नदी गावाच्या दक्षिणेकडून यायची आणि गाव वसलेला तिनसाचा डोंगर संपला की किंचित डावीकडं वळून निघायची. नदीच्या पूर्वेकडच्या किनार्याकडं जाण्यासाठी हिर्या डुंगीतून निघाला तेव्हा स्वच्छ चंद्रप्रकाश पसरला होता. नदीच्या पात्रात आपण दिसू अशी त्याला भीती होती आणि ती साधार होती. पात्र साधारण पन्नासेक मीटर रुंदीचं. तो ते सरळ ओलांडू लागला असता तर पंचाईत नक्कीच होती. त्यामुळं त्यानं नदीच्या प्रवाहात आधी डुंगी टाकली. साधारण मैलभर खाली जाऊन तिथून त्यानं पात्र ओलांडलं आणि समोरच्या बाजूनं तो पुन्हा वर आला. त्या किनार्यावर पुढं आत जायचं आणि जाताना इकडच्या किनार्यावरच्या रात्रीच्या स्तब्धतेवर नजर ठेवायची. स्तब्धता थोडीजरी विचलीत झाली की काम सुरू. झोप येऊ नये म्हणून बिडी ओढायची. बिडीचा निखारा दिसू नये याची दक्षता घेण्यासाठी उभी ओंजळ बिडीभोवती.
चंद्र डोक्याला तिरपा झाला तेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव हिर्याला झाली. त्यानं डुंगी तिरावर घेतली. बाहेर उडी मारली. डुंगीचा दोर ओढून घेतला आणि काठावरच्या एका बुंध्याला ती बांधली. तो जंगलात शिरला. दहा मिनिटांनी तो पुन्हा डुंगीवर आला तेव्हा त्याचं पोट भरलं होतं. किनार्यावर या बाजूला किती वेळ थांबायचं उगाच, असा विचार करून त्यानं डुंगीला थोडी गती दिली. दक्षिणेकडं तो डुंगी हाकू लागला. फर्लांगभर अंतर त्यानं कापलं असेल. नदीच्या पश्चिमेला पठारी भाग सुरू होण्याची चिन्हं होती. कोणत्याही परिस्थितीत डुंगी पश्चिमेच्या तिराला न्यायची नाही असं त्याला भाईनं सांगितलं होतं. त्यामुळं त्यानं डुंगी पूर्वेकडंच ठेवली होती.
डावीकडच्या डोंगरातून एक आवाज हिर्याला ऐकू आला. हुंकारासारखा. कोणता तरी प्राणी. अर्थात, हिर्याला त्याची भीती नव्हती. तो नदीत होता. पण जिथं हा आवाज ऐकू आला तिथंच त्याला थांबणं भाग होतं. थोडं पुढं मगरींचा टापू. वेळ रात्रीची. त्यामुळं सावधानता अधिक गरजेची. एरवी दिवसा जिथंपर्यंत माणसं जातात, त्याच्या अलीकडंच तो थांबला. त्यानं दूरवर नजर टाकली. अंधारात झाडांच्या फक्त सावल्या दिसत होत्या. हालचाल काहीही नव्हती.
रात्रीच्या वेळी एकट्यानं अशी कामगिरी करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्यामुळं हिर्या निवांत होता. एकच अडचण होती, आज त्याला पावा वाजवता येत नव्हता. एरवी अशा वेळी तो निवांत पावा वाजवत असायचा. आज पोलिसांना त्याचं अस्तित्व कळण्याची भीती होती. त्यामुळं फक्त बिडीवर काम भागवावं लागत होतं.
कंटाळा उडवण्यासाठी हिर्यानं तोंडावर पाणी मारलं. टॉवेलनं तोंड पुसलं आणि पुन्हा एक बिडी पेटवली. एक दीर्घ झुरका घेतला. धूर सोडत त्यानं समोर दूरवर नजर फेकली आणि तो सावध झाला. दूरवर काही हालचाल दिसू लागली होती. नेमकी कशाची हे कळत नव्हतं. पण हालचाल होती. हिर्या टक लावून पाहू लागला. पाचेक मिनिटांत चित्र स्पष्ट झालं. ओळीनं काही माणसं चालत येत होती इतकं त्या सावल्यावरून कळत होतं.
हिर्यानं डुंगी वल्हवायला सुरवात केली. लगेच गावात जाणं गरजेचं होतं. ठरवून त्यानं डुंगी पात्रात मध्यावर टाकली आणि तो भराभरा काठीनं पाणी मागं लोटू लागला.
***
डामखेड्यात नैऋत्येला असलेल्या उतारावर दामाचं घर होतं. तिथंच बातमीदारांना थांबवलं होतं. ते पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते.
दामाच्या घरापासून पूर्वेला नदी दिसायची. नदीच्या काठाला लागून असणारं जंगल दिसायचं. दक्षिणेला अरवलीहून येणारा रस्ता. त्या रस्त्याच्या अलीकडं असणारंही जंगल दिसायचं. ही मंडळी पोचली तेव्हा मात्र फक्त छाया आणि अंधुक प्रकाशाचा खेळ. त्यावरून अर्थ लावायचा. अरवलीचा रस्ता तिथून जवळ, तर नदीकिनारची वाट लांब. हे ठिकाणच सुरक्षीत आहे, असं बरोबरच्या दादानं सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यापलीकडं जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती.
मध्यरात्रीचे साडेतीन झाले होते. फोटोग्राफरनी सरळ ताणून दिली होती. अंधारात आणि इतक्या अंतरावरून आपला काहीही उपयोग नाही हे त्यांना ठाऊक होतं. 'अग्निहोत्रीं'च्या गप्पा सुरू झाल्या होत्या. नेहमीच्याच, राजकारणाविषयी. चहाचा, बिनदुधाच्या, एक राऊंड आल्या-आल्या झाला होता. आता दुसरा व्हावा अशी काहींची इच्छा होती. पण तिथली एकूण परिस्थिती पाहता तशी इच्छा व्यक्त करणं मुश्कीलच. एक दोघा अनुभवी मंडळींनी आपल्यासमवेत प्रथमच आलेल्या दोघांचा 'पाठ घेणं' सुरू केलं होतं. गंमतीगंमतीत या अशा अनभिज्ञ भागाविषयी, माणसांविषयी काही असे ग्रह करून द्यायचे की हे नवागत काही काळ तरी त्या 'प्रभावा'तून बाहेर येत नाहीत.
तासभर असाच गेला तेव्हा आत्तापर्यंत डोळे ताणून बसलेल्यांना थोडा पश्चाताप होऊ लागला होता. डोळे ताणण्याऐवजी आल्या-आल्या ताणून दिली असती तर बरं झालं असतं वगैरे त्यांना वाटू लागलं. पण असं करून चालत नसतं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. पोलीस केव्हाही जंगलापलीकडं आणि नदीच्या मधल्या टापूत जमतील आणि त्याचवेळी कदाचित ठिणगी पडेल.
प्रवासात प्रत्येक बातमीदाराला काही गोष्टींची कल्पना समितीकडून स्पष्ट दिली गेली होती. पहिली म्हणजे ते सारे त्यांच्याच जबाबदारीवर तिथं आले आहेत, त्यांना समितीनं आणलेलं नाही. फक्त त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं सुरक्षीत रस्त्यावरून त्यांना इथंपर्यंत आणलं आहे. समितीनं हीही दक्षता घेतली होती की, आपल्याकडून त्यांच्या हाती काहीही दिलं जाणार नाही. त्यांची तटस्थता शक्य त्या मार्गानं एस्टॅब्लीश होणं महत्त्वाचं.
सव्वापाचच्या सुमारास उतारावर काही हालचालीची चाहूल लागली. आवाज येऊ लागले. एक हत्यारधारी आधीच त्या दिशेनं गेला होता. आवाजांपाठोपाठ तो धावत आला निरोप घेऊन: "घुसतायेत साले..."
***
हिर्या गावात काही मिनिटं थांबला आणि लगेच अरवलीच्या वाटेवर धावत सुटला. साठेक जवान जंगलातच होते. त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लगेचच.
गावातून त्याचवेळी मेगाफोनवरून एक आवाज आसमंतात घुमला. समितीच्या विजयाचा नारा होता तो. पाठोपाठ दुसरा नारा झाला, "हमारे गावमें हमारा राज"! नारा दिला अनीश रेगेनं, अनुभवी मंडळींनी आवाज ओळखला होता. त्यानंतर अनीशचाच आवाज घुमू लागला.
"सर्वेला सहकार्य केलं जाणार नाही. ताकदीच्या बळावर गावांत घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये. डेप्युटी कलेक्टर आणि प्रांताधिकार्यांनी नोंद घ्यावी की हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे. तिथं सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो..."
मेगाफोन गावात वरच कुठं तरी होता. अंधारात दिसणं शक्य नव्हतं. दहा-पंधरा मिनिटांत झुंजुमुंजू झालं की सारंच स्पष्ट होईल अशा बातमीदार मंडळी होती. बरोबर असणारे दोन्ही तरुण निघून गेले होते. हालचाल करायची तरी कशी हा प्रश्न होता. त्यामुळं तिथंच थांबून राहणं त्यांनी पत्करलं.
सुरवात कशी झाली, काय झालं हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. गोंधळ सुरू झाला खाली जंगलापाशी. काही गडबड आहे इतकंच कळत होतं. उजाडलं तेव्हा नदीतीराच्या दिसणार्या भागात पोलिसांचीच धावपळ दिसत होती. तिथून अलीकडं फक्त जंगल. पोलिसांकडंही मेगाफोन होता, त्यांचे इशारे समितीच्या पहिल्या घोषणेबरोबरच सुरू झाले होते. त्यामुळं आधी सारंच मेगाफोनचं युद्ध वाटत होतं. आणि त्या युद्धातच केव्हातरी आलेला गोळीचा आवाज विरून गेला. त्यामुळं ती कुठून सुटली, जंगलातून की पठारावरून हे आता कोणालाही सांगता येणं शक्य नव्हतं. एका गोळीनंतर हे आवाज वाढले. पुढं मग फारसं काही कळेनासं झालं. आवाज कानी येत होते. काही कळत नव्हतं, पण त्यांचा अर्थ इतकाच होता की चकमक सुरू आहे.
अंदाज घेत फोटोग्राफर आणि बातमीदार दामाच्या घरापासून खाली उतरू लागले. निघताना त्यांच्यातल्या अनुभवींपैकी कोणी एकानं ओरडून सांगितलं, "काही झालं, एकमेकांना चुकलो तरी ठीक दीड तासानं आहे त्या स्थितीत सगळ्यांनी दामाच्या घरी यायचं. धुमश्चक्री त्याआधी संपली तर आधीच." किती जणांच्या ते डोक्यात शिरलं हे तपासत बसण्यात अर्थ नव्हता.
खाली उतरता-उतरताच गोळ्यांचा आवाज कानात साठवत कुणी पुढं, कुणी मागं असं करता-करता ते कधी विखुरले गेले ते त्यांनाही कळलं नाही.
***
"सर्वेला विरोध करणार्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. झाडं आडवी टाकून पोलिसांचा रस्ता रोखला होता. पोलिसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच आधी तुफान दगडफेक करण्यात आली, मग जंगलातून गोळीबार झाला. दीड तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. तीन पोलीस मारले गेले. सहा जण जखमी झाले. पथकाला अर्ध्या रस्त्यातूनच माघार घेणं भाग पडलं, कारण सुरक्षीत वाट नक्षलींनी बंद केली होती. मगरींचा संचार होता तिकडून वळून पुढं गावात जाणं शक्य नव्हतं..."
एसपी सांगत होते. घाई दिसत होतीच बोलण्यात, कारण प्राथमिक माहिती देऊन मी घटनास्थळी जाणार आहे असं ते म्हणाले होते. घटनास्थळी म्हणजे अरवली कॅम्पपर्यंत तर नक्की. ब्रीफिंग करताना एसपींनी काहीही मागं ठेवलं नाही. पोलिसी कारवाई फसते आहे हे त्यांनी शांतपणे कबूल केलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात समितीचीही हानी झाली आहे इतकंच त्यांना सांगता आलं. प्रत्यक्षात किती आणि काय हे मात्र सांगणं शक्य नव्हतं, कारण ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारला गावात शिरताच आलं नव्हतं. इंडियन मेडिकल असोसिएशनचंच पथक फक्त आत येऊ शकेल असे फलक समितीनं लावले होते. त्याहीपलीकडं, त्या जंगलात अद्याप किमान पंचवीसेक शस्त्रधारी तरी होतेच.
आयएमएचं पथक तिथं पोचेपर्यंत दुपार उजाडणार होती.
***
खडकी, निमखेडामार्गे दिवा एकटाच मोटरसायकलवर आला. रुपसिंगच्या शेतावरच थांबला. किशोर, धनजीसेठ तिथंच होते. निरोप स्वच्छ होता: समितीचा डामखेड्याचा कार्यकारी मंडळ सदस्य वेस्ता आणि सायगावचा सिक्का हे दोघं 'शहीद' झाले होते. भाईच्या दंडात आणि मांडीत गोळी घुसली होती. आणखी तिघं जखमी झाले होते. सर्वांना डोली करून निमखेड्याला नेलं होतं. तिथल्या दवाखान्यात उपचार सुरू झाले होते. पोलिसांनी गोळीबार थांबवून मागं जाण्यास सुरवात केली, तसा जंगलातून गावकर्यांनीही गोळीबार थांबवला होता. दोन तासांपूर्वीपर्यंत पुढं आलेले सगळे पोलीस अरवली कँपला गेले होते. बातमीदार आणि फोटोग्राफरचं पथकही परस्पर अरवलीला गेलं होतं.
वेस्ता आणि सिक्का यांच्यावर दोन्ही गावांच्या मध्ये जंगलात अंत्यसंस्कार करायचा निर्णय झाला होता.
अंत्यसंस्काराचा निरोप घेऊन समितीचे कार्यकर्ते गावागावांत पोचत होते तेव्हा त्या दोघांच्याही बायका आपले बछडे आणि इतर काहींसमवेत डामखेड्यातच होत्या. दुःखासाठीची उसंत त्यांना अंत्यसंस्कारानंतर मिळणार होती. घरी पोचल्यावरच. ते त्यांनी पत्करलेलं होतं. जमिनीसाठी, कारण एरवीही काही पर्याय नव्हताच, ही त्यांची धारणा होती!
***
कलेक्टर ऑफिसात एकूण रिपोर्ट तयार व्हायला दुसर्या दिवसाची दुपार उजाडली. स्वतः कलेक्टर अरवलीपर्यंत जाऊन आले. एसपीही गेले होते. त्यांच्या पाठोपाठ स्पेशल आयजी. नंतरची रिव्ह्यू मिटिंग कलेक्टर ऑफिसलाच झाली. पालकमंत्री दुपारी साडेतीन वाजता तिथं पोचणार होते, नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झालाच. चार वाजता ते आले तेव्हा स्पेशल आयजींसमवेत कलेक्टर, एसपी अँटे चेंबरमध्ये बसले होते. पालकमंत्री थेट तिथंच गेले.
"नमस्कार. काय परिस्थिती आहे आत्ता?" आत शिरताच पालकमंत्र्यांचा पहिला प्रश्न. कलेक्टर बोलू लागले. मोजक्या पंधरा-वीस वाक्यांत त्यांनी आढावा घेतला.
"पुढं काय? सर्वेला किती दिवसांची स्थगिती आहे?"
"स्थगितीची मुदत नाही. मी आपल्याकडून पुढच्या सूचनांची वाट पाहतोय." कलेक्टरांचा खुलासा.
"आत्ता घाई नको. सुप्रीम कोर्टच काय ते सांगेल..." पालकमंत्री म्हणाले. कलेक्टरांनी मान डोलावली.
काही औपचारिक चर्चा करून पालकमंत्र्यांनी आतला फोन उचलून सूचना दिली, "रेव्हेन्यू सेक्रेटरींना लाईनवर घ्या." त्यांचं खातं तेच.
काही क्षणातच फोन लागला. पालकमंत्री इकडून बोलू लागले. पलीकडचं बोलणं ऐकू येणं शक्यच नव्हतं. "तुमच्याकडं प्राथमिक माहिती असेल... कलेक्टरांचा रिपोर्ट येईलच. काय आहे, या कोर्टाच्या 'जैसे थे' वगैरे आदेशांनी त्यांना जोर दिला. नाही तर त्यांची ही हिंमत झाली नसती. आता जे झालं ते उत्तम झालं. आय सजेस्ट, वी मस्ट टेक द रिपोर्ट डायरेक्टली टू दिल्ली... सुप्रीम कोर्ट. एकदाचं हायकोर्टातलं लफडंही तिकडं दिल्लीत जाणं गरजेचं आहे. मग या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट ऑर्डर देईल. ती काही भूसंपादन करू नका अशी असणार नाही. आत्ता घडलेल्या घटनेतून कोर्टातही गांभीर्य मांडता येईल..."
एसपींना त्याक्षणी मारल्या गेलेल्या तीन पोलिसांची आणि त्यातून एकूण पोलीस दलामध्ये निर्माण होणार्या प्रतिक्रियेची चिंता होती. समितीविरुद्ध त्या दुर्गम प्रदेशात झुंजणं सोपं नव्हतं. वर्षभरात बळी पडलेल्या पोलिसांची संख्या आता १२ वर गेली होती.
कलेक्टरांना सर्वे आणखी लांबवता येईल का याची चिंता भेडसावत होती. त्यांना ठाऊक होतं की सर्वे होईलही, पण भूसंपादन शक्य नाही सध्याच्या स्थितीत. पुनर्वसनाचा प्लॅन पक्का नसताना 'जिओरिसोर्सेस'नं कितीही मोठ्या कल्पना मांडल्या तरी त्या या प्रदेशात प्रत्यक्षात आणणं नेहमीच्या चौपट कामाइतकं होतं.
स्पेशल आयजींचा विचार सुरू होता तो समितीचं कंबरडं कसं मोडायचा याविषयी. जिओरिसोर्सेसच्या एम.डीं.ना दिलेला तो शब्द होता. त्या शब्दावरच पुढं हरिप्रसाद महाराजांचं समाधान अवलंबून होतं. महाराज समाधानी झाले तरच सीबीआयमध्ये जाण्याची संधी, एरवी इथंच राज्यात सडत रहावं लागेल.
"या तीन पोलिसांची नावं काय आहेत?" पालकमंत्र्यांचा अचानक प्रश्न आला एसपींना.
"हेड कॉन्स्टेबल रावण पाटोळे, कॉन्स्टेबल रफीक मुकादम आणि प्रभाकर चव्हाण. तिघंही मुख्यालयातच नेमणुकीला होते." एसपींनी माहिती पुरवली. पालकमंत्र्यांना नावात काय इंटरेस्ट आहे हे त्यांच्या ध्यानी आलं नाही.
"आपण त्यांच्या घरी जाऊया. भरपाईसाठी मी सीएमसायबांशी बोललो आहे. त्याशिवाय कंपनीही मदत करणार आहे. मुलं केवढी आहेत?"
"तिघंही तरूण होते. मुकादमचा मुलगा आणि चव्हाणची मुलगी बालवाडीत वगैरे आहे. पाटोळ्यांचा मुलगा पुढच्या वर्षी दहावीला जातोय." एसपी.
"ठीक आहे, त्यांची व्यवस्था करू. जरा डीआयओंना बोलवण्याची व्यवस्था करा..." पालकमंत्र्यांनी जिल्हा माहिती अधिकार्यांना बोलावण्याची सूचना केली. उद्याच्या बातम्यांची सोय. चौघंही बाहेर आले.
छोट्याशा औपचारिक बैठकीनंतर मंत्री पुन्हा अँटे चेंबरमध्ये गेले. यावेळी सोबत फक्त कलेक्टर आणि मंत्र्यांचे सचिव व दोन सहायक होते. पाऊण तासानं सारेच बाहेर आले. "चला, आधी पोलिसांच्या कुटुंबियांना भेटून येऊ..." मंत्री म्हणाले.
पत्रकारांना निरोप देण्यासाठी डीआयओंच्या सहायकांची पळापळ सुरू झाली.
***
सचिवालयात महसूल सचिवांच्या दालनांमध्ये नेहमीच्या वेळेनंतरही जाग होती. सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार होत होतं. भूसंपादनाला गावकर्यांचा विरोध नाही. विरोध आहे तो फक्त समितीचा. समितीच्या शस्त्रांच्या धाकदपटशामुळं गावकरीही दबलेले आहेत. त्यामुळं सर्वंकष कारवाईची गरज आहे असा मुद्दा मांडण्याची सूचना सरकारच्या विशेष वकिलांसाठी त्या प्रतिज्ञापत्रासोबतच्या नोटमध्ये लिहिली गेली होती.
घटनास्थळापाशी केलेल्या व्हिडिओची एक प्रत घेऊन पालकमंत्र्यांचे एक सहायक तिथं पोचण्यास निघाले होते. महसूल सचिवांसाठी निरोप होता, या व्हिडिओवरून 'आँखो देखा हाल' तयार करून तो सुप्रीम कोर्टात देण्यासाठी सज्ज ठेवायचा.
***
पालकमंत्र्यांचा ताफा पोलीस लायनीत शिरला. पाटोळे, चव्हाण आणि मुकादमच्या घरांसमोर शोकाकूल मंडळी होती.
विचारपूस करून पालकमंत्री पत्रकारांशी बोलू लागले. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून विशेष घोषणेची अनुमती त्यांना मिळाली होती. तिन्ही पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून नियमित मदतीव्यतिरिक्त प्रत्येकी एक लाखाची मदत. तिघांच्या पत्नींना सरकारी नोकरी. तिघांचीही पहिली नावं घेत पालकमंत्री आपुलकीनं बोलले. त्यांचे डोळे पाणावले होते. कॅमेराचे फ्लॅश उडत तेव्हा ते चकाकत!
तिन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहून पालकमंत्र्यांनी रेस्टहाऊसकडं कूच केलं.
***
सूर्य मावळतीला निघाला होता तेव्हा पोलीस लायनीपासून साधारण अर्धा फर्लांगभर अंतरावर असलेल्या संस्कार केंद्रातील मुलांना तिथली शिक्षिका प्रार्थना शिकवत होती. तिची आणि त्या मुलांचीही आवडती प्रार्थना,
इतनी शक्ती हमें देना दाता
मनका विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्तेपे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...
केंद्रातून बाहेर येणारे शब्द आसमंतात विरून जात होते.
शिक्षिकेच्या आवाजातच दोन चिमुकले आवाजही मिळालेले होते - रोशन मुकादम आणि रेवा चव्हाणचा आवाज!
बापाच्या मृत्यूचा 'निरोप' त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा लागणार होता.
पूर्ण
प्रतिक्रिया
5 Mar 2010 - 4:44 pm | महेश हतोळकर
सुरेख कथा(?). मनापासून आवडली. वाक्यच निवडायचं म्हणलं तर सगळीच वाक्ये निवडावी लागतील.
5 Mar 2010 - 8:56 pm | धिन्गाना
फारच सुरेख.
5 Mar 2010 - 10:16 pm | मदनबाण
नक्षलवाद नक्की संपणार तरी कधी ? :(
कथा आवडली...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
5 Mar 2010 - 11:17 pm | संदीप चित्रे
वीकांतला जमेल तेव्हा शांतपणे बसून सगळे भाग पुन्हा एकदा सलग वाचून काढीन. मस्त जमलीय कथा !
तुमच्याकडून असेच उत्तम लेखन होवो ह्या शुभेच्छा !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
5 Mar 2010 - 11:50 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री मोडक, हा भागही नेहमीप्रमाणेच आवडला पण पटापटा उरकला गेला असे जाणवले. बरीच पात्रं आणि स्थळं असल्याने एक कादंबरीच होऊ शकेल असे वाटते. विस्ताराने लिहिण्याचे मनावर घ्यावे. अनीशसारखे लोक कुठून येतात? का हा सगळा व्याप करतात? हिंसेमागची त्यांची भुमिका काय? या गोष्टींचा उहापोह वाचायला आवडेल.
6 Mar 2010 - 8:12 am | विसोबा खेचर
पुर्णपात्र्यांशी सहमत आहे..
मोडकशेठ, अजूनही लिहा..
तात्या.
5 Mar 2010 - 11:59 pm | अर्धवटराव
वाचुन वाटलं कि खरंखुरं जग... जे एक जंगलच आहे... त्या सत्यापासुन मी किती लांब आहे, सुरक्षित आहे !! त्याकरता देवाला धन्यवाद द्यायचे आणि आनंद मानयचा कि सत्य परिस्थिती बघुन दु:खि व्हायचं :(
भावना अजुनहि अर्धवटच आहे :(
(गोंधळलेला)अर्धवटराव
-रेडि टु थिंक
6 Mar 2010 - 12:09 am | राजेश घासकडवी
कथा छान झालेली आहे. शेवटपर्यंत पकड ठेवते. उघड काळं पांढरं करण्याऐवजी संतुलित चित्रणाकडे भर ठेवते. प्रश्नांचा निकाल लावण्याऐवजी भिजत घोंगड्यातनं दोनचार थेंब गळाल्याचं दाखवते.
जाता जाता - झुंडशाहीवरच्या नितीन थत्तेंच्या प्रश्नाचं उत्तर नाही, पण सविस्तर मांडणी वाटली. खऱ्या व्यक्ती व यंत्रणा अडकलेल्या दिसल्यामुळे प्रश्न भिडतो. कथेचा जीव अजून मोठा आहे असं वाटलं.
राजेश
6 Mar 2010 - 12:39 am | प्राजु
कथा आवडली.
शेवट्पर्यंत पकड घेते आहे.
विकेंड ला पुन्हा एकदा वाचेन.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
6 Mar 2010 - 7:04 am | सुनील
सुरेख पण अजूनही वाढवता आली असती, असे वाटते. गावकर्यांच्या जमिनी न देण्यामागच्या भूमिकेचा अजून थोडा उहापोह केला गेला असता, ते नक्षलवादाकडे का आणि कसे झुकले याचे थोडे अधिक विवेचन असते, तर अधिक उत्तम झाले असते.
कथा आवडली (हे वेगळे सांगायची काहीही आवश्यकता नाही!) ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Mar 2010 - 8:32 am | Nile
मोडकांनी नेहमीप्रमाणे त्यांचे बारकावे, वास्तव, निगडीत प्रश्न सुंदर मांडलेले आहेत. कथा म्हणुन उत्तमच! खरं तर वाचताना असं वाटलं की यावर एक छान मालिका किंवा डॉक्युमेंटरी बनेल!
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकेतस्थळावर येणार्या सुखवस्तु मध्यमवर्गापुढे हे प्रश्न मांडणं. एकीकडे पत्रकारीता विकली गेली आहे चा आक्रोश सुरु असताना अश्या लेखांचं महत्त्व फार आहे. खरं तर प्रामाणीक पत्रकार अश्या माध्यमांचा वापर लवकरच करु लागतील हा विचार सुखावुन गेला.
काय बरोबर आणी काय चुक हे ठरवणं परिस्थितीच्या बळी गेलेल्यांसाठीच, तिर्हाईताचे त्यावरचे विचार म्हणजे फुकाचे बोल!
6 Mar 2010 - 11:02 am | अमोल खरे
नक्षलवाद किती भयानक आहे आणि त्यांचे काय नेटवर्क आहे ते थोडंफार कळलं. कालच केंद्रिय गृहसचिव पिल्लई ह्यांचे स्टेटमेंट वाचले टाईम्स मध्ये. नक्षलवाद्यांना २०५० मध्ये भारत ताब्यात घ्यायचाय म्हणे. आपले राज्यकर्ते २०४० पर्यंत जागे होणार नाहीत बहुदा. नक्षलवादाची समस्या काश्मीरप्रश्ना सारखी नाही झाली म्हणजे मिळवलं. मुंबईसारख्या शहरात माणुस किती सेफ आहे ते पुन्हा एकदा कळलं. अप्रतिम लेखमाला होती.
बाकी "रामदासांचा" संचार सर्वत्र असतोच म्हणा. स्टॉक मार्केट पासुन गोडबोलेंपर्यंत. :)
6 Mar 2010 - 1:57 pm | प्रकाश घाटपांडे
श्रामोंच्या कथा घेतल्या तर त्यातुन सिंहासनासारख्या उत्तम चित्रपटाची निर्मिती होउ शकते. हे फक्त चित्रपट निर्मात्यां पर्यंत पोचायला हव. त्यांना यात व्यवसाय दिसला तर दिसु द्यात.लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Mar 2010 - 8:37 am | अर्धवटराव
हे खरखुरं जग, जे एक जंगलच आहे... त्यापासुन मी किती लांब आहे... सुरक्षित आहे. त्याकरता आनंद मानायचा कि लोकांच्या इतक्या हाल बघुन दु:खि व्हायचे हेच कळत नाहिये...
(गोंधळलेला) अर्धवटराव
- रेडि टु थिंक
24 Jan 2016 - 2:17 pm | मुक्त विहारि
आणि श्रामोंचेच नाव डोळ्यासमोर आले....
आज पासून आमचा श्रामो सप्ताह....
1 Feb 2016 - 10:14 pm | राघव
शतशः धन्यवाद. पुन्हा वाचायला दिल्याबद्दल!!
स्वगतः श्रामो आणि निरोप हे दोन्ही शब्द काही खपल्या काढून गेले रे राघवा.. :-(
2 Feb 2016 - 9:25 pm | मुक्त विहारि
काही कारणांमुळे श्रामो आणि यकू, ह्यांना भेटता आले नाही, ही खंत आहेच.म्हणूनच जसा वेळ मिळेल तसा, त्यांचे लेख वाचतो.
देवावर तसाही आमचा विश्र्वास न्हवताच.ह्या अशा घटना घडल्यामुळे, दैवावरचा पण विश्र्वास उडून गेला.
(सालं पुणे, इंदूर आणि संभाजीनगर इतके दूर कधीच वाटले नाही.)
2 Feb 2016 - 9:00 am | सुनील
जवळपास सहा वर्षांनंतर कथा पुन्हा वाचली. तितकीच पुन्हा आवडली.
2 Feb 2016 - 5:47 pm | बिपिन कार्यकर्ते
.