सुस्वागतम मंडळी ! या कोल्हापुरी रांगड्या मातीत सर्व मिपाकरांचे मनापासुन स्वागत. कोल्हापुर हे नाव आले की, महारांजाची धाकटी गादी, नवा आणि जुना राजवाडा, अंबाबाई मंदिर, साठमारी अशी अनेक एतिहासीक स्थळे डोळ्यासमोर येतात. खवय्याना तर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, तर माझ्यासारख्या घासफुसवाल्या मंडळीना मिसळपाव आठवतो. फॅशनप्रेमींसाठी कोल्हापुरी चपला आहेतच व खिसा हलका करायची तयारी असेल तर गुजरीला जाउन कोल्हापुरी साजाची ऑर्डर करुन कारभारणीला खुष करा, तर रसिक मंड्ळीना लावणी व कुस्तीचा आंनंद घेता येईल. अर्थात दुर्गभटक्याना कोल्हापुर म्हणले कि आठवतो पन्हाळा, फार तर विशाळगड आणि हल्लीच क्रेझ झालेला पन्हाळगड-विशाळगड हा महाराजांच्या पाउलखुणांचा माग घेणारा ट्रेक. पण पर्यटकांच्या गर्दीत वाहून जाणारे हे किल्ले न पहाता, आपण या लेखमालिकेत तब्बल डझनभर किल्ले फिरणार आहोत. काही किल्ले आपणाला केवळ एकून माहित असतील , तर काही पहिल्यांदाच माहित होतील.
सध्याचा कडक उन्हाळा आणि अंगाची होणारी काहीली, त्यात पारा चढलेला. या दिवसात किल्ले फिरायची अजिबात ईच्छा नसते. पण वरी डोन्ट! आपण पुढचे काही दिवस घनदाट जंगलात फिरणार आहोत. मस्त पैकी जांभळे आणि करंवंदे या रानमेव्याचा आस्वाद घेणार आहोत. या दिवसातली पानगळ आणि जंगल्यातल्या पाणवठ्यावर आटल्याने वन्यप्राण्याचे दर्शनही होईल, तेव्हा तयारीत रहा. आज आपण जाणार आहोत, शाहुमहारांजाच्या दुरदृष्टीने वसविलेल्या राधानगरीजवळच्या दाजीपुर अभयारण्यात. गव्यासाठी सुप्रसिध्द असलेले हे जंगल हल्ली पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाने वन्यप्रेमीच्या बकेट्लिस्टमधे आले आहे. दाजीपुर अभयारण्य सध्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा भाग झाले आहे. दाजीपुर तर बहुतेकाना एकून माहिती असते. क्वचित गोव्याला जाताना फोंडा घाटातून लांबून पाहिलेले असते. पण याच अभयारण्यात एक किल्ला हे कधी एकुनही माहिती नसते. तर आज आपण याच जंगलभ्रंमतीत "शिवगडा"ची माहिती घेणार आहोत.
शिवगडाजवळून फोंडा आणि कोल्हापुर यांना जोडणारा घाटमार्ग कोकणात उतरतो. प्रचीनकाळी आचरा, विजयदुर्ग, देवगड या बंदरात उतरला जाणारा माल या घाटाने देशावर यायचा, त्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी. अर्थात हा मार्ग भुईबावडा, करूळ, आंबा, अणुस्कुरा या मार्गाच्या तुलनेत दुय्यम सहाजिकच हा किल्लाही तसा फार महत्वाचा नाही. तरीही ईतिहासात याचा थोडाफार उल्लेख आहे. ई.स. १७४० मधे बलवंतगडाहून ( राजापुर, जि-रत्नागिरी) तानाजीराव खानविलकरानी चिमाजी अप्पाना पत्र लिहीले आहे,"बावडा( गगनबावडा,जि-कोल्हापुर), बळवंतगड, सिवगड तिनी जागे आपांचे पदरी घातले आहे, सिवगड तो सालपीच्या उरावर आहे". पण शिवगड शिवाजी महाराजांच्या काळात अस्तित्वात होता याचा कोणताच पुरावा मिळत नाही.कदाचित अस्तित्वात असलाच तर नंतर बेवसावू झाला असेल. सावंतवाडीच्या फोंड सावंतांनी करवीरकर छत्रपतींविरुध्द हालचालीचा एक भाग म्हणून जुन १७३२ मधे बोलवण (ओळवण)-घोणसरीच्या डोंगरावर तटबंदी करण्यासाठी सैन्य पाठविले. हि खबर छ्त्रपतीना समजतात, त्यांनी पंत आमात्याना सावंताविरुध्द रवाना केले, त्यांनी सावंतांचे सैन्य येण्याआधीच घोणसरीचा डोंगर ताब्यात घेतला आणि शिवगडाची उभारणी केली.
करवीर घराण्याच्या ईतिहासाची साधनेप्रमाणे ई.स. १८०० च्या पत्राप्रमाणे, सावंताच्या हल्ल्याच्या शक्यतेने शिवगडावरील चौक्या वाढवून शेजारील घाटवाटा व पाज यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. ई.स. १७३९ च्या एका पत्रात शिवगडाच्या घाटात चौकीसाठी अमृतराव भगवंत प्रतिनीधी यांचे १५ लोक नेमण्यासंबधी महत्वाचा उल्लेख मिळतो.
शिवगडावर जायचे असेल तर तीन मार्ग आहेत
१ ) कोकणातून जायचे असेल तर फोंडा घाट -आयरेवाडी-चवथीरामाची वाडी-दारवळ- सपाटवाडी- हेळ्याचा माळ किंवा घोणसरी
२ ) फोंडाघाट- गडगे सखल वरून वाटाड्या घेउन दोन ते अडीच तासात शिवगड गाठता येतो.
३ ) कोल्हापुर- राधानगरी- दाजीपुर-दाजीपुर अभयारण्य
अर्थातच तिसरा मार्ग सोयीचा आहे.
आम्ही अशीच एका मे महिन्यात शिवगडाला भेट देण्याचा प्लॅन केला. रात्रीच दाजीपुरला जायचे आणि सकाळी उठायचे आणि उन्हं चढायच्या आत किल्ला करायचा असे ठरविले. पण विकीमॅपीयावर दाजीपुर स्टँड लईच लहान दिसले, त्यात तिथे डास आणि गावातली कुत्री मुक्कामाला असणार, एकूण सुखाची झोपही होणार नाही आणि रात्री-अपरात्री त्या कुत्र्यांबरोबर फायटिंगची वेळ येणार, त्यापेक्षा कोल्हापुर स्टँडवर टि.पी. करायचा आणि पहाटे पोहचू अशा बेताची गाडी पकडून दाजीपुरला जायचे असे ठरले. आज तीन सोबती बरोबर होते, प्रमोद, संकेत( मामेभाउ) आणि विशाल ( त्याचा मित्र). मात्र रात्री २ वा. ची गाडी शेवटची असुन त्यानंतर एकदम पहाटेच गाडी आहे हे सुवर्तमान स्टँडवरच्या चौकशी या पाटीखाली बसणार्या महाभागाने अतिशय नम्र (म्हणजे कश्या? कळले असेलच ) आवाजात आम्हाला सांगितले. अखेरीस नाईलाजाने आम्ही राधानगरीला उतरून स्टँडवर थोडावेळ थांबायचे आणि मग पहाटेच्या गाडीने दाजीपुर गाठायचे असा बदल केला आणि पणजी गाडीत चढलो. त्या रात्री कोल्हापुर स्टँडवर काय काय बघितले ते लिहीले असते, पण जाउ देत, उगाच आय.डी. ला पंख लागायचे. अखेरीस आमची वरात राधानगरी स्टँडवर आली. सुदैवाने इथे सिमेंटची भरीव बाकडी होती, त्यामुळे डास नसतील अशी आशा करून आम्ही बाकड्यांवर आडवे झालो. पण तरीही काही डास विचारपुस करत आमच्या जवळ आलेच. अखेरीस त्यांच्या ब्रेकफास्टची सोय म्हणून आम्ही डोळे मिटुन शरीर त्यांच्या हवाली केले.
पहाटे कुडाळकडे जाणार्या गाडीने दाजीपुरला उतरलो, तो समोरच हे "हॉटेल निलकमल" दिसले.
रात्रभराच्या दगदगीने सोबती बहात्तरच्या दुष्काळातून आल्यासारखे चेहरा करून बसले होते. सर्वसंमतीने शिर्याची ऑर्डर केली. नाष्टा संपवून परवानगीसाठी वनखात्याच्या चौकीत गेलो. तिथे आम्ही शिवगडला जाणार हे कळल्याबरोबर मंगळावर जाणार असल्यासारखे शिवगड कुठे आहे हे विचारले. अखेरीस माझ्याकडचे पुस्तक आणि त्यातील शिवगडाची माहिती वाचून त्या सरकारी डोक्यात शिवगड दाजीपुर अभयारण्यातच आहे हा नवा साक्षात्कार झाला.
आम्ही परवानगी मिळवून आम्ही डांबरी सडकेवरून जंगलाच्या दिशेने कुच केले. हि सडक ओळवण गावापर्यंतच आहे.
वाटेत अभयारण्यात असणार्या प्राण्यांची माहिती असणारे बोर्ड लावले आहेत.
पुढे मात्र कच्चा मातीचा गाडी रस्ता शेवट पर्यंत आहे. पावसाळ्यात अभयारण्य बंद असते, तरी शिवगड आणि गगनगिरी महाराजांचा आश्रम वनखात्याच्या हद्दीबाहेर असल्याने या रस्त्यावर वहातूक असते.
तास दिड तासाची तंगडतोड करून आपण वनखात्याच्या चौकीपाशी पोहचतो. या चौकीजवळच एक धनगरवाडा आहे. त्याला ठक्याचीवाडी म्हणतात. शिवगडावर पाणी नाही, तेव्हा पाणी संपले असेल तर ईथे भरून घ्यावे. इथे दोन फाटे फुटतात, गेट असलेला रस्ता दाजीपुर अभयारण्यात जातो, ( वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजे पर्यंतच) तर चौकीला मागून वळसा घालून जाणार्या रस्त्याला पुढे पुन्हा दोन फाटे फुटतात.
त्याचा उजव्याबाजुचा रस्ता गगनगिरी आश्रमाकडे जातो, तर डावीकडे जाणारा रस्ता शिवगडाकडे जातो. गुरे चारणारे धनगर सोडले तर या वाटेवर फार वर्दळ नसते. शिवगडावर पाणी नाही त्यामुळे या चौकीत पाणी भरुन घ्यावे. साधारण तासाभराच्या तंगडतोडीने आपण एका माळावर पोहचतो, या वाटेत अजिबात झाडी नाही, त्यामुळे प्रचंड त्रास होतो. या माळाला "उगवाई देवीचा माळ" म्हणतात. उगवाई देवीची मुर्ती शिवगडावर आहे.
या माळावरूनच समोर, सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटा झालेला शिवगड दिसतो. अशीच रचना गगनगड, विशाळगड, कोयनेजवळचा भैरवगड, प्रचितगड यांचीही आहे. शिवगड व त्याच्यासमोरची टेकडी दिसत आहे.
मात्र गडावर जाण्यासाठी आपल्याला उजव्या दिशेने म्हणजे उत्तरेकडे थोडे चालावे लागते. वाटेत हे वनदेवाचे स्थान आहे.
लक्ष डावीकडे ठेवले कि छोटी पायवाट खाली उतरताना दिसते. गर्द झाडीच्या या वाटेने एका टेकडीला वळसा घालून आपण शिवगडाच्या मुख्य डोंगरापाशी पोहचतो.
या ठिकाणी एक उंबराचा वृक्ष आहे, इथून डावीकडे थोडे खाली उतरले कि पावसाळी धबधबा दिसतो, त्याच्या खाली कातळ कोरीव कुंड असून, जर गडावरील पाणी संपले तर इथून न्यायची व्यवस्था असावी. हे ठिकाण संरक्षित रहावे म्हणून थोडी तटबंदीही बांधलेली दिसते.
आता मुख्य गडावर जाउया. साधारण उत्तराभिमुख गोमुखी प्रवेशव्दार या गडाला आहे. या बुरुजाला गोल वळसा घालून आपण आत प्रवेश करतो.
आतून हि गोमुखी बांधणी स्पष्ट कळते.
गडाची हि बाजू कमकुवत आहे, कारण उगवाई देवीच्या पठारावरून तोफांचा हल्ला झाल्यास त्याला तोंड देता यावे यासाठी या बाजूला दुहेरी तटबंदी केलेली आहे.
तटबंदी ओलांडून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक बुरूज दिसतो. पुढे एका चौथर्यावर एक सतीशिळा दिसते.
गडावर तटबंदी सोडली तर हाच काय तो चांगल्या स्थितीत असलेला अवशेष.
गडावरील वाड्याचा चौथरा
तसेच चालत टोकाशी आलो कि एकदम कोकणचा संपुर्ण पट समोर उलगडून येतो. तब्बल चोवीसशे फुटावरून नजारा मस्त दिसतो. अगदी खाली कुर्लीचे धरण दिसते, तर त्याच्या मागच्या बाजूला एखाद्या गडासारखी सपाटी असलेला डोंगर दिसतो त्याला "सालव्याचा डोंगर" म्हणतात. (फोटोत डाव्याबाजुला लांबवर अस्पष्ट दिसतो आहे तो ) याच्या पायथ्यातून कोकण रेल्वेमार्ग गेला असल्याने, रेल्वेतुन जातानाही नांदगाव रोड आणि वैभववाडी रोड या स्टेशन दरम्यान आपण हा डोंगर पाहू शकतो. गडावरून उत्तरेकडे पाहिल्यास सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अलग झालेला, एखाद्या शिवलिंगासारखा दिसणारा गगनगड दिसतो. तर पुर्ण उत्तर आणि ईशान्येला दाजीपुर अभयारण्य पसरले आहे.
हा समोरच जो भाग दिसतोय त्याला "पाट्याचा डंग" म्हणतात. गवे हमखास दिसण्याची हि जागा. बाकी किल्ल्यावर फारसे काही पाहण्यासारखे नाही. पांढर्या ठिपक्यासारखा भाग दिसतो आहे तो गगनगिरी आश्रम.
नैऋत्य बाजूला असलेल्या बुरुजापासून एक वाट खाली कोकणात उतरते, ती गडगे सखलला जाते.
मागे वळून पाहिल्यावर दिसणारा माथा.
आता जाउया गगनगिरी महाराजांचा आश्रम पहाण्यासाठी. त्यासाठी शिवगडावरून पुन्हा पठारावर यायचे आणि एक उत्तरेकडे म्हणजेच डाव्या हाताला फुटलेली दिसेल, या वाटेने अर्ध्या तासात ह्या आश्रमापाशी आपण येउन दाखल होतो.
या ठिकाणी गगनगिरी महाराजांनी तप केले होते. इथे थोडी वस्ती आहे. पाणीही मिळेल. इथेच दुपारचे जेवण करायचे आणि अर्थातच थोडी वामकुक्षी. आम्ही इथे जेवण करून थोडावेळ पडलो होतो, सोबती घोरत होते, पण मी जागाच होतो, अचानक एका हेलिकॅप्टरचा जवळून आवाज आला आणि खुप खालून एक हेलिकॅप्टर मंदिरावरून उडत गेले, कदाचित उद्वव ठाकरे फोटोग्राफीसाठी आले होते कि काय? कल्पना नाही.
आश्रमापासून जवळच "झांजेचे पाणी" हे नैसर्गिक पाण्याचे कुंड आहे, ते पहायचे. ईथून आपण आलो तो शिवगड लांबवर दिसतो. पाण्याचा आस्वाद घेउन आश्रमापासून एक कच्चा गाडीरस्ता आपल्याला सकाळच्या वाटेला नेउन सोडतो. तिथून परतीच्या वाटेला लागायचे.
शिवगडाचा नकाशा
शिवगड परिसराचा नकाशा
यालाच जोडून दाजीपुर जंगलाची सैर करता येईल. उन्हाळ्यात प्राणी दिसण्याची बरीच शक्यता असते. अर्थात ट्रेकबरोबर जंगलसफारी करायची असेल, तर जास्तीचा एक दिवस पाहिजे. दाजीपुरमधल्या आणखी काही रिसोर्टचे संपर्क क्रमांक देतो, त्याचा उपयोग होईल.
१ ) एकांत रिसॉर्टः- 8888336668 , 9665923636
२ ) चांदोली रिसॉर्ट- 9403441644
३) या शिवाय हे दोन संपर्क क्रमांक आहेत, (02321)203778, 9545703322
आता दाजीपुर जंगलाची सैर करुया, या व्हिडीयोमधून
दाजीपुर दर्शन
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
३ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) कोकणचे पर्यटन - प्र. के. घाणेकर
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
19 May 2017 - 8:34 pm | स्पा
सहिच, अजुन नवे किल्ले फिरायला मिळतील
19 May 2017 - 9:01 pm | पद्मावति
वाह, मस्तच.
19 May 2017 - 10:43 pm | एस
माहिती तर छान आहेच, तुमची मेहनतदेखील दिसून येत आहे. खूपच छान. हा किल्ला प्रचितगडाप्रमाणेच दिसतो आहे. प्रचितगडाबद्दल लिहिणार असालच. पुभाप्र.
22 May 2017 - 8:09 pm | दुर्गविहारी
या सर्वच किल्ल्यांबध्द्ल अगदी ईंटरनेटवरही फार कमी माहिती उपलब्ध आहे. मी या ठिकाणी गेलो तेव्हा माहिती अभावी अनेक अडचणी आल्या. त्यावेळी ठरविले कि आंतरजालावर याची एकत्रित सविस्तर माहिती आवश्यक आहे. ती सुध्दा मराठीत , यासाठी मिसळपावचे आणि आत्ता मायबोलीचे सदस्यत्व घेतले आणि लिखाणास सुरवात केली. शक्य तितके अचुक नकाशे दिले, कारण याची फार गरज जाणवते. एखादी गोष्ट बघायची राहून गेली तर त्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी कदाचित शक्य होत नाही यासाठी जास्तीत जास्त सविस्तर माहिती देणारी हि लेखमाला सुरु केली. अर्थात इथेही भटकंतीवरचे उत्तम धागे वाचले आहेत, तेव्हा काय लिहीले पाहिजे त्याचा अंदाज आलाच. आशा आहे पुढे कोणी या किल्ल्यांच्या माहितीसाठी गुगल सर्च करेल, तेव्हा मिपावरचा धागा उपयोगी पडेल.
कोल्हापुर जिल्ह्यातले किल्ले संपले कि मी खानदेशामधल्या किल्ल्यांवर लिहीणार होतो. पण हरकत नाही, मधे प्रचितगडचा धागा नक्की टाकतो.
24 May 2017 - 2:10 pm | भटकीभिंगरी
लेख खुप सुन्दर, सविस्त्तर, माहितीपुर्ण आहे. ट्रेक करताना याचा खुप उपयोग होइल. पुधिल लेखान्च्या प्रतीक्षेत.....
19 May 2017 - 10:45 pm | यशोधरा
वा! एक अतिशय उत्तम दस्तावेज तयार होत आहे तुमच्यामुळे.
20 May 2017 - 10:23 am | इरसाल कार्टं
अजून एक किल्ल्याची ओळख झाली
20 May 2017 - 11:48 am | प्रचेतस
भन्नाट लिहित आहात.
शिवगडाबद्दल ऐकले होते, पण इतर ऐतिहासिक माहिती नव्हती.
20 May 2017 - 1:39 pm | पैसा
खूप छान लिहीत आहात.
22 May 2017 - 1:01 pm | स्वच्छंदी_मनोज
मतच ओ..जबरी भटकंती.
तुमची मेहनत आणी लिहीण्यातला सुटसुटीतपणा जाणवतोय. पुढचे भाग लवकर येऊदेत.
कोल्हापूर भागात माझी कमीच (जवळ जवळ नाहीच) भटकंती झालीय त्यामूळे ह्या एरीयात भटाकताना तुमचे लेख उपयोगाला येणार.
22 May 2017 - 2:11 pm | वरुण मोहिते
दाजीपूर ला फिरून सुद्धा हा किल्ला माहित नव्हता .
22 May 2017 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका.
-दिलीप बिरुटे
22 May 2017 - 7:51 pm | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या या प्रोत्साहनामुळे होणारे कष्ट विसरून नवीन धागा लिहीण्याचा उत्साह येतो. पुढच्या आठवड्यात मुडागड
22 May 2017 - 8:18 pm | स्वच्छंदी_मनोज
>> लवकरच येऊदे.. मुडागड म्हणजे मुडागडची पाज आणी काजिर्डा घाटपण येणार का??
24 May 2017 - 1:19 pm | दुर्गविहारी
बरोबर. पण या दोन्ही वाटा सध्या बंद झाल्यात. त्या एवजी कोल्हापुरमधूनच जावे लागते. सविस्तर धाग्यात वाचायला मिळेलच. आणखी एक मदत कोणी करेल का? मला दाजीपुर अभयारण्याचा व्हिडियो एम्बेड करता आला नाही, म्हणुन लिंक दिली. तरी धाग्यात व्हिडीयो कसा टाकायचा हे कोणी सांगु शकेल?
23 May 2017 - 8:21 pm | पाटीलभाऊ
सुंदर भटकंती आणि वर्णन.
24 May 2017 - 1:35 pm | दुर्गविहारी
धन्यवाद पाटीलभाऊ, तुम्ही अगदी पहिल्यापासून वाचून प्रतिक्रीया देत असता.
24 May 2017 - 6:08 pm | बापू नारू
छान माहिती दिलीत , धन्यवाद_/\_
5 Jun 2017 - 1:54 am | रानवेडा सचिन
अतिशय सुरेख वर्णन केलं आहे ट्रेकचं. शिवगड किल्ला ट्रेक व दाजीपुर जंगल सफारी करायची असेल तर राधानगरीचे माझे मित्र आहेत संदेश म्हापसेकर ( 99231025589 ) यांना अवश्य संपर्क करा. राहण्याची सोय, स्वादिष्ट जेवण, ट्रेकसाठी गाईड, सफारीसाठी गाईड, जीप्सी इ. ची अतिशय उत्तम सोय करतात ते.
5 Jun 2017 - 1:55 am | रानवेडा सचिन
अतिशय सुरेख वर्णन केलं आहे ट्रेकचं. शिवगड किल्ला ट्रेक व दाजीपुर जंगल सफारी करायची असेल तर राधानगरीचे माझे मित्र आहेत संदेश म्हापसेकर ( 99231025589 ) यांना अवश्य संपर्क करा. राहण्याची सोय, स्वादिष्ट जेवण, ट्रेकसाठी गाईड, सफारीसाठी गाईड, जीप्सी इ. ची अतिशय उत्तम सोय करतात ते.
5 Jun 2017 - 12:00 pm | मनिमौ
तुमचे लेख फार सुरेख आहेत. नंतर सगळे लेख एकत्र करून पुस्तक काढायच नक्की मनावर घ्या
6 Jun 2017 - 4:27 pm | प्रीत-मोहर
सुरेख काम केलत!!
__/\__