लेखांचा खीमा-पाव
साहीत्य :
१) मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, इत्यादि....('तात्यासाहेब', 'बळवंतराव' भीमराव, 'भाईकाका, इ.) अशा माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे.
२) ज्या दुकानदाराकडून हा लेख आणलेला आहे त्याचा मेंदू. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या दुकानदाराला मेंद/अक्कलू नाही या वर आपला ठाम विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे. पण आपण आणलेला मेंदू निघाला तर मग काय, मज्जाच मजा....
हा भाग आणताना तो नीट निवडून आणावा. त्यात भावना, विचार, कळकळ असले दगड असता कामा नयेत. मेंदू कसा असावा ......या मेंदूचा व लेखाचा खिमा ठो़ऊन आणावा. लेखाच्या व मेंदूच्या कशा ठिकर्या उडाल्या पाहिजेत ! शक्य झाल्यास ठोकणार्यास बाजूला सारून आपण स्वतःच ठोकावा. कदाचित त्याला कींव येऊन तो हळू ठोकेल. तशा खीम्याचा काय उपयोग ? शक्यतो जिवंत दुकानदाराचा मेंदू ठोकता आला तर फारच बरं ( हालाल !) हे करताना बरेच मित्र गोळा करावेत व त्या प्रसंगाचा आनंद घ्यावा. म्हणजे जेवताना याची आठवण करून करून डोळ्यात पाणी येईल.
३) जहाल शब्द, मसालेदार शब्द, व अजब तर्कशास्त्र. या खड्या मसाल्यांनी पदार्थ अधिक रुचकर बनतो. याच्यातला तिसरा मसाला फार महत्वाचा आहे आणि तो गुपचूप वापरायचा आहे. म्हणजे दुसर्याला वापरता येणार नाही व आपल्यालाच सारख्या ऑर्डर मिळत राहतील.
४) झिणझिण्या : हा एक वेगळा मसाला आहे. हा भारत देश सोडून सर्व देशात मिळतो. हा मसाला टाकला की पदार्थ खाताच खाणार्याच्या डोक्याला मुंग्या येतात व त्याचा तोल सुटतो. असे झाल्यास आपल्या रेसिपीला पहिले बक्षिस निश्चित मिळणार हे गृहीत धरावे.
५) लूप : हा एक तुपासारखा पदार्थ आहे. संगणक क्षेत्रात काम करणार्यांना याचा उपयोग चांगलाच माहीत असणार. हा तळण्यासाठी वापरला की तळणे ही प्रक्रीया थांबतच नाही. तळत रहा.. तळत रहा... अर्थात हे आपण टाकले नाही तरी चालेल . कारण हा या पदार्थाचाच एक बाय प्रॉडक्ट आहे आणि तो मुळ पदार्थात मिसळत राहतो...
६) नकारात्मकता: अत्यंत महत्वाचा मसाला. प्रत्येक वस्तूकडे नकारात्मक डृष्टीने बघता यायला पाहिजे. पण याची काळजी करू नका. आपण हा पदार्थ करायला घेतलाय म्हणजे ही आपल्याकडे भरपूर असणार.
७) व्याकरण : पदार्थ बिघडायला लागल्यास आपल्या मदतीस येणारा मसाला. याचा साठा भरपूर ठेवा. हा आपल्याला कायम लागणारच आहे.
उपकरणे :
१) एक किसणी. तुम्हाला वाटेल की याला कसलीही किसणी चालेल. पण नाही. ही काही विशिष्ट दुकानातच मिळते. याला दोन्हीकडून धार असते. याचा फायदा असा की लेख कसाही किसला तरी त्याचा कीसच पडतो. बर नुसते एवढेच नाही. याला काही मोठी भोके, काही मध्यम तर काही केसाच्या अग्राएवढी सुक्ष्म असतात. आणि या भोकांचा वापर हा क्रमाने करायचा असतो. याच्या प्रशिक्षणाची सोय काही तज्ञांकडे उपलब्ध आहे. पण थोडक्यात सांगणे झाल्यास ज्यांना या पदार्थाची रुची वाढवण्यात रस आहे त्यांनी पाळीपाळीने ही किसणी हाती घेऊन वेगवेगळ्या भोकातून हा लेख किसावा. किसताना खाली काय पडते आहे ते आजिबात बघू नये. किसत रहावे. थांबावे कधी ? याचे उत्तर फारच सोपे आहे. अशाच पदार्थाची दुसरी ऑर्डर मिळाली की किसणे थांबवावे. याने हातालाही चांगला व्यायाम होतो व मेंदूलाही आराम मिळतो. आता तुम्ही विचाराल की दुसरी ऑर्डर नाही मिळाली तर काय ? तसे झाल्यास खाणारे उठून गेले की थांबावे. व शेवटी आपण करणारेच राहीलो की हा पदार्थ ओरपून खावा. असा उरलेला पदार्थ खाण्यास फारच रुचकर लागतो व बर्याच दिवस पुरतो.
२) असंख्य शब्दकोष. ( मोठे भांडे व चाळणी) याचा उपयोग फारच होतो. प्रमूख साहित्यातील प्रत्येक कण या चाळणीत चाळून घ्यावा. शक्यतो इतक्यावेळा चाळावा की त्याचा भूगा झाला पाहिजे. अर्थात यात सर्व भाषेचे शब्दकोष लागतील. कधी कुठला लागेल याचा नेम नाही.
३) सगळ्या साहित्याचे तुकडे, भुगा, पीठ, मैदा करता येईल अशी सगळी उपकरणे. आपल्याकडे नसतील तर ही भाड्यानेही मिळतात.
कृती :
फारच सोपी. सगळे गोळा केलेले साहित्य आपल्या समोर दिसले की आपल्याला पुढची कृती आपोआप फुरफरायला लागेल. आपला आनंद द्विगुणीत, त्रिगुणीत होत जाईल...
पाव विकत आणावा. तूप (लूप) फार मोठे असल्यास हा पदार्थ नासण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी शेवटी तो प्लेटमधून खरडीत ट्रान्सफर करावा व उर्वरीत काळात त्याचा आनंद घेत बसावे.
तयार झालेल्या अशा पदार्थावर आपल्या अगाध ज्ञानाचा चुरा भुरभुरावा व मिपाच्या साईटवर ठेवून सर्व्ह करावा. असे केले तर हा पदार्थ दिसण्यास व खाण्यास अधिक रुचकर लागतो.
आमच्या कॅमेर्यात या पदार्थाची ( न मावल्यामुळे) प्रतीमा घेता आली नाही म्हणून छायाचित्र टाकता आले नाही त्याबद्दल क्षमस्व.
हलके घेणे हे वेगळ्याने सांगायला नको. :-)
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
5 May 2011 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा... सूक्ष्मनिरीक्षण का काय म्हणतात ते हेच का? :P
5 May 2011 - 11:06 am | प्यारे१
ज कु.
फारच छान पाकृ.
बाकी 'पेरणा' कुट्ल्या 'बार'मदून उचालली त्येबी ल्हिवा की.
5 May 2011 - 11:08 am | विसोबा खेचर
मस्त.. :)
5 May 2011 - 12:16 pm | सामान्य वाचक
आपल्या अगाध ज्ञानाचा चुरा भुरभुरावा व मिपाच्या साईटवर ठेवून सर्व्ह करावा : मस्त
5 May 2011 - 11:04 pm | अविनाशकुलकर्णी
पचायला कठिण ..पदार्थ..
5 May 2011 - 11:39 pm | प्राजु
हाहाहा!!!
पदार्थ फारच चविष्ट झालाय हा. :)
एक फाऊल आहे.. हीच पाककृती अंडे घालून कशी करता येईल हे टार्या विचारेल तेव्हा 'टीप ' किंवा 'विशेष सूचना' असे लिहून त्याबद्दलही लिहावे. :)
5 May 2011 - 11:59 pm | आनंदयात्री
काही यशस्वी आचार्यांची प्रतिक्रिया वाचायला उत्सुक आहे.
-
(शाकाहारी)
आंद्या
15 Oct 2014 - 8:47 pm | जयंत कुलकर्णी
हा माझा एक जुना लेख आठवला..........
15 Oct 2014 - 8:54 pm | प्यारे१
तुम्ही खोदकाम करु नका हो.
फक्त नथ उतरवा लेखणीतून सध्या. लौकर. ;)
15 Oct 2014 - 8:55 pm | जयंत कुलकर्णी
कंटाळा आला आहे आता....लिहायचा...
15 Oct 2014 - 9:00 pm | प्यारे१
लाहौलविलाकुवत...
दुनिया इंतजार कर रही है और आप है के थक गये.
ये काम आपको करना ही पडेगा. बिनाथके, बिनारुके.
परवरदिगार आपको हौसले बुलंद रक्खे.
15 Oct 2014 - 8:50 pm | पैसा
जबरदस्त पाकृ!
15 Oct 2014 - 9:02 pm | सुहास..
ही किसणी हाती घेऊन वेगवेगळ्या भोकातून हा लेख किसावा. >>>
हा हा हा हा !
काय जयंतदा ! आँ ! आँ !! ;)