पुतळा म्हणजे....

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
6 Mar 2018 - 6:34 pm

पुतळा म्हणजे कधी गडकरी, सावरकर तर कधी तो लेनीन,
नाव बदलता मते बदलती, पुतळा त्या वृत्तीचे दर्शन.

पुतळा म्हणजे अंध धुंद निर्बंध कधी सत्तेचा दर्पण.
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन.

पुतळा म्हणजे मूर्ती नाही, धर्म रुढींचे ना त्या बंधन.
पुतळा म्हणजे दगड नी धातू, तरीही देई कुणास चेतन.

पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण.
पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन.

पुतळा म्हणजे चुकार कुठल्या पक्ष्याचे हक्काचे घरपण..
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..

अभय-काव्यधोरणइतिहाससमाज

प्रतिक्रिया

.

प्रचेतस's picture

6 Mar 2018 - 9:31 pm | प्रचेतस

खूप काही सांगणारी कविता.

एस's picture

6 Mar 2018 - 10:17 pm | एस

चांगली आहे कविता.

अनन्त्_यात्री's picture

7 Mar 2018 - 8:23 am | अनन्त्_यात्री

...त्या व्यक्तीचे सद्गुण स्मरता, पाय मातीचे विसरुन जाणे....

प्राची अश्विनी's picture

7 Mar 2018 - 12:34 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!

नाखु's picture

7 Mar 2018 - 8:46 am | नाखु

म्हणजे मध्यरात्री भेकड उच्चाटन अणि
दिवसा कोडग जाणते समर्थन

माहितगार's picture

7 Mar 2018 - 9:14 am | माहितगार

पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..

हि ओळ विशेषतः आवडली. पुतळ्यांमध्ये, लोकमान्य टिळक प्रेरणा मुल्य शोधत. त्यांच्या मते व्यक्तीपुजा म्हणजे त्या व्यक्तिचे अंध-अनुकरण करणे नव्हे पण त्यातून केवळ प्रेरणा घेणे. टिळकांच्या मते पुतळा/मुर्ती बघणार्‍या हजारो व्यक्तींना प्रेरणा मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीनेही प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कडून काही चांगले घडले तर पुतळा संकल्पनेस यश येते.

माझ्या मते , राजकीय पुढारी जेव्हा पुतळे बसवण्याचे राजकारण करतात तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रेरणा घेण्यापेक्षा, इतर अंधभक्तांना तुम्हा अनुयायांचा मी पुढारी हे सिद्ध करण्याचा / होण्याचा उद्देश असतो - हि शुद्ध धूळफेक असते. पुतळ्याच्या रुपाने व्यक्ती पुजा केली जाणार्‍या व्यक्तीची मते बर्‍ञाचदा कालसुसंगत अथवा प्रॅक्टीकल राहीलेली नसतात, काही/ बर्‍याच अनुयायांची अपेक्षा काळ आणि परिस्थिती बदलली तरी शब्द ग्रंथपुजेने अंधानुकरण होत रहावे अशी अपेक्षा असते. शब्द पुजा व्यक्ती पूजा उणीवग्रस्त असतात हे कळले तरी बर्‍याचदा वळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॅक्टीकल अथवा काळसूसंगत निर्णय घेण्याची गरज पडते असे त्या त्या काळातील नेतृत्वाने पुतळे बनवणे / मुर्तीकण करणे मुर्तीपूजेकडे ढकलणे रास्त असते म्हणजे अंधभक्तांना पुतळा/मुर्तीपूजेच्या कर्ममांडात गुंतवले की अंधभक्तांची पावती मिळते आपले नेतृत्व प्रस्थापीत करता येते आणि दुसरीकडे पुस्तकपूजा टाळून प्रॅक्टीकल निर्णय घेता येतात.

पुस्तकांची काळानूरुप कालसुसंगतता राहत नाही आणि अनेक वेळा प्रॅक्टीकल अस्पेक्ट्स काँटेक्स्ट बदलले असतात -पुस्तकपूजा अनेकदा तापदायक ठरतात . पुस्तक पुजेपेक्षा पुतळा / मुर्तीपूजा बरी पडते. एकदा पुतळा/मुर्ती पूजा करुन झाली हार घालून झाला की प्रत्यक्षात व्यावहारीक गरजे प्रमाणे वागता येते आणि पुस्तकपुजे पेक्षा तेच बरे असते.

माहितगार's picture

7 Mar 2018 - 9:21 am | माहितगार

सांगण्याचा मुद्दा असा की, पत्त्याची खूण शिल्लक ठेवून पत्र हरवणे एका अर्थाने नव्या काळास नव्या परिस्थितीनुरुप वागू देणारे न्याय देणारे म्हणून चांगलेच असावे. आणि पुतळ्यांचे काम संपले आहे हे, हे हरवलेल्या पत्रावरचे पत्ते आहेत हे लक्षात आल्यावर ते पुतळे खाली उतरवून त्यांचे विसर्जन करण्यातही काही अयोग्य नसावे. असो

प्राची अश्विनी's picture

7 Mar 2018 - 12:34 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद आणि बरोबर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Mar 2018 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार

पुतळा म्हणजे रस्तावर पडलेले टिनाचे डबडे
कोणीही यावे आणि लाथ मारुन उडवावे

पुतळा म्हणजे कोणाची तरी जाज्वल्य अस्मिता
त्या मानाने देवळातले देव बरेच सुरक्षित असतात

पुण्यात कर्वे रोड वरचा महर्षि कर्व्यांचा पुतळा देखिल बरेच दिवस गायब झाला आहे. तिकडे म्हणे नुतनीकरणाचे काम सुरु आहे.

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2018 - 10:20 am | चौथा कोनाडा

पुतळा/मुर्ती या विषयी ओशो यांचे विचारः

OSHO

माहितगार's picture

7 Mar 2018 - 10:58 am | माहितगार

कमाल आहे, कुणी कुठे केव्हा आणि का नम्र व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतरांनी कुठेतरी नम्र होण्याबद्दल नकारात्मक अर्थ काढण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्विकारुनही एकतर ते नकारात्मक तर्क केवळ तर्कच असतात. दुसरे कुठेतरी नम्र होणार्‍ञांना त्यांच्या व्यक्तिगत इच्छे
नुसार नम्र होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास नकारात्मक अर्थ काढणार्‍यांपुढे नम्र होण्याची अथवा तमा बाळगण्याची मुळीच अरज नसते.

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2018 - 4:33 pm | चौथा कोनाडा

कुणी कुठे केव्हा आणि का नम्र व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2018 - 4:56 pm | चौथा कोनाडा

सहमत.
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.

बाकी "नकारात्मक तर्क हे केवळ तर्कच असू शकतात" आणि "तमा बाळगण्याची मुळीच गरज नसते" याच्याशी सहमत.

माहितगार's picture

8 Mar 2018 - 8:16 pm | माहितगार

पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.

बर्‍यापैकी सहमत, इथे प्रगल्भता शब्दा अर्थछटेसाठी काही पर्यायी शब्द सुचतो का म्हणून विचारात पडलोय .

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2018 - 10:38 pm | चौथा कोनाडा

धन्यु !

प्रगल्भता च्या जागी शाश्वतता योग्य होईल ?

प्राची अश्विनी's picture

7 Mar 2018 - 12:37 pm | प्राची अश्विनी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको.
पण ओशोंचे मत पटले नाही. निसर्गासमोर नतमस्तक होणे आणि मूर्तीसमोर या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या परस्पर विरोधी असतीलच असं नाही.

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2018 - 1:31 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद.
मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे.
आपल्याकडे वड अथवा इतर वृक्षाचे पुजन किंवा देवराई हा निसर्गपुजनाचाच भाग आहे.
पंचमहाभुतांना नमन( सूर्य, वारा, पृथ्वी /जमीन, पाणी आणि आकाश) हा त्याचाच भाग.
मुर्तीपुजन ते निसर्गपुजन हा टप्पा अवघड असणार.
आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !
जे लोक फक्त मुर्तीपुजा मानतात, त्यांना उद्देशून ते एक्झागरेट करून सांगितलं ओशो यांनी.

(एक शंका: ओशो-विचारची इमेज मला का दिसत नाहीय ? मी गुगल फोटोज मध्ये अपलोड केलीय. मी गुगल लॉगीन केल्यावर दिसतेय. काय सेटिंग्ज करावी लागतात ?)

माहितगार's picture

9 Mar 2018 - 2:18 pm | माहितगार

मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे.....
आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !

'निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे ' हा वाक्प्रयोग आपण आधीच्या प्रतिसादातून केला आहे. सकारात्मक अनुभूती पावित्र्य, मांगल्य, श्रद्धेय बनवण्यास साहाय्यक असते, पण अनुभूती आणि पूजा यात अल्प अंतर असावे.

दुसरे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉल्जीकल सिक्वेन्स पाहिला तर पूजांची सूरवात निसर्ग झाली असावी. त्यानंतर पूर्वज पूजा आली असावी. निसर्गाचे मानवीकरण किंवा पर्सोनीफीकेशन होतानाची स्टेज ऋग्वेदात दिसून येते (चुभुदेघे) . निसर्गपूजेचा एक उपप्रकार नैसर्गिक शक्तींना स्पिरीट आपण जसे पंच महाभूते कल्पतो तसे काहीसे समजून झाल्याचे दिसून येते.

नास्तिक सुद्धा निसर्गाच्या पंच महाभूतांनी रुद्ररुप धारण करु नये अशीच इच्छा करेल. समोरच्यांना नमवण्याची निसर्गाची क्षमता आजही असीम आहे असे वाटते. पण निसर्गाने रौद्ररुप धारण करणे काहीसे परिस्थिती जन्य आहे. सर्वसामान्य मानवास रोजच्या समस्यातून सुटका हवी यासाठी तो इतर विवीध श्रद्धांचा आसरा घेताना दिसतो त्यातच मुर्तीपूजेचाही समावेश होतो.

मूर्ती पूजा पूजांच्या स्वरुपात बरीच उशीरा आलेली दिसते. निसर्ग पूजा ते ओबड धोबड खडकांची पूजा एका बाजूला दुसर्‍या बाजूला वृक्ष पूजा (ते काठी पूजा) तिसरी पूर्वज पूजा असे पूजेचे स्वरुप विकसीत झाले असावे. सर्वसाधारण पूजा असो की मुर्ती पूजा , पूजा होण्यासाठी श्रद्धा निर्माणास साहाय्यक कथासूत्राची किमान आरंभीच्या क्षणी गरज असावी, किमान पक्षी एखादी गोष्ट पावू शकेल अथवा एखादी गोष्ट कोपू शकेल अशी भावना बळ पकडली की तिथून पुढे पुजेची कर्मकांडे आकारास येतात.

अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते. असो

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2018 - 4:23 pm | प्राची अश्विनी

छान चाललीय जुगलबंदी.:)

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2018 - 5:24 pm | चौथा कोनाडा

अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते.

बरोबर. सुंदर प्रतिसाद.

प्राची अश्विनी's picture

7 Mar 2018 - 12:40 pm | प्राची अश्विनी

नाखु, अनंतयात्री, एस, प्रचेतस, चामुंडराय, चौथा कोनाडा, माहितगार आणि पैजारबुवा ( आजकाल माझ्या मोबाईल वर पैसे टाईपलं की पैजारबुवाच येतं) मनापासून धन्यवाद!

श्वेता२४'s picture

7 Mar 2018 - 12:54 pm | श्वेता२४

पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण.
पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन.

या ओळी खास वाटल्या. खूपच छान आणि अर्थपूर्ण कविता सध्याच्या वातावरणात.

manguu@mail.com's picture

7 Mar 2018 - 5:35 pm | manguu@mail.com

हाथ आओ तो बुथ हात न आओ तो खुदा हो
तुम एक गोरखधंदा हो

इरसाल's picture

7 Mar 2018 - 8:43 pm | इरसाल

प्रत्येक राज्यसरकारने राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी १०० एकर जागा देवुन ज्यांना आपापल्या नेते, धर्मगुरु, किंवा तत्सम लोकांचे पुतळे लावायला परवानगी द्यावी. त्यासाठी भरमसाठ शुल्क लावावे म्हणजे ज्यांना खरोखरच कळकळ आहे ते जातील तिथे.

तिमा's picture

7 Mar 2018 - 8:51 pm | तिमा

आणि..... पुतळा म्हणजे हमखास शिटण्याची जागा, पक्ष्यांची आणि पक्षांचीही!!!

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2018 - 11:13 pm | चौथा कोनाडा

या वरून एक चारोळी आठवली

पुतळे उभा करून
खरंच स्फुर्ती मिळते का
एकदा सरावाचे झाल्यावर
नजर तरी वळते का ?

बहुधा चंद्रशेखर गोखले यांची आहे.

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2018 - 4:22 pm | प्राची अश्विनी

हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती, अखेर कमाई.
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2018 - 5:22 pm | चौथा कोनाडा

+१

कुसुमाग्रजांची सुंदर कविता !

पुतळा उभा करताना किंवा फोडताना त्या माणसाबद्दल आदर किंवा तिरस्कार दाखवण्यापेक्षा आपली पावर दाखवणे याचे ते साधन असते. जुन्या देवळातल्या भंगलेल्या मूर्ती, बामियान बुद्ध किती लांब यादी वाचावी? दुसर्‍या कोणाच्या आदेशावरून त्या फोडणार्‍याना त्यांच्या सौंदर्याची जाणीव एक क्षणही होत नसेल का?

माहितगार's picture

8 Mar 2018 - 8:11 pm | माहितगार

+१

भीडस्त's picture

9 Mar 2018 - 9:44 am | भीडस्त

पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन.
एकदम चपखल

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2018 - 4:20 pm | प्राची अश्विनी

सर्व प्रतिसादकर्त्यांना , वाचकांना धन्यवाद.

दुर्गविहारी's picture

9 Mar 2018 - 5:50 pm | दुर्गविहारी

खुपच सुंदर कविता आणि तितकेच उत्तम प्रतिसाद यांची मेजवानी म्हणजे हा धागा. येउ द्यात आणखी.

पद्मावति's picture

10 Mar 2018 - 3:22 pm | पद्मावति

सुंदर कविता.

मला कधीच पुतळे असे ऑड किंवा कशाचे तरी प्रतिक म्हणून वाटलेच नाहीत. अर्थात खूप पुतळे असलेल्या गावात राहतो म्हणून असेल कदाचित. बस स्टॅण्डसमोरचा डिव्हायडरचा रोड आणि शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा हे मराठवाड्यातले प्रातिनिधीक चित्र डोळ्यासमोर त्या पुतळ्याशिवाय पूर्णपणे येतच नाही. पुतळे मस्त वाटतात चौकात. कलाकाराने जीव ओतलेले पुतळे खरेच दृष्ट लागावी इतके सुंदर दिसतात. बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे. त्या घोड्याच्या नसाननसा सुध्दा धातूत उतरवणार्‍या शिल्पकाराचा हेवा वाटे. त्या देखण्या कलाकृतीला जातीय आणि राजकीय अस्मिता चिकटल्या की सगळ्यांचीच माती होते. पुतळ्याला हार घालणारे लोक, त्याला देव बनवणारे लोक, त्या पुतळ्याचे विटंबन केले म्हणून माणुसकी पेटवणारे लोक हे खरेतर महाभयंकर.

बिटाकाका's picture

11 Mar 2018 - 8:52 pm | बिटाकाका

+१००००००, अभ्या!!

बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे.

यासाठी अजून +१०००००००.

सतिश गावडे's picture

11 Mar 2018 - 9:11 pm | सतिश गावडे

तुमचे एक नास्तिक मित्र अगदी अशाच नजरेने जुनी मंदिरे पाहतात म्हणे.

प्राची अश्विनी's picture

12 Mar 2018 - 7:29 am | प्राची अश्विनी

कलाकृती निव्वळ कला म्हणून अनुभवता येण्याची कला अवगत असणारे कलंदर विरळाच!

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2018 - 4:23 pm | चौथा कोनाडा

अभ्याजी यांच्याशी सहमत !
+११,१११

आमच्या महानगरातील भक्तिशक्ती शिल्पसमुह असेच नजर खिळवून ठेवणारे आहे. संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरचे वारकरी व शिवाजी महाराज यांच्या सोबतचे मावळे यांचं अतिशय कौशल्यपुर्ण मर्जिंग सुंदर आहे. तुकाराम महाराजांच्या पुतळयाची उंची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंची पेक्षा जास्त ठेवून उत्तुंगता साधलेली आहे. ज्या ज्या वेळी इथं भेट देतो त्या त्या वेळी त्यातली अद्भुतता पाहतच राहतो.
हा सुंदर शिल्पसमुह नाशिक येथिल विख्यात शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी घडवलेला आहे. पण त्यांचे नाव तिथं लिहिण्याची सजगता दाखवलेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

भक्तिशक्ती

जेंव्हा अश्या जीव ओतून तयार केलेल्या सुंदर कलाकृतींचा राजकारणात "वस्तू" म्हणून वापर होतो तेव्हा अत्यंत वाईट वाटते.
कलात्मक सौंदर्यदृष्टीचा र्‍हास, दुसरं काय !

चौ. को. साहेब,
तुम्हाला आठवत असेल, भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा मागे पुर्ण मोकळे होते. त्या मोकळ्या अवकाशात हे शिल्प खूप उठून दिसायचे. अतिशय भव्य वाटायचे ते शिल्प. पण कर्म दरीद्र्यांनी मागे बिल्डींगा बांधायच्या परवानग्या दिलया आणि त्या शिल्पाच्या सौंदर्यात बाधा आली. आता तरी मागे झाडे आहेत म्हणुन मागची बिल्डींग दिसत नाही. नाहीतर आधी त्या पुतळ्यामागे असलेल्या बिल्डींगच्या बाल्कनीतुन कपडे/साड्या वाळत घातलेले असायचे ते पुतळ्याच्या बॅकग्राउंडला असलयामुळे खूप घाण दिसायचे.

विशुमित's picture

12 Mar 2018 - 8:14 pm | विशुमित

शिल्प बांधायच्या आधी तिथे बिल्डिंगा बांधायच्या परवानग्या नव्हत्या का ?

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2018 - 9:40 pm | चौथा कोनाडा

परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या पाहण्यात शिल्पसमुह उभारणीच्यावेळी तिथं तथाकथीत "विकास" झाला नव्हता.

अभ्या..'s picture

12 Mar 2018 - 10:42 pm | अभ्या..

मला फार आवडते भक्ती शक्ती

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2018 - 10:45 pm | चौथा कोनाडा

होय सर. इमारती व्ह्यायच्या अगोदरचे शिल्प मला चांगलेच आठवतेय. तेंव्हा वाहतुक अन गजबजाटही कमी होता, पथारीवाले, खेळणीवाले यांचे अतिक्रमण व्ह्यायचे होते. खुपच रमणीय सुंदर होता हा परिसर. आता हा परिसर पाहिला की वाईट वाटते की एव्हढं सुंदर स्फुर्तीस्थळ आता लहान मुलांचा बगिच्या व मोठ्यांसाठी पिकनिक स्पॉट झालाय !

पुतळ्यांच्या मागे इमारती होणार आहेत हे कळताच शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी लगेचच बिल्डर लोकांची संपर्क साधून या पुतळयांचं सौंदर्य बाधीत होऊ नये म्हणुन योग्य त्या सुचना, मार्गदर्शन दिले होते, पण ते पाळले गेले नाही. इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती, पण काही उपयोग झाला नाही.

दुर्दैव !

तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००% सहमत आहे.
पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?
या पैकी काहीजण प्रेरणा आणि रसग्रहण घेतच असतील.
त्या गणेश तलावाचा उपयोग बगिच्यासाठी करायला हवा होता. पण तिथे एन्ट्री फी आकारतात बहुतेक. (इतरही काही करणे असतील )
....
कै. गर्गे नी चुकीच्या लोकांकडे संपर्क केला असे राहून राहून वाटते. ( त्या आधी प्रशासनाकडे देखील म्हणणे मांडलेच असणार).
इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती तरी ते करून घायला काय हरकत होती?

चौथा कोनाडा's picture

15 Mar 2018 - 10:47 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद.

पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?

फारच गंभीर प्रश्न आहे हा. मैदाने व मोकळ्या जागा इ अतिक्रमण / कमर्शियलाझेशन ने व्यापून टाकल्या जाताहेत. भविष्यात अवघड आहे.

गणेश तलावाचा वापर करून त्याभोवती सुंदर उद्यानाची (लॅण्डस्केपड गार्डन) रचना केलेली आहे. हे वीर सावरकर उद्यान प्राधिकरणातला आकर्षण बिंदू आहे.
आंजावर फोटो आहेत. पाहता येतील. योग आलयास नक्की भेट द्या. माझ्या माहिती नुसार गणेश तलावाला एन्ट्री फी नाहीय, फक्त वीर सावरकर उद्यानाला आहे.
दोन्हीची कंपाऊंडस वेगवेगळी आहेत.

दोनतीन वर्षापुर्वी तिथं मिपाचा कट्टा झाला होता. मी पहिल्यांदाच मिपाकट्टयाला उपस्थित राहिलो. ज्याम धमाल आली होती त्याची आठवण झाली.
डॉ सुहास म्हात्रे यांनी सावरकर उद्यानाचे काही सुंदर फोटो कट्ट्याच्या वृतांतात प्रतिसादात टाकलेले आहेत ते खालील लिंक वर दिसतील.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

पुंबा's picture

13 Mar 2018 - 11:34 am | पुंबा

कविता खुप आवडली.
गोखले अर्थशास्त्र संस्थेत नामदार गोखलेंचा पुतळा आहे. संगमरवरात केलेला, इतका सुबक, सुंदर पुतळा मी आजवर पाहिला नव्हता. असे, संगमरवरात केलेले पुतळी नसतात का आज काल? तो कमीत कमी ८०-९० वर्षे जुना असावा.

प्राची अश्विनी's picture

13 Mar 2018 - 7:14 pm | प्राची अश्विनी

_/\_

कुणाला पुतळे हे प्रेरणा देणारे वाटतात तर कोणाला ते कालांतराने निरुपयोगी वाटतात.कधी कधी या पुतळ्याची मार्मिक चर्चाही घडत असते."पुतळे म्हणजे पक्षाची सोय"अशा प्रकारचे द्विअर्थी विधान ऐका नेत्याने केले होते. कांही नेत्यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर विश्वास नसल्या मुळे आपल्या जिवंपणीच स्वतःचा पुतळा उभा करून घेतला.मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची तर एक सत्य घटना अशी की लोकांनी श्री.राजीव गांधी यांचा पुतळा मोठ्या प्रेमानी उभा केला, मात्र बनवणाऱ्याने तो इतका चुकीचा बनवला की त्यात राजीव गांधी कुठेच दिसत नव्हते. यावर आनेक वादंग झाले. पुतळा काढून टाकण्या साठी निर्वाणीचे इशारे झाले , मोर्चे झाले. हा पुतळा कुणा सारखा दिसतो याचे रोज एक नवनविन नाव पुढे येत असे.