आपला देश सोडून दूर, अनोळखी देशात रहायला आल्यावर तिथला एकूण रागरंग, आचार विचार, राहणीमान ह्या सगळ्यांचा तक्ता समजाऊन घेताघेता, आपल्या नकळत आपण कधी त्या तक्त्यामधला एक रकाना बनून गेलो ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही! बाहेर आल्यावर आपल्यापैकी बहुतांश लोक कदाचित स्वत:ला आणि इतरांना सांगत असतील कि शेवटी आपला देशच बरा. दोन चार वर्षात आपण तर माघारी जाणार भैया! हा राग आलापता आलापता वर्षांमागून वर्षे उलटून जातात. आचानक हेच "जातो माघारी जातो माघारी’ गाणे कधी एखाद्या पार्टीत समोरचा माणूस गाऊ लागला कि आपण गालातल्या गालात हसतो.
देशाबाहेरच्या रंगात एकदा रंगल्यावर आपला संपूर्ण कायापालट जरी झाला नाही, तरी त्या रंगछटा मात्र निश्चीतच कुठेतरी आपल्या आत बाहेर छिडकल्या गेल्या असतात. मला वाटते, माणूस हा प्राणी स्वभावत:च एखाद्या स्पंज सारखा असावा! जिथे जातो तिथे आपण काहीना काही आत्मसात करीत असतो. ह्यात चांगले, वाईट सारेच आले. माणसा माणसांत फ़रक फ़क्त कोणी कसे फ़िल्टर लावले हा असेल. ह्या फ़िल्टरचा परिणाम म्हणून कोणी माणूस सामावून घेणारा तर कोणी हट्टी भासत असेल. प्रमाणाचा फ़रक सोडला, तर प्रत्येकानेच आजुबाजुच्या वातावरणातून काहीना काही उचललेले असते. अर्थातच आपल्या देशाबाहेर जास्त काळ घालवल्यानंतर, आपल्या एकूण विचारांत, आवडीनिवडीत, भाषेत फ़रक पडला असेल तर त्यात अस्वाभाविक काहीच नाही.
आमच्याकडे माझा मित्र भारतातून आला होता. माझा धाकटा मुलगा वय वर्षे अठरा--- सुट्टीमुळे घरी होता. घरी होता असे फ़क्त म्हणायचे. त्याचे सगळे चित्त बाहेरच लागलेले होते. त्यामुळे एकदोन तास निवांतपणे फ़ोनवर मित्राबरोबर गप्पा सुरु होत्या. अघळपघळ बर्मुडा घातलेला उंचनिंच देह. सक्तीच्या लष्करी शिक्षणामुळे ठेवावी लागलेली सोल्जरछाप क्रॉपकट कटींग, ह्या सगळ्या अवताराशी विसंगत बोकड दाढी, एका कानात लोंबकळणारी भिकबाळी आणि गळ्यामधे स्टीलची जाडजूड साखळी. अशा अवतारात हा बंब्या आपला मोबाईल कानाला लावून गप्पा मारीत घरभर बिनधास फ़िरतोय. बराच वेळ हे सिंगापूरीयन ध्यान पाहून आपली करमणूक करून घेतल्यावर, मित्राचे लक्ष मुलाच्या फ़ोनवरील बोलण्याकडे गेले. तेव्हा मात्र मित्राची विकेटच पडली. बारकाईने ऐकून देखील त्याला कळेना हा मुलगा बोलतो तरी काय आहे!
यू नो डे? म्हा बदी वॉ द मुवीरेडी. .......हाऊआ? दोन्नोले... यू आस ’इम डे. यू दोन्सी, यू शूअ वोन्त मिस अ तीन्ग.. डे!.... वाह्ल्लाऊ डे... हायतॉप स्तुप्पीदिती म्यान........... हे! डे... यू फ़िल्द फ़ाम रेडीआ? ......विचवना?........ द सारजन तोल्द आफ़तर द परेद मे...... तेल यू डे... आय कॅनॉत तहान......द फ़ाम सो लेच्चे.......
हे असे तासभर चालू होते. शेवटी न राहवून मित्राने मला विचारलेच. "अरे हा प्राणी कोणत्या भाषेत बोलतो आहे?" ही अगम्य भाषा सिंगापूरी इंग्लीशच आहे हे काही तरखडकरी पठडीतल्या मित्राच्या पचनी पडले नाही.
तरखडकरावरून आठवले, सिन्ग्लीशलाच काही नावे ठेवायला नको. तिकडे अमेरिकन्स देखील माझ्यावर असेच वैतागत असतील. तीस वर्षापुर्वीची ह्युस्टनची आठवण. एकदा फ़ोनवर एक अमेरिकन सुंदरी (आवाजावरून सुंदरीच असावी. निदान तसे समजायला काय जाते!) मला ए फ़ॉर ऎपलच्या थाटात कोणाच्या तरी नावाचे स्पेलींग सांगत होती. त्य़त एका अक्षरावर माझे घोडे जे अडले, ते काही केल्या पुढेच जाईना. ती आपली सारखी झी...झी असे काही तरी सांगायचा प्रयत्न करीत होती. आणि मी तिला "तुला जी फ़ॉर जर्मनी" म्हणायचे आहे कां? असा घोषा लावला होता. पण आमची दिलजमाई काही केल्या होत नव्हती. तिने निकराचा प्रयत्न म्हणून, "द लास्ट लेटर ऑफ़ द अल्फ़ाबेट, ए बी सी डी..... एक्स वाय झी" असे जेव्हा सांगीतले, तेव्हा माझ्यातला तरखडकर जागा होऊन त्याने "एक्सक्यूज मी.. द लास्ट लेटर ऑफ़ द अल्फ़ाबेट इज झेड" अशी दुरुस्ती तिला सुचवली होती. ते झेड प्रकरण काही तिच्या गळी उतरले नव्हते. मला वाटते, शेवटी तिने वैतागून फ़ोन आपटला असावा. मला मात्र त्यातल्या त्यात समाधान येवढेच मिळाले कि आपल्यालाच अमेरिकन्सचे उच्चार कळत नाहीत असे नाही, तर त्यांना सुद्धा आपले उच्चार समजत नाहीत.
इथे हे लक्षात घ्या कि त्यावेळेस झी टीव्ही नव्ह्ता. पुढे सिंगापूरात झी टीव्ही आल्यानंतर मी "झेड ई ई म्हणजे झी" पाहता पाहता झेडलाच झी म्हणू लागलो. माझ्या ब्रिटीश बॉसला ह्या नवीन ज्ञानाचे कौतूक वाटण्या ऎवजी रागच आला होता. "दीज *डी अमेरीकन्स, दे थींक दे स्पीक इन्ग्लीश. ऐक्चुअली दे हॅव स्पॉईल्ड अवर क्वीन्स लॆन्ग्वेज" असे त्याचे उदगार ऎकल्यावर ह्या झी आणि झेडच्या वादात आपण पडायचे नाही असा सूज्ञ निर्णय मी घेतला. तसे झी टीव्हीने आणखीही बरेच काही शिकवले. झी च्या बातम्यांनी हिंदीतील अंकगणना जसे वन, टू, थ्री, हंड्रेड, थावजंड इत्यादी पण शिकवली. पण तो भाग वेगळा.
अमेरिकेला उगाच नाही "अ बीग मेल्टीन्ग पॉट" असे म्हटल्या जाते. इथे येणाऱ्या प्रत्तेकावर अमेरिका आपली कल्हाई चढवतेच. साहेबाच्या ईन्ग्लीशचे तिने काय रूप बनवले ते सगळ्यांना ठाऊक आहेच. अर्थात सिंगापुरीयन्सनी तर ईन्ग्लीशला नवे रूप नाही, चक्क शिमग्याचे सोंग करून सोडले आहे. ते पाहीले की अमेरिकेला कुठल्या तोंडाने नावे ठेवणार? ह्या बीग मेल्टीन्ग पॉट मधे, माणसाची भाषाच काय, पण भूक देखील नवीन चवी घेऊन उफ़ाळून येते.
टेक्सासमधे आणखीन काही विचीत्र अनुभव आले. गेल्या गेल्या काही दिवस कार नसल्याने रस्त्यावर पायी चालावे लागायचे, कारण टॅक्सी किंवा बस अभावानेच दिसणार. तेव्हा पायी चालणाऱ्यांकडे लोक कसे विचीत्रपणे पहायचे. पहिल्यांदा जवळ क्रेडीट कार्ड नव्हते, तेव्हा कॅशने पैसे दिल्यावर शंकेखोरपणे पहाणी करायचे. पहिल्यांदा खूप राग यायचा. पण लवकरच ह्या सगळ्याला किती महत्व द्यायचे ते लक्षात आले. ह्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. अशा प्रसंगातून दोन्ही संस्कृतीच्या व्यक्ती एकमेकांना प्रेरीत करीत असतात. म्हणजेच अशा सांस्कृतीक इनटरऍक्शनचे परिणाम धिम्या गतीने दोन्ही बाजूंवर कार्य करून विचारात फ़ेरबदल घडवून आणत असतात. यातून धृवीकरण होऊन एक वेगळीच जागतीक महानगरीय संस्कती उदयास येत आहे असे मला वाटते.
सिंगापूर महानगरीत सुद्धा हेच बघायला मिळते. इथल्या कियासू वृत्तीविषयी तुम्ही कदाचित ऐकलेच असेल. कियासू म्हणजे मागे रहाण्याची भीती वाटणारे. म्हणून जीवनाच्या चढाओढीत पुढे रहाण्यासाठी सदॆव मरमर करणारे. पण नीट पाहीलेत, तर हा कियासू चष्मा कितीतरी दिल्ली किंवा मुंबईच्या माणसांनी सुद्धा चढवलेला दिसेल. आजच्या उंदीर दौडीतले ते एक संरक्षक शस्त्रही असेल. हे शस्त्र देखील असेच सांस्कृतीक इनटरऍक्शनमधून विकसीत झालेले आहे.
महानगरीय संस्कृतीची एक लक्षणीय बाजू असते. ती म्हणजे उदंडता. धनसंपत्ती, लोकसंख्या, समस्या, त्यावरील उपाय, बेकारी, नोकऱ्या, सारे सारे मुबलक असते. संपत्तीच्या उदंडते पाठोपाठ उद्दंडता पण येते. तीही कोन्याकोपऱ्यात आपले स्थान धरून असते. उद्दंडता नासाडीला जन्म देते. सारेच मुबलक असल्याने काटकसरीला मागच्या बेंचवर देखील स्थान मिळत नाही. ही नासाडी, अनाठायी खर्च नुकसानदायक असू शकेल हा विचार देखील आपल्याला शिवत नाही.
मागे एकदा कंपनीने मला बंगलोरला एक्सपॅट बेनेफिट पॅकेज देऊन पाठवले होते. घरी कोणी ओळखीची मंडळी दोनचार दिवस पाहुणी होती. माझी आपली एक सवय म्हणजे ज्या खोल्यांमधे कोणी नाही त्यातील फॅन लाइट बंद करायचे. पण ह्या मंडळींच्या मुक्कामात पूर्ण घरभर दिवाळी! लाइट ऑफ करकरून मी थकलो. त्यांचा माझा चोरशिपाईचा खेळच झाला होता जणू. शेवटी मी त्यांना स्बच्छच सांगीतले कि बाबांनो वापरत नसला तर फॅन, लाइट बंद करत जा. तर ते तणकलेच. “तुम्हाला काय लाइटचे बिल थोडेच भरावे लागते? कंपनीच तर भरते ना?” ही तर नासाडी वृत्तीची छोटीशी झलक झाली.
जेव्हा आपले काही जात नसेल, तेव्हा आपल्याला नासाडीचे काहीच वाटत नाही. पण खरेच आपले काही जात नसते का? आपल्याला ज्या काही सुखसोयी मिळत असतात, त्याचे दाम कुठल्या ना कुठल्या रुपात भरावेच लागतात. ग्लोबल वार्मींग हे ज्वलंत उदाहरण बघा. सिंगापूरला तर "फ़ुकटचे जेवण कुठेच नसते (देअर इज नो फ़्री लंच)" ह्या उक्तीची वारंवार आठवण लोकांना दिली जाते. इथल्या राज्यव्यवस्थेचा तो एक मजबूत खांब आहे. या उलट भारतात दिसते. सगळ्या सोयी फ़ुकट मिळाव्या म्हणून संघटना कंपन्यांवर, सरकारवर दबाव आणतात. मायबाप सरकारने आमची सगळी काळजी घ्यायलाच पाहीजे अशी मानसिकता खालच्या वर्गात सोकावली आहे. वाटेल तितके कर्ज घेऊन ठेवायचे. फ़ेडता आले नाही की राजकीय पक्षांवर दबाव आणून कर्जमाफ़ी मिळवायची. इतके सारे फ़ुकट वाटले तर कमावणार कोण आणि किती? सरकार कडून सोयी सवलती हव्या असतात. आपल्या कर्तव्याची जाणीव त्या प्रमाणात असते का हे कोणी तपासून पहाते का? काही फ़ायदा हवा असेल तर त्यासाठी काही किंमत देखील अपेक्षीत असते हे तत्व आजच्या लहान मुलांच्या अंगीपण कसे मुरले आहे ह्याचे डोळे उघडणारे उदाहरण परवा दिसले.
माझ्याकडे जपानहून माझा भाचा त्याच्या दोन छोट्या मुलांना घेऊन आला होता. त्याने एका जपानी मुलीशी लग्न केले आहे. काही कारणाने त्याची बायको जरी येऊ शकली नाही, तरी ह्या पठ्ठ्याने एकट्यानेच पाच आणि सात वर्षांच्या छोट्यांना घेऊन येण्याचे धाडस केले. मुलांना जपानी शिवाय कुठल्याच भाषेचा गंध नव्हता. मुले एकदम गोड गोंडस, जपानी बाहुल्यांसारखी! आम्ही त्यांच्याशी बोलतांना माझा भाचा दुभाषी व्हायचा. मुलेही खूष होती. सर्व नवीन गोष्टी बालसुलभ उत्सुकतेने विचारायची. दिवसभर बाहेर उंडारल्यावर थकून घरी आली. गप्पागोष्टी करीत आम्ही सगळे पहुडले होतो. सहज मायेने माझी पत्नी पाच वर्षाच्या जयचे पाय चेपून देऊ लागली. थोडा वेळ तो पण खुष झाला. पण मग न राहवून त्याने वडिलांना काहीतरी विचारले. त्याचे भाषांतर ऐकून आम्ही दंगच झालो. जय विचारत होता "बाबा, ही आन्टी माझी इतकी सेवा का करीत आहे? तिला माझ्याकडून काय हवे आहे?" मोबदला दिल्याशिवाय काही मिळत नसते हे लहानपणापासूनच ह्यांच्या अंगी बाणले असते कि काय? चित्राने जयला छळण्याची हाती आलेली संधी अर्थातच सोडली नाही. "मला काही नको. फ़क्त एक गोड पप्पी हवी." हे भाषांतर ऐकताच आपले पाय सोडवून तो धूम पळाला आणि दुरूनच भावाला म्हणतो कसा, "मी तुला सांगीतले ना, हिला नक्की काहीतरी पाहीजे आहे!"
तुम्ही ऐकलेच असेल. "पाण्या तुझा रंग कसा? ज्यात मिसळला तसा." ह्या ओळीत मी भर घालतो. "प्राण्या तुझा ढंग कसा? जिथे वाढला तसा."
एकूण काय, आपण जिथे रहातो, वाढतो, त्या वातावरणातून अगदी लहानपणापासून शेवट पर्यंत वेगवेगळे रंगढंग उचलतो. ह्या सर्वांतून माणूस नावाचे रसायन घडत जाते. माणसांचा समाज तयार होतो. समाजाची संस्कृती उभरते. सध्याच्या संस्कृतीत अजून तरी देवाधर्माचा मोठा भाग आहे. कोणी सांगावे? हा भाग उद्या कदाचित लक्ष्मी देवीच्या पुजेपर्यंतच मर्यादित असेल. अशी प्रक्रीया सुरू झाल्याची चिन्हे आजच अवतीभवती दिसतात! जग जसेजसे छोटे होत आहे तसतशी एक नवीन आंतरराष्ट्रीय महानगरी संस्कृती आकारास येत आहे हे मात्र नक्की.
********************************
प्रतिक्रिया
25 May 2010 - 11:59 am | इरसाल
अरुण अगदी मनोहर लिहिलेस बघ.
25 May 2010 - 12:36 pm | शैलेन्द्र
फारचं छान लेख..
25 May 2010 - 1:57 pm | स्पंदना
यू नो डे? म्हा बदी वॉ द मुवीरेडी. .......हाऊआ? दोन्नोले... यू आस ’इम डे. यू दोन्सी, यू शूअ वोन्त मिस अ तीन्ग.. डे!.... वाह्ल्लाऊ डे... हायतॉप स्तुप्पीदिती म्यान........... हे! डे... यू फ़िल्द फ़ाम रेडीआ? ......विचवना?........ द सारजन तोल्द आफ़तर द परेद मे...... तेल यू डे... आय कॅनॉत तहान......द फ़ाम सो लेच्चे....... :)) कस जमल हे लिहायला?
सुन्दर!! खुप गोष्टी पटल्या.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
25 May 2010 - 2:10 pm | अरुण मनोहर
काही नाही, बराहा युनीकोड वापरलं. ;)
अहो ह्यातल अक्षर अन अक्षर माझा मुलगा जसा बोलला होता तस आहे! सिंग्लीश तुम्हाला ऐकून माहीत असेलच.
25 May 2010 - 8:06 pm | पंगा
सिंग्लिशबद्दल ऐकलेले आहे. ('कॅन अल्सो कॅन', ज्याच्यात्याच्या मागे 'ला' वगैरे.) पण हा नमुना रोचक वाटला.
यातल्या 'ले' बद्दल ऐकलेले आहे. ('ला', 'ले' वगैरेंचे मूळ चिनी असावे काय?) बाकी 'डे' आणि काही शब्दांच्या शेवटीचा 'आ' ('हाउआ', 'रेडिआ', 'विचवन्ना') खास तमिळ वाटला. ('लित्तल इंदिया' इन्फ्लुएन्स?)
- पंडित गागाभट्ट
25 May 2010 - 8:34 pm | पंगा
त्यात काय कठीण आहे? असे तर मिसळपावावर अनेक जण लिहितात की!
- पंडित गागाभट्ट
25 May 2010 - 2:13 pm | अभिरत भिरभि-या
आवडला
25 May 2010 - 2:23 pm | मस्त कलंदर
छान लेख.. आवडला!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 May 2010 - 3:22 pm | पिंगू
एक उत्तम लेख आणि अतिशय छान निरिक्षण..
- पिंगू
25 May 2010 - 3:25 pm | निरन्जन वहालेकर
' मनोहर " कारी ! खूप छान लेख ! आवडला
25 May 2010 - 3:49 pm | भोचक
मस्त लिहिलंय.
(भोचक)
जाणे अज मी अजर
25 May 2010 - 4:42 pm | मुक्तसुनीत
लिखाण आवडले ! मनमोकळेपणे लिहिलेले आहे. लिहित रहा ! :-)
25 May 2010 - 4:54 pm | अनिल हटेला
लेख आवडला.....:)
(हींग्लीश)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
25 May 2010 - 4:58 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
25 May 2010 - 5:29 pm | भडकमकर मास्तर
मस्त लेख आवडला...
25 May 2010 - 5:45 pm | टुकुल
ते सिंग्लीश सोडता लेख आवडला, तुमच्या मुलाला मराठी येत काहो थोडबहुत? येत असेल तर त्याला इथे लिहायला सांगा, चुचु मराठी ला तोड भेटेल. :-)
--टुकुल
25 May 2010 - 6:47 pm | अरुण मनोहर
तुमच्या मराठी विषयीच्या भावना माझ्या सारख्याच आहेत. माझी दोन्ही मुले ईथेच जन्मली व वाढली. मला सांगायला अभिमान वाटतो, की दोघेही मराठी उत्तम बोलतात. घरी मराठीच बोलले पाहीजे असा दंडकच घातला होता. शाळेची सगळी वर्षे हिन्दी "मातृभाषा" म्हणून घेता आली. त्यामुळे मराठी वाच्ताही येते (अलबत हळुहळु, कारण सवय नाही).
सिंग्लीश बद्दल बोलायचे तर हा ईथल्या सर्वच भाषिकांचा हळवा मुद्दा आहे. उलटसुलट आणि अति आग्रहाची अशी विविध मते त्या विषयी ऐकायला मिळतात. पण मुलांनी सिंग्लीश हे समवयस्कांशी जवळीक साधायला जरी आत्मसात केले, तरी "शुद्ध ईंग्लीश" ला दूर केले नाही. त्यामुळे ईथली बरीच तरूण ही ईंग्लीश मधे द्वैभाषिक आहेत.
तुमच्या अभिप्राया साठी धन्यवाद.
25 May 2010 - 5:45 pm | अनामिक
लेख आवडला.
-अनामिक
25 May 2010 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आवडला........!
सिंगापूर महानगरीत सुद्धा हेच बघायला मिळते. इथल्या कियासू वृत्तीविषयी तुम्ही कदाचित ऐकलेच असेल. कियासू म्हणजे मागे रहाण्याची भीती वाटणारे. म्हणून जीवनाच्या चढाओढीत पुढे रहाण्यासाठी सदॆव मरमर करणारे.
वाक्य भिडले, सॉरी पटले. सिंगापूरचे हे वैशिष्ट्ये नोंद करुन ठेवले. :)
-दिलीप बिरुटे
25 May 2010 - 7:30 pm | ऋषिकेश
विषय नेहमीचा असला तरी देश बदलल्याने वेगळा फ्रेश लेख वाटला.
अजून येऊ द्या
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
25 May 2010 - 8:04 pm | अरुंधती
मस्त विषय, छान मांडणी, खुसखुशीत किस्से.... लेकाची सिंग्लीश तर लय भारी!
लेख आवडला.... अजून लिहा! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
25 May 2010 - 8:30 pm | शुचि
काय सुरेख जमलीये भट्टी. मस्त लेख.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 May 2010 - 10:02 pm | मदनबाण
अप्रतिम लेख... :)
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
25 May 2010 - 11:43 pm | शिल्पा ब
भारी खुसखुशीत लेख...आवडला.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/