कंट्रोल....

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
25 Feb 2010 - 8:30 pm

( साधारण सव्वासात-साडेसातच्या दरम्यान मीनल व महेश घरी येत असत. बहुतेक वेगवेगळे क्वचित ठरवून स्टेशनवर भेटलेच तर बरोबर. मीनलचे भाजीपाला-खाऊ, गरजेच्या गोष्टी खरेदीत महेश वैतागत असे त्यामुळे शक्यतो ही सारी कामे मीनल एकटीच करी. आजही नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मीनल पाळणाघरात गेली. चार वर्षाची मधुरा आईची वाट पाहतच होती. रिक्शातून उतरून मीनलने तिला हात केला तशी मावशींना टाटा करून मधुरा तिची छोटीशी बॅग घेऊन खाली आली व मीनलला मिठी मारून बसली. दिवसभराच्या अनेक गोष्टी आईला सांगायच्या असल्याने मधुराने चिवचिवाट सुरू केला. मायलेकी दहा मिनिटात घरी पोचल्या. भाजी -खाऊची पिशवी, मधुराची बॅग व आपली पर्स सांभाळत मीनलने दार उघडले. महेश अजून घरी पोचला नव्हता. नेहमीप्रमाणे मीनलची नजर हॉलमधल्या घड्याळाकडे गेली. सात-वीस झाले होते. येईलच आता महेश, तोवर हातपाय धुऊन चहा ठेवावा असा विचार करत मीनलने आवरायला सुरवात केली. एकीकडे मधुराची गोड बडबड सुखावत होतीच. दिवसभराचा सगळा शीण लेकीला नुसते पाहिले तरी पळून जातो. लाघवी आहे पोर. लेकीशी गप्पा करत एकीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू करते..... )

मीनल : मधुरा, अग खिडकीतून पाहा गं बाबा दिसतो का?
मधुरा : ( डोकावून पाहते.... पुन्हा आईकडे पाहते.... पुन्हा पुन्हा जास्ती डोकावण्याचा प्रयत्न करते... पण बाबा दिसत नाही. ) नाही गं ममा, आपला बाबा दिसत नाही अन स्कूटरही नाहीये खाली.
मीनल : ( स्वतःशीच बडबडते.... आठ वाजत आले, अजून कसा आला नाही हा. एखादी गाडी मागेपुढे म्हटले तरी येव्हाना यायला हवा होता. कोणीतरी भेटले असेल नाहीतर वाटेत. एकदा का गप्पा सुरू झाल्या की स्वारी रमते तिथेच. चला तोवर मधुराला वरणभात भरवावा. पोर भुकेजली असेल. आज डबाही पूर्ण संपलेला नाहीये. ) मधुरा, का गं माऊ आज डबा आवडला नाही का? अर्धाच खाल्लास.
मधुरा : ममा, अग आज ना मावशीने सगळ्यांना पुरणाची पोळी दिली मग मी नाही संपवला डबा. मला पुरणाची पोळी आवडते. तू करशील ममा?
मीनल : हो करीन हं..... ( मधुराने लागलीच तिच्याकडे प्रॉमिस मागितले. तशी टपलीत मारत ..... ) हे बघ पक्के प्रॉमिस. बरं चला आता वरणभात खायचा ना?

( मधुराला भरवताना सारखे लक्ष घड्याळाकडे... साडेआठ वाजलेत.... अजून कसा नाही आला महेश? सेल ट्राय करते. पण महेश घेत नाही. पुन्हा ट्राय करते.... आता नॉट रिचेबल. वैतागाने सेल आपटते. )

मधुरा : ममा, बाबू कुठेय? काल म्हणाला होता उद्या उनो खेळूया. आणि अजून आला नाही. आता म्हणेल, मधुराणी अग दमलो गं बाई. आज नको ना शोन्या उद्या खेळू, गॉड प्रॉमिस. दररोज मला प्रॉमिस करतो आणि खेळतच नाही. तुझा सेल दे ना मी बाबूला फोन करते. ( फोन लावते पण लागत नाही. पुन्हा लावते..... ) हा बाबा असा काय करतो गं, घेतच नाही. ( हिरमुसली होते )
मीनल : अग, आज नक्की खेळेल बघ. तू आटप बरं. घास तोंडात ठेवून बोलू नये म्हणून कितीवेळा तुला सांगितलंय. मग गाल चावला जातो... रक्त येतं आणि मोठ्याने रडू कोणाला येतं? आणि तो सेल दे इकडे. पुन्हा लावते हं मी.
मधुरा : ( खुदकन हसत ) मधुराला, मधूराणीला रडू येतं....... ममा आता जेवण पुरे. मला बाबू हवाय. आत्ताच्या आत्ता हवा. ( हळूहळू रडायच्या बेताला येते )
मीनल : अग आता जेवून रडायला सुरवात करू नकोस हं मधुरा, ओकशील. मी मुळीच पुसणार नाही. आधीच माझं मन थाऱ्यावर नाहीये. ( स्वयंपाक घरात जात जात, पुन्हा घड्याळाकडे पाहते... ..बापरे नऊ वाजून गेले. उशीर होणार आहे तर फोन नाही का करायचा. सेलही घेत नाहीये. तरी त्याला माहीत आहे न सांगता उशीर झाला की माझ्या जिवाची नुसती घालमेल होते. पण त्याला काय फरक पडतोय. आता आला की काहीतरी कारणे सांगेल. ये रे लवकर. मधुराही रडायच्या बेतात आहे अगदी. )

पावणेदहा होतात, मधुरा पेंगायला लागते.... सारखी कोणाची तरी स्कूटर बिल्डींग मध्ये येते की लागलीच मीनल खिडकीतून वाकून पाहते..... आला वाटतं.... दुसरंच कोणीतरी असते. हिरमुसली होतं मधुराला थोपटत पुन्हा पुन्हा सेल ट्राय करते.

मीनल : आज महेश आला की बिलकूल चिडायचं नाही. त्याने कळवायला हवे होते हे खरेयं पण जाऊ दे. आता सकाळपासून तोही बाहेर आहे, दमला असेल. कदाचित काहीतरी तसेच महत्त्वाचे कारण असेल. आणि अगदी मित्राबरोबर गेलाय म्हणून उशीर झाला तरीही आत्ता रागवायचे नाही. भांडायचे नाही. एकदाचा लवकर येऊ दे झालं.
आई कधी कधी बाबांना असा उशीर झाला तर कडीला चमचा, पळी असे अडकवत असे, ते आठवून मीनलही कडीला पळी अडकवते. मधुरा गाढ झोपी जाते. तिला उचलून बेडवर ठेवून फॅन लावून मीनल हॉलमध्ये येते पुन्हा नजर घड्याळाकडे वळते, बापरे सव्वादहा झाले.... सेल ट्राय करते.... तोच बेल वाजते. आला वाटते. मीनलची काळजी एकदम संपते. हुश्श...... सुस्कारा टाकते. अन ती पटकन दार उघडते.

महेश : (हसतो... सेलची बेल वाजते... पाहतो तर मीनलचाच कॉल.... बंद करतो. ) काय राणीसाहेब, आता मी आख्खा समोर असताना सेलवर कशाला बोलायचेय तुला? आणि इतकी शांतता.... मधुराणी कुठेय आमची? मधुरे अगं मधुरे.... बाबू आलाय बघ. चला चला आज उनो खेळायचा ना? ( ही सगळी वाक्ये भराभर बोलतो.... मीनलचा स्फोट होऊ नये म्हणून प्रयत्न करतो........ पण, )
मीनल : ( कंट्रोल... मीनल कंट्रोल ) मिळाला का वेळ घरी यायला? बरेच वाजलेत नाही. मधुरा झोपली अरे. बाबूची वाट पाहून रडून झोपली. सेलची बॅटरी आहे ना ..... नाही म्हणजे एखादा कॉल करायचा ना? किंवा आम्ही केला तर घ्यायचा... मला उशीर होणार आहे असे बोलून आपटून टाकायचा.... ( पारा हळूहळू चढत चाललाय.... महेश एकदम चूप, गरीब चेहरा करून तिच्याकडे पाहतोय. ) पण मित्र भेटले असतील, मग काय कोण बायको आणि पोर तर काय लहानच आहे.... आता हा असा गरीबासारखा कशाला उभा राहिला आहेस? सगळी नाटक मेली. चला आता जेवा म्हणजे मला किचन बंद करायला... उद्या पुन्हा सहाला उठायचेयं.
( महेश नुसतीच मान डोलावतो व कपडे बदलायला जातो. तोवर मीनल पानं घेते.... मायक्रोमध्ये भाजी, आमटी गरम करते तोवर महेश येऊन पानावर बसतो. ताण हलका करावा म्हणून ..... )
महेश : मग मायलेकीनि मिळून मज्जा केली ना? कार्टून्स मधुराने पाहिले की नाही आज?
मीनल : ( मज्जा... हा शब्द ऐकताच तिचा कंट्रोल संपतो व ती सटकते. ) मज्जा ना हो तर खूप मज्जा केली. आलटून पालटून खिडकीतून डोकावलो, सारखा सेल लावला...... बाबू हवा म्हणून मधुरा रडली आणि शेवटी दमून झोपली. नुसती तुझी वाट पाहिली.... मज्जाच मज्जा.
महेश : ( दुर्लक्ष करीत ... ̮मूड लाइटच ठेवत ) आज काय अगदी आईसारखी पळीही अडकवलीस तू कडीला. मग काय पळी अडकवल्यापासून कधी आलो मी? ( तू पण ना gr8 आहेस अशा खुणा करतो. )
मीनल : ( संतापते ) एकतर तू इतक्या उशिरा आलास, तोही न सांगता.... साधा एक मिनिटाचा कॉलही करावासा वाटला नाही तुला. वर माझ्या भावनांची टिंगल करतोस? अजूनही तू का उशीर झाला हेही सांगितले नाहीस. हं, सांगणारच काय म्हणा.... मित्राबरोबर चकाट्या पिटत बसला असशील. ना वेळेची शुद्ध ना बायको-पोरीचा विचार. मला अजिबात चालणार नाही हे असे वागणे.... पुन्हा जर तू असे केलेस ना...
महेश : ( तिला अर्ध्यातच तोडत.... रागाने ) तर काय... नाही सांग ना तर काय करशील गं तू? मी काय मुद्दाम उशीर केलाय का? अर्जंट काम आलं. ते करून निघालो. स्टेशनवर आलो तर समोरच सम्या व अजित भेटले. मग काय थोडावेळ गप्पा करून निघू म्हणता म्हणता वेळ कुठे गेला कळलेच नाही. त्या हॉटेलच्या बेसमेंट मध्ये रेंजच नव्हती येत. मग कसा तुला कळवणार? नाही म्हणजे मी कळवायला हवे होते पण..... समजा एखादा दिवस नाही कळविले तर एवढे घर डोक्यावर कशाला घ्यायला हवे. एक तर मरमर ऑफिसमध्ये काम करा, पॉलिटिक्सला तोंड द्या आणि घरी येऊन काय तर ही मुक्ताफळे ऐका..... ( अन्नाला नमस्कार करतो आणि तसाच न जेवता उठतो. )
मीनल : महेश, अरे महेश..... हे असे भरल्या ताटावरून कशाला उठला आहेस? (एकीकडे संताप तर एकीकडे कंट्रोल न राहिल्याचे दुःख, लागलेली भयंकर भूक अन त्यात भर हा न जेवताच उठल्याने मीनलचा तोल सुटतो. ती रडायलाच लागते. ) असे करू नको रे महेश, ये ना जेवायला.
महेश : मला नाही जेवायचे. पोट भरलेय माझे तुझी मुक्ताफळे ऐकून. झोपतो मी आता. ( दार लावून टाकतो. )
मीनल : हताशपणे हातातला घास तसाच ठेवते. उठते, सगळे आवरून किचन बंद करून बेडरूममध्ये येते. महेशकडे पाहते, तो मधुराला जवळ घेऊन झोपलेला असतो. त्याच्याजवळ जाते, केसांवरून, कपाळावरून हात फिरवते. प्रेमाने गालाचे चुंबन घेते..... त्या स्पर्शाने, प्रेमाने, आर्जवाने महेश कधीचाच विरघळलेला असतो... तो पटकन वळतो. मीनलला कुशीत घेतो. )
महेश : मीनल, सॉरी गं. अगं रस्ताभर घोकत होतो.... चूक माझी आहे. मी कळवायला हवे होते. पण एकदा का गप्पा सुरू झाल्या ना की भानच राहत नाही गं. तू ओरडलीस तरी आपण ऐकून घ्यायचे अजिबात चिडायचे नाही असे मी ठरवून आलो होतो पण.... काय झाले कोण जाणे तू चिडलीस अन मीही सटकलो मग. मनापासून सॉरी म्हणतो... पुन्हा किमान पंधरा दिवस तरी असे नक्की वागणार नाही...... बरं बरं महिनाभर नाही वागणार. आता राग सोड आणि हास पाहू. ए मीनल, एक रिक्वेस्ट..... प्लीज, पटकन फ्लॉवरचा रस्सा गरम करायला घे ना, तोवर मी पाने घेतो.... अग आग लागलीये पोटात.
मीनल : महेश, अरे मीही सारखी स्वतःला बजावत होते रे.... तू आलास की चिडायचे नाही. तू येईतो इतकी काळजी वाटत होती ना मला.... अन तू दरवाज्यात दिसताच काळजी संपून तिची जागा संतापाने कधी घेतली ते कळलेच नाही. पण तुझी चूक आहे हं महेश... मी अशी न सांगता एक दिवस अकरा पर्यंत घरी येत नाही म्हणजे तुला कळेल काय काय विचार तेवढ्या वेळात येतात ते.
महेश : ( कोपरापासून हात जोडत ... ) माझे आई, तू रागाव, पाहिजे तर बोचकार पण माझ्यासारखा वेडेपणा नको हं करूस. अग मी तर तासाभरातच अर्धमेला होऊन जाईन. चल आता जेवायला दे गं फार भूक लागलीये.

( दोघेही हसत हसत किचन मध्ये जातात.... अर्धवट झोपेत मधुराणी बडबडते, माझा बाबू आला, माझा बाबू आला..... चला चला उनो खेळायला.)

नाट्यसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

शेखर's picture

26 Feb 2010 - 1:17 am | शेखर

मस्त !!!

शुचि's picture

26 Feb 2010 - 5:39 am | शुचि

मस्त!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अनिल हटेला's picture

26 Feb 2010 - 10:28 pm | अनिल हटेला

मस्तच !!

:)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

रेवती's picture

26 Feb 2010 - 4:50 am | रेवती

भानस, आपली लेखनशैली नेहमीच आवडते.
सर्वधारणपणे सगळ्या घरांमध्ये होणारे प्रसंग, सगळ्यांच्या मनात येणार्‍या भावनांचं चित्रण आपण छान करता.
ही गोष्टंही आवडली पण बायकोवर प्रेम असणारा नवरा मित्रांच्या गराड्यात अडकल्यावर कधितरी घरी फोन करायला विसरतो हे ठिक पण वाचताना असे जाणवते कि ही नेहमीचीच बाब होऊन बसलिये त्यांच्या घरात! ते जरा खटकलं. आपल्यासाठी दुसर्‍याला ताटकळत, काळजी करत ठेवणं हे जोडीदारासाठी त्रासदायक असतं. चांगली गोष्ट एवढीच कि उपाशी झोपत नाहीत.

रेवती

हर्षद आनंदी's picture

26 Feb 2010 - 6:21 am | हर्षद आनंदी

++१

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मदनबाण's picture

26 Feb 2010 - 8:37 am | मदनबाण

सहज-सुंदर लेखन... :)

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

भानस's picture

26 Feb 2010 - 8:57 pm | भानस

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
रेवती, तुम्ही नेमके ओळखलेत. दुर्दैवाने हे चित्र पाहायला मिळते. जाणूनबुजून जोडीदाराला दुखवायचा हेतू नसला तरी आवर्जून कळविले जात नाही. घेईल समजून किंवा त्यात काय कळवायचे असे वाटत असते. काही वेळा निघूच पटकन म्हणतांना वेळेचे भान राहत नाही असेही होते. असो. आभार.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 8:23 am | विसोबा खेचर

क्लास! :)

तात्या.

अस्मी's picture

1 Mar 2010 - 11:39 am | अस्मी

सहीच :)

- मधुमती