नागपंचमी:-
प्रतीवर्षी श्रावण शुक्ल ५ ला ही पूजा करायची पध्द्त आहे. नागाची मातीची मूर्ति किंवा घरातील देवपूजेच्या खोलीतील बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकॄती काढून ही पुजा करतात. त्याचप्रमाणे एखाद्या पाटावर पाच किंवा नऊ फ़ण्यांच्या नागांची आकॄती काढून पुजा करण्याचीही पुष्कळ घराण्यात पद्धत आहे. नवनाग देवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे.
नवनागांची नावे पुढीलप्रमाणे:-
अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलम !
ध्रुतराष्ट्रं शंखपालं तक्षकं कालियं तथा !!
म्हणजे १) अनंत २) वासुकि ३) शेष ४) पद्मनाभ ५) कंबल ६) ध्रुतराष्ट्र
७) शंखपालं ८) तक्षक आणि ९) कालिया
श्रीमहादेवाच्या अंगावरील अलंकारात नाग असायचेच आणि श्रीविष्णू तर शेषावर म्हणजे नागावरच शयन करीत असतात हे प्रसिध्दच आहे. नागाची देवालयेही कित्येक ठिकाणी आहेतच. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे तर नाग हे कुलदैवत किंवा प्रतीक आहे.
या दिवशी दोन प्रहरी घरात नागांची पूजा झाल्यावर ज्या ठिकाणी सर्प रहाण्याचा संभव असतो अशा जवळच्या वारुळाला गंध-फ़ूल वाहुन तिथे दुधाचा नैवेद्य ठेवण्याची चालही पुष्कळ ठिकाणी आहे.
१) श्रीकृष्ण कालिया नावाच्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पाण्यातून वर आला तो याच दिवशी.
२) मणिपूर येथे पूर्वकाली एक खेडवळ होता. त्याने या दिवशी आपली जमीन नांगरली. तेव्हा तिथल्या एका कोप-यातल्या नागिणीच्या पिलास इजा पोहोचून ती मरण पावली. तेव्हा त्या नागिणीस राग येऊन तिने त्या माणसाच्या कुटूंबातील सर्व माणसांस रात्री निजल्यावेळी दंश केला, ती तशीच पुढे त्या खेडवळाची एक लग्न झालेली मुलगी होती, तिला दंश करण्यासाठी तिच्या नव-याच्या घरी गेली पण त्या मुलीने नागिणीची पूजा करून तिच्यापुढे दूध वगॆरे ठेवले. त्यामुळे ती नागिण संतुष्ट झाली आणि त्या मुलीच्या प्रार्थनेवरून पुढे तिने अम्रूत शिंपडून तिच्या माहेरच्या माणसांनाही जिवंत केले. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी जमीन नांगरू नये असे म्हणतात. आजही कित्येक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये, विळीने चिरु नये, जमीन खणू नये, तळण करू नये असे कटाक्षाने पाळ्णारे लोक आहेत.
३) आणखी एक गोष्ट अशी की सगळेच साप किंवा नाग काही विषारी नसतात. काही ठिकाणी तर नाग हा क्षेत्राच रक्षण करित असतो, म्हणून त्याला क्षेत्रपालही म्हणतात. एखादा कंजुष किंवा द्रव्य हेच सर्वस्व मानणारा माणुस जेव्हा आपले द्रव्य पुरून ठेवतो तेव्हा तो मेल्यावरही नागरुपाने द्रव्याची राखण करीत असतो अशीही कित्येकांची समजुत आहे.
४) नाग हा ब्राम्हण असल्यामुळे त्याची हत्या करणे म्हणजे ब्रम्हहत्या होते त्यामुळे नागाला मारु नये असे म्हणतात.
५) नाग किंवा साप शेतातल्या ऊंदरापासुन पिकाचे रक्षण करतो म्हणुनही या दिवशी नागाची पुजा केली जाते.
दोन दिवसापूर्वीच आमच्या सोसायटीत मागे असलेल्या झाडीतून नागोबा व्हिजीट देऊन गेल्याचे कळले. साप पकडणारे लोक्स सुध्दा त्यांच्या लाठ्या काठ्या (स्टीक्स) घेऊन आले होते. अर्थात नाग महाराजांनी तोपर्यंत कलटी मारली होती ते सोडा. या लोक्सनी दोन चार बीळ सद्रूश भोकांशी झटापट केली आणि आले तसे काठ्या हलवत निघुन गेले. पुढच्या कॉलच्या वेळेला बघू बोलले. मनात म्ह्ट्ल आयला मिळाला असता नाग तर बर झाल असतं तेवढच एक टेंशन कमी (आख्खा श्रावण आणि भाद्रपद बाकी आहे हो अजून). असो.
बज्जु गुरुजी
प्रतिक्रिया
14 Aug 2010 - 12:03 am | बेसनलाडू
काही समजुती माहीत होत्या - जसे विळीवर न चिरणे, तव्यावर न भाजणे जमीन न नांगरणे इ. मी तर हेही ऐकले आहे की नागसदृश भाज्या - जसे पडवळ, शेवग्याच्या शेंगा इ. - भक्षण करू नयेत.
(समजूतदार)बेसनलाडू
काही माहिती नव्याने कळली (नवनाग इ.). काही प्रश्न पडले. उत्तरे जाणून घ्यायला आवडतील -
१. महाभारतातील धृतराष्ट्र आणि नवनागांतील धृतराष्ट्र यांच्यातील नामसाधर्म्याव्यतिरिक्त परस्परसंबंध (असल्यास) कोणता?
२. नाग ब्राह्मण असतो असे म्हणातात ते का? म्हणजे ब्राह्मण असल्याची लक्षणे कोणती मानली गेली आहेत आणि ती नागाला कशी लागू होतात?
(जिज्ञासू)बेसनलाडू
14 Aug 2010 - 5:18 pm | मी-सौरभ
शेवटी दिलेला वर्तमान काळातील टच छान वाटला....
14 Aug 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार
श्रद्धावान असुनही हि कथा पहिल्यांदा ऐकली तेंव्हा असा प्रश्न पडला की, राग येउन दंश करत हिंडण्यापेक्षा त्या नागीणीने अमृत शिंपडुन आपल्या पिलांना का जिवंत केले नाही ?
पराक्षक
14 Aug 2010 - 7:31 pm | मदनबाण
छान माहिती... :)