मित्रांनो,
हातातील सर्व लिखाण बाजूला ठेवून हा लेख लिहायला घेतला आहे याचे कारण आज बरोबर २१६ वर्षापूर्वी एक थोर शायर या पृथ्वीतलावर परमेश्वराने धाडला आणि अगणित अक्षरश: अगणित रसिकांना त्याने त्याच्या शायरीने वेड लावले. नजिकच्या काळात वेड लागलेला मीही त्यातलाच. त्याच्यावर आज लिहिले नाही तर त्याच्या दरबारात क्षमा मिळेल की नाहे याची शंकाच आहे. या थोर मनस्वी माणसाचे नाव होते मिर्झा ग़ालिब.
हे लिहावे म्हणून माहिती गोळा करावी म्हणून संग्रहातील एक पुस्तक उघडले तर लक्षात आले की नव्याने ते लिहायची आवश्यकता नाही. कारण श्री रसेल यांच्या पुस्तकाचे वर्णन श्री खुशवंत सिंगांनी ‘कुठल्याही बाजूने विचार केला तरीही हे पुस्तक ग़ालिबवरचा या जगातील शेवटचा शब्द आहे’ असे केले आहे आणि ते खरे असल्यामुळे यानंतर मी अजून काही लिहिण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. त्या पुस्तकात श्री. रसेल यांनी जे त्याच्या १००व्या पुण्यतिथीला भाषण केले आहे त्याचेच भाषांतर करुन त्या थोर माणसाला वंदन करावे म्हणून हा लेखन प्रपंच.
ग़ालिबला कोणी काहीही म्हणो तो कर्जबाजारी हो़ऊन मेला असो किंवा तो सुरवातीच्या काळात लोकांना पैसे मागत असे असे म्हणत असो पण ग़ालिबच्या उचंबळून येणाऱ्या भावनांनी शब्दांचा जो संसार मांडला त्यात गुंतून न पडणारा विरळाच.
या लेखमालेच्या शेवटी त्याच्या काही शेरांचे आपण रसग्रहणही करणार आहोत किंवा आपण सर्वजण आपल्याला जी ग़जल आवडते त्याचे रसग्रहण प्रतिक्रियेत देऊयात. ही लेखमाला जरा मोठी होण्याची शक्यता आहे .........
भाषण: (काही बदलासहीत जे मी केले आहेत)
आज म्हणजे १५ फेब्रुवारी १९६९ला ग़ालिबला आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली. तो एक थोर शायर होता त्याची उर्दू व फार्सी भाषांवर हुकमत होती, त्याच्या शायरीबद्दल बोलायची गरज नाही परंतू आज आपण ग़ालिब माणूस म्हणून कसा होता, त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या शायरीवर कसा व काय प्रभाव पडला हे पाहणार आहोत. त्याचे जे चित्र मी आपल्यासमोर रेखाटणार आहे, ते त्याच्याच लिखाणातून उमजले आहे, साकारले गेले आहे. माझ्या वाचकांमधे काहीजण ग़ालिबच्या शेरोशायरीशी चांगलेच परिचीत असतील तर काहींना त्याच्या गायलेल्या ग़ज़ला माहीत असतील तर काही जणांचा त्याच्या शेरांचा चांगलाच अभ्यास असेल. पण ते सर्व त्याच्या प्रतिभेतून का अवतरले याचा उलगडा कदाचित आपल्याला आता होईल. त्याच्या उर्दू व फार्सी लिखाणातून आपल्याला ग़ालिब उलगडायचा आहे. खरे तर त्याच्या उर्दू व फार्सी लिखाणात महदअंतर आहे. त्याची उर्दू अत्यंत अनौपचारिक गप्पा मारावी तशी लिहिलेली आहे तर फार्सी अत्यंत गंभीर व औपचारिक, व त्याने ते लिहितांना अत्यंत काळजी घेतलेली आहे हे सतत जाणवत रहाते. काही जाणकारांचे असेही म्हणणे आहे की या कृत्रीमतेमुळे जरी ते लिखाण चांगले वाटले तरी त्या लिखाणातील आत्मा हरविला आहे. अर्थात माझे तसे म्हणणे नाही...
ग़ालिबचा जन्म एका तुर्की वंशाच्या सरदार घराण्यात झाला. हे घराणे मध्य आशियामधून भारतात आपल्या तलवारीच्या जोरावर शहाजहानच्या दरबारात प्रस्थापित झाले.. हालि ग़ालिबच्या शब्दात सांगतो,
‘ग़ालिबचे पूर्वज "तुर'शी नाते सांगतात. हा तुर जगप्रसिद्ध फार्सी राजा फरिदूनचा मुलगा. जेव्हा कयानी घराण्याने आख्खा पर्शिया व तुराण गिळंकृत केला तेव्हा तुराणींची सत्ता काही काळ खंडित झाली व ते सत्ता व संपत्तीपासून वंचित झाले हे खरे असले तरीही त्यांच्या हातातील तलवार तळपतच होती. कारण या तुर्कांच्या घराण्यात एक आगळीच परंपरा होती ती म्हणजे माणूस मेल्यावर त्याच्या मुलांना फक्त त्याची तलवारच मिळायची व इतर संपत्ती मुलींमधे वाटली जायची. पुढे अनेक वर्षांनंतर या तुर्कांनी मुसलमानी अमल जेव्हा चालू झाला तेव्हा म्हणजे सेल्जुक घराण्याने परत एकदा आपली सत्ता प्रस्थापित करुन एका साम्राज्याचा पाया रचला. पुढे या घराण्याने इराण, तुराण, सिरिया, रुम इत्यादि प्रदेशावर आपली सत्ता गाजविली. सेल्जुक घराण्याचा पाडाव झाल्यावर त्यांची मुले इतस्तत: पांगली. त्यातील एकाचे नाव होते तारसाम खान जो समरकंदला स्थायिक झाला. ग़ालिबचा आजोबा या तारसामखानाचा वंशज.'
ग़ालिबला त्याच्या घराण्याची ही गादी पुढे चालविता आली नाही याचा खेद वाटत असे. त्याचे आजोबा शहा आलमच्या पदरी सरदार होते व वडीलही सैन्यात होते, जे एका लढाईत मारले गेले होते. पण ग़ालिबच्या नशिबी काही वेगळेच लिहिले होते. त्याच्या एका फार्सी पत्रात तो लिहितो,
‘मी कमनशिबी ! दुर्दैव माझी पाठ सोडत नाही म्हणून मला आज माझी रिकामी धान्याची कोठारे बघावी लागत आहेत. मी माझ्या पूर्वजांप्रमाणे हातात तलवार घेऊन, लढाईला जाऊ शकत नाही ना ॲव्हिसेनासारख्या ज्ञानी माणसाप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्याची माझी पात्रता आहे. मग मी म्हटले चल दर्वेशी हो आणि निरिच्छ, स्वछंदी आयुष्य जग. कशातही अडकू नकोस. पण मी जन्मत:च बरोबर घेऊन आलेल्या कवितेच्या प्रेमापोटी मी तेही करु शकत नाही. या कवितेने माझे आयुष्य व्यापून टाकले आहे. जणू ती मला म्हणते, ‘ मनाच्या आरशात शब्दांच्या प्रतिमेचा खरा अर्थ पकडणे हे सुद्धा मोठे काम आहे. लढाया गाजविणे आणि ज्ञान प्राप्त करणे हे तुझे काम नाही. तो दर्वेशी होण्याचा विचार झटकून टाक आणि कवितेचा रस्ता पकड. तेच योग्य आहे’. ते ऐकून मी या काव्यसागरात माझी नाव ढकलली आहे. माझी लेखणी या नावेचा झेंडा आहे आणि माझ्या पूर्वजांचे तुटलेले बाण माझी लेखणी.'
ग़ालिबचा जन्म २७ डिसेंबर १७९७ आग्र्यात झाला व त्याचे लहानपण त्याने तेथेच घालविले. तो १३ वर्षाचा असताना त्याचे लग्न एका ११ वयाच्या मुलीशी लाऊन देण्यात आले. थोड्याच दिवसात ग़ालिबने आपले बस्तान दिल्लीला हलविले. आयुष्यात बऱ्याच उशीरा त्याने त्याने त्याच्या आग्र्याच्या आठवणींना एका तरुण हिंदू मित्राला लिहिलेल्या पत्रात उजाळा दिला. त्याने लिहिले,
‘ तुझे आजोबा आणि मी साधारणत: एकाच वयाचे असू. असलाच तर एकदोन वर्षाचा फरक असेल. असेल माझे वय १९ किंवा २०. आम्ही अगदी जिवलग मित्र होतो आणि आम्ही बुद्धिबळ खेळायचो. त्यांचे घर जवळच होते. त्याला वाटेल तेव्हा तो आमच्या घरी यायचा व रात्री उशीरापर्यंत गप्पा मारायचा आम्हाला छंद होता. मला अजून आठवतंय, आमच्या घरांमधे एका नाचणारीचे घर व दोन गल्ल्या होत्या. आत्ता जे लक्ष्मीचंद सेठ यांचे घर म्हणून ओळखले जाते ते आमचे होते. मी त्या हवेलीच्या पुढच्या सोप्यातच वेळ घालवित असे. मी आमच्या गल्लीतील घराच्या गच्चीवरुन पतंग उडवित असे व राजा बलवान सिंगच्या पतंगाशी पेच घेत असे.’
या तरुणपणाच्या आठवणींबाबत तो त्याच्या खास फार्सीमधे त्याच्या बायकोच्या नातेवाईकाला, झिया-उद्दीन अहमदला लिहितो, (त्या वेळी अहमद आग्र्याला भेट देणार असतो)
‘दुर्दैवी ग़ालिबच्या उसाश्यांनी शुद्ध केलेली आग्राची हवा व अश्रूंनी स्वच्छ केलेल्या आग्राच्या पाण्याने तुमचे ह्र्दय आनंदीत होवो. हे दोन आग्र्याचे आत्मेच आहेत. आपण जरी दूर असलो तरीही माझे मन तुमच्यापाशीच आहे. या माझ्या भरारी घेणाऱ्या मनाने आपल्याला इतक्या जवळ आणून ठेवले आहे की आता यापेक्षाही जवळ येणे शक्य नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही माझ्या जन्मगावाला भेट देत आहात ही गोष्टच आपण किती जवळ आहोत याची साक्ष आहे. माझे अक्ष व ह्रदय तुमच्याबरोबर असल्यामुळे मला माझ्या जन्मगावी प्रत्यक्षात असल्याचा भास होतो आहे त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे. माझ्या या जन्मगावाकडे कोणी वाकड्या नजरेने बघायचे धाडस करु नये उलट तिच्या रस्त्यावरुन चालताना पारमेश्वराकडे आग्ऱ्याच्या भल्यासाठीच प्रार्थना करावी कारण या शहराने एके काळी माझ्या विदिर्ण झालेल्या ह्रदयास सांभाळले आहे. एक काळ असा होता की आग्र्याच्या मातीत मादक मँड्रेकशिवाय काहीही पिकत नसे ना झाडांना कसली फळे लागत. जणू विदिर्ण ह्रदयांसाठी या शहराने ती सोय केलेली असावी. तिच्या बागेतून मंद वाहणाऱ्या मादक वाऱ्यांनी कोमेजलेली ह्रदये उमलत होती व दारुड्यांना सकाळच्या प्याल्यांची आठवणही होत नसे. एवढेच काय धर्ममार्तंडानाही परमेश्र्वराची प्रार्थना करण्यासाठी मान तुकविण्याचे भान रहात नसे. आग्र्याच्या बागेतील फुलात उडणाऱ्या प्रत्येक धुळीच्या कणावर माझे प्रेम आहे व त्यातील प्रत्येक पानावर दैवीकृपेचा वर्षाव होवो..................
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
27 Dec 2013 - 11:26 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
27 Dec 2013 - 11:26 pm | खटपट्या
अप्रतिम सुरवात सर !!!
अजून एक जबरदस्त मालिका वाचायला मिळणार
28 Dec 2013 - 11:55 am | लॉरी टांगटूंगकर
वा!!!जयंतकाकांची लेखमालिका सुरु झाली की आवडत्या लेखकाचे न वाचलेलं पुस्तक हाती लागल्याचा आनंद होतो.
28 Dec 2013 - 8:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
काका धन्यवाद हे लिहायला घेतल्याबद्दल...
वाचतोय...
29 Dec 2013 - 10:06 pm | चाणक्य
वाचतोय
28 Dec 2013 - 8:58 pm | जेपी
गालीब आवडता शायर . पुभाप्र
29 Dec 2013 - 6:10 pm | कुमारकौस्तुभ
मुद्दते हुइ के गालिबं गुजर गया पर अब भी याद आता है
उसका वो हर एक बात पे कहना के यु होता तो क्या होता ?
सुंदर विषय !
सुंदर सुरुवात !!
उत्सुकतेच्या उंबरठ्यावर !!!
29 Dec 2013 - 6:30 pm | कवितानागेश
छान सुरुवात. :)
27 Dec 2017 - 10:32 am | जयंत कुलकर्णी
आज गालिबचा जन्मदिन.... परत एकदा प्रयत्न करुन ही मालिका पूर्ण करावे असे मनात येते आहे..
27 Dec 2017 - 12:57 pm | सानझरी
नक्की पूर्ण करा.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहोत..