असे असायला हवे होते/बहुधा असेच असावे! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
25 Sep 2007 - 1:53 am

राम राम मंडळी,

चि वि जोशी हे मराठीतले एक नावाजलेले लेखक. चि वि जोश्यांचे एक पुस्तक आहे. (त्याचं नांव मला आत्ता आठवत नाही, पण आठवून नक्की सांगेन.) त्या पुस्तकात त्यांनी काही धमाल लेख लिहिले आहेत. त्यांचं (म्हणजे चि विं चं) म्हणणं असं की आपल्या संस्कृतीने 'याचक' हाच नेहमी मोठा ठरवलेला आहे. आणि याचकाला दान दिल्यावर किंवा याचकाने दात्याकडून दान घेतल्यावर जणू काही याचकच दात्यावर फार मोठ्ठे उपकार करतो आहे असं चित्र गेली वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीत रंगवलं गेलं आहे. दात्याला इतर कोणतंही क्रेडिट न देता जणू काही दान देणं हे त्याचं कर्तव्यच आहे आणि असं चित्र निर्माण करण्यात आपले बरेचसे ऋषिमुनी वर्षानुवर्ष यशस्वी झाले आहेत असं चि विं चं म्हणणं आहे! :)

चि विं च्या या पुस्तकातील एका लेखाचा साधारण गोषवारा असा -
(नेमके शब्द माहीत नाहीत, हे पुस्तक वाचल्याला आता बरीच वर्ष झाली,)

या लेखात (शीर्षक - 'असे असायला हवे होते' किंवा असंच काहीतरी!) चि विं नी असं म्हटलं आहे की ही सर्व ऋषिमुनींची जमात म्हणजे अत्यंत माजुरडी जमात होती. ही मंडळी स्वतः काहीही कामधंदा करत नसत परंतु उगाच सगळीकडे आपण मोठे विद्वान असल्याचा जोरा करत अत्यंत माजोरीपणाने समाजात वावरत. चि विं नी आपल्या विनोदी शैलीत या गोसावड्यांवर छान कोरडे ओढले आहेत.

आता दुर्वास ऋषिंचीच कथा घ्या! द्रौपदीची थाळी सूर्यास्तानंतर काम करत नसे हे जाणून दुर्वासांनी समस्त पांडवांना फुक्कटचा त्रास द्यायचे एक षडयंत्र रचले आणि एकदा मध्यरात्री ते आपल्या हजार दीड हजार शिष्यवर्गाला घेऊन पांडवांकडे जेवायला गेले. पुढे द्रौपदीला, 'ऐन वेळेस पाहुण्यांना जेवायला काय वाढायचे' या संकटातून बाहेर पडण्यास कृष्णाने मदत वगैरे केली अशी काहीशी 'द्रौपदीची थाळी' ही मूळ कथा सर्वश्रुत आहे. परंतु चि विं ना ही कथा काही रुचेना आणि आपल्या लेखात ही कथा वस्तवात कशी असायला हवी होती, कशी घडायला हवी होती हे चि वि फार छान लिहितात!

ते लिहितात, (नेमके शब्द आठवत नाहीत परंतु माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो! :) --

हा दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं. द्रौपदीची थाळी सूर्यास्तानंतर काम करत नाही हे त्या फाजील माणसाला चांगलं माहीत होतं, तरीही पांडवांना केवळ त्रास द्यायचा आणि आपलं स्तोम अधिक माजवायचं या हेतूने तो एका मध्यरात्री आपल्या हजार-पाचशे गोसावड्या शिष्यवर्गाला घेऊन पांडवांच्या कुटीपाशी पोहोचला आणि त्यांनी दार ठोठावलंन! :)

द्रौपदीने दार उघडताच दुर्वासाने आपल्याला जेवायला वाढणे हे जणू काही द्रौपदीचं कर्तव्यच आहे अश्या थाटात त्यांनी द्रौपदीला 'आम्ही सगळे जेवायला आलो आहोत' असा हुकूम सोडला!

(म्हणजे पुन्हा याचकच मोठा, आणि दाता कस्पटासमान! :)

आपली थाळी मध्यरात्री आकाशात सूर्य नसल्यामुळे काम करत नाही हे जाणूनच या हलकटाने मध्यरात्री आपल्याकडे जेवायला येण्याचा घाट घातला आहे हे द्रौपदीने ओळखले! :) परंतु तिचे सगळे नवरे, विशेषतः भीम डाराडूर झोपला होता. भीमाच्या केवळ घोरण्यामुळेच आजुबाजूच्या जंगलात असलेली श्वापदे चळाचळा कापत होती.

परंतु द्रौपदीही तशी हुशार! :) भीमाला झोपेतून जागं करायला थोडाशी सवड मिळावी म्हणून द्रौपदीने 'आम्ही पारोश्या ब्राह्मणांना जेवायला वाढत नाही. तुम्ही सगळे नदीवर जाऊन अंघोळी करून या, तो पर्यंत मी स्वयंपाक तयार ठेवते' असे दुर्वासाला सुनावले! :)

दुर्वास आणि मंडळींवर पारोसे ब्राह्मण हा आरोप ठेवून द्रौपदीने तात्पुरती का होईना, दुर्वासाची जरा पंचाईतच केली! काहीही अधिक न बोलता मनातल्या मनात रागाने चडफडत दुर्वास आपल्या शिष्यवर्गाला घेऊन नदीवर अंघोळी करता चालता झाला. पण थंडी तर जामच पडली होती त्यामुळे 'तिच्यायला एवढ्या थंडीत नदीच्या गार पाण्यात कोण फुक्कटची अंघोळ करतो?' असा विचार करून दुर्वास आणि मंडळी नुसतीच एक चक्कर मारून पांडवांच्या कुटीत परतली! :)

एव्हाना द्रौपदीने भीमाला झोपेतून उठवला होता. भर मध्यरात्री झोपमोड झाल्याने भीम चांगलाच भडकला होता. तेवढ्यात दुर्वास आणि त्याचा कंपू तिथे पोहोचले. दुर्वासाला पाहताच भीमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने दुर्वासाला चांगलेच सुनावले! तो म्हणाला,

"हा दाढीदिक्षितांचा मेळावा आत्ता इथे कुठे? काय रे दुर्वासा, तुला काही रीतभात आहे की नाही? :) मध्यरात्री दारं ठोठावून, लोकांची झोपमोड करून खुशाल जेवायला मागतोस? देऊ का चांगला धम्मक लाडू?" :)

"तुझे सर्व शिष्य तर आधीच पळाले आहेत. आता काही जेवायला बिवायला मिळणार नाही. तुझ्यावर दया करतो आणि तुला आमच्या कुटीत झोपायला जागा देतो आहे हे नशीब समज! बाहेर गेलास तर जंगली श्वापदं तुला फाडून खातील! चल झोप आता मुकाट्याने.."

भीमाने असा हाग्या दम दिला आणि दुर्वास चुपचाप झोपला! :))

तर मंडळी, अशी ही द्रौपदीची कथा! अर्थात, चि विं च्या कल्पनेतली! आता चि वि हे मराठीतले थोर विनोदी लेखक. खुद्द त्यांनीच असं लिहून माझ्यासारख्या होतकरू लेखकांना जणू काही लायसनच दिले आहे. माकडाच्या हातात कोलीतच म्हणा ना! :))

चि विं ची वरील कथा वाचून मलाही एक लहानशी कथा सुचली ती इथे लिहून समारोप करतो -

असे असावे -

व्यास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी! सगळ्यांनी फुक्कटचा लाडावून ठेवलेला. स्वतःला मारे गुरूबिरू म्हणवून घ्यायची याला दांडगी हौस! :)

पण मंडळी झालं असं, की बुद्धीची देवता, १४ विद्या ६४ कलांचा अधिपती वगैरे गुणांनी संपन्न असा गणपती तेव्हा बराच फेमस होता! व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता. च्यामारी व्यासाला कुणीच विचारेना. नाही, तसा व्यासही तपस्वी वगैरे होता आणि त्याने तपस्या वगैरे करून थोडेफार नालीजही प्राप्त केले होते! :)

तर मंडळी, या व्यासाचा एक हुशार शिष्य होता. त्या शिष्याने गीता नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. व्यासाने आपल्या गुरुपदाचा फायदा घेतला आणि त्या अज्ञात शिष्याची मुस्कटदाबी केली आणि आपणच हा ग्रंथ लिहिला असं सगळीकडे सागत सुटला! :)

तरीही गणपतीची पॉप्युलॅरिटी काही केल्या कमी होईना! गणपती, त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्याकडचं असलेलं एकमेवाद्वितीय असं बुद्धीचातुर्य, हे सगळं व्यासाला हळूहळू असह्य होऊ लागलं, आणि हा गणपती जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी व्यासाच्या डोळ्यात खुपू लागला. व्यास गणपतीचा मनोमन तिरस्कार करू लागला! :)

आणि या तिरस्कारातूनच, अहंकारातूनच, मूळात ढापलेल्या गीता या ग्रंथाबद्दल 'मी सांगितले आणि गणपतीने लिहिले' अशी एक जबरदस्त अफवा हा व्यास जिथे तिथे पसरवू लागला आणि मार्केट मध्ये 'बघा, मी किती हुशार! हा गणपती माझा साधा कारकून आहे!' अश्या बाता मारत फिरू लागला! :)

लोकांनी अर्थातच खरंखोटं काय हे गणपतीला विचारलं! गणपती मिश्किलपणे मनाशीच हसला आणि त्याने 'जाऊ दे, उगाच चारचौघात बिचार्‍या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला आणि 'गणपती व्यासांचा लेखनिक होता' ही व्यासांनी पिकवलेली कंडी जनमानसात अगदी आजपर्यंत खरी मानली गेली! :)

पुढे केव्हातरी गणपतीने व्यासाला खाजगीत भेटायला बोलावून व त्याच्या कानाखाली दोन सणसणीत आवाज काढून, 'यावेळेस सांभाळून घेतलं आहे, पण पुन्हा माझ्याबद्दल अश्या कुठल्याही थापा मारल्यास तर सोंडेनी उचलून फेकून देईन. चल, चालता हो आता!' असा सज्जड दम भरला! :)

असो!!

आपलाच,
(गणेशभक्त!) तात्या.

वाङ्मयमौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

25 Sep 2007 - 2:08 am | सर्किट (not verified)

तात्या,

असेच "असायला हवे होते" हे शीर्षक दिले म्हणून बरे झाले. कारण आणखी हजार-दोन-हजार वर्षांनी तेव्हाच्या इतिहास संशोधकांनी "हे असेच होते" म्हणून खुश्शाल ठोकून दिले असते. आत्ताचे इतिहास संशोधक जसे कुठल्यातरी शिलालेखावरून सांगतात ना, तसेच. (त्यांना काय माहिती बिचार्‍यांना, की हजार वर्षांनी लोकांनी गंडावे म्हणून कुणीतरी तो शिलालेखाचा प्र्याक्टिकल जोक केला आहे !)

- (वर्तमान संशोधक) सर्किट

प्रियाली's picture

25 Sep 2007 - 6:58 am | प्रियाली

कोणी काही म्हणो -

>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं.

मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही.

आता तुमच्या व्यासाच्या गोष्टीत

>>समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.

हाहाहा!!! हे वाक्य जरा भारीच आहे.

शेवटची सही (व्यासद्वेष्टा गणेशभक्त) तात्या अशीच असायला हवी होती.

सर्व सदस्य लेख मजेत घेतील अशी आशा करू. एखाद्याला नको नको ते प्रश्न पडले तर उपक्रमावरील ॥जय गणेश॥ चर्चेत धाडून द्या. ;-)

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 12:00 pm | विसोबा खेचर

>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं.
>>मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही.

हीहाहाहाहा ..:)

आपला,
(एकशिंगी राक्षस) तात्या.

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 9:28 am | विसोबा खेचर

>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं.

मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही.

कोण हो माणसं? मराठी संस्थळांवर अशी काही माणसं आहेत का? आणि त्यांचा आपल्याला असा काही अनुभव आला आहे का हो प्रियालीताई? :)

चला! उशीर होतो आहे. निघतो आता! हरिनाम सप्ताहाला जायचं आहे! :)

तात्या.

प्रियाली's picture

23 Mar 2008 - 7:52 pm | प्रियाली

ऑं! हा प्रश्न काल विचारून गेलात काय?

कोण हो माणसं? मराठी संस्थळांवर अशी काही माणसं आहेत का? आणि त्यांचा आपल्याला असा काही अनुभव आला आहे का हो प्रियालीताई? :)

काय तात्या!!! ट्यूब इतक्या दिवसांनी पेटली की का काय? :))))))))))))))

असो, "तो मी नव्हेच" असं चटकन म्हणून टाका आणि माझा रोख इतर कोणावर जात असेल ते कोण याची कल्पना करा.

(चतुर) प्रियाली.

नितिन थत्ते's picture

14 Apr 2009 - 11:31 am | नितिन थत्ते

हल्ली तसली माणसं शाप द्यायच्या ऐवजी 'फोकलिच्यांनो, बघीन बघीन नाहीतर ........' असं काहीसं सारखं बोलतात. :D
(ह. घ्यालच).

खराटा
(रंग माझा वेगळा)

धनंजय's picture

25 Sep 2007 - 2:48 am | धनंजय

>समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
> च्यामारी व्यासाला कुणीच विचारेना.

याला (म्हणजे दुसर्‍या वाक्याला) 'पुरावा' आहे. व्यासाकडे तीन बायका बळेच पाठवल्या. (वेगवेगळ्या दिवशी एक-एक करून - तीन्ही एकाच दिवशी नाही.) एकीने गच्च डोळे बंद केले. दुसरी घाबरून पांढरी फटक पडली. आणि तिसरी गरीब बिचारी मोलकरीण होती, तिला सगळे काही सोसायची सवय होती, हीदेखील पिडा तिने सोसली.

आता हा तपशील व्यासांनीच स्वतःबद्दल लिहिला की लेखनिकानी घुसडला ते तुमचे तुम्ही बघा.

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 12:02 pm | विसोबा खेचर

>> तिसरी गरीब बिचारी मोलकरीण होती, तिला सगळे काही सोसायची सवय होती, हीदेखील पिडा तिने सोसली.

खरं आहे! मला बिचार्‍या त्या गरीब मोलकरणीची दया येते. आठ आठ दिवस अंघोळ न केलेल्या व्यासाशी संग करायचा म्हणजे पिडाच नव्हे तर मरण यातनाच म्हणायच्या त्या! :)

आपला,
(विदूर) तात्या.

व्यंकट's picture

25 Sep 2007 - 2:59 am | व्यंकट

व्यासांनी तरी सुद्धा आपल्या जन्माची (ती )कथा लपवली नाहीये बर का :)

सहज's picture

25 Sep 2007 - 6:55 am | सहज

मजा आली वाचायला.

आमच्या बातमीदाराकडूनः-

असापण एक सीन डोळ्यासमोरून गेला की गणपतीमहाराज तृप्त भोजन करून आवडते स्त्री सोबत आवडते पेयपान करत असताना दूरचित्रवाणीवर कूठल्याश्या एका वाहीनीवर एका कार्यक्रमात व्यासमूनी मात्र गणपतीमहाराजांवर खोटेनाटे आरोप करत होता व त्या सभागृहातील काही बापेलोक ( फारतर एखादी पोरीबाळी, सगळ्या नाही बर का!) फिदीफिदी हसत होते. मग मात्र गणपतीच्या तळपायाची आग सोंडतच घूसली. ठरवले आता मात्र ह्या व्यासाची *** टाईट करायची!

*** साठी समर्पक शब्द सूचवा. इफ आय नो गणपती वेल "लंगोटी" कूड बी वन ऑफ द ऑप्शनस

##आमच्या बातमीदाराचा व्यास कॉर्प, व्यास इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, महाभारत इंटरनॅशनल ह्या कोणाशीही कूठलाही हितसंबध नाही.

टग्या's picture

25 Sep 2007 - 7:35 am | टग्या (not verified)

'इफ आय नो गणपती वेल...' आवडले! :))

सर्किट's picture

25 Sep 2007 - 11:04 am | सर्किट (not verified)

इफ आय नो गणपती वेल "लंगोटी" कूड बी वन ऑफ द ऑप्शनस

इफ आय नो व्यास वेल, असे हवे ;-) असे आम्हाला वाटते..

- कृष्णद्वैपायन सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2007 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या
खरंच वाचायला मजा आली.

<< व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
हा हा हा :)

एकविसाव्य शतकातील दैवविषयक विचारासाठी संशोधकाला खरेच फार मोलाची माहिती आहे ! ;)

<< उगाच चारचौघात बिचार्‍या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला आणि 'गणपती व्यासांचा लेखनिक होता' ही व्यासांनी पिकवलेली कंडी जनमानसात अगदी आजपर्यंत खरी मानली गेली! :)

:)) व्यासांचा आय.पी. एड्रेस शोधून ते लेखन कोणाचे हे ठरवता आले असते !

बाकी तात्या,
ऋषी मुनींच्या आणि त्या व्यासांच्या (ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणा-यांच्या नव्हे )मागे लागून फार दुष्मन्या ओढवून घेता तुम्ही ! तुमच्याबद्दल लिहून लिहून त्यांच्या वह्या गच्च भरुन गेल्या असतील अन व्यास तर तुमच्या नावानं एक स्वतंत्र नोंद, खातेवहीत करत असेल ! तुम्हाला नडणारी /लढणारी माणसं म्हणजे त्याचाच परिणाम हे लक्षात कसं येत नाही तुमच्या ! ;)

आणखी कथा येऊ दे ! आठवून आठवून लिहा ! तब्येत खूष होते अशा लेखनाने. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 12:10 pm | विसोबा खेचर

>>:)) व्यासांचा आय.पी. एड्रेस शोधून ते लेखन कोणाचे हे ठरवता आले असते !

बिरुटेसाहेब, ते सर्किटचं काम आहे आणि त्यालाच ते जमतं! तेव्हा व्यासाचा आय पी पत्ता शोधण्याचे काम तुम्ही सर्कीटलाच सांगा! :)

तात्या

सर्किट's picture

25 Sep 2007 - 12:26 pm | सर्किट (not verified)

त्या प्रकरणात आमचे देवबाप्पा आमच्यावर रुसलेत. आता नको रे बाबा !

- (डाकिया) सर्किट गोरे

प्रमोद देव's picture

25 Sep 2007 - 12:59 pm | प्रमोद देव

त्या प्रकरणात आमचे देवबाप्पा आमच्यावर रुसलेत.
मी कशाला रुसू? इथे येणारी सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात बाप माणसे आहेत.आणि ती अशी एखाद्या विषयावरून वाद-विवाद करता करता शत्रुत्वाच्या पातळीवर पोचणार असतील तर आमच्यासारख्या सामान्यांचे काय होणार ह्या काळजीने चलबिचल होते इतकेच. वादे वादे जायते तत्वबोध: !असे म्हणता म्हणता वादे वादे जायते विषयांतर: ! आणि त्याही पुढे जाऊन मुष्टीप्रहार:(शाब्दिक) असे जर असेल तर मग काळजी वाटणारच! ती काळजी व्यक्त करण्याचा आम्ही एक केविलवाणा प्रयत्न करून पाहिला इतकेच. पण दोन्ही बाजू आपापल्या जागी ठाम आहेत हे पाहून आम्ही आपले सुरक्षितपणे पतली गली मधून पसार झालो.

रुसलो मात्र कुणावरही नाही.कारण जूने जाऊ द्या मरणा लागूनी असे केशवसुत(बरोबर ना) म्हणून गेलेत. रोजच नवनवीन काही तरी घडत असते तेव्हा हे भूतकाळाचे ओझे उगाच कशाला बाळगा. तेव्हा हल्लीच्या भाषेत "अपडेट" राहणे प्रशस्त वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2007 - 11:25 am | प्रकाश घाटपांडे

अनिल अवचटांच्या 'धार्मिक' या पुस्तकात एक किस्सा आहे. महर्षी विनोद हे गुरुपौर्णिमेला स्टेज वर एक प्रयोग करित असत. त्यात एक तांब्याची तार असे ती अँटेना म्हणून काम करत असे. त्याद्वारे यांचे गुरु म्हणजे व्यास हे त्या अँटेनाद्वारे यांच्या शरिरात प्रवेश करित असत. एकदा असाच अंगात व्यासांचा संचार होण्याला वेळ लागत होता. अर्थातच प्रेक्षक वेठीस धरले होते. वैतागुन एक महाविद्यालयीन युवक म्हणाला 'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास"

प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

25 Sep 2007 - 11:28 am | सर्किट (not verified)

किसोबा नेचर हे होते का ?

- सर्किट

प्रमोद देव's picture

25 Sep 2007 - 11:30 am | प्रमोद देव

'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास"
हे बाकी खास!

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 12:11 pm | विसोबा खेचर

>>'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास"
>>हे बाकी खास!

हेच म्हणतो! :)

प्रमोद देव's picture

25 Sep 2007 - 12:04 pm | प्रमोद देव

आपल्या इथे गणपतीला विवाहित समजतात. त्या उलट दक्षिण भारतात त्याला ब्रह्मचारी समजतात. हे काय गौडबंगाल आहे?
आपल्या इथे कार्तिकस्वामीला ब्रह्मचारी समजतात आणि दक्षिणेत तो चक्क विवाहित मानला जातो. आता बोला!

सर्किट's picture

25 Sep 2007 - 12:12 pm | सर्किट (not verified)

इथे ठाण्यात अविवाहीत समजतात. आपण बंगलोर वगैरे ठिकाणि जाऊन आला आहात. तिथे त्याला विवाहीत समजतात की काय ?

हघ्याहेसांनल.

- सर्किट

सर्किट's picture

25 Sep 2007 - 12:21 pm | सर्किट (not verified)

अटलबिहारी बाजपेयींच्याच शब्दात "मै अविवाहित हूं, ब्रम्हचारी नही !"
भारत का नेता कैसा हो ? अटलबिहारी जैसा हो !
अब की बारी अटल बिहारी !!!

- सर्किट बाजपेयी

सहज's picture

25 Sep 2007 - 12:17 pm | सहज

हेच कि दिसत तस नसत :-)

ह्या गावात नाही म्हणजे त्या गावात पण नाही असे थोडेच असते

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2007 - 12:19 pm | प्रकाश घाटपांडे

<<त्या उलट दक्षिण भारतात त्याला ब्रह्मचारी समजतात. हे काय गौडबंगाल आहे?>>

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख कुणी ब्रह्मचारी असा केला कि ते " मी फक्त अविवाहित आहे' अशी दुरुस्ती करीत असतं.

प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

25 Sep 2007 - 12:22 pm | सर्किट (not verified)

काय काका ! अगदी जमलय बघा ! वरती माझा प्रतिसाद बघा !!

- सर्किट घाटपांडे

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2007 - 1:05 pm | प्रकाश घाटपांडे

असं म्हणताना वाजपेयींच्या चेहर्‍यावर एक मिष्कील हास्य असे.
प्रकाश घाटपांडे

देवदत्त's picture

10 Oct 2007 - 8:05 pm | देवदत्त

अहो.. गणपतीने दक्षिण भारतात सांगितले नसेल की विवाहित आहे म्हणून आणि कार्तिकस्वामींनी इथे सांगितले नसेल की ते विवाहित आहेत म्हणून. ;)
आता आपल्यालाही सांगितलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवावा लागेल. प्रत्यक्षात कोण भेटले आहे त्यांना(किंवा त्यांच्या बायकांना) ?

मनिष's picture

25 Sep 2007 - 11:45 pm | मनिष

चि. वि. जोशींचे "ओसाडवाडीचे देव" असे एक भन्नाट पुस्तक होते. त्यात हे देव वगैरे क्रिकेट खेळतात. :)

चित्तरंजन भट's picture

10 Oct 2007 - 6:11 pm | चित्तरंजन भट

भन्नाट!!!!

विश्वजीत's picture

10 Oct 2007 - 7:51 pm | विश्वजीत

किमान अठ्ठावन वर्षाचा माणूस असेल असे वाटत होते पण तो अडतीस वर्षांचा आहे असे कळते. मग असे ज्येष्ठतेचे बेअरिंग का बरे घेतले असावे?
असो. चर्चा आवडली.

(बुचकळ्यात पडलेला) विश्वजीत

विसोबा खेचर's picture

12 Oct 2007 - 4:19 pm | विसोबा खेचर

किमान अठ्ठावन वर्षाचा माणूस असेल असे वाटत होते पण तो अडतीस वर्षांचा आहे असे कळते. मग असे ज्येष्ठतेचे बेअरिंग का बरे घेतले असावे?

अरे ३८ म्हणजे खूप वर्ष झाली. मला हे टोपणनाव तर त्याही आधीपासून पडलेले आहे. मी 'तात्या' म्हणूनच जन्माला आलो म्हणेनास..:)

असो..

तात्या.

जुना अभिजित's picture

11 Oct 2007 - 5:53 pm | जुना अभिजित

हसून हसून मुरकुंडी वळली. मिसळपाववर आल्यापासून(=मिसळपाव सुरु झाल्यपासून) असा लेख वाचला नव्हता. च्यायला आजूबाजूचे सहकर्मचारी बघाया लागलेत..

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Mar 2008 - 11:29 am | डॉ.प्रसाद दाढे

तात्या, तुम्ही दिलेले अवतरण 'वायफळाचा मळा' (कॉ॑टिनेन्टल प्रकाशन) ह्या पुस्तकातील आहे. त्यातील इतर लेखही (विशेषतः ऋतु॑वरील विनोदी लेख) मस्त आहेत. एक॑दरीत चि.वि. लिहायचेच लई भारी! मी ऑर्कुटवर चि.वि. जोशी या॑ची कम्युनिटी स्थापन केली आहे, त्या॑चे चाहते आस्वाद घेऊ शकतात.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=16432055

विसोबा खेचर's picture

24 Mar 2008 - 11:44 am | विसोबा खेचर

तात्या, तुम्ही दिलेले अवतरण 'वायफळाचा मळा' (कॉ॑टिनेन्टल प्रकाशन) ह्या पुस्तकातील आहे.

येस्स! अगदी बरोब्बर. मी 'वायफळाचा मळा' हे पुस्तकाचे नांवच विसरून गेलो होतो. छोटेखानी, परंतु फारच छान पुस्तक होते ते!

द्रौपदीच्या थाळीची कथा चिविंनी त्यातच लिहिली आहे! :)

आपला,
(वायफळाचा मळाप्रेमी) तात्या.

झकासराव's picture

24 Mar 2008 - 9:45 pm | झकासराव

चिंतामण विनायक जोशी :)

त्यांच्या नायकाच नाव चिमण हे चुकुन चिंतामणच चिमण झाल अस वाचल मी. चु भु द्या घ्य.

त्यांची ४-२ पुस्तके माझ्या संग्रही आहेत. छान आहेत. :)
वायफळाचा मळा वाचल्य जबरा आहे :)
हा प्रतिसाद जरा अवांतरच झाला नै

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Mar 2008 - 2:33 pm | डॉ.प्रसाद दाढे

त्यानी पहिला विनोदी लेख लिहिला तो ' टीकाकार आणि न्हावी' कॉलेजच्या हस्तलिखित मासिकासाठी, त्यात शेवटी बाबुराव न्हावी म्हणतो, 'हे पाहा चिमणराव.. ' हे त्या॑नी 'चि॑तामणराव' असेच लिहिले होते पण 'प्रि॑टी॑ग मिष्टेक' झाल्यामुळे चिमणराव झाले. हेच ना॑व कायम ठेवण्याबाबत त्या॑चे मेव्हणे प्रा.वा.गो.काळे आग्रही राहिले व पुढे ते ना॑व मराठी साहित्यात अजरामर झाले

आपल्या इथे गणपतीला विवाहित समजतात आणि कार्तिकस्वामीला ब्रह्मचारी . त्या उलट दक्षिण भारतात त्याला गणपतीला ब्रह्मचारी समजतात तर कार्तिकस्वामीला दक्षिणेत विवाहित मानला जातो.
र्धम प्रसार करताना ऐका माणसाने - गणपती कार्तिकस्वामी आणि दोन देव्या अश्या पाच मुर्ति एकाच पोत्यात भरुन हिमालयातून दक्षिण भारतात आणल्या पण स्थापना करताना जरा ( लांबचा प्रवास करुना आल्याने थकून गेला होता.....जरा विस्मरणही .......पर्यायाने) अदला बदल झाली ................आणि पुढे तिच प्रथा पडली.....ही.......साठा ऊत्तराची कहाणी पाचा ऊत्तरी सुफळ संपुर्ण ..................

गणपती व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
सांभाळुन व्यास सात चिरंजीवात आहेत म्हणे .(.......मग अजूनही भेट्तील)
खरं तर वाचायला मजा नाही मज्जा आली.

बाकी इतिहास संशोधक हाच ऐक संशोधनाचा विषय आहे !

baba's picture

14 Apr 2009 - 5:11 am | baba

तात्या,
चि विं च्या कल्पनेतली कथा लय भारी अन तुम्ही लिवलेली तर त्याहून भारी...

"व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता "
:) :)

"गणपती मिश्किलपणे मनाशीच हसला आणि त्याने 'जाऊ दे, उगाच चारचौघात बिचार्‍या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला.."
बाप्पा पयल्यापासूनच लय उदार...

"पुढे केव्हातरी गणपतीने व्यासाला खाजगीत भेटायला बोलावून व त्याच्या कानाखाली दोन सणसणीत आवाज काढून, 'यावेळेस सांभाळून घेतलं आहे, पण पुन्हा माझ्याबद्दल अश्या कुठल्याही थापा मारल्यास तर सोंडेनी उचलून फेकून देईन. चल, चालता हो आता!' असा सज्जड दम भरला!"
ये हुयी ना बात....

अजय भागवत's picture

14 Apr 2009 - 7:04 am | अजय भागवत

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2009 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

गीता का महाभारत ?
नक्की कुठला ग्रंथ लिहिला व्यासांसाठी गणपतीबप्पाने ?

शंकासुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य