अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
15 Apr 2011 - 11:55 pm

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

आदरणीय अण्णा,

आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली. शेतकरी संघटनेच्या औरंगाबादला झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत या भ्रष्टाचारमुक्ती अभियानाला सक्रिय पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि सेवाग्राम येथील बापूकुटीसमोर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत लाक्षणिक उपोषण करून जनलोकपाल विधेयकाला समर्थन देण्याचे भाग्य आम्हालाही लाभले.

या विधेयकाच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातला आमआदमी लढण्यासाठी मैदानात उतरला असला तरी त्यातील किती लोकांना जनलोकपाल विधेयक कितपत कळले हे सांगणे कठीण आहे. पण भ्रष्टाचारावर इलाज व्हायलाच हवा. "काहीच न करण्यापेक्षा, काहीतरी करणे कधीही चांगले" एवढाच विचार करून आणि प्रथमच भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशभरातली एवढी आमजनता रस्त्यावर उतरायला तयार झाली असणार, हे उघड आहे.

भ्रष्टाचाराचा महाभयंकर राक्षस आटोक्यात येण्याऐवजी वणव्यासारखा पसरून दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहे. त्यात आमजनता होरपळून निघत आहे. "जगणे मुष्किल, मरणे मुष्किल" अशा दुहेरी कैचीत आमजनता सापडली आहे. या सर्व प्रकारात राजसत्ताच एकतर स्वतः: लिप्त आहे किंवा खुर्ची वाचविण्याच्या मोहापायी हतबल होऊन डोळेझाक करत आहे, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहे, हे आता जनतेला कळायला लागले आहे. त्यामुळे त्यांना संताप व्यक्त करण्यासाठी लढायला एक भक्कम आधार हवा होता; तो त्यांना तुमच्यात दिसला म्हणून आमआदमी नेहमीच्या कोंडलेल्या भिंती ओलांडून बाहेर पडला. त्यासाठी अण्णा तुमचे लक्ष-लक्ष अभिनंदन आणि कोटी-कोटी धन्यवाद!

अभियान नव्हे जनचळवळ

भ्रष्टाचार मुक्ती अभियान आता नुसते अभियान राहिले नसून एक जनचळवळ होऊ पाहत आहे. योग्य मुहूर्तावर, योग्यस्थळी या चळवळीची मुहूर्तमेढही रोवली गेली आहे. पण ही चळवळ पुढे न्यायची तर यापुढची वाटचाल नुसती सात्त्विक अथवा भावनिक असून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यासाठी तुम्हाला या लढाईसाठी त्या तोडीचे सवंगडीही शोधावे लागेल. कारण चित्रविचित्र विचारधारा जोपासणारे अनेक विचारवंत एकत्र येणे सोपे असते पण उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत एकत्र टिकणे महाकठीण असते. त्यांच्यात आपसातच फार लवकर पोळा फुटायला लागतो, हा पूर्वानुभव आहे.

अण्णा, जेव्हा तुम्हाला नगर जिल्ह्यात सुद्धा पुरेशी प्रसिद्धी मिळाली नव्हती तेव्हापासून म्हणजे १९८५-८६ पासून तुम्हाला मी ओळखतो. तुमच्या कार्यशैलीवर मी तसा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या देशातल्या सबंध गरिबीवर मात करता येईल असा काही कार्यक्रम तुम्ही हाती घ्याल, अशा आशाळभूत नजरेने मी तुमच्याकडे सदैव पाहत आलोय. पण माझी निराशाच झाली हे मी नाकारण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या कार्याचे मोल कमी आहे असे मला म्हणावयाचे नाही आणि जेव्हा देशभरातून तुमच्या कार्याचा गौरव होत असताना माझ्यासारख्या एका फ़ाटक्या माणसाने एक वेगळाच सूर काढणे हेही शोभादायक नाही. पण तुम्ही दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करून या देशातल्या लक्षावधी खेड्यांमधल्या एकाही माणसाला "दुसरा अण्णा" बनून आपल्या गावाचे "राळेगण सिंदी" करता आलेले नाही. अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर "राळेगण सिंदी" सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.

एवढे अण्णा कुठून आणायचे?

अण्णा, एकेकाळी क्रिकेटमध्ये भारतात वेगवान गोलंदाज ही दुर्मिळ गोष्ट होती, पण कपिलदेव आले आणि मग त्यांचे अनुकरण करून मोठ्या प्रमाणावर वेगवान गोलंदाज तयार व्हायला लागलेत.

ज्याला "भारतरत्न" म्हणून गौरविण्यात केंद्रसरकारने चालढकल चालविली त्या सचिन तेंडुलकरने तर फलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली आणि सचिनचे अनुकरण करून गावागावात चेंडू सीमापार तडकवणारे फलंदाज तयार झालेत.
सर्व रोगावर रामबाण इलाज म्हणून प्राणायाम आणि योगाभ्यासाचे धडे स्वामी रामदेवबाबांनी दिले आणि अल्पकाळातच जनतेने अनुकरण केले आणि देशभरात हजारो "रामदेवबाबा" तयार झालेत.

"शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण" असून "शेतमालास रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला" त्यासाठी "भीक नको घेऊ घामाचे दाम" असा मंत्र शरद जोशींनी दिला आणि पिढोन्-पिढ्या हतबलपणे जगणारा शेतकरी खडबडून जागा झाला.
शरद जोशींचे अनुकरण करूनच गावागावात लढवय्ये शेतकरी तयार झालेत.

याउलट

संपूर्ण देशातील खेड्यांची "राळेगणसिंदी" करायचे म्हटले तर त्यासाठी काही सरकारी ठोस योजना बनत नाही कारण कदाचित ती अव्यवहार्य असेल. मग सरकारी तिजोरीतून गंगाजळी आपापल्या गावापर्यंत खेचून आणायची तर प्रत्येक गावात एकेक अण्णा हजारे जन्मावा लागेल. आणि अशी कल्पना करणेसुद्धा अशास्त्रीय आणि अव्यवहार्य आहे.

अण्णा, आपला देश हा नेहमीच चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या मागे धावणारा आणि व्यक्तीपूजक राहिला आहे. त्यामुळे एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या कार्याची व्यावहारिक पातळीवर "चर्चा" करणे एकतर मूर्खपणाचे मानले जाते किंवा निषिद्धतरी मानले जाते. त्यामुळे बाबा आमटे, अभय बंग, अण्णा हजारे किंवा सिंधुताई सपकाळ ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग असली तरी यांच्या कार्यामुळे एकंदरीतच समाज रचनेवर, संस्कृतीच्या उत्क्रांतीवर, प्रशासकीय यंत्रणेवर आणि नियोजनकर्त्या निगरगट्ट राज्यकर्त्यांच्या धोरणांवर काहीही प्रभाव पडत नाही, हे सत्य असूनही कोणी स्वीकारायला तयार होत नाही.

जनलोकपाल विधेयक

अण्णा, "जनलोकपाल विधेयक" यायलाच हवे. त्यासाठी तुमच्या समर्थनार्थ मी माझ्यापरीने यथाशक्ती प्रयत्न करणारच आहे. पण या विधेयकामुळे काही क्रांतीकारी बदल वगैरे घडून येतील, या भ्रमात मी नाही. मानवाधिकार आयोगाचा फायदा ’कसाब’ला झाला पण या देशातल्या कष्टकरी जनतेला वेठबिगारापेक्षाही लाजिरवाणे जीवन जगावे लागते, शेतकर्‍यांना आयुष्य संपायच्या आतच आपली जीवनयात्रा संपवावी लागते. देवाने दिलेल्या आयुष्यभर जगण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यास मानवाधिकार आयोग कुचकामी ठरला आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग या देशातल्या सव्वाशेकोटीपैकी फक्त मूठभर लोकांनाच झाला. त्यामुळे तुम्ही ज्या मार्गाने वाटचाल करताहात त्यामुळे आमजनतेचे फार काही भले होईल असे मला वाटत नाही.

अण्णा, तुम्ही ४-५ दिवस दिल्लीला उपोषण केले आणि आम जनतेच्या नजरेत "हिरो" झालेत. कदाचित हिच आमजनता तुम्हाला एक दिवस "महात्मा" म्हणून गौरवायला मागेपुढे पाहणार नाही. तुमच्या समर्थनार्थ मैदानात उतरायला लागलीच आहे. त्यामुळे मूठभर लोकांच्या नव्हे या "आमजनतेच्या" आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे काही क्षण निर्माण होण्यासाठी तसे थेट प्रयत्न करणे ही आता तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी नुसती सात्त्विक अथवा भावनिक आंदोलने करून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यानुरूपच पुढील वाटचाल करावी लागेल.

अण्णा, तुमचा कायद्यावर प्रचंड विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. पण कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. कायदा करून उपयोगाचा नाही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. दुर्दैवाने कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही, नाही तर आहे तेच कायदे खूप आहेत. त्यामुळे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुन्हा नवा कायदा किंवा विधेयक हे काही रामबाण औषध ठरू शकत नाही.
याउप्परही तुम्हाला कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरसी सुटतात, असे वाटत असेल तर मग या वर्धेला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावनस्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलावर हवी तेवढी दारू, अगदी ज्या पाहिजे त्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे आणि गावठीही मुबलक उपलब्ध आहे.

नाही खरे वाटत? मग या सेवाग्रामला बापुकुटीसमोर. येताना एकटेच नका येऊ, हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. हजारो लोकांना आंघोळ करायला पुरून उरेल एवढी दारू एकटे सेवाग्राम हे गावच पुरवेल, याची मला खात्री आहे.

कायद्याच्या राज्याचा विजय असो!

गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------

धोरणप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2011 - 12:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुटे साहेब, वर्ध्याच्या दारु दुकानदारांचा एक मोर्चा काही दिवसापूर्वी कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर पाहिला होता. दुकानदारांचे म्हणने होते की, आमचीच म्हणजे वर्ध्याचीच दुकाने का बंद ? दारुबंदी करायची तर महाराष्ट्रभर करा असे त्यांचे म्हणने होते. महाराष्ट्र शासनाला दारुपासून मिळणारा प्रचंड महसूल [विदा नाही] शासन कशाला बुडवेल. बाकी, अण्णांच्या समर्थनार्थ आपल्या भावनेशी सहमत आहे. पण आता काही राजकीय विचारवंतांनी असा सूर लावलाय की,समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे. जनलोकपाल विधयकात काही सदस्यांना घेतले नाही म्हणून काही लोक अण्णांवर नाराज आहेत, बाकी, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा हा लोकशाही बळकट करुन करता येणार नाही का ! असा विचारही पुढे आला पाहिजे असे वाटते. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

16 Apr 2011 - 12:48 am | गंगाधर मुटे

वर्ध्याच्या दारु दुकानदारांचा एक मोर्चा काही दिवसापूर्वी कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर पाहिला होता. दुकानदारांचे म्हणने होते की, आमचीच म्हणजे वर्ध्याचीच दुकाने का बंद ? दारुबंदी करायची तर महाराष्ट्रभर करा असे त्यांचे म्हणने होते.

त्यांचे म्हणणे रास्त आहे.

महाराष्ट्र शासनाला दारुपासून मिळणारा प्रचंड महसूल [विदा नाही] शासन कशाला बुडवेल.

शासनाचा महसूल बुडत असेल, पण शासनकर्त्यांचा आणि प्रशासनाचा कुठे बुडतोय.
त्यांना तर सुगीचे दिवस आहेत दारूबंदीमुळे.

समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे.

हा चक्क कांगावा आहे. काही समांतर शासन वगैरे तयार होणार नाही.

सुधीर१३७'s picture

16 Apr 2011 - 11:18 am | सुधीर१३७

>>>>>समांतर शासनाची मागणी ही लोकशाहीला मारक ठरत आहे वगैरे.

हा चक्क कांगावा आहे. काही समांतर शासन वगैरे तयार होणार नाही >>>>>>>>>>

......................................... समांतर शासन नाही, पण भ्रष्टाचार करू शकणारी नवीन व्यवस्था नक्कीच जन्माला येईल याची खात्री बाळगा. :(

प्रास's picture

16 Apr 2011 - 12:16 am | प्रास

बर्‍याच अंशी सर्वसामान्यांच्या भावनांना शब्दरुप दिल्याबद्दल गंगाधरराव, तुमचे अभिनंदन!

लिखाण मुद्देसूद आणि परखड आहे, त्याचप्रमाणे डोळ्यात अंजन घालणारेपण. अण्णांच्या बद्दल वैयक्तिक आदर जरूर आहे पण त्यांच्या चळवळींतून आणि आंदोलनांमधून अतिशय मर्यादित किंवा म्हणावा तितका ठोस परीणाम झालेला दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.

सामर्थ्य चळवळींचे नक्कीच आहे पण या चळवळींच्या उद्दिष्टांच्या पातळ्या फार विचारपूर्वक निश्चित करणे गरजेचे आहे. एखाद्या मुद्द्यावर सरकार वा प्रशासन सकृतदर्शनी सहमत झाल्याचे दिसल्याबरोबर त्या पातळीवर चळवळ यशस्वी झाल्याचे गृहित धरून अण्णा आंदोलन मागे घेतात वा स्थगित करून सरकार वा प्रशासनालाच अंमलबजावणी करायला सांगतात असं दिसून आलेलं आहे. प्रशासन किंवा सरकार यानंतर आपली चालढकलाची मोहिम सुरूच ठेवतात आणि एका चांगल्या आंदोलनाचा फियास्को होऊन जातो. सरकार वा प्रशासनावर आंदोलन काळात असलेला दबाव सुरू राहण्यासाठी जे दुसर्‍या-तिसर्‍या पिढीचे 'अण्णा हजारे' गावोगावी तयार असायला हवे असतात तसे कुठेही तयार झालेले दिसत नाहीत आणि हा एकप्रकारे अण्णांच्या आंदोलनांचा आणि चळवळीचा पराभवाला कारणीभूत होऊ शकणारा ऋणबिंदू असावा असं वाटतं.

गंगाधररावजी, एका चांगल्या मुद्द्यावरचा संतुलित लेख लिहिल्याबद्दल आभार!

विकास's picture

16 Apr 2011 - 12:30 am | विकास

लेखकाच्या भावना आणि तळमळ समजू शकतो. या लेखात (शिर्षकासंदर्भात) दोन मुद्दे आहेत असे वाटते:

कायदा उघड उघड मोडणे:
या मुद्याशी सहमत.

मात्र एक जिल्हा गांधीजींच्या पावलांनी पावन झाला म्हणून तेथे दारूबंदी करणे आणि ती मोडणे:
गांधीजींच्या पावलांनी केवळ वर्धाच पावन झाले अथवा त्यांचा जन्म गुजरातेतील, ते गुजराथी म्हणून तेच राज्य म्हणत, दोन्ही ठिकाणीच बंदी का? ज्या भारतभूमीत ते जन्माला आले ती भारतभूच, त्यांच्या आणि अशा अनेक इतरांच्यामुळे पावन नाही का झाली?

बरं, गांधीजींमुळे दारूबंदीच का? अजून त्यांचे इतर काही हट्ट असत, उ.दा. निसर्गोपचार, संपूर्ण अहींसा (पोलीसांकडे देखील शस्त्रे नकोत) वगैरे करणे का नको? मांसाहार चालतो का? थोडक्यात, आपल्याबद्दल आणि इतर अनेकांबाबत आदर राखत म्हणेन की असली दारूबंदी करणे हे खूळ आहे किंवा फारतर भाबडेपणा म्हणता येईल असे काही आहे. मी काही दारूचा प्रचार करण्यासाठी हे लिहीत नाही, पण दारूबंदी करायचीच असेल तर संपूर्ण भारतातच करा, नाहीतर असे सिलेक्टीव्हली नको असे वाटते. कारण त्यातून साध्य काहीच होत नाही, फक्त ज्याच्या स्मृतीस मान म्हणून केले जाते, अशा नेत्याची नकळत विटंबनाच होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Apr 2011 - 1:45 pm | निनाद मुक्काम प...

ह्याच विषयावर मी गुजरात मधील दारूबंदी हा लेख लिहिला होता .
विकास जी ह्यांनी माझ्या भावना अतिशय समर्थ पणे मांडल्या आहेत .
गांधीच्या कार्य व कृत्यामुळे जेवढे त्यांचे विरोधक निर्माण झाले त्यापेक्षा कैक पटीने जास्त त्यांचा आंधळा व पांगळा अनुयाय करणाऱ्या अनुयायांमुळे झाले .
अर्थात हा अनुयाय स्वतःची राजकीय आणी इतर पोळ्या पिकवायला झाला हे वेगळे सांगणे नकोच .
लेखामध्ये एका उत्कृष्ट विषयाला तोंड फोडले आहे .

गंगाधर मुटे's picture

16 Apr 2011 - 12:41 am | गंगाधर मुटे

गांधीजींच्या पावलांनी केवळ वर्धाच पावन झाले अथवा त्यांचा जन्म गुजरातेतील, ते गुजराथी म्हणून तेच राज्य म्हणत, दोन्ही ठिकाणीच बंदी का? ज्या भारतभूमीत ते जन्माला आले ती भारतभूच, त्यांच्या आणि अशा अनेक इतरांच्यामुळे पावन नाही का झाली?

बरं, गांधीजींमुळे दारूबंदीच का? अजून त्यांचे इतर काही हट्ट असत, उ.दा. निसर्गोपचार, संपूर्ण अहींसा (पोलीसांकडे देखील शस्त्रे नकोत) वगैरे करणे का नको? मांसाहार चालतो का? थोडक्यात, आपल्याबद्दल आणि इतर अनेकांबाबत आदर राखत म्हणेन की असली दारूबंदी करणे हे खूळ आहे किंवा फारतर भाबडेपणा म्हणता येईल असे काही आहे. मी काही दारूचा प्रचार करण्यासाठी हे लिहीत नाही, पण दारूबंदी करायचीच असेल तर संपूर्ण भारतातच करा, नाहीतर असे सिलेक्टीव्हली नको असे वाटते. कारण त्यातून साध्य काहीच होत नाही, फक्त ज्याच्या स्मृतीस मान म्हणून केले जाते, अशा नेत्याची नकळत विटंबनाच होते.

अगदी सहमत. मी पण तेच म्हणतोय.

निव्वळ कायदे केले की प्रश्न सुटतो, हा भाबडेपणा आहे, असे मला म्हणायचे आहे.

सुधीर१३७'s picture

16 Apr 2011 - 11:22 am | सुधीर१३७

लेख उत्तमच.

केवळ कायदे करुन प्रश्न सुटत नाहीत, तर नवनवीन प्रश्न निर्माण होतात.

जोपर्यंत समाजातील व्यक्तिंची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कायदे करुनही काहीही उपयोग नाही.

मुटेसाहेब खरच सेवाग्राम ला अशी परिस्थिती आहे का ?

गंगाधर मुटे's picture

16 Apr 2011 - 5:51 pm | गंगाधर मुटे

सेवाग्राम ला अशी परिस्थिती आहे का ?

आख्ख्या जिल्हाभर आहे. गावात पाण्याचा दुष्काळ असतो पण दारू मात्र मुबलक. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2011 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्ध्याच्या, नागपूरच्या गोष्टी निघाल्या की सर्कीटची (मिलींदची) आठवण होते.
च्यायला, कुठे दडपून बसलाय कोणास ठाऊक ?

-दिलीप बिरुटे
(सर्किटचा फ्यान)

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2011 - 11:20 am | पिवळा डांबिस

मास्तर, सेवाग्रामात शोधून पाह्यलंत का?
:)

सर्किटकाकांचा एसी
पिवळा डांबिस

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Apr 2011 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते

लेख आवडला. त्यातील भावनांशी सहमत आहे.

विसोबा खेचर's picture

18 Apr 2011 - 10:56 am | विसोबा खेचर

लेख उतमच..!

परंतु,

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....

यातील 'अण्णा' हा शब्द वाचून अंमळ चपापलोच..! मग कळलं की हे माझे अण्णा नव्हेत..! ;)

अर्थात, अण्णा हजार्‍यांचाही मी फॅन आहेच..:)

असो..

(अण्णांचा शिष्य) तात्या.

सातबारा's picture

18 Apr 2011 - 2:40 pm | सातबारा

अण्णा हजारे हे आधुनिक सरकारी गांधी असून प्रसिध्दी साठी हपापलेले आहेत असा माझा अभ्यास आहे. अण्णांचे उपोषण कधीही दहा दिवसांच्या वर जात नाही . यावेळीही हे सोकॉल्ड आमरण उपोषण दहा दिवसांच्या आत संपेल अशी मी मारलेली पैंज जिंकली. अण्णांना आपल्यावर लाईमलाईट कसा ओढून घ्यायचा याची क्लुप्ती चांगलीच अवगत झालेली आहे हे नक्की.
हे तथाकथीत उपोषण आणि लोकपाल इ. इ. गोष्टींचा सहा महिन्यात बोर्‍या वाजेल यावर मी पैंज लावायला तयार आहे. (जर ही पैंज मी हरलो तर मला आनंद वाटेल).