आजकाल लग्नातले विधी हे फोटोव्हिडीओ मध्ये दिसले पाहिजे म्हणुनच केले जात असल्याचे पाहायला मिळतय. हात देवघरासमोर जोडतात पण पाहतात फोटोग्राफरकडे ते ठीकय पण व्हिडीओकडेही तसेच. या निमीत्त मी लग्नाची जी फोटोशुट केलेली आहेत त्याचे काही किस्से मि.पा. वाचकांसाठी या धाग्यात लिहीतो.
लग्नात चार जण रायचंद ( अतिशहाणे ) असतात ज्यांना वेगवेगळ्या भन्नाट युक्त्या सुचतात आणि ते लगेच नवख्या नवऱ्यासमोर मांडतातही. जसे की अमुक पाहुणे आले नाहीत पण त्यांचा बाकी परिवार आहे तर फोटो काढताना एका माणसाची जागा शिल्लक ठेवा फोटोग्राफर त्यांना तिथ उभ करतील काॅम्प्युटर मधुन. मग आला व्याप आम्हाला.
बरं हे रायचंद फक्त नवरोबच्या आजुबाजुलाच दिसतील. बाकी कार्यक्रम कसा चालुय जेवणाकडे काय धावपळ चालुय याची त्यांना काही कल्पनाही नसते आणि काही देणघेणही नसत त्यांच. एका लग्नात असेच झाले. मी जेवणाचे शुट करायला गेलो तेव्हा रायचंदबहाद्दरांचे म्हणणे की जेवत असलेल्या लोकांच शुट घ्या. पण आधी सगळ्या जेवणाच्या मांडणीच शुटींग आधी घ्यायला मी गेलो तिथे एक चायनीजवाला नुडल्स बनवत होता. तो तव्यात असा कडक तडका घेत होता की तव्यावर जाळ लागायचा मला ते थोडसं रेकाॅर्ड कराव वाटल्याने मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवला. त्याचा उत्साह शिगेला पोहचल्याने त्याने असा तडका घेतला की त्याच्या डोक्यावरच्या राजस्थानी पद्धतीने गवत काड्यांपासुन बनवलेल्या छतानेच पेट घेतला. तिथ धाडसी दोन चार जण पुढे सरसावले आणि लाथ घालुन त्याच छत पाडले खाली, नाहीतर छतावर काही फुटांवरच मंडप होता. गॅस कनेक्शन बंद करुन टाक्या बाजुला पटकन भिरकवल्याने एक मोठा अपघात टळला..
काही लग्न तर लैच वेगळ्या पद्धतीत लागतात. डीजे, घोडा, फेटे, केटरर्स सगळ एकदम चांगल्या दर्जाच आणतील पण नेमक विधीला बसले की हवनकुंडाऐवजी ताट,घंगाळ येत तिथे. चक्क तुराट्या पेटउन फेरे घेताना पाहिलय मी लोकांना आणि तेच लोक नंतर अल्बम पाहताना एखाद्या गुजराती, मारवाडी किंवा ब्राम्हणांच्या अल्बमशी तुलना करुन त्यांचाच कसा साधा झालाय हे दाखउन देण्याच्या प्रयत्नात असतात. नशिब आहुती देण्यासाठी लागणार पळी गुरुजींनी पिशवीत बाळगलेली असते.
वरातीला अर्धा तास जास्त नाचतील पण नेमक विधी चालु झाला की गुरुजींना,"आटपा लवकर पाहुण्यांना लांब जायचय" अस म्हणताना थोडसुद्धा लाजत नाहीत हे लोक. असं म्हटले की गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायला आम्हाला खुप मज्जा येते त्यांना मनात काय बोलले असेल हे आम्हाला ठाऊकच.
बरं विधी झाला की नवरीच्या घरुन देव चोरायला जातात आणि देव चोरताना म्हणतात, "ओ फोटो घ्या फोटो".
लग्नांनध्ये माझ्या समोर झालेले काही गंमतशीर, आश्चर्यकारक किस्से सांगतो.
-- एका लग्नात आम्ही नवरदेवासोबत पोहोचलो नियोजित स्थळी. लग्न ६.३० वाजता लागणार अस नियोजन होतं. पण खराब रस्त्यांमुळे दोन तासाचा रस्ता तीन तासांवर गेला आणि पोहचायला उशीर झाला. डीजे आला आणि मित्रमंडळ वरातीसाठी उत्साहित झाले. नवरदेवाला आहेर चालु तोच डीजेवाल्याने गाणे वाजवायला सुरुवात केली आणि पहिलच गाणं वाजलं 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत'. पहिल गाण हे गणपतीच अपेक्षीत असताना मध्येच सलमान डोळ्यांसमोर तरळल्याने मी शुटींग करता करता तिकडे नजर फिरवली तर डीजे च्या नावावरुन कळल की गणपतीच गाणे वाजवण त्यांना शक्यच नाही. लगेच पोरांनी नाचायला सुरुवातही केली होती म्हणुन मी नीटच पाहिल तर काय आश्चर्यचकीतच झालो. कारण मी हे अस पहिल्यांदा पाहत होतो. त्या डीजेच्या रॅकवर म्हणजे टेम्पोच्या टपावर चार पोरी होत्या नाचण्यासाठी. ज्या लागोपाठ प्रत्येकी गाण्यावर दोन दोन नाचत राहिल्या. मग काय त्या गावातले म्हणजे नवरीचे भाउबंदकीतले पण झिंगत नाचायला सुरु झाले. खेडेगावातल लग्न असल्याने ईतकी धुळ उडत होती की घट्ट दस्ती तोंडाला बांधुनही घशात धुळ गेल्याचा भास होत होता. वरात साडेपाचला चालु झालेली चक्क रात्री पावणे दहापर्यंत चालली आणि लग्न रात्री साडे दहाला लागले. कहर तर आता सुरु झाला जेव्हा कन्यादानासाठी लागोपाठ १३ जोडपी आली. अश्यातच तीन वाजलेले. त्यानंतर सुनमुख आणि फळभरणी(ओटीभरणी) ला दुसऱ्या दिवसाचे पहाटेचे साडेपाच झालेले. बिदाई साडेसहाला एकदाची झाली.
मागच्या महिन्यातही असाच अनुभव आला. मित्रमंडळी झिंगाट रात्रीच्या साडेनऊस्तोर नाचत होते. महत्वाच म्हणजे स्काॅर्पीओत बसलेला नवरदेव सुद्धा चार पावलं पुढे सरकलेल्या डीजेला मागे यायला सांगायचा. हे सगळ खटकल नवरीच्या गावच्या पुढाऱ्यांना. त्यांनी डीजेवाल्याचा माईक हातात घेतला आणि कडक आवाजात स्पष्ट बोलले की पाचव्या मिनीटात नवरदेव मंडपात पाहिजे नाहीतर लग्न मोडलं अस गृहीत धरुन आल्यापायाने परत जा. हुज्जत घातली तर पायही ठीक राहतील याची शाश्वती आम्ही देणार नाही. बस्स थरकाप उडाला एकच आवाजाने. नवरदेवतर थंडच झाला आणि खरोखर पाचव्या मिनीटात नवरदेव मंडपात आला.
बदला मात्र घेतलाच. फोटो काढताना मुद्दाम उशीर लावायचा. काका काकुंची बाजु बदलुन बदलुन फोटो काढले. रात्रीचे एक वाजलेले तरी जेवायच नाव घेत नव्हता. विधीतर बाकीच होता अजुनही. शेवटी व्हायच तेच झालं पहाटे पाच वाजता बिदाई होऊ दिली पठ्याने.
-- एक लग्न होतं दुपारी साडे बाराचं, पण नेमक नवरदेवाचे कपडेच घरी विसरुन आलेले असल्याने नवरदेव पारावर तसाच ताटकळत राहिला. नवरदेव पारावर पोहचला की मित्रमंडळी अड्ड्यावर पोहचलेले असतात. कपडे आणायला दीड तास वेळ लागल्याने मित्रमंडळींनी टप्प्यावर टप्पा चालुच ठेवलेला. शेवटी कपडे पोहचले एक वाजेदरम्यान आणि ते घालुन नवरदेव घोड्यावर बसला. मित्रमंडळींना ईतकी जास्त झालेली की काय करतायत त्यांचे त्यांनाच कळत नव्हते. चांगली दीड तास वरात चालु होती. वरुन उन्हाची तिरपी जोरातच. आता झाले मित्रांचे येडेचाळे सुरु. कोण नवरदेवाचा टाॅवेल ओढायच तर कोणी फेटा डोक्यावर घेउन नाचायच. ते ईतक्यावर थांबले नाही तर त्यांनी घोडेवाल्याला सुद्धा हमरी तुमरी केली आणि लगाम पठ्यांनी स्वत:च्या हातात घेतली आणि नवरदेव स्वार असलेल्या घोड्याला नाचवायची तयारी करु लागले. अक्षरश: पडला असता बिचारा नवरदेव पण सावरला कसातरी. पुढ जे झाल ते एकदम गजब होतं. कोणच ऐकत नसल्याने रडकुंडीला आलेल्या नवरदेवाचे पाणावलेले डोळे पाहुन खुप राग आला पण बेवड्यांशी पंगा घेईल कोण? म्हणुन लग्नमंडपात गेलो आणि ऐटीत पांढरे कपडे घालुन मोठाल्या सोनसाखळ्या गळ्यात अडकउन मिशीला ताण देणाऱ्या ४२-४५ वर्षीय गृहस्थाकडे मी स्वत: जाऊन विनंती केली आणि वरातीत चाललेला प्रकार ऐकवला. माझी विनंती आणि मी त्यांना सांगताना समोरचे ऐकणारे चारजणांसमोर तेही म्हणाले चल बघु बायका पोरं भुकीजलेत आणि ह्यांचा काय पोरखेळ(एक गावठी शिवी होती ईथं) चाललाय म्हणत ते आले. तोवर मित्रमंडळीही थकलेलेच होते कडक आवाजाला मान देत नवरदेवाला मंडपात घेउन आले.
हे झाले गावखेड्यांतल्या लग्नांचे किस्से.
आता थोड शहरी भागतल्या लग्नांबद्दल सांगतो.
-- एक गुजराती लग्न होत. त्यांच सगळ कसं नियोजनबद्ध असत.(आत्तापर्यंत तर असच पाहिलय मी) लग्नाच्या आदल्या
दिवशी गणेशपुजन,ग्रहशांतीपुजा, मांडवपुजन वगैरे पुजा दिवसभर टप्प्या टप्प्याने चालुच असतात. संध्याकाळी संगीत संध्या असते. दुसऱ्या दिवशी सकाळीच वेगवेगळे कार्यक्रम चालु होतात. ते त्यांच्या पारंपारिक रीतीने असतात. सामेला,माहेरा,मिलनी असे बरेच काही प्रकार असतात त्यात. दुपारी फेरे,कन्यादानाचा विधीही उरकतात.
संध्याकाळी नवरी मुलगी घोड्यावरुन मिरवणुक काढुन नवरदेव जिथे असतो तिथपर्यंत जाते.(घाटाडी म्हणतात त्याला) त्यानंतर नवरदेव घोड्यावरुन लग्नमंडपाकडे येतो. सगळ काही शिस्तबद्ध असत रस्त्यात जागोजागी केटरींग चे मुले पाणी, स्वागत पेय, थंडपेय घेउन उभे असतात. कुठ भांगडा करायचा आणि कोणत्या चौकात गरभा करायचा हे सगळ नियोजित असत शिवाय लग्न मंगलाष्टक वेळेत झाली पाहिजे म्हणुन चारचौघे वऱ्हाडींना घड्याळाच्या काट्याची आठवण करुन द्यायला असतातच. लग्न नियोजित वेळेतच कधीतरी १५-२० मिनीटांच्या फरकाने लागत.
त्या दिवशीही असच झालं. लग्नानंतर ग्रुप फोटो चालले रात्रीच्या बारा वाजेपर्यंत. तेवढ्यात नवरीला अशक्तपणा जाणवायला लागला म्हणुन लगेच जेवायला बसले. पण तरीही अस्वस्थ वाटत असल्याने आराम करायला रुममध्ये गेली. आता आमची सुट्टी होणार होती पण बिदाईसाठी थांबाव लागल. पाहता पाहता ३ वाजले पण बिदाई काय होईना आम्ही दर अर्ध्या तासाने विचारायचो अजुन किती वेळ आणि उत्तर तेच "झालं पंधरा मिनीटांत निघु". फक्त जवळचे नातेवाईक आणि परिवारातले मोजके चाळीस च्या आसपास लोकं थांबलेले होते. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या. कारण त्यांनी दुपारी आराम केलेला होता. त्रास होत होता तो गुरुजींना आणि आम्हाला. माझी तेव्हा सटकली मी अचानकपणे सगळ्यांसमोर घाईगडबडीत उभा राहिलो आणि कॅमेरा बॅगेत ठेवत होतो तोच नवरीचे काका बोलले 'काय झाल? कुठे निघालात?' मी-'आलोच चौकातुन चहा घेऊन' मी एवढ्यावरच ना थांबता समोर बसलेल्या गुरुजींना म्हणालो, "चला गुरुजी आपण चहा घेउन येऊ." गुरुजींनी नकारार्थी मान हालवली. गाडी चालु करुन सगळ्यांचा समोर पुन्हा एकदा आलो आणि बोललो ' मामा, काका तुम्हाला कोणाला चहा प्यायच असेल तर सांगा घेऊन येतो चारदोन कप'
त्यांनी मला तर उत्तर दिलेच नाही शिवाय खिशातुन मोबाईल काढला तोवर मी बॅग आवरत असल्याचच भासवल. त्यांनी फोन लावला आणि त्यांच संभाषण सुरु झालं ते पुढीलप्रमाणे - 'वऱ्हाड अजुन मंडपात असताना तुम्ही गेलेत कुठे? कोणाला विचारुन गेले? ईथ अजुन बिदाई बाकी आहे? आत्ताच्या आत्ता दहा मिनीटात चहाची सोय करा.'
रात्रीची शांतता असल्याने त्यांचा आवाज चांगलाच गरजत होता.
त्यात मी भर टाकली 'कोणय तो केटरर्स वाला? पाण्याची जारसुद्धा ठेवला नाही त्याने.'
काकांनी रिडाईल केले आणि खुपच मोठ्या आवाजत केटरर्सवाल्याशी भांडायला लागले. हा सगळा आवाज मुलीच्या रुमपर्यंत गेला आणि अक्षरश: मिनीटातच ती बाहेर आली आणि चला चला म्हणायला लागली. गुरुजींचा विधी बाकीच होता तर मी म्हटलं 'आता खुप उशीर झालाय. एक काम करा गाडीत बसा आणि थोडस पुढ घ्या आम्ही रेकाॅर्ड करुन निघतो. सकाळी लवकर दुसऱ्या लग्नात जायचय.' त्यांनीही ऐकलं आणि आमची सुट्टी केली.
भडकवण्याच्या बाबतीत फोटोग्राफरचा हात कोणी पकडु शकत नाही अस माझ मत आहे. -- मारवाडी समाजाच लग्न होतं. फोटोग्राफरने कमीत सुपारी घेतलेली असल्याने मदतनीसच सोबत घतलेला नव्हता. मदतनीस असतील तर वेळेत जेवण करायला मिळते. ताटकळत उभ राहण्यापेक्षा त्याला तिथं उभ करुन कार्यक्रम सुरु झाला की सांग बोलुन कार्यालयाबाहेरची हवा खात उभ राहता येत. तर आम्ही दिवसभर काम करुन थकलो तर होतोच सोबत कावळ्यांनी पोट चांगलच कोरलेल. नवरा नवरी जेवायला बसल्याशिवाय आम्हाला घास घेण शक्य नव्हत. नवरा नवरी बसले तेव्हा त्यांना एकमेकांना घास भरवायला सांगुन फोटो काढले आणि आम्ही बसलो जेवायला. अर्ध जेवण झालेल, दाळबाटी चुरुन खात असल्याने हात पुर्ण भरलेला असताना नवरदेवाचा अतिउत्साही मित्र आला आणि बोलला 'मला नवरदेवाला घास भरवायचय फोटो घ्या चला.' मला ज्याने कामावर बोलवल होत त्यानेही बोलला जा हात धुउन घे फोटो. मला भयंकर राग आला, मी हात धुतला आणि फोटोसाठी नवरदेवासमोर उभा राहताच वेटर ला आवाज दिला आणि म्हटलं 'ते स्वीट चे बाऊल चेंज कर पटकन' तो बोलला 'का?' मी म्हटलं 'सांगतोय तेवढ कर तु' आणि तेवढ्यात वरबापाने मला विचारले 'का काय झाल?' नेमका याच प्रश्नाच्या प्रतिक्षेत असलेला मी मोठ्याने उत्तरलो 'तुटक्या फुटक्या भांड्यात कुत्रे मांजर खात असता'
भयाण शांतता पसरली वेटर लोकांचा हेड धावतच आला नी ताट बदलुन आणायला गेला. तोच नवरदेव मित्र बोलला 'राहुद्या फोटो आता निघतो मी', चल बाय भेटु पुण्यात आल्यावर म्हणत त्याने नवरदेवाला टाटा बाय बाय केला. नंतर मला माझा सहकारी बोलला 'कशाला बोलतो रे असं? लग्न मोडतील ना अस बोलल्याने!'
मी अस म्हणत नाही की फोटोग्राफर कडुन काहीच चुका, गैरवर्तन होत नसतं. त्यासाठी योग्य फोटोग्राफर निवडा. सुपारी देण्यापुर्वी किमान दोनवेळा त्याला घरी बोलवा. तो वेळेच पालन करतो की नाही पाहा. त्याच्यातला नीटनीटकेपणा वगैरे पाहा. कारण तो तुमच्या परिवारासोबत दोन दिवस काम करणार आहे. त्याला शक्य तितका ॲडव्हान्स द्या आणि उर्वरीत रक्कमही वेळेत मिळेल अशी जाणीव वारंवार करुन द्या. तुमच्या अनमोल क्षणांची आठवण तो तुम्हाला देणार असल्याने त्यालाही सन्मानाने वागवा.
यापेक्षा भन्नाट किस्सा कसा होउ शकतो पहा.
- काही नवख्या जोडप्यांना तर आपण कोणते कपडे घालाव किंवा कुठे काय घालुन जाव याचेही ज्ञान नसते. घातले तरी वावरताना काळजीसुद्धा घेता येत नाही. असाच एका प्रीवेडींग मध्ये एक अशी घटना घडली की लग्नाचे काम माझ्याकडे असुनही मी लग्नात ना जाता ईतरांकडुनच काम करउन घेतल. तर झाल अस व्हत की प्रीवेडींग साठी आम्ही एका रिसाॅर्टला गेलेलो. सकाळी फटफट झाल्यापासुनच कामाला सुरुवात झालेली. दुपारपर्यंत वेगवेगळ्या तीन ड्रेस मध्ये शुट करुन झाल होत. जेवणानंतर मुलीने घागरा घातला. आमच शुट झाल पण तीने स्वत: एक पोज सांगीतली अशी की गवतावर बसुन घागरा पसरउन फोटो घ्यायचा. बरं ब्युटीशिअन ही जेवणानंतर सुस्ताउन झाडाखाली शांत बसलेली होती. ती बसलेली असताना मी ड्रोन हवेत उडवला पण तितक्यात जोराचा वारा आला आणि घागरा पुर्णपणे हवेत झिंगला. मी क्षणाचाही विलंब ना करता ब्युटीशिअनवर खेसकत सगळे कॅमेरे माझ्या हातात घेतले आणि रेकार्ड डिलीट करुन त्यांना तशी खात्री करुन दिली. संध्याकाळची शुटींग रद्द केली आणि घरी पोहोचलो.
--- एका उच्चशिक्षीत पंजाबी जोडप्याचा विवाह सोहळा आटपला. घरी जाउन गृहप्रवेशाचा कार्यक्रमही संपला. आता आम्हि निघणार तेवढ्यात तो त्यांच्या घरी जमलेल्या नातेवाईकांना आमची ओळख करुन देत होते. प्रीवेडींग ही आम्हीच केलीय आणि खुप छान झालीय अस म्हणत ते एकमेकांना पेनड्राईव्ह, लॅपटाॅप कुठय विचारत होते. तेवढ्यात नवऱ्या मुलाला युक्ती सुचली की युट्युबवर अपलोडवलेली आहे ती आॅनलाईनच दाखउ. त्याने डिजीटल टीव्ही आॅन केला आणि युट्युबला लाॅगीन केला. लाॅगीन करताच रिकमंडेड व्हिडीओज दिसले. सुरुवातीला दहा सेकंद सगळे डोळे विस्फारुन पाहत होते आणि नवरोबाची धडपड की ते पेज बंद करुन पुढील लिंकवर जायच. नंतर सगळेच मोठ्याने हासायला लागले. त्या रिकमंडेड व्हिडीओ मध्ये होत - 'जानिये ]%|{£|$^$$|£ लेने के फायदे तथा तोटे'
नवरदेव हिरमुसला बिचारा नंतर प्रीवेडींग चा व्हिडीओ चालु झाला पण त्याकडे कोणाचच लक्ष लागत नव्हत. जर अस माझ्या मित्रासोबत घडल असत तर मी त्याला चक्क फटके देत देत हसलो असतो.
मी वर ज्या काही घटना सांगीतल्यात त्या मित्राच्या लग्नात सुद्धा घडु नये यासाठी सल्ला जरुर द्या.
हा माझा पहिलाच धागा असल्याने काही चुका झाल्यास कृपया दुर्लक्षित कराव्यात.
या धाग्यासाठी मिपाकरांच्या गृपमधुन (मिळून मिसळून) मदत आणि प्रोत्साहन खुप मिळालय त्यांचे खुप आभार.
( तळटिपः- विवाहाचे सर्व फोटो ईंटरनेटवरुन घेतले आहेत.)
प्रतिक्रिया
26 Mar 2018 - 8:47 pm | उपयोजक
खुप छान लिहिलेयत अनुभव! लिहित रहा. शुभेच्छा!!
26 Mar 2018 - 9:19 pm | अभ्या..
जब्बरदस्तच की,
एकच लंबर किस्से झालेत.
बाकी दस्तीवरुन मराठवाड्याकडले वाटलांव. हैकानै? ;)
27 Mar 2018 - 1:21 pm | फुटूवाला
हो, संभाजीनगर (औरंगाबाद).
26 Mar 2018 - 9:41 pm | सतिश गावडे
लेखातील प्रकाशचित्रांवर तुमचा प्रताधिकार आहे का? नसल्यास ती प्रताधिकार मुक्त आहेत का?
- भडीमार
छान लिहीलं आहे. आवडलं लेखन. :)
27 Mar 2018 - 8:39 pm | पगला गजोधर
छान लिहीलं आहे. आवडलं लेखन. :)
शिवाय "भडीमार" शब्द आवडला गेल्या आहे.
26 Mar 2018 - 9:41 pm | Indranil
26 Mar 2018 - 9:48 pm | Indranil
छान लिहिलंस। लिहीत राहा। अजून अनुभव वाचायला आवडतील।
26 Mar 2018 - 10:17 pm | मार्मिक गोडसे
लेखन आणि किस्से खूपच छान.
26 Mar 2018 - 10:31 pm | दुर्गविहारी
एकच नंबर !!! आता लिहीते व्हा. थांबायचे नाही.
26 Mar 2018 - 10:38 pm | टवाळ कार्टा
भारी
26 Mar 2018 - 10:47 pm | एस
लग्न हा जगातला सर्वात वाईट समरप्रसंग असतो. महायुद्धे यापुढे काहीच नाहीत! लेख आवडला. फोटो तुम्ही काढलेले टाकले असते तर आवडले असते पहायला.
26 Mar 2018 - 11:19 pm | पिलीयन रायडर
दस्ती म्हणजे परभणीकडचे का तुम्ही?!
छान आहे लेख!
27 Mar 2018 - 12:25 am | कंजूस
हाहाहा.
भारी किस्से.
*नवख्या नवऱ्यासमोर*!!
27 Mar 2018 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे
भारी किस्से ! =))
27 Mar 2018 - 1:07 pm | mayu4u
अजून येउद्या!
27 Mar 2018 - 1:19 pm | फुटूवाला
पहिल्याच लेखनावर आलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद..
27 Mar 2018 - 1:25 pm | पद्मावति
मस्तच लिहिलेय.
27 Mar 2018 - 1:33 pm | सुमीत भातखंडे
मस्त किस्से.
अजुन येऊद्यात
27 Mar 2018 - 2:06 pm | चौकटराजा
आमच्या एका फोटू वाल्या मित्राकडे तळेगाव दाभाडे येथुन एक ग्राहक आला. याने एका प्रोजेक्टचे ४ हजार सांगितले . तो ग्राहक म्हणाला ४०० देईन .हा म्हणाला आहे कमी म्हणजे किती कमी ... त्याला काय जजमेंट ? त्यावर तो ग्राहक म्हणतो " तुम्हाला फक्त फोटो व विडीओ काढायाचे नाटक करायचा रोल आहे. मग याने विचारले हा उद्योग कशासाठी ? त्यावर त्याचे उत्त्तर लई भारी या सदरात मोडावे ..... ते असे " अहो लगनातील फोटोत नवरा बायको सोडून कुणाला रस असतोय ?पण फोटो काढताहेत हे दिसले पाहिजे . त्यांना मी पटवले आहे. हनिमूनला स्वत: च काढतील फोटो . नंतर कुणी विचारले " अल्बम आला का ?" तर सांगत राहायचे सीझन मुळे फोटोवाला बिझ्झी आहे. " महिना गेला की कोणी विचारायाला यात नाही फोटोचे काय झाले ? " नंतर अल्बम नाईतरी धूळ खातच पडणार !
27 Mar 2018 - 2:31 pm | फुटूवाला
असतात असे काही नग, तरीही ४०००/- तर फक्त त्या दोन कारागीरांची (फोटो&व्हिडीओ) मजुरीच झाली. कॅमेरा भाड्याचा विचार केला तर रक्कम मोठी होते. म्हणुनच ५०% उच्चल म्हणुन मागतो आम्ही. कोणाला माहित की अशी कल्पना कोणालाही येउ शकते. असे गिऱ्हाईक चेहऱ्यावरुनच कळतात तसे तर की हे गिऱ्हाईक नसुन गिऱ्हा आहे..
27 Mar 2018 - 2:36 pm | चौकटराजा
आता मी हा किस्सा ऐकूनही १५ वर्षे झाली. प्रत्यक्ष गोष्ट त्या पूर्वीही ५ वर्षे अगोदरची असावी.
27 Mar 2018 - 2:44 pm | फुटूवाला
मग बरोबर आहे.
27 Mar 2018 - 3:39 pm | एस
खतरा किस्सा आहे! मानलं! :-D
27 Mar 2018 - 2:47 pm | पी. के.
भारी किस्से. शेवटचा तर लैच भारी
27 Mar 2018 - 2:50 pm | श्रीगुरुजी
मस्त लेखन
27 Mar 2018 - 3:09 pm | अत्रन्गि पाउस
उत्कृष्ट लिखाण ... एकंदर लिखाणातील सराईत पण पाहून नवीन डू आयडी असावा असच वाटलं ...पण ते असो ...
अजून येऊ द्या ...
बाकी डिजिटल फोटोग्राफी सुरु झाल्यापासून १ फोटो काय आणि १० फोटो काय किमतीत फार फरक नाही त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती कसे कुणी फोटो काढावे ह्याचे एकंदर तारतम्य प्रचंड सुटलेले आहे, अर्थात हा मानवी स्वभाव आहे ..
अर्ध्या जेवणातून उठवणाऱ्या अनुभवाने अतिशय विचित्र फिलिंग आले ...
एकूणच सामाजिक मनाचा फोटो काढलाय ह्या लेखात ...वा बुवा
27 Mar 2018 - 3:51 pm | फुटूवाला
धन्स!!
मिपाकरांच्या मिळून मिसळून या व्हाट्सअप समुहातून मिळालेल्या मदतीमुळे लिखाणात नीटनीटकेपणा आलाय.
डिजीटल कॅमेऱ्याचं पण आयुष्य मर्यादित क्लिकपुरतेच आहे, हे ज्यांना ठाऊक ते मर्यादितच आणि नेमके फोटो काढतात आजही.
27 Mar 2018 - 3:12 pm | विशुमित
छान लेखन.
'रायचंद" शब्द आवडला.
....
स्वतःचा कार्यक्रम असेल तर अतिउत्साही 'रायचंद" लोकांची "त्याची" सोय करू नये. आपल्याच कार्यक्रमात राडा घालतात आणि वरून लोकांचं ऐकावे लागते की कसले अमक्या तमक्याचे मित्रं.
27 Mar 2018 - 3:38 pm | फुटूवाला
"रायचंद" म्हणजे पिऊन राडा घालणारे नव्हे.
तर प्रत्येक कार्यक्रमात वडीलधारे (मावसा,काका,मामा किंवा वरबापाचे जवळचे मित्र) असतात. त्यांच्या कडे युक्त्या भन्नाट असतात.
एक किस्सा सांगतो- रुखवत मांडण्यासाठी पलंगच (लोखंडी चारपायी) पाहिजे असतो. ज्याचे चारही पाय पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवल्याने तळीव पदार्थांना मुंग्या लागणार नाहीत. तर वरबाप म्हणतात आणा शेजाऱ्याकडुन तोच रायचंदांची युक्ती बाहेर पडते आणि ते बोलतात " कशाला? आपल्याकडे बाज आहे ना? आणा पटकन अन बाजेचे पाय पाण्यात ठेऊन उरका पटकन". तेव्हा त्यांना हे माहित नसत की नवरोबाच्या आज्जीची बाज ही माचव्यांची आणि आंबाड्याच्या सुंबाची आहे. ज्यात खुप साऱ्या मुंग्या आधीच राजवाड्यात राहिल्यासारख मजेत दिवस काढतायत. मग पाय पाण्यात ठेऊन काय फायदा?
27 Mar 2018 - 3:59 pm | विशुमित
अतिउत्साही रायचंद वरातीत नाचणारे, मी यांच्याबद्दल बोललॊ . माझ्या मते ते पण एक प्रकारचे रायचंदच असतात.
27 Mar 2018 - 4:09 pm | फुटूवाला
त्यांना वेळीच नाही आवरलं तर मोठी फजिती होते...
27 Mar 2018 - 3:23 pm | भीडस्त
लयीच मज्या आली पघा वाचतानि
आझुक यिउंद्या
27 Mar 2018 - 3:36 pm | वरुण मोहिते
लिहीत रहा. असे बरेच अनुभव आपल्याकडे असतील . वाचायला आवडेल.
27 Mar 2018 - 3:54 pm | फुटूवाला
यानंतरही नक्कीच लिहीन.
27 Mar 2018 - 4:25 pm | गावठी फिलॉसॉफर
गोविंदराव तुम्हाला आलेल्या एका अनुभवात ते बेवडे मित्र धिंगाणा करतात. तसेच आमचेही मित्र आहेत. तुम्ही परिस्थती व्यवस्थित हाताळताल.
सुपारी पक्की
27 Mar 2018 - 4:54 pm | फुटूवाला
लग्न आटोपल्यावर मोठी पार्टी देतो म्हणत पार्टीची सोय किती थाटात केलीय याच चॉकलेट देऊनच थांबवणे शक्य आहे. डीजे नसाल लावत तर उत्तमच. जमलं कि सांगा मग बोलू सुपारीच..
27 Mar 2018 - 5:40 pm | अमरेंद्र बाहुबली
अतिशय सुंदर लेख. आणखी अनुभव येवद्यात.
27 Mar 2018 - 7:04 pm | सुखीमाणूस
मांडले आहेत.
27 Mar 2018 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा
@अस म्हणताना थोडसुद्धा लाजत नाहीत हे लोक. असं म्हटले की गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायला आम्हाला खुप मज्जा येते त्यांना मनात काय बोलले असेल हे आम्हाला ठाऊकच.--- असल्या श्टैलचं काम असेल तर आमच्या सारखे लोक काम ठरवतानाच विशिष्ट काळजी घेतात. तरीही अनेकदा या सर्कशीत *रली जातेच!
2 Apr 2018 - 2:31 pm | सचिन काळे
अतिशय सुंदर लेख.
3 Apr 2018 - 2:54 pm | परिंदा
मस्त किस्से लिहिलेत. लेख थोडा विस्कळीत वाटला. पटापट एकामागुन एक किस्से सांगत गेलात, म्हणून असावे.
3 Apr 2018 - 9:14 pm | पैसा
लिहीत रहा.
8 Apr 2018 - 12:09 pm | प्रमोद देर्देकर
लय भारी किस्से. येवूद्या अजुन.
आमचं गुरुजी (सध्या ते फूsssssर झालेती) नंतर तुमीच लग्नातलं लिवलं बघा.
9 Apr 2018 - 9:59 am | मुक्त विहारि
आवडले...
14 Apr 2018 - 3:41 pm | मर्द मराठा
उत्सुकतेपोटी प्रश्न..... ड्रोन कोणता आहे तुमच्या कडे? सरकारी परवानग्या काढायला काय काय केलेत?
14 Apr 2018 - 3:48 pm | फुटूवाला
सगळ्यात लेटस्ट जो आहे तो रेंट ने मागवतो. परवानगीसाठी रिसॉर्ट, कार्यालयाची प्रत जवळच्या पोलीस स्टेशन ला देतो.
14 Apr 2018 - 7:50 pm | भटक्या फोटोग्राफर
त्याला शक्य तितका ॲडव्हान्स द्या आणि उर्वरीत रक्कमही वेळेत मिळेल अशी जाणीव वारंवार करुन द्या. तुमच्या अनमोल क्षणांची आठवण तो तुम्हाला देणार असल्याने त्यालाही सन्मानाने वागवा.
हे लोकांना शिकवावे लागते खरंच
असाच अनुभव आहे
16 Apr 2018 - 5:40 pm | आदूबाळ
मस्त किस्से आहेत. मजा आली. आणखी लिहा.
17 Apr 2018 - 11:47 am | बिटाकाका
आवडलं लिखाण! छान किस्से आहेत.