*
भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले. ती उर्जा बघता बघता इतकी वाढली की त्या ६१० क्रमांकाच्या टाकीचा सेफ्टी व्हाल्व जोरात उडाला आणि प्राणघातक वायू जोरात बाहेर आला...
पुढच्या काही तासांमधे ८ लाखांच्या वस्तीतील २००० अबालवृद्धांना मृत्यूने गाठले तर जवळपास तीन लाखांना हानीकारक इजा झाल्या. पाच लाखांच्या वर पोचलेल्या हानीमधे २ लाख ही पंधरावर्षाखालील मुले होती तर सुमारे ३००० ह्या गरोदर स्त्रीया होत्या. त्याचे दूरगामी परीणाम आजही भोगणारी जनता आहे. या व्यतिरीक्त हजाराहून अधिक गुरेढोरे मृत्यूमुखी पडली, परीसरातील झाडे, पिके खराब झाली आणि तीच अवस्था ही पाण्यातील माशांची...
अर्थात इतके नंतर झाले आणि होत राहीले पण त्या रात्री १ वाजता व्यवस्थापकाने, "काहीच झाले नाही", असे सांगितले तर सकाळी सहा वाजता पोलीसांनी "सगळे काही सुरळीत" म्हणून जाहीर करून टाकले! हा अपघात होता, का घातपात, निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक केलेली मनुष्यावरील चाचणी यावर चर्चा होत राहीली आणि राहीलही. पहीली मदत करायला दोन दिवसांचा वेळ लागला... नंतर, भारतसरकारने $ ३ बिलीयन्स इतकी भरपाई जनतेच्या दबावाखाली युनियन कार्बाईडच्या अमेरिकन व्यवस्थापनास मागितली. अनेक वर्षांच्या कोर्टबाजीनंतर त्यातील $४७० मिलीयन्स मिळाले. त्यातील सरासरी रुग्णांना रू. २५,००० तर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांस रू. ६२,००० इतके मिळाले. खरे किती हातात पडले असतील हा एक वेगळाच संशोधनाचा विषय ठरू शकतो. यातून जे काही भारतातील मानवी मुल्य दिसते ते विदारक आहे.
अनेक लेख, पुस्तके, शोध निबंध, छायाचित्रे आणि संघटना यांनी भोपाळ दुर्घटना जागी ठेवली. पर्यावरण विषय शिकताना अमेरिकेतील महाविद्यालयात यावरून चर्चा (केस स्टडीज) झाल्याचे आजही आठवते. अजूनही काही (भारतीय विद्यार्थी) या विषयावरून येथे जनजागरण करताना दिसतात.
जे झाले ते अचानक झाले का? - उत्तर नाही असे आहे. १९८१ ते १९८४ च्या काळात त्याच संकुलात सहा वेळेस वायूगळती झाली होती. अमेरिकेतपण व्हर्जिनियात त्याच कंपनीच्या संकुलात असे प्रकार झाले होते. पण हे सर्व काही जे लपवले होते ते भोपाळच्या भिषणेतून लपवता आले नाही... शिवाय रात्रपाळीचे कमी केलेले कर्मचारी, कामगारांना हिंदीच नीट समजत असताना अडमुठेपणाने इंग्रजीतीलच माहीतीपुस्तीका (instruction manuals) असणे, जो वायू हा लहान लहान टँक मधे ठेवायला हवा तो एकत्रीत एकाच ठिकाणी ठेवणे अशी अनेक इतरही कारणे शोधता आली... फांदी मोडणार होतीच, पण कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली. त्यात फक्त अनेक निरपराधांना जीव घालवावा लागला अथवा अनेकांना उध्वस्त जीवन जगत बसावे लागले.
याला जबाबदार कोण? - फक्त युनियन कार्बाईड आणि ते पण अमेरिकेतील व्यवस्थापनच? ते आणि त्यांचा "कॉर्पोरेट माज" नक्कीच जबाबदार आहेत. पण केवळ तेच, असे म्हणता आले असते तर खूप बरे झाले असते. हरीत क्रांतीची स्वप्नपुर्ती करताना, किटकनाशके आयात करणे परवडत नसल्याने तत्कालीन गरीब भारताने हा अमेरिकन कंपनीचा कारखाना स्थापित करण्याचा प्रस्ताव मान्य केला. त्यात गैर काहीच नव्हते, असेल तर फक्त आपण गरीब असल्याने अमेरिकेत लागते तशी सुरक्षा यंत्रणेची आपल्याला, वास्तवीक लोकसंख्येची घनता जास्त असूनही, गरजेची नाही असे आपसुक समजून वागणे...
आजही पर्यावरणीय आणि सुरक्षेचे कायदे आणि त्यांचे कठोर पालन आपल्याकडे होत आहे का? जेंव्हा एखादा मोठा अपघात होतो आणि एकदम खूप मृत्यू अथवा अपघातग्रस्त दिसतात तेंव्हा सुरक्षा यंत्रणेतील दोष दिसून येतात. पण तसे म्हणालात तर वर्षाकाठी याहून अनेक जण त्याच अवस्थेतून जात असतात पण तो आकडा एकत्रीत, एका दिवसातील नसल्याने दुर्लक्ष होते. जसे विमान अपघातात गेलेले पटकन दिसतात पण त्याहूनही अधिक नियम न पाळल्याने गाड्यांच्या अपघातात बळी पडलेले असतात तसेच...
एकंदरीत ३ डिसेंबर १९८४ आणि नंतरचा काळ हा स्थानीक सामान्यांसाठीचा दुर्दैवी आणि अजूनही इतरत्र बर्याच अंशी असे परत घडू नये या कडे दुर्लक्ष करण्याचा (ignorance), तर सरकार आणि खाजगी क्षेत्रे यांचे एकंदरीत त्या त्या संस्थांना साजेलसे वर्तन दाखवणारा इतिहास आहे. त्या इतिहासाच्या या काळरात्रीला आज पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत.
----------
*Bhopal XXV
(वाचनीय आणि माहीतीपूर्ण) संदर्भ: Bhopal Gas Tragedy: An Analysis, Bhopal disaster
प्रतिक्रिया
3 Dec 2009 - 1:48 am | गणपा
विकास जुनी खपली निघाली..
ही घटना घडली तेव्हा लहान होतो. या विषयाच गांभिर्य जाणवण्या येवढ वय नक्कीच न्हवत. पण टिव्ही वर आणि पेपरात येणार्या बातम्या बाबांकडुन कळायच्या.. काही तरी भयंकर घडलय एवढ मात्र समजत होत.
आज २५ वर्षझाली या घटनेला पण खर्या पिडीतांना कितपत भरपाई मिळाली देवच जाणे.
3 Dec 2009 - 1:53 am | धनंजय
सुरक्षा ही ऐश नसून गरज आहे.
इतिहासाचा आढावा आणि सुयोग्य विवेचन.
3 Dec 2009 - 3:03 am | अनामिक
लेख वाचताना तुम्ही लिहिलेलं शेवटचं वाक्य मनात घोळत होतं. आपण सेफ्टीला कधी महत्व देणार आहोत कोण जाणे!
-अनामिक
3 Dec 2009 - 3:22 am | स्वाती२
आजही दुर्घटना पिडितांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहियेत. वर भारतीय परंपरेनुसार स्मारक बांधून पैसे खायचा सरकारचा प्लॅन आहेच.
3 Dec 2009 - 3:25 am | संदीप चित्रे
ह्या स्थायी स्वभावामुळे अशा घटना होतात आणि ..........
अजून एका माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्स !
3 Dec 2009 - 3:49 am | चतुरंग
माझ्या बाबांचे मित्र भोपाळला तिथल्या बँकेत होते त्यावेळी. नंतर काही वर्षांनी त्यांची भेट झाल्यावर त्यांनी सांगितले की ते गावाबाहेर रहात असल्याने त्यांना काही समजले देखील नव्हते. दुसर्या दिवशी जेव्हा हाहा:कार माजलेला समजला तेव्हा कळले की केवढे भयानक कांड झाले होते!
आत्ताच उत्सुकता म्हणून यूनियन कार्बाईड (म्हणजे सध्या 'डोव' कंपनीची सबसिडरी आहे) कंपनीची साईट चाळली. त्यावर त्यांनी ह्या घटनेचा उल्लेख केला आहे. रंजक बाब म्हणजे ही घटना हा घातपात होता असं त्यांनी चक्क त्यांच्या साईटवर म्हटलं आहे. हे मला आश्चर्यकारक वाटलं!
1984 In December, a gas leak at a plant in Bhopal, India, caused by an act of sabotage, results in tragic loss of life. (http://www.unioncarbide.com/bhopal)
कारण इतर कुठे तसा उल्लेख वाचल्याचे स्मरत नाही.
कंपनीने सुरक्षेत केलेली तडजोड उघड होऊ नये म्हणून आपल्याकडल्या गलथान कारभाराचा गैरफायदा घेऊन ह्याला घातपाताचे नाव तर दिले नसेल ना? अशी शंका चाटून गेल्याशिवाय राहिली नाही. एकूण सगळेच भयानक दलदलीसारखे वाटते!
चतुरंग
3 Dec 2009 - 9:28 am | शाहरुख
साला, हजारानं लोकं मेली आणि लाखो अपंग झालीत तरी कंपनी आपली चालूच..
इथून
3 Dec 2009 - 6:01 am | प्राजु
माहिती पूर्ण लेख.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
3 Dec 2009 - 8:07 am | चित्रा
मध्ये एमआयटीतील एका कार्यक्रमात गेले असताना काही मुले भोपाळवरून पत्रके वाटत होती. त्यांच्याच संघटनेतील मुलांची ही (खाली दिलेली) मुलाखत असावी.
http://www.lokvani.com/lokvani/article.php?article_id=5954
3 Dec 2009 - 8:20 am | सहज
मधे Yes men fix the world माहीतीपट पाहीला. पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे. त्यात भोपाळ दुर्घटनेचा कसा विसर पडला आहे व डाउ केमिकल्स (ज्यांनी युनियन कार्बाईड विकत घेतली आहे त्यांचे) प्रतिनिधी असल्याचे भासवुन (येस मेन एक्टीव्हिस्ट) बीबीसीवर, डाउ केमिकल्सनी भोपाळ दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे असे सांगून डाउ केमिकल्स व प्रसारमाध्यमांची फजिती केली होती पहाण्यासारखे आहे.
युटुब दुवा - yes men fix the world
दुवा १ दुवा २
3 Dec 2009 - 8:30 am | हर्षद आनंदी
दुखर्या नसेवर बरोबर हात ठेवला आहे तुम्ही!!
कितीही लाजीरवाणे असलेतरी हे सत्यच आहे. भोपाळ दुर्घटना ते फयान सारे काही जसे च्या तसे आहे.. बदलले आहेत फक्त चेहरे..
१.१५ अब्ज लोकसंख्येच्या गरीब देशात २०-२५ लाख मेले तर कुणाला त्याचे सोयर-सुतक?
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
3 Dec 2009 - 8:35 am | मदनबाण
छान लेख...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
Dow Chemical :---
http://www.safe2use.com/pesticides/dow-union.htm
http://en.wikipedia.org/wiki/Dow_Chemical_Company
3 Dec 2009 - 9:36 am | दशानन
त्या दुर्दैवी लोकांना इश्वर शांती देवो.
एखादी दुर्घटना का घडली व त्याला जबाबदार कोण ह्याचा शोध घेण्याचा जरा ही प्रयत्न न करणे ही आपल्या देशाची राजकिय संस्कृती आहे काय असे वाटते, मागील दोन एक वर्षापुर्वी एका दिल्लीतील जुन्या न्युजपेपर लाब्रयरी मध्ये त्याकाळातले पेपर वाचनात आले होते व जे काही राजकीय स्टंट बाजी त्या प्रकारावर चालू होती ते वाचून खरोखर किव आली ह्या राजकारण करण्यांची.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
3 Dec 2009 - 9:44 am | निखिल देशपांडे
समायोचित लेखन.. माहीति पुर्ण लेख...
अवांतर :- मागे गॅस लिक वर एक अॅनिमल्स पिपल नावाची कादंबरी वाचण्यात आली होती. त्यातला काही भाग हा भोपाळ गॅस ट्रेजडी वरुन उचललेला वाटतो.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
3 Dec 2009 - 9:57 am | नितीनमहाजन
भोपाळ दुर्घटनेमधील अपघातग्रस्तांना जेव्हा अंतरीम मदत जाहीर झाली (सुमारे १५ ते २० वर्षांनी) तेव्हा म.टा. मध्ये आलेले आर. के. लक्ष्मण यांचे चित्र (याला व्यंगचित्र म्हणणे फार चुकीचे ठरेल) आठवले.
भोपाळ शहरामध्ये पडलेला एक सांगाडा... ज्यावर कोळीष्टके झाली आहेत... लूत लागलेले कुत्रे फिरत आहेत... अश्या वेळी एक रुग्णवाहिका येते... त्यातून दोन डॉक्टर उतरतात... जे वकिलाच्या वेषात आहेत... दोघांच्या चेहर्यावर लिप्ताळल्याचे भाव आहेत...
आणि हातात प्रथमोपचाराची पेटी आहे.
आर. के. लक्ष्मण यांचे चित्र पाहून डोळ्यातील अश्रू आपण थांबवू शकत नाही.
माझ्याकडे मूळ चित्र आहे. शक्यतो लवकर scan करून टाकेन.
नितीन
3 Dec 2009 - 10:29 am | सुनील
इथे मुख्यत्वे दोन प्रश्न आहेत -
१) सावधानता / खबरदारीच्या उपायांबाबतची अनास्था
२) विकसनशील देशांतील मानवी जीवाचे मूल्य
पहिल्या प्रश्नाबाबत बोलायचे झाल्यास, ही अनास्था, उदासीनता आपल्या देशात ठायी ठायी भरलेली आढळते. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील उपहार ह्या चित्रपटगृहाला आगलेल्या आगीची घटना असो वा दोन महिन्यांपूर्वी पनवेल येथे शाळेच्या बसला झालेला अपघात असो.
आज मुंबईत जागोजागी मॉल झाले आहेत. इथे अगदी छोट्या बंदिस्त जागी शेकडो माणसे असतात. समजा अशा वेळी तेथे एखादी आगीसारखी दुर्घटना घडली तर, काय उपाययोजना आहे? उपाययोजना असलीच तर, तेथिल संबंधित कर्मचारी ती वापरण्यासाठी प्रशिक्षित आहेत काय? अशा प्रसंगी लोकांनी कसे वागावे यासाठी त्यांना काही प्रशिक्षण (फायर ड्रील सारखे) मिळाले आहे काय? दुर्दैवाने, ह्या सर्वांची उत्तरे नकारार्थी मिळतात. म्हणूनच अशा घटना इथे वारंवार घडतात.
दुसर्या प्रश्नाबद्दल बोलायचेच तर, एकच प्रश्न स्वतःला विचारावा - अशी दुर्घटना जर एखाद्या पाश्चात्य देशात झाली असती तर, तेथिल सरकारचे, लोकांचे आणि मुख्य म्हणजे संबंधित कंपनीचे वर्तन असेच (भारतात घडले तसे) असते काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Dec 2009 - 12:59 am | विकास
वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार!
गणपा: ही खपली आहे खरी पण तसे न वाटून घेता, त्यातून पुढे जाताना (अगदी आत्तापर्यंतच्या चुका विसरून) काय करावे हा प्रत्येकाने विचार करावा असे वाटते...
चतुरंगः युनियन कार्बाईडने "घातपाताची" अर्थात "कॉन्स्पिरसी थियरी" पहील्यापासूनच काढली होती. अर्थात ते तसे सिद्ध करू शकले नव्हते. त्यांनी असे ही म्हणून पाहीले की आमचा - म्हणजे अमेरिकेतील युनियन कार्बाईडचा - भारतीय कंपनीवर विशेष अधिकार नव्हता . अर्थात सिद्ध उलटच झाले होते... वर दिलेल्या दुव्यातील हे एका विद्यार्थिनीने केलेले विश्लेषण वाचण्यासारखे होते.
कर्कः कुठल्याच राज्यकर्त्यांना याचे काहीच पडलेले नसते. बाकीच्यांचे जाउंदेत, विमान अपघातात अनेक राजकारणातील, विशेष महत्वाच्या व्यक्तींना मरण आले काही मरता मरता वाचल्या पण त्यानंतर ही काही फार गांभिर्याने गोष्टी घेतल्या जातात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्यावरभर देण्या ऐवजी, आपण, भोपाळसाठी नाही पण भोपाळमुळे शिकून नक्की समाज म्हणून काय बदल घडवून आणू शकतो हा मुद्दा आहे. ह्या गोष्टी एका रात्रीत होत नाहीत. पण आज ही घटन घडून जवळपास ९१२५ रात्री होऊन गेल्या हे वास्तव विदारक आहे. त्याआधी आणि नंतरही मुंबईत चेंबूर आहे. त्याला सहज गॅस चेंबर म्हणले जायचे...
सहजरावः येस मेन हा प्रकार खूप मोठा आहे. पांढर्या कॉलरची गुन्हेगारी ही अजूनही मारक आहे... स्टॅनले विरुद्ध रोश (Roche) माहीत आहे का? आता पुढचा धोका (भारताला) असणार आहे तो शेती व्यवसायात - एकीकडे कॉर्पोरेट शेतकरी तयार होत आहेत पण त्याहूनही काळजी वाटण्यासारखे म्हणजे मोन्सँटो सारख्या कंपन्यांची रासायनीक खते, प्रयोगशाळेत तयार झालेली बीजे वगैरे... ज्याला युरोपात बंदी आहे, अमेरिकेत विरोध आहे ते तुमच्या-आमच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न चालू आहे. आत्ता अमेरिकेत पं. मनमोहनसिंगांबरोबर जे करार झाले त्यात एक भर हा शेतकीव्यवसायावर होता. नक्की काय करार केलेत ते माहीत नाही. पण ते जेंव्हा वाचले तेंव्हा युएस एड या आंतर्राष्ट्रीयस्तराव अनुदान देणार्या सरकारी संस्थेच्या प्रमुख पदी / हिलरी क्लिंटनच्या हाता खाली राजीव शहा यांना नेमल्याचा आनंद आणि नंतर वाचनात आलेली काळजी आठवली.
हर्षदः लेखाचा उद्देश दुखर्या नसेवर हात ठेवण्याचा नव्हता. पण काळाच्या ओघात कधीतरी मागे वळून पहाण्याचा नक्की होता. दुर्घटनाग्रस्तांना हे आजही दरोज जाणवत आहे, पण मला-तुम्हाला किमान पंचवीस वर्षांनी तरी विचार करावा लागावा असे कुठेतरी वाटते. विशेषतः जेंव्हा पद्धतीत काहीच बदल झालेले नसतात तेंव्हा..
राजेसाहेबः राजकीय संस्कृती (की विकृती?) अशीच आहे हे नग्नसत्य आहे...
नितीनमहाजनः चित्र अवश्य स्कॅन करून लावा...
सुनीलः तुम्हाला मुंबईतील मॉलवरून वाटणारी काळजी योग्यच आहे. पण (चूक असले तरी) घटकाभर असे म्हणूया की ते खाजगी आहे... पण दादर (पश्चिम) रेल्वेस्थानकाचा फलाट क्रमांक १ मधून बाहेर आलात (सेनापती बापट मार्ग) तर काय आढळते? - (मध्यंतरीच्या काळात गेलो नाही, तेंव्हा बदलले असेल तर क्षमस्व!) लगेच फ्लायओव्हर. जर आगीचा बंब, पोलीस, रुग्णवाहीका आणायच्या असतील तर जागा आहे का? हेकेवळ एकच उदाहरण आहे. मला उत्सुकता आहे की टाटाने आता तरी ताज हॉटेलमधी योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे का?
तुमच्या दुसर्या प्रश्नासंदर्भात, "अशी दुर्घटना जर एखाद्या पाश्चात्य देशात झाली असती तर, तेथिल सरकारचे, लोकांचे आणि मुख्य म्हणजे संबंधित कंपनीचे वर्तन असेच (भारतात घडले तसे) असते काय?" मला आज अमेरिकेबाबतही पूर्ण खात्री नाही. अर्थात उशीराने का होईना काहीतरी न्याय मिळेल पण त्यातील बहुतांशी पैसे हे वकील गिळंकृत करेल असेच वाटते.
4 Dec 2009 - 1:08 am | विसोबा खेचर
१९९० च्या आसपास मला एक भोपाळी इसम तिकडच्या खाजगी बसमध्ये भेटला होता..
काही कारणांमुळे आमच्यात संवाद साधला गेला.. तो इसम अंध नव्हता परंतु त्याच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली होती व त्याची नजर बरीच अधू झाली होती..
बोलण्याच्या ओघात वायुगळतीमुळे त्याच्या डोळ्यांना इजा झाली होती हे समजले आणि वाईट वाटले..
तात्या.
4 Dec 2009 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनाचा समारोप करतांना आपण म्हणता त्याप्रमाणे 'पर्यावरणीय आणि सुरक्षेचे कायदे आणि त्यांचे कठोर पालन आपल्याकडे होत आहे का?' या बाबत म्हणाल तर आपण तितकेसे सुरक्षीत नाहीच असे म्हणावे वाटते. थातूर-मातूर उपायोजना करुन सुरक्षीततेचे प्रमाणपत्र सादर करुन फसवाफसवीचे उद्योग जो पर्यंत चालू राहतील तो पर्यंत भविष्यात अशा घटना होणारच नाही, असे ठामपणे म्हणू शकणार नाही.
हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हजारो जायबंदी झालेत, पण या घटनेपासून काही शिकलो का ! याचे उत्तर नाहीच असे म्हणावे लागेल.
काल सकाळच्या शोकांतिकेची २५ वर्ष संपादकीयात म्हटल्याप्रमाणे, नुकसान भरपाई, संबंधीतांना शिक्षा, आणि शासनाची जवाबदारी, किंवा पुनर्वसन झाले म्हणजे जवाबदारी संपली असे नव्हे, तर अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून शासन काय उपाययोजना करते. बहुराष्ट्रीय कंपन्याकडून आता काय काळजी घेतली जाते. याचा शोध घेतला तर फारशी प्रगती व्हावी, अशी माहिती नक्कीच मिळणार नाही.
खरं तर झाल्या घटनेने ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्यांच्याबद्दल वाईट वाटते. सुरक्षीततेचे सर्वोत्तम प्रयत्न करुन. भविष्यात अशी घटना कधीच घडू नये, एवढीच प्रार्थना देवाकडे आपण करु शकतो.
-दिलीप बिरुटे
4 Dec 2009 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
करायचं माणसाने आणि भरायचं देवाने??
:-(
अदिती
4 Dec 2009 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>करायचं माणसाने आणि भरायचं देवाने??
सुरक्षीततेची खात्री माणसाकडून नसल्याने भार देवावर टाकलेला बरा. :)
आमच्या वाळूज एमायडीसीतून औरंगाबादेकडे रस्त्याने जातांना कोणत्या तरी कारखान्यातून कोणत्या तरी वायूचा इतका भयंकर वास येतो की श्वास घेता येत नाही, मळमळल्यासारखं होतं. कसली सुरक्षीतता आन कसलं काय !
'देवाबद्दल बोलणे' हे विषयाशी संबंधीत नसल्यामुळे व्य. नी. करतो.
-दिलीप बिरुटे