एक वर्तुळ पूर्ण झालं

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
1 Apr 2008 - 5:55 pm

नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे
जन्माला आला म्हणून.

या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं
आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही.
या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं. पण त्या खोलीत गेल्यानंतरचा थरार खूप
काळ कायम होता.

----------
इंदूरला आल्यानंतर बाजीरावासंदर्भातील निनाद बेडेकर यांनी लिहिलेला लेख वाचनात आला. बाजीरावाने मराठी सत्तेचा प्रचंड
साम्राज्यविस्तार केला. नर्मदा ओलांडणारा हा पहिला मराठी वीर. त्याच्या पराक्रमाला तोड नव्हती. इंग्रजी इतिहासकारांनाही त्याचं
कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. शाहू महाराज तर एकदा म्हणाले होते ''दहा हजार सैन्य आणि बाजीराव यांच्यातलं काही
निवडायला सांगितलं तर मी बाजीरावाला निवडेन.'' उत्तर भारत आजही महाराष्ट्रापासून इतका लांब आणि 'परप्रांत' वाटतो, तर
त्यावेळी कुठलीही साधने नसताना हा भाग कसा वाटत असेल? मग बाजीरावाने उत्तर भारतात विस्ताराचं धैर्य कसं दाखवलं
असेल? माळव्यापासून बुंदेलखंडापासून त्याने मराठी जरीपटका डौलाने फडकावला. त्याच्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ३५-४०
लढाया त्याने खेळल्या. पण एकही तो हरला नाही. तो हाडाचा सैनिक होता आणि लढाई कशी जिंकावी याचे शास्त्र त्याला
अतिशय चांगले अवगत होते. बाजीरावाच्या मातोश्री राधाबाईंनी एकदा काशीयात्रेची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी वाटेतल्या सर्व
राजांनी बिनधोकपणे त्यांना जाऊ दिले. पण त्यांचा विशेष आदरसत्कार केला. बाजीरावाने या भागात गाजवलेल्या पराक्रमामुळेच
हे घडू शकलं.

बाजीरावाच्या तत्कालीन पराक्रमाचा एक किस्सा बेडेकरांनी नोंदवला आहे. त्यावेळी उदयपूरच्या राण्याने
बाजीरावाला बोलवलं. खास त्याच्यासाठी तिथली बाग सुशोभित केलं. त्याच्यासाठी सुवर्णाचं सिंहासन ठेवलं होतं. एक चांदीचं
सिंहासन स्वतःसाठी ठेवलं होतं. बाजीरावाला त्याने सुवर्णसिंहासनावर बसण्याची विनंती केली. रायाने त्या सिंहासनाकडे एकदा
पाहिलं आणि तो पटकन चांदीच्या सिंहासनावर बसला. सगळेच आश्चर्यचकीत झाले. मग रायाने खुलासा केला. ज्या सिंहासनावर
'राणा प्रताप बसले, त्यावर बसण्याची माझी लायकी नाही.' तेवढ्या एका वाक्याने राजपूत समाजाला रायाने जिंकून घेतलं. पुढे
जयपूरच्या जयसिंहाने देखील उदयपूरच्या राजासारखेच सुवर्णसिंहान केले. तिथे मात्र राया सुवर्णसिंहासनावरच बसला आणि
उदयपूर आणि जयपूर या दोन्ही गाद्यातील भेदही दाखवून दिला.

मराठी साम्राज्यविस्तार करणारा हा बाजीराव अवघ्या चाळीसाव्या वर्षी नर्मदेजवळ रावेरखेडी येथे अतिश्रमाने मरण पावला.

-----------------------
नुकतेच इंदूरजवळ धार या गावाला गेलो होतो. या गावाला मोठा इतिहास आहे. परमार वंशातील प्रसिद्ध राजा भोज दहाव्या
शतकांत इथेच राज्य करत होता. नंतर इस्लामी आक्रमणानंतर राज्य अल्लाउद्दीन खिलजीने गिळंकृत केलं. पुढे मुसलमानी
राज्यानंतर बाजीरावाने या प्रांतात मराठी अंमल प्रस्थापित केला. मराठी सुभेदारीच्या वाटण्या झाल्यानंतर धार पवारांकडे गेले.
आनंदराव पवार या पवारांच्या राज्यसत्तेतील पहिले राजे. धारच्या किल्ल्यावर मुसलमानांनंतर मराठ्यांनीही आपले वर्चस्व
प्रस्थापित केले.

पण या किल्ल्याशी निगडीत आणखी एक इतिहास निगडीत आहे. या किल्ल्यावर बघण्यासारखे काहीच नाही, असे आम्हाला (मी
आणि बायको) तिथे घेऊन जाणार्‍या रिक्षावाल्याने सांगितले. पण आम्हाला किल्ला आवडला. नंतर तिथे गेल्यानंतर एक
महत्त्वाची बाब समजली.

मराठी साम्राज्याचा अस्त ज्याच्या काळात झाला तो दुसरा (पळपुटा) बाजीराव याच किल्ल्यात जन्माला आला होता. माधवराव

पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या
बाजीरावाला जन्म दिला होता. पुढे घडलेला इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे. बाजीरावाच्या कितीही बाजूने आणि विरोधात
लिहिलं तर त्याच्या कारकिर्दीतच मराठी राज्य संपलं हेही तितकंच खरं.

पुरातत्व खात्याच्या एका कर्मचार्‍याने नियम डावलून आम्हाला ती खोली दाखवली, ज्यात दुसर्‍या बाजीरावाचा जन्म झाला होता.
पुरातत्व खात्याने ठेवलेल्या जुन्या मूर्तींखेरीज तिथं काहीही नव्हतं. एका भिंतीवर पेशवाईतील वाटावं असं चित्र ठेवलं होतं. बस्स.

मराठी साम्राज्याचा विस्तार करणारा एक बाजीराव आणि ज्याच्या काळात मराठी राज्य लयाला गेलं असा दुसरा बाजीराव.
दोघांच्या जन्माचा माझ्याशी जोडला गेलेला हा दुवा. यानिमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालं.

हे ठिकाणइतिहासलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

1 Apr 2008 - 6:22 pm | ध्रुव

आपला लेख आवडला!
--
ध्रुव

आनंदयात्री's picture

1 Apr 2008 - 6:23 pm | आनंदयात्री

माहिती. धन्यवाद.

डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे

भोपळ्याच्या वेलामुळे डुबेरे प्रसिद्ध कसे आहे ते नाही कळले.

भोचक's picture

1 Apr 2008 - 6:37 pm | भोचक

भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

चतुरंग's picture

2 Apr 2008 - 7:39 pm | चतुरंग

थोडा अधिक विस्ताराने असता तर आणखीन भावला असता.

मेहबूब आबासाहेब सतारमेकर, शनिवार पेठ, मिरज ह्यापलीकडे दुर्दैवाने त्यांची माहिती गुगलून मिळाली नाही पण सतार तयार करण्याबद्दल जास्ती माहिती इथे मिळेल.

चतुरंग

लेख बाजीरावाबद्दल आहे क भोपळ्यासाठी?ति. पू. आनन्दयात्रीजीना हा प्रश्न पडला असावा....
त्या प्रश्नाच्या उत्तरात्............विजुभाऊ

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 6:48 pm | मनस्वी

ज्ञानात भर पडली.

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:23 pm | प्राजु

खूपच सुंदर झाला आहे हा लेख. अतिशय माहितीपूर्ण.. बर्‍याच माहिती नसलेल्या गोष्टि समजल्या. आपले अभिनंदन. आणि धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

विजय आचरेकर's picture

2 Apr 2008 - 10:29 am | विजय आचरेकर

लेख आवडला
माहितीपूर्ण

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 5:59 pm | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

लेख नेहमीप्रमाणेच सुंदर!

राऊंना आमचा मानाचा मुजरा! थोरल्या आबासाहेबांचं स्वप्न राऊंनीच पुरं केलं..

तात्या.

भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यांकरता वापरतात असं मीही ऐकून आहे परंतु खास तंबोर्‍यांकरता विशेष मोठ्या आकाराचे भोपळेही मुद्दाम उगवले जातात. ते तयार झाल्यावर त्यातला गर काढून ते विशिष्ठ पद्धतीने वाळवले जातात, त्यामुळे त्यातून चांगला घुमारेदार आवाज येऊ शकतो..

आपला,
(आबासाहेब मिरजकरांचा शिष्य) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

2 Apr 2008 - 10:43 pm | संजय अभ्यंकर

भोचकभाऊ,

मान गये आपको!
कहाँ कहाँ तक घुमा लाये!

धारला व रावेरखेडीस आमचे नातेवाईक रहातात. लहानपणी पाहीलेले धार व रावेर आठवले.

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

2 Apr 2008 - 10:49 pm | संजय अभ्यंकर

भोचकभाऊ,

धन्यवाद!

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Apr 2008 - 4:46 pm | डॉ.प्रसाद दाढे

धार येथे प्रख्यात शिल्पकार 'अण्णासाहेब तथा रघुनाथ कृष्ण फडके' राहात असत. (ज्या॑नी चौपाटीवरचा लोकमान्य टिळका॑चा पुतळा तयार केला.) ख॑डेराव टेकडीजवळ त्या॑चा स्टुडिओ होता (आजही असेल). पुल॑नी 'गुण गाईन आवडी' मधील 'माझे दत्तक आजोबा' ह्या लेखात त्या॑चे सु॑दर व्यक्तिचित्र रेखाटले आहे

अविनाश ओगले's picture

3 Apr 2008 - 10:31 pm | अविनाश ओगले

आपले लिखाण खूप वेगळे. आवडले.

आंबोळी's picture

3 Apr 2008 - 11:13 pm | आंबोळी

पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या
बाजीरावाला जन्म दिला होता.

दुसरा बाजीराव राघोबादादान्च मुलगा होता?

(काका मला वाचवा फेम) नारायणाच मुलगा दुसरा माधवराव.... त्याचा मुलगा (की नातू?)दुसरा बाजिराव असावा....
राघोबाच मुलगा (नाव आठवत नाही)पहिल्या माधवरावाच्या हयातीतच मेला होता.....

यावर मि.पा. चे इतिहासाचार्य प्रकाश टाकतील काय?

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 11:20 pm | प्रभाकर पेठकर

दुसरा बाजीराव हा राघोबादादाचाच मुलगा. अमृतराव हा राघोबाचा दत्तक पुत्र होता.

दुसर्‍या बाजीरावाला नाना फडणीसाने तुरुंगात टाकून व्यसनी बनविले होते अशी वदंता आहे.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2011 - 12:15 pm | मृत्युन्जय

२० जुलै रोजीच मागच्या वर्षी बहुधा भोचक उर्फ अभिनय यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा धागा वरती आणतो आहे.