माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने
दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत
अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले.
कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते. या कवितेची नायिका एक प्रेमविवाह झालेली
स्री असुन तिने आपल्या आईवडीलांच्या इच्छेविरुध्द हे लग्न्न केलेले आहे.
नाते तुझे नि माझे
असे जन्मोजन्मीचे
प्रिया तुझ्यासवेच मला
या जन्मी रमायचे
घरदार सोडुनी आले
मायेस पारखी झाले
परि तुझ्यासंगती सख्या
रममाण संसारी झाले
बोचरे बोल दुनियेचे
झेलुनी पुढे चालायचे
माता, पिता, बंधुभगिनी
आठवुनी नाही रडायचे
झाली बरीच जगती
आबाळ या जीवाची
स्फुंदुनी सांगू कशी मी
मातेस मी दुरीची
सुखदु:खाची जरी छाया
ओलांडीत मी चालले
या जन्मीच्या तव गाठीला
आज एक तप पुर्ण झाले
मज का वाटे कुणास ठावूक
का मनात माझ्या आले
तुच सांग ना प्रिया खरे का?
नाते ना 'ते' राहिले.....
प्रतिक्रिया
9 May 2008 - 10:51 pm | स्वाती राजेश
कविता छानच आहे.
प्रेम करणार्याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!
हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो....
कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.
10 May 2008 - 12:38 am | मन
प्रेम करणार्याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!
हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
13 May 2008 - 11:49 am | वेलदोडा
कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!
इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714
शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.
13 May 2008 - 11:37 am | विसोबा खेचर
घरदार सोडुनी आले
मायेस पारखी झाले
??
आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :)
झाली बरीच जगती
आबाळ या जीवाची
स्फुंदुनी सांगू कशी मी
मातेस मी दुरीची
मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे?
यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :)
आपला,
(प्रॅक्टिकल) तात्या.
13 May 2008 - 11:42 am | ऋचा
पळून जाताना विचार करावा
म्हणजे नंतर असे नाही गळे काढावे लागत...
13 May 2008 - 11:43 am | मनस्वी
भ्रमरा, पुढच्या वेळी अशी दिरंगाई करू नकोस!