कुठ कुठ जायाचे जाळ्यात -२

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जनातलं, मनातलं
8 Apr 2008 - 7:27 pm

याआधी
कुठ कुठ जायाच जाळ्यात -१

आता लिहायच, छायाचित्र काढायच, चित्र काढायच तरी सगळी सृजनशीलता कामाला लावावी लागते. जरा जपून.....यात बरेच धोके आढळतात. यशस्वी लेखक होण्यासाठी, जाळ्यावरच यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याची माहिती माहितीजाळ्यावरच मिळेल. पारंपारिक पद्धतीबरोबर नव्या मार्केटिंगच्या पद्धती अवगत असतील तर उत्तम अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. आणि त्यांचे फटकारे या माहितीजाळ्यात होणार्‍या सर्व प्रकारच्या लेखनाला लागू आहेत.

आता एक फार महत्त्वाची गोष्ट . जाळ्यात लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत, असे असले तरी त्यांच्या तणावयुक्त कामातून वेळ काढून मराठीच्या प्रेमापोटी ते लेखन करत आहेत हे मात्र तेवढेच महत्त्वाचे आहे.. एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? नाही. तर मुद्दाम अनुभव कल्पत ते लिहीत आहेत. त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा असावा ही साधी अट आहे. उचलेगिरीच्या विरुद्ध ही पिढी एकीकडे अतिशय सजग आहे तर दुसरीकडे जाळ्यावर आले की गेले ..आपलेच नाव घातले तरी काय? अशी धारणा काहींची दिसते.

दुष्काळाने चीनच्या उत्तर भागात कसे भीषण दारिद्य ओढवले यावर लेख लिहायचा असेल तर संपन्नतेने भरलेल्या अमेरिकेतल्या स्टारबक्स कॅफे मधूनही तो लिहिता येईल ही आहे या विश्वजाळयाची कृपा. वराहमिहिरापासून तर कल्पना चावला आपल्या डायरीत काय लिहायची ते सुद्धा जाळ्यावर मिळेल. ही सगळी उत्साही आणि कामसू तरूणाईची कृपा. त्यांच्याहून आपण काकणभर सरस आहोत हे दाखवण्याची कोणतीही संधी वयाने मोठी मंडळी सोडत नाहीत. सोडणार नाहीत. शेवटी त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिले हेच खरे. एकंदरीत शेवट असा की गुगलून माहिती मिळाली नाही तर अशावेळी जाळ्यावरच मदतीला अनेक जण धावून येतात, काळजी नको. शेवटी किती दिवस पाण्यात राहून माश्याशी वैर साधणार? या विश्वजाळ्यामुळे आणखी एक फायदा झाला आहे तो म्हणजे पुढच्या पिढीने काय चांगले केले ते दाखवायला एक तरी हुकमी जागा मिळाली. बाकी आपला फावला वेळ कसा घालवायचा याचे अनेक पर्याय या विश्वजालाने समोर ठेवले . आपण सर्वांनी केलेले जे काही बरे वाईट कार्य असेल अगदी समाजकार्य का असेना त्याचे पुरावे शोधायला आता घट्ट विणलेल्या विश्वजाळामुळे जास्त वेळ द्यावा लागणार नाही!

ही स्वतःला एकीकडे हौशी म्हणवणारी लेखकांची ही जाळ्यातली किंवा जाळ्यावरची पिढी, पेपरात, बातम्यात आपले नाव येण्याच्या स्पर्धेत सामील झालेली आहेत याचा विसर पडू देऊ नका. शेवटी हा त्यांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. स्वतःच स्वतःच्या दर्जाबाबत गप्पा मारणार्‍या मानंकित मासिकात, केवळ स्त्रियांना सवलत देणार्‍या काही मासिकात, पुरवण्यातून लेखन करणारी, आपल्या सोसायटीच्या वार्ताफलकावर लिहिणारी, उच्चपदवीधर असणारी माणसे एकवेळ रोज नियमाने देवाचे स्मरण करत नसतील पण या जाळ्याला एकदा नमस्कार करत असतात. याची कुणकूण लागल्यानेच बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते.

हे सगळ फारच आशादायी आणि गुळगुळीत निरस वाटत आहे ना? म्हणजे चार मराठी डो़की तशी गुण्यागोविंदाने राहाणे?
पूर्वी भावंडात भांडण व्हायची, प्रेमी युगलांत एकमत होत नसे, नवराबायकोत कधी उघड आणि बरीचशी लपून भांडणे व्हायची, शेजारी भांडायचे . शेवट काय तर मग मोठ्याने आवाज, उखाळ्यापाखाळ्या, रडारड, दोन चार शिव्या , चार गुद्दे ! पण सर्वामंध्ये ध्वनीप्रदूषण अथवा कानावर अन्याय हा ठरलेलाच. याचे कारण काय ते प्रेम असो वा रागलोभ मराठी माणूस तसा वृत्तीने रांगडा आणि शेवटी साधा - जे काही करायचे ते वाजत गाजत. त्यामुळे ढोल ताशे नगारे सगळे आलेच.

(गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. एकंदरीत आता शत्रू कोण आणि मित्र कोण ते समजणेच अवघड आहे त्यामुळे सगळे कावे फसलेले आढळतात. ) तर मग या इंटनेटमु़ळे, विश्वजालामुळे जगभर संचार करायची युक्ती हाती आल्याने अनुकूल परिस्थितीत मराठी माणसाचे मराठीप्रेम जे ( कधीचे) गगनापार तर पोहोचलेले होते ते सात समुद्रापारही सहज डोळ्यात भरेल एवढे आता फोफावले आहे हे काही मुद्दाम सांगायला नको. थोडे विषयांतर झाले आहे त्याकरता क्षमा असावी पण मराठी- मराठी बाणा म्हटले की शिवाजी राजांचे नाव न काढता पुढे जाणे पुढच्या सात पिढ्यांनाही शक्य नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल.

आता भांडणाकडे पुन्हा वळू या. चार मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. मंडळाच्या गणेशोत्सवाचे निमित्त्य, परदेशातल्या मराठीमंडळाचे निमित्त्य काही असू दे.. मतभेद हे आलेच. कारण एकमत झाले आणि तेही सर्वांचे तर मराठयांची अस्मिता बुडाली असा भलताच संशय इतरांना येईल. मराठयांची अस्मिता कोण असला फाजील प्रश्न मी विचारणार नाही कारण असल्या फालतू जोकला जाळ्यावर आजकाल कोणी भीक घालत नाही. दारु, बाई, मार , शिव्या यांनी भरलेले विडंबनाची जितकी किंमत तसलाच हा फालतूपणा आहे. तर खाणे, झोपणे आणि भांडणे हे सर्व जन्मसिद्ध अधिकार आहेत निदान मराठी माणसाचे तरी.. हे आजही आपल्यापैकी कुणी विसरलेले नाही.. तरीसुद्धा अशाप्रकारे फार त्रासदायक शेवट असणारे भांडणतंटे होऊ नयेत असे मत असणार्‍या अहिंसेचा पुरस्कार करणार्‍या काही मराठी लोकांनी भांडायला जरा सोपे पडावे म्हणून अताशा या विश्वजाळयाला हाताशी धरले आहे. नियतकालिकातून वाचकांचा प्रतिसाद यायला दिवस लोटत. आता सगळा दोन मिनिट का जमाना आहे. अगदी व्हिडियो कॉन्फरन्सची सोय जरी ब्लोगांवर मिळाली तरी नकोसा प्रतिसाद असला तर आवाज बंदचे बटन दाबले की झाले..ओरडणार्‍याचा फक्त चेहरा दिसेल! जी शक्ती आवाजात आहे ती हावभावात आणणे भल्याभल्याना जमत नाही. जे करायचे ते कर - गेंड्याची कातडी पांघरून मला काही इजा नाही ना हे धोरण जाळ्यात सुरु ठेवता येते हेच महत्त्वाचे.
भांडणाची हौस तर भागते पण रक्तपात आणि ध्वनीप्रदूषण दोन्हीवर नामी उपाययोजना असणारा हा मंत्र निदान जाळ्यावर लोकांना मिळाला आहे. असा नव्या जुन्याचा संगम इथे जाळ्यावर आपल्या लेखनाने साधता येतो.

कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदा का एखादी व्यक्ती जाळ्यात अडकली की ब्लॉग, ऑर्कूट , साईट वरून ती थेट आई बाबा, आजी आजोबा, मामा मावश्या ,मिळवत अगदी जिवश्चकंठश्च पर्यंत... आणि त्यापुढेही .......जाऊ शकते.(कम ऑन नाऊ, इथे सगळेच फुकट आपला वेळ घालवत नाहीत.)
रक्ताचे नाते नाही त्यामुळे नैतिक बंधनाच्या ओझ्याचा प्रश्न नाहीच ! शेवटी सगळे आभासी जग. हा एक धोका ओळखता आला तरच इथे राहणे सुकर होईल. बाकी सगळे अगदी खर्‍या आयुष्यासारखे. 'इथे वावरतांना संगणक बंद की त्यातले जग बंद' असा फुकटचा नको असलेला सल्ला देणारे माझ्यासारखे जीभ पोळलेले लोकही आहेतच. तेव्हा आता इथे आला आहातच तर फक्त कस आणि किती जाळ्यात गुंतायच (कोणाकोणाच्या जाळ्यात्? ऑ? ) हा निर्णय उरला आहे.

वावरमाध्यमवेधलेख

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Apr 2008 - 8:03 pm | प्राजु

विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये...
थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक...

कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल.

एकदम खरं...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले?
प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात
वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त
वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही.
तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा.
वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत.
जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते.
जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे.
जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार.
मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे.
जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच.
बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे.
मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे
हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे.
चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे?
माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते.
लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत
हे कशावरुन?
बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले.
कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते.
वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो.
नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती.
समर्थानीच म्हंटले आहे
जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन !
मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.'

सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन
आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

सुवर्णमयी's picture

8 Apr 2008 - 10:37 pm | सुवर्णमयी

मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2008 - 11:24 pm | प्रभाकर पेठकर

सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे.
विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत.
जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत.
जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन.
असो.
जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन's picture

8 Apr 2008 - 11:46 pm | छोटा डॉन

भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे.
आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो...

माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ...

खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे.
आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला."
आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ...
तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो....
आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..."
आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...]
आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

9 Apr 2008 - 11:59 am | आनंदयात्री

लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 12:33 pm | विसोबा खेचर

अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत.

हा हा हा! :)

एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत.

व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही!

बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते.

उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही!

(गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या.

हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही!

असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही!

असो, चूभूद्याघ्या!

तात्या.

अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो!

असो...

स्वाती राजेश's picture

9 Apr 2008 - 3:43 pm | स्वाती राजेश

सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत.
काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी's picture

9 Apr 2008 - 6:02 pm | सुवर्णमयी

लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.
ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते.

या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत.

इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :)

राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे.

लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला?
या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला.

सर्वांचे त्याकरता आभार.

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2008 - 7:38 pm | स्वाती दिनेश

दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत.
कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल.

हे अगदी पटले.
स्वाती

मदनबाण's picture

10 Apr 2008 - 10:22 am | मदनबाण

मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार.
ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....)

कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे.
सहमत.....

एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही.
एकदम बरोबर

पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल.
१००% सहमत.चांगल ते घ्याव.....

(माहितीजाळा वरील आयटी कोळी)
मदनबाण