नमस्कार मंडळी.
आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते तेच मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल? कदाचित नाही, किंवा माहित नाही.
गप्पांमधे तर्क वितर्क लढवणे एक वेळ जमेल पण एकट्यात स्वतःला हा प्रश्न विचारला तर उत्तर देणे कठीण होवुन बसते, अर्थात आज सगळं सुरळीतपणे चालु आहे म्हणुन असे प्रश्न पडतात, एखाद्या गरीबाला/मागच्या पिढीला (पुन्हा व्याख्या व्यक्तीसापेक्ष ;) ) हा प्रश्न विचारला तर कदाचित त्याला हा प्रश्न समजणार सुद्धा नाही. असो..
खरं तर किती मध्यमवर्गीय लोकांना हा प्रश्न पडतो? किंवा पर्याय निवडायला वाव असतो/वेळ मिळतो?. भारतात बहुतांशी प्रत्येक जण शिक्षण घेतो केवळ चांगली नोकरी मिळवण्याकरता, मला काय करायला आवडतं हे जाणण्यासाठी पुरेशी साधनं/ज्ञान आजुबाजुला असायलाही हवीत ना, आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातुन निसटुन गेलेली असते, अर्थात पॅशन (मराठी शब्द?) साठी वयाची मर्यादा नसते पण मग कंफर्ट झोनचे काय? बायको मुलं आहेत, जबाबदारी आहे, सन्यास नाही घेऊ शकत. मग काय करावं बरं? अशा वेळी लोकं तथाकथित प्रगत देशांकडे बघतात, चुक की बरोबर हेही माहित नाही.
खुपच गुंतागुंतीचा हजारो डायनॅमिक व्हेरिएबल असलेला हा प्रश्न आहे खरा, पण याचं उत्तर शोधणं सुद्धा गरजेच आहे, नाही का? की नाही? जे चाल्लय ते गोड मानुन रहाव?
आपला,
(या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असलेला)
मराठमोळा
प्रतिक्रिया
1 Sep 2010 - 3:41 pm | यशोधरा
छान लिहिलंयस.
1 Sep 2010 - 3:57 pm | सूड
कंफर्ट झोन मध्ये राहून जे आवडतं ते करणं नेहमीच शक्य नसतं, तेव्हा रिस्कची तयारी हवी आणि तितकंच डेडिकेशनसुद्धा (मराठी शब्द ?).
1 Sep 2010 - 4:09 pm | मृत्युन्जय
रिस्क - धोका
डेडिकेशन - समर्पित वृत्ती ??
1 Sep 2010 - 4:13 pm | सूड
धन्यु
1 Sep 2010 - 3:58 pm | आम्हाघरीधन
खरं तर किती मध्यमवर्गीय लोकांना हा प्रश्न पडतो? किंवा पर्याय निवडायला वाव असतो/वेळ मिळतो?. भारतात बहुतांशी प्रत्येक जण शिक्षण घेतो केवळ चांगली नोकरी मिळवण्याकरता, मला काय करायला आवडतं हे जाणण्यासाठी पुरेशी साधनं/ज्ञान आजुबाजुला असायलाही हवीत ना, आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातुन निसटुन गेलेली असते, अर्थात पॅशन (मराठी शब्द?) साठी वयाची मर्यादा नसते पण मग कंफर्ट झोनचे काय? बायको मुलं आहेत, जबाबदारी आहे, सन्यास नाही घेऊ शकत. मग काय करावं बरं? अशा वेळी लोकं तथाकथित प्रगत देशांकडे बघतात, चुक की बरोबर हेही माहित नाही.
पर्याय निवडायचा वेळ असतो... पर्याय निवडायची संधी मात्र नसते, मध्यमवर्गिय लोकांना धास्ती असते कि आवडते तेच करायच्या प्रयत्नात दुसरी परंपरागत पद्धतीची संधी पण गमावुन बसण्याची.. म्हणुन ते मुलांना पर्याय निवडण्याची संधीच देत नाहीत.. काही सन्माननीय अपवाद वगळले तर प्रत्येक मध्यमवर्गिय हा तोलुन मापुनच निर्णय घेण्याला प्राधान्य देताना दिसतो हेच खरे..
1 Sep 2010 - 4:11 pm | मृत्युन्जय
खरं सांगु का? मला माझा पेशा आवडतो. त्यामुळे माझा पास
1 Sep 2010 - 8:19 pm | इंटरनेटस्नेही
हम्म्म.. विचारात पडलो.
(अजुन तरी विद्यार्थी)
इंटरनेटप्रेमी.
1 Sep 2010 - 11:25 pm | चिरोटा
तुम्हाला तुमचा जॉब आवडतो का?
१)होय
२)नाही
३)कधी कधी आवडतो
४)गरजेपुरताच.
1 Sep 2010 - 11:29 pm | चतुरंग
जबराट ठासलाय!!!! =)) =))
कौलरंग
1 Sep 2010 - 11:41 pm | नितिन थत्ते
मी सहा सात प्रकारचे जॉब केले. एखाद्या जॉब मधल्या सर्व गोष्टी आवडतात किंवा एखाद्या जॉबमधली कुठलीच गोष्ट आवडत नाही असे कधीच झाले नाही.
उदा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये डिझाईन करणे, ड्रॉईंग काढणे आवडायचे. पण त्याचे प्रोसेस शीट बनवणे नाही आवडायचे वगैरे.
1 Sep 2010 - 11:51 pm | मराठमोळा
>>मी सहा सात प्रकारचे जॉब केले. एखाद्या जॉब मधल्या सर्व गोष्टी आवडतात किंवा एखाद्या जॉबमधली कुठलीच गोष्ट आवडत नाही असे कधीच झाले नाही.
पण प्रत्येक जॉब हा केवळ पैसे कमावण्याच्या दृष्टीने केला होतात का? की आवड लक्षात ठेवुन मिळवला होता?
भेंडी बाजार,
सद्ध्याचा जॉब आवडतो की नाही हा विषय नाहीये मुळात, स्वतःचं करीअरचं क्षेत्र निवडण्याबद्दल आहे. त्यामुळे कौल बाद. :)
2 Sep 2010 - 12:08 am | नितिन थत्ते
दोन जॉब स्वीकारले ते केवळ पैसे कमावण्यासाठी. एक जॉब स्वीकारला कारण आधीची कंपनी बंद व्हायची शक्यता होती म्हणजे पुन्हा म्हटले तर पैशासाठीच. :)
पहिला जॉब प्रॉडक्ट डेवलपमेंटमध्ये केला. तो बराच आवडला. आधीच्या प्रतिसादात लिहिले आहेच. मात्र याही केसमध्ये डिझाईन हा कॉलेजमधला आवडीचा विषय होता का? याचे उत्तर नकारार्थी आहे.
बहुतेक जॉबमधले मुख्य काम इंटरेस्टिंग असते. आनुषंगिक कामे नावडीची असतात.
आमच्या डिझाईन ऑफिसमधली स्लोगनः Job is not complete till paperwork is done.
2 Sep 2010 - 12:12 am | चतुरंग
पेपरवर्क आवडले! ;)
पेपरवर्क करायचे नसले तर वॉटरमार्क्स उमटवले तरी चालतील! ;)
2 Sep 2010 - 12:17 am | उदय
प्रश्नाचे उत्तर आहे की मला माझी नोकरी आवडते. मला आवडते असे काम आहे, चांगले पैसे मिळतात, ६ आठवडे सुट्टी मिळते, दर २ आठवड्यात शुक्रवारीपण सुट्टी असते, बेनिफिट्स चांगले आहेत, बॉस कटकट्या नाहिये, घरापासून १० मिनिटाच्या अंतरावर ऑफिस आहे. पण सगळेजण असे नशीबवान असतीलच असं नाही. माझ्या नोकरीच्या अनुभवांबद्दल इथे वाचता येईल.
या विचारांशी मी सहमत नाही. जीवनाच्या गरजा पूर्ण होणे अधिक महत्वाचे आहे, आणि त्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे सामान्यवर्गीय सरळ मार्गाने (रिस्क न घेता) नोकरी करताना दिसतो. पैसा असला की रिस्क घेण्याची क्षमता वाढते आणि मग आपण आवडेल ती गोष्ट करू शकतो.
2 Sep 2010 - 12:19 am | ऋषिकेश
मला माझ्या आवडत्या गोष्टींसाठी पैसा पुरवतो म्हणून करतो तो जॉब आवडतो :)
2 Sep 2010 - 12:20 am | माझीही शॅम्पेन
थोडासा "मिड-लाइफ क्रायसेस" च्या अंगाने जाणरा विषय आहे.. माझ्या सारखे बहुतेक जण लोकल मध्ये चढणार्या वा उतरण्यारा गर्दीच्या रेट्या प्रमाणे निर्णय घेतात..
माझ्या मते हे काही डायनॅमिक वेरियबल्स .
१ . अंगावर असलेले लोन (कर्ज) आणि त्याचे हाफ्ते (एमाइ)
२. सध्या करत असलेल्या जॉबचे फास्ट्रेशन कितपत आहे
हे सगळ करताना नोकरी / कुठल्याही उत्पन्नचे साधन नसण हा एक भयंकर प्रकार आहे ..हे नक्कीच लक्षात घेतले पाहिजे
2 Sep 2010 - 12:21 am | सुनील
छान लिहिलयं.
आमची सही पहा. दोन वर्षे होऊन गेली पण बदलली नाही. बदलायची गरज भासली नाही.
जे काम तुम्ही करीत आहात (किंवा कर्मधर्मसंयोगाने तुमच्या गळ्यात पडले आहे, असे म्हणा हवेतर) त्यात आनंद शोधायचा प्रयत्न करा. सुखी व्हाल.
याचा अर्थ अल्पसंतुष्ट रहा असा अजिबात नाही! जरूर अधिक आवडीचे काम शोधीत रहा पण सध्या आहे त्या कामात दु:खी राहू नका! शोधलात तर जगात आनंद भरपूर आहे!
2 Sep 2010 - 12:22 am | शुचि
मला स्वतःला शिक्षकीचा पेशा सर्वात अधिक आवडतो कारण कदाचित माझी आई असेल पण लहानपणीही मी खोटी खोटी मास्तरीण व्हायचे आणि खेळायचे. पण माझी आप्टीट्यूड आहे का त्या पेशाला योग्य तर नाही. ४ चौघातला सभाधीट्पणा, वक्तृत्व, स्वतःला व्यक्त करण्याची खोल क्षमता माझ्यात तितकीशी नाही.
याउलट कॉप्युटरपुढे बसून , जगापासून नातं तोडून मला बरच व्यवस्थित फन्क्शन (वागता) करता येतं. मीटींगमधे मुद्दे मांडण्याचं कसब तेवढं मी हळूहळू आत्मसात केलं आहे. त्यामुळे मला माझा पेशाच आवडतो.
हां माझ्या स्वप्नात मी एक आदर्श मास्तरीण असते. मी मातीच्या गोळ्यांना आकार दिला असता. मी माझ्या वक्तृत्व नैपुण्यानी अनेकांना मंत्रमुग्ध केलं असतं , चिमुकल्या पंखांना बळ दिलं असतं, आशा उर्मी दिली असती वगैरे वगैरे...
पण मला झेपतय काय तेदेखील तर पहायला पाहीजे ना. जेवढी झोळी ज्याची तेवढच दान त्याच्या पदरी.
असो थोडक्यात पाय जमीनीवर ठेवून लेखाजोखा घेतला असता - मला माझा पेशा आवडतो. पण मला शिक्षक मंडळींचा अतोनात आणि एक प्रकारे - wistful/pensive असा आदर वाटतो हेदेखील तितकच खरं आहे.
2 Sep 2010 - 12:27 am | शुचि
ममो एक सांगायचं राहूनच गेलं सुंदर प्रश्न टाकलात. विचार करायला लावलत. मुसुंनी जसा "वहाणा" लेख लिहून मेंदूला चालना दिली तसच काहीसं. अशा प्रश्नांनीच "कोहम" उत्तराच्या जवळ्पास गेल्याचा आभास तरी होतो. कुठेतरी जिगसॉ पझलचा तुकडा सापडल्याचा आनंद मिळून जातो.
धन्यवाद!!
2 Sep 2010 - 11:02 am | सहज
फार फार क्वचित लोकांना जॉब सॅटिसफॅक्शन मिळतं. क्रिकेट म्हणजे सबकुछ असे इतरांच्या असुयेस पात्र करीयर असलेल्या एखाद्या कर्णधाराला त्याला हवी तशी टीम मिळाली नाही, अगदी सचिन तेंडुलकर घेतला तरी जेव्हा तो चुकीच्या पद्दतीने आउट होत असेल, भारत हरत असेल, तेव्हा त्याला वाईट वाटते व जिंकतो तेव्हा आनंद होत असेल. तसेच इतरांच्या आयुष्यात नोकरी धंद्यावर कधी कधी वाईट दिवस, कधी चांगले.
अगदी एखादा सी इ ओ असेल पण मॅनेजिंग बोर्डाकडून साथ मिळत नसेल तर त्याला देखील जॉब सॅटिसफॅक्शन नाही.
पुन्हा वर मुद्दा आल्याप्रमाणे आजच्या जीवनशैलीचे परिणाम असे आहेत की आहे त्या वाढीव आर्थिक जबाबदार्या पेलायला पैशाकरता कामात थोडीफार तडजोड करावी लागते.
मागे एकदा नंदनने एकदा कामधंद्याला 'उपजीविका' म्हणतात ते एका वाक्यातुन अधोरेखीत केले होते. खरी गोम आहे की मग 'जीविका' काय? आज कामावर रोज १५ तास जात असतील तर जीविका कुठली जगत आहोत?
आपल्याकडे 'जन्म मरणाचा फेरा चुकवीला' अशी एक कल्पना आहे. ह्या आयुष्यात हे रोज काम करुन पैसे कमावणे व आपण निवडलेले आयुष्य त्यावर अवलंबुन असणे हा फेरा चुकवायचा आहे. म्हणजेच नेमकी अशी किती रक्कम असावी की समाधान नसलेल्या उपजीविकेच्या नादी न लागताही जीविका आनंदात गेली पाहीजे.
:-)
2 Sep 2010 - 11:17 am | मदनबाण
सहजरावांचा प्रतिसाद लयं आवडला... :)
2 Sep 2010 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
ममो जॉब विषयी कल्पना नाही रे बॉस !
मला कॅफेच टाकायचा होता किंवा हार्डवेअर्-सॉफ्टवेअर सपोर्ट चालु करायचा होता. हे मी डिप्लोमाच्या दुसर्या वर्षाला असतानाच ठरवले होते आणि डिग्री पुर्ण झाल्या झाल्या बरोब्बर १७ व्या दिवशी माझ्या कॅफेचे फर्निचर चालु देखील झाले होते ;) अर्थात ह्या सगळ्याला घरच्यांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानेच हे शक्य झाले.
आपण आपल्या कॅफेत आणि सौंदर्यफुफाट्यात खुश आहोत.
2 Sep 2010 - 12:54 pm | इन्द्र्राज पवार
"भारतात बहुतांशी प्रत्येक जण शिक्षण घेतो केवळ चांगली नोकरी मिळवण्याकरता,"
हे स्थूलमानाने बरोबरच आहे, त्यातही मराठी कुटुंब प्रमुखांचीदेखील हीच माफक अपेक्षा असते. 'अमुक एका क्षेत्रात "नोकरी" ची संधी चांगली आहे, त्यामुळे बाळला त्याच साईडला घालायचे ठरविले' हे एखाद्या सरकारी कचेरीत टी-टाईमला तिन्हीत्रिकाळ कानावर पडणारे ठरलेले वाक्य ! "मग माधुरीला आर्टसकडे का?", "का म्हणजे? अहो रावसाहेब, अजून दोन मुली आहेत मला, एक झाली की दुसरी लग्नाला येईलच. त्यामुळे ग्रॅज्युएट झाली की उडवून टाकायचा बार..!" या बर्याच प्रमाणात अस्तित्वात असलेल्या मनोवृत्तीमुळे मुलगा हा "नोकरी"च करणार असे गृहितक मांडलेले असतेच (काही अपवादही असतीलच, पण तेही 'अपवाद' हा नियम सिद्ध करण्यापुरते).
एका विशिष्ट वयापर्यंत व्यक्ती (३ ईडियट्स काईंड तरूण्/तरूणी) नोकरी वा स्वतंत्र व्यवसायाबाबत "पॅशनेट" (पॅशन = आवेश, आवेग) असतोच असतो. पण काही वेळा पटावर मनासारखे दान पडतेच असे नाही. एकीकडे संधीबाबत होत असलेला कोंडमारा तर दुसरीकडे शरीरावरून कॅलेन्डरची पाने सटकत असतात. अशावेळी पुरात हाती आलेला एक ओबडधोबड ओंडकादेखील दुसर्या किनार्यावर नेईल अशी आशा मनी ठेऊन नियती म्हणेल तो प्रवास करावा लागतो.
"जॉब सॅटिसफॅक्शन आहे का?" या पेक्षा "आहे त्या जॉबमध्ये मी सॅटिसफॅक्शन शोधतो..." ही वृत्ती निदान काही अंशी तरी प्राप्त जगणे सुसह्य करते.
माझे एक नातेवाईक येथील एका स्थानिक महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. या कॉलेजच्या मॅनेजमेन्टने गेल्या ५० वर्षात जिल्ह्यात राहु द्या, पण खुद्द कोल्हापूर शहरातदेखील दुसरे कॉलेज काढलेले नाही, त्यामुळे या प्राध्यापक मंडळींची येथील नोकरी इतकी आरामाची/सुखाची झाली आहे की, ज्या गेटमधून ते नोकरीच्या पहिल्या दिवसासाठी आत आले, त्याच गेटमधून ३०-३५ वर्षानंतर सेवानिवृत्त होऊन बाहेर पडणार. बंगले, फ्लॅट्सदेखील यांनी याच कॉलेजपासून अगदी "वॉकेबल डिस्ट्न्स" वर घेतले असल्याने कामाला येताना वाहतुकीचा कणभरही त्रास नाही. कॉलेजचा पहिला तास सकाळी ७.३० ला असला तरी ७.१५ पर्यंत याने पायात बूटदेखील घातलेले नसतात. शिवाय उभा महाराष्ट्र ज्यावेळी सकाळी ११.३० ला कामात मग्न असतो, त्यावेळी याने घरचा रस्ता आरामात धरलेला असतो. त्यामुळे आता या प्राध्यापक नातेवाईकाला "जॉब सॅटिसफॅक्शन" पोतंभर असणारच (ते त्याच्या सुजलाम सुफलाम देहयष्टीवरूनदेखील दिसतेच), तर यांचाच मेहुणा आहे एम.आर. जो चार जिल्ह्यातून कायमपणे चकरा मारीत असतो. आठवड्यातील पाच दिवस बाहेरच जेवतो. हादेखील आपल्या जॉबमध्ये समाधानी आहेच आहे.
तेव्हा परिस्थितीजन्य 'समाधान' मानने हाच खरा मंत्र असावा, असे मी म्हणतो.
इन्द्रा
4 Sep 2010 - 11:11 pm | पैसा
मला एवढ्या वर्षांत कळलंय ते इतकंच की, काम आणि घर एकमेकात मिसळू देऊ नका. सुखात रहाल!. कामाच्या वेळेला मनापासून काम. पण एकदा घरी आलं की सगळा वेळ घरातल्यांचा. बस्स. अर्थात हा आमचा नोकरी करणार्यांचा अनुभव. बिझीनेस करणार्यांना एवढं अलिप्त रहाता येईल का यावर मी काही बोलू शकत नाहीए.
2 Sep 2010 - 10:29 pm | चिरोटा
वर ह्याबद्दल चर्चा झालीच आहे. वैयक्तिक जबाबदार्या,त्या क्षेत्रात मिळणारा पैसा ह्यांचा कामावर्,त्यात असणार्या आवडीवर परिणाम होत असतो. गेल्या महिन्याच्या Entrepreneur च्या अंकात ह्या विषयीच एक लेख आहे.मुक्ता दरेरा ह्या युवतीने चालु केलेली ireboot नावाची एक कंपनी आहे. आपल्या आवडीचे पूर्ण वेळ नोकरी/व्यवसाय करायचे असल्यास ही कंपनी मदत करते.उ.दा. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी आपली भेट घडवून आणणे,त्या व्यवसायातील खाच खळगे समजावून सांगणे,त्या संबधीत कोर्सेस विषयी तज्ञांचा सल्ला,मदत.. ईत्यादि कामे कंपनी करते. अभियांत्रिकी क्षेत्रातली नोकरी सोडून पूर्ण वेळ फोटोग्राफर,हॉटेल शेफ झालेले काही जण आहेत!!.
जास्त माहिती इथे http://www.ireboot.com
2 Sep 2010 - 11:23 pm | राजेश घासकडवी
हे सालं नोकरी वगैरेचं झंजट काही नको. माझं खूप जुन्या काळपासूनचं स्वप्न आहे. ते सकाळी उठून धावत ट्रॅफिकमध्ये ऑफिस गाठणं नको. रात्री डोकं फिरवून दमून परत येणं. ज्या कंपनीचं प्रॉडक्ट खपतंय की नाही याबद्दल आपल्याला काडीचीही पडलेली नाही तिथे उगाच खोटं हसत, बिनडोक लोकांशी जमवून घेत, खर्डेघाशी करत बसायला सांगितलंय कोणी? आधीच डोक्याला इतर झंजटी खूप असतात, त्यात दिवसातले दहा तास कंपनीच्या झंजटी कुठे सोडवत बसायच्या? आणि या सगळ्यातनं मिळतं काय? कोणी तरी कोणाला तरी काही तरी सतत विकायचा प्रयत्न करत असतो. त्या साखळीतली एक मजबूत कडी होऊन बसायचं. कशासाठी?
बस, आपल्याला हवं तसं जगावं. आपल्याला हवं ते करावं. सकाळी आरामात उठावं. कधी वाटलं तर दिवसभर पुस्तक वाचावं. कधी भर मंगळवारी हाईकला जाऊन यावं. नाहीतर कॅफेमध्ये बसून फॉर्मल कपडे घातलेल्यांची रॅट रेस बघावी. रोज जमलं तर व्यायाम बियाम करावा थोडासा, पोरांबरोबर वेळ घालवावा. दिवाळीला त्यांच्याबरोबर मोठ्ठा कंदील करून सजवावा. उगीच कुठच्यातरी सभांना जाऊन सांस्कृतिक जीवनात सामील वगैरे व्हावं. कधी टाईमपास म्हणून कोर्टात जाऊन बसावं, असंच आपलं. उगच. मनात आलं म्हणून. काही विशेष कारण नसताना.
मग बाकी फार काही मिळालं नाही तरी विशेष बिघडत नाही. घर छोटं असलं, वहान साधंसंच असलं तरी चालेल. तीन वेळा व्यवस्थित जेवायला मिळालं, इंटरनेट वगैरे असलं की पुरे. कपड्यांची छानछोकी नसली तरी काय बिघडत नाही. कधीमधी जावं रेस्टॉरंटमध्ये... पण फार चैन करायची गरज नाही. आयुष्यात बाकी सगळं मिळतं, वेळ मिळत नाही. दिवसाभरात दहा बारा तास मनसोक्त उधळायला मिळाले तर त्याइतकी मोठी चैन नाहोतंय...
वाट बघतोय कधी ते स्वप्न पुरं होतंय...
4 Sep 2010 - 1:53 pm | सहज
एक स्वतंत्र धागा अपेक्षीत! जिव्हाळ्याचा विषय. बाकी आमचे प्रकाशकाका घाटपांडे यांचे आयुष्य थोडेसे वर्णन केल्यासारखे वाटले.
4 Sep 2010 - 8:09 pm | मिसळभोक्ता
हे मी केलंय. माझी जुनी कंपनी विकली गेली. (पैसा बर्यापैकी मिळाला.) मस्त मनात येईल तसे जगावे हे स्वप्न होतेच. (कुणाचे नसते ?)
म्हणून ३ महिने कुल्ले वर करून पडून राहू, म्हणून नवीन काहीही केले नाही. (फक्त मनोगतावर अॅक्टिव्ह होतो.)
पण लवकरच लक्षात आले, की हे निवांत जीवन आपल्याला जमण्यासारखे नाही.
तेव्हापासून खूप सुखी आहे.
मृत्यू यावा तोच काम करताना, अशी देवाजवळ मागणी आहे. बघू तो भाडखाऊ ऐकतो की नाही ते.
4 Sep 2010 - 1:50 pm | मराठमोळा
गुर्जी,
>>हे सालं नोकरी वगैरेचं झंजट काही नको.
सगळ्यांना अशी सुखं मिळतात का? नाही हो. वेळ पण नाही मिळत.
विषय क्लिष्ट आहे मान्य आहे, तुम्ही पण झगडत आहात. म्हणजे प्रश्नांची उत्तरं नाहीत..
:)
आपला,
4 Sep 2010 - 9:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ममो, माझं जुनं स्वप्न होतं जाम पैसे कमवायचे आणि जाम सुखात रहायचं! नंतर समजलं मी जी नोकरी करत्ये त्यात जाम मजा येत्ये आणि चिक्कार पैसाही मिळतोय. पण स्साला अजून काही महिन्यांत संपणार कॉन्ट्रॅक्ट!
4 Sep 2010 - 10:09 pm | वेताळ
असा कोणी सापडणे कठीण आहे.आपले काम आपण उपजिविकेसाठीच करत राहतो.कोणताही पाश न बाळगता मानाप्रमाणे काम करायचे व इतर वेळी भटकत राहयचे हे कोणा एकालाच जमु शकते,पण ते करण्यावर तो खुष असेल का हे सांगणे पण तितकेच कठीण आहे.आपण जे काम करतो ते प्रामाणिक पणे करत राहणे व ज्यावेळी वेळ मिळतो त्यात आपल्याला आवडण्यार्या गोष्टी कराव्यात असे वाटते.
मी माझ्या उपजिवेकेच्या कामात खुष आहे.पण त्यात मला ताण नसतो हे म्हणणे देखिल खोटे ठरु शकते.ताणतणाव विरहित काम आज फक्त स्वप्नात बघण्यास मिळत असावे.