अनवट किल्ले २३: फारुकी राजवटीचा "थाळनेर" ( Thalner )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
1 Dec 2017 - 6:36 pm

महाराष्ट्राचा ईतिहास आभ्यासताना आपल्याला सातवाहनांपासून ते यादवांची कारकिर्द माहिती असते. बहामनी कालखंड व त्याची शकले झाल्यावर निजामशाही, आदिलशाही, ईमादशाही यांनी महाराष्ट्राच्या विशिष्ट भुप्रदेशावर कसे राज्य केले ते ही ज्ञात असते. पण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकाकडच्या प्रदेशात म्हणजे खानदेशात फारुकी राजवट नांदली याचा थांगपत्ता नसतो. थाळनेरच्या भुईकोटाच्या धाग्यात आपण हि माहिती घेउ व ईतिहासाचे एक नवे पान उलटूया. सध्या खानदेश म्हणले कि नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा क.स.मा.दे. (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ) हा परिसर येतो. सध्या तरी धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील किल्ल्यांवरच लिहीणार आहे. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांवर लिहीताना क.स.मा.दे. परिसरावर लिहीन.
थाळनेर म्हणजे थळ+नीर या शब्दांची संधी. थळ म्हणजे जमीन आणि नीर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर. धुळ्यापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर तापी नदीकाठी थाळनेर गावात हा किल्ला असून अनेक राजवटी व त्यांचा वैभवशाली काळ पाहिलेला हा किल्ला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. थाळनेर हे एकेकाळी खानदेशची राजधानी व सुरत- बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र होते.
थाळनेर बद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. मलिकखान हा लष्करी सेवेतील एक सैनिक होता. तो काही कारणाने या परिसरामध्ये आला असताना त्याने येथे एक विचित्र दृष्य पाहील. तो गावात आला असताना त्याला एक कुत्रा सशाच्या मागे धावताना दिसला. कुत्रा सशाचा पाठलाग करीत असताना पुढे धावणारा ससा अचानक थांबला आणि त्याने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाच्या या पावित्र्याने कुत्रा माघारी पळू लागला आणि ससा त्याचा पाठलाग करु लागला. असे अनोखे दृष्य पाहून मलिकखान एकदम चकीत झाला. त्याने विचार केला की ज्या भूमीमध्ये ससा कुत्र्याला पळवू शकतो ती भूमी निश्चीत शौर्याची भूमी असली पाहीजे.( अर्थात हि कथा अनेक संदर्भात एकली आहे, तेव्हा यात फार अर्थ नसावा ) या भूमीमध्ये जर आपण वास्तव्य केले तर निश्चितच आपल्या हातून पराक्रम घडेल व आपल्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. म्हणून मलिकखान याने तेथील वतनदाराला ही घटना सांगून तेथे रहाण्याची परवानगी मागितली. वतनदाराने या गोष्टीला नकार दिला. मलिकखान तडक दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान फिरोजशहा तुघलक याची सत्ता होती. या सुलतानाकडून मलिकखान याने एका छोट्या पण महत्त्वाच्या कामगिरीबद्दल थाळनेर व करवंद हे परगणे इ.स.१३७० मध्ये जहागीर म्हणून मिळवले आणि तो थाळनेरला परतला. थाळनेर ताब्यात घेवून त्याने फारुखी घराण्याची सत्ता तेथे स्थापित केली. थाळनेर येथील उत्खननात सहाव्या शतकात होऊन गेलेल्या कुंभकर्ण घराण्यातील भानुशेष राजाचा ताम्रपट आढळला असुन या ताम्रपटा नुसार थाळनेरचे त्या काळातील नाव स्थलकनगर होते. सहाव्या व सातव्या शतकात कुंभकर्ण नावाचे राजघराणे येथे राज्य करत होते. ते राजे मांडलिक राजे होते व त्या घराण्यात पाच राजे होऊन गेल्याची माहिती नव्याने समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पुर्वी खानदेशची राजधानी होते. इ.स. ११२८ मध्ये जिवाजी आणि गोवाजी या गवळी किंवा अहीर कुटुंबाकडे थाळनेरचा ताबा होता. देवगिरीचा राजा बाजीराव ह्याचा मुलगा दौलतराव खानदेशची पहाणी करण्यासाठी आला असता त्याला थाळनेरची भरभराट झाल्याची आढळले. त्यामुळे खुश होऊन त्याने जिवाजी आणि गोवाजीच्या कुटुंबाला थाळनेरचा प्रमुख बनविले. इ.स.१३७० मध्ये फिरोजशहा तुघलक याने हा प्रदेश जिंकून घेतला आणि मलिकराजा फारुकी याला दक्षिण गुजरातची सुभेदारी बहाल केली. मलिकने थाळनेरला आपली राजधानी बनविली. इ.स. १३७० मध्ये त्याने सत्ता स्थापन करून थाळनेर येथे किल्ला बांधला. पुढच्याच वर्षी गुजरातच्या सुलतानाने मलिकवर हल्ला करुन त्याचा प्रदेश हिसकावून घेतला. मलिक थाळनेरच्या आश्रयाला जाऊन राहीला. इ.स.१३९९ मध्ये मलिक मेल्यावर त्याने आपल्या दुसरा मुलगा मलिक इफ्तीकार याला थाळनेरचा ताबा दिला. त्यामुळे चिडलेला पहिला मुलगा नासिर खान याने इ.स.१४१७ मध्ये माळव्याच्या सुलतानाच्या मदतीने थाळनेरवर हल्ला करुन त्याचा ताबा घेतला.(१४१७). इ.स.१४९८ मध्ये गुजरातचा सुलतान मो.बेगडा याने थाळनेर जिंकून आजूबाजूच्या प्रदेशात लुटालुट केली. १५११ मध्ये मो.बेगडाने अर्धा खानदेश तसेच थाळनेर आपला वजिर मलिक हसनुद्दीन याला बहाल केला. पण पुढच्याच वर्षी त्याचा खुन झाला आणि थाळनेर पुन्हा खानदेश मध्ये सामील करण्यात आले. गुजरातचा सुलतान चंगेज खानने इ.स. १५६६ मध्ये खानदेशचा राजा मिरान मुहम्मद खान याचा पराभव केला. इ.स.१६०० मध्ये मोगल सम्राट अकबराने खानदेशचा फारुकी घराण्याचा शेवटचा राजा बहादूरशहा फारुकी याचा पराभव केला आणि थाळनेरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यावेळी सुरत-बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत व संपन्न होता. इ.स.१६९७ मध्ये सरदार नेमाजी शिंदे यांनी 8 हजार घोडेस्वारनिशी खानदेशातील नंदुरबार व थाळनेर ही शहरे लुटली़ त्या वेळी मुस्लीम सरदार हुसेन अलीखान यांचा पराभव करून त्याने थाळनेर येथून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची लूट केली होती़ या घटनेवरून थाळनेर हे गाव वैभवसंपन्न असल्याचे लक्षात येत़े. १७५० मध्ये
थाळनेरचा ताबा पेशव्यांकडे आल्यावर त्यांनी तो होळकरांना सरंजाम म्हणून दिला. १८०० मध्ये होळकरांनी तो निंबाळकरांना दिला पण पुढच्याच वर्षी परत आपल्या ताब्यात घेतला. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला त्यावेळी खानदेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात मराठ्यांचे २५० लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले यात त्यांचे सात अधिकारीही कामी आले.
थाळनेरच्या इतिहासाविषयी बरेच वाचले होते. या परिसरातील किल्ले पहाण्याची संधी आली तेव्हा या सर्वात उत्तरेकडच्या थाळनेरपासूनच सुरवात करायची ठरविले. थाळनेर गाव धुळे शहरापासून ईशान्य दिशेला ४८ किमी वर आहे. धुळ्यावरून शिरपुरच्या दिशेने निघालो. वाटेत सोनगिर किल्ला दिसला. थाळनेर पाहून येताना हा बघायचे नियोजन होते. अखेरीस तापी नदीवरचा पुल ओलांडून शिरपुरला पोहचलो. सध्या बंधार्‍याच्या कल्पनेमुळे प्रसिध्द झालेले हे गाव, विशेष म्हणजे या छोट्या गावात सुरेख बाग आहे शिवाय ईंजिनिअरींग कॉलेज देखील आहे. थाळनेरसाठी बस लवकर नव्हती, सहाजिकच खाजगी जीप, ज्याला या भागात कालीपिली म्हणतात, त्याला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्ह्ता. थाळनेरला जाण्यासाठी जापोर, मांजरोद ह्याठिकाणी जाणार्‍या बस उपलब्ध असतात.पण जीपवालेही लगेच जाणार नव्हते, पुन्हा बसची वाट बघण्याला पर्याय नव्हता. अखेरीस थाळनेरकडे निघालो. तिकीट काढताना समजले कि थाळनेरचे दोन तीन स्टॉप आहेत. मात्र गाव जवळ आल्यानंतर कुठे उतरायचे ते कळेना. अखेरी शेजारी बसलेल्या पांढरे कपडे आणि गांधी टोपी घातलेल्या श्री. सतारसिंग गिरासे यांना कुठे उतरले पाहिजे हे विचारले. हे शेजारच्या पाठोळा गावचे रहिवासी होते, त्यांची मुलगी थाळनेरला दिली होती. तीला भेटायला आलेल्या या माणसाने मला थाळनेर दाखवायची जबाबदारी घेतली. हे एका परिने फारच फायद्याचे झाले कारण स्थानिकांइतकी सुक्ष्म माहिती आपल्याला नसते.
Thalner 1
सुरवातीला आम्ही गावाच्या बाहेर असलेल्या दहा कबरी पहाण्यास गेलो.
Thalner 2

Thalner 3

Thalner 4

Thalner 5

Thalner 6

Thalner 7

Thalner 8

Thalner 9

Thalner 10
थाळनेरवर राज्य करणाऱ्या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या या कबरी . त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या ११ फूट x ११ फूट आकाराच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे १) मलिकराजा (१३९६) २) मलिक नसिर (१४३७) ३) मिरान अदीलशहा(१४४१) ४)मिरान मुबारकखान(१४५७).
Thalner 11
यानंतर गावातील बाजारपेठेच्या रस्त्यावरून चालण्यास सुरवात केली. एका शिवमंदिराजवळचे एक जुने घर श्री. गिरामे यांनी मला दाखविले. हेच होते भारतरत्न सु.श्री. लता मंगेशकर यांचे आजोळचे घर. माई आणि लहानगी मंगेशकर भावंडे यांनी ईथेच काही काळ व्यतीत केला. याच काळात आजीच्या तोंडून एकलेल्या , 'शक्कर का दाना ' या चालीवर बाळासाहेबांनी 'किती जिवाला राखायच राखल, राया तुम्ही जाळ्यात पाखरु टाकलं' ह्या लावणीला चाल दिली. सध्या मात्र ईथे कोण रहात आहे ते समजले नाही. पुढे गिरामे यांच्या मुलीच्या घरी गेलो. काहिही सबध नसताना झालेल्या या आदरातिथ्याने मलाच संकोचल्यासारखे झाले. अर्थात खानदेशी भाषेत झालेल्या त्यांच्या संभाषणाचा मला गंधही लागला नाही. मात्र मध्यप्रदेशाच्या सीमेवरच्या सेंधवा ईथेही किल्ला असल्याचे समजले. अर्थात वेळ नसल्याने तो पहाता आला नाही. पुन्हा कधीतरी या परिसराचा दौरा करून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणीचा किल्ला ( अक्काराणीचा किल्ला ) व शहाद्याजवळचा कोंढावळचा भुईकोट पहायचे आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्याच्या उत्तरे टोकाला सातपुड्याच्या रांगेतील चौगावचा किल्लाही राहिलाय. बघुया कधी योग येतो.
इथून आम्ही थाळनेर भुईकोटाकडे निघालो.
Thalner 12

Thalner 13

Thalner 14

Thalner 15

Thalner 16
पण त्याआधी किल्ल्याच्या पायथ्याशी स्थळेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आह़े.
मंदिराच्या समोर अखंड पाषाणात कोरलेला एक नंदी बसविलेला आह़े. काळ्या पाषाण दगडांनी हे मंदिर उभारले असुन आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. मंदिरात शिवाची पिंड आह़े.
Thalner 17
तापी नदी थाळनेर गावाजवळ नालेच्या यु (U) आकाराचे वळण घेते. तेथे असलेल्या १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे.
Thalner 16
एका लहानश्या ३०० फुट उंच टेकडीवर साधारण त्रिकोणी आकाराचा थाळनेरचा किल्ला ३ एकरवर वसलेला आहे. एक बाजूने तापी नदी असल्याने ती बाजू संरक्षित झाली होती तर दुसऱ्या बाजुला तटबंदी आणि बुरुज बांधून हा किल्ला अभेद्य करण्यात आला होता. किल्ल्यामध्ये येण्याच्या मार्गावरील दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाला आहे.
Thalner 17

Thalner 18

Thalner 19
मागच्या बाजुला अनेर, बोरी आणि तापी असा त्रिवेणी संगम असल्याने तापीनदीचे भव्य पात्र नजरेत भरत होते.
Thalner 20
तर एक मस्त झोकदार वळण घेउन तापी गुजरातच्या दिशेने घाईघाईने निघाली होती.
Thalner 21
नदीचे चमचमणारे पाणी आणि तटबंदीच्या उरलेल्या भिंती.
Thalner 22

Thalner 23
किल्ल्याच्या भिंती भाजलेल्या गुलाबी रंगाच्या विटांनी बनलेल्या आहेत.
Thalner 25
तापी नदीचे पाणी किल्ल्याला धडकून पश्चिमेकडे वळण घेते. या पाण्याने संबध टेकडी हळूहळू कापून काढल्याने या बाजूची संपुर्ण तटबंदी ढासळली आहे. आज केवळ किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व ३ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज ढासळलेले आहेत. किल्ल्यामध्ये खुरटी झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने जपूनच फिरावे लागते. थाळनेर गावातील नागरिकांनी किल्ल्यातील मोठमोठे दगड, माती आणि विटा हे बांधकामासाठी नेऊन हा किल्ला अक्षरशः पोखरून काढला आहे. त्यामुळे या किल्ल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
Thalner 25

Thalner 26

Thalner 27
किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत.एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.
Thalner 28

Thalner 29
किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर पाताळेश्वर मंदिराच्या बाजुला शेंदूर फासलेली हनुमान मुर्ती असुन शेजारील देवडीत एक झिजलेले शिल्प ठेवलेले आहे. गडावर पाण्याचा आजही साठा असणाऱ्या दोन विहिरी असुन एका विहीरच कठडा पुर्णपणे ढासळलेला आहे. याशिवाय गडावर पाण्याचे दोन हौद असुन संपुर्ण गडावर खापरी नळातुन पाणी फिरवल्याचे अवशेष दिसून येतात. गड फिरताना झाडीत दोन ठिकाणी जमिनीत साठवणीचे रांजण पहायला मिळतात. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो.
Thalner 30
किल्ला पाहून आम्ही शेवटचे आकर्षण म्हणजे जमादार वाडा पहाण्यास निघालो. पण विश्रांतीसाठी एका नवीनच बांधलेल्या मंदिरात, पाताळेश्वराच्या मंदिरात थांबलो. या मंदिराची एक कथा गिरामे यांनी सांगितली, 'हे मंदिर कहीसे उपेक्षित, पडिक होते. या ठिकाणी असलेल्या शांततेमुळे एक हुशार विध्यार्थी या मंदिरात नेहमी अभ्यासासाठी यायचा. पुढे तो शिकून मोठा अधिकारी झाला, पण या मंदिराला विसरला नाही. पुढे वर्गणी गोळा करून व स्वखर्चाने त्याने या मंदिराचा जीर्णोध्दार केला'. आज आपणाला दिसते आहे ते हेच मंदिर.
Thalner 31

Thalner 32

Thalner 33

Thalner 34

Thalner 35

Thalner 35
या नंतर आम्ही एका वाड्यापाशी पोहचलो. त्याला स्थानिक लोक जमादार वाडा म्हणतात. या वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दार खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते गढी दाखवतात पण त्यांचा इतिहास त्यांना ठाऊक नाही. गढीच्या मुख्य दरवाजावर रामसिंग व गुमानसिंग ही नावे लिहीलेली दिसतात.
खरंतर फारशी अपेक्षा ठेवून मी इथे आलो नव्हतो. पण बरेच काही पाहून परत चाललो होतो. श्री. गिरामे यांनी दिलेला वेळ आणि अत्यंत आपुलकीने मला हि ठिकाणे दाखविली त्याबध्द्ल त्यांचे मनापासून आभार मानून थाळनेर गावातून परत निघालो.
थाळनेर परिसरातील भटकंतीचे नियोजन करायचे असेल तर, धुळ्याहून सकाळी लवकर निघून २१ किमी वरील सोनगिर, २७ किमी वरील थाळनेर पाहून धुळ्याला परत येता येते. अथवा तसेच पुढे जाऊन (४० किमी) वरील अंमळनेर, (२० किमी) पारोळा, (८ किमी) बहादरपूर हे किल्ले पाहून धुळ्याला परत येता येते.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भ ग्रंथः-
१ ) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा. डॉ. जी.बी. शहा
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) धुळे जिल्हा गॅझेटियर

प्रतिक्रिया

थाळनेरबद्दल माहिती नव्हती. चांगली माहिती देत आहात. पुभाप्र.

ज्योति अळवणी's picture

4 Dec 2017 - 9:37 am | ज्योति अळवणी

खूप छान माहिती

मौल्यवान माहितीबद्दल धन्यवाद _/\_

जागु's picture

4 Dec 2017 - 2:49 pm | जागु

छान.

प्रचेतस's picture

5 Dec 2017 - 7:04 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लिहिलंय.

फारुकी राजवट, थाळनेर बद्दल माहिती होतीच पण तुमच्या लिखाणामुळे तपशीलवार माहिती समजली. तापी नदीचं पात्र अतिशय विस्तीर्ण दिसतंय. कबरी अगदी देवगिरीच्या आसपास असलेल्या कबरींसारख्याच आहेत.

थाळनेर मधील 'नेर' शब्दाबद्दल अजून एक उपपत्ती आहे. 'नेर' हा शब्द संस्कृत नीर शब्दापासून न बनता 'नहर' ह्या अरबी किंवा फारसी शब्दापासून निर्माण झाला. नहर म्हणजे पाण्याच प्रवाह अथवा ओढा/नदी (वाहते पाणी). अर्थात नीर/ नहर अर्थ तसा एकसमानच. नहर शब्दही मूळ संस्कृतातूनच तिकडे गेला असावा.
अर्थात 'नेर' हा शब्द महाराष्ट्रात इस्लामिक राजवटीपासून वापरात आला. 'नेर' ह्या शब्दाचा वापर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास उद्देशून करतात. अंमळनेर, संगमनेर, पारनेर, जामनेर, पिंपळनेर इत्यादी.

अरविंद कोल्हटकर's picture

6 Dec 2017 - 10:18 am | अरविंद कोल्हटकर

सह्याद्रीच्या पूर्व उतारावर १२ नेरे आणि १२ मावळे आहेत अशी २४ खोरी आहेत ही कल्पना आहे. हे मी कोठेतरी वाचले होते पण कोठे ते आठवत नाही. दाते-कर्वे शब्दकोशात पुढील यादी मात्र मिळाली:
जुन्नर ते चाकण पर्यंत १२ नेरे - १ शिवनेरी, २ जुन्नर, ३ भिमनेर, ४ घोडनेर, ५ भिननेर, ६ भामनेर, ७ जामनेर, ८ पिंपळनेर, ९ पारनेर, १० सिन्नर, ११ संगमनेर, १२ अकोळ नेर आणि पुण्यापासून शिरवळपर्यंत १२ मावळे :- १ अंदर मावळ, २ नाणे मावळ, ३ पवन मावळ, ४ घोटण मावळ, ५ पौड मावळ, ६ मोसे मावळ, ७ मुठे मावळ, ८ गुंजण मावळ, ९ वेळवंड मावळ, १० भोर खोरे, ११ शिवथर खोरे, १२ हिरडस मावळ.

दुर्गविहारी's picture

8 Dec 2017 - 7:37 pm | दुर्गविहारी

थोडी दुरुस्ती सुचवतो.
सभासदाच्या बखरीप्रमाणे
बारा नेर आहेत:-
१ शिवनेरी, २ जुन्नर, ३ भिमनेर, ४ घोडनेर, ५ भिननेर, ६ भामनेर, ७ जामनेर, ८ पिंपळनेर, ९ पारनेर, १० सिन्नर, ११ संगमनेर, १२ अकोळ नेर
बारा मावळ आहेतः-
१ अंदर मावळ, २ नाणे मावळ, ३ पवन मावळ, ४ घोटण मावळ, ५ पौड मावळ, ६ मोसे मावळ, ७ मुठे मावळ, ८ गुंजण मावळ, ९ वेळवंड मावळ, १० कर्यात मावळ ११ जुने मावळ १२ हिरडस मावळ.
सात खोरे आहेतः-
१) भोर खोरे २ ) शिवथर खोरे ३ ) पोंड खोरे ४ ) कानद खोरे ५ ) खेडेभारे ६ ) सासवड खोरे ७ ) रोहिड खोरे

गामा पैलवान's picture

8 Dec 2017 - 10:45 pm | गामा पैलवान

प्रचेतस,

चिरनेर उरणच्या जवळ आहे. सगळी नेरं बहुधा सह्याद्रीच्या पूर्वेस नसावीत. शिवाय महाराष्ट्राबाहेरही अनेक नेरं आहेत उदा : चंपानेर, बिकानेर, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

अनुप ढेरे's picture

6 Dec 2017 - 9:56 am | अनुप ढेरे

लेख आवडला!

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. अनवट किल्ले या मालिकेत पुढचा खानदेशातील किल्ला असेल "सोनगीर".