कुठ कुठ जायाच जाळ्यात -१

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जनातलं, मनातलं
8 Apr 2008 - 8:29 am

कुठ कुठ जायाच जाळ्यात

काय आहे मंडळी एकदा का जाळयात अडकलात की तुमची सुटका नाही हेच खर. मग ते जाळ सौंदर्यवतीच्या धुंद करणार्‍या सौंदर्याच असो , साखरपेरणीसारख्या स्तुतीसुमनांच्या वर्षावाचे असो, पोलिसी पहार्‍याचे असो की इनकमटॅक्सच्या धाडीचे असो ..किंवा आजच्या या विश्वजालाचे सुद्धा! एकदा का आत आलात की बाहेरचा रस्ता बंद एवढच लक्षात असू द्या.

तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्‍या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्‍यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..)
कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे.

अदयावत संगणकीय तंत्रज्ञान हाताशी असल्याने सर्वकाही वाचण्याची, ऐकण्याची सोय आता विश्वजाळ्यामुळे शक्य झाली आहे. वेगाने होऊ घातलेल्या 'डिजिटायझेशनमुळे' आपल्याला हवे असणारे पुस्तक, नवी जुनी गाणी, सिनेमा , कादंबर्‍या , पुस्तके हे सर्व माहितीजाळयावर उपलब्ध आहे अधिकाधिक प्रमाणात भविष्यातही होतच राहील यात तिळमात्रही शंका नाही. आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्‍यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल. त्याला केवढी 'मेगा डिमांड' आहे हे लक्षात घ्या. (काही शब्द इंग्रजी वापरले की खास वजन येते असे अनेक मान्यवर लेखकांच्या लेखनातून आढळले आहे. म्हणून तसेच करण्याचा माझाही भाबडा प्रयत्न आहे असे समजा आणि मराठी प्रेमीं रसिकांनो मला मोठ्या मनाने क्षमा करा. )

तथाकथित कथासंग्रह, कादंबर्‍या, मासिके अशा काळ्या पांढर्‍यावर आणि शेवटी रद्दीच्या ढिगार्‍यात जमा होणार्‍या काही क्षूद्र कागदी कपट्यांवर फारसे विसंबून न राहणारी एक जमात आहे. ती अतिशय प्रगल्भ, प्रतिभावंत आणि ताज्या दमाची पिढी कधीचीच या जाळयात आपल्या लेखनाचा झेंडा मोठ्या दिमाखाने फडकावित उभी आहे. शेवटी वरवर अगदी सहजशक्य वाटणारा हा मामला अतिशय नाजूक आहे हे सांगायलाच हवे. आज चार वर्षाच्या पोराला त्याचा स्वतःचा ईमेल आयडी हवा असतो. त्याला वावरायला कायद्याने परवानगी असणार्‍या काही साईटस् म्हणजेच संकेतस्थळांना तोटा नाही. अगदी मराठीचा विषय काढलात तरी मराठी गोष्टी आणि बालगीते ऐकण्याची सोय आज त्याकरता उपलब्ध आहे. काही काळाने लहान बाळाच्या रडण्याचे 'डिकोडिंग' करून ही माणसे आपल्य पिल्लूला हे नकोय , ती साईट हवी आहे असे म्हणाली तरी मला वावगे वाटणार नाही. अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे. नव्या काळाची पावले ओळखण्यात चतूर असणार्‍यांनी म्हणूनच या समांतर विश्वाला आपल्या मुख्य पानावर वेळीच मान द्यावयाला सुरुवात केली आहे.

तुमच जे काही खर खोट, खाजगी सावर्जनिक आयुष्य असेल नसेल , आपण एक दोन चार पाने ,एक दोन बुक वाचत असाल नसाल तरी त्यावर ठासून चार मराठी ओळी खरडता आल्याच पाहीजेत अशी अट आणि अपेक्षा आज गृहीत धरली आहे. आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा......
तिचा विषय आला की शेवटी जरा हळूवार आणि हळवे सुद्धा व्हायलाच हवे. सर्वांनीच विशेषतः पुरुषांनी. बायकांनी पारंपारिक लाजणे इत्यादी सोडले असले तरी पुरुषांकडून पूर्ण होणार्‍या अपेक्षात पुरुषांकडून मिळणारा अनुकूल प्रतिसाद आजही कायम आहे. मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच. तोच मुद्दा पुरुषांना सुद्धा लागू आहे. चार पुरुष आयडिचे प्रतिकूल प्रतिसाद ते झेलतील पण एखाद्या फुलाचे काटे बोचले तर मात्र घाव अतिशय खोल जातो.....तेव्हा जाळ्यावर कस वागयच ह्याच अतिशय लवचिक धोरण असू द्या.
क्रमशः

वावरमाध्यमवेधलेख

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Apr 2008 - 7:53 pm | प्राजु

हा पहिला भाग अतिशह वेल बलन्स्ड आहे.

आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे.

खरंतर, ही सद्यस्थिती आहे. प्रत्येकाच ब्लॉग असणं.. ही गरजच बनली आहे.

लेखाचा पहिला भाग सुंदर.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 1:23 am | विसोबा खेचर

सोनाली,

हा भाग आवडला, छान लिहिला आहेस, मोकळेपणाने लिहिला आहेस.. अभिनंदन!

दुसरा भाग अद्याप वाचायचा आहे. तो उद्या जरा सवडीने वाचेन..

काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच.

हो, मग का नाही येणार? का येऊ नये?

ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्‍यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.

अनुभव घेतोच आहे की! काही मोजके अपवाद सोडल्यास, "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!

सोनाली, आता मला तू कदाचित असं म्हणशील की या मंडळींशी तुलना करू नकोस! तर त्यावर मी विचारेन की का तुलना करू नको?

वरील सगळे उत्तुंग लेखक वाचल्यावर "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार " असंच मला आजच्या पोरांचं लेखन वाचून म्हणावंसं वाटतं! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मीही एक जालावरचा लेखक आहे, परंतु मीही ह्या आजकालच्या पोरांतच जमा आहे हेही कबूल करतो! एवढ्या प्रचंड मोठ्या मराठी जालावर सर्व सोयी हाताशी असताना, मोजके अपवाद सोडल्यास आपल्याला वरील मंडळींइतकं उत्तुंग कुठे काय वाचायला मिळतं सांग पाहू??

तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल.

हम्म! करमणूक, ज्ञानवर्धन इतपत पातळीपर्यंत साहित्यिक भरारी मारली आहे हे मीही मान्य करतो. परंतु कथा/लेख/काव्य या बाबतीतल्या उत्तम ललितलेखनाबाबतीत अजून जालावर बर्‍यापैकी वानवा आहे! काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! उगाच आंतरजालावर लिहिण्याची सहज सोय आहे म्हणून कुणी कुसुमाग्रज होत नाही! त्याकरता आंतरजालाची नव्हे, तर उत्तुंग प्रतिभेची गरज आहे. आंतरजाल हे केवळ एक माध्यम आहे!

यात मी आंतरजालावरील लेखकांना मुद्दामून कमी लेखतो आहे असं नव्हे! नक्कीच नव्हे! आज मिपावर, मनोगतावर, मायबोलीवर अनेक मंडळी लिहीत आहेत. मी यातलं बरचसं लेखन वाचतो. ते जर चांगलं असेल तर मलाही ते तेवढ्यापुरतं आवडतं, अगदी नक्कीच आवडतं! मीही त्या लेखनाला मनमोकळा प्रतिसाद देतो! परंतु फावल्या वेळात कधी काही जरा निवांतपणे वाचत बसायचं असेल तर आजही मला शिरुभाऊ, पुलं, दळवी, कुसुमाग्रज, यांचीच पुस्तकं काढून वाचत बसावंसं वाटतं! माझी ही वाचनभूक आणि वाचनानंद आजच्या घडीला तरी एवढ्या मोठ्या मराठी महाजालावरचा एकही लेखक भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे!

आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा......

हे बाकी बरं बोल्लीस! यापुढे सावधगिरीनेच वागत जाईन! :)

मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच.

हे समजलं नाही..

तात्या.

चतुरंग's picture

9 Apr 2008 - 2:26 am | चतुरंग

तुझ्या लेखनातली तळमळ प्रामाणिक आहे.

काही मुद्दे पाहूयात.
तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्‍या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्‍यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..)
कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे.

'नवीन तंत्रज्ञान आणि मूलभूत गरजा' हा मुळातच एक वेगळा आणि मोठा विषय आहे. जगात सगळीकडेच हे थोड्याफार फरकाने घडत असते. भारतासारख्या प्रगतीशील देशाला ही दरी फार प्रकर्षाने जाणवण्याची कारणे अनेक आहेत. जसे लोकसंख्या, अशिक्षितपणा, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा इ. मूलभूत गरजा पूर्ण नाहीत म्हणून नवीन तंत्रज्ञान नाकारणे हे तितकेसे बरोबर नाही कारण नवीन तंत्रज्ञानाने मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. माहितीचे आदानप्रदान हा नवीन शोधांचा पाया असतो. ताक घुसळून जसे लोणी निघते अशीच माहिती योग्य प्रकारे घुसळून नवीन शोध लागतात! अर्थात तीच एकांगी गोष्ट होऊ नये. अति सर्वत्र वर्जयेत ह्या न्यायाने सारासार विचाराने हे व्हावे ही अपेक्षा.
अधुनिक जीवनशैलीमुळे संपर्काची माध्यमे बदलली आहेत हे निश्चित पण वापरणार्‍याने त्याचे डोके गहाण ठेवू नये म्हणजे माणसामाणसातला भावनेचा ओलावा सुकून जात नाही.

आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच.

'झटपट गोष्टी' हाच खरा गुणवत्ता घसरण्याचा केंद्रबिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाकडे पहा. कोणतीही गोष्ट अशी झटपट नसते. आज हापूसचे कलम लावले, पुढच्या महिन्यात मोहोर, त्याच्या पुढच्या महिन्यात आंबे असे कधीच नसते! मशागत आहे, निगराणी आहे, मेहेनत आहे, वाट पहाणं आहे आणि मग काही वर्षांनी जो हापूस मिळतो त्याची चव जन्मभर लक्षात रहाते! ही खरी गुणवत्ता!
काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!!
हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!!
पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार?

आजच्या पोरासोरांमधे गुणवत्ता नाहीये का? जरुर आहे. पण फक्त माती काळीभोर असून चालेल का? योग्य टीकेचा नांगर, योग्य कल्पनेचे बी, योग्य प्रशंसेचा पाऊस, धीराने वाट पहाणे, आणि मगच यशाची कणसे! हल्ली पूर्ण कणीस होईपर्यंत कोणी वाटच बघत नाहीत सगळेच फक्त हुरडा खातात असे वाटते!

आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे.

हे बरोबर लिहिले आहेस. प्रगती म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरात ह्याचे रहस्य आहे. प्रत्येकाचा आपापला प्राधान्यक्रम कशाला महत्व द्यायचे हे ठरवतो.

शेवटी ह्या आभासी जगात वावरतानाचे नियमही थोडे वेगळे असणारच आहेत. पण ह्या जगाने माणसे जोडायचे एक नवे माध्यम दिले आहे ह्यात शंका नाही. त्याचा वापर कसा, किती करावा हे तारतम्यानेच ठरेल. पण आज मनात आलेले विचार मांडता येतात आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतात, तेही लगेच हे चांगले नाही का?

चतुरंग

बेसनलाडू's picture

9 Apr 2008 - 2:34 am | बेसनलाडू

चतुरंग,
तुम्ही अतिशय मार्मिक, मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. अभिनंदन.
काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!!
हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!!
पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार?
वावा! हे तर अगदी 'लाख पते की बात' सारखे मोलाचे! छान! किंबहुना फार दूर जायची गरजच नाही. आपण सगळे आपापल्या ज्या ज्या लाडक्यादोडक्या संकेतस्थळांवर वावरतो, त्या सगळ्याच ठिकाणी वैयक्तिक चिखलफेक थोपवत किंवा प्रसंगी तिने अंग माखून घेऊन, किती संयम राखायला हवा आणि आपले मुद्दे लावून धरून केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपातला वादविवाद कसा करावा, मुद्देसूद लिहिण्याबोलण्यासाठी कशी किती मेहनत घ्यावी व चिकाटी अंगी बाळगवी - या सगळ्याचे स्वयंशिक्षण टीवी वरील झटपट तार्‍यांना मिळाले नसावे ;)
(मुद्देसूद)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

9 Apr 2008 - 4:13 am | सुवर्णमयी

चतुरंग,

तुमच्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादासाठी आभारी आहे. हा लेख मी कोणतीही टोकाची भूमिका घेऊन लिहिलेला नाही, माझी मते त्यात येऊ नये निव्वळ निरीक्षण यावे असा एक प्रयत्न मी सध्या करते आहे. त्याचा हा एक प्रयोग समजू. ( कदाचित फसला असेल)

तंत्रज्ञानाचा फायदा मी कधी नाकारणार नाही पण तारतम्य नसेल तर नव्या सोयीच्या आहारी जाऊन नक्की आपण काय साधतो हा विचारही मनाला भेडसावतो. तुम्ही म्हणाला तशी दरी भारतात मला अधिकच जाणवली...

निसर्गाचे अतिशय उत्तम उदाहरण घेतले आहे, आवडले, पटले..
शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच
यात हेटाळणीचा सूर लावायचा नाही. तर मनुष्यवृत्तीकडे निर्देश करायचा आहे. आज जाळ्यावर असे दोन गट आहेत जसे वास्तव जगातही आहेतच याची कल्पना मला आहे. दर्जाबद्दल कोणतीही तडजोड केली की संपलेच यावर माझा ठाम विश्वास आहे.

काही मुद्दे अधिक स्पष्ट केल्याबद्दल आभार,
सोनाली

धमाल मुलगा's picture

9 Apr 2008 - 12:46 pm | धमाल मुलगा

सुवर्णमयीताई,
उत्तम विषय आणि त्याची हाताळणीदेखिल छानच.

अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे.

खर॑ आहे.

त्यावर चतुरंगरावांचे मुद्दे म्हणजे तर सोने पे सुहागा! पटलं.

"ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही!

तात्याबा, अहो, आपण थोडा वेळ आंतरजाल ठेवू बाजुला. जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि.

अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
मग नक्कीच कसदार लेखन घडेल. हां, अगदी पुलं, दळवी, कुसुमाग्रज नाही पण काहीतरी सकस नक्कीच जन्माला येइल असं वाटतं.

कदाचित तुम्ही म्हणाल, हा कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! पण मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे.

आपला नम्र,
- ध मा ल.

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 12:56 pm | विसोबा खेचर

धमाल्या,

माझ्या प्रतिसादाची सहृदयतेने दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार! :)

जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि.

नाहीच आहेत! मान्य! परंतु जालावरही नाहीत!

सोनालीने जालावरील लेखकांच्या संदर्भात लिहिले होते म्हणून मी जालावर लिहिणार्‍यांच्या लेखनाबद्दल माझे वैयक्तिक मत सांगितले, इतकेच!

अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे.

अगदी सहमत आहे! आणि हौसेला मोल नाही! कुणीही लिहावं! :)

अर्थात, त्या हौशी मंडळीत मीही आलोच! ;)

कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

सहमत आहे! परंतु माझा मुद्दा फक्त सोनालीच्या,

"तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल."

या विधानाशी निगडित होता. सध्या तरी मराठी आंतरजालावर लिहिल्या जाणार्‍या ललित साहित्याने अद्याप तरी मरायला कुठली मोठ्ठी भरारी वगैरे मारली आहे असं मला तरी वाटत नाही!

कदाचित तुम्ही म्हणाल, मी कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला!

ए, असं मी कुठे म्हटलंय? आणि म्हणणारही नाही!

मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो.

अगदी बरं केलंस! :)

कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे.

धत तेरीकी! अरे मेल्या त्यात सांभाळून काय घ्यायचंय? चांगलंच लिहिलं आहेस की! :)

आपला,
(मराठी आंतरजालावरच्या अनेक कडमड्या ललित साहित्यिकांपैकी एक!) तात्या.

अवांतर - अजून जळ्ळी भरारी वगैरे मारायला मला तरी बराच वेळ लागेल, खूप काही चांगलं लिहावं लागेल! साला, उगाच भलत्या गैरसमजात कशाला रहा? :)

ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही!
प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच.
संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात.
गदीमा पाडगावकर दळवी पुलं हे जणु पाळण्यात होते तेंव्हा पासुनच थोर होते असे तर नाही ना. मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 1:05 pm | विसोबा खेचर

प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच.

ठीक आहे! नव्या पिढीने लिहून दाखवावं त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम! आम्ही निश्चित दाद देऊ! ;)

मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे

काहीच गैर नाही! नव्या दमाच्या लेखकांनी तेवढं थोर होऊन दाखवावं की! आमची कुठे ना आहे? :)

आणि अहो मला स्वत:ला आणि माझ्यासारख्याच हौशी नव्या दमाच्या लेखकांना मनमुराद लिहिता यावं, म्हणून तर हे संस्थळ सुरू केलं!! शिवाय इतरही संस्थळं आहेत, ब्लॉग्स आहेत! नव्या दमाच्या लेखकांनी अगदी अवश्य थोर व्हावं! ;)

आमची जळ्ळी ना कुठे आहे? आणि कशाला असेल?

तात्या.

चतुरंग's picture

9 Apr 2008 - 7:43 pm | चतुरंग

संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात.

हे उदाहरण आणि तुलना मात्र ह्या जागी अगदी अयोग्य आणि गैरलागू आहे. अहो शृंगारामधे सूचकता ही फार महत्त्वाची असते. 'अंतरपट' उघडे करुन दाखवणे आणि 'अंतरंग' उघडे करुन दाखवणे ह्यात फार फार फरक आहे. म्हणूनच 'चोली के पीछे' हे बीभत्स वाटते आणि मजरुहचे हे 'नौ दो ग्यारह' मधले एस्.डी. नी स्वरबध्द केलेले आणि किशोर आशाने अमर केलेलं 'आंचल में क्या जी' हे लाडिक वाटते!

अशी तुलना करुन तुम्ही त्या सगळया थोर कलावंतांचा अपमान करीत आहात असे माझे स्पष्ट मत आहे.

गदीमा, पुल, दळवी हे पाळण्यात थोर होते का? हा प्रश्न फसवा आहे! पाळण्यात कोणीच थोर नसते - पण पाळण्यात पाय मात्र दिसायला लागतात! ते तसे दिसणे ही कदाचित थोर होण्याची निशाणी असू शकते. प्रोत्साहन, प्रशंसा ही नव्या दमाच्या लेखक/कवींना नक्कीच मिळायला हवी त्याखेरीज नवनिर्मिती नाही.
पण नव्याकडे जाताना कुठेतरी गुणवत्तेची तुलना नको का? इतक्या वर्षांनंतर आपल्याला 'गीतरामायण' अजूनही मोहून का हो टाकते? ती रचनेतली प्रासादिकता, ते साधे पण चपखल शब्द, ती भाव पोचवण्याची ताकद ही कुठून आली? संत, पंत वाङ्मयाचा, अभंग, ओव्या, भारुडे, लावण्या, सूर, ताल ह्याचा गाढा अभ्यास आणि शिवाय प्रतिभा ह्या असामान्य संगमातून निर्माण झालेले ते महाकाव्य आहे!!
आज ६० वर्षांनंतरही चि.विं.चे विनोद का हो हसवतात? त्यांच्यानंतर विनोदी लेखक पुष्कळ झाले पण त्यातले बहुतांश बाष्कळ निघाले! लिखाणातली ती निर्विषता, तो सामान्य माणसाचा भाबडेपणा, ते सडेतोड (म्हणजे अचकट-विचकट, शिव्या देऊन नव्हे!) लेखन, विसंगती, विरोध, अतिशयोक्ती ह्यातून उच्च विनोद निर्मिती हे सारे कुठे गेले?
म्हणून अभ्यास हवा, चिकाटी हवी, सातत्य हवं आणि "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन|" हे ही हवंच!
केवळ फळावर डोळा ठेवून अशी निर्मिती होत नसते. त्यासाठी झोकून द्यायला लागते बाकी सगळं मागोमाग येतेच!!

चतुरंग

तात्या मिपा आम्हा लोकाना मनमुराद लिहीन्याची मस्त संधी मिळवुन देतेय त्यासाठी.इथे ओव्या आणि शिव्या खावुन आम्ही चांगले तयार होतोय.
थोर होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप आहे. शेवटी लहानपणी तेंडुलकरच्या आईने त्याचे कौतुक केले असेल म्हणून्तर तो मोठा होउ शकला ना! फुटवे फुटताच क्षणी छाटले गेले तर त्याचा वृक्ष जाउदे साधे झुडुप सुद्धा होणार नाही .
याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने एकमेकांची पाठ खाजवावी. सकस लिहिण्यासाठी थोडे प्रोत्साहन / थोडी शिस्त / थोड्या चुका दाखवुन देणारे बोल हेच तर आम्हाला अपेक्षीत आहे बुजुर्गांकडुन.
धमाल्याने बरोबर लिहिलेय. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे.
आपला एक होतकरु लेखकु...विजुभाऊ

सुवर्णमयी's picture

9 Apr 2008 - 6:05 pm | सुवर्णमयी

लेखाची दखल घेऊन त्यावर आपली प्रामाणित मते मांडणार्‍या सर्वांचे आभार.
सोनाली