कधीतरी .... कुठेतरी....
.........खरेतर लेखन हा आमचा प्रांत नव्हे, तरिपण या छायाचित्रांचे थोडेसे रसग्रहण करण्याचा एक प्रयत्न.....
खालील चित्राचे चार भाग, म्हणजे आकाश, दूरचा डोंगराळ प्रदेश, खालील जमिनीचा उतार, घरे आणि त्याभोवतालची झाडे, खडक.... या चारी भागात एक सुंदर समतोल तर आहेच, शिवाय या सर्वांवर असलेले धुक्याचे एक हलकेसे आवरण या चारी भागांना बांधून ठेवते. अगदी समोरील झुडुपांचा, घराखालच्या खडकांचा, तसेच घरांच्या छपरांच्या सावलीचा भाग, लहान झाडांचे खुंट आणि मोठ्या झाडांच्या फ़ांद्या...या सर्व चित्रात विखुरलेल्या गहिर्या जागा, आणि तश्याच विखुरलेल्या प्रकाशमान जागा... मुख्यतः झाडां-झुडुपांवरील ऊन्ह आणि दूरची पायवाट, हे या चित्राला विषेश उठाव देणारे भाग, पण तेही अगदी हवा तेवढाच, त्यात भडक नाट्यमयता अगदी नाही......घरे मानवनिर्मित असली, तरी त्यांच्यावर वर्षानुवर्षे झालेल्या निसर्ग-चक्रांच्या परिणामी त्यांचे भोवतालच्या निसर्गाशी घडून आलेले अतूट नाते....आता निसर्गाने त्यांना आपल्या उबदार कोषात आपलेपणाने सामावून घेतलेले आहे.....खरंच, अश्या ठिकाणी रहायला किती छान वाटेल.....
खालील दृष्य बघताना अपली नजर डावीकडून खाली वेगाने उतरत, ठेचाळत, गहिर्या हिरवेपणात चिंब भिजत, लाल-सोनेरी उन्हात न्हाणार्या घरापाशी थबकत, अगदी उजवीकडल्या दाट झाडीत पहुचते न पहुचते, तोच तिथले इंद्रधनुष्य आपल्याला उंच उंच आकशात भरार्या घ्यायला लावते....तिकडून ढगांमध्ये रमत गमत आपण डावीकडल्या जुन्या घरांच्या चिमण्यांमधून खाली उतरतो, आणि परत त्याच अटळ, पण हव्या हव्याश्या वाटणार्या उताराच्या प्रवासाला लागतो....यंदा आपण थोडेसे जास्त तपशील बघतो, जसे दोन्ही झाडांचं एकमेकांशी चाललेलं हितगुज, आणि खालच्या हिरवाईवर इथे तिथे लाजत लाजत पसरलेलं थोडंस ऊन्ह.... आकाशाचा पसारा मोठा असला, तरी जमिनीच्या हिरव्या गहिराईमुळे आणि त्यातील अनेक बारकाव्यांमुळे एकंदरित तोल बरोबर साधला जातो, आणि या दोघांना जोडणारे इंद्रधनुष्य ढगांमध्ये शिरता शिरता आपल्याला अलगदपणे तिथे सोडून स्वतः मात्र हळुच हरवून जाते...
रात्रीच्या वेळी या गूढरम्य जागी चालणारा हा एकला प्रवासी डावीकडल्या उबदार घरात शिरून विसावणार, की पलिकडल्या घराच्या पायर्या चढून हिरवट, काळोखे दार ठोठावणार? की दाट काळोखाने वेढलेल्या गल्लीत शिरणार? पहाट होईपर्यंत हा असाच भटकत राहणार का? तो जर मी असतो, तर नक्कीच भटकत बसलो असतो.....
असावे घरटे आपुले छान......
इथे आपले कोणीच नाही.....तरिपण इथून निघूच नये, असे वाटते....पण जरा जपून....जीएंच्या 'प्रवासी' मधील "ते" गाव हेच तर नव्हे?
पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार?
इथे राहणारी माणसे पण अशीच वॄद्ध, जराजर्जर असतील का? त्यांना मुले, सुना, गोजिरवणी नातवंडे असतील ना?
रोमच्या प्राचीन वैभवाचा सूर्य केंव्हाच ढळला...आता उरलेत भग्नावशेष.....पण तेही किती भव्य दिव्य....
या धबधब्यासोबत आपणही खालच्या कुंडात कोसळावे....मग पक्षी बनून दूर दूर उडून जावे.....
महाराज अजून नाही का पहुचले गडावर? त्यांचा इशारा आला, की मगच मी हा देह सोडेन....
प्रतिक्रिया
26 Mar 2010 - 4:53 pm | विसोबा खेचर
सु रे ख..!
हा धागा या नियमाला अपवाद समजला जावा..
तात्या.
26 Mar 2010 - 5:11 pm | गोगोल
चान्गले फोटोग्राफ्स
26 Mar 2010 - 5:26 pm | चित्रगुप्त
धन्यवाद...
ही चित्रे इथे देण्यात काही कॉपीराईट वगैरे भानगडी काय आहेत, हे ठाऊक नाही, परंतु इतकी सुंदर चित्रे बघितल्यावर रहावले गेले नाही.....
अशी काही भानगड असल्यास कळवावे.
चित्रगुप्त
26 Mar 2010 - 5:37 pm | कराडकर
खूपच छान आहेत, कुठे मिळाले ?
26 Mar 2010 - 6:48 pm | राघव
कुठे मिळालीत? मस्त आहेत!
राघव
27 Mar 2010 - 3:34 am | राजेश घासकडवी
प्रथम त्यातली बरीच पेंटिंगं वाटली होती...सर्वांमध्ये स्वप्नवत छटा आहेत.
राजेश
27 Mar 2010 - 5:38 am | चित्रगुप्त
ही चित्रे बघताना एकदा (किंवा वाटल्यास दोनदा) कंट्रोल की दाबलेली ठेऊन "प्लस" की दाबावी. म्हणजे एकंदरीत देखावा व अक्षरे मोठी होऊन जास्त बरे दिसेल. मुख्य चित्र पडद्याच्या बरोबर मध्यभागी करून घ्यावे.
या चित्रांवर आणखी भाष्य केल्यास छान वाटेल...
चित्रगुप्त.
27 Mar 2010 - 7:14 am | मीनल
छान चित्र आणि लेखन ही .
दोन्ही आवडले .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
27 Mar 2010 - 7:19 am | प्राजु
+१
क्लास!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
27 Mar 2010 - 5:48 pm | शशिकांत ओक
चित्रे तर अप्रतीम आहेतच पण मोजक्या व तरल भाषेतील आपल्या रसग्रहणाने चित्रकथेला एक गूढात्मक पार्श्वभूमी लाभली आहे.
शशिकांत
28 Mar 2010 - 9:18 pm | अभिशेक गानु
छायचित्रे पाहताना मनात उमट्णार्या भावनचे तरल चित्रिकरण!
27 Oct 2010 - 10:00 pm | चित्रगुप्त
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.
खूप काळानंतर मिपावर आलो आहे.
28 Jan 2018 - 9:13 pm | चित्रगुप्त
मिपावर उचकापाचक करत असता अचानक माझ्या मिपावरील लेखनापैकी अगदी सुरुवातीच्या काळातील हा मार्च २०१० चा धागा दिसला. तेंव्हाच्या लेखनाची जरा गंमत वाटली, तस्मात वर काढत आहे.
29 Jan 2018 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट आहेत सगळी चित्रे ! धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल.
पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार?
हे चित्र आहे, फोटो नाही, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही ! चित्राच्या तळाशी असलेली पायवाट म्हणजे अशक्य चित्रकला आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!
9 Apr 2024 - 5:53 am | चित्रगुप्त
माझा हा चौदा वर्षांपूर्वीचा मिपावरील अगदी पहिला धागा. यातला एकही फोटो आता दिसत नाहिये, आणि माझ्या लक्षातही नाहिये कोणते फोटो होते ते. यावर काही उपाय आहे का ?
9 Apr 2024 - 9:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटोच्या लिंका तेव्हाही गंडल्या असाव्यात असे वाटते.
-दिलीप बिरुटे
9 Apr 2024 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फूल एचटीएमल, पीएचपी कोड, प्लेन टेक्स, यात मिपावर काही काळापासून घोळ आहे, तांत्रिक बाबीत जरा मिपा मागे पडत आहे आणि जग पुढे चालले आहे, फुकट आहे म्हणून आपल्याला आहे तसं इंजॉय करावे लागते.
मिपाची तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रशांत यांना कळवून बघा. काही रिप्लाय आला तर, नशीब समजावे. कोण बघतं रे तांत्रिक बाजू...!
गुढीपाडव्याच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(आहे तसं मिपा सोसणारा मिपाकर)
9 Apr 2024 - 9:25 am | प्रचेतस
सायकल जरा बाजूला ठेवली तरच प्रशांतला वेळ मिळेल ना भो.
9 Apr 2024 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय, २०१४ पासून यांचं सायकल प्रमाण फार वाढलय -सुत्र
-दिलीप बिरुटे
10 Apr 2024 - 4:02 pm | चित्रगुप्त
जानेवारीत पुण्यात प्रशांतची भेट झाली तेंव्हा या विषयावर चर्चा झाली होती. त्याने सांगितलेल्या तांत्रिक माहितीप्रमाणे जुन्या लेखातले फोटो अदृष्य होणे हे अटळ आहे. त्यावर उपाय म्हणजे खुद्द मिपावर फोटो चढवता येणे. परंतु सध्यातरी ते शक्य दिसत नाही, असे म्हणाला होता.
10 Apr 2024 - 4:51 pm | चौथा कोनाडा
फोटोचा संदर्भ घेऊन मांडलेलं मुक्तक आवडलं !
फोटो गायब होण्याला उपाय नाही असं दिसतंय !
मिपाने हे धागे संपादित करून नवे फोटो चढवण्याची सोय द्यावी.
ते मुळ फोटो नाही मिळाले तर धाग्याला, लेखाला साजेसे दुसरे फोटो चढवता येतील !