तारीख २० एप्रिल २०१०. तब्बल ४० तासांचा थकवणारा प्रवास करुन विश्वनाथन आनंद बायको अरुणा समवेत अखेर एकदाचा बल्गेरियाची राजधानी सोफियाला पोचला आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला! आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तो फ्रँकफर्टला चार दिवस अडकून पडला होता आणि शेवटी त्याला गाडीने जावे लागले. तो आणि त्याचा आव्हानवीर बल्गेरियाचा वेसेलीन टोपालोव ह्यांच्यातला विश्वविजेतेपदाचा सामना २३ एप्रिलला सुरु होतोय. माझ्यासारख्या लाखो बुद्धिबळ रसिकांचे लक्ष आता १३ मे पर्यंत सोफियाला लागलेले असेल. निसर्गप्रकोपाने चार दिवस वाया गेले आणि अडनिडा प्रवास करावा लागला म्हणून आनंदने स्पर्धा तीन दिवस पुढे ढकलता येईल का अशी विचारणा केली परंतु बल्गेरिअन संयोजकांनी त्याला नकार दिला. ह्या सगळ्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच आनंदवर ताण येईल की काय अशी शंका व्यक्त होते आहे. टोपालोवला ह्या सगळ्याचा कसा फायदा उठवता येईल ह्या दृष्टीने त्याच्या गोटाची आखणी चालू झाली आहे. अशा रीतीने प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वीच ही लढत एका वेगळ्याच प्रकारे मानसिक स्तरावर सुरु झाली आहे.
१९८७ साली ज्यूनिअर विश्वविजेतेपद आणि ग्रँडमास्टरपद अशी दोन्ही एकाच वर्षी पटकावून भारताच्या बुद्धीबळविश्वाला आनंदने एक सर्वस्वी नवा आयाम दिला. 'एक भारतीय सुद्धा हे करु शकतो तर', अशी एक वेगळीच आत्मविश्वासाची भावना त्याने अनेकांच्या मनात जागवली. एकेकाळी सोविएत रशियाला जणू काही आंदण मिळाल्यासारखा असणारा हा खेळ हळूहळू संपूर्ण जगात विजेते निर्माण करु लागला आणि रशियन सद्दी संपुष्टात येऊ लागली. २००७ ला जगज्जेतेपद मिळवून आणि लगोलग दुसर्या वर्षीच २००८ ला व्लादिमीर क्रामनिकला पराभूत करुन ते टिकवून आनंदने इतिहास निर्माण केला.
ह्या दुव्यावर आनंदची छोटेखानी मुलाखत आहे. ती जरुर पहा. महान खेळाडू किती साधे असतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे (त्या बाबतीत फक्त सचिनचीच तुलना त्याच्याशी होऊ शकेल). अतिशय निगर्वी, नम्र आणि मृदुभाषी असा हा जगज्जेता पटावर वाघ बनून धुमाकूळ घालतो ह्यावर विश्वास ठेवणे कठिण जाते! मिखाईल ताल हा आनंदचा आवडता खेळाडू. आनंद त्याच्याप्रमाणेच आक्रमक खेळतो. धोका पत्करुन नवीन पर्याय खेळून बघणे त्याला आवडते. कास्पारोव आणि कार्पोव सारख्या महारथींशी तो प्रत्येकी शंभरापेक्षा जास्त डाव खेळलेला आहे! वेगवान बुद्धीबळाचा तर तो बादशहाच आहे.
ग्रँ.मा.प्रवीण ठिपसेने त्याची एक आठवण सांगितली आहे. मे १९८३ मधे मुंबईत राष्टॄय बुद्धीबळ स्पर्धा होत्या. चेन्नैचा नामवंत खेळाडू दिलावरने मुख्य सामन्याधिकार्यांकडे तक्रार केली की त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे चेस क्लॉक चालत नाहीये! घडाळ्याच्या तपासणीत काही दोष आढळला नाही. ती मॅच संपली तेव्हा दिलावरने ९५ मिनिटे खर्च करुन तो सामना गमावला होता आणि आनंदच्या घड्याळात फक्त २ मिनिटे झालेली होती!! :T
त्याचा आव्हानवीर टोपालोव सुद्धा काही साधा खेळाडू नाहीये. सध्या जगातला दोन नंबरचा इलो रेटिंग (गुणांकन) असलेला खेळाडू आहे तो!
अनेकवेळा धोके पत्करुन तो खेळत जातो आणि प्रतिस्पर्ध्याला चकित करायचं अशा इराद्याने खेळतो. कास्पारोव सारख्या तगड्या शिलेदारालाही घाम फोडणारा खेळ त्याने केलेला आहे!
विरुद्ध
ह्या दोन तुल्यबळ खेळाडूंमधला सामना कसा रंगतो हे बघायला सगळे जग उत्सुक आहे. ह्या दुव्यावर जिज्ञासूंना आणखीन माहिती मिळेल!
विशी आनंदला शुभेच्छा देऊन हा लेख आवरता घेतो!
सोफियातला 'सेंट्रल मिलिटरी क्लब' जिथे ही स्पर्धा होणार आहे.
(सर्व चित्रे जालावरुन साभार)
प्रतिक्रिया
22 Apr 2010 - 3:55 am | बेसनलाडू
बुद्धीबळात फारसे प्राविण्य नसले तरीही आपण आनंदचे जुने फ्यान आहोत आणि त्याच्या बव्हंशी सगळ्या सामन्यांकडे डोळे लावून बसलेले असतो. आनंदला या लढाईसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू
आनंदची सचिनशी केलेली तुलना पटली.
(तुलनात्मक)बेसनलाडू
22 Apr 2010 - 4:19 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
बिपिन कार्यकर्ते
22 Apr 2010 - 4:14 am | इंटरनेटस्नेही
.
22 Apr 2010 - 5:32 am | प्रभो
आनंदला या लढाईसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
22 Apr 2010 - 10:30 am | राजेश घासकडवी
सर्व जग दृ्क्श्राव्य माध्यमांच्या आहारी जात असताना नाट्य म्हणजे चित्रमय हालचाली व अनुषंगिक ध्वनि असा गैरसमज होण्याची सहज शक्यता असते. हे सहज ओळखता येणारं, मनाला गुंगवण्यासाठी सोपे मार्ग चोखाळणारं विश्व. यात बुद्धीबळाच्या ६४ घरांत तितकंच नाट्य निर्माण होऊ शकतं हे कळायला ती गंमत खूप वेळा चाखावी लागते. ही अॅक्वायर्ड टेस्ट आहे. आनंद विश्वविजेता म्हणून सचिनशी तुलना करणं एक, व स्वत: त्याचे पटीय कव्हर ड्राईव्ह, अप्पर कट्स ओळखून त्याला दाद देणं वेगळं. ज्यांना हे दिसतात त्यांना जगातल्या सौंदर्यांचा एक नवीन पैलू दिसतो. ज्यांना नाही दिसत त्यांच्यासाठी केवळ देशाभिमान.
मी या दोनच्या मध्ये कुठेतरी आहे.
जर कोणी अधिक ज्ञान असलेल्याने समालोचन केलं तर आवडेल.
तोपर्यंत 'आनंद, आगे बढो, हम तुम्हारे साथ है' इतकंच....
22 Apr 2010 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आनंदला शुभेच्छा!
(निव्वळ देशाभिमानी) अदिती
22 Apr 2010 - 10:43 am | प्रमोद देव
खरंच आहे...आनंद आणि सचिन...दोघेही यशाच्या अत्युच्च शिखरावर आहेत पण दोघांचे पाय अजूनही जमिनीवर घट्ट आहेत. अशा ह्या दोघां जगज्जेत्या आणि तरीही सदैव विनम्र असणार्यांचा मी निस्सीम पंखा आहे.
क्रिकेट आणि बुद्धीबळ...दोन्हीही खेळ माझ्या आवडीचे आहेत..आणि मी ते मनसोक्त खेळलोय.
22 Apr 2010 - 10:55 am | विसोबा खेचर
दोघांनाही मनापासून शुभेच्छा..
तात्या.
22 Apr 2010 - 11:44 am | टारझन
क्लासिक रंगा !!!!!!!!!!!!!
- (बुद्धिबळप्रेमी) चेकेश मेटकरवी
22 Apr 2010 - 1:03 pm | ज्ञानेश...
आनंदला शुभेच्छा.
22 Apr 2010 - 2:30 pm | निखिल देशपांडे
हे ईलो रेटिंग आणि विश्वविजेतेपद ह्या मधे नेहमीच गोंधळ उडतो..
बाकी ह्या स्पर्धे कडे लक्ष आहेच..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
22 Apr 2010 - 4:22 pm | चतुरंग
फिडे हे रेटिंग देते. सामन्यांना दर्जा दिलेला असतो. ज्या दर्जाच्या सामन्यात खेळाडू खेळेल आणि जिंकेल, हरेल किंवा बरोबरी करेल त्यानुसार हे रेटिंग बदलत जाते. संख्याशास्त्रावर आधारलेली ही पद्धत आहे.
उदा. एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा सगळेच ग्रँडमास्टर्स खेळत असलेल्या स्पर्धेचं एलो रेटिंग जास्त असणार.
लेखात देलेला विकीचा दुवा भरपूर माहिती देतो.
विश्वविजेतेपद आणि फिडे रेटिंग यांचा थेट संबंध असतोच असं नाही. उदा. इथे बघ सध्याचा विजेता आनंद चौथ्या स्थानावर आहे आणि त्याचा आव्हानवीर टोपालोव दुसर्या. कारण मागच्या विजेतेपदापासून आत्तापर्यंतच्या मधल्या काळात त्या दोघांनी ज्या स्पर्धा खेळल्या त्यावर हे रेटिंग बदलते. आणि ही स्थिती मार्च २०१० ची आहे. एप्रिलच्या शेवटाला पुन्हा कदाचित हे बदललेले असेल.
चतुरंग
22 Apr 2010 - 4:59 pm | श्रावण मोडक
या सामन्याविषयी तुमचं समालोचन (च्यायला, काय म्हणावं हे सुधरेना. म्हणून हा शब्द वापरला - मला म्हणायचं आहे ते इतकंच की या सामन्याचं 'रसग्रहण' (च्यायला, परत तसंच काही तरी. असो) तुम्ही करा) वाचायचे आहे. तेव्हा तयारीत रहा ही मागणी पुरवण्यासाठी.
आता ही मागणी हीच या लेखावरची दाद आहे हे समजून घ्यालच.
22 Apr 2010 - 5:03 pm | बिपिन कार्यकर्ते
रंगाशेठ अशी आधीच काही प्रॉमिसं देऊन आणि ती पुरी न करता बसले आहेत.
बिपिन कार्यकर्ते
22 Apr 2010 - 5:07 pm | चतुरंग
तुम्हाला विश्लेषण म्हणायचं आहे बहुदा!
इथे धावतं समालोचन अवघड आहे पण 'चाल'तं रसग्रहण करायचा प्रयत्न राहील! ;)
चतुरंग
22 Apr 2010 - 6:14 pm | श्रावण मोडक
'चाल'तं रसग्रहण... करेक्ट. हेच. वर बिका म्हणतात तसं काही करू नका. लई बोटं मोडंन तुमच्या नावानं तसं काही केलं तर... ;)
26 Apr 2010 - 8:30 pm | धमाल मुलगा
मोडकांच्या पुर्ण प्रतिसादांशी बाडिस!! :)
22 Apr 2010 - 6:07 pm | चतुरंग
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २० ऐवजी २१ एप्रिलला होईल आणि स्पर्धा २३ ऐवजी २४ एप्रिलला सुरु होईल.
चला एक दिवसाची का होईना जादा विश्रांती मिळाली आनंदला.
चतुरंग
22 Apr 2010 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजयी होण्यासाठी आनंदला आणि सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी रंगाशेठला शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
[वजीर]
24 Apr 2010 - 1:16 am | चतुरंग
उद्या शनिवारी पहिला सामना दुपारी २ वाजता (कोऑर्डिनेटेड युनिवर्सल टाईम - हा पूर्वी ग्रीनिज मीन टाईम म्हणून ओळखला जायचा) ला सुरु होईल. त्यानुसार आपापल्या ठिकाणच्या वेळा तपासून सामन्याचे थेट कवरेज जिज्ञासूंना खालील दुव्यावर बघता येईल
http://www.chess.com/news/anand-v-topalov-live-coverage-4870
राहिलेले सर्व सामने मात्र दुपारी १२ (कोऑर्डिनेटेड युनिवर्सल टाईम) वाजता सुरु होतील.
चतुरंग
26 Apr 2010 - 4:49 pm | प्रमोद देव
आनंद पहिल्या डावात अपेशी
26 Apr 2010 - 5:08 pm | चतुरंग
आनंद स्ट्राईक्स बॅक! ;)
चतुरंग
26 Apr 2010 - 5:26 pm | प्रमोद देव
ही बातमी नक्कीच ’आनंद’दायक आहे. :)
26 Apr 2010 - 7:43 pm | वेताळ
आता मजा येईल. लेखाबद्दल धन्यवाद.
वेताळ
26 Apr 2010 - 8:48 pm | संदीप चित्रे
तुझ्या 'चाल'त्या रसग्रहणाची वाट बघतोय !
26 Apr 2010 - 9:29 pm | विसोबा खेचर
साला आत्ता आमचा गॅरी असता तर दोघांना केव्हाच हरवून मोकळा झाला असता! :)
(कास्पारावच्या व्यक्तिमत्वचा विलक्षण प्रेमी) तात्या.
26 Apr 2010 - 10:04 pm | रामदास
गॅरीपेक्षा कमी नाही.गेल्या आठवड्यापासून किती मुव्ह्ज झाल्या याचा काही हिशोबच ठेवता नाही आला बॉ.
तूर्तास मात्र चतुरंगाच्या पुढच्या लिखाणाकडे नजर ठेविन म्हणतो.
29 Apr 2010 - 6:43 pm | प्रमोद देव
चौथ्या फेरीत टोपोलोवला नमवून आनंदने एक गुणाची आघाडी घेतलेय.
चौथ्या फेरीअखेर आता आनंदचे अडीच तर टोपलोवचा दीड..असे गुण झालेत.
29 Apr 2010 - 10:19 pm | चतुरंग
चतुरंग
30 Apr 2010 - 11:29 pm | चतुरंग
पांढर्या मोहर्यांनी खेळताना टोपालोव काही वेगळा खेळ करेल असे वाटले होते पण तसे झाले नाही.
१२ फेर्यांच्या ह्या स्पर्धेत आनंद ३-२ असा आघाडीवर आहे.
उद्या शनिवार दि. १ मे रोजी सहावा डाव आनंद पांढर्या मोहोर्यांनी खेळेल.
रविवारी विश्रांतीचा दिवस आहे.
नियमानुसार निम्म्या फेर्या झाल्यावर काळ्या-पांढर्या मोहर्यांची आदलाबदल होते त्यानुसार सोमवारी आनंद पुन्हा पांढर्या मोहर्यांनी सुरुवात करेल.
-----------
मानसिक दृष्ट्या आनंद आत्ता आघाडीवर आहे. पुढल्या दोनपैकी किमान एका तरी डावात जिंकून आघाडी वाढवण्यावर त्याचा भर राहील. पुढचे दोन्ही सामने रंगतदार होतील अशी चिन्हे आहेत.
चतुरंग
2 May 2010 - 12:00 am | प्रमोद देव
सहाव्या डावातही बरोबरी झालेय.
आनंद: साडेतीन गुण.... टोपालोव:: अडीच गुण
अजूनही १ गुणांनी आनंद आघाडीवर आहे.
2 May 2010 - 1:44 am | मी-सौरभ
आनंदी आनंद गडे.......
-----
सौरभ =D>
3 May 2010 - 10:37 pm | चतुरंग
सातवा डाव बरोबरीत सुटला ४-३ असा आघाडीवर आहे आनंद!
-----------------
हा डाव हरता हरता वाचलाय आनंद. ऑलमोस्ट वाट लागलेली होती, कसाबसा निसटला! :(
चतुरंग
4 May 2010 - 10:27 pm | चतुरंग
अखेरीस टोपालोवने आठव्या डावात आनंदला पुन्हा एकदा खडे चारले!
आता ४-४ अशी बरोबरी आहे!
उद्या विश्रांतीचा दिवस. परवा आनंदकडे पांढरी मोहरी असणार आहेत तेव्हा आनंदने जोरदार खेळ करायला हवा. चौथ्या सामन्यात दिसलेला त्याचा खेळ पुन्हा दिसायलाच हवा नाहीतर टोपा अधिकाधिक आक्रमक होत जाईल! (गेले तीन डाव आनंद फारच बचावात्मक झालाय हे नक्की.)
चतुरंग
7 May 2010 - 10:39 pm | प्रमोद देव
आता आनंद व टोपालोवचे दोघांचेही ५-५ गुण झाले आहेत.
आता फक्त दोनच सामने बाकी आहेत.
मध्यंतरी ९वा सामनाही बरोबरीत सुटला होता.