प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करणारा महावीर कोण? या प्रश्नाचा शोध 'फर्डिनांड मॅगेलान'पाशी येऊन संपतो. कारण हाच तो सुपरहिरो ज्याने पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. ती सुद्धा आपण शंकराला प्रदक्षिणा घालतो ना, तशी!
या मॅगेलानबद्दल मी पहिल्यांदा वाचलं जेव्हा मी हौशी खगोलनिरीक्षकाचं काम करायचो. दक्षिण गोलार्धातून दिसणारा एक खगोलीय अविष्कार म्हणजे मॅगेलानचे ढग. प्रत्यक्षात ह्या अवकाशातील छोट्या आकाराच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) असून आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरणाऱ्या उप-आकाशगंगा (किंवा लघु-दीर्घिका) आहेत. ही आणि याबद्दलची माहिती गोळा करताना अजून थोडी शोधाशोध केली आणि कळलं की या आकाशगंगांचं नाव हे 'फर्डिनांड मॅगेलान' या जग-प्रसिद्ध नाविकाच्या नावावरून दिलंय, ज्याने यांचा शोध (डिस्कव्हरी) लावला. मॅगेलानचं नाव अजूनही अनेक जागांना, वस्तूंना, पदार्थांना, प्राण्यांना दिलं गेलंय कारण या गोष्टी त्यानंच पहिल्यांदा जगासमोर आणल्या. असा हा मॅगेलान आणि त्याची ही परिचयात्मक माहिती.त्याची अजून थोडी ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!
मॅगेलानचा जन्म झाला १५व्या शतकाच्या उत्तरार्धात एका पोर्तुगीज कुटुंबात. लहान वयातच मॅगेलान पोर्तुगीज राजाच्या दरबारी हुजर्या म्हणून नोकरीस लागला, अर्थातच ही नोकरी म्हणजे त्याच्या कुटुंबाचा पिढीजात पेशा होता. पण बहुधा मॅगेलानचं मन यात रमलं नसावं. कारण काही वर्षातच एकदम शांत आणि सरळसोट नोकरी सोडून तो एका जहाजावर खलाशाची अतिशय सामान्य नोकरी करू लागला आणि तिथेच त्याची समुद्राशी ओळख झाली. दक्षिण-पूर्वेतील पोर्तुगीज वसाहतींवर काम करताना अक्कलहुशारी, मेहेनत आणि थोडंफार नशीब यांच्यामुळे मॅगेलान वरिष्ठांच्या जसा पटकन नजरेत भरला, तशीच थोड्याच वर्षांत त्याचावर खप्पामर्जीही झाली. त्यातच अवैध व्यापाराचा शिक्का माथ्यावर लागल्याने पोर्तुगाल आणि पोर्तुगीज वसाहतींमध्ये त्याला काम मिळेनासे झाले. पोर्तुगीज राजानेही त्याची पश्चिमेकडील मसाल्याच्या बेटांवर मोहीम आर्थिक कारणे पुढे करून आणि मॅगेलानच्या मागण्या नाकारून रद्द केली. पोर्तुगालमध्ये करण्यासारखे मॅगेलानकडे काहीच उरले नाही. निराश मॅगेलान पोर्तुगाल सोडून स्पेनमध्ये निघून गेला.
१५वं शतक संपत आलं होतं. जगाचे नकाशे बनवायचं काम नुकतंच सुरु झालं होतं त्या काळातली ही गोष्ट. संशोधक आणि धर्मसंस्था यात 'पृथ्वी गोल आहे की सपाट आहे ' या प्रश्नावरून वादंग माजला होता. पोर्तुगीजांतर्फे वास्को-द-गामा भारतात पोहोचला होता. पोर्तुगाल आणि स्पेन ही दोन्ही राष्ट्रं तेव्हा अनिर्बंध राज्यकर्ते आणि परस्परांचा द्वेष यात गुंतून पडली होती. त्यातून मान्य कराव्या लागलेल्या एका तहानुसार 'आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे जाणारा मार्ग' पोर्तुगीजांच्या ताब्यात आला होता. पोर्तुगीज भारतात पोहोचले आणि भारत नावाचा खजिना त्यांच्या हाती लागला ही गोष्ट स्पेनच्या राजाला सहन होणारी नव्हती. खुष्कीचा (जमिनीवरील) मार्ग हा कठीण तर होताच, त्यातच तुर्क, मूर आणि अफगाण टोळ्यांमुळे धोक्याचा होता. समुद्री चाचेगिरी आणि होणारी लुटालूट लक्षात घेऊनही हा मार्ग सोयीचा असल्याने स्पेनचे राज्यकर्ते लवकरात लवकर भारतात पोहोचण्यास उत्सुक होते. स्पेनच्या राजाने 'कोलंबस'ला भारतात जायचा नवा समुद्रामार्ग शोधायला संपूर्ण अर्थसहाय्य केलं. पण हाय रे कर्मा! कोलंबसाने भारताऐवजी अमेरिकेचा शोध लावला. अमेरिका कसली, त्याने तर अमेरिकेच्या आधी लागणाऱ्या वेस्ट इंडीज बेटांचा शोध लावला होता. कोलंबसला किंवा इतर स्पेनला आपण कसला शोध लावलाय याची सुतराम कल्पना नव्हती, आणि ते भारताला पोहोचायच्या ऐवजी कुठेतरी भलतीकडेच पोहोचल्याबद्दल कोलंबसावर नाराज होते. बिचाऱ्याने भारतात पोहोचण्यासाठी खूप खटपट केली पण तो गेला भलत्याच दिशेला त्याला तो तरी काय करणार.
अतिपूर्वेकडील मसाल्याची बेटे शोधण्यासाठी मॅगेलानला आर्थिक पाठबळ हवं होतं, आणि स्पेनच्या राजाला एक जाणकार मनुष्य. दोघांची भट्टी जमली आणि मॅगेलान त्याच्या पूर्वेच्या बेटांच्या मोहिमेला निघाला. स्पेनच्या राजाने त्याला आर्थिक मदत तर केलीच, शिवाय ५ जहाजांचा ताफा, सुमारे २०० खलाशी आणि एका जहाजाच्या कप्तानाला कधीही मिळणार नाहीत इतके अधिकार देऊन त्याची रवानगी केली. वेस्ट इंडीज बेटांचा ताबा जरी स्पेनकडे असला तरी ब्राझीलच्या भूभागाचा आणि किनारपट्टीचा ताबा पोर्तुगीजांकडे होता. पोर्तुगीज जहाजे आणि गस्त चुकवीत मॅगेलान आर्जेन्टिनापर्यंत येऊन पोहोचला. अतिशय खवळलेला अटलांटिक समुद्र आणि बेक्कार हवामान यामुळे त्याला तिथे काही काळ थांबून राहावे लागले. त्यानंतर संपूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जायच्याऐवजी मॅगेलानने आपला मोर्चा एका अरुंद अशा सामुद्रधुनीकडे वळवला. (सामुद्रधुनी: दोन भूभागामधील चिंचोळा समुद्राचा पट्टा. उदाहरणार्थ, भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेली पाल्कची सामुद्रधुनी).
इथून जात असताना मॅगेलानच्या २ जहाजांवर बंडखोरी झाली आणि मॅगेलानवर विश्वास नसणारे त्याचे २ कप्तान आणि काही खलाशी ही जहाजे घेऊन गुपचूप स्पेनला परत गेले. थोड्या दिवसांनी जेव्हा मॅगेलान सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला तेव्हा त्याला दिसला एक अतिविशाल महासागर. अटलांटिक महासागर आणि सामुद्रधुनीमधील वादळी वारे आणि खराब हवामान यांच्या मानाने हा सामुद्र अगदीच शांत होता. मॅगेलानने याला नाव दिलं 'शांत' समुद्र. हाच आजचा प्रशांत महासागर (pacific ocean)!
पडेल वारे, आणि समुद्राचा शांतपणा यामुळे मॅगेलानच्या खलाशांची प्रशांत महासागर पार करताना चांगलीच दमछाक झाली. ३-४ महिने महासागरात कसेबसे जिवंत राहून मॅगेलान अतिपूर्वेकडील देशात येऊन पोहोचला. मसाल्याच्या बेटांकडे यायचा एक संपूर्ण नवा मार्ग त्याने शोधून काढला होता. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
सध्याच्या फिलिपिन्समध्ये दोन स्थानिक शासन-कर्त्यांच्या भांडणात एकाला मदत (अर्थात राजकीय फायदा उठवण्यासाठीच) करताना झालेल्या हल्ल्यात मॅगेलान जबर जखमी झाला. स्थानिक आदिवासी त्याला घेऊन गेले. मॅगेलान त्यानंतर तो कधीही कुणालाही दिसला नाही. त्याला झालेल्या जखमांमुळे तो जागीच मरण पावला असावा असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी लिहून ठेवलेले आढळते. मॅगेलानच्या पार्थिवासाठी अनेक वाटाघाटी (आणि सौदेबाजीसुद्धा) झाली, पण सर्व व्यर्थ. जगाच्या या संशोधकाची अशी अखेर झाली की त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. पण त्याचा हा प्रवास व्यर्थ गेला नाही. या सगळ्या दिव्यातून वाचलेले खलाशी (फक्त १८ जण) रडत-खडत स्पेनला पोहोचले.
आता प्रश्न असा आहे की मॅगेलान जर मध्येच मरण पावला, तर असं का म्हणतात की त्याने जग-प्रदक्षिणा पूर्ण केली?
कारण जेव्हा तो पोर्तुगीजांच्या नोकरीत होता, तेव्हा तो फिलिपिन्सला येऊन काही काळ राहून गेला होता. त्यामुळे त्याने पहिली जग-प्रदिक्षिणा केली असे मानले जाते. त्या काळी समुद्र-प्रवासात जिवंत राहून सहीसलामत प्रवास पूर्ण करणे हीच सर्वात मोठी गोष्ट होती तिथे मॅगेलान आणि त्याचे मुठभर सहकारी जगाची सफर करून आले.
मॅगेलानने या सफरीदरम्यान बनवलेले नकाशे त्याच्या मृत्युनंतरही सुमारे ३०० वर्ष वापरात राहिले. गरजेप्रमाणे त्यात सुधारणाही झाल्या, पण पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मॅगेलानने सर्वप्रथम 'पुराव्यानिशी शाबित' करून दाखवला. पृथ्वीचे आणि समुद्रामार्गांचे नकाशे 'पृथ्वी गोल आहे' हे ध्यानात ठेवून बनवले महिजेत ही दूरदृष्टी सर्वप्रथम मॅगेलानने दाखवली. त्यासाठी काहीकाळ त्याला स्पेन मधील धर्मासंस्थांच्या रोषाला बळी पडावे लागले होतेच. पण त्याने त्याचा आग्रह सोडला नाही, आणि नंतर घडला तो सर्व इतिहास वर संक्षेपाने आला आहेच!
असा हा जगाचा संशोधक, मॅगेलान! स्वत:च्या कार्याने आणि चिकाटीने अजरामर होता येतं हे दाखवून देणारा एक असामान्य सुपरहिरो!
प्रतिक्रिया
31 Jul 2010 - 8:01 am | नितिन थत्ते
छान ओळख.
31 Jul 2010 - 10:12 am | विजुभाऊ
सुंदर माहिती.
मॅगेलन ने काही पुस्तके लिहीली आहेत का?
त्याबद्दल लिहा ना.
31 Jul 2010 - 10:41 am | स्वाती दिनेश
लेख आवडला, माहितीपूर्ण!
स्वाती
31 Jul 2010 - 10:52 am | अभिषेक पटवर्धन
बिचाऱ्याने भारतात पोहोचण्यासाठी खूप खटपट केली पण तो गेला भलत्याच दिशेला त्याला तो तरी काय करणार.
हे वाक्य तितकसं खरं नाही. पॄथ्वी गोल आहे, या तत्वावर विसंबुन, पश्चिमे कडे गेल्यावर गोल फिरुन शेवटी पुर्वेकडे असलेल्या भारतात पोच्ता येइल असा त्याचा कयास होता. (जो बरोबर होता)...अर्थात तेव्हा जगाला अमेरीका नावाची काही एक जागा आहे याची सुतराम कल्पना नवती. तेव्हा सगळा प्लान बरोबर असुनही बिचारा कोलंबस शेवटी अमेरीकेत पोचला. त्याच्याच मागे पुढे कधीतरी अमेरिगो वेस्पुसी अमेरीकेत पोचला, ज्याच्या नावावरुन अमेरीकला हे नाव मिळालं.
31 Jul 2010 - 4:07 pm | असुर
absolutely right अभिषेक!
आपण जे म्हणता आहात ते मी आधीच विषद केले आहे की "एका तहानुसार 'आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे जाणारा मार्ग' पोर्तुगीजांच्या ताब्यात आला होता."
कोलंबस निघाला होता भारतात जाण्यासाठी, किंवा भारतात जाण्यासाठी एक नवीन सागरी मार्ग शोधून काढण्यासाठी. पहिल्या ट्रीपला तो कॅरेबियन बेटांवर पोहोचला. अर्थात ही गडबड होण्यामागे त्याची 'पश्चिमेकडून भारतात पोहोचायला लागणारा वेळ आणि अंतर' याबद्दलची चुकीची भाकिते हेही एक कारण होतंच. दुसऱ्या ट्रीप पासून मात्र तो प्रामाणिकपणे कॅरेबियन बेटांवर जाण्यासाठीच निघाला आणि दर वेळी यशस्वीपणे पोहोचला.
पण कोलंबसला अर्थसहाय्य आणि साधनं दिली गेली होती ती भारताकडे जायचा मार्ग शोधण्यासाठी. त्यातच त्याने हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी देखील खूप खटपट देखील केली होती, कारण त्याची भाकिते आणि अंतरे पाहून कोणी त्याला मदत करायला तयार नव्हते. म्हणून हे वाक्य 'बिचाऱ्याने भारतात पोहोचण्यासाठी खूप खटपट केली पण तो गेला भलत्याच दिशेला त्याला तो तरी काय करणार' असे लिहिले आहे.
यातून काही चुकीचा अर्थ निघत असेल तर दोष केवळ माझ्या लेखनाचा आहे. मॅगेलानला महत्व देण्यासाठी मला कोलंबसाचे महत्व कमी करायचे नाहीये. पण ही गोष्ट मॅगेलानची आहे, आणि मला मॅगेलानची गोष्ट कोलंबसावर न्यायची नव्हती, म्हणून मी कोलंबसची गोष्ट ४-५ वाक्यात संपवली.
--(गैरसमज झाल्याबद्दल दिलगीर) असुर
31 Jul 2010 - 10:58 am | भारतीय
माहितीपुर्ण लेख.. फ्रांझ फर्डिनांड कोण होता काही माहितीये का हो तुम्हाला? त्याचही नाव याच संदर्भात ऐकल्यासारखे वाटतेय..
31 Jul 2010 - 12:24 pm | अप्पा जोगळेकर
छान माहितीपूर्ण लेख आहे. असुर, कॅरेबियन पायरेट्सवर पण लिहा की राव. मजा येईल.
फ्रांझ फर्डिनांडचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. ज्या राजपुत्राचा बोस्नियात हर्जेगोविना इथे एका सर्बियन माणसाने खून केला आणि ते कारण निमित्तमात्र होउन पहिलां महायुद्ध १९१४ साली पेटलं त्या ऑस्ट्रियन राजपुत्राचे नाव 'फ्रांझ फर्डिनांड' होय.
31 Jul 2010 - 5:27 pm | नितिन थत्ते
या संदर्भात तुम्ही ऐकलेले नाव बहुधा फर्डिनंड-द्-लेसेप्स असावे. त्याने सुवेझ कालव्याचे काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे पूर्वेला येण्यासाठी आफ्रिकेला वळसा घालणे टळले.
31 Jul 2010 - 11:33 am | Pain
सुंदर लेख !
आणि अभिषेकशी सहमत.
31 Jul 2010 - 12:08 pm | महेशकुळकर्णी
लेख आवडला !
लहानपणी 'किशोर' मासिकात याची गोष्ट वाचल्याचे आठवते आहे.
31 Jul 2010 - 9:30 pm | संजय अभ्यंकर
जेम्स क्लेवेलच्या Shogun कादंबरिचा नायक जॉन ब्लॅकथॉर्न हा मॅगेलनची सामुद्र्धुनी पार करून जापान मध्ये पोहोचला असे त्याने कादंबरीत लिहिले आहे.
१६०० च्या शतकातला तो काळ होता. ज्या काळी दिशादर्शनाची साधने मर्यादित होति, त्या काळात जहाजचे कप्तान रोज, ग्रह, तार्यांच्या स्थितीच्या नोंदि, कंपास वरील दिशा, पाण्याचे प्रवाह इ. नोंदि करून ठेवित असत. ज्या वहीत ह्या नोंदि केल्या जात त्याला रुट्टर म्हटले जाई.
कथेत लिहिल्यनुसार जॉनच्या हाती मॅगेलनचे रुट्टर लागते. त्याचा वापर करून तो जापानला पोहोचतो.
स्पेन व पोर्तुगाल ने ब्रिटन विरुद्ध पुकरलेल्या सागरी युद्धामुळे आशियात येण्याचा पर्यायी मार्ग ब्रिटनला हवा होता.
तो अश्या रितीने त्यांना सापडला.
जेम्स क्लेवेलने लिहिलेल्या सहा कदंबर्यांनुसार ब्रिटिशांच्या आशियातल्या वसाहती ह्या पूर्वे कडून सुरु होऊन पश्चिम आशियात पसरल्या असे दिसते.
तज्ञांनी प्रकाश टाकावा.
31 Jul 2010 - 12:31 pm | Nile
लेख आवडला.
हौशी खगोलनिरिक्षक या नात्याने तुमच्याकडुन खगोलावर येणार्या अनेक सुंदर लेखांची ही एक छानशी सुरुवात आहे असे मानतो आणि पुढील लेखांची वाट पहातो. :-)
31 Jul 2010 - 5:56 pm | रामदास
आणखी लेखनाची अपेक्षा आहे.
31 Jul 2010 - 7:04 pm | मस्त कलंदर
शाळेत असताना एकदा बाबांनी दोन रशियनांनी प्रकाशित केलेली पण मराठीत अनुवादित असलेली दोन पुस्तके आणली होती. त्यातले एक होते:"लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला?" त्या पुस्तकात हा फर्डिनांड मॅगेलान पहिल्यांदा पाहिला. त्याचे आणि त्याच्या जहाजाचे पानभर चित्र आणि त्याची गोष्ट दिली होती... आज हा लेख वाचताना त्या पुस्तकाची आठवण झाली पटकन!!! :)
असुर, छान सोप्या भाषेत माहितीपूर्ण लेख लिहिला आहे... अजून येऊद्यात हीच इच्छा....
31 Jul 2010 - 7:08 pm | निखिल देशपांडे
छान माहितीपूर्ण लेख..
पुढच्या लेखनाच्या प्रतिक्षेत..
31 Jul 2010 - 8:11 pm | आनंदयात्री
वाह लेख आवडला. रंजक आणि माहितीपुर्ण आहे.
धन्यवाद, पुढिल लेखाची वाट पहात आहे.
31 Jul 2010 - 10:13 pm | प्रभो
छान लेख.