्वळ गर्दीच्या मॅनेजमेंटसाठी या गोष्टींचं अस्तित्व नाहीये.
विचार तर्कशुद्ध असणं आणि तो लोकांना पटणं यात बराच फरक आहे. विचार हा कागदावर असतो. पाकिस्तानी लोकांना तो पटण्यात बाकीच्या गोष्टी येतात. त्यात, पाकमधलं भारतविरोधी असलेलं जनमत, धर्मांध जनमत, तालिबानचा व इतर भारतविरोधी सामाजिक, राजकीय शक्तींचा विरोध, तिथला लोकशिक्षणाचा मंद वेग, ढासळलेली आर्थिक परिस्थिती, सतत हिंसेमुळे असलेली भीतीची भावना या व इतर अनेक गोष्टी येतात. या परिस्थितीत शरीफांचा भारतानुकूल विचार तोही राजकीय व धार्मिक कट्टर भूमिकेविरोधात (काफरांचा देश: ही तालिबानची अधिकॄत भूमिका आहे; भारत, अमेरिका, इस्राइल, रशिया, इंग्लंड, आणखी एक देश याविरोधात त्यांचं धर्मयुद्ध आहे. संदर्भः लादेनच्या हत्येच्या दिवसाचा सकाळ / मटा.) जोमाने पसरायची शक्यता किती आहे? अर्थात फार कमी. जर एवढ्या नाजूक धाग्यावर आपण आपली विचारांच्या धोरणाची मोट बांधणार असलो, तर ते चूक नाही काय?

४. भारतात तरी या विचाराला १००% पाठिंबा मिळेल का? शहरातली काही जनता व खेड्यातली नाममात्र जनता सोडून कोणी पाठिंबा देईल असं वाटत नाही. मुख्य कारणं असं, की भारत पाक वादाचं मूळ नुसत्या भांडवलशाही / जमिनीच्या वादात नाही; हे धार्मिक संघर्षात आहे, जो लोकांच्या अनुभवात ५००-६०० वर्षं आहे; आणि त्याचं आता स्मरणात नाही तर रागाच्या भावनेत रुपांतर झालेलं आहे. (आठवा: गोध्र्याला हिंदूना जाळणं, आणि मग मुस्लिमांबरोबर दंगल किंवा १९९३ चे स्फोट व दंगल.) दुसरं असं १९४७ पासून पाकबरोबरच्या कारवायांत जी जीवितहानी झाली आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूतीने विचार करणारे व इतर पीडित (उदा. काश्मिरी पंडित) त्यांच्या दु:खाला शांतता देण्यासाठी तेवढ्याच भक्क्म राष्ट्रीय हिताचा पर्याय असणं गरजेचं आहे, ते या अशा मैत्रीच्या पर्यायात आहे असं दिसत नाही. (त्यांना शांतता मिळत नाही, तोपर्यंत या मैत्रीबद्दल भारतातही असंतोष राहणारच हे निश्चित.)

५. हा पर्याय सध्या अंमलबजावणीसाठी तर्कशुद्ध किती आहे, हेही बघणं गरजेचं आहे. पाकिस्तानने भारताबरोबर चांगले संबध राखले, की भारत सुरक्षित होणार आहे का? नाही. कारण, तालिबानला अमेरिका शोधत असून पाकिस्तान लपवून ठेवतो, तर त्यापुढे भारताची अवस्था येत्या काही वर्षांत किती सामर्थ्यशाली होणार आहे, की पाकिस्तान दहशतवादाला शून्य पाठिंबा देइल? त्यामुळे तालिबान कारवाया चालूच राहणार. चीन पाकिस्तानचा मांडलिक नाही :), त्यामुळे त्याचा त्रास राहणारच. बांग्लादेशचा त्रास कमी होईल असं निश्चित नाही. नेपाळमध्ये माओवाद्यांचाच प्रभाव, त्यामुळे तो त्रास कमी होणार नाही. काश्मीर प्रश्न भारताचं (राजकीय / भूगोलीय) नुकसान न होता सुटेल का? ते सांगता येत नाही. दुसर्‍या बाजूने पाकिस्तान एखादं भरभक्कम राष्ट्र आहे का? की ज्याच्याशी मैत्री झाली की, या इतर प्रश्नांचा त्रास कमी होईल? तीही शक्यता नाही. मग जर या मैत्रीने कसलाच राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रश्न सुटणार नसेल, तर उपयोग काय?
शांततेसाठी शांतता हा त्याचा उपयोग मारून मुटकून दाखवता येइल, पण देशात होणारी दहशतवादाची घुसखोरी थांबणार नसल्यामुळे ती शांतता खरी नाहीच. तसं करणं म्हणजे, साप येऊन चावतोय, पण अहिंसा पाळण्यासाठी त्याला मारायचा नाही असं म्हणणं होईल. तसंही म्हणायला हरकत नाही, पण ते संन्याशाने वैयक्तिक पातळीवर म्हणावं त्यामुळे त्याचं आध्यात्मिक कल्याण तरी होईल. पण जिथे कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा/ सुखाचा प्रश्न आहे, तिथे ही भूमिका अयोग्य आहे.

६. चांगल्या विचाराला पाठिंबा देणं गरजेचं आहे हे बरोबर आहे. पण व्यवहारात, ज्यावर देशाची भूमिका ही असायला हवी असा लोक विचार करणार आहेत; अशा ठिकाणी अशी तर्कशुद्ध नसलेली भूमिका मांडणं योग्य नाही. कारण, हळूहळू लोकविचारांवर जनमत बनत जातं, त्यावर राजकीय भूमिका घेतल्या जातात. त्यावर देशाची धोरणं बदलतात (आठवा: काँग्रेसची राष्ट्रीय प्रश्नांबद्दल उदा. काश्मीर, अफजल गुरू इ.; बोटचेपी भूमिका, का? कारण त्यांना वोटबँका दुखवायच्या नाहीत. मुस्लिमबहूल मतदारसंघात काँग्रेसच निवडून येते, ही काही काँग्रेसची लोककल्याणकारी लोकप्रियता नाही. भाजपही त्याचप्रमाणे.)
पाकबद्दल शत्रुत्वाची भूमिका घ्यावी असं नाही; पण त्याचे फाजील लाड करणं, आणि देशाच्या हिताचा विचार न करता भूमिका घेणं, हे टाळणं गरजेचं आहे.

विसोबा खेचर's picture

24 May 2011 - 10:35 am | विसोबा खेचर

दाउद इब्राहिमसह भारतात दहशतवाद माजवणार्‍या अतिरेक्यंना पाकने थारा दिला आहे. पाक जोपर्यंत ते सर्व अतिरेकी भारताच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत पाकड्यांशी मैत्री अशक्य आहे..

तात्या.

सर्व नवीन प्रतिसाद वाचले. आजपर्यंत माझे स्वतःचे लेखनही अशाच विचारांचे होते व त्यात मूलभूत बदल नवाज शरीफसारख्या नेत्याच्या एकाद्या भाषणाने होणार नाहींय्. पण कांहीं गोष्टी लक्षणीय आहेत.
'मिपा'करांना माहीत आहेच कीं मी बरीच पाकिस्तानी वृत्तपत्रे गेली बरीच वर्षे वाचतोय्, पण त्यांतील संपादकीयांचा, स्तंभलेखकांच्या लेखनाचा व मुख्य म्हणजे वाचकांच्या पत्रव्यवहाराचा आढावा घेतल्यास असे वाटते कीं पाकिस्तान या क्षणी अगदी मुळापासून हादरलेला असून आपले कुठे तरी चुकले आहे असाच सूर वाचायला मिळतो. उदा. हा दुवा:
http://tribune.com.pk/story/174406/the-threat-lies-within-not-across-our...
पाकिस्तान्यांच्या मनातली ही भावना तात्पुरतीसुद्धा असेल पण सध्यातरी ती स्पष्ट दिसते आहे. म्हणून मी वरील लेख लिहिला. भविष्याच्या पोटात काय आहे कुणी सांगावे?

विकास's picture

24 May 2011 - 8:04 pm | विकास

पाकिस्तान या क्षणी अगदी मुळापासून हादरलेला असून आपले कुठे तरी चुकले आहे असाच सूर वाचायला मिळतो. उदा. हा दुवा: http://tribune.com.pk/story/174406/the-threat-lies-within-not-across-our...

पाकीस्तानमधील ट्रिब्यून हा इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युनशी संलग्न आहे. त्यामुळे थोडेफार तसे आले, आणि ते देखील पितळ उघडे पडल्यावर, तर नवल नाही. त्यात कालचा नाविकतळावरील हल्ला हा पाकीस्तानी तालीबानचेच काम आहे हे माहीत असल्याने भारताचा काही संबंध नाही असे म्हणणे आणि तसा (शास्त्रापुरता) विचार प्रकट करणे सोपे गेले आहे.

आता हेडली आणि तहावूर हुसैन राणा वरील खटला शिकागोत चालू झाला आहे. त्यात त्यांनी आयएसआयचा २६/११ मध्ये प्रत्यक्ष संबंध असल्याचे म्हणले आहे. त्याबद्दल आता ही पाकीस्तानी माध्यमे आणि स्तंभलेखक काय म्हणणार आहेत याबद्दल उत्सुकता आहे.

विकास-जी,
वाचकांचा पत्रव्यवहार मी बातम्यांपे़क्षा जास्त चवीने वाचतो कारण त्यात सुशिक्षित पाकिस्तान्यांचे मतप्रवाह व विचारांचा कल वाचायला मिळतात. ते वाचल्यावर मला असे वाटले कीं सध्यापुरती का होईना, पण उपरती झाल्यासारखे मला जाणवत आहे. माझ्या ’बिनलादेन’वाल्या लेखाखालचे दुवे वाचल्यास ते आपल्याही लक्षात येईल. खास करून सिरिल अल्मेडा यांचा The Emperor's Clothes जरूर वाचा! (सगळेच वाचनीय आहेत.)

हुह???
हेच मी लिहिल तर तुम्ही कडाडून विरोध केला?

सुधीर काळे's picture

26 May 2011 - 9:46 am | सुधीर काळे

प्रत्येक मत एकाद्या घटनेच्या संदर्भात पाहिले पाहिजे. तसेच सरकार, लष्कर व जनता यात गल्लत करू नये हे नी नेहमीच सांगतो. पाकिस्तानातले बदलते वारे पाहिले कीं मतपरिवर्तन अपरिहार्य आहे.
माझ्या मते ISI कधीच लष्कराच्या आज्ञेनुसार वागत नाहीं, लष्कर सरकारात असो वा मुलकी सरकारशी स्दादागिरी करत असो, ते मुलकी सरकारला भीक घालत नाहीं. या मर्यादा मी ओळखतो व म्हणूनच हूमाताईंसारख्या लेखिकेला लिहितो कीं पाकिस्तानी बुद्धिजीवी लोकांनी असे प्रयत्न केले पाहिजेत.
याचे यश माझ्या हयातीत मी पाहू शकणार नाहीं याची मला कल्पना आहे. पण तरीही छोटे उस्ताद सारख्या कार्यक्रमांना मी नेहमीच पांठिंबा देतो कारण ही छोटी मुलेच उद्या नव्या युगाचे nuclei होणार आहेत याची मला जाणीव आहे.
असो सध्या मी पुण्यात आहे व नेटची सोय कधी-कधी आहे. म्हणून २ जूननंतरच मी नेहमीसारखा इथे 'पडीक' असेन!

पण तरीही छोटे उस्ताद सारख्या कार्यक्रमांना मी नेहमीच पांठिंबा देतो कारण ही छोटी मुलेच उद्या नव्या युगाचे nuclei होणार आहेत याची मला जाणीव आहे.

+१

लष्करात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या एका वाचकाचे हे पत्रही वाचनीय आहे!
http://www.dawn.com/2011/05/23/don-quixotes-galore.html

आंसमा शख्स's picture

25 May 2011 - 11:40 am | आंसमा शख्स

भारत हा पाकिस्तानचा शत्रू नाही.
नवाज काहीही बोलले तरी इतरांनी ऐकले तर शक्य आहे ते. आय एस आयच्या कारनाम्यांनी पाकिस्तान आपल्या हाताने आपल्याच पायावर कुल्हाडी मारत आहे. माजोवर पाकिस्तानी सैन्य सरकारच्या अधिकाराखाली येत नाही तोवर काही होणार नाही. ताकद त्यांच्याकडे आहे. खुदा करो त्यांना चांगली बुद्धी मिळो. दहशतवाद हा काही इस्लाम नाही जे कळेल तेव्हाच अमन मिळेल. दुसर्‍याच्या घराला आग लाऊन आपले घर सुरक्षित राहत नसते हे त्याना कळले असेल आता. आपल्या काश्मिरची वाट लावली आता त्याचे चटके बसत आहेत त्याना.

सुधीर काळे's picture

26 May 2011 - 9:34 am | सुधीर काळे

डॉनवर ज्या निवडक स्तंभलेखकांचे/लेखिकांचे लेख मी नियमित वाचतो (कारण ते समतोल वाटतात) त्यात हाजरा मुमताज, हुमा युसुफ या लेखिका आणि इर्फान हुसेन हा लेखक हे प्रामुख्याने आहेत व त्यांचा एकादा लेख आवडला तर त्यांना मी लिहितोसुद्धा!
त्यातल्या श्रीमती हुमा यांना मी लिहिलेली मेल आणि त्यांचे उत्तर अशा दोन्ही मेल्स मी खाली दिल्या आहेत. दोन्ही वाचनीय आहेत. त्यांनाही मला वाटते तसेच वाटत आहे असे दिसते.
काळे
-------------------------------------------
From: "Huma Yusuf"
To: "K. B. Kale"
Thank you for writing. We were also pleased by Mr. Sharif's statement to boost Indo-Pak ties. I think there is a very slow (almost imperceptible) change in the mind of the establishment on these issues, and we can only hope for the best.

Best regards,

Huma Yusuf

On Tue, May 24, 2011 at 9:01 PM, K. B. Kale wrote:

Dear Ms. Huma,
I read your latest article "Over the Himalayas" and liked it very much. Really excellent!
"Balanced view" seems to be the hallmark of your writing, going by two articles of yours I have read so far.
In this article, you have brought out fickleness in the future development of Sino-Pakistani friendship very well.
In the end, I wonder whether Pakistan, now itself a budding democracy, should seek friendship with a Chinese totalitarian regime (with natural affection for Pakistani Military brass) or a genuine democracy across its Eastern border.
In this context, I really admired the courage & statesmanship of out-of-power Nawaz Sharif who urged Pakistani people to stop considering India as their biggest enemy & re-appraise Indo-Pak relations to improve growth. Thus the role of Pakistani intelligentsia like you would be crucial in changing the mindset of Pakistani people.
I have written a letter to Jakarta Post on this subject & I will send you the link if it gets published. I am no journalist, I am a metallurgist in charge of a steel plant here in Jakarta. I will be in DC area (north Virginia) for three weeks and wonder whether we could meet.
Warm regards,
K B Kale, Jakarta

सुधीर काळे's picture

26 May 2011 - 9:52 am | सुधीर काळे

माझे आजच डॉनने प्रसिद्ध केलेले हे पत्र जरूर वाचा! (थोडी काट-छाट केलेली आहे!)
मूळ पत्र जकार्ता पोस्ट्ने प्रसिद्ध केले तर त्याचाही दुवा देईन.
http://www.dawn.com/2011/05/26/nawaz-sharifs-views.html

सुधीर काळे's picture

31 May 2011 - 9:43 am | सुधीर काळे

कृपया ही दोन्ही पत्रे वाचा:
पहिले माझे आहे. खास करून पत्राखालील प्रतिसाद वाचा. कांहीं पाकिस्तान्यांचे आहेत.
http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have...
हे माझ्या पत्राला आलेले एका जकार्तास्थित पाकिस्तानी वाचकाचे उत्तर आहे. तेही वाचा.
http://www.thejakartapost.com/news/2011/05/31/letter-india-pakistan-shou...