काव्यक्षण (कविता संग्रह)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
16 Jan 2011 - 9:33 am

आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे.
- निमिष न. सोनार

प्रेमाचा निसर्ग

प्रेम असावे झाडासारख्रे
दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी
एकमेकांना सुखाची सावली देण्यासाठी
प्रेम असावे पहाडासारखे
अढळ अचल राहाण्यासाठी
एकमेकांना भक्कम आधार देण्यासाठी

प्रेम असावे फुलासारखे
नाजूक हळूवार फुलण्यासाठी
एकमेकांना जीवापाड जपण्यासाठी

प्रेम असावे नदीसारखे
बेधुंद प्रणयात वाहून जाण्यासाठी
एकमेकांना उत्कट प्रेमसागराकडे नेण्यासाठी

प्रेम असावे हवेसारखे
न सांगता अनुभवण्यासाठी
एकमेकांना प्रेमसुगंध देण्यासाठी

प्रेम असावे आकाशासारखे
जीवनातील पोकळी भरुन काढण्यासाठी
एकमेकांवर अनंत प्रेम करण्यासाठी

अन या आकाशाच्या आभासात...
हव्याश्या स्पर्शासोबत...
नदीच्या नवख्या प्रवाहासोबत...
फुलाच्या फुललेल्या आनंदासोबत...
पहाडाच्या पक्क्या आधारासोबत...
झाडाच्या झुलणार्‍या झोक्यात...
प्रणयाचे झोके घेत राहावे...
प्रेम गाणे गात राहावे...
प्रेम धुंद होतच राहावे...

निसर्गाच्या सानिध्यात, "प्रेम निसर्ग" अबाधीत राहावा
नैसर्गिक प्रेम" बहरत जावून, "प्रेमाचा निसर्ग " अनुभवत राहावा
अनुभवत राहावा...

----

प्रेमात तुझ्या संपलो मी...

प्रेमात तुझ्या गुंतलो मी
माझाच नाही उरलो मी
प्रेमाच्या खेळात जिंकलो मी
हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी.....

भेटलीस तेव्हा हरखलो मी
हसलीस तेव्हा हर्षलो मी
रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी
निघालीस तेव्हा हिरमुसलो मी.....

तू दूर होतीस तेव्हा
तुझ्या हृदयात दिसलो मी
परत कधी आलीच नाहीस तेव्हा
माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी...

-----

प्रणयाचा प्याला

पावसाच्या पेटलेल्या पाण्यात...
वार्‍याच्या वेगवान वाटेवर...
बेटावरल्या बहरलेल्या बागेत...
आकाशाच्या अमर्याद आभासात...
सागराच्या संथ सुरावटीत...
सूर्यकिरणांतील सुप्त सप्तरंगांच्या साक्षीने...
इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा...
"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला..!!"

-----

प्रेमधुंदी

नाही कुणी आस पास
लागला प्रेमाचा ध्यास
मिसळला श्वासात श्वास
लागली मिलनाची आस
हे खरं आहे की आभास
एकेक क्षण बनावा एकेक तास
असे वाटे दोघांच्या एकच मनास
वाटतोय वेगळाच उल्हास
रात्र आजची आहेच तशी खास
मधूर चंद्राच्या सोबतीलाआहे चांदण्यांची आरास...
मधूर चंद्राच्या सोबतीलाआहे चांदण्यांची आरास...

----

मी मराठी बोलतेय...

मी महाराष्ट्राची भाषा
संवादाची दिशा आणि आशा
मी असते तुमच्या मनामनांत
मी असते तुमच्या संवादात
आठवा मला शब्दाशब्दांत
साठवा मला पानापानांत
सदा ठेवा मला जीवंत
पाहू नका माझा अंत
करू नका माझी उपेक्षा
ही माझी एकच अपेक्षा!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
-- तुमचीच लाडकी ,मराठी

----

सुखी जीवनाचे मर्म...

दृष्टीकोनातून जन्मतात विचार
विचारतून घडतात आचार
आचार म्हणजेच आपुले कर्म
कर्म ठरवते भाग्य नि भविष्य
म्हणूनच सकारत्मक दृष्टीकोन हाच असावा ...
आपुला एकची धर्म!!
आपुला एकची धर्म!!
तेच आहे सुखी जीवनाचे मर्म...
सुखी जीवनाचे मर्म!!

----

भारत... होईल का पूर्वीसारखा परत?

भारत ...
झालाय समस्यांनी गारद! झालाय समस्यांनी गारद!

महागाई ...
देशाला पोखरत जाई! देशाला पोखरत जाई!

बॉंबस्फोट ...
दाखवी कुणाकडे बोट? दाखवी कुणाकडे बोट?

दहशतवाद ...
रोजच करतोय घात! रोजच करतोय घात!

अपघात ...
करी तनमनावर आघात! करी तनमनावर आघात!

अत्याचार ...
बनलाय रोजचा आचार! बनलाय रोजचा आचार!

दगडफेक ...
करी एकतेचे तुकडे अनेक! करी एकतेचे तुकडे अनेक!

अभिनेत्री ...
लावताहेत कपड्यांना कात्री! लावताहेत कपड्यांना कात्री!

नेते ...
कधीकाळी प्रामाणिक होते! कधीकाळी प्रामाणिक होते!

खेळाडू ...
खातात पैशाचे लाडू! खातात पैशाचे लाडू!

जनता ...
वाढवी लोकसंख्येची घनता! वाढवी लोकसंख्येची घनता!

सुबत्ता ...
राहिली नाही आता! राहिली नाही आता!

चित्रपट ...
चालण्यापेक्षा पडतात पटापट! चालण्यापेक्षा पडतात पटापट!

धनदांडगे ...
झालेत लोकशाहीला बोटावर नाचवणारे लांडगे! झालेत लोकशाहीला बोटावर नाचवणारे लांडगे!

बहुमत ...
सिद्ध करायला लागते नोट! सिद्ध करायला लागते नोट!

शेतकरी ...
आत्महत्यांची वाट धरी! आत्महत्यांची वाट धरी!

बेकारी ...
पळवी तोंडाची भाकरी! पळवी तोंडाची भाकरी!

पैसा ...
झालाय देवा जैसा !!! झालाय देवा जैसा!!! झालाय देवा जैसा!!!

भारत ...
होईल का पूर्वीसारखा परत?
होईल का पूर्वीसारखा परत?

----

जेव्हा शब्दशोध करवतो अर्थबोध..

जेव्हा वाद बनतो दहशतवाद ...
करतो सगळ्यांना बरबाद!
जेव्हा वाद बनतो सुसंवाद ...
बनतो सगळ्यांचा मदतीचा हात!
जेव्हा मान बनतो अपमान ...
घालतो मनात सूडाचे थैमान!
जेव्हा मान बनतो सन्मान ...
जागवतो मनात प्रेमभावना महान!
जेव्हा कृती बनते विकृती ...
सुरू होते मनाची अधोगती!
जेव्हा कृती बनते संस्कृती ...
होते लाखो मनांची उन्नती!

---
दहशतवाद्याचे भयगीत : "मी तर अंधाराचा सोबती...! "

मन माझे दगड, मी तर अंधाराचा सोबती...!
काळोख खुणवी मला, रात्र असे माझी सखी
नाही बघवत मला, चेहरे निष्पाप सुखी
भय नाही वाटत मला, वसे सैतान माझ्या मुखी
मन माझे दगड, मी तर अंधाराचा सोबती...!
रक्तपिपासू हात अनेक, माझे आदेश ऐकती
वाटतो मी मृत्यू अनेक, कुटुंबे उध्वस्त होती
माझी अपत्ये अनेक, विझवी निष्पाप प्राणज्योती
मन माझे दगड, मी तर अंधाराचा सोबती...!
वाटू लागलीय आता, माणसाला माणसाची भीती
सुन्न झालीय आता, पापभिरू मेंदूंची मती
पसरलीय आता, सगळीकडे माझीच (अप)किर्ती
मन माझे दगड, मी तर अंधाराचा सोबती...!
असंतोष हा बाप माझा, अन सूडभावना जन्मदात्री
अन सूडभावना जन्मदात्री...!!!
मन माझे दगड, मी तर अंधाराचा सोबती...!
मी तर अंधाराचाच सोबती...!
----
मंदी आणि संधी

मंदी आणि संधी
यांची कधी होत नसते 'संधी'
दोन्ही एकमेकांच्या सवती
घुटमळतात दोन्ही माणसाच्या अवती भवती
मंदी असल्यास संधी दूर पळते
संधी आल्यास मंदीला पळवता येते
मंदी चुकवता येत नाही
संधी चुकली की परत येत नाही
मंदी जाता जात नाही
संधी येता येत नाही
मंदी जाण्याची वाट बघावी लागते
संधी येण्याची वाट बघावी लागते
मंदीत चुकून संधी आली तर
हे माणसा तीला आपलेसे कर
अन्यथा मंदी तीला गीळून टाकेल
आणि माणसाची सहन शक्ती पिळून टाकेल
एक मंदी पुरे आहे जगाला नाहिसे करायला
मात्र फक्त एकच योग्य संधी आवश्यक आहे, मंदीला पळवायला....
मंदीला पळवायला...!!

-----

गणतंत्र आणि देशाचे तंत्र!

का बिघडले आहे
देशाचे तंत्र?
येऊन एखादा महापुरुष, देईल का देशाला
प्रगतीचा मंत्र?
कधी सापडेल देशाला भ्रष्टाचारावर
मात करण्याचे सूत्र?
कधी मिळेल देशाला
प्रगत देशाचे छत्र?
कधी संपेल बेरोजगारीचे
जीवघेणे सत्र?
कधी वागेल जबाबदारीने या देशातला प्रत्येक गण आणि आणेल ताळ्यावर
देशाचे तंत्र?
आणि मग खऱ्या अर्थाने सफल होईल
गण-तंत्र!
आणि सफल होईल
मिळालेले स्वातंत्र्य!

----

पुन्हा पावसाची पाळी ...

असह्य झाल्या होत्या उन्हाच्या झळी
सरली रात्र काळी काळी
त्या रम्य सकाळी
दाटूनी आली मेघ काळी काळी
सुगंध पसरवी माती काळी काळी
जलधारा घेवूनी भाग्य बळीराजाच्या कपाळी
आली पावसाची पाळी, पुन्हा पावसाची पाळी
खुलली बगेतली एकेक कळी
मरगळलेल्या मनी आली प्रसन्नतेची झळाळी
आली पावसाची पाळी, पुन्हा पावसाची पाळी

----

स्वातंत्र्य तर मिळाले ... पण ...??

स्वातंत्र्य तर मिळाले
इंग्रज तर पळाले,
पण...
दहशतवाद जन्मला... तो येथेच आहे.
भ्रष्टाचार जन्मला... तो येथेच आहे.

स्वातंत्र्य तर मिळाले,
स्वराज्य तर मिळाले,
पण...

महागाई वाढली.. ती जात नाही
बेरोजगारी वाढली.. ती जात नाही

स्वातंत्र्य तर मिळाले,
लोकशाही तर मिळाली,
पण...
लोकसंख्या वाढली... ती वाढतेच आहे
बेईमानी वाढली.. ती वाढतेच आहे.

स्वातंत्र्य तर मिळाले
इंग्रज तर पळाले,
पण...
इंग्रजी येथेच आहे... ती जाणार नाही
गरीबी येथेच आहे... ती जाणार नाही

----

स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!
चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...
ओंजळ भरून!
महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!

महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!
बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!
चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!

ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!
उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!

शृंगारभयानककरुणशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

छान.
शेवटच्या कवितेतील कल्पना भन्नाट आहे.

प्रकाश१११'s picture

16 Jan 2011 - 6:00 pm | प्रकाश१११

आपल्यां कवितेला खूप शुभेच्छा !!!

संग्रह काढलात तर कळ्वा. विकत घेईन .

निमिष सोनार's picture

16 Jan 2011 - 6:21 pm | निमिष सोनार

धन्यवाद!