आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आनंद कसा घ्यायचा ते विसरले आहेत अशी तक्रार जागोजागी ऐकू येते. समृद्धीचे चणे वाढले असले, तरी दात ते चणे खाण्याऐवजी एकमेकांना विचकून दाखवणे, कोणावर तरी धरणे, कराकरा खाणे, स्वत:चाच ओठ चावणे, वगैरे गोष्टींमध्येच गढून जाताना दिसतात. 'थांबा आणि गुलाबांचा वास घ्या' या उक्तीप्रमाणे वागायची इच्छा असली तरी कधी कधी नुसते दुर्गंधीचे भप्कारेच येतात, त्याला आपण तरी काय करणार? त्यात सध्या आयटीने जी क्रांती केलेली आहे, तीमुळे इतकी वर्षं मुकाट्याने काम करणाऱ्या बायकाही आता मारे हपिसात जाऊन चकाट्या पिटून संध्याकाळी नवऱ्याप्रमाणेच थकून भागून आल्याचं सांगतात. कमी मुलांवर अधिक लक्ष पुरवण्याची अनिष्ट प्रथा पडायला लागल्यामुळे पूर्वी पाच-सहा पोरांकडे लक्ष द्यायला जितका वेळ पुरत असे, तितका वेळ आजकाल दोन पोरांसाठीही अपुरा पडतो. त्यात बायकादेखील हापिसात जातात हे सांगितलं का? असो, तर मुद्दा काय की आजच्या गृहस्थ गृहस्थिणींना स्वयंपाक करण्यासाठी देखील वेळ नसतो. मग असलेले चणे पडून राहातात, आणि दातही बिचारे उपाशी राहातात. तेव्हा आम्ही दात आहेत तोवरच, हे चणे कसे खाऊन घ्यावेत याविषयी एक लेखमालाच लिहायची ठरवली आहे.
सध्याचा जमाना पाककृतींचा आहे. योग्य इन्ग्रेडियंट, योग्य प्रमाणात मिसळले की उत्तम पदार्थ जमतो. इतकंच नाही त्याची आकर्षक चित्रं काढून संस्थळांवर डकवली तर शेकडो लोकांना जळवण्याचं समाधानही मिळतं. म्हणून आम्ही आमचा सल्ला या पाककृतींच्या आकारबंधातच देणार आहोत. तेव्हा लोकहो, या, आनंदी होण्यासाठी काही पदार्थ कसे करायचे हे शिकून घ्या.
पहिलाच पदार्थ अगदी ताजा आहे. (काही लोकांनी, 'आहो, रेसिपी टाका आणि लवकर द्या तो लोकांना नाही तर शिळा होईल' अशा प्रेमळ आठवणी देखील केल्या आहेत. दूरदूरहून नवीन गिऱ्हाइकं तो चाखून बघण्यासाठी येणार असंही म्हणत आहेत.)
तर त्याची कृती अशी
घटक पदार्थ (सगळेच पदार्थ आयते मिळत नाहीत. काही पदार्थांच्या कृती खाली दिलेल्या आहेत)
1. सुमारे पंधरा दे धमाल माणसं. ही मिपावरती दिसतात, मुखवट्यांआडूनसुद्धा त्यांचा मिष्किलपणा जाणवत राहातो. आपल्या आसपास त्यातली कोण कोण आहेत हे शोधलं की झालं.
2. त्यांना बसण्यासाठी आणि मनमुराद गप्पा छाटण्यासाठी जागा
3. या गप्पा बेफाम दौडण्यासाठी थोडं वंगण म्हणून काही पेयं. या पदार्थात
- मेलन मार्गारिटा
- ('च्यायला ते यंत्र किती वेळा फिरवत बसायचं, आण तसंच तिच्यामारी') टकिला शॉट्स
यांचा वापर केला आहे. कृती खाली दिलेलीच आहे.
4. खाण्यासाठी पदार्थ - हो, गप्पांचा विठोबा चालू असला म्हणून पोटोबाकडे कसं दुर्लक्ष करायचं? पण चांगली गोष्ट अशी की आपल्याला फारसं करावं लागत नाही. इतर लोक काय काय मस्त मस्त आणतातच. पदार्थांच्या यादीविषयी खाली विस्ताराने दिलेलंच आहे.
5. किमान चार तास मोकळा वेळ. व मनसोक्त गप्पा
6. फार हॅहॅहूहू झालं तरी तक्रार न करणारे शेजारी
मेलन मार्गारिटा
मेलन म्हणजे टरबूज की खरबूज हे नक्की माहीत नाही. पण हा हिरव्या देशात मिळतो, व हिरव्याच रंगाचा असतो. त्याला साखर काकडी म्हणतात असंही मी ऐकलंय. अलिकडे काकड्यांचे खूपच प्रकार ऐकून आहे. पण या मात्र खरोखरच दहा इंच व्यासाच्या असू शकतात. असो. मेलनचे तुकडे (तीन कप - सुमारे पाउण लीटर) करून ते फ्रीझरमध्ये ठेवायचे. काही तासात फ्रीझ होतात
0.5 कप (120 मिली) टकिला
0.5 कप (120 मिली) ट्रिपलसेक (किंवा कॉइनत्रॉ)
(ट्रिपलसेक नसेल तर संत्र्याचा इसेन्स काही थेंब, पाव कप व्होडका (किंवा टकिलाच), पाव कप पाणी, चार टीस्पून साखर यांचं मिश्रण)
1 मोठं लिंबू
5 चमचे साखर
5 बर्फाचे तुकडे
सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घालावं. आणि सर्व बर्फाचा बारीक चुरा होईपर्यंत घुर्रर्र करावं. लोकांना द्यायचं नसल्यास सरळ जगनेच पिता येतं. पण दिलंत तर सुमारे पाच पेयं होतात.
टकिला शॉट्स
डाव्या हाताच्या मागच्या भागावर, अंगठा हाताला मिळतो तिथे थोडं लिंबू चोळून त्यावर चिमूटभर मीठ ठेवायचं. त्याच हातात एक लिंबाची फोड धरायची. दुसऱ्या हातात टकिलाचा एक शॉट (एका वेळी गिळता येईल इतका) शॉट-ग्लासमध्ये घ्यायचा. सगळ्यांनी (हे एकापेक्षा अधिक लोकांनी करायचं तर खरी गंमत) एका वेळी आपला ग्लास एका झटक्यात रिकामा करायचा. हा झटका जिभेला आणि घशाला जाणवला पाहिजे. ती चव विरण्याआधीच पटकन मीठ चाटायचं आणि लगेच लिंबू चावायचं... आहाहाहा... थोड्या वेळाने रीपीट.
खाण्यासाठी पदार्थ
यावेळी घरगुती पाव, राजमा, कोबीची भाजी, लाल मिरच्यांची फोडणी असलेला आंबट खारट दहीभात, व गाजर-अक्रोडाचा केक असा मेनू होता.
पाव
राजमा
लोक अर्थातच प्रेमाने इतर पदार्थही घेऊन आले.
दिपालीने बनवलेला अॅपल अपसाइड डाउन केक
नाटक्याने स्वत:च्या हाताने बनवलेला (असं तो सांगतो...) पनीर अचारी
पारुबाईंनी आणलेला सुंदर कॅरेमल क्रंच व्हाईट क्रीम आणखीन काय काय मस्त मस्त केक
शिल्पाने आणलेले उडीद वडे... कुठे दिसताहेत काय म्हणता, अहो ते संपले केव्हाच.
गोड पोरं
आत्तापर्यंतची कृती नीट केली तर गप्पा व्हायला फारसं काही करावं लागत नाही. म्हणजे पोह्यांना फोडणी दिली की थोडा वेळ नुसती वाफ काढायची असते, तसं. त्यात नाटक्यासारख्याकडून त्याला आलेल्या पुणेरी अनुभव ऐकायचे म्हणजे पर्वणीच. बेसनलाडूसारखं कोणीतरी नव्यानव्या वधूला घेऊन आलेलं असेल तर उत्तमच. मग 'कायरे, गेल्या वेळी दुसरीलाच घेऊन आला होतास ना' म्हणून खेचायला उधाणच येतं. तेवढ्यातल्या तेवढ्यात शिल्पाला सुद्धा नवीन लग्नाबद्दल छेडायचं... आणि मिपाबद्दलचं, नुकत्याच घडलेल्या आयटी, सैपाक व भप्करसारख्या गोष्टींबद्दलचं गॉसिप बबलू, सौरभ,दिपाली, पारुबाईंबरोबर करायचं.
ही अशी 'वाफ' काढत असताना अधून मधून मार्गारिटाचं किंवा टकिला शॉट्सचा हबका मारायचा आणि पुन्हा मंद उबेवर वातावरण राहू द्यायचं. मध्ये मध्ये हास्याची चुरचूर ऐकू येत राहाते. मधूनच कुकरच्या शिटीसारखा हास्याचा स्फोट होतो. एकंदरीत चांगलंच चाललंय म्हणायचं. अशा चर्चांमध्ये काय रंगत येते, व कुठचे विषय डोकावून जातात हे सांगता येत नाही. वानगी दाखल थोडे देतो, इतर कट्टरांनी (म्हणजे कट्ट्याला आलेल्यांनी) भर घालावी, विस्तार करावा.
-संकेतस्थळे कोणी कशी तयार केली? संकेतस्थळांचे मालक, चालक, कंटक यांचा इतिहास-भूगोल
-नवीन लग्न झालेले, संसारात मुरलेले - लक्षणे, स्वयंपाक पद्धती व कौशल्ये इत्यादी. (यावर मी तरी आणखीन काही लिहिणार नाही, मायला आधीच फार बदनाम झालोय) तसंच नाड्या कोणाच्या हातात आहेत/असाव्यात
-"बाब्या कार्टे सिद्धांत" यावरची मौलिक देवाणघेवाण.
-बेलाचा एकोळीचा प्रतिसाद, व त्यावरून त्याची टेर खेचणे, त्याच्या जुन्या चर्चांविषयीच्या रम्य आठवणी
-टॅक्सी/रिक्षा चालकांचा माज व त्यावरील सौ. रभरांग नेकर :) यांचे जालीम उपाय.
थोड्या वेळाने मात्र तयार केलेले पदार्थ खरोखरच द्यायचे लोकांना. मग मोक्याच्या जागेवर म्हणजे बुफे टेबलाभोवती उभं राहून, खुर्च्यांवरती बसून, एकमेकांशी चकाट्या पिटत सगळे पदार्थ फस्त करायचे.
मनसोक्त गप्पा
जेवण झाल्यानंतर पुन्हा स्थानापन्न होऊन तृप्ती व्यक्त करायची व पुन्हा गप्पांचे ग्लास भरायचे. मग सगळ्यांची निघण्याची वेळ आली की चवीचवीने पदार्थ काय फर्मास झाला असं पोटावर हात फिरवत म्हणायचं. तुम्ही बॅचलर किंवा तात्पुरते बॅचलर असलात तर पिशव्या भरभरून उरलेले पदार्थ घेऊन जाऊन दोन दिवस चैन करायची. नक्की कोण नक्की काय बोललं हे सगळं ब्लर होऊन फक्त धमाल आली एवढंच लक्षात राहिलं याचा अर्थ पदार्थ फर्मास झाला, मनात भिनला.
तरी जाता जाता या पदार्थात 'एक' अट्टल पुणेरी माणूस कमी पडला याची हळहळ देखील व्यक्त करायची. सगळंच परफेक्ट झालं तर पुढच्या वेळी काय करणार ना?
असो. तर सांगायचा मुद्दा काय, की मिपावर भेटणारे समधर्मी मित्र-मैत्रिणी, चमचमीत खाणं, एखादं सुंदर ड्रिंक, भरपूर केक आणि छान गप्पा असतील तर आनंदी होणं काय कठीण आहे? त्या संध्याकाळी घातलेला सदरा मी जपून ठेवला आहे.
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 9:45 am | खालिद
एकदम झकास वर्णन.
शेवटचे वाक्य तर अफलातून.
पुढचा भाग लवकर येउ द्या.
(कधीतरी शिकागो ला कुणीतरी कट्टा करा रे. असा एखादा सदरा मी पण घालून जपून ठेवावा म्हणतो.)
13 Aug 2010 - 4:34 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! :-)
12 Aug 2010 - 9:47 am | सहज
गुर्जीं मस्तच वर्णन!
मराठमोळ्याला एक फार छान झलक मिळाली आहे.
12 Aug 2010 - 9:47 am | शिल्पा ब
वाह!!! आठवण अजूनच ताजी केलीत...मस्त वाटलं सगळ्यांना भेटून...
आणि हो ... नाटक्या यांना पनीर मसाला केला होता त्याची आणि तुम्हाला राजमा आणि ब्रेडची पाकृ देण्याची जाहीर विनंती...
(इतके चविष्ट पदार्थ एकटेच नका खात जाऊ आम्हालाही कळूदे कसं बनवायचं ते..)
12 Aug 2010 - 9:52 am | ऋषिकेश
लै फर्मास पाककृती! केल्यास आनंदी आयुष्याची ग्यारंटीच!
12 Aug 2010 - 9:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वा वा, एकूण मज्जा केलेली दिसते आहे. भेटीचे आणि कॉकटेलचे वर्णन मस्तच, शेवटचं वाक्य खासच! पण गुर्जी तिथे होते हे सिद्ध करायला काही फोटूगिटू आहे का?
12 Aug 2010 - 9:58 am | शिल्पा ब
त्यांनीच तर सगळे फोटो काढलेत (स्वताच्या क्यामेऱ्याने).
12 Aug 2010 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यांनी फोटो काढले आणि इतरांना दाखवले????? आश्चर्य आहे. आम्ही सगळे दमलो दोन महिने, सहा दिवस आठवण/विनंती करून, करून!! बहुदा आम्हां निवासी लोकांना हिरवा माज दाखवत असावेत गुर्जी!
12 Aug 2010 - 1:49 pm | राजेश घासकडवी
काही तांत्रिक अडचणी, कंबाईंड विथ आळस यामुळे ते फोटो वेगवेगळ्या मीडियावर भारतात आहेत...
बस काय, आमच्याच २ बीएचकेमध्ये झाली ही प्यार्टी :)
12 Aug 2010 - 10:55 am | दिपाली पाटिल
आपले फोटो काढलेच नाहीत नं... पुढल्या वेळेस असला स्लॅक चालणार नाही राजेश... :D
आणि हो तो अॅप्पल अप-साईड डाउन केक नव्हता काही तो पिअर (pear) अप-साईड डाउन केक आहे..
कट्टा मस्तच होता बाकी...जेवणाबद्दल तर काय सांगावे...
दिपाली :)
12 Aug 2010 - 11:11 am | बबलु
दिपाली,
तू पण ना कमाल करतेस.
गुर्जींनी माझ्यासमोरच ३ टकीला शॉट्स मारले (सचिनने सिक्सर मारवी तसे). नंतर (त्याच नशेत) फोटू काढले असावेत. :) :)
असो.... तू बनविलेला केक मी प्याक करून घरी घेउन आलो आणि दुसर्या दिवशीही हादडला. आता बोल.
..... केक कावळा.
12 Aug 2010 - 11:41 am | राजेश घासकडवी
तुम्हीच टाइट स्केड्यूलवर होतात ना... असो, वेळात वेळ काढून आलात ते बरं वाटलं.
आता पाचापैकी चार शब्द बरोबर आले ते कुठेच गेलं! बाकी तो केक मस्त होता...
अ पिअर (pear) अप-साईड डाउन केक इज अ पिअर (pear) अप-साईड डाउन केक बाय एनी नेम... असं काहीसं शेक्सपियर म्हणून गेल्याचं आठवतं. :)
12 Aug 2010 - 10:04 am | Nile
वा वा, काय बोलावे?? थोडासा वृत्तांत वाचला काही फोटो पाहिले अन जळजळ वाढली म्हणुन पुढे वाचणे सोडुन दिले . ;-)
धमाल केलेली दिसतेच आहे, पण गुर्जी तो सदरा धाडा हो इकडे. :-)
12 Aug 2010 - 10:04 am | Nile
वा वा, काय बोलावे?? थोडासा वृत्तांत वाचला काही फोटो पाहिले अन जळजळ वाढली म्हणुन पुढे वाचणे सोडुन दिले . ;-)
धमाल केलेली दिसतेच आहे, पण गुर्जी तो सदरा धाडा हो इकडे. :-)
12 Aug 2010 - 10:08 am | मदनबाण
घासकडवी साहेब जरा फोटुतल्या लोकांची नावे लिवा की,म्हणजी पार्टीतल्या मंडळींची ओळख कळेल. :)
12 Aug 2010 - 8:11 pm | विकास
घासकडवी साहेब जरा फोटुतल्या लोकांची नावे लिवा की,म्हणजी पार्टीतल्या मंडळींची ओळख कळेल.
असेच म्हणतो!
बाकी वृत्तांत एकदम मस्त!
12 Aug 2010 - 10:40 pm | शिल्पा ब
मनसोक्त गप्पा या हेडिंग खाली असलेल्या फोटोत दुसऱ्या ओळीत पहिल्या फोटोत नाटक्याच्या मागे निळा ड्रेस घालून उभी आहे ती मी.
12 Aug 2010 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी समोर उभी आहेस असं वाटलं मला! मानलं ब्वॉ गुर्जींच्या फोटोग्राफीला!! ;-)
गुर्जी: नाटक्याची ऑप्टीकल डेप्थ एकापेक्षा जास्त आहे ... गल्ली चुकलं वो फोटो काढताना! :p
12 Aug 2010 - 11:18 pm | नाटक्या
एकंदरीत जमलेल्या सगळ्यांच्या मानाने ऑप्टीकल डेप्थच काय पण विड्थ पण एका पेक्षा बरीच जाडी होती... :-)
12 Aug 2010 - 11:22 pm | चतुरंग
तरी बरं फोटो वाईड अँगल लेन्सने काढलेत म्हणे! नाहीतर काय व्हायचं? ;)
(अतिवाईड)चतुरंग
12 Aug 2010 - 11:29 pm | राजेश घासकडवी
हे हे हे, ते टकिला शॉट्सविषयी नाही वाचलं का? खुलासा संपला.
12 Aug 2010 - 10:37 am | एक
वृत्तांत सुरेखच आहे..पण लिहिलं आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त दंगा झाला असणार याची गॅरेंटी आहे.
गुरुजींना या आधी आम्ही त्यांच्याच घरी १-२ दा भेटलो होतो. (बहुतेक २००२ साली.) त्यामुळे त्यांच्या आदरातिथ्या बद्द्ल प्रश्नच नाही!! यावेळी नाटक्या ने कुठलं कॉकटेल बनवलं?
एका मित्राचं आमंत्रण आधीच् स्विकारलं होतं त्यामुळे मला येता आलं नाही. आमच्या पुण्या बद्द्ल तुम्ही लोक खूप "वाईट्ट् वाईट्ट" बोलत होता असं कळालं. :) त्यामुळे आमच्या जाज्ज्वल्य अभिमानाला जागून पुढच्या कट्ट्याला आम्ही उपस्थीत राहूच.. :) मराठमोळेंमुळे ती संधी चालून येतच आहे.
तेव्हा भेटूच!!
-(अट्ट्ल,सदाशिवपेठी, एकारान्त पुणेकर) एक
12 Aug 2010 - 10:37 am | विंजिनेर
जळजळ झालेली आहे. :) कृपया पदार्थांच्या पाकृ आणि पाकृंचे जीवघेणे फटु टाकून जळजळ आणखी वाढवू नये.
असो. शिर्षकावरून क्रमशः वृत्तांत वाटतोय. म्हणजे इनोचा फ्यॅमीली पॅक आणावा लागणार. :)
12 Aug 2010 - 10:37 am | बबलु
>>>सुमारे पंधरा दे धमाल माणसं. ही मिपावरती दिसतात, मुखवट्यांआडूनसुद्धा त्यांचा मिष्किलपणा जाणवत राहातो.
हा हा हा !! कळला रोख. :) :) :)
>>> वंगण म्हणून काही पेयं.
बेष्ट बेष्ट.
>>> एका वेळी आपला ग्लास एका झटक्यात रिकामा करायचा. हा झटका जिभेला आणि घशाला जाणवला पाहिजे. ती चव विरण्याआधीच पटकन मीठ चाटायचं आणि लगेच लिंबू चावायचं.
ब्रम्हानंदी.
गुर्जी, राजम्याचा फोटू काय ज ब रा आलाय. आणि राजमा आणि होममेड ब्रेड होता पण "ए वन". सॅलूट.
दीपालीचा अपसाइड डाउन केक फर्मास.
नाट्क्याची चिकन अचारी यमी (६ पट गोरीवाली वेगळी) :)
शिल्पाने आणलेले बरेचसे उडीद वडे तर मीच निर्लज्यासारखे हादडले. (स्वगतः सुधार बबल्या सुधार) .
काय मस्त झाले होते म्हणून सांगू.
>>> असो. तर सांगायचा मुद्दा काय, की मिपावर भेटणारे समधर्मी मित्र-मैत्रिणी, चमचमीत खाणं, एखादं सुंदर ड्रिंक, भरपूर केक आणि छान गप्पा असतील तर आनंदी होणं काय कठीण आहे?
+ १००
(कट्टा जबरी एंजॉय केलेला) ... बबलु
12 Aug 2010 - 10:52 am | पारुबाई
मी आत्तापर्यंत कधीही एखाद्या पार्टीचे इतके सुंदर वर्णन वाचले नव्हते.
मुळात हे सगळे एका पाककृतीच्या आकारबंधात बांधणे ही कल्पनाच ग्रेट आहे.
खरेच ती एक अविस्मरणीय सन्ध्याकाळ होती .
थ्री चिअर्स टू यू सर !!!
12 Aug 2010 - 11:04 am | बबलु
शेवटच्या वाक्याशी सहमत :) :) :)
....लाडू कावळा :)
12 Aug 2010 - 10:53 am | स्वाती दिनेश
कट्टा जोरात झालेला दिसतो आहे, मस्त वृत्तांत!
स्वाती
12 Aug 2010 - 10:57 am | धनंजय
मजा केली तुम्ही लोकांनी!
12 Aug 2010 - 7:52 pm | चित्रा
असेच म्हणते.
12 Aug 2010 - 10:58 am | दिपाली पाटिल
मस्त वृत्तांत लिहीलाय...
12 Aug 2010 - 11:02 am | स्पंदना
फार जळजळतय हो!!
पण काय करणार हाती फक्त इनो!
पण एक सांगा राव, फोटो तकिला शॉट नंतर काढले की तकिला शॉटच्या आधी ?
कारण तो शॉट बसला की माझाच फोटो होतो.
12 Aug 2010 - 11:19 am | राजेश घासकडवी
म्हणूनच मी इतरांचेच फोटो काढले... :)
12 Aug 2010 - 11:29 am | बबलु
गुर्जी, _/\_
12 Aug 2010 - 11:20 am | शिल्पा ब
फोटोतली छकुली माझी आहे बरं का... :-)
12 Aug 2010 - 12:00 pm | बबलु
बच्चेकंपनीचा खेळ/दंगा सॉलिड मस्त सुरु होता.
मोठ्यां एवढाच लहानांनीही कट्टा एंजॉय केला.
12 Aug 2010 - 11:21 am | नंदन
कट्टा दणदणीत झालेला दिसतोय. फोटो आणि वृत्तांत झकासच. दोन वर्षांपूर्वी पिडांकाकांकडे झालेला पहिला द. कॅलिफोर्निया कट्टा आठवला :) [दुवा]
12 Aug 2010 - 11:27 am | जागु
छान छान.
12 Aug 2010 - 11:34 am | दत्ता काळे
वृतांत आणि फोटो दोन्ही आवडले.
12 Aug 2010 - 11:49 am | प्राजक्ता पवार
सुरेख वर्णन ! शेवटचे वाक्य अगदी योग्य . पुढील पाकृ लवकर टाका.
12 Aug 2010 - 2:31 pm | मन१
आवडली.
12 Aug 2010 - 12:41 pm | अरुंधती
मस्त वर्णन आहे मिपा कट्ट्याचं आणि गप्पा-खादाडी संमेलनाचं! आवडलं! :-)
12 Aug 2010 - 8:09 pm | असुर
प्रचंड! प्रचंड जळजळ झालीये. फक्त इनो पुरेसं नाही. आता डायरेक्ट कार्बन डायऑक्साइड खावा लागेल बहुतेक. :-)
असो.
शेवटचं वाक्य खासच. सदरा... खलास!
लंडनमध्ये कट्टा करण्यासारखी मेंबरं असतील तर कळवा राव. ही जळजळ त्याशिवाय जायची नाही.
--असुर
12 Aug 2010 - 8:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा कट्टा मस्तच.......!
-दिलीप बिरुटे
12 Aug 2010 - 11:29 pm | नाटक्या
पारावर लय गप्पांचा फड रंगला व्हता ते कवा तरी लिवा..लिवा म्हून मागे लागलो व्हतो ते आपून लय बेस्ट केलं बघा. आता पासून या पुढे समद्या पारावरच्या गप्पा आपूनच लिवा. आमच्यात लिवनारा कोन नाय! बा ल्हान पनी मागं लागला व्हता "साळेत जा, साळेत जा" म्हून पर एकदा गुर्जींनी (तुम्ही नव्ह बरं का मास्तर) आसं थोबाड फोडल (भेटू दे तो मास्तूरे आता आसा फोडतो फोकलीच्याला XXX) का तवा पासून साळेचं त्वांड पायल न्हाइ. मी काय म्हनतो ते मान्य हाय का न्हाय मंडळी. लय बेस्ट लिवला मास्तर. पुढच्या टायमाला पारावर गप्पा हानायला बसलो तर एक संतरा बाटली आपल्याकडून बक्शीस बरं का!!
13 Aug 2010 - 3:20 am | चतुरंग
हे कट्ट्याचे वर्णन नसून एखादे संपादकीय वाचतोय की काय अशी शंका येते न येते तोच दुसर्या-तिसर्या परिच्छेदापासून मास्तरांनी गाडी बरोब्बर रुळावर आणली आणि माझा जीव टकीलात पडला! ;)
चित्रे आणि पायरी दरपायरी खुमासदार वर्णनावरुन कळतेच आहे की एकदम जोरदार झालेला आहे कट्टा!
बाकी दारवांबाबत आम्ही काही कमेंट्स देऊ शकत नाही पण साला हा मार्गारीटा प्रकार मात्र एकदा चाखून बघायचाय असं राहून राहून वाटतं! ;)
लगे रहो वेस्टकोस्ट वासियों एन्जॉय!! :)
लेखातल्या शेवटच्या वाक्याबद्दल पेश्शल टाळ्या, घासूशेठ!! :)
(ईस्टकोस्टनिवासी)चतुरंग
13 Aug 2010 - 5:54 am | नाटक्या
गुर्जी आपण आज्ञा केलीत म्हणून लिहीतो. मंडळी या शिवाय पडद्य आड बर्याच घडामोडी झाल्यात त्या अशा:
१. नवीन लग्न झालेल्या (म्हणजे कोण? सगळ्यांना माहित असावे..) नाड्या कोणाच्या हातात आहेत/असाव्यात ह्याबद्दल झालेली चर्चा. या चर्चेत बेसनलाडू यांनी (का कुणास ठाउक) पण फारच हिरिरीने भाग घेतला.
२. टकीला कशी प्यावी यावर गुरुजींचे बोधप्रद आख्यान. नाटक्या आणि मंदार (श्री. शिल्पा ब) यांचे त्याला फाट्यावर मारून एकादमात टकीला पिणे.
३. गुरुजी आणि त्यांचे जालीम शत्रू यांचे वादविवाद.
४. दादर आणि सभोवारच्या परिसरातली खरेदी (बरेच दादरकर असल्याने) गल्ली/दुकान आणि त्यांची मोजदाद (इकडुन तिसरे तिकडून हजारावे इ.) जणू काही दुकानच खरेदी करणार होते.
५. टॅक्सी/रिक्षा चालकांचा माज व त्यावरील मिपाच्या सभासदत्वाच्या प्रतिक्षेत असलेले सौरभ रांगणेकर यांचे जालीम उपाय.
६. शिल्पा ब यांची ऐण्ट्री झाल्यावर चळाचळा कापणारे मिपाकर
७. हाण तुझ्या XXX असे म्हणत बघता बघता पावाचा फन्ना उडवणारे मिपाकर
८. गाण्यातले ओ-का-ठो कळत नसताना गाण्यावर बोलणारे नाटक्या. त्यावरून नाटक्या आणि बबलू यांची जुंपली (आपल्याला चढल्यावर काय बोलायची बात नाय, काय समजलात? आपल्या म्हणजे दोघांच्या) नंतर लक्षात आले की बबलू शेट असे का बरळताहेत ते. त्याचे काय आहे मंडळी बबलूशेट नेटफ्लिक्स मध्ये पाट्या टाकतात आणि बरेच (नको ते) सिनेमे बघतात म्हणून असे होते. ही बघा त्यांनी सध्याच बघीतलेल्या सिनेमांची यादी:
1. सीता और मार्गारिटा
2. सोडा अकबर
3. जो पिया वही सिकंदर / जो पिलाता वही बार-टेंडर
4. लव्ह, सेक्स और व्होडका
5. रब ने पिला दी थोडी
6. रम व्हिस्की से कम नही
7. पास्ड आउट अॅट लोखंडवाला
8. चांदनी चौक से चांदनी बार तक
9. रम दे बसंती
10. हम टाईट हो चुके सनम
11. कभी देशी कभी रम
आणखी काय लिहू, पुढल्या पेग नंतर परत लिहीन.
13 Aug 2010 - 10:58 am | बबलु
हा हा हा !!!!!
ढाक-चिक, ढाक-चिक, ढाक-चिक, ढाक-चिक !!!!
असो... कुठेतरी ऐकलेली चारोळी इथे चपखल बसते.
पिऊन थोडी चढणार असेल |
तरच पिण्याला अर्थ आहे ||
एवढी ढोसून चढणार नसेल |
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे ||
:) :) :)
बाकी चालू द्या.
13 Aug 2010 - 11:01 am | सहज
पिऊन थोडी चढणार असेल |
तरच पिण्याला अर्थ आहे ||
एवढी ढोसून चढणार नसेल |
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे ||
+१ सहमत आहे. ती झिंग उर्फ किक नसती तर काही अर्थ नाही.
नाटक्याशेठचा प्रतिसादही आवडला. पुढच्यावेळी त्या एकेका सिनेमाचे कथानक लिव्हा असेच एक कट्टा करुन!
13 Aug 2010 - 12:52 pm | मिसळभोक्ता
आमच्या मध्यवयीन गंडांतरामुळे दुसर्या दिवशी भल्यापहाटे उठून सोळा मैलाच्या चढाई-उतराईचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने कट्ट्याला येणे जमले नाही, तरी (की त्यामुळेच?) कट्टा धमाल झालेला दिसतो आहे. चान चान.