निरोप - २

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
3 Mar 2010 - 6:54 pm

निरोप - १

रातंब्रीच्या पुढं दोन रस्ते फुटतात. एक खाली उतरतो. खोल खाली. सूर्य मावळण्याच्या साधारण तासभर आधी त्या रस्त्यावरून वाहतूक बंद होते. कुणाचीही. दुसरा रस्ता डावीकडे वळून पुन्हा पहाडात चढतो. घाटाची वळणं घेत चढण संपवतो आणि पठाराला लागतो. तीन गावं ओलांडली की पुन्हा उजवीकडं वळण. एक घाट उतरून तासाभरानंतर तालुक्याचं ठिकाण. आधीच्या फाट्यावरून खाली उतरलेल्या रस्त्यानं मात्र तालुक्याचं ठिकाण गाठायला फक्त वीस मिनिटं लागतात. कारण तो खाली उतरताना पाचेक मैलातच डोंगर संपतो आणि तिथून डावीकडं वळलं की सपाटीचा रस्ता आणि पुढं तालुक्याचंच ठिकाण. पण ते पाचेक मैलांचं अंतर जीवघेणं, अशी त्याची ख्याती. तरसं आणि एखादा बिबटा यांचं क्षेत्र, अशी चर्चा. त्यामुळं मावळतीनंतर कोणीही तिकडून जात नाही. अपवाद दिवा आणि त्याच्या साथीदारांचा. त्यांची खुशाल जा-ये सुरू असते. त्यामुळं, त्यांनीच ती तरस आणि बिबट्याची चर्चा उठवून दिली असावी असं सरकारी लोक नेहमी बोलतात, पण ती चर्चा खोटी ठरवण्यासाठी त्या रस्त्यानं मावळतीनंतर जाण्याचं धाडस दाखवत नाहीत हेही लोकांना पक्कं ठाऊक आहे. अर्थात, लोक या गोष्टींवर अवलंबून नसतात. ते त्यांच्या गतीनं चालत असतात.
दिवा संध्याकाळी सूर्य मावळला की त्याच रस्त्यानं निघतो आणि साडेसातला तालुक्याला पोचतो. आजही तेच. दुपारी तो रातंब्रीच्या पुढं निमखेड्याला गेला होता. तो आणि रामदास. रामदासला मोटरसायकल चालवता येते, पण रस्त्यावर. रातंब्री ते निमखेडा म्हणजे केवळ पायवाट. पायवाट म्हणजे नेहमीच्या पायवाटेपेक्षा रुंद. वाटेत तीन ठिकाणी ओढे ओलांडून जावं लागतं. अंतर सहा मैलांचं. गाडी पहिल्या आणि दुसर्‍या गियरवरच चालवता येते. हे अंतर दिवा कापतो तीस मिनिटांत. मागं बसणार्‍याची तयारी हवी. रामदासची ती आहे. तो नुसता बसत नाही. निमखेडा आणि पुढच्या गावांना न्यायची सामग्री घेऊनच जातो प्रत्येकवेळी. त्यात अगदी वह्या-पुस्तकांपासून काहीही असतं. 'मसाला' तर असतोच असतो. अर्थात, 'मसाला' असेल त्यावेळी प्रवास रात्रीचा. मोहीमेतील ठिकाणाच्या आधी मैलभर अंतरावर थांबायचं आणि तिथून चालत पुढची वाटचाल.
रातंब्रीच्या फाट्यावरून खाली उतरणार्‍या रस्त्यावरून दिवानं मोटरसायकल काढली आणि रामदासनं काही मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी मिळणार्‍या आडोशाचा फायदा घेत बिडी पेटवली.
"अंडी न्यायची का जाताना?" रामदासनं एक झुरका मारून दिवाला विचारलं. तालुक्यालाच मुक्काम करण्याचा त्यांचा विचार होता. दिवानं मान डोलावली. भाकरी आणि अंड्याची भाजी हा बेत रामदासचा आवडता. त्यामुळं स्वारी खुश झाली.
साडेसातला दहा मिनिटं कमी असताना मोटरसायकलनं मधल्या नाल्यावरचा पूल ओलांडला आणि ती डावीकडं गावाच्या दिशेनं वळली. फर्लांगभर अंतर कापलं असेल - नसेल तेवढ्यात दिवाचं लक्ष वेधून घेतलं ते रुपसिंगच्या दुकानावरच्या झेंड्यानं. समितीचा झेंडा. तो त्यावेळी तिथं फडकतोय याचा अर्थ होता की दिवानं तिथंच थांबायचं आहे. किशोरनं आखून दिलेली शिस्त होती ती. दिवानं ब्रेक दाबला. गती कमी झाल्यावर रुपसिंगच्या दुकानाशेजारी असलेल्या बोळात गाडी वळवली, थांबवली आणि तो व रामदास उतरले. दहा एक पावलं चालले आणि रुपसिंगच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतात शिरले. शेत मोठं होतं. डावीकडून चालत ते नाल्याच्या दिशेनं जाऊ लागले. उतार सुरू होतो तिथं चार दांडकी जमिनीत ठोकून चौरस आडोसा तयार केला होता. आतून प्रकाश पाझरत होता याचा अर्थ किशोरभाई आत्ता तिथंच असणार.
"सलाम, किशोरभाई." दोघंही एकाचवेळी दरवाजातून आत शिरतानाच म्हणाले. किशोरनं हात कपाळापाशी नेला.
औषधाच्या बाटलीतून बाहेर आलेल्या वातीची भगभग सुरू होती. त्या उजेडात तो चिठ्ठी लिहित होता. दोन चिठ्ठ्या लिहून झाल्या होत्या. त्यांच्या घड्या समोर होत्या. दिवा विचारात पडला, किती ठिकाणी जावं लागणार आहे? त्याची ना नव्हती; प्रश्न वेळेचाच असायचा. रात्री किती फिरायचं याला मर्यादा होतीच नाही तरी. साधारण वीसेक मैलांच्या टापूत चार ठिकाणी पोलिसांचे कॅम्प वाटेत लागायचे. तो धोका होता म्हणून. पूर्वी तो रात्रीच्या रात्रीच फिरायचा.
"दिवार्‍या," किशोर हाच एकटा असा की जो दिवाला त्याच्या पूर्ण नावानं हाक मारायचा, "आज कुठल्याही परिस्थितीत सायगावला जावं लागेल..." किशोर बोलू लागला. दिवानं चमकून त्याच्याकडं पाहिलं. सायगाव म्हणजे डामखेड्याच्या पुढं. जायचं म्हणजे आले त्याच्या विरुद्ध दिशेला. रस्ता ठीक, पण वाटेत सर्वांत मोठा पोलीस कॅम्प. अरवलीचा.
"पर्याय नाही. भाई तिथंच आहे. तो उद्यापर्यंत काही डामखेड्यात येणार नाहीये. उद्या अ‍ॅक्शन सुरू होतीय डामखेड्यातून..." भाई म्हणजे समितीचा सरचिटणीस अनीश रेगे. सध्याचं नाव भाई.
थोडा वेळ सारेच गप्प होते. चर्चा करण्याची गरज नव्हती. भाईपर्यंत निरोप पोचवायचा इतकं पुरे होतं कृती करण्यासाठी. पंधरा मिनिटांनी किशोरनं दिवाच्या हाती तिन्ही चिठ्ठ्या ठेवल्या. एक डामखेड्यात रतीलालला द्यायची होती. ती पूर्वतयारीसाठी असणार. उरलेल्या दोन्ही पुढं सायगावला भाईसाठी. वेगळे विषय असतील तर एकच चिठ्ठी लिहायची नाही; दोन चिठ्ठ्या त्या नियमानुसार.
"आता इथं थांबू नका. आज फौजफाटा आहे इथं. आठनंतर गावांत गाड्या येऊ लागतील. आत्ता बाहेर थांबल्या आहेत..." किशोरनं थांबलेल्या गाड्यांचा उल्लेख केला. गांभीर्य लक्षात येण्यास तेवढं पुरेसं होतं.
किशोरनं गरजेपुरती माहिती त्या दोघांनाही दिली. डामखेड्यात उद्या हजार पोलीस घुसतील. एसआरपीसह. सोबत महसूलची पथकं. तीनशे लोकसंख्येच्या गावाच्या तिप्पट बंदोबस्त. म्हणजे काहीही करून परवा दुपारी मोजणीचा पहिला रिपोर्ट पाठवायचा असणार सरकारला. सुप्रीम कोर्टात चार दिवसांनी सुनावणी. रात्रीच्या सुमारास पोलीस घुसतील. गावात शिरल्यानंतर प्रत्येक घरामागं पोलीस असतील. सोबत एक डेप्युटी कलेक्टर. फायरिंगची ऑर्डर काढणं सोपं. रात्रीतून मोर्चेबांधणी पक्की. सकाळी सगळ्या शेतांची मोजणी सुरू. व्हीडीओ शुटिंग होईल. दुपारपर्यंत डामखेडा पूर्ण करून रिपोर्ट येईल.
दिवा आणि रामदासनं स्वाभाविकच विचारलं, "परत येणार माघारी की...?"
"परत कशाला येतील? पुढचं गाव कळलेलं नाही. पूर्व की पश्चिम इतकाच प्रश्न आहे. उद्या कळेल. निरोप पोचवून तुम्ही दोघंही माघारी या. येताना रस्ता कुठला घ्यायचा हे जाताना परिस्थिती पाहून ठरवा. अरवलीच्या कॅम्पवर हालचाल असेल. त्यातून अंदाज येईल. जमलं तर आरवलीत रामदासला उतरून आत जाऊदे. तासाभरात तो गाव ओलांडून येईल. मग त्याला घे सोबत. तू बाहेरूनच जा..." किशोरच्या सूचना सुरू होत्या.
मोटरसायकल सव्वाआठला तिठ्यावर आली आणि डावीकडं वळून अरवली-डामखेड्याच्या दिशेला लागली.
---
संध्याकाळी साडेसातनंतर स्टँडवर कोणीही असत नाही. शेवटची बस साडेसहालाच गेलेली असते. सात ते सव्वासातच्या दरम्यान दोन गाड्या परत यायच्या असतात. त्या आल्या की सारं सुनसान. पोलीस ठाण्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर स्टँड, पण या दिवसांत रोज संध्याकाळी सहानंतर रात्री साडेआठपर्यंत कॉन्स्टेबल पवारची नेमणूक. काम काहीच नाही. चोहीकडं नजर ठेवून रहायचं. कोण येतंय, कोण जातंय हे पहायचं. स्टँडवर फक्त बसायचं नाही. स्टँडच्या समोरून जाणारा रस्ता ते तिठा, तिठ्यावरून माघारी परत स्टँड ते बाजार हा रस्ता आणि त्याला तिथंच डावी-उजवीकडं फुटणारे दोन रस्ते. डावीकडच्या रस्त्यानं नदीकडं जाता येतं. उजवीकडचा रस्ता वसाहतीत. तिथं सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांचं वास्तव्य. मुख्य रस्त्यावर स्टँड आणि तिठा यांच्या मध्ये नदीच्या दिशेला एक रस्ता फुटला आहे, तिथं रेस्टहाऊस. तिथंही नजर ठेवायची. बाहेरगावचे पत्रकार रात्रीच गावात पोचतात आणि मुक्कामासाठी रेस्टहाऊसच गाठतात म्हणून.
ठरल्याप्रमाणे बाजार रस्ता, आतले दोन्ही रस्ते करून तो स्टँडवर आला तेव्हा सातचा ठोका झाला. एकटा कंट्रोलर - कंट्रोलर म्हणजे क्लार्कच - होता बसून. त्याच्या शेजारची खुर्ची पवारनं गाठली. खिशातून पुडी काढली. तो तंबाखू मळू लागला. तशी हालचाल नव्हती. त्यामुळं पवार निश्चिंत होता.
पहिली बस यायला दहा मिनिटं लागली. जागेवरूनच पवारला कळलं की बसमध्ये खच्चून सहा-सात जण आहेत. त्यामुळं त्याला उठण्याचीही गरज नव्हती. त्यानं फक्त नजर लावून बारकाईनं पाहिलं. सरपंचाची बायको आणि मेहुणी होती. त्या मेहुणीला पाहताना पवारचा काटा किंचित हलला, पण त्यानं आवरलं. रुपसिंगचा पोरगा होता. तो बहुदा माल घेऊन आला असणार. इतरांमध्ये दोघं तर मास्तरच होते. आज त्यांची मिटिंग असणार झेडपीत. ती उरकून येत असावेत. बाकी एक-दोघं गावकरी. दुसरी बस पाठोपाठच आली. तिच्यातून तर केवळ कंपौंडर उतरला. बस थेट आतमध्ये गेली.
पवारनं हातातल्या कागदावर काही लिहिलं. कंट्रोलरनं पाहिलं पण काही विचारलं नाही. हे आता सवयीचंच होतं. आपला गाशा गुंडाळून तो निघाला.
"ये लवकर उरकलं तर. मी आहे बसलेलो." कंट्रोलरनं बसलेलो या शब्दावर जोर दिला. अर्थ स्पष्ट होता. गावातल्या एकमेव बारमध्ये. पवारनं मान डोलावली. आणि तोही निघाला.
पवारनं रेस्ट हाऊसचा राऊंड केला. तिथं कोणी आलेलं नव्हतं. एसआरपीचे दोन डेप्युटी कमांडंट सोडले तर. ते सकाळपासूनच होते. देवराम मागं स्वयंपाकाच्या तयारीत होता. आज त्या दोघा कमांडंटच्या जेवणात त्याचं जेवण निघून जाईल. सहजच पवारनं चौकशी केली. कोंबडी होती. देवराम त्याच्याकडं अपेक्षेनं पहात होताच, पण पवारनं स्वतःला आवरलं. बारमध्ये जायचं आहे, हे त्याला आठवलं. तरी देवरामनं आग्रह केलाच. "ये की तिकडून, मी नाही तरी अर्धा किलो जादा आणलंच आहे. तू येशील म्हणून." देवरामला पक्कं ठाऊक होतं. बारमधून आल्यानं पवार थोडा ढिला होईलच. पुढची कामं मार्गी लावता येतील हा त्याचा विचार.
तिठ्याच्या पलीकडं थोडा उंचवटा आहे. तिथं पोचल्यावर पवार मागं वळला. पंधरा एक पावलं त्यानं कापली असावीत आणि त्याचे डोळे चकाकले. समोरून प्रकाशाचा झोत आला. काही क्षणात मोटरसायकल दिसली आणि ती अरवलीच्या दिशेनं वळली. पवारनं शेजारी शेतात उडी घेतली आणि मधनं धावत त्यानं अरवली रस्ता गाठला. कुंपणाच्या आड असतानाच त्याला चेहरे अर्धवट दिसले - दिवा आणि रामदास! मोटरसायकल निघून गेली आणि पवार वळला. त्यानं पुन्हा आठवून खात्री केली. मोटरसायकलला नंबरप्लेट नव्हती. म्हणजे दिवा आणि रामदासच. आजचं काम संपलं होतं.
रात्रीच्या सुरवातीला दिवा आणि रामदास अरवलीच्या दिशेनं? कुठं निघाले असावेत? ही काही वेळ नाही पहाडात शिरण्याची. अर्थात, समितीच्या लोकांचं काही सांगता येत नाही. ते केव्हाही, कुठूनही उगवतात. हत्यारं असतातच. वेळ आला तर मारायची तयारीही असतेच. पण तरीही...
पवारचं विचारचक्र सुरू होतं. दिवा आणि रामदास हे कधीही सापडत नाहीत. दिसतात सर्वत्र. असतात सर्वत्र. सारी निरोपानिरोपी आणि पोचवापोचवी तेच करतात. या भागांत तरी. आत्ता यावेळी हे दोघं त्या दिशेनं कसे? पवारला आठवलं, दोनेक महिन्यांपूर्वी या दोघांना त्यानं रातंब्रीच्या रस्त्यावर रात्री असंच पाहिलं होतं. ठाण्यात येऊन त्यानं रिपोर्ट केला आणि तो खोलीवर गेला. सकाळी आठ वाजता त्याला कळलं होतं ते इतकंच की रातंब्रीच्या पुढं समितीच्या लोकांनी समरी गावाकडून येणार्‍या पोलीस पार्टीवर हल्ला केला. तिघं मारले गेले. ती पोलीस पार्टी येणार असल्याची खबर दिवा आणि रामदासच घेऊन गेले होते इकडून. पण पुरावा नाही. तेव्हापासून दिवा आणि रामदास यांच्याकडं सारं लक्ष केंद्रित झालं.
डीवायएसपी ऑफीस आणि कंट्रोल रूम. दोन ठिकाणं अशी होती की जिथं दिवा आणि रामदासच्याबाबतीतील निरोप जाणं गरजेचं होतं.
विचारांच्या चक्रातच पवार ठाण्यावर आला. पीआय गुर्जर अद्याप होते. त्यांनाच जाऊन सांगावं, पवारनं ठरवलं.
"सर, दिवा आणि रामदास आत्ता अरवलीकडं गेले. मोटरसायकलवर."
गुर्जरांनी डोकं वर केलं आणि नजर प्रश्नार्थक केली.
"बाकी काही माहिती नाही. मी तिठ्यावरून परतताना ते वळले तिकडं."
गुर्जरांनी पुन्हा मान डोलावली. पवार ताठ झाला आणि त्यानं पाऊल मागं टाकलं.
पंधरा मिनिटांत डीवायएसपी, होम डीवायएसपी आणि एसपी या तिघांशीही गुर्जरांचं बोलणं झालं. उद्याची दुपार ही डेडलाईन ठरली, समितीची काय तयारी असेल याची माहिती काढण्याची. अर्थात अ‍ॅक्शन प्रोग्राममध्ये काहीही बदल नाही.
अर्ध्या तासानं गावाबाहेर थांबलेल्या व्हॅन्स गावाच्या दिशेनं सरकू लागल्या.
क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

3 Mar 2010 - 8:02 pm | मेघवेडा

क ड क..

मेमेंटो या 'केवळ अप्रतिम' चित्रपटाची आठवण झाली कथा वाचताना.. एक एक सीन लिंक करत करत पूर्ण चित्रपट बॅकवर्ड नेलाय. श्रामो, उत्कंठा ताणली गेलीये. पुढला भाग येऊद्या सडसडीत...

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Mar 2010 - 8:16 pm | अक्षय पुर्णपात्रे

उत्कंठा तर शीगेला पोहोचली आहे. समिती, सरकारी यंत्रणा, पत्रकार, गावकरी सगळेच जिवंत.

प्रभो's picture

3 Mar 2010 - 8:19 pm | प्रभो

पुढे??

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

बहुगुणी's picture

3 Mar 2010 - 11:27 pm | बहुगुणी

लिहा पुढचं झटपट!

अंतु बर्वा's picture

3 Mar 2010 - 11:46 pm | अंतु बर्वा

मायला या क्रमशः च्या... :-)

जबरा लिखाण... घडामोडी एवढ्या पटापट होतायेत की जणू सगळं काही समोरच घडतय..

पुढचा भाग लवकर टाका राव... उत्कंठा एकदम शिगेला पोचलीय...

मदनबाण's picture

4 Mar 2010 - 12:41 am | मदनबाण

भाग तीन ची वाट पाहतोय...

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

संदीप चित्रे's picture

4 Mar 2010 - 2:20 am | संदीप चित्रे

येईपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही !
प्रत्येक भागाची वाट बघतोय आणि वाचतोय हे मात्र नक्की !!

राजेश घासकडवी's picture

4 Mar 2010 - 2:50 am | राजेश घासकडवी

त्या सगळ्यांना +१.

दोन्ही बाजूंचं चित्रण आहे, त्यामुळे संघर्षाला जिवंतपणा येतोय. चक्रं आणि त्यांवरचे दाते एकमेकांत गुंफून झालेल्या यंत्राचं चित्र मस्त रंगतंय. आता कुठे चावी फिरतेय... गाडी कशी आणि कुठे जाते ते बघायची उत्सुकता आहे.

राजेश