काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ''साला, यावर लिहिलं पाहिजें" पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. '' माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन" हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ''नाटय महोत्सव''.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता कार्यक्रम.. ते काहीही असो , या घटनेने मला मात्र खुप काही दिलं,शिकवल . मज्जा आली राव, ...आणि कदाचित असे बरेच काही घडल्याने लिहायचे असे खुपदा ठरवुनही कागदावर मात्र काही येत नव्हते.. आत्ता मात्र अचानक सणक आली आहे . डोक्यात विचार येतायत.. आणि शाई कागदावर नीट पसरतीय ..
*************
बरोबर वर्षापुर्वीची गोष्ट .. हाच दिवस ..कोंडुसकर मध्ये बसलो होतो .. जस्ट कोल्हापूर सोडत होतो. कडेला कोणतरी समवयस्क तरूणच दिसतोय, हे बघुन मी खुष. तेवढच ४ तास अगदीच बोअर जाणार नाहीत याची गॅरंटी !!. तेवढयात त्याचा फोन वाजला .. आणि, फोनवर तो नाटकाबद्दल काहीतरी बोलू लागला. "रंगकर्मी.कॉम" सुरू केल्यापासून नाटक म्हटले की माझे कान आपोआप टवकारले जातात.. तसेच घडले आणि साहजीकच मैत्रीसाठी हात पुढे झाले. नतंर बोलता बोलता बरेच काही समजले .. आश्चर्याची गोष्ट होती की, तो माझ्याच शाळेचा विद्यार्थी होता आणि , आमचा अप्रत्यक्ष संबंध एका प्रोजेक्टच्या निमित्ताने आलेला होता .अनुज त्याचे नाव . तो फिर क्या , बात बन गई बॉस !! त्या 4.30 तासांच्या मनमुराद गप्पातुन आम्ही बाहेर पडलो ते चांगले मित्र होऊनच. आणि अर्थातच पुन्हा भेटायचे, टच मध्ये रहायचे असे ठरवून.... त्यानंतरचे 6 महिने. जीटॉक असो वा फेसबुक वा फोन ,कोणत्या ना कोणत्या मीडीयम मधुन आम्ही संपर्कात होतोच. तारा जुळत असल्याचे जाणवत होते . आणि मग आम्ही पुन्हा भेटलो ते मे मध्ये.. आणि तिथे या सगळया महोत्सवाचा श्रीगणेशा झाला.. गंमत अशी होती की अनुज 4 वर्षे पुण्यात राहिलेला आणि तिथल्या आर्ट सर्कल मध्ये जगलेला ..अर्थातच पुण्यातलं नाटक त्याच्यात भिनलं होत.. आणि, यातलं काहीही कोल्हापूरात नाही याची खंतददेखील .. सो, काहीतरी करायचं हे त्याच्या मनात होतं आणि माझ्याही.. आणि माझा मित्र केदारच्याही.. केदार तर कंप्लीट नाटकवाला ...त्यानं तर नाटकासाठी आणि नाटकात किती काही केलय याला गणतीच नाही ...
*************
मे २०१० चा शेवटचा आठवडा.. बारावीच्या अभ्यासातुन नुकताच रिकामा झालेलो मी.. देवल क्लबची नेहमीचीच जागा , कुठे कुठे हिंडुन परत आलेला अनुज ,केदार आणि मी . ... मुद्दाही तोच.. काहीतरी करायचचं , ज्यांन कलाक्षेत्रात काहीतरी बदल होईल .निदान असा प्रयत्न केल्याच समाधान आपल्याला मिळेल . हे वेड मात्र आम्हाला आहे हा .. फुकाच बोलण्यापेक्षा आपणच कृती करायची, मग पडलो तरी बेहत्तर ( आणि असं आनंदान खुपदा पडलोय देखील हा !!) .. हा मात्र असल्ल कोल्हापुरी ऍटिट्युड .. खिशात दमडी नसताना रंगकर्मीचा घाट त्यासाठीच घातला.. आणि, आताही तोच विचार चालू होता..
त्याच्या आधीच २-४ दिवस सचिन कुंडलकरमुळे मीही बऱ्याच नाटकवाल्यांना भेटून आलेलो. नवीन ओळखी , नवीन विचार आणि नवीन जग . या सगळ्याच गारुड होतच ... २ तास आम्ही बोलत होतो, असेच, आम्ही अनुजच्या घरी गेलो. त्याने एक व्हीडीओ लावला.. आणि, आमची तोंडे उघडीच राहिली. फिरोदिया करंडकातल्या एका विजेत्या नाटकाचा तो व्हिडीओ.एक से एक कलाप्रकार आणि बरंच काही .ऑसम ओन्ली ...हे सगळ आम्हाला माहितच नव्हत.. डबक्यातले शहाणे आम्ही सगळे .. आता जर का हे डबक आहे हे आम्हाला कळालय तर ते इतराना सुद्धा सांगायला हवं. नाटकाचा मॉडर्न प्रकार, निदान काही चांगली नाटके तरी कोल्हापूकरांना दाखवायचे ठरले.. आणि पक्के झाले, नाटयमहोत्सव करायचा ...इतिहास फार मोठा होता , पण वर्तमानात काहीच नव्हतं.. शंभुराजे चा प्रयोग प्रेक्षक नाहीत म्हणुन रद्द करावा लागला होता .. वर्षाला कुठेतरी एखादे प्रॉडक्शन होत होते .. हे सगळ बदलायला हव अस बर्याच जणाना वाटत होत पण कुणीतरी सुरवात करायला हवी होती आणि आम्ही ती करणार होतो. आणि या निर्णयाबरोबरच माझ्याही अनुभवांचा प्रवास सुरू होणार होता.. काय घडणार होते ते काही माहित नव्हते .. पण माझ्या लाडक्या सलीलदांच्या गाण्यसारखे " ना अंदाज कुठले ना अवधान काही " म्हणुन आम्ही पुढे जाणार होतो .हा मार्ग योग्य आहे का या प्रश्नासह सुरवात झाली " रंगकर्मी.कॉम प्रस्तुत नाट्यमहोत्सव कोल्हापुर २०१० ला " बाकी काही नसले तरी एवढे मात्र कळत होते की माझ्या वैयक्तीक लाईफमध्ये काहीतरी भन्नाट मात्र घडणार आहे .
********
हुश्श.. यानंतर मग पत्राची भाषा ते बजेट. सगळ करताना खुप मजा आली . सुरवात झाली डीसीजन घेण्यापासुन .. स्टार्ट तु एंड डिसीजनच डिसिजन.. अनुभवी पैलवान असा कोणी नाहीच, पण, पहिलटकरणाची बातच काही वेगळी असते मित्रानो .. नाटके ठरवणं, ती खरोखर चांगली आहेत का हे पाहणं, मग, त्यासाठी नाटक बघितलेले प्रेक्षक हुडकुन त्यांना फोन. नाटककारांना फोन, डेटस.. नाटक महत्वाची की महोत्सवांच्या डेटस. बरच काही .३,४ आणि ५ जुलै . पाऊस मध्येच येऊन सारे ओम फस्स तर करणार नाही ना ? डोक्यावर टांगती तलवार होतीच ... " आनंदभोग मॉल " आणायचच होत .. पण अचानक त्यातल्या एका कलाकाराला लंडनला जाव लागल .. मग काय करायच ? प्रश्न आणि प्रश्न ... आणि, अंतर्गत लागेबंध्यामुळे जेंव्हा तिन्ही दिवस, एकच नाटयगृह मिळणार नाही हे समजंलं, तेंव्हा कोणाच्याही पाया न पडता शाहु स्मारक आणि केशवराव भोसले मध्ये महोत्सव घ्यायचा धाडसी निर्णय.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोल्हापूरकरांना आवडतील ,पचतील अशी नाटके आणायचा आटोकाट प्रयत्न.. आता आठवतानाच माझच मला आश्चर्य वाटतय ... चर्चा, फोन, खासबागमध्ये मिसळ खाताना डोक भंजाळायचं.. "न येती उत्तरे" हे समलिंगी संबधावरच नाटक इथ आणायचं नाही अस ठरवलं.. अर्थात दिग्दर्शकांच्या मनात थोडासा राग आणि आढी.. पण इथला प्रेक्षकवर्ग बघितल्यावर त्यांनी दिलेली योग्य डिसिजनची कबुली.. भारत बंदलाही कार्यक्रम ठेवण्याचे धाडस . आणि त्याला झालेली सर्वात जास्त गर्दी.. आणि, मह्णुनच डिसीजन मेकस् चेंज ची सारखी होणारी आठवण..
**********
'बोलणार्याचा दगडही विकला जातो' .. अगदी खर !!आज मी या वाक्याचा दिवाना आहे. कारण अनुभवान त्या वाक्याच महत्त्व कळलय.. या इव्हेंटमध्ये सर्वात मोठा पार्ट होता तो डिलींगचा .. सुदैवाने, माझ्या लहान वयामुळे, तो फारसा माझ्यावर आला नाही/मी घेतला नाही. पण इतरांच्या कडेला बसुन खुप काही शिकायला मिळाले.. पैसा उभा करणं आणि तेवढ्याच पैशात सगळ बसवण .कारण , काहीही झाल तरी पैशाच सोंग घेता येत नाही .त्यात नाटक , तेही प्रायोगिक .... थोडक्यात समाजातल्या एका वर्गासाठीची गोष्ट . त्यामुळे फारसे पैसे मिळणार नव्हतेच . अस असताना हा सगळा डोलारा फक्त आणि फक्त योग्य डिलींगवर जमणार होता.. कधी गोड बालून, कधी आवाज वाढवुन , तुटणार नाही इतकं ताणुन ते जमलं. अनुज ,केदार न जमवलं .पैशाच्या बाबतीत पडु नकोस रे !!!! लहानपणापासुन कोण ना कोण बोलायचेच ... त्या भीतीमुळ असेल कदाचित . पैशाची जबाबदारी कधी घ्यावीशीच वाटली नाही .. पण कडेला बसुन कुणाच कुठे नाक दाबलं की तोंड उघडतं ते कळालं. मीटींगचा अभ्यास , उत्तराला प्रत्युत्तर कसं द्यायचं.. बरचं शिकायला मिळालं , मी जर का एम.बी.ए. केलं तरी मी हे सगळं शिकू शकणार नाही, याची आज मला गॅरंटी आहे.. या महिनाभराच्या काळात वणवण फिरताना, नंतर मिडिया सांभाळताना ,कार्यक्रमावेळी 10 जणांची टिम सांभाळताना लक्षात एवढे मात्र आलं की, ज्याला जीभ नीट वापरता येते, तो जग बदलु शकतो..
************
''महोत्सवाच्या आदल्या आठवडयात , अगदी तीन दिवस आधीपर्यंत झोपच लागली नाही..''कारण नेहमीचचं, पैसा.. सकाळ आणि रेडिओ मिरची कधीचीच पाठिशी होती.. पण त्यातुन ते लोकांपर्यंत पोहोचणार होत . पण मुळ जे लागणारे ते पैसे हातात नकोत का ? हवेतल्या गप्पा सगळेच मारतात . आम्हीही त्यातलेच एक होतोय का काय त्याची भीती वाटत होती . अर्थात , त्यासाठींच आम्ही आणि सँट्रो प्रचंड फिरत होती. बावडेकर कांकासारखी दिलदार माणसे जवळ होती ,पण ते पुरस नव्हतं. म्हणुन मग भटकणं .कधी दारावरूनच परत फिरत होतो, तर कधी अगदी शेवटी भरवशाच्या म्हशीला टोणगा बसत होता.माणस कशी असतात याचे बहारदार नमुने मात्र फुकटात बघायला मिळाले . एकदा तर आम्ही एका हॉटेलात बसलो होतो.. लक्षात आलं की, 15 दिवसापूर्वीही आम्ही इथच बसलेलो आणि तेंव्हा जेवढी रक्कम आमच्या हातात होती , त्यात 1 पैशाचीही वाढ आज झालेली नाही.. सुत्र हालत होती, नाटक ठरत होती.. अपरिहार्य कारणाने एक दोन बदलली देखील.. कार्यक्रमही ठरले.. पण, घोडं अडतं होत एकाच जागी .पैसा . .. शेवटी मित्र कामाला आले.. आणि एक कंपनीने हात दिला. त्यानी स्पाँसरशीप दिल्याचे कळाल्यावर मी नाचायचाच बाकी होतो . नंतर कार्यक्रम वगैरे बेस्ट झाला.. पण पैसाच बोलतो हे सत्य मनावर रूजले ते कायमच ..
********
माझा फेसबुक चॅट नेहमी ऑन असतो. तुझा जन्म नेटवर झाला आहे का ? असा जोकही काही जण करतात .. पण मी इंटरनेट सेव्ही आहे.. आणि, कोणीही काहीही म्हटले, तरी मला त्याचा फायद्यांचा अनुभव आहे, आणि अभिमान देखील . कारण, आमचा अख्खा नाटयमहोत्सव उभा राहण्यात नेटचा वाटा प्रचंड आहे.. आशिष, सचिन सगळे नेटवरच भेटायचे .... सर्व नाटके, सर्व चर्चा सगळं नेटवरच व्हायचं.. आणि फेसबुकमुळे तर १००० लोकाना आमच्या महोत्सवाबद्दल कळाले .. पैशाच्या भाषेत फुकटची जाहिरात .... याशिवाय आम्ही कोल्हापूरात. आणि मनस्विनी , प्रमोद काका असे बाकी सगळे मुंबई, पुण्यात.. इतकेच काय, तर आम्ही टीम मेंबर्सही चॅटवरच बोलायचो. कारण हा घाट घातलेला असताना अनुज आणि मी आमच्या आमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये बिझी होतो, तर केदार त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये ,सो, नेट वॉज द बेस्ट वे.. या टेक्नॉलॉजीचे, मग हजारवेळेला वेगवेगळया लोकांच्या मोबाईलने आम्हाला टोलवले असले तरी आभार मानावेच लागतील.
******
मी हे मान्य करायलाच हवं, की या आधी खाणं, पिणं, झोपणं, अभ्यास आणि मनोरंजन इतकं माझं आरामदायी जिवन होतं.तेच माझ वर्तुळ होत .. आणि, दुनियादारी मी काही म्हणजे काहीही बघितली नव्हती, माझं व्यवहारज्ञान शुन्य होतं (ते आजही तसंच आहे ;) ) ..पण, या महोत्सवाने मला आनंद , मानसिक समाधान वगैरे दिल .पण खुप शिकवल देखील ... मला माणसांचे अतिप्रचंड नमुने बघायला मिळाले. अगदी, ऍक्टिंग येत नसलेल्या, पण आवाज पोहोचत नाही म्हणून थिएटरवर राग काढणाऱ्या सो कोल्ड कलाकारापासुन ते चार वर्षाच्या प्रामाणिक चिमुरडया कलाकारापर्यंत... तिकिटांचे कटींग करुन देणारे सज्जन प्रेसवाले, ते पै आणि पै वसुल करणारे उद्योजक .केशवरावचा हातावर पोट असणारा अटेंडंट, तर बऱ्याचदा राजकारणी पध्दतीने टोलवून लावणारे राजकारणी माणसे . सतत पाठिशी असणारे देशमुख सर ( जिल्हाधिकारी ) ... माणसं आणि चेहरे आणि माणसांनी पांघरलेले मुखवटे ...
कोणीतरी काही करतंय म्हणून त्याला मदत न करता त्यात आम्हाला सन्मान मिळत नाही म्हणून खळखळ करणारे , दबाव आणारे सो कोल्ड ज्येष्ठ आणि सहकारी रंगकर्मी..ज्याच्या बोटात जादू आहे आणि ज्याने ती आमच्यासाठी खळखळ न करता वापरली तो मित्र मयुर . मिरची सारखा ब्रँड एका शब्दात आमच्या पाठीमागे उभा करणारा दुसरा मयुर . माणसचं माणसं.... जाता जाता, भल्या बुर्या अनुभवांनी का होईना ही सारी आमचं अनुभवविश्व समृध्द करून गेली, एवढं मात्रं खरं..
*********
प्रत्यक्ष फिल्डवर्क ही खरी कसोटी..माणसांचे मॅनेजमेंट.. अचानकपणे रेडिओवर बोलायला लागणं.. आणि अशाच अचानकपणे एक परिसंवाद कंडक्ट करायला लागणं.. छातीत कसं धडधडतं याचा अनुभव पहिल्यांदा आणि प्रकर्षानं आला. अंगात असलेला आळस . पडलेलं टोपण नांव आणि फजिती .. हाताला हात देणारे मित्र.. नाटक संपल्यावर घरी जातानाही असणारे टेन्शन.. हुरहुर, प्रतिसाद काय आणि कसा. हॉटेल वरचा चहा ते वैचारिक गप्पा. आणि, सर्वत शेवटी सगळं पार पडल्यावर झालेला आनंददेखील. समाजातल्या एका मोठ्या क्रॉस सेक्शनची ओळख झाली . माझ्यातलं माणूसपण जागं झालं.. खुप मोठं काम झालं.. कार्यक्रमानंतर जेव्हा ऍडमीशन चा निर्णय चालला होता . तेव्हा प्रॅक्टीकल विचार करायला जमल, खंबीर राहता आलं आणि या इव्हेंट न मला बदलवलय याची जाणीव पहिल्यांदा झाली
******
माझ्याशीच चर्चा करताना कोणीतरी म्हणालेलं ''या महोत्सवानं सामान्य माणसाला झाट्ट फरक पडत नाही.''.. तुम्हालाही तेच वाटलं असेल. की तुमच्या हट्टापोटी एवढं सगळ झाल . . आम्हाला काय फरक पडतो आणि पुढे काय? पहिले पाढे पच्चावन्नच का ? अशाने काही होत नसते .. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली असेल फक्त . वगैरे वगैरे ... सुदैवाने हा फक्त हट्ट राहीला नाही. या महोत्सवानं एक सुरवात झाली. नक्की नाटकात काय चाललयं हे लोकांना कळालं..इथले रंगकर्मीही जागे झाले.. नक्की आपली दिशा काय असायला हवी याची जाणीव झाली. ग्रिप्स प्रकारच नाटक , अमृत संजीवनी सारख नृत्य नाट्य , मनस्वीनीच एकमेकात .. एवढ सगळ चालु असत हा आवाका लोकाना समजला. श्याम मनोहरांच साहित्य संमेलनात झालेले भाषण बघता आल . चर्चासत्र फक्त फॉर्मल न राहता लिखाणावर हिमाशु आणि प्रमोद काळे यांच्या संगतीने खरीखुरे चर्चा घडली .. आणि, केशवरावच्या कडेच्या टपरीवर टाईमपास गप्पांच्या जागी चर्चा झडल्या आणि,गटतट मोडून काही तरूण मुले एकत्र आली. काहीतरी घडलं.. मरगळ मोडून पडली.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विचार सुरू झाला.. महोत्स्वाच्या आधी 2 वर्षात जेवढी नाटक झाली, तेवढी गेल्या फक्त 3 महिन्यात झाली. 90-100 नवे प्रेक्षक तयार झाले आणि कोल्हापूरात काहीतरी सुरू आहे हा विश्वास सगळयांना मिळाला..आणि आत्ताच शाहु नाट्यमंच ची स्थापना झाली आहे .. सर्व गट तोडुन नाटकवाले एकत्र आलेत .. शिबिर करतायत .. यात केदारही आहेच ... आणि , शाहु नाट्यमंच आयोजित नाट्यमहोत्सव लवकरच कोल्हापुरकरांच्या भेटीला येतोय .. एखादी चांगली गोष्ट घडताना एक लीडर आणि इतर फॉलॉअर असे कधीतरी व्हावे लागते हेही इथल्याना पटलेय ... कधी न झालेले महोत्सव आत्ता होतायत, हे करायचे धाडस येण्यात १ % वाटा तरी आमचा असेलच की .... पहिल्याचवेळी, आमच्या पोत्यात एवढं संचित पुरेस आहे, नाही का!
*******
हुश्श.. हे सगळं झालं आणि आज त्यावरचं लिखाणही.. खुप काही दिलं या सगळयानं.. पुर्वी मला कोल्हापूरातलं काही माहिती नव्हतं .आता ५ % तरी कळल ..काही करता येईल याचा आत्मविश्वास आला. अनुभवाची आणि ज्ञानाची पोतडी भरली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी बराचसा जमिनीवर आलो. कारण या जगात आपण एका मुंगीएवढेही नाही हे कळाले . तरी देखील , एकदा एक छोटासा मुलगा मला बघितल्यावर "हा टीव्हीवरचा दादा" असे ओरडला. तेंव्हा, माझा ''मी'' कुरवाळला गेला.. आज, हे लिहितानादेखील कदाचित या ''मी'' लाच मी कुरवाळतोय .पण , एक इव्हेंट कशी उभी राहिली आणि त्यातुन नक्की मिळत तरी काय हे कळेल ना .. हे यशाबद्दलच , अपयशाबद्दलच सांगण नाही . हे काहीतरी करण्याबद्दलच सांगण आहे ... प्रत्येकाच फील्ड वेगळ .. पण ठरवल तर काही करता नक्कीच येत , ही उमेद माझ्या मित्राना मिळायला हवी . कोणताही व्यावसायिक नफा , एक फुटकी कवडीदेखील यातुन स्वतःला मिळवायची नाही असे ठरवुन केलेला कार्यक्रमही यशस्वी होतो हे सत्य सांगण महत्त्वाच. परवा , एक पुण्यातली स्पर्धा कोल्हापुरात आली आणि गंडली . का तर , सगळीच लोक केस पिकलेले ... आमच्या १५ जणांच्या टीम मध्यल्या सर्वात मोठ्या कार्यकर्त्याचे वय ३१ वर्ष होत ... तरुणाई काही करु शकते हे ज्येष्ठाना कळायला हवं ... एवढच हे सगळ लिहिण्याच प्रयोजन ... त्यातुनही हे लिहिताना जी आत्मस्तुती आली असेल ती माझा दोष ... आणि तसही एकदा बाहेर पडू दे हे सगळ .. कारण, या ''मी'' ला मोठा होउ न देणं, हेच माझं काम आहे,आणि आता त्याला बाटलीत बंदही करायचय .. कारण ते जमलं तरच मी जगु शकतो. मी , आम्ही काही जग जिंकलय ,वेगळ केलय अस काहीही नाही , आणि काही झालं असेल तर ते आपोआप झालय हे मला माहित आहे .. मी एका सुखवस्तु घरातील मुलगा आहे आणि संजय भास्कर जोशी म्हणतात तसे अशा परिस्थितित मी असले काही पालथे धंदे केले यात फारस नवीन नाही.. बरोबर, आहे ते.. आणि बरचस जमलंय, पण बरचस चुकलय देखील. एक मात्र आहे, काहीतरी करण्याची जिद्द आणि तरूणाईचा जोष भरभरून आहे. तो टिकवायचाय .. या मिळालेल्या शिदोरी वर खुप काही करत राहायचयं.. कारण करण्यासारखं खुप आहे आणि मंझील फारच दूर आहे.
************
( फार पुर्वी लिहिलेला हा लेख एका साप्ताहिकात प्रसिद्ध होणार म्हणुन इथे प्रकाशित केला नव्हता .. हा लेख या आठवढ्यात येतोय असे मागच्या आठवड्यात कळाले . तेव्हा तो मिपावर टाकु असा विचार मनात होताच . तोच ,परवा रात्री एका नाटकाच्या प्रयोगात असताना पणशीकर गेल्याचा फोन आला . मला , नाटकात काम करण्याची आवड तयार होण्यात पणशीकरांचा मोठा वाटा होता . सातवी ,आठवीत असताना त्यांच्या आश्रुंची झाले फुले आणि तो मी नव्हेच याची पारायणे झाली होती . तिथुनच आवड निर्माण झाली . इव्हन ,पणशीकरांंचे तो मी नव्हेच प्रत्यक्ष बघायचा योग आला . पुढच्या दोन पीढ्याना मी नक्की सांगु शकेन की स्वतः पणशीकरांचे तो मी नव्हेच पाहिलय ... हा लेख ही त्यांना विनम्र श्रद्धांजली ..........)
प्रतिक्रिया
15 Jan 2011 - 8:40 pm | यशोधरा
छान रे :) तुला खूप शुभेच्छा.
15 Jan 2011 - 9:05 pm | ईन्टरफेल
,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .
२ क्वार्टर देसिचि मारलि रे दादा?
बकि तुझ काय कल्ल नाय ब्बा
येड्छाप
15 Jan 2011 - 10:57 pm | देशपांडे१
लेख छान आहे,
..
बाकी टारझनशी सहमत.
15 Jan 2011 - 11:09 pm | मितान
खूप छान उतरवलंयस रे !
तुला खूप खूप शुभेच्छा :)
16 Jan 2011 - 12:07 am | डावखुरा
छान प्रकटन....
उत्तम प्रयत्न ...त्यातुन साकारलेल्या एका चांगल्या उप्क्रमाच्या यशस्वीतेबद्दल आपले अभिनंदन..
16 Jan 2011 - 12:38 am | प्राजु
छान!! चांगलं लिहिलं आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा!
16 Jan 2011 - 8:21 am | ५० फक्त
रंगकर्मी. कॉम ची बॅकस्टेज स्टोरी आवडली.
हर्षद.
16 Jan 2011 - 9:26 am | सुधीर काळे
विनायक, बर्याच दिवसांनी 'मिपा'वर पाहिलं तुला आणि मनात आलं, "देर आये, दुरुस्त आये". लेख छान लिहिला आहेस!
पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा!
16 Jan 2011 - 10:22 am | वेताळ
तुझ्या चिकाटीचे मला जाम कौतुक वाटते.
16 Jan 2011 - 12:59 pm | विनायक पाचलग
धन्यवाद सर्वांचे
16 Jan 2011 - 3:10 pm | पिंगू
विनायक लगे रहो.. पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.. बाकी कुठल्याही गोष्टी सहज मिळवता येत नाहीत हे खरच..
- पिंगू
16 Jan 2011 - 3:24 pm | ऐक शुन्य शुन्य
कोल्हापूरला अश्या प्रयत्नाची गरज आहे !! मुम्बई, ठाणे अनी पुणे सोडुन नाटकाना प्रतिसाद तुलनेने कमी मिळतो.
खूप शुभेच्छा!
17 Jan 2011 - 9:11 am | विनायक पाचलग
अगदी !!!!
17 Jan 2011 - 12:23 pm | छोटा डॉन
पाचलग साहेब, लेख आवडला बरं का, मस्त लिहले आहेस.
प्रयत्न चालुच ठेवा, यश नक्की आहे.
- छोटा डॉन
17 Jan 2011 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार
छान लिहिले आहेस.
तुझ्या कार्याला शुभेच्छा.
17 Jan 2011 - 12:38 pm | sneharani
मस्त लिहलय!
17 Jan 2011 - 2:13 pm | अमोल केळकर
पुढील उपक्रमास शुभेच्छा !!!!
अमोल
17 Jan 2011 - 2:13 pm | अमोल केळकर
पुढील उपक्रमास शुभेच्छा !!!!
अमोल
17 Jan 2011 - 3:35 pm | प्राजक्ता पवार
छान लिहिलं आहेस .
शुभेच्छा .
17 Jan 2011 - 4:18 pm | गणपा
खुप छान लिहिलयस रे विनायका.
पुढिल कार्यासिद्धिसाठी शुभेच्छा !!!!
17 Jan 2011 - 6:24 pm | विजुभाऊ
चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा
17 Jan 2011 - 8:55 pm | उल्हास
शुभेच्छा
19 Jan 2011 - 5:09 am | निनाद मुक्काम प...
अभिनंदन
तुमची नाटकाविषयी विषयी तळमळ व जिद्द आणि चिकाटी व धडाडी साठी खास कौतुक