टॉप ५ आहारविषयक भ्रमनिरास

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
10 Apr 2011 - 4:42 pm

गेल्या काही वर्षात आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्चात्य पदार्थ पण खातो, करून बघतो. तसेच, आपली आरोग्य आणि आहारा विषयी जागरूकता देखील वाढली आहे. तर जेव्हा आपल्याला एवढ्या माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याच बरोबर बरेच समज गैरसमज पण उदभवत असतात. आज मी इथे असेच काही भ्रमनिरास करत आहे. जर ह्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही समज, प्रश्न असतील तर मला जरूर कळवा, मी त्याचे समाधान करण्याचा जरूर प्रयत्न करेन.

१. खूप पाणी पिऊन वजन कमी होते
मी बऱ्याच सिनेतारीकांच्या मुलाखतीत वाचलेले आहे 'माझ्या सौंदर्य आणि सुडोल फिगर चे रहस्य म्हणजे पाणी'- असं सांगणारी ती सुंदरी, तिने केलेल्या आहारनियंत्रण आणि व्यायाम ह्या बद्दल काहीच सांगत नाही. अर्थात करीना कपूरने फिटनेस पॉप्युलर करण्या पूर्वीचं हे उदाहरण आहे. पण आज देखील, बऱ्याच लोकांना असं वाटतं कि खूप खूप पाणी प्यायल तर शरीरातली चरबी सुद्धा वितळून निघून जाते. हा एक भ्रम आहे. पाणी पिणे हे अगदी अत्यावश्यक असते, ते शरीरातल्या बऱ्याच हानिकारक किंवा अनावश्यक पदार्थांना बाहेर फेकतं पण त्यात अतिरिक्त चरबी चा समावेश होत नाही. आपल्या शरीरातली चरबी हि फक्त व्यायाम आणि संतुलित नियंत्रित आहाराने कमी होते.

२. सगळे फॅट हानिकारक असतात
हा बहुदा सर्वात जुना गैरसमज असेल. 'सगळे' फॅट (तेल, तूप, दुग्धजन्य पदार्थ, दाणे, काजू किशमिश) वाईट नसतात. उलट आपल्या सगळ्यांना थोड्या विशिष्ट फॅट ची रोजच्या आहारात गरज असते. उ. दा. म्युफा, प्युफा, इसेन्शियल फॅटी अ‍ॅसीड जे आपल्याला ओलिव्ह ओईल, सोय बीन ओईल, सन फ्लॉवर ओईल, करडी ओईल, शेंगदाणा तेल व अखरोड, पिस्ता, काजू आणि मासे ह्यातून मिळते. फॅट शरीरातल्या पेशींचे आरोग्य जपत, विटामिन अ, ड, ई, क ह्याच्या पचनात मदत करतं आणि सगळ्या मज्जातंतूंचे स्वास्थ्य संभाळत. अर्थात अती तेलयुक्त किंवा फॅट रीच आहार असेल तर वजन नक्कीच वाढते पण त्याचा अर्थ सगळे फॅट हानिकारक असतात असं होत नाही.

३. फॅट फ्री = लो कॅलोरी
हा आधुनिक हेल्थ फूड संस्कृती चा मोठ्ठा गैरसमज आहे. फॅट फ्री म्हणजे त्यात कॅलोरी पण कमी असतात किंवा त्याने वजन वाढत नाही असे अजिबात नाही. उलट एक सोप्पा निर्देश म्हणजे, जर फॅट कमी असेल तर पदार्थात साखरेचे किंवा तत्सम प्रमाण वाढवलेले असते. तसेच शुगर फ्री पदार्थात इतर फॅट चे प्रमाण जास्त असते. आणि बेक्ड म्हणजे लो कॅलोरी असं नेहमीच नसतं. तर म्हणून, कायम nutrient लेबल वाचूनच पदार्थाची निवड करावी!

४. जास्त साखर खाऊन मधुमेह होतो
नाही. तुम्हाला जर मधुमेह असेल, तर जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाऊन तुमच्या रक्तातल्या ग्लुकोज चे प्रमाण वाढेल. पण तुम्हाला मधुमेह नसेल तर, फक्त जास्त साखर खाल्ल्या मुळे तुम्हाला हा आजार होत नाही. तसेच, आहारात अजिबात वरून साखर घातलेले पदार्थ नसतील तरी तुम्हाला मधुमेह होणार नाही ह्याची खात्री देता येत नाही, कारण- मधुमेह होण्या मागे बरीच अनुवंशिक व इतर कारणं असतात जसे अती वजन असणे, व्यायामाचा अभाव, अनियमित व असंतुलित आहार, मद्यपान ई. साधारण गोड पदार्थ कॅलोरी व फॅट रीच पण असतात आणि म्हणून त्याने वजन वाढून, मधुमेह होण्याची शक्यता वाढते. म्हणून रोजच्या रोज गोड धोड, तळलेले पदार्थ खाणे टाळावेत.

५. रात्री उशिरा खाल्लं कि वजन वाढते
काही वर्षांपूर्वी, ४ पी. एम. डाएट नावाचे फॅड आले होते. तेव्हापासून खूप लोकांची अशी समजूत झाली आहे कि रात्री अपरात्री खाल्लं कि जास्त वजन वाढतं. आपलं शरीर वेळ बघून पचनक्रिया कशी करायची हे ठरवत नसतं. नाहीतर, दिवसा भरपूर केक, पेस्ट्री, पिझ्झा आणि रात्री फक्त सलाड असं खाल्लं तरी मग वजन वाढायला नको मग? पण तसं होत नाही. वजन वाढणं किंवा कमी होणं हे पूर्णपणे दिवसभरात (आणि रात्रीत) आहारात असलेल्या कॅलोरीस वर आधारित असतं. पण एका निरीक्षणानुसार, अपरात्री खाल्ले जाणारे पदार्थ हे मुळातच खूप कॅलोरी रिच असून त्याने मेदोवृद्धी होते उ. दा. आईस्क्रीम, केक, पेस्ट्री, चॉक्लेट इ. तर वजन वाढीचा संबंध 'कधी' खातोय ह्याच्याशी नसून 'काय' आणि 'किती' खातोय ह्याच्याशी असतो!

राहणीविचारलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

10 Apr 2011 - 4:52 pm | प्रीत-मोहर

धन्स ग तै!!!

चला मी चालले वॉक ला ....

निवेदिता-ताई's picture

10 Apr 2011 - 5:12 pm | निवेदिता-ताई

मी पण येते ग तुझ्याबरोबर...

दीविरा's picture

10 Apr 2011 - 8:23 pm | दीविरा

एक लेख वाचनात आला होता की जास्ती पाणी पीणे चांगले नाही,त्यावर तुमचे काय मत आहे?

त्यामुळे vitamin B& C शरिराच्या बाहेर फेकली जातात असे त्या लेखात लिहले होते.

तसेच फॅट फ्री = लो कॅलोरी असले लेबल पाहून घेऊ नये अशा मताची मी आहे कारण मग फॅट फ्री = लो कॅलोरी आहे ना मग

जास्ती खायला हरकत नाही असे वाटते.त्यापेक्षपे नेहमीचेच थोडेसे कमी खावे (जमले तर)

बाकी माहिती छान :) अशाच लीहित रहा

रेवती's picture

10 Apr 2011 - 8:29 pm | रेवती

वाचतिये.

मीली's picture

10 Apr 2011 - 8:33 pm | मीली

छान सांगितलेस अमिता.
"डोन्ट लूज युअर माईंड लूज युअर वेट" वाचून काढले ..छान पुस्तक आहे समतोल आहार आणि व्यायाम करूनच आपण वजन कमी करू शकतो हे निट सांगितले आहे ऋजुता दिवेकर ने ! (करीना कपूर चे वजन कमी करणारी !)
दर दोन ते ३ तासांनी सकस खायला हवे यावर भर दिलेला आहे .खूप अंतर असेल कि भूक जास्त असल्याने आपण जास्त खातो आणि वजन वाढवतो.
त्यातही वजन कमी करण्या संबधी असलेल्या गैर समजुतींना मोडीत काढले आहे.

अरे वा!!
मीही डॉ. डॅनियल एमेन यांचे 'चेंज युवर ब्रेन टू चेंज युवर बॉडी' हे पुस्तक वाचते आहे.
सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे छोटी मील्स फ्रीक्वेंटली घ्या म्हणतात.;)
फक्त त्यात ब्रेनची माहिती जरा जास्तच देवून सांगतात त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट वाटणारा भाग येइपर्यंत वाचत रहावे लागते.;) त्यांच्या चांगल्या तब्येतीच्या वजन मापांमध्ये मी आहे म्हणून इतके बरे वाटले.:)
गेली अनेक वर्षे करत असलेल्या व्यायामाचे सार्थक झाल्यासारखे.;)

कलंत्री's picture

10 Apr 2011 - 9:21 pm | कलंत्री

आहार आणि विहारातील योग्य ते संतुलन ठेवले तर वजन वाढणे अथवा घटणे यावर विचार करावा लागत नाही.

आपल्या शरीराची वृत्ती आणि प्रवृत्ती आपणासच शोधावी लागते.

आहार विषयी एवढी जागरूकता बघून आनंद झाला

जास्त पाणी प्यायल्या वर शरीरातून जास्तीचे विषारी पदार्थ (toxins) आणि गरजेपेक्षा जास्त असलेले जीवनसत्व ब आणि क निघून जाते. म्हणूनच हे जीवन सत्व रोजच्या आहारात असणे खूप गरजेचे असते.

तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.