पुलाखालून खूप पाणी वाहून गेलय आता तरी विद्यार्थीदशेत पंगेगिरी अशी ब~याचदा केलीय. तसं त्यातलं काही अंगलट आलं नाही पण अनुभवसम्रुद्ध मात्र नक्की करून गेलं.
आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असतानाची गोष्ट. परिक्षा महिन्याभरावर आलेली, जर्नल्स लिहीण, ती तपासून घेण, परीक्षेत काय विचारलं जाईल याचा माग काढण वगैरे वगैरे सगळे उद्योग चालू होते. एरवी मी शिक्षकांच्या फार गुड बुकात नसलो तरी ब्याड बुकातही नसायचो (असं तेव्हा मला वाटायचं.) शिक्षकांना सतावणे वगैरे व्हायचं ते त्यांना सोडवायला त्रास होईल अशा शंका विचारण्याने किंवा चालू वर्गात थोडी भंकस करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणण असंच. त्यात काही वैयक्तिक नसायचं. अर्थात लोकांशी पंगे घेण्याची रगही काही कमी नव्हती.
पण तो शनिवार काही वेगळाच होता. दिवसभर निरनिराळ्या शिक्षकांकडून जर्नल्स तपासून घेत होतो. प्रिपरेशन लीव्ह असल्याने शिक्षकही जागेवर सापडायचे नाहीत तेव्हा एका दिवशी जास्तीतजास्त जर्नल्स ताब्यात घ्यायच्या विचाराने मी आणि माझे मित्र प्रयत्न करत होतो. याच विचारात आमच्या 'शरीर रचना' विभागात मी प्रवेश केला.
इथे आमचे २ ग्रूप असायचे आणि प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे शिक्षक असायचे. माझ्या ग्रुपचे शिक्षक त्या दिवशी नव्हते पण त्यांनी जर्नल्स तपासून ठेवल्याचा निरोप मिळालेला. विभागात दुस~या ग्रुपचे शिक्षक असल्याने मी त्यांना या संदर्भात विचारलं. त्या दिवशी त्यांचं काय बिनसलेलं ठावूक नाही पण माझा प्रश्न ऐकताच त्यांचा पारा एकदम चढला. त्यांनी माझ्यावरच आगपाखड करायला सुरुवात केली. तुम्हा मुलांना वेळेचं महत्त्व कळत नाही, तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळेला तुमची कामं घेऊन आमच्याकडे येता. आम्ही काय इथे फक्त याच कामासाठी बसलोयत का वगैरे वगैरे. मी आपलं त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की आमच्या ग्रुपची जर्नल्स आमच्या शिक्षकांनी तपासून ठेवली आहेत आणि ती विभागातून घेऊन जायला परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही फक्त त्यांची जागा सांगा, जर्नल्स नेल्याची नोंद करून आमची आम्ही ती घेऊन जाऊ पण त्यांची माझं कोणतंही बोलण ऐकायची तयारी नव्हती.
पुढे त्यांचं बोलण वैयक्तिक झालं. ते ओरडून म्हणायला लागले की तुला जर्नल्स चा काय उपयोग? तुझा काय अभ्यास वगैरेशी काहीच संबंध नाहीये आणि तू परीक्षेत तरी काय दिवे लावणार आहेस? आता तर मी बघतो की तू या परीक्षेत पासच कसा होतोस ते. नाही तुझ्या एक्झामिनरला भेटून तुला फेल करायला लावलं तर बघ!
इतका वेळ त्यांच्याशी शांतपणे बोलून त्यांचं सगळ ऐकून नि माझं काम आटोपून निघायचा विचार करणारं माझं डोकं त्यांच्या तू पासच कसा होतो ते मी बघतो या बोलण्याने एकदम सटकलं. मीही त्यांना तेव्हढच जोरात ओरडून म्हंटल की तुम्ही तुम्हाला हवंय त्या प्रकारे मला नापास करायचा प्रयत्न करा आणि मी बघतो की मला नापास कोण करतय ते. मी काय नि किती अभ्यास केलाय तो माझा प्रश्न आहे पण हिम्मत असेल तर १० नोव्हेंबरला १९९३ ला सकाळी ११ वाजता माझी परीक्षा आहे. या दिवशी माझ्या सेंटर वर या, मी वाट बघेन तुमची तिथे. मीही बघतो की तुमचा कोणता एक्झामिनर मला फेल करतोय ते.
यानंतर मी माझं जर्नल घेऊन तिथून निघून गेलो. तोपर्यंत ही हकीगत सगळ्या कॉलेजभर कळलेली.
सिनियर मित्रांनी तेव्हा पहिल्यांदा मी कसा मोठा पंगा घेतलाय ते सांगितलं. २० वर्षांपूर्वी, खार खाऊन असलेल्या शिक्षकाने आपल्या नावडत्या विद्यार्थ्याला परीक्षेत एक्झामिनरकडून फेल करवण ही अत्यंत मामुली आणि सहज शक्य गोष्ट होती आणि तसे प्रकार झालेलेही होते. पण मग मीही याचा फार विचार केला नाही. शब्दाला शब्द मिळून वाद झाला होता आणि घडायचं ते घडून गेलेलं. माझ्यापरीने मी अभ्यास केला आणि जे होईल ते होवो या विचाराने त्या दिवशी परीक्षा दिली. अर्थात मधून मधून ते शिक्षक येतायत का ते ही बघत होतो. तसे ते सेंटरला आलेही पण माझ्या परीक्षेच्या ठिकाणी फिरकले नाहीत. यथावकाश निकाल लागला. मी ब~यापैकी गुणांनी उत्तीर्ण झालो.
बहुदा त्या शिक्षकांनीच माझ्याशी पंगा घेतला नसणार.......
प्रतिक्रिया
24 Jan 2011 - 8:36 pm | कच्ची कैरी
अरे बाप रे ! केवढा मोठा लेख आहे हा ?कधीतरी सवडीने वाचुन प्रतिक्रिया देईन हं!
24 Jan 2011 - 9:37 pm | टारझन
मी असतो तर असा शाब्दिक पंगा घेण्या ऐवजी दातंच घशात घातले असतो. आणि म्हणालो असतो. आता फक्त दात पाडलेत . ह्यापुढे कुठे थोबाड उघडलं तर हाडंही मोडेन. चालाय फिरायच्या लायकीचा रहाणार नाही वगैरे वगैरे. :)
- (अस्थि-दंत विमा एजंट) टारझन
25 Jan 2011 - 6:22 am | नरेशकुमार
आनं तिखट-मिठ लावुन इथं लेख टाकला असता, आनं आमीबी तो चवी चवी ने चावला असता. स्वारी स्वारी वाचला असता.
24 Jan 2011 - 10:14 pm | आत्मशून्य
वर्गातील पंग्याची प्रसीध्दी थोडी जास्तच झाल्याने कदाचीत पंगा घेतला गेला नसावा, सूमडीत कायबी करता आल नसावं. नाय तर लय वर पर्यंत सेटंग लावावी लागली असती तूम्हालाबी आन तूमच्या शीक्शकालाबी.
25 Jan 2011 - 4:17 am | निनाद मुक्काम प...
पंगा जरूर ध्यावा पण तो घेतल्यावर आपल्या असेलेल्या व बरेचदा नसलेल्या काका /मामा ह्यांचा राजकारणातील किंवा आर्थर मधील वास्तव्याचा सूचक उल्लेख करावा अशी सूचना मी माझ्या मित्रांना नेहमी करायचो .
माझे नावच होते त्यावेळी बोलबच्चन अमिताभ बच्चन
25 Jan 2011 - 4:56 am | गणपा
सुदैवाने शिक्षकांशी पंगा घेण्याच भाग्य(?) लाभल नाही. बिचारे सगळे साधे भोळे होते.
तसेही आम्ही नेहमीच त्यांच्या गुडबुकात रहायचा प्रयत्न करायचो. पण तरी त्यातल्या त्यात जे खडुस होते ते पण फक्त व्हायवाला इंगा दाखवायचे. लेखी परिक्षेत त्यांनी कधी डुख धरला नाही.
अश्या शिक्षकांना आम्ही अॅन्युअलच्या दिवशी फिशपाँडचा मारा करुन करुन जेरीस आणायचो. ;)
25 Jan 2011 - 1:57 pm | स्वतन्त्र
माझ्याशी देखील एका शिशिकेने तिला सोडून दुसऱ्या सरांना "गुड मोर्निंग" म्हणल्याबद्दल पंगा घेतलेला.
त्याचे प्रत्युत्तर आता वर्ष संपल्यावर.
कसं देऊ ते सुचवावे.
गुड मोर्निंगचे मोठं भेटकार्ड देण्याच्या विचारात आहे.
25 Jan 2011 - 1:44 pm | ashvinibapat
माझ्या एका मित्राने असाच पंगा घेतला होता एका सरांबरोबर , बा चा बा चि झाल्यावर साहेबांनी सरळ सरांच्या काना खाली १ ठेउन दिली.त्यामुळे प्रकरण फार चिघळले,त्याच्या घरातल्या सगळ्यांनी त्याला माफी मागायला सांगितली तेव्हा स्वारीने सगळ्या वर्गा समोर अशी माफी मागितली,
"ह्या माणसाला मी कानफटावले असुन मी त्या बद्द्ल दिलगीर आहे."
ह्या असल्या माफी नाम्या नंतर शुन्य मिनिटात सर वर्गातुन गायब झाले.
25 Jan 2011 - 1:53 pm | चिंतामणी
"पंगा" असे विषयसुचीमधे वाचल्यावर वाटले की प.रा., चाचा यांच्याप्रमाणे पंडीत गागाभट्ट प्रिंटमिडीयात चमकले आहेत की काय? उत्सुकतने विषयावर टिचकी मारली पण आत वेगळीच स्टोरी निघाली.
25 Jan 2011 - 8:30 pm | प्रास
चिन्तामणीजी, इथल्या 'पंगा' नामे सदस्याच्या अस्तित्वाबद्दल माहितीच नसल्याने माझ्याकडून असा 'प्रमाद' घडला. आता शिर्षक बदलाचे प्रायश्चित्त कसे घ्यायचे त्याचे मार्गदर्शन करावे.
तसदीबद्दल माफी असावी...... :)
31 Jan 2011 - 5:56 pm | चिंतामणी
यात कसली आली तसदी.
संपादम मंडळाला व्यनी करून कळवा. तेच बदलु शकतात.
बाकी माझ्यामुळे आपल्याला अजून एका सदस्याची माहिती झाली हे ही नसे थोडके. :)
31 Jan 2011 - 6:03 pm | गणपा
का बॉ लेखाच नाव काय म्हणुन बदलायचे?
30 Jan 2011 - 11:22 am | Nile
आम्ही सुद्धा लै शिक्षकांशी पंगे घेतले होते. इंजिनीअरींगच्या प्रोफेसेरला भर वर्गात तुला शिकवता येत नाही म्हणुन सांगुन टाकलं. घरी फोन गेल्यावर घरच्यांना मात्र त्याला शिकवता का येत नाही हे सांगता नाकी नऊ आले, पण पोराचं ज्ञान पाहुन घरच्यांनी जास्त वाद घातला नाही आणि तुझं तु निस्तरुन घे हे ऐकवुन सुटका केली. शेवटी प्रिन्सिपॉलला पण पटवुन दिल्यावर त्या लेक्चररची हकालपट्टी झाली.
बाकी दहावीत आमच्या एका मित्राने एका शिक्षकाच्या (शिक्षकाने वर्गात शिवी दीली म्हणुन) कानफटात मारल्याने शाळेत लै दंगा झाला होता. त्याशिवाय, ऑफ पीरीयडला जमदग्नी प्रिन्सीपॉल खिडकीत यायला आणि "भो**च्यांनो गप बसा, मामा आला" हे वाक्य कोणीतरी केकटायला एकच मुहुर्त साधल्याने आख्ख्या वर्गाची हजामत झाली होती तोही एक किस्साच. प्राथमिक शाळेत काही उच्चप्रतीची चित्रे काढल्याने (साला असली चित्रे मोठ्यांनी काढली की ते मात्र प्रतिभावान चित्रकार होतात) आमचे कुठले कुठले अवयव रंगवले गेले होते ते एक प्रकरणच.... कीती किस्से लिहणार?