मी सध्या शांघाईला वास्तव्यास आहे. इथे ह्या वर्षी बाप्पांचे दर्शन होईल का नाही, बाप्पांची आरती कानावर पडेल का नाही, बाप्पांचा प्रसाद खायला मिळेल का नाही, ह्यासाठी गेले काही दिवस मन कासावीस होत होते. पण बाप्पांच्या कृपेने *श्री. आराध्ये ह्यांचे 'गणरायाचे आगमन निमंत्रण' बघून खूप आनंद झाला.
ठरल्या वेळेप्रमाणे काळ संध्याकाळी, आम्ही( मी, माझी पत्नी शीतल, माझा मित्र नीरज, आणि त्याची पत्नी निशा) चौघे श्री. आराध्ये ह्यांच्या घरी निघालो. घरी पोहोचल्यावर बाप्पांचे दर्शन झाले. शांघाईतले सजवलेले बाप्पा बघून मन भरून आले.
श्री. आराध्ये ह्यांच्या घरी शांघाई मधील जवळपास ३० कुटुंबे गणरायाचे स्वागत करण्यासाठी हजर होती.
तिथे जुने मित्र भेटले आणि काही नवीन मित्रांच्या ओळखी झाल्या.
श्री. आराध्ये ह्यांनी आरती पठन केली.
सर्व जमलेल्या भक्तांनी गणरायाचे दर्शन घेतले.
आरती संपल्यावर संपल्यावर सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला.
बालचमू देखील आनंदाने प्रसाद ग्रहण करीत होती.
मोठे जन देखील गप्पा मारण्यात गढून गेलेले होते.
श्री. श्रीकांत आराध्ये यांच्या निमंत्रणामुळे दूरदेशी देखील आम्हाला बाप्पांचे दर्शन झाले त्यामुळे मी त्यांचा शतश: आभारी आहे.
* शांघाई मध्ये होणार्या कार्यक्रमांमध्ये श्री。 श्रीकांत आराध्ये हे गेली तीन वर्षे प्रामुख्याने भाग घेत होते. सुरुवातीला 'शांघाई मराठी' हा एक खूप लहान ग्रुप होता. हा ग्रुप श्री. चारुहास भेंडे ह्यांनी चालू केलेला होता. एक वर्षांपूर्वी श्री. आराध्ये ह्यांनी आपल्या हातात सूत्रे घेतली आहेत.
'शाघाई मराठी' ग्रुप शांघाई मध्ये दरवर्षी पारंपारिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. जसे कि मकर संक्राती, गुडी पाडवा, गणेशोत्सव. 'शांघाई मराठी' ग्रुप ने नुकताच जूनमध्ये 'स्वर संध्या' आणि श्री श्रीधर फडके ह्यांचा 'फिटे अंधाराचे जाळे', 'गीत रामायण' हा कार्यक्रम शांघाई मध्ये आयोजित केला होता.
शांघाई मध्ये एक 'भारतीय मंडळ' असून त्यांच्या तर्फे दिवाळी, होळी, नवरात्री, आणि काही समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.
तसेच शांघाईतील 'भारतीय दूतावास' यांच्या तर्फे स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस, साजरे केले जातात.
प्रतिक्रिया
12 Sep 2010 - 8:15 am | चिरोटा
छान फोटो.
गणराय चीनी राज्यकर्त्यांना सुबुद्धी देवो.!!
12 Sep 2010 - 8:33 am | अविनाशकुलकर्णी
गणराय चीनी राज्यकर्त्यांना सुबुद्धी देवो.!!
आय आय्य्य्य्य..ह.ह.पु.वा
12 Sep 2010 - 9:00 am | केशवसुमार
मनोजशेठ,
गणपती बप्पा मोरया!!
एकदम दणक्यात साजरी केलेली दिसते गणेशचतुर्थी..
तुम्ही दिलेल्या फोटोमुळे आमच्या बाल मित्र मंदार पोंक्षेचे दर्शन झाले.. मागच्या महिन्यात त्याची आणि आमची चुकामु़क झाली होती... जग खूप लहान आहे हेच खरे..
12 Sep 2010 - 9:29 am | चिंतामणी
क्या बात है.
३० कुटुंबे एकत्र आली हे वाचून आणि पाहून भरून आले.
श्री. आराध्ये यांना शुभेच्छा.
मनोजभौ, फोटुत तु कुठला हे लिहीले असतेस तर बरे झाले असते.
12 Sep 2010 - 5:54 pm | आनंद
पाठीवरती i लिवलय ते असावेत.
12 Sep 2010 - 10:51 pm | केशवसुमार
तो मंदार पोंक्षे आहे..
(खातरीलायक)केशवसुमार
12 Sep 2010 - 11:39 am | चिगो
तसे आजकाल भारतातही "मेड इन चायना" गणपती मिळतात... ग्लोबल गणेश..
12 Sep 2010 - 4:13 pm | सुनील
मस्त झाला की गणेशोत्सव! मूर्ती मेड इन इंडिया होती की चायना?
एका पंजाबी मित्राकडे गणपती होता. सगळ्या आरत्या-भजने हिंदीतून झाली. शेवटी मला आग्रह झाला (गणेशजींचे पेटंट मराठी लोकांनी घेतलय, हे अखंड भारतवर्षाला ठाऊक आहे). मग मीही थोडी आरती-मंत्रपुष्पांजली वगैरे (सदा सर्वदा नाही!)म्हणून महाराष्ट्राची मान उंचावली!
गणेशजींना प्रसादाचा भोग चढवताना पाहून थोडी मौज वाटली!
बाकी असे सणवार सगळ्यांना एकत्र आणण्यास उत्तम!
12 Sep 2010 - 6:19 pm | चतुरंग
लै भारी! शांघाईमधे गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल श्री आराध्ये आणि कुटुंबियांना आमचे अभिनंदन कळवा आणि त्याचा सचित्र वृत्तांत आम्हाला पोचवल्याबद्दल तुमचे अभिनंदन स्वीकारा! :)
आम्हालाही काल इथे गणेशपूजन करता आले. फ्रामिंगहाम इथे राहणार्या साने कुटुंबियांकडे काल गणेशाची आरती आणि प्रसादाचे भोजन करुन मनाने आणि पोटाने तृप्त झालो. बच्चे कंपनीही एकदम खूष होती, आरत्या म्हणणे, टाळ वाजवणे, आरतीचे तबक ओवाळणे हे सगळे चढाओढीने सुरु होते! मजा आली.
गणपतीबाप्पा मोरया!!!
चतुरंग
12 Sep 2010 - 6:29 pm | विलासराव
>>शांघाईमधे गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल श्री आराध्ये आणि कुटुंबियांना आमचे अभिनंदन कळवा आणि त्याचा सचित्र वृत्तांत आम्हाला पोचवल्याबद्दल तुमचे अभिनंदन स्वीकारा!
असेच म्हणतो.
>>आम्हालाही काल इथे गणेशपूजन करता आले.आरत्या म्हणणे, टाळ वाजवणे, आरतीचे तबक ओवाळणे हे सगळे चढाओढीने सुरु होते! मजा आली.
मग त्याचाही सचित्र वृत्तांत आम्हाला पोचवणार असालच त्याबद्दल तुमचेही अभिनंदन स्वीकारा!
12 Sep 2010 - 8:59 pm | प्राजु
आम्ही ही काल आमच्या मराठी मंडळाने मंदीरामध्ये पूजा ठेवली होती व त्यानंतर ढोल्-ताशाच्या गजरात मिरवणूक होती. आम्ही गेलो होतो. खूप दिवसांनी लेझिम खेळलो. मग प्रसाद घेऊन घरी आलो. आणि संध्याकाली आमच्या इथल्या उंडे कुटुंबियांच्या घरी बाप्पांच्या आरतीला गेलो.. तिथेही टाळ, आरत्या.. आणि प्रसाद! बच्चे कंपनी जाम खुश होती. :)
12 Sep 2010 - 10:58 pm | मीनल
आम्ही चीन मधे राहत होतो तेव्हा लिहिलेला हा लेख --चीनमध्ये गणपतीचा आगळा पाहुणचार