दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्या वार्याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं.
पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्या पोरांचे आवाज कानावर आले..
"हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!"
"हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!"
हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!
मला आत आलेले पाहून गोपाळे सरांनी त्यांचे जोर मारणे थांबवून मिस्किल हसत विचारले "या राजे! वाजले का साडेपाच?"
भिंतीवरल्या घड्याळातला मोठा काटा पावणेसहाची वेळ दाखवत होता मी ओशाळून मान खाली घातली.
"चला, चला लवकर या जोर मारायला. सव्वासहा वाजता सुरु करायची आहे प्रॅक्टिस." सर म्हणाले.
लंगोट कसून, त्यावर जांग्या नेसून मी घरुन तयारी करुनच निघालो होतो त्यामुळे झटपट शर्टचड्डी उतरवून त्या पोरांच्यात सामील झालो.
जोर, बैठका, आखाडा खोदणे आणि दोर चढणे असा व्यायाम झाल्यावर खरंतर हातपाय भरुन आले होते पण पहिलाच दिवस असल्याने उत्साह अमाप होता!
तालमीच्या मध्यभागी जमिनीत रोवलेला, साधारण १०-११ फूट उंच, वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला लाकडी खांब होता, मल्लखांब! तेल प्यालेलं गर्द तपकिरी रंगाचं ते लाकूड चमकत होतं. लाकडाची अंगची नक्षी अगदी नजरबंदी करत होती. त्याच्या भोवती चारी बाजूला गाद्या टाकल्या होत्या. गोपाळे सरांनी हातात एरंडेल तेल घेऊन खांबाला लावले. आम्ही आठ-दहाजण भोवती अर्धगोलात उभे होतो. एकेकाला तेल संपूर्ण अंगाला आणि विशेषतः दंड मांड्यांना लावायला सांगितले. पहाटे-पहाटे एरंडेलाचा तो उग्र वास आणि बुळबुळीत, चिकट स्पर्श अगदी नकोसा झाला पण इलाज नव्हता. सरांनी खांबावरची पहिली पकड समजावून सांगायला सुरुवात केली.
--------------------------------------------------------------
कारभारी गोपाळे. साडेपाच फूटच असतील जेमतेम. मागं वळवलेले केस. व्यायामाचं शरीर. पण आडदांड नाहीत. अतिशय मिस्किल झाक डोळ्यात. तसं बघायला गेलं तर कागदोपत्री सरांचा विषय भूगोल पण त्यांचं मन रमायचं ते खेळात. लेझीम, कुस्ती हे त्यांचे आवडीचे खेळ.
इयत्ता पाचवीत असताना मी पहिल्यांदा मल्लखांब शब्द ऐकला तो त्यांच्याकडूनच. "पहाटे यायला तयार असली पोरं तर मी शिकवायला तयार आहे!" म्हणताच आम्ही आठदहा जण जमा झालो होतो.
कुठल्याही पैशांची अपेक्षा न करता फक्त आवड म्हणून आणि आपली पोरे एका वेगळ्या खेळात चमकावीत म्हणून मास्तरांनी हा उद्योग सुरु केला होता! मुख्याध्यापकांच्या मागे लागून तालमीच्या किल्ल्या स्वत:कडे ठेवायची परवानगी मिळवण्यापासून त्यांनी सगळं केलं.
मल्लखांब शिकवताना त्यांची एकाग्रता बघण्यासारखी असे. ते तल्लीन होऊन शिकवत. एखाद्याचे लक्ष नाही किंवा पोरे एकमेकात खुसफुसत काहीतरी टवाळकी करताहेत असं वाटलं तर ते एकदम गप्प होत आणि रोखून बघत. पुन्हा दुर्लक्ष करण्याची हिंमत नसे, म्हणजे सर मारत वगैरे नसत पण त्यांच्या तळमळीनं शिकवण्याचाच धाक पुरेसा असे.
इयत्ता पाचवी ते नववी असा पाच वर्षे मी मल्लखांब केला. झेप, सुई-दोरा, आकडी, घाणा, बोंडावरचे ताडासन, मयूरासन असे मल्लखांबावरच्या अनेक उड्या आणि पकडींचे विविध प्रकार त्यांनी शिकवले.
मल्लखांबाच्या व्यायामानं अंग अतिशय लवचिक आणि काटक बनतं. शरीराला बाभळीच्या लाकडासारखा घोटीव टणकपणा येतो. पाठीचा कणा अक्षरशः इलॅस्टिकसारखा लवचिक बनतो. मी कुठल्याही क्षणी चटकन पश्चिमोत्तानासान करु शकत असे किंवा कमान/चक्रासन करु शकत असे. (हल्ली आता उभ्यानं आपलीच पावलं दिसणंही मुश्किल झालंय, तो भाग वेगळा! ;)) ह्या शारीरिक फायद्यांबरोबर मानसिक फायदेही पुष्कळ झाले. एकाग्रता वाढली, ठराविक वेळात अचूकतेने आणि वेगानं गोष्टी करण्याचा सराव झाला, वैयक्तिक आणि सांघिक असा दोन्हीस्तरावर हा खेळ असल्यानं दुहेरी फायदा झाला.मल्लखांब सोडून इतकी वर्ष झाली पण त्याचे फायदे मला जीवनभरासाठी साथ देणार आहेत!
---------------------------------------------------------------
आम्ही मल्लखांब सुरु केला त्याआधी राजीव जालनापूरकर हा सरांचा विद्यार्थी होता. त्यावेळी मोजकेच विद्यार्थी ह्या खेळाला येत. त्यामुळे अहमदनगरहून तो बदली होऊन पुण्याला गेला आणि सरांच्या शिकवण्यात खंड पडायचा धोका निर्माण झाला. आमची आठ-नऊ जणांची बॅच मिळाली आणि सरांना पुन्हा हुरुप आला. पुण्याला मल्लखांब जोरात होता. त्याचवेळी मुंबईच्या समर्थ व्यायाममंदिराचा मल्लखांब संघही चमकत होता. एक दिवस सरांनी नोटीसबोर्डावर पत्रक लावलं "मल्लखांब राज्यस्तरीय स्पर्धा." आमचा साताठ जणांचा संघ तयार करायला घेतला. स्पर्धा पुण्यात होत्या, मला वाटतं गुलटेकडीला एक विद्यालय आहे तिथे होत्या. सरांना उत्साह अमाप. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पोचलो दुसर्या दिवशी सकाळी स्पर्धा. रात्री जेवणं झाल्यावर सगळ्यांना एकत्र बसवून सरांनी सांगितले "तुमच्यापैकी कुणीही बक्षीस मिळवू शकेल असं मला वाटत नाही, पण आपण त्यासाठी आलोच नाहीये. तुम्हाला त्याहूनही मोठं बक्षीस मिळणार आहे ते राज्यातल्या नामवंत खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघता येणार आहे! एकेक उडी बघून घ्या, पकडी लक्षात ठेवा काय तयारीनं पोरं इथे येतात हे पहा, आज ना उद्या आपल्याला तिथे पोचायचंय!" माझे डोळे आताही हे लिहिताना भरुन आले. कारण हा जो आत्मविश्वास सरांनी जागवला, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल कशी करावी ह्याचं जे शिक्षण नकळत दिलं त्याचा मी ऋणी आहे!
सकाळ वेगळीच उजाडली. पोटात फुलपाखरं नाचत होती. मैदानावर आमचा संघ गेला. आम्ही चांगला पर्फॉर्मन्स दिला. समर्थ व्यायामचा दत्ताराम दुदम हे मुख्य आकर्षण होतं! त्यांची टर्न आली आम्ही श्वास रोखून पहात होतो. शिसवीच्या लाकडासारख्या टणक आणि गोटीबंद शरीराचा बुटकेलासा दत्ताराम येऊन उभा राहिला. टाचा उंच करुन त्यानं हात उंचावला आणि विजेच्या वेगानं पळत येऊन खांबावर झेप घेतली थेट पायात खांब पकडला. एखाद्या चपळ फुरश्यासारखा तो वळसे घेत होता, एका पकडीतून दुसरी पकड, दसरंग झाला, घाणा झाला, सुईदोरा झाला. त्याचे सांधे बहुदा रबराचे असावेत!
शेवटी तो क्षण आला. खांबाच्या बोंडावर दोन्ही हात टेकवून दत्तारामनं त्याचे पाय हळूहळू पाठीमागे न्यायला सुरुवात केली. सगळं मैदान श्वास रोखून बघत होतं एखाद्या मशीनप्रमाणे सावकाश कमरेतून वर जात जात शेवटी त्यानं हँडस्टँड पूर्ण केला. ११ फुटी खांबाच्या सरळ रेषेत तो खांबावर उलटा उभा होता, तसूभरही न हालता!! पुढच्या सेकंदात त्यानं सरळ वरुन उलटी झेप घेतली आणि खाली येतायेताच खांब मांड्यात पकडला आणि लँडिंग केलं! टाळ्यांचा कडकडाट झाला. सरांनी जाऊन त्याचं अभिनंदन केलं, त्याच्या शिक्षकांचंही केलं.
-----------------------------------------------------------------
आम्ही परत आल्यावर आमच्या सरावात नवीन उड्यांचा समावेश झाला. आमच्यातल्या दोन जणांना हा हँडस्टँड शिकवलाच सरांनी. ज्यादिवशी तो जमला त्यादिवशीचा आनंद काय वर्णावा सरांचे डोळे चमकत होते! मग मशालीचा मल्लखांब सरांनी स्वतःच्या जबाबदारीवर शिकवायला घेतला. दंड, हात, मांड्या ह्यांना पेटत्या मशाली बांधून मी स्वत: शाळेच्या स्नेहसंमेलनात तो केला. मी सुखरुप लँडींग केलं आणि सर रडायला लागले आनंदाने!
-----------------------------------------------------------------
पुढे काही कारणाने ह्या सगळ्या खेळांवर गदा आली. बोर्डात पोरे चमकावणे ह्या एकाच नादापायी पालकांचंही सगळ्याच खेळांकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागलं. आमचीही शाळा सोडण्याची वेळ आली होती. बारावी झाल्यावर इंजिनिअरिंगला जायच्या आधी सरांना शाळेत जाऊन भेटलो होतो. त्याही वेळी मला म्हणाले "ए उंटा (मी किडमिडीत आणि उंच असल्याने माझं नाव त्यांनी उंट ठेवलं होतं), मल्लखांब विसरु नकोस. तू करत रहा तुझ्या पोरांनाही शिकव!" त्यानंतर बरेच वर्षांनी सर भेटले, वाकून नमस्कार केला. तसे मिठी मारुन म्हणाले "तुमची बॅच भारी होती राव. तुमच्यासारखी पोरं परत काय मिळाली नाईत. आजकाल सगळे माना मुरगाळून फक्त पुस्तकंच वाचत्यात!" सरांच्या डोळ्यातली वेदना मला अस्वस्थ करुन गेली.
----------------------------------------------------------------
माझा मुलगा आजकाल जिमनॅस्टिक्सला जातो त्याच्या उड्या बघून मला माझा मल्लखांब आठवला आणि मग सहाजिकच गोपाळे सर आठवले. आता सर निवृत्त आहेत त्यांच्या गावी गेलेत. बरेच वर्षात सरांची गाठ नाही पण आजही कुठे मल्लखांब शब्द ऐकला, किंवा चित्र बघितलं तरी डोळ्यांसमोर येतात कारभारी गोपाळे!
-चतुरंग
प्रतिक्रिया
12 Mar 2010 - 11:17 am | चेतन
रंगाकाका मस्त लिहलयं आवडलं
मला दोरी वर नाही चढता येत मल्लखांब खुप दुरच गोष्ट. पण पाचवी सहावित असताना एकदा स्पर्धा पहायला गेलो होतो. भिती होती साला एक पाय घसरला तरं...
चेतन
अवांतरः कारभारी शब्द पाहून पहिलांदा वाटलं काय विडंबन लिहलं की काय ;)
12 Mar 2010 - 11:19 am | सुनील
सुरेख आठवणी लिहिल्या आहेत.
शाळेतील शिक्षक जसे आठवतात, भावतात तसे कॉलेजचे नाही. कारण ठाऊक नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Mar 2010 - 1:26 pm | विंजिनेर
छान लेख. शाळेतल्या आठवणी जागवल्या !
(दोरीचा मल्लखांब केलेला)विंजिनेर
12 Mar 2010 - 3:41 pm | विसोबा खेचर
सहमत..!
12 Mar 2010 - 1:37 pm | स्वाती दिनेश
सुरेख! आठवणी आवडल्या,
स्वाती
12 Mar 2010 - 1:41 pm | झकासराव
भारी लिहिलय :)
12 Mar 2010 - 2:38 pm | बिपिन कार्यकर्ते
पर्फेक्ट रंगा स्टाईल... मस्त. !!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
12 Mar 2010 - 3:36 pm | समीरसूर
चतुरंग,
अप्रतिम लेख! आमचे काही ध्येयवादी शिक्षक आठवले. आजकाल अशा शिक्षकांची वानवा आहे आणि इतर शिक्ष़क, समाज, विद्यार्थी त्यांची कदर करतातच असे नाही. शाळांमधले वातावरणच इतके बदलले आहे की अशा शिक्षकांची जात नामशेष होण्यास आता जास्त अवधी उरलेला नाही. काल/परवा 'छडी लागे छम छम' हा एक बरा चित्रपट झी टॉकीजवर पाहिला. मोहन जोशी, शरद पोंक्षे, स्मिता तळवलकर, उदय सबनीस आदी कलाकारांनी समरसून शिक्षकांच्या व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. शाळेतले राजकारण, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, शिक्षकांच्या अपेक्षा, असूया, हेवे-दावे इत्यादी गोष्टींवर मार्मिक भाष्य करणारा असा हा चित्रपट वाटला.
सध्या वातावरण ही बदलले आहे. सगळं फायद्याच्या रुपात तोलून बघतांना खरी कळकळ, काहीतरी चांगलं करून दाखविण्याची वृत्ती, निस्वार्थ भाव वगैरेंची किंमत शून्य होत चाललेली आहे.
--समीर
12 Mar 2010 - 4:35 pm | टारझन
अत्तिशय सुंदर ... वाचतांनाच स्फुरण चढले .. आणि दोनच्यार मल्लखांब आपणही मोडावेत असं वाटलं .. :)
लै भारी रंगाशेट ...
हॅहॅहॅ .. आमचे दहावीचे शिक्षक श्री.ढगे सर .. हे सुद्धा मी त्यांना भेटल्यावर असेच म्हणाल्याचं आठवलं =))
- (मल्लिका प्रेमी) मल्ल कलंदर
12 Mar 2010 - 6:03 pm | अरुंधती
अतिशय सुंदर आठवणी तुम्ही अतिशय सहजपणे, उत्कटतेने मांडल्या आहेत. खेळाच्या, कसरतीच्या शिक्षकांचे आपल्या जडणघडणीतले योगदान वेगळेच असते. त्याची तुलना कोणाशीच व कशाशीच होऊ शकत नाही. आमच्या शाळेत क्रीडा शिक्षक असलेल्या मुंगसे सरांची आठवण झाली त्या निमित्तानं! धन्यवाद!! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
12 Mar 2010 - 6:04 pm | धनंजय
मस्त लिहिले आहे
12 Mar 2010 - 8:36 pm | प्रभो
मस्त रंगाशेठ,
आमच्या शाळेत मल्लखांब नव्हता पण आम्ही गणपतीच्या मिरवणूकीसाठी १ महिना आधीपासून मनोरे करायचो. त्याची आठवण झाली.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
12 Mar 2010 - 8:40 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री चतुरंग, आठवणींचे-गोपाळे सरांचे सहज चित्रण आवडले.
12 Mar 2010 - 8:47 pm | सुमीत भातखंडे
मस्त आठवणी.
12 Mar 2010 - 10:36 pm | पिवळा डांबिस
सुंदर लिखाण, रंगा!
आवडलं!!
12 Mar 2010 - 11:04 pm | राजेश घासकडवी
कथा ओघवती झाली आहे. गोपाळे मास्तरांचं चित्र डोळ्यासमोर उभं होतं. मिपावर बऱ्याच चित्रण / कथां विषयी अजून मोठं असायला हवं होतं असं वाटतं. तेच या चित्रणाविषयी वाटल्यावाचून राह्यलं नाही.
राजेश
12 Mar 2010 - 11:12 pm | Nile
क्या बात है! गोपाळे सरांची मस्त आठवण आली. आम्ही नेहमी ग्राउंडवरच असल्याने आम्हाला खेळाचे शिक्षक सगळ्यात जास्त प्रिय होते. ह्या खेळाच्या प्रत्येक शि़क्षकाची पोरांना मारायची एक खास 'स्टाईल' होती. गोपाळे सर आमच्या (इवल्याश्या) मानेला धरुन, कंबरेत वाकवुन, आम्हाला गरागरा गोल फिरवायचे!
सगळ्यात जास्त धमाल म्हणजे, शाळा सुटल्यावर आम्ही नेहमीच फुटबॉल, हॉकी, क्रीकेट आणि काही नसले तर 'खेळाच्या मेळाव्याची' तयारी म्हणुन, खोखो इ. साठी जमत असुच. कधी कधी ही शिक्षक मंडळी सुद्धा आमच्यात सामील होउन खेळत असे, तेव्हा काय जोशाने खेळायचो आम्ही! नगरला गेलो की शाळेच्या ग्राउंडवर जातोच, दोन्ही बाजुला बांधलेल्या इमारतींमुळे ग्राउंड पार भकास दिसतं!
13 Mar 2010 - 5:14 am | मदनबाण
सुंदर लेख... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
13 Mar 2010 - 5:28 am | पाषाणभेद
>>> म्हणजे सर मारत वगैरे नसत पण त्यांच्या तळमळीनं शिकवण्याचाच धाक पुरेसा असे.
रंगाशेठ, असले शिक्षक आज मिळणे नाही.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
13 Mar 2010 - 10:45 pm | चित्रा
छानच लिहीले आहे.
मशालीचा मल्लखांब म्हणजे खासच असावा.
असेच लिहीत जाणे!
10 Oct 2015 - 7:38 am | चुकलामाकला
वा! डोळ्यात पाणी आलं.
10 Oct 2015 - 7:51 am | बाबा योगिराज
चांगला धागा वर आलाय. मस्त आठवण आहे. सुंदर लिखाण.
10 Oct 2015 - 9:26 am | बोका-ए-आझम
दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराचे दत्ताराम दुदम सर म्हणजे जबरदस्त मल्लखांबपटू. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी थोडाफार मल्लखांब शिकलो. पुढे घर बदलल्यामुळे त्यात खंड पडला. या लेखाने सरांची आठवण परत जागी झाली. त्याबद्दल विशेष धन्यवाद!
10 Oct 2015 - 8:45 pm | चतुरंग
दत्ताराम दुदम सरांचे विद्यार्थी आहात हे ऐकून छान वाटले. जालावर सहज शोध घेतला आणि दुदम सर चेपूवरती आहेत हे दिसले. आम्ही त्यांचा जो सुप्रसिद्ध हँडस्टँड बघितला त्याचा फोटू देखील तिथे मिळाला.
11 Oct 2015 - 9:52 am | बोका-ए-आझम
फोटोबद्दल आणि सर चेपुवर आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!
10 Oct 2015 - 9:33 am | असंका
सुरेखच...
धन्यवाद!!
10 Oct 2015 - 12:29 pm | हेमंत लाटकर
चतुरंग मस्त लेख.
10 Oct 2015 - 12:35 pm | dadadarekar
छान
10 Oct 2015 - 1:02 pm | पद्मावति
अतिशय सुंदर लिहिलंय. फार छान व्यक्तिचित्र.
10 Oct 2015 - 3:26 pm | बॅटमॅन
सुर्रेख!!!!!
10 Oct 2015 - 7:20 pm | एक सामान्य मानव
काही काळ मिरजेला रहात असताना भानू तालमीत जात असे. तिथल्या वस्तादान्च्या आठवणी जाग्या झाल्या. मुलान्ना फुकट शिकवायला रोज अगदी नियमाने वेळेवर येणारे असे लोक आता जिमच्या जमान्यात दुर्मिळच...
10 Oct 2015 - 8:50 pm | चतुरंग
जोर घुमवलेत, टेटे खेळलोय, त्यांच्या त्यावेळी नव्या असलेल्या बॅडमिंटन कोर्टावर भरपूर खेळलोय.
वासू जोगळेकर पैलवान, तिथल्या जोर बैठका आणि मुद्गल सगळ्या गोष्टी अजूनही आठवताहेत! :)
11 Oct 2015 - 10:13 am | नूतन सावंत
सुरेख व्याक्तीचित्रण.शाळेतल्या व्यायामशिक्षकांची आठवण झाली.
11 Oct 2015 - 11:24 am | मनो
गोपाळे सरांच्या अजून काही खुमासदार आठवणी आहेत पण त्या इथे नकोत. त्याचा एक स्वतंत्र लेखच लिहायला हवा, त्यांच्या भूगोलाच्या वहीसारखा. त्यांचे शिकवणं म्हणजे फक्त एकच वाक्य "लिहून घ्या". त्यामुळे भूगोल म्हणजे "घोका आणि ओका". म्हणून मैदानातले गोपाळे किती जरी हवेहवेसे वाटले तरी वर्गात नकोसे होत.
खेर मास्तर, एस डी आणि जी डी हे कुलकर्णी, बोरुडेसर, व्ही पी कुलकर्णी, किती नावे घेऊ. या मास्तरांची खरी आणि "ठेवलेली" नावे, nostalagic केलत राव तुम्ही आज.
12 Oct 2015 - 3:23 pm | मीता
गोपाळे सर आठवले . आम्हाला पाचवीला होते PT साठी.
11 Oct 2015 - 6:44 pm | विवेकपटाईत
आतिशय सुंदर काळजाला भिडणारा लेख. सन १९८४च्या आधी जनकपुरीतल्या पार्कांमध्ये पंजाबी, सरदार आणि इतर सर्व हॉकी खेळायचे, ब्लॉक मध्ये प्रतिस्पर्धा व्हायचा. मस्त मजा यायची. त्या काळात दिल्लीत मुले भरपूर हॉकी खेळायची. नंतर दिल्लीत परिस्थिती खराब झाली, खेळ बंद पडले . १९९० नंतर त्या नंतर पोरे क्रिकेट खेळताना दिसू लागली. पण आज पार्क सुनसान पडलेले असतात.
12 Oct 2015 - 4:58 pm | सूड
वाह, नॉस्टॅल्जिक लिखाण!!
12 Oct 2015 - 9:05 pm | आदूबाळ
या लेखात उल्लेख केलेलं गुलटेकडीचं विद्यालय म्हणजे माझी शाळा - महाराष्ट्र मंडळ. मैदानावर सतत कोणते ना कोणते खेळ चालू असायचे. एक तरणतलाव सोडला, तर बाकी काय वाट्टेल ते होतं. अगदी पोलव्हॉल्टही होता.
13 Oct 2015 - 11:33 pm | अभ्या..
कम्प्लीट व्हिज्युअलाईझ झाले. खूप वेळा मल्लखांब पाहिल्याने असेल कदाचित. पण ते शरीर खरे शरीर. तोच खरा शरीराचा चिवटपणा अन स्टेमिना. ती खरी साधना. सप्लीमेंट्स घेऊन जिममध्ये फुगवलेल्या कटसपेक्षा ही अॅथलीट बॉडी शेवटपर्यंत साथ देते.
सुरेख वर्णन रंगाकाका. मस्त मस्त. मिरजेतल्या भानू तालीम मंडळाकडून माझे भाऊ खेळायचे. त्यामुळे जास्तच आपलेपणा.
14 Oct 2015 - 5:55 pm | सूड
सहमत!!
20 Jul 2016 - 10:35 pm | रुपी
सुरेख लिहिलंय.
गोपाळे सर आम्हालाही भूगोळ शिकवायचे. मी असताना मल्लखांब मात्र दुसरे सर शिकवत होते, आणि गोपाळे सर खोखो.
मध्ये शाळेच्या आणखी एका माजी विद्यार्थ्याने गोपाळे सरांबद्दल लिहिले होते. हा त्या लेखाचा दुवा.