नमस्कार,
गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात. अशीच काहीशी अनास्था विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवरील सदस्यांची एकमेकांबद्दल असू शकते. या सार्या भिंती पाडून विविध संकेतस्थळावरील लेखकांचे, ब्लॉगर्सचे लेखन मराठी आंतरजालावर अधिक दूरवर पोचवावे अशी इच्छा मी-मराठी.नेट च्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती. यातून मी-मराठी.नेट नेच पुढाकार का घेऊ नये असा विचार पुढे आला. याचा पहिला टप्पा म्हणून मीमराठी.नेट व मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे आंतरजालीय ललित-लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.
सदर स्पर्धेसाठी प्रसिद्ध लेखक/समीक्षक श्री. शंकर सारडा, प्रसिद्ध पत्रकार श्री. प्रवीण टोकेकर, व श्री रामदास यांनी परीक्षक म्हणून काम करण्यास अनुमती दिली आहे. मी मराठी तर्फे आणि स्पर्धेच्या संयोजकांतर्फे या सर्वांचे आभार.
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
* स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन जालावर पूर्वप्रकाशित असल्यास या पूर्वी प्रकाशित झालेल्या संस्थळाचा दुवा द्यावा.
* एक लेखक एकाहून अधिक प्रवेशिका सादर करू शकतो.
* लेखनाचा प्रकार हा ढोबळमानाने ललित लेखन असा ठेवण्यात आला आहे. यात स्वतंत्र कथा, लेख, प्रवासवर्णने, लेखक/पुस्तक/चित्रपट/नाटक इ.चा परिचय, या सार्या प्रकारचे लेखन अंतर्भूत होईल. यात अ-साहित्यिक वा विशिष्ट अभ्यास विषयाशी संबंधित तांत्रिक लिखाण स्वीकारले जाणार नाही. लेखन गद्य असावे स्वरूपात असणे आवश्यक आहे. तरीही स्पर्धेत कविता/कवि याबद्दलचे परिचय/आस्वाद लेखन स्वीकारले जाईल.
* स्पर्धा १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१० या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे १ फेब्रुवारी २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
* स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध प्रकाशक ’मेहता पब्लिशिंग हाऊस’ तर्फे पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
* स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मीमराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.
* स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
* सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.
१. लेखन स्पर्धा खुला असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.
२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.
३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप (स्पर्धा-)व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. या निरोपातच लेखकाचे मूळ नाव (स्पर्धेच्या निकालात मूळ नावाचीच घोषणा केली जाईल.), संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता (पारितोषिके पाठवण्यासाठी) देणे बंधनकारक आहे.
४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व संचालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.
५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट चे संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.
८. निकालाबाबत मीमराठी.नेट च्या संचालक मंडळाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट व स्पर्धा-संयोजक बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
______
स्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :
संकेतस्थळाच्या डाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा. व तेथे असलेला "लेखन स्पर्धा २०१०" ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 4:23 pm | दूरदर्शी
गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही.
सहमत
त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.
अगदी खरे
अशीच काहीशी अनास्था विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवरील सदस्यांची एकमेकांबद्दल असू शकते. या सार्या भिंती पाडून विविध संकेतस्थळावरील लेखकांचे, ब्लॉगर्सचे लेखन मराठी आंतरजालावर अधिक दूरवर पोचवावे अशी इच्छा मी-मराठी.नेट च्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती. यातून मी-मराठी.नेट नेच पुढाकार का घेऊ नये असा विचार पुढे आला. याचा पहिला टप्पा म्हणून मीमराठी.नेट व मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे आंतरजालीय ललित-लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भिंती पाडण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य
यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती
आम्ही नक्की प्रयत्न करु. प्रकल्पाच्या यशासाठी शुभेच्छा व आशिर्वाद :)
1 Dec 2010 - 4:54 pm | अमोल केळकर
चांगला उपक्रम. शुभेच्छा
अमोल केळकर
1 Dec 2010 - 4:57 pm | छोटा डॉन
स्तुत्य प्रयत्न :)
आमचा मनापासुन शुभेच्छा :)
- छोटा डॉन
1 Dec 2010 - 7:08 pm | निवेदिता-ताई
खूप चांगला उपक्रम. हार्दिक शुभेच्छा .
1 Dec 2010 - 8:38 pm | प्राजु
उत्तम उपक्रम आहे. खूप खूप शुभेच्छा!
3 Dec 2010 - 11:43 am | अवलिया
मस्त उपक्रम.