खरी कमाई....

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
16 Dec 2009 - 2:42 am

अतिशय साध्या साध्या गोष्टी किती सुख देऊन जातात. अनेकदा त्या करणाऱ्याला त्याचा गंधही नसतो. तो आपला नेहमीच्या रहाटगाडग्यात अगदी नकळत ते करून जात असतो. पण ते दुसरे मन मात्र हा चांगुलपणा टिपत असते. आणि कुठेतरी त्या मनातही या अनपेक्षित मदतीच्या ओघाचा जन्म होतो. त्यातल्या निखळ सुखाची त्याला एकदा का गोडी कळली की आपसूक तोही त्या साखळीचा हिस्सा होऊन जातो. मी याबाबतीत खूपच भाग्यवान. अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, अनोळखीही माझ्या जीवनात अनेकप्रकारे बंध निर्माण करून गेलेत. ही ’ खरी कमाई ’. सहजी केलेली निरपेक्ष गुंतवणूक. या हाताचे त्या हातालाही न कळेल इतक्या निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी आवर्जून केलेला मदतीचा खटाटोप.

मी विसाव्या वर्षीच नोकरीला लागले. कॉमर्सचा शेवटचा पेपर टाकून घरी आले तर कॉल लेटर वाट पाहत होते. दुसऱ्याच दिवशी जॉईन झाले. पाहता पाहता मैत्रिणी-मित्रांचा गोतावळा वाढला. एक मैत्रीण .... खरे तर अगदी जवळची म्हणावी तश्यांत मोडणारी नसली तरी वर्तुळातली. घरी तीन मुले जरा टिपीकल नवरेशाही गाजवणारा नवरा. पहाटे चारापासून ही उठलेली. तरी कामे संपत नसत. आठला नवरा व ती खाली उतरत ऑफिसला जाण्यासाठी. दोन मिनिटे उशीर झाला तरी नवरा थांबत नसे. सरळ स्कूटरला लाथ मारून चालता होई. मग तो संपूर्ण दिवस ही अतिशय उदास असे. मुलेही नवऱ्याने चढवून ठेवलेली होती. या सगळ्या रोजच्या मानसिक ताणतणावातूनही ही माझी थोडीशी लांबच असलेली सखी गुरवारी माझा उपास असतो म्हणून न चुकता मला आवडणारी कच्च्या केळीची भाजी घेऊन येत असे. हा परिपाठ मी किंवा ती रजेवर असलो तरच चुकला असेल. आजही मी जेव्हां जेव्हां ती भाजी करते त्या प्रत्येकवेळी गलबलून येते. इतक्या सातत्याने कोणा तिसऱ्यासाठी प्रेमाने व आवर्जून असे करणे सहज सोपे नसते. त्यासाठी तितकी आपुलकी मनात असावी लागते.

ऑफिसमध्ये डबे पोचवणारे काही जण होते. बहुतांशी त्यांचे बांधलेले गिऱ्हाईक असायचे. एखादे दिवशी आपण डबा आणलेला नसला तर त्यांच्याकडे हमखास आपल्यासाठी डबा मिळेलच अशी मुळीच गॅरंटी नाही. असेच एक नेहमी येणारे. आमच्या सेक्शन मध्ये एकाला रोजचा त्यांचा डबा येई. एकदा असाच माझा उपवास होता. मला सकाळी वेळच मिळाला नव्हता काहीही करायला. सुदैवाने त्यांच्याकडे चक्क त्यादिवशी खिचडीचा एक डबा उरला होता. तो त्यांनी मला दिला. पुढे मी नोकरी सोडेस्तोवर हे गृहस्थ न चुकता गुरवारी माझ्या सेक्शनमध्ये डोकावत..... दारातूनच डबा उंचावून विचारत... हवा का? माझा डबा ( जर मी आणलेला असेल ) मी दाखवला की हसून पुढे जात. सारे दोन क्षणांचे संभाषण. पण न चुकता होणारे. अनेकवेळा लागोपाठ सहा महिनेही मी त्यांच्याकडून एकदाही डबा घेतलेला नाही तरीही हे सहृदयी गृहस्थ मला विचारल्याशिवाय पुढे जात नसत. खरे तर कोण लागत होते मी त्यांची? पण मी उपाशी राहू नये म्हणून अव्याहत केलेली विचारणा.

एका मित्राची आई डोंबिवलीवरून ट्रेनच्या इतक्या मरणाच्या गर्दीतूनही बाटलीभरून टोमॅटोसार पाठवायची. मित्र ओरडायचा, म्हणायचा, " आमच्या म्हातारीवर काय जादू केली आहेस कोण जाणे. न चुकता दर महिन्याकाठी सार देते तुझ्यासाठी, वर दमही देते. माझ्या लेकीला नीट पोचव. खबरदार गर्दीचे निमित्त करून इथेच टाकून गेलास तर." आज ही प्रेमळ माय या जगात नाहीये पण तिचा माझ्या चेहऱ्यावरून फिरलेला हात आणि त्या टोमॅटोच्या साराची चव हृदयात घर करून गेलीये.

अजून एका मित्राचे वडील.... खरे तर आमचा फोनवरच संवाद जास्त. रोजचे न चुकता होणारे संभाषण. अर्थात संभाषणात सगळा वेळ मित्रच. पण त्याच्या बाबांशी एक वेगळेच बंध जुळले. प्रचंड माया करायचे माझ्यावर. दोनतीन दिवस त्यांच्याशी बोलणे नाही झाले तर चौथ्या दिवशी फोन येई. " का गो बाय विसरीलस का? अगो अजून मी जिवंत आहे. जीव लावून बसली आहेस माय. म्हाताऱ्याशी दिसाकाठी चार शब्द बोलत जा." दोन किंवा तीनच वेळा प्रत्यक्ष भेटले असेन मी त्यांना. पण पोत्याने माया केली त्यांनी माझ्यावर. नागपूरला गेले होते कॅरम टुर्नामेंटसाठी. आल्यावर फोन केला, माझा आवाज ऐकताच म्हणाले, " आलं का नागपूर? अग कधीपासून वाट पाहत होतो तुझी. आता जीव थंडावला बघ." हे ऐकले आणि भरून पावले.

दिसामाजी न मोजता येईल इतक्या लोकांशी आपण बोलतो. रोजची कामे, त्यानिमित्ते होणारे संवाद. आमचे ऑफिस म्हणजे तर लोकांचा अखंड राबता. डीलर्स, वकील, अकाँटंट नुसता सावळा गोंधळ. मला डोमिसाईल घ्यायचे होते. बांद्रा कोर्टात जावे लागणार होते. अतिशय निकडीने हवे असल्याने मी व नवरा गेलो. तिथे पोचताच चारी बाजूने हल्ला बोल केल्यासारखे अनेक काळेकोटवाले आमच्यावर तुटून पडले. आता कोणाला काम सोपवावे हा विचार मनात सुरू असतानाच अचानक हाक आली, " जोशी मॅडम, तुम्ही इथे काय काम काढलेत? " वळून पाहिले तर माझ्या सेक्शनला नेमाने येणारे एक वकील होते. " मॅडम आजवर एकदाही तुमची सेवा करू दिली नाहीत निदान आता तरी सांगा कशाला आलात इथे? गरीबाला एकदा तरी मदत करू देत. " संध्याकाळी साडेचार वाजता डोमीसाईल आमच्या हातात होते. वर माझेच आभार मानत होते.

भर पावसाळ्याचे दिवस होते. संततधार लागली होती अगदी, मरे मरत मरत धावत होती. कशीबशी ठाण्याला उतरले. सुदैव जोरावर होते. समोरच एक रिक्षावाला येऊन थांबला, " मॅडम रिक्षा? " मला तर अगदी देवच सापडल्यासारखे झालेले. निघालो. ए के जोशीला रिक्शाने राइट घेतला आणि जरा मिनिटभर अंतर गेले असेल एक जवळपास पूर्णच भिजलेले आजी-आजोबा रिक्शाला हात करताना दिसले. रिक्षा स्टेशनवरूनच भरून येत असल्याने थांबतच नव्हत्या. दोघेही हैराण झालेले. रिक्षावाल्याला थांबवून त्यांना रिक्शात घेतले. कुठे जायचे विचारता कळले की माझ्या घराजवळच राहतात. अर्धा तास झाला रिक्षा शोधत होते. त्यांना घरी सोडून मी पुढे निघाले. ही घटना मी विसरूनही गेले. एक दिवस सकाळी ऑफिसला निघाले तर आजोबा गल्लीत दिसले. मला पाहून प्रफुल्लित चेहऱ्याने पुढे आले, " सापडलीस एकदाची. अग आमची सौ रोज सकाळी मला पिटाळते. विचार कशाला ते? अग, तुला शोधायला. अंधुकसा अंदाज होता तू इथे कुठेतरी राहतेस. मग काय गेले चार दिवस सकाळी आठपासून मी रोज घुटमळतोय इथे. हे घे, खास तुझ्यासाठी आणलीत वेचून ही देवाघरची फुले. " असे म्हणून ओंजळभर प्राजक्ताची टपोरी फुले माझ्या हातावर ठेवली. त्या फुलांचा दरवळ आजही तितकाच ताजा आहे.

हल्लीच मायदेशी आलेले असताना खोपट-ठाण्याहून एस्टीने नाशिकला आईकडे निघालेले. गाडी सुटतानाच उन्हे कलली होती. इगतपुरीला इतके भयंकर धुक्याचे लोट येऊ लागले की अर्ध्या फुटावरचेही दिसेना. ' मानस ' हॉटेल तर संपूर्ण नामशेष झालेले. एस्टीत आम्ही फक्त आठ माणसे. मी एकटीच व एक मुसलमान जोडपे होते, ती दुसरी बाई बाकी सगळे सडेफटिंग. नेमकी एस्टी फेल झाली. काहीतरी मेकॅनिकल फॉल्टच झाला होता. घरचे लग्न असल्याने माझ्या पर्समध्ये दागिने व बरेच पैसेही होते. ड्रायव्हर व कंडक्टर आत्ता गाडी दुरुस्त करून घेऊन येतो म्हणून गेले ते गायबच झाले. इगतपुरीला प्रचंड धुक्यात रात्रीचे साडेनऊ वाजता आम्ही आठ माणसे घाबरून एकमेकांकडे संशयाने पाहत कसेबसे तग धरून बसलो होतो. भीतीने इतके घेरलो होतो की जरासा आवाज झाला तरी दचकत होतो. तेवढ्यात समोरून एक पोऱ्या चहाची किटली व ग्लूकोजची बिस्किटे घेऊन आला. ड्रायव्हरने आम्हा सगळ्यांसाठी गरम गरम चहा व निरोप धाडला होता. अमृततुल्य चहा होता तो. त्या चहामागच्या आपुलकीने आम्हा आठ माणसांना आपलेसे करून टाकले. भीतीची जागा गप्पांनी घेतली. नकळत धीर दिला-घेतला गेला. रात्रीचे १२ वाजता शिंगाडा तलावाशी मला बाबांच्या हाती सोपवूनच ड्रायव्हर कंडक्टर स्टँडवर गेले.

अशी अनेक माणसे आपल्या जीवनाचा हिस्सा बनून जातात. अडीअडचणीला मदतीचे हात पुढे करतात. पाहू गेले तर काही असामान्य मदत त्यांनी केलेली नसते. पण त्याक्षणी ते आपली नड भागवतात. आपुलकीचे बंध बांधले जातात. कधी ते तात्कालिक असतात. तर कधी काळ व अंतराचे बंधनही त्यांच्या प्रेमात खंड पडू देत नाही. अशा सहृदयी मनांची इतकी प्रचंड संख्या आहे की लिहिताना माझे हात थकून जातील. त्यांच्या स्मरणातही मी नसेन पण माझ्यासाठी ते सगळे मौल्यवान आहेत. या साऱ्यांनी माझ्यावर केलेल्या निःस्वार्थ प्रेमामुळेच मीही हा वसा पुढे चालवण्यास प्रवृत्त झाले व प्रयत्नपूर्वक, आवर्जून तो कसा वाढेल याचा शोध घेत राहते. तुम्हालाही असे असंख्य अनपेक्षित चांगले अनुभव आले असतील आणि मला खात्री आहे या आपुलकीच्या-निर्व्याज प्रेमाच्या साखळीच्या नवनवीन कड्या तुम्हीही गुंफत असालच.:)

गुंतवणूकसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अडाणि's picture

16 Dec 2009 - 3:01 am | अडाणि

भग्यवान आहात... तुमचा हेवा वाटतो एवढेच म्हणेन...

-
अफाट जगातील एक अडाणि.

रेवती's picture

16 Dec 2009 - 4:34 am | रेवती

अडाणि यांच्याशी सहमत!
अगदी भाग्यवान आहात तेवढ्याच सहृदय व कृतज्ञही......सगळ्यांची आठवण येते आहे म्हणजे त्या व्यक्तीही भाग्यवान आहेत असंच म्हणायला हवं. नाहीतर आजकाल कोण कुणाला मदत करून गेलं किंवा नाही याचंही भान नसतं. साधी कृतज्ञताही व्यक्त करताना दिसत नाहीत लोक! असं वाटतं की कोरड्या थ्यॅंक्यू व सॉरी यांना खरोखरच काही अर्थ उरलाय का?

रेवती

प्राजु's picture

16 Dec 2009 - 6:02 am | प्राजु

छान लिहिलं आहेस.
अशा माणसांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अतिशय चांगली पद्धत आहे ही. हे लिहूनच व्यक्त होईल. न जाणो ही माणसे जगाच्या पाठीवर कुठे असतील. त्यांच्यापैकी एखाद्याने जरी हा लेख वाचला तरी बरं होईल असं वाटतं.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मदनबाण's picture

16 Dec 2009 - 7:18 am | मदनबाण

अनुभव कथन आवडले...
माणुसकी असणारी माणसं हल्ली दुर्लभ झाली आहेत...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Dec 2009 - 9:58 am | घाशीराम कोतवाल १.२

मस्त अनुभव कथन करणारा लेख
खुप आवडला
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

प्रकाश घाटपांडे's picture

16 Dec 2009 - 10:11 am | प्रकाश घाटपांडे

आपला माणसांकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. संवादातुन आपुलकी दृढ करण्याचा प्रयत्न चांगला वाटावा असाच आहे. आपल्याला विक्षिप्त माणसे देखील भेटली असतीलच ना त्यावरही लिहा एकदा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

16 Dec 2009 - 10:26 am | सहज

हेच म्हणतो. आपण छान लिहता व तुम्हाला भेटलेल्या विक्षीप्त माणसांबद्दलही लिहा :-)

अक्षय पुर्णपात्रे's picture

16 Dec 2009 - 10:54 am | अक्षय पुर्णपात्रे

आपण छान लिहता व तुम्हाला भेटलेल्या विक्षीप्त विकृत माणसां/स्त्रियांबद्दलही (विशेषतः वयस्क व (निवृत्त (अनुभवांनी समृद्ध होऊन अथवा एकूणातच थकल्यामूळे (हा परिपक्वतेचा भविष्याआधीच (immaturely) गारद होण्याचा किंवा अपरिपक्वतेतून वर्तमानाच्या अपरिपक्व आकलनाचा परिपाक असू शकेल) )) लिहा. :)

पर्नल नेने मराठे's picture

16 Dec 2009 - 10:32 am | पर्नल नेने मराठे

सुरेख लिहिले आहेत.....
चुचु

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Dec 2009 - 1:06 pm | भाग्यश्री कुलकर्णी

नेहमीप्रमाणेच उ त्त म लिहीले आहेस.

दशानन's picture

16 Dec 2009 - 1:23 pm | दशानन

सुरेख लिहले आहे.
जिवनाच्या वाट्यावर किती तरी अशी अनामिक नाती जुळून जातात व आपल्या ह्दयाचा कुठला तरी कोपरा व्यापून राहातात.
अश्याच काही हरवलेल्या नात्यांची मला तुमचा लेख वाचून आठवण झाली.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

sneharani's picture

16 Dec 2009 - 3:03 pm | sneharani

सुरेख लिहले आहेस.

स्वाती२'s picture

16 Dec 2009 - 5:08 pm | स्वाती२

सुरेख लिहिलयं.

मीनल's picture

16 Dec 2009 - 7:17 pm | मीनल

प्रत्येक प्रसंग डोळयासमोर उभे केलेस.शेवटी पाणी आले डोळ्यात!
माझ म्हणण्यापेक्षा माझा विश्वास आहे की अशी चांगली ( अनकंडिशनली लव्हिंग)माणस भेटण आपल सदभाग्य. आपल्याकडून काही ही नको असताना आपल्यासाठी काही करणारे आई वडिलांव्यतिरिक्त फारच थोडे असतात.
तूही त्यांच कधी तरी या जन्मी /मागल्या जन्मी केल असशील त्याची ते परत फेड करत असतील जाणते /अजाणे पणी.
अस एकल आहे की आपल सर्व काही या जन्मी चुकत कराव लागते. ते चांगल असो अथवा वाईट.

मीनल.

खरी कमाई खुप आवडली. (सहसा, आपण जस वागु तसा आप्ल्याला ईतरांकडुन अनुभव येतो.)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

chipatakhdumdum's picture

16 Dec 2009 - 9:25 pm | chipatakhdumdum

खर तर आपल्या आसपासची माणस खरच चांगली असतात, (एखादा अपवाद वगळला तर), आपण उगीचच त्यांच्या सामान्य वागण्याचे त्यांचा स्वार्थ असेल असा अर्थ लावतो. तुम्ही नशिबवान आहात. साध्या माणसांचे साधे सरळ सोपे अर्थ लावता. साहाजिकच तुमच्या प्रतिक्रिया सुध्दा सरळ सोप्या प्रेमाच्या होतात. दुर्योधनाला,चांगला माणूस शोधायला, आणि धर्माला, वाईट माणूस शोधायला, सांगितल.. , दोघेही हरले.

चतुरंग's picture

16 Dec 2009 - 10:19 pm | चतुरंग

खरे तर आपण सगळेच तसे भाग्यवान असतो पण आपण तसे आहोत हे बर्‍याचदा उशिरा समजते किंवा कधीकधी आपण ते विसरुन जातो!
तुमचे अनुभव माझ्या मनातल्या माणसांना उजाळा देऊन गेले.

चौथीत होतो. सूर्यवंशी सर आमच्या वर्गावर होते. पावसाळ्याचे दिवस, बेदम पाऊस सुरु होता. मधली सुट्टी झाली, मी दप्तरात हात घातला आणि समजले की डबा घरीच विसरलाय. कडकडून भूक लागलेली, इतकी की हातपाय थरथरायला लागले, डोळ्यात पाणी आले. आसपासच्या दोस्तांचे डबे शेअर केले तरी त्या वयात पुरत नाही. सरांच्या लक्षात आले. चल म्हणाले. मुसळधार पावसात त्यांच्या छत्रीतून शेजारी चितळे रोडवर 'जगदीश भुवन' मध्ये नेले. दोन प्लेट बटाटेवडे आणि स्पेशल चहा ऑर्डर केला. आग्रह करकरून पोटभर वडे खायला लावले आणि वर चहा पाजला! त्या दिवशी ते गरमागरम बटाटेवडे मला जसे लागले तसे पुन्हा कधीही मी खाल्लेले नाहीत. सूर्यवंशी सरांना चौथीनंतर मी कधी बघितलं नाही पण आजही पाऊस आणि बटाटेवडे असं काँबिनेशन झालं की हटकून त्यांची आठवण येते आणि ते जिथे असतील तिथे सुखात असोत अशी प्रार्थना करतं मन!

चतुरंग

भानस's picture

17 Dec 2009 - 1:47 am | भानस

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.:)
मीनल अशी माणसे सहवासात येत असतात गं. दोन गच्च भरलेल्या पिशव्या घेऊन बसमध्ये चढल्यावर कोणीतरी उठून जागा देणे किंवा हातातली पिशवी घेणे ( मग त्यावेळी जर कोणी म्हणाले की नुसती पिशवीच काय घेतोस्/घेतेस, मला बसायला मात्र दिले नाही .... हे असे वाटले की त्या व्यक्तिने दाखवलेला चांगुलपणा फुकट गेला. तुम्हीं त्याला क्रेडीट दिले नाहीच पण स्वत:चे हलके झालेले ओझेही पाहिले नाहीत.) ह्या रोजच्या घटनेत त्या व्यक्तिला आपल्याकडून काय हवे असणार.:)
चतुरंग म्हणतात तसेच मीही म्हणते आपण सगळेच तसे भाग्यवान असतो फक्त अनेकदा साध्या साध्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत - लक्षात येत नाहीत. आणि या रोजच घडत असतात. कदाचित आपण आपल्या ( त्या त्या वेळी असणार्‍या ) मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये इतके व्यग्र असतो किंवा काहीवेळा आपण माणसांना गृहित धरतो.
chipatakhdumdum म्हणतात तसे बरेचदा समोरचा माझ्याशी का बरे चांगला वागतोय? त्याचा काय हेतू/स्वार्थ असेल यात.... हा संशय मनात धरून आपण अगदी क्षुल्लक गोष्टींचाही ताप करून् घेतो. कशाला ते? स्वतःला संधी द्यायला काय हरकत आहे?
प्रकाश घाटपांडे, आहेत आहेत काही विक्षिप्त अनुभवही आहेतच.( असणारच ना:) )त्या त्या वेळी रागही आलाय... दु:खही झाले, अगदी हताश व्हायलाही झाले. कधी कधी हसून पुरेवाटही झाली. लिहीन कधीतरी.
अक्षय पुर्णपात्रे, विकृत माणसे मला तरी भेटली नाहीत. हा...सामाजिक विकृतीबद्दल मी बोलत नाहीये.तिचा ताप असतोच. :( बाकी विक्षिप्त माणसे-अडेलतट्टू माणसे नक्कीच भेटलीत.:)

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 5:12 am | पाषाणभेद

छान लेख.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विशाल कुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 10:24 am | विशाल कुलकर्णी

खुप छान लिहीले आहेत, डोळ्यात पाणी उभे राहीले वाचताना. परमेश्वराजवळ एकच प्रार्थना की तुम्हाला कायम अशीच चांगली माणसे भेटोत. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भिंगरि's picture

17 Dec 2009 - 12:42 pm | भिंगरि

आता रात्रि झोपण्यापुर्वि वाचतेय हा लेख उद्याचा दिवस एकदम मस्त जाणार. तुमच्या सारखाच जगण्यावर आणि माणसांवर प्रेम करण्याचा छंद जडो हि त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना.

ता. क. मी तुमचे लिखाण नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि, नेहमि प्रतिक्रिया नाहि दिल्यागेलि (कारण दरवेळेला तेच तेच कस लिहायच ह प्रश्न पडतो) तरि मी तुमचि पंखि आहे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Dec 2009 - 3:50 pm | फ्रॅक्चर बंड्या

भाग्यवान आहात ...

binarybandya™

विमुक्त's picture

17 Dec 2009 - 4:25 pm | विमुक्त

उत्तम लिहिलं आहे...