मास्तर

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
11 Aug 2010 - 4:54 pm

इंग्रजी वृत्तपत्र वाचायला लागल्यापासुन मास्तरनं पिच्छा पुरवला. मास्तर म्हणजे प्रकाश कर्दळे, इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीच्या सुरुवातीपासुनचे संपादक. पत्रकारितेतले दिग्गज. तब्बल चाळीस वर्षे त्याने पत्रकारिता गाजवली अन कँपातल्या अरोरा टॉवर्स बिल्डींगच्या तिसर्‍या मजल्यावरच्या आठ फुट बाय आठ फुट आकाराच्या त्यांच्या केबिनमधे बसुन कित्येक दशकं अक्षरशः राज्य केलं, अनेक उत्तम पत्रकार घडवले (जे त्यांना घाबरुन पळुन गेले नाहीत ते घडले), अनेक कार्यकर्ते जन्माला घातले, पुण्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अनेक मोहिमा राबवल्या, अनेक जनहितार्थ याचिका केल्या, बरेच प्रोजेक्टस प्रत्यक्षात आणले अन अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आणली.
पुढं पत्रकारितेत प्रवेश केल्यावर मास्तरभोवती माझ्या मनातलं गुढतेचं वलय अधिकच दाट होत गेलं. अनेक किस्से ऐकायला मिळाले त्याच्याबाबत - त्याचा संताप, त्याचा राग, त्याची तळमळ, त्याची कळकळ, त्याची जिद्द, त्याची चिकाटी, त्याचा बिनधास्तपणा, त्याची सावध वृत्ती, त्याचा व्यासंग, त्याचा लोकसंग्रह एक ना अनेक! काय वाटायचं तेव्हा मास्तरबाबत मला सांगणं अवघड आहे - थोडी भीती, थोडा दरारा, थोडा धाक अन बराचसा आदर!
अन पुण्यातल्याच एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रात काम करत असताना एक दिवस मला अचानक इंडियन एक्सप्रेसच्या तत्कालिन चीफ रिपोर्टरचा फोन आला. "मास्तर तुझे मिलना चाहता है!" पाचच शब्द मी ऐकले अन सुटलो ते तडक एक्सप्रेसच्या ऑफिसात मास्तरसमोरच उभा राहिलो. "का रे गाढवा! तिथेच थांबणार की इथे येऊन काम करणार?" मास्तरचे शब्द ऐकले अन अक्षरशः अंगावर काटा आला. मी, एक छटाक पत्रकार, मास्तरच्या हाताखाली काम करु शकतो? तेव्हढी लायकी आहे माझी? कधी हो म्हणलो ते कळलंच नाही. त्या दिवशी तासाभरात माझ्या जुन्या नोकरीचा राजीनामा दिला अन गावभर सायकल पिदाडली - मला मास्तरनं कामावर घेतलंय असं ज्याला त्याला सांगत.
दुसरा दिवस उजाडला (सहसा पत्रकारांचा दिवस सकाळी दहा अकरा वाजता उजाडतो.) अन सकाळी सकाळी मी इंडियन एक्सप्रेसमधे कामावर हजर. मास्तरच्या हाताखाली काम करायला मिळणार म्हणुन मन अगदी फुलपाखरु झालेलं. पहातो तर तिथं वेगळीच गडबड सुरु. तेव्हा कोरेगांव पार्क वगैरे भागात टेक्नो पार्ट्यांना उधाण आलं होतं अन इंडियन एक्सप्रेस त्या तश्या पार्ट्यांच्या विरोधात बातम्या जोरात छापत होतं. आदल्या दिवशीच कोरेगाव पार्कमधल्या एका हॉटेलात आमच्या एका फोटोग्राफरवर काम करत असताना एका परदेशी माणसानं हल्ला केला होता. सगळे त्याच गडबडीत. माझ्याकडं कुणाचं लक्षच नाही. बसलो तसाच मुडपुन, चीफ रिपोर्टरच्या टेबलसमोर एका खुर्चीत. समोर मास्तरच्या केबिनमधे मीटींग सुरु होती. रागानं लालबुंद झालेला मास्तर, "यु आर थिंकिंग लाईक अ बाबु! यु आर बिहेविंग लाईक अ हेडकॉन्स्टेबल! यु आर अ क्लर्क, नॉट अ जर्नालिस्ट," असे एकेकाला/ एकेकीला तडकवत होता. अन सगळे मान खाली घालुन ऐकत होते. "आय वॉन्ट टु गीव्ह अ मेसेज टु पीपल दॅट नथिंग कॅन स्टॉप अस फ्रॉम डुइंग अवर वर्क. नोबडी कॅन बुली अस," मास्तर म्हणत होता.
अचानक मास्तरचं लक्ष माझ्याकडं गेलं अन "यु! कम इनसाईड," असा पुकारा झाला. धडधडतं काळिज अन थरथरते पाऊल घेऊन आत गेलो अन बंदुकीतुन गोळी झाडावी तसा मास्तरनं प्रश्न विचारला. "यस्टरडे अवर फोटोग्राफर वॉज अ‍ॅटॅक्ड व्हाईल ऑन ड्युटी. व्हॉट शुड वी डु टुडे?" क्षणार्धात मी उत्तरलो,आय विल वर्क ऑन द सेम स्टोरी. बिसाईडस आय विल फॉलो अप विथ द पोलिस अ‍ॅन्ड फाईल ऑदर स्टोरी ऑन डेव्हलपमेंटस इन इन्व्हेस्टीगेशन. इफ देअर इज नो प्रोग्रेस, आय विल थ्रॅश अप द पोलिस टिल दे शो द रिझल्ट." मास्तर हसला अन म्हणाला, "लेटस शो देम अवर रिझॉल्व अ‍ॅन्ड स्ट्रेंग्थ. लेट अस टेक आऊट अवर ओन रुट मार्च देअर. वी ऑल विल गो ऑन टु व्हिलर्स सो दॅट एव्हरीबडी सीज अस. मी या नव्या रिक्रुटच्या गाडीवर बसेन. बट नो राऊडी बिहेवियर." अन दहा मिनिटात आम्ही सगळे स्त्री पुरुष पत्रकार गाड्यांवरुन कोरेगांव पार्कच्या गल्ल्यातुन फिरत होतो. तिथले सगळे लोक थक्क होऊन पहात होते या अजब रूट मार्चकडे. सगळ्या कोरेगांच पार्कमधुन फिरुन आम्ही शेवटी पोहोचलो ज्या हॉटेलात हल्ला झाला तिथं तर मालक धावत पुढं आला. सगळ्यांना मास्तरनं कॉफी पाजली अन मालकाशी थोडावेळ बोलुन परतलो. त्यानंतर तासाभरात तो हॉटेल मालक स्वतः त्या फरार हल्लेखोराला घेऊन पोलिस स्टेशनला पोहोचला पण.
मास्तरबरोबर काम करणं हे पत्रकारितेचं सगळ्यात मोठं प्रशिक्षण होतं. वाचक हा वृत्तपत्राचा केंद्रबिंदु असतो, त्याच्या जीवावर पत्रकाराच्या सगळ्या उड्या अन त्यामुळं पत्रकारानं जे लिहायचं ते वाचकाच्या हिताचच असलं पाहिजे हे मास्तरनं नीट ठसवलं. टीमस्पिरीट काय असतं, पत्रकारानं कितीही प्रलोभनं आली, कितीही धमक्या आल्या तरी ठाम कसं उभं रहावं अन सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही विषयात हात घालण्याआधी संपुर्ण होमवर्क कसा करावा हे त्याच्याकडं पाहुनच शिकायला मिळालं.
मास्तरचा स्वतःचा व्यासंग देखील दांडगा होता. रंगात आल्यावर मास्तर इतिहासावर, लष्करावर, राजकारणावर, पत्रकारितेवर, हवामानशास्त्रावर, कायद्यावर, समाजशास्त्रावर भरभरुन बोलायचा. तासन तास ते ऐकताना वेळ कसा जायचा हे लक्षात देखील यायचं नाही. सगळं झाल्यावर गाडी परत यायची पत्रकारितेवर, पत्रकारानं कसा व्यासंग केला पाहिजे अन कसा तरतमभाव ठेवला पाहिजे यावर.
मास्तरनं पत्रकार हा सुद्धा कार्यकर्ताच असतो हे मनावर ठसवलं. पुण्याची वाहतुक समस्या, रिक्षावाल्यांची अरेरावी, गणेशमंडळांची मनमानी, पार्ट्यांमधली बेधुंद मग्रुरी या आणि अश्या अनेक विषयांवर त्यानं वर्षानुवर्ष कळकळीनं काम केलं. बातम्या, इन्व्हेस्टीगेटीव्ह स्टोरीज, लेख तर लिहिलेच पण स्वतः अनेक समस्यांवर उपाय शोधुन काढले. एक्सप्रेस सीटीझन फोरम मार्फत अनेक विषय पुढे रेटले. गरज पडली तेव्हा जनहितार्थ याचिका करुन न्यायालयाचे दरवाजे पण ठोठावले. गणेश मंडळांच्या मांडवाच्या आकाराबाबतची नियमावली, ध्वनिप्रक्षेपकांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदुषणाबाबतच्या नियमांची अंमलबजावणी, सहाआसनी रिक्षांवर बंधने, प्रिपेड रिक्षा पद्धत, टेकड्यांवरची अतिक्रमणे थांबवणे अश्या अनेक गोष्टी मास्तरनं केल्या. पण हे करत असताना त्यांच्याबद्दल कुणाच्या मनात दुस्वास निर्माण नाही झाला. कारण सगळ्यांनाच त्यांचे हेतु स्पष्टपणे माहिती होते. गणपती मंडळांच्या मांडवाबाबत जनहितार्थ याचिका झाल्यावर तर मास्तरच्या विरोधात बरेच जण आंदोलनाला उतरले होते. पोलिससुद्धा धसकले होते. मास्तरनं तरीही गणेश मंडळांबरोबर मीटींग घेतली अन सर्वांनीच त्याचं म्हणणं समजावुन घेतल्यावर नियम पाळणं कबुल केलं. कुठलीही जबरदस्ती न करता उत्सवाचे दहा दिवस रस्ते मोकळे राहु लागले.
१९७१ च्या युद्धाचा बहुतेक सगळ्यांना विसर पडलेला असताना मास्तरनं त्या झळझळीत विजयाचा रौप्यमहोत्सव संपुर्ण वर्षभर साजरा केला अन संपुर्ण देशभर ती लाट पसरली. त्यातुनच सुरु झाले पुण्यात जनतेतर्फे युद्धस्मारक उभारण्याचे काम. जनतेने शहिद जवानांचे स्मारक उभारल्याचा भारतातला हा पहिलाच प्रसंग. हे स्मारक मोरवड्याजवळ आहे.
भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल मास्तरला प्रचंड अभिमान. मास्तर नेहमी म्हणे, "इंडियन्स आर सेकंड टु नन." १७७९ मधे महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठी फौजांना वडगाव मावळच्या लढाईत इंग्रजी फौजेची पार दाणादाण उडवली. तेथे तेव्हा बळी पडलेल्या स्टुअर्टचे थडगे आहे आणि त्याची इस्टुर फाकडा म्हणुन पूजा होते पण मराठ्यांच्या विजयाचे तिथे स्मारक नाही म्हणुन मास्तरने तिथे वडगांव स्मारक उभे केले.
कारगील युद्धानंतर अपंग जवानांना मदत करण्यासाठी एक्सप्रेसनं डिसेबल्ड सोल्जर्स फंड सुरु केला. अर्थातच त्याचे बरेचसे काम मास्तरने केले. कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या जवानांचे भवितव्य आशादायक करण्याचे काम मास्तरने अनेक वर्षे निष्ठेने केले.
कायद्यामुळे लोकांचे व लोकशाहीचे सबलीकरण होते यावर मास्तरचा दृढ विश्वास होता. कारभारात सुसुत्रता यावी, पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार निर्मुलन व्हावे यासाठी लोकांना सर्व माहिती मिळवण्याचा कायदेशीर अधिकार हवा असे मास्तरला वाटे. यामुळेच मास्तरने अनेक वर्षे माहितीच्या अधिकाराचा कायदा निर्माण व्हावा यासाठी अण्णा हजारे यांच्या साथीने लढा दिला. कायदा निर्माण झाल्यावर त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हम जानेंगे याहु ग्रुप सुरु केला. इंडियन एक्सप्रेसमधे या कायद्याबाबतची माहिती देण्यासाठीचे एक्सप्रेस इनिशिएटीव्हज हे पुर्ण एका पानाचे सदर अनेक वर्षे चालवले.
२००७ मधे इंदियन एक्सप्रेसमधुन निवृत्त झाल्यावर मास्तरने पुण्यात इंटेलिजंट पुणे हे टॅब्लॉईड वीकली सुरु केले. अर्थातच त्याच्या बरोबर होतो आम्ही दोघे - आमची जुनी सहकारी आणि टु द लास्ट बुलेट ची सहलेखिका विनिता देशमुख आणि मी. पण मास्तरची ही सेकंड इनिंग फारच अल्पकालीन ठरली.
१५ जुलै २००७ च्या दुपारी जेवायला बसण्याआधी मी मास्तरला फोन केला. आमचे कामाचे बोलणे सुरु असतानाच अचानक मास्तरने मी जेवलो आहे का अशी चौकशी केली. मी आता जेवायचेच आहे म्हणल्यावर मग आता फोन ठेव. उद्या बोलु. मी पण जेवतो. असे मास्तर म्हणाला. अन त्यानंतर काही क्षणातच परत फोन घणाणला. मास्तरला हार्ट अ‍ॅटॅक आला होता. धावत पळत गेलो तर तोवर मास्तर आम्हाला सोडुन गेला होता, कधीही न परतण्यासाठी!
आज मास्तर आपल्यात नाही हे अजुनही मनाला पटत नाही. मास्तर अजुनही माझ्या अन इतर अनेकांच्या मनात आहे. आमच्या श्रद्धेमधे तो आहे. आमच्या विश्वासात तो आहे. आजही मी अनेक निर्णय अमुक परिस्थितीत मास्तरने काय केले असते असा विचार करुन घेतो. पण.....
अनेकदा समोर एखादा यक्षप्रश्न उभा रहातो. मास्तरने त्या परिस्थितीत काय केले असते हा प्रश्न मी स्वतःलाच विचारतो अन एकदम लक्षात येते की मास्तर असता तर हा प्रश्न त्यानेच सहज सोडवला असता. अन मग उरते ती केवळ एक पोरकेपणाची भावना... घशात दाटुन आलेला आवंढा... डोळ्यात तरळणारे अश्रु... मन आक्रंदत असतं, "मास्तर तुझ्याकडं शिकवायला एव्हढं होतं. तु सगळं आम्हाला द्यायचा प्रयत्न केलास पण आम्हीच कर्मदरिद्री. आमचा आवाकाच नव्हता तुझ्या ओंजळीतनं सांडलेलं सगळं वेचायचा!"
डिस्क्लेमरः इथं अनेकांना प्रश्न पडेल की मला ज्याच्याबद्दल एव्हढा आदर वाटतो त्याचा एकेरी उल्लेख या लिखाणात कसा? पण तसेही आपण आईला कुठं अहोजाहोन हाक मारतो अन भक्तपण नेहमी देवाला अरे तुरेच करतो ना?

नोकरीशिक्षणविचारमाध्यमवेधअनुभव

प्रतिक्रिया

मितान's picture

11 Aug 2010 - 5:01 pm | मितान

उत्तम लेखन !

असा मास्तर भेटायला भाग्यच लागतं. :)

मला पण माझ्या मास्तरची आठवण झाली !

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Aug 2010 - 5:01 pm | llपुण्याचे पेशवेll

चांगली ओळख करुन दिली आहे मास्तरांच्या कामाची. त्यांच्या कामाचा आवाका इतका मोठा होता हे ठाऊक नव्हते.
धन्यवाद प्रसन्नदा, इतक्या चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळ्ख करून दिल्याबद्दल.

प्रसन्न केसकर's picture

11 Aug 2010 - 5:17 pm | प्रसन्न केसकर

२००० नंतर पत्रकारितेत आलेल्यांना सुद्धा मास्तर माहिती नाहीये.
अन त्यांच्या व्यक्तीमत्वाचा किंवा कार्याचा आढावा एका लेखात घेणे मला शक्य होईल असे वाटत नाही. अजुनही बरेच काही राहुन गेलेले आहे.

श्रावण मोडक's picture

11 Aug 2010 - 10:06 pm | श्रावण मोडक

हे लेखन केल्याबद्दल धन्यवाद.

त्यांच्या व्यक्तीमत्वाचा किंवा कार्याचा आढावा एका लेखात घेणे मला शक्य होईल असे वाटत नाही. अजुनही बरेच काही राहुन गेलेले आहे.

या एकेक घटना, त्या हाताळण्याची मास्तरची (हो इथं एकेरीच बरोबर आहे!) पद्धती, त्यामागची विचारांची बैठक हे सगळं लिहून काढच. ऐकून खूप आहे, वाचायचंही आहे.

संदीप चित्रे's picture

12 Aug 2010 - 12:17 am | संदीप चित्रे

>> या एकेक घटना, त्या हाताळण्याची मास्तरची (हो इथं एकेरीच बरोबर आहे!) पद्धती, त्यामागची विचारांची बैठक हे सगळं लिहून काढच
नक्की लिहा.. वाचायला आवडेल.
एकंदर भन्नाटच होता मास्तर ...

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Aug 2010 - 5:02 pm | घाशीराम कोतवाल १.२

>>इथं अनेकांना प्रश्न पडेल की मला ज्याच्याबद्दल एव्हढा आदर वाटतो त्याचा एकेरी उल्लेख या लिखाणात कसा?
होय प्रसन्दा मला हाच प्रश्न पडला होता.

>>आपण आईला कुठं अहोजाहोन हाक मारतो अन भक्तपण नेहमी देवाला अरे तुरेच करतो ना?
हॅट्स ऑफ टु मास्तर
बस्स व्यक्तीचित्रण आवडले येव्हडच म्हणेन

अर्धवट's picture

11 Aug 2010 - 5:03 pm | अर्धवट

>>वाचक हा वृत्तपत्राचा केंद्रबिंदु असतो, त्याच्या जीवावर पत्रकाराच्या सगळ्या उड्या अन त्यामुळं पत्रकारानं जे लिहायचं ते वाचकाच्या हिताचच असलं पाहिजे हे मास्तरनं नीट ठसवलं.

खुप मोठा विचार आहे नाही का हा.

>>पत्रकार हा सुद्धा कार्यकर्ताच असतो
जियो..

प्रसन्न्दा.. केवळ निशब्द... काय बोलणार.. सादर प्रणाम तुम्हा दोघांनाही

स्वाती दिनेश's picture

11 Aug 2010 - 5:05 pm | स्वाती दिनेश

मास्तरांची ओळख आवडली, मास्तरांची अचानक एक्झिट झालेला शेवट चुटपुट लावून गेला.
स्वाती

चतुरंग's picture

11 Aug 2010 - 5:08 pm | चतुरंग

तुमच्या मास्तरचे नाव मी एक्सप्रेसमधून मागे कधीतरी वाचलेले परंतु ते एवढे मोठे नाव होते ह्याची कल्पना नव्हती!
अतिशय हृद्य ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2010 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रसन्न, हे नाव आधी ऐकले होते आणि एकदा तुझ्याकडून उल्लेख ऐकला होता. छान रंगवली आहेस आठवण.

अतिशय भावपूर्ण आणि परिणामकारक व्यक्ती चित्र !!

छोटा डॉन's picture

11 Aug 2010 - 5:23 pm | छोटा डॉन

बाप माणसावर बाप लेख लिहला आहे प्रसनदा ....
सलाम टु युवर मास्तर ...

एवढी छान ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु :)

पुप्याला दिलेल्या तुमच्या उपप्रतिसादात "त्यांच्या व्यक्तीमत्वाचा किंवा कार्याचा आढावा एका लेखात घेणे मला शक्य होईल असे वाटत नाही. अजुनही बरेच काही राहुन गेलेले आहे. " हे आले आहे, अजुन असेच येऊद्यात हेच म्हणतो.

- छोटा डॉन

मराठमोळा's picture

11 Aug 2010 - 5:33 pm | मराठमोळा

प्रसन्नदा,
नाही नाही म्हणता तुम्ही हा लेख लिहिलाच.
अंगावर रोमांच उभे राहिले लेख वाचुन. अशी लोकं फार क्वचित भेटतात आयुष्यात.
मास्तरांची पुन्हा ओळख करुन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद.

जिप्सी's picture

11 Aug 2010 - 5:43 pm | जिप्सी

मस्त लेख राव्,खरंच तुमचं पत्रकारांच जगचं वेगळं !!!
आजुन लिवा राव!

अवांतर :-इस्टुर फाकडया नवसाला पावतो.

(नवश्या) जिप्सी

प्रसन्न केसकर's picture

11 Aug 2010 - 6:03 pm | प्रसन्न केसकर

ही गुलामी मनोवृत्तीतुन जन्मलेली अंधश्रद्धा आहे. दुर्दैवाने त्याला शासनापासुन सगळे बळी पडलेत. (शासनातर्फे इस्टुर फाकड्याची पुजा सालीना प्रायोजित होते.)

मुळात इस्टुर फाकडा म्हणजेच कॅप्टन जेम्स स्टेवर्ट हा परकी आक्रमक. तो शूर होता हे नक्कीच पण त्याचा इतिहास हा आक्रमणाचा काळा इतिहास. जर अधिक उत्सुकता असेल तर बोरघाटातल्या शिंगरोबाचा इतिहास वाचावा. नंतर इंग्रजांनी मराठ्यांना जिंकले तेव्हा इतिहासाचे विकृतीकरण झाले त्यातुन इस्टुर फाकडा जन्माला आला - अगदी पीर अफझलखानासारखाच. सर्वावर कडी म्हणजे इस्टुर फाकडा मुळात १४ जानेवारी १७७९ रोजीच्या वडगावच्या लढाईत मेलाच नाही. तो त्याआधीच दहा दिवस म्हणजे ४ जानेवारीला कार्ल्याला मेला असे अनेकांचे म्हणणे आहे.

मृत्युन्जय's picture

11 Aug 2010 - 7:32 pm | मृत्युन्जय

नक्की तारीख माहित नाही. पण तो शेवटच्या लढाईच्या आधी मारला गेला असे म्हणतात हे मात्र खरे. त्याच्या वधामुळेच गोर्‍यांचा आत्मविश्वास संपला आणि ते हारले असे मानले जाते.

मृत्युन्जय's picture

11 Aug 2010 - 7:32 pm | मृत्युन्जय

नक्की तारीख माहित नाही. पण तो शेवटच्या लढाईच्या आधी मारला गेला असे म्हणतात हे मात्र खरे. त्याच्या वधामुळेच गोर्‍यांचा आत्मविश्वास संपला आणि ते हारले असे मानले जाते.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Aug 2010 - 5:52 pm | प्रकाश घाटपांडे

मास्तरांच्या स्मृतीनिमित्त झालेल्या मराठा चेंबर्स मधील कार्यक्रमाला मी गेलो होतो तेव्हा त्यांच्या विषयी माहिती समजली. या निमित्त उजाळा मिळाला.

काय बोलु ? कर्दळेसर होते तोवर चांगल होतं (मी चांगल म्हणतोय, ठीक नाही ) !! कोणीतरी आमच्यासारखंही होतं (राजकारणापलीकडचं) आता मात्र बोटावर मोजण्याईतके ?? त्यातही टोचणं एकावे लागतात !! असो !!.......न लिहीलेच बरं....

डायरी लिहीता आली असती !! ती एक शाळाच होती की !!

अर्थात काही गोष्टी 'बाहेर'न आलेल्याच बर्‍या!! ...मत दिले आहे ...दिस ईज नॉट अ राईट फ्लॅटफॉर्म

...पण आपल्याला कधीतरी फ्लॅटफॉर्म मिळेल , प्रसनदा ??????????????///

आशावादी
सुहाश्या !!

क्रेमर's picture

11 Aug 2010 - 6:21 pm | क्रेमर

मास्तरांचे व्यक्तिचित्रण आवडले.

दत्ता काळे's picture

11 Aug 2010 - 6:22 pm | दत्ता काळे

मीपण नांव ऐकलेलं होतं पण माणूस एवढा मोठा असेल हे माहीत नव्हतं. तुम्ही उत्तम परीचय करून दिलात. धन्यवाद.

घाटावरचे भट's picture

11 Aug 2010 - 7:03 pm | घाटावरचे भट

उत्तम परिचय. धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

11 Aug 2010 - 7:45 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.

सहज's picture

11 Aug 2010 - 8:43 pm | सहज

फार उत्तम ओळख.

इन्द्र्राज पवार's picture

11 Aug 2010 - 7:24 pm | इन्द्र्राज पवार

आपल्या "गुरुं"चे भावस्पर्शी चित्र लेखकाने उभे केले आहे हे प्रत्येक ओळीला जाणवते. शेवट "टची" आहे.

"यामुळेच मास्तरने अनेक वर्षे माहितीच्या अधिकाराचा कायदा निर्माण व्हावा यासाठी अण्णा हजारे यांच्या साथीने लढा दिला."
या कामामुळे सर्वसामान्य जनता त्यांची नेहमी ऋणी राहील इतके ते कार्य महत्वाचे आहे.

'इस्टुर फाकड्या' ची माहिती होती आणि त्या नावा मागचा इतिहासदेखील. (अलुपिष्टन सारखाच)

चिन्मना's picture

11 Aug 2010 - 7:30 pm | चिन्मना

व्यक्तीचित्रण आवडले. अशी माणसे होती/आहेत म्हणूनच जग सुरळीत चालू राहते असे कधीकधी वाटते.

स्वाती२'s picture

11 Aug 2010 - 7:35 pm | स्वाती२

आवडले.

धडाडीच्या माणसाची तशीच सशक्त ओळख करून दिलीत.

शाहरुख's picture

11 Aug 2010 - 8:02 pm | शाहरुख

पत्रकारिता आणि त्यातील माणसं यावर असेच लिहीत रहावे.

विलासराव's picture

11 Aug 2010 - 8:03 pm | विलासराव

भाग्यवान आहात... हेच म्हणतो.
अतिशय हृद्ययस्पर्शी शब्दांत करुन दिलेला आपल्या गुरुंचा परिचय आवडला.

विनायक पाचलग's picture

11 Aug 2010 - 9:21 pm | विनायक पाचलग

सलाम !!!!
लेखातील व्यक्तीला आणि लिहिणार्‍यालाही ..

विद्याधर३१'s picture

11 Aug 2010 - 9:43 pm | विद्याधर३१

कालच्याच लोकसत्तामध्ये त्यांच्या नावाने एक माहिती आधिकाराबद्दल एक वाचनालय पुणे महानगपालिकेने चालू केल्याची बातमी होती
आणी आजच त्यांचे व्यक्तीचित्र वाचायला मिळाले....

आळश्यांचा राजा's picture

11 Aug 2010 - 10:03 pm | आळश्यांचा राजा

फार छान आणि प्रभावी चित्रण. मास्तरांचे वेगळेपण आणि त्यातच असलेले मोठेपण अचूक रेखाटले आहे.

मदनबाण's picture

12 Aug 2010 - 4:42 am | मदनबाण

सुंदर लेख... :)

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2010 - 5:13 am | राजेश घासकडवी

प्रसनदा, तुम्ही खूप मनापासून, आतून लिहिलेलं आहे हे जाणवतं.

बहुतेक वाचकांचं विश्व नोकरी-घर यात मर्यादित असतं. बाहेर चाललेल्या घटनांशी माध्यमांमधूनच, दूरान्वयाने संबंध येतो. त्या विश्वातलं एक दादा व्यक्तिमत्व, व त्याचबरोबर तुम्हाला ते गुरुसमान असणं, यासारखा दुग्धशर्करा योग विरळाच.

हा लेख ज्या मालेचा गोषवारा, इंट्रोडक्शन आहे अशी माला लिहावी ही विनंती. रंगवण्याची हातोटी तुम्हाला आहेच, पण एकेक प्रसंग अधिक खोलात जाऊन वर्णन केला तर या लेखाप्रमाणेच वाचकांना भिडणारं खूप लिहिता येईल असं वाटतं.

नंदन's picture

12 Aug 2010 - 6:23 am | नंदन

लेख अतिशय आवडला.

हा लेख ज्या मालेचा गोषवारा, इंट्रोडक्शन आहे अशी माला लिहावी ही विनंती. रंगवण्याची हातोटी तुम्हाला आहेच, पण एकेक प्रसंग अधिक खोलात जाऊन वर्णन केला तर या लेखाप्रमाणेच वाचकांना भिडणारं खूप लिहिता येईल असं वाटतं.

-- सहमत आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Aug 2010 - 9:23 am | विश्वनाथ मेहेंदळे

सहमत !!!!

शिल्पा ब's picture

12 Aug 2010 - 5:43 am | शिल्पा ब

लेख खूप आवडला. असा गुरु लाभायला भाग्य लागते..
शहिदांचे स्मारक उभे करणे, लोकांना कायद्याची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न करणे, गणेशोत्सव कमीत कमी प्रदूषणास कारणीभूत व्हावा या दृष्टीने केलेले हे उत्तम काम.

भावस्पर्शी लेखन.

sneharani's picture

12 Aug 2010 - 10:10 am | sneharani

मस्त लिहला आहेत लेख.
अशी माणसं फार कमी भेटतात.
लिहीत रहा.