एका अनावर कैफात लिहिली होती
ती कविता
नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण
थोडी खरीही वाटली
ती कविता
नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा
जास्तच खरी वाटली
ती कविता
नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ?
मग खोडायला गेलो दोन चार ओळी
तेव्हा
ओळीतल्या रिकाम्या जागेतून
सण्णकन फणा काढत
जिव्हारी डसली
ती कविता
प्रतिक्रिया
22 Dec 2017 - 10:54 am | चाणक्य
एकच नंबर.
22 Dec 2017 - 11:45 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त, सुरेख
कचकन डसली कविता
पैजारबुवा,
22 Dec 2017 - 12:08 pm | पगला गजोधर
आवल्डी.... कविता नेक्स्ट डोर ...
22 Dec 2017 - 1:23 pm | पगला गजोधर
शब्दजिल्ब्यां वगळीता, अर्थ गवसले नवे ।
आज दिसले काव्या, सखोल जे सर्वा हवे ।।
अबोल शब्द बहरले, अभावे हळूच उमलले ।
ढोल हे सुखावले, मौन जागे तुझ्यासवे ।।
22 Dec 2017 - 12:59 pm | पुंबा
अहाहा!!!!
बर्याच दिवसांनी लखलखीत, बावनकशी कविता वाचायली मिळाली.
22 Dec 2017 - 1:07 pm | नाखु
मौनाची भाषा काही कमी नाही
आवडलं
नितवाचक नाखु
22 Dec 2017 - 9:26 pm | राघव
अतीव सुंदर! कल्पना अत्त्युत्तम!! :-)
22 Dec 2017 - 9:49 pm | हरवलेला
मस्तच !!!
23 Dec 2017 - 11:01 am | अनन्त्_यात्री
सर्वांना धन्यवाद!
23 Dec 2017 - 11:43 am | दुर्गविहारी
खुपच छान ! प्रतिभा जेव्हा अशी उसळी घेते तेव्हाच उत्स्फुर्त आणि बावनकशी काव्य येउ शकते. कण्हत कुंथल काढलेल्या कविता एकताना आणि वाचताना जांभया आवरत नाहीत. या निमीत्ताने आरती प्रभुंच्या "ये रे घना ये रे घना" या काव्याच्या किस्स्याची आठवण झाली.
23 Dec 2017 - 12:09 pm | प्राची अश्विनी
अतिशय सुंदर!
23 Dec 2017 - 8:33 pm | एस
वा! अस्सल बावनकशी कविता.
23 Dec 2017 - 9:59 pm | अनन्त्_यात्री
किस्सा काय आहे ते सांगाल का?
-आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
25 Dec 2017 - 11:13 am | दुर्गविहारी
आधी आरती प्रभु यांनी ये रे घना या कवितेचे फक्त एकच कडवे लिहीले होते, 'फुले माझी अळुमाळू, वारा पाहे चुरघळू'. हि कविता जेव्हा हॄद्यनाथांच्या हाती पडली तेव्हा त्यातील गेयता जाणवून त्यांनी गाणे करायचे ठरविले आणि खानोलकरांना बोलावून उरलेले कडवे पुर्ण करण्यास सांगितले. मात्र खानोलकारांनी बाळासाहेबांना सांगितले कि हे कडवे रचनाता आलेली प्रतिभा परत येणे कठीण आहे. म्हणून शांता शेळके यांना प्रभुकुंजवर उरलेले कडवे लिहीण्यासाठी बोलावले गेले, मात्र त्यांनाही पुढे जाता येईना. बाहेर गच्चीत पान खात खानोलकर उभे होते, अचानक ते आत आले आणि दुसरे कडवे लिहून घेण्यास सांगितले, 'टाकुनीया घरदार नाचणार नाचणार'.
प्रतिभा अशी अवचित येते आणि काहीतरी भव्यदिव्य निर्माण करुन जाते. अजुन एक गाणे, 'ती येते आणिक जाते' हे ही अवचित आलेल्या प्रतिभेलाच उद्देशून आहे. बर्याचजणांना ते प्रेयसीला उद्देशून आहे असे वाटते, पण 'येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागते' म्हणजे प्रतिभेच्या कळयाने निर्माण झालेली फुलेरुपी कविता असा सुप्त अर्थ आहे.
25 Dec 2017 - 12:15 pm | एस
क्या बात है! भारीच किस्सा. एक किस्सा शांताबाईंचा असाच आहे. सुरेश भट यांची गझल 'सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या...' मध्ये एक ओळ आहे 'पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे'. यातली 'तुझे हसू आरशात आहे' ही ओळ शांताबाईंनी सुचवलेली आहे.
26 Dec 2017 - 4:43 pm | अभिजीत अवलिया
वा!
असेच मी मंंगेश पाडगावकर यांंच्या 'श्रावणात घन निळा बरसला' या काव्याबद्दल ऐकलेय.
भर उन्हाळ्यात दादर ते चर्चगेट या जेमतेम अर्ध्या तासाच्या लोकल प्रवासात हे संंपूर्ण गीत त्यांंना सुचले असे ऐकलेय.
अनन्त यात्री यांंची कविता देखील छान आहे.
23 Dec 2017 - 10:01 pm | अनन्त्_यात्री
आपल्या प्रतिसादांबद्दल आभार.
26 Dec 2017 - 11:11 am | अनन्त्_यात्री
आपण दिलेली प्रतिभा-प्रसादाची उदाहरणे आवडली.
26 Dec 2017 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
26 Dec 2017 - 1:36 pm | अनन्त्_यात्री
प्रतिसादाबद्दल आभार.
26 Dec 2017 - 3:19 pm | शलभ
मस्त कविता आहे.
27 Dec 2017 - 11:00 am | अनन्त्_यात्री
आपल्या प्रतिसादांबद्दल आभार.
1 Jan 2018 - 9:08 am | गबाळ्या
यातून तुम्हाला नेमकं काय व्यक्त करायचंय हे नीटसं कळालं नाही.
(सहज वाटलं म्हणून )
तुमच्या बाकीच्या कविताही मी वाचल्या त्यातल्या काही छानही आहेत. त्यातल्या बऱ्याच कविता ह्या कविता या विषयावर आहेत. त्या सगळ्या वाचून असे वाटले कि त्यामार्फत तुम्ही तुमच्या कविता, कवितांची पद्धत 'justify' करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही आता पर्येंत काही चांगल्या कविता केल्या आहेत आणि इथून पुढेही चांगल्या कविता करू शकाल. त्यामुळे तुम्हाला असे 'justify' करण्याची गरज नाही. कविता करत रहा.
3 Jan 2018 - 5:58 pm | अनन्त्_यात्री
माझ्या कवितांवरील कविता वाचून मी "माझ्या कविता, कवितांची पद्धत 'justify' करण्याचा प्रयत्न करीत आहे" हे आपणास का वाटले हे मला नीटसे कळले नाही.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.