पुण्यातील आद्य मिसळ अड्ड्यास १०० वर्षे पुर्ण होत आहेत. रवीवार पेठेतील रेल्वे बुकिंग ऑफीस शेजरी असलेले "वैद्य उपहार गृह" हे ते ठिकाण. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे.
या निमीत्त सकाळ मधे एक लेख आला आहे. तो पुढील प्रमाणे
पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'
पुण्याची वैशिष्ट्ये अनेक. पुणेरीपण जपणारी. पुणेरी मिसळ त्याच परंपरेतली. पुणेरी मिसळ म्हटले, की हमखास तोंडावर येते वैद्यांची मिसळ. रविवार पेठेतील खास पुणेरी मिसळीसाठी प्रसिद्ध असलेले वैद्य उपाहारगृह येत्या सोमवारी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी 99 वर्षे पूर्ण करून "सेंच्युरी' मारण्याच्या तयारीत आहे.
शंभर वर्षांपूर्वी रघुनाथ वैद्य हे कोकणातल्या उसगावमध्ये भिक्षुकी करणारे गृहस्थ पुण्यात शिवाजी रस्त्यावर तेव्हा असलेल्या जोगळेकर वाड्यात वास्तव्याला आले. उपाहारगृहांची चलती नव्हती, त्या काळात जोगळेकर एक उपाहारगृह चालवत असत. ते पाहून रघुनाथरावांनीही स्वतःचे हॉटेल थाटायचे ठरवले आणि सरदार फडक्यांच्या वाड्यात जागा घेऊन 1912च्या हनुमान जयंतीला उपाहारगृह सुरू केले.
काही वेगळ्या प्रकारचा पदार्थ द्यावा म्हणून रघुनाथरावांनी आपल्या उपाहारगृहात वैशिष्ट्यपूर्ण मिसळ बनवायला सुरवात केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव त्रिंबक वैद्य यांनी उपाहारगृहाची धुरा खांद्यावर घेतली ती थेट 1988 पर्यंत. सुरवातीची काही वर्षे उपाहारगृह पुणेरीपणाला छेद देत पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत सुरू असे. साठच्या दशकात काही घरगुती अडचणींमुळे त्रिंबकरावांच्या पत्नी सुशीलाबाईंना उपाहारगृहाची जबाबदारी हाती घ्यावी लागली. त्या घरचे काम सांभाळून उपाहारगृह चालवत. साहजिकच दुकानाच्या वेळा बदलल्या. आजही त्याच कायम आहेत.
संगणक क्षेत्रात काम करणारे दीपक जोशी हे त्रिंबकरावांचे नातू आज हे उपाहारगृह चालवतात. एक ऐतिहासिक ठेवा जपायचा म्हणून हा खटाटोप असल्याचे ते सांगतात. सुरवातीला दोन आण्यांना मिळणारी इथली मिसळ आज 25 रुपयांपर्यंत जाऊन पोचली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपायचा म्हणूनच दीपक जोशींनी "विस्तार नाही, शाखा नाही, वेळा त्याच (दुपारी बंद राहणारच) आणि चवही तीच' ही परंपरा आजही सुरू ठेवली आहे.
खास वैद्य उपाहारगृह परंपरा
- मिसळीत लाल तिखट नाही, आल्याचा मुक्त हस्ताने वापर
- सर्व कामगार कोकणचे असल्याने होळी ते रामनवमी उपाहारगृह बंद राहणारच (1912 पासूनची परंपरा)
- सगळा माल रोजच्या रोज बनणार आणि खपणारही
- दुकानात आजही वडील-मुलगा, भाऊ-भाऊ असे एकाच कुटुंबातले सदस्य कामगार
- राजा रविवर्म्यांची चित्रे, देवादिकांची चित्रे यांनी सजलेल्या भिंती (1928 मधील दत्ताची तसबीर अजूनही खांबावर)
- तीच जुनी ओतीव लोखंडाची टेबले आणि जुन्या बसक्या खुर्च्या
आपण सगळे जण मराठी माणुस, त्याची व्यवसाय कौशल्ये, स्वभाव इत्यादी बद्दल नेहमीच बोलत तसेच लिहीत असतो. नुकताच मिपावर एका कौलावर अशीच चर्चा चालू आहे.
मराठी माणूस चिकाटीने १०० वर्षे हा व्यवसाय करत असेल तर नक्कीच कौतुकास्पद आहे. त्या निमीत्त "वैद्य उपहार गृह" येथे एक मिसळ कट्टा करायवयास हरकत नसावी. दिवस, वेळ या बद्दल चर्चा करून ठरवावे असे वाटते.
(
प्रतिक्रिया
16 Apr 2011 - 9:06 am | प्रचेतस
कधी जायचे बोला.
आपण तयारच आहोत.
16 Apr 2011 - 9:14 am | चिंतामणी
उद्याचा रवीवार शक्य नाही (सरुटॉबानेचा कट्टा आज आहे ना. उद्या भूक लागली पाहीजे ना ;))
यादी बनवायला वल्लींनी सुरवात केली आहे. उत्सुक मिसळ भोक्त्यांनी नावे नोंदवावीत.
16 Apr 2011 - 10:47 am | प्रचेतस
सरुटॉबानेचा कट्टा आज नाही हो. उद्याच आहे. पण तरीही कारण तेच. आज मिसळ खाल्ली तर उद्या भूक लागली पाहीजे ना ;)
२४ एप्रिल किंवा १ मे ठरवून टाकू.
16 Apr 2011 - 9:22 am | ५० फक्त
मी दुसरा, फोन करा जेवण झालं असलं तरी वारजेपासुन चालत येईन.
16 Apr 2011 - 9:44 am | प्रदीप
९९ वर्षे चालवलेल्या उपक्रमास मनापासून अभिवादन.
आता हे थोडे कीस काढणे होईल, तरीही-- हे शतक नव्हे. शतक २०१२ साली होईल. आणि ते तसे नक्की व्हावे ह्यासाठी सदर आस्थापनास शुभेच्छा!
जाता जाता, तुमच्या लेखातील काही 'च' चा वापर आवडला:
* दुपारी बंद राहणारच
* ...होळी ते रामनवमी उपाहारगृह बंद राहणारच
16 Apr 2011 - 10:02 am | चिंतामणी
पण एक गोष्ट नम्रपणे आपल्या निदर्शनास आणु इच्छीतो की मी "हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे" असेच म्हणले आहे.
16 Apr 2011 - 9:54 am | शिल्पा ब
मस्त. एक ऐतिहासिक ठेवा म्हणुन जतन करण्याचा विचार स्त्युत्यच आहे. चवही तीच म्हणजे उत्तम.
(अर्थात चव बदललीये का कसं हे सांगणारे लोकं आहेत का ही एक उत्सुकता वाटुन गेली एवढंच. केवळ याच नाही तर जगात कुठेही असा दावा करणार्या हाटेलांबद्द्ल हो!! नाहीतर इथेच युद्ध सुरु व्हायचं.)
16 Apr 2011 - 10:47 am | सर्वसाक्षी
नक्की येईन. आल्याची मिसळ खाल्ली नाही. नवी मिसळ चाखायला आव्डेल.
16 Apr 2011 - 11:10 am | सुधीर१३७
नक्की येईनच.
जवळ असूनही न चाखलेली मिसळ खायला नक्कीच आवडेल. :)
16 Apr 2011 - 1:45 pm | कुक
हे मस्त आहे
मिसळ घ्या मिसळ
16 Apr 2011 - 3:22 pm | गणपा
खाने वालोंको खाने का बहाना चाहीये. :)
करा लेको अजुन एक कट्टा करा.
इनो इनो इनो द्या रे लवकर कुणी तरी.
16 Apr 2011 - 4:41 pm | सुधीर काळे
मी ३०मे रोजी पुण्यात १-२ दिवस आहे. त्यामुळे मला यावेसे वाटत असूनही जमणे कठीणच दिसतंय्.
16 Apr 2011 - 5:01 pm | चिंतामणी
का ३० एप्रील?????????
18 Apr 2011 - 2:34 pm | मराठमोळा
काय ठरतयं का नाय या कट्ट्याचं? :)
18 Apr 2011 - 2:47 pm | चिंतामणी
तारखेबद्दल एक दोन सुचना आल्या होत्या. माहिती घेउन फायनल करू १-२ दिवसात.
18 Apr 2011 - 2:52 pm | मी-सौरभ
तारीख /वार व्यनी करा...
आनी हो वैद्यांना विचारा एका वेळी किती जणांना बसू देतात (मिसळ खायलाच) ....
18 Apr 2011 - 3:04 pm | गवि
कट्ट्याची आयडिया भन्नाट. माझी उपस्थिती लावण्याचा मनापासून प्रयत्न करीन.
कोणीतरी बसण्याच्या कपॅसिटीचा मुद्दा मांडला. त्यात अॅडिशन म्हणून मी म्हणतो: "बसायला जागा असो नसो, उभ्याने तरी मिसळ मिळायला हवी. ते मिसळ (कट / तर्री) मागणीनुसार वाढीव बनवत राहतात की फक्त आणलेली /एकदा बनवून झालेली संपेपर्यंत वाढतात याची आधी खात्री करुया."
प्लीज. पुन्हा पुणे मुंबई गैरसमज / वाद नको.
पुण्यामधेच हे असे आहे असं नव्हे. एकूण सर्वच गावांत मराठी हॉटेलांमधे (विशेषत: परंपराप्रिय) असे चालतेच.
"मिसळ आहे" आणि "मिसळ संपली" अशा दोन पाट्यांवर चाललेले असते. (पाठपोट पाटी.)
त्यातही "मिसळ आहे" अशा पाटीची खरेतर गरज नाही. "संपली" इतकी पाटी बास असते.
खरंतर मिसळ संपल्यावर दुकानच बंद होत असल्याने तीही पाटी कशाला बनवतात कोण जाणे.
पुण्यात आताशा असं काही नसेल तर आनंद आहे. :)
18 Apr 2011 - 4:15 pm | तर्री
एका चांगल्या परंपरेचा ऊत्तम परिचय करून दिलात. आभार.
हे हाटेल नक्की कुठे आहे ? जवळपासची काही खूण सांगाल का ?
(कृपया माझ्यासारख्या पुण्याबाहेरील मिपामंडळी करिता )
18 Apr 2011 - 5:18 pm | चिंतामणी
रवीवार पेठ रेल्वे बुकींग ऑफीस आणि फडके हौद चौकाचे दरम्यान.
शक्य असल्यास या कट्ट्याला हजेरी लावावी ही विनंती.
18 Apr 2011 - 4:24 pm | llपुण्याचे पेशवेll
खरेतर वैद्यबुवांकडची मिसळ खास चविष्ठ कधिच नव्हती आजही नाही पण ती वेगळी नक्कीच आहे. तिखट पण जळजळीत नाही. एकदम गरमागरम अशी वेगळीच मिसळ. तसेच त्यांच्याकडचे डींकाचे लाडू देखील फार खास. सेवाही चांगली ..
त्यामुळे मिसळ खास नसली तरी वैद्य उपाहार गृह आवडते.
20 Apr 2011 - 2:47 am | विनायक बेलापुरे
खरे आहे.
उगाच ९९ वर्ष झालीत अश्या फार अपेक्षेने जाउ नका म्हणजे बरी वाटेल.
19 Apr 2011 - 9:20 pm | मन१
तुम्ही फक्त तारिख ठरवा.
मी ऑनलाइन क्वचितच असतो. त्यामुळं इथे कट्ट्याचं ठरलं तर कुणी व्य नि केला/खरड टाकली तर बरं होइल.
--मनोबा.