अनवट किल्ले १३ :म्यानातून उसळे तलवारीची पात, सामानगड ( Samangad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
30 Jun 2017 - 8:51 pm

ई.स. १६७४. राजधानी रायगडावर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची तयारी चाललेली, सगळीकडे निमंत्रणे गेलेली. अगदी कट्टर शत्रु ईंग्रजानही निमंत्रण पोहचले होते, पण खुद्द स्वराज्याच्या एका मानकर्‍याला मात्र या सोहळ्याला यावयाची परवानगी नव्हती, कोण हा शिलेदार ? हे होते स्वराज्याचे सरनौबत कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्याच्या एका डुख धरलेल्या नागाला, बहलोलखानाला त्यांनी हाती गवसलेला, असताना, जतजवळील उमराणीजवळ धर्मवाट दिली. हाती आलेला शत्रु, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तीनही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करायच्या नाहीत, हे शिवाजी महारांजांचे धोरण विसरण्याची चुक या मानकर्‍याकडून झाली होती. उंबरखिंडीतील कारतलबखान आणि रायबाघनचा अपवाद सोडला तर, स्वता महाराजानी शत्रुला कधीही जिवंत परत जाउ दिले नाही. आता बहलोलखान स्वराज्यावर चालून येणार हि अटकळ महाराजांनी बांधली व त्याचे पारिपत्य होत नाही तोपर्यंत रायगडावर तोंडही न दाखविण्याचे प्रतापरावांना सांगितले. अपेक्षेप्रमाणे बहलोलखान गडहिंग्लजमार्गे कोल्हापूर प्रांतात शिरायची तयारी करु लागला. त्याची छावणी नेसरीजवळ आहे हि खबर प्रतापरावाना लागली आणि लगोलग ते उठले आणि त्यांना डोळ्यासमोर फक्त बहलोल खान दिसू लागला, घोड्यावर मांड ठोकून ते वार्‍याच्या वेगाने बहलोलखानावर निघाले. आपला सरदार निघालाय हे पाहून त्यांच्या बरोबर विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, विठोजी आणि सिध्दी हिलाल हे सरदार पाठोपाठ निघाले. यावेळी त्यांच्याकडे १२०० ची फौज होती, पण केवळ सुड डोक्यात थैमान घालत असल्याने योग्य संधीची वाट पहावी व खानाला कापून काढावे ईतकेही भान प्रतावरावांना राहिले नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त महाराज असावेत. तुफान वेगाने सात घोडेस्वार १५००० हशमांच्या गर्दीत शिरले आणि बघता बघता नाहीसे झाले. पंतगाने ज्योतीवर झेप घ्यावी असे झाले. एन महाशिवरात्रीला ( २४ फेब्रुवारी १६७४) अजून एक खिंड रक्ताने न्हावून निघाली आणि पवित्र झाली.
हा करुन प्रसंग दुरवरून एक प्राचीन दुर्ग खिन्न मनाने पहात होता. कदाचित तुझ्याच राज्याने एखाद्या गडाचा आश्रय घेउन, गनिमी काव्याने मोठ्मोठे शत्रु नमविले, तु ही तसेच का केले नाहीस? हि खंत बाळगून आजही तो गड मुक उभा आहे, या प्रसंगाचा साक्षीदार "सामानगड".
वास्तविक सामानगडाचा इतिहास याही आधीचा आहे. कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जातो. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन २९ सप्टेंबर १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व ८ मार्च १७०२ रोजी शहामीर यास किल्लेदार नेमले. यावेळी साबाजी क्षीरसागर गडाचे किल्लेदार होते. सन जुलै-ऑगस्ट १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.
या परिसरातील भुदरगड, रांगणा,महिपालगड्,वल्लभगड या किल्ल्यांच्या मधोमध सामानगड असल्याने रसद पुरवण्याच्या दृष्टीने एकदम चांगला असा हा किल्ला. त्यामुळेच याच महत्व अनन्य साधारण. यावर रसद, दारुगोळा वगैरे ठेवत असत त्यामुळे या गडाला सामानगड हे नाव पडले असावे.
या गडावर जायचे असेल तर दोन मार्गे जाता येते.
१ ) ज्यांना बेळगाववरुन यायचे असेल त्यांनी स्वताची गाडी असेल, तर संकेश्वरच्या आधी हलकर्णी या गावी जावे. तिथून बसरगेच्या रस्त्याला लागून नंदनवाडमार्गे नौकुडला जावे. गडाच्या दक्षिण उतारावर नौकुड वसलेले आहे. ईथून थेट डांबरी सडक गडमाथ्यावर घेउन जाते. जर एस.टी. ने यावयाचे असेल तर संकेश्वरहून दर तासाला हलकर्णीला जायाला बस आहेत. तिथून बसरगे या गावी जाण्यास खाजगी जीप आहेत. नौकुड फाट्याला उतरुन चालत नौकुड गाठता येइल. तिथून थेट गड.
२ ) गडहिंग्लज वरून नौकुडला जाण्यासाठी थेट एस.टी. आहेत. या बसच्या वेळा अशा- ७.२०,९.२०,१०,१०.५०,१२.३०,४.१० या शिवाय गडाच्या उत्तर उतारावर वसलेल्या चिंचेवाडीसाठी खाजगी जीपसेवा आहेच. स्वताच्या गाडीने कोल्हापुर बाजुने यावयाचे असेल तर संकेश्वर - गडहिंग्लज-चिंचेवाडी- सामानगड असे थेट येता येईल. गड पाहून नेसरीचे स्मारक बघणे सोयीचे ठरेल.
smn1
सामानगड परिसराचा नकाशा.
बरेच दिवस कोल्हापुर जिल्ह्याचा द्क्षिण भाग म्हणजे गडहिंग्लज, चंदगड परिसरातील किल्ले पहायचे राहिले होते. वास्तविल माझे लहानपण याच परिसरात गेले होते. आमच्या घरातुन सामानगड दिसायचा. पण कधी गेलो नव्हतो. त्यामुळे सामानगडाबरोबरच गडहिंग्लज हे शहर किती बदललयं हे पहायची उत्सुकता होतीच. थोडी सवड काढुन निघालो. संकेश्वरला उतरून बसने हलकर्णी गाठले. गडहिंग्लजहून कोल्हापुरला जाताना बर्‍याचदा थेट एस.टी. नसायची, तेव्हा संकेश्वर गाठायचे, तेथे खाजा खायचा आणि बेळगाववरुन येणारी एस.टी. पकडून कोल्हापुरला जायचे. हि आठवण संकेश्वरला झालीच. पुढे हा परिसर ग्रामीण कथालेखक महादेव मोरे यांच्या लेखणीतून पुन्हा भेटला. असो.
smn2
हलकर्णीवरून मात्र वाहन न मिळाल्याने अकरा नंबरची बस पकडून नंदनवाडमार्गे नौकुड गाठले गावातून डांबरी रस्ता थेट वरच्या पठारावर जातो. या रस्त्याने वर पोहचल्यानंतर "भीमशाप्पा" नावाच्या सत्पुरुषाची समाधी पाहिली. जवळच भिमशू नावाचे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे.
smn3
ईथून सपाटीवर आल्यानंतर हे भीमसासगिरी मंदिर समोर दिसले. हा समर्थस्थापित मारुती मानला जातो. तीन मंदिरांचा हा समुह आहे.
smn13
आत चाळोबाचे मंदिरही आहे. माघ कृष्ण त्रयोदशीला ईथे जत्रा असते. सामानगडाचे गडकरी भाउराव गडनीस यांनी हि जत्रा सुरु केली असे मानले जाते.
अजुन एक कथा या परिसरामधे घडली असे मानले जाते. रामदास स्वामी आजारी असताना, त्यांना शिवाजी महाराजांची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. त्यांच्या आजारावर फक्त वाघीणीच दुधाने फरक पडेल अस सांगून शिवाजी महाराजांना ते आणण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे.
smn5
शिवाजी महाराजांनी ज्या गुहेतून वाघीणीच दुध काढून आणले ती गुहा या हनुमान मंदिरापासून १० मिनिटावर आहे. तिथे वाघाची डरकाळी ऐकू येते अस गावकरी मानतात. मी ती गुहा पाहण्यास गेलो. वाघ आत शिल्लक नसल्याने डरकाळी काही एकू आली नाही. या कथांमधे फारसा अर्थ नसतो. फक्त अशा काही अख्यायिका जोडल्या गेल्या कि ती ठिकाणे पवित्र मानून स्वच्छ ठेवली जातात, जपली जातात ईतकाच फायदा.
smn4
या मंदिराजवळच संदेशवहन केंद्राचा मनोरा आहे. या टॉवरमुळे सामानगड खुप लांबुनही ओळखता येतो.
smn6
या मंदिराच्या पश्चिमेला एक जमीनीत खोदलेले लेण मंदिर आहे. साधारण ईंग्रजी सी आकारचे एक विवर जांभ्या दगडात कोरलेले आहे.
smn7
smn8
मधे शिवमंदिर तर सभोवती ओवर्‍या आहेत. जांभ्या दगडात कोरलेल्या या लेण्यात एक अनोखे सौंदर्य जाणवते.
smn9
दुर्गभटक्यांना मुक्काम करायला एकदम आदर्श जागा. याला "महालिंदेश्वर शिवमंदिर" म्हणतात. या ठिकाणीच प्रभु रामचंद्रानी वास्तव्य केल्याचे मानले जाते.
smn15
दुर्दैवाने विकासाच्या नावाखाली ईथेही पेव्हर ब्लॉक घालून मुळ जांभ्याची फरशी झाकून टाकली आहे.
smn11
पुर्वी या लेण्या लांबून सापडायच्या नाहीत, पण पुरातत्व खात्याने सर्व बाजुनी रेलींग लावल्याने व बोर्डही बसविले असल्याने पर्यटकना मंदिर पहाता येते.
smn18
या ठिकाणी खाली उतरण्यासाठी केलेला कातळ कोरीव जीनाही वैशिष्ठ्यपुर्ण आहे.
smn12
मुख्य शिवमंदिराखेरीज श्रीराम मंदिर, सुर्य मंदिर , दत्त मंदिर अशी काही अन्य मंदिरे आहेत.
smn14
या ठिकाणी परिसराचा नकाशा लावला आहे. सामानगडावर जाण्यापुर्वीच हि ठिकाणे पाहिली म्हणजे गड निंवातपणे फिरता येतो.
आता आपण जाउया गडाकडे. स्वताची गाडी असेल तर थेट गाडीतुनच फिरता येईल कारण डांबरी सडक थेट किल्ल्यात जाउन सर्वत्र पोहचवली आहे. मी मात्र चालत गडाचे प्रवेशद्वार गाठले.
smn16
सामानगड या पठारापासून एका छोट्या घळीमुळे थोडा अलग झाला आहे. साधारण आठ फुटाच्या तटबंदीने संपुर्ण गड वेढला आहे. समुद्रसपाटीपासून गडाची उंची अवघी २६०० फुट आहे.
smn17
रस्याने चालत आपण महाद्वारापाशी येउन पोहचतो. पुर्वी तेथे मुळ दरवाजा होता, मात्र १८४४ च्या लढाईत ईंग्रजानी केलेया तोफाच्या मार्‍यात तो नष्ट झाला.
आता पर्यटन विकासाच्या नावाखाली झालेल्या बांधकामात हा नवीन दरवाजा उभारलेला आहे.
smn19
तसेच तटबंदीही नव्याने बांधली आहे. मुळ तटबंदी कशी होती हे गडाच्या काही भागात पहायला मिळते, त्यातुलनेत हे काम बेंगरूळ वाटते. उगाच विकासाच्या नावाखाली हे असले काम विसंगतच वाटते.
smn20
गडमाथ्यावर वनखात्याने कॄत्रिम वॄक्षारोपण करुन सावली केली आहे. अर्थात स्थानिक झाडांचे वॄक्षारोपण करायचे सोडून निलगिरी, सुबाभूळ अशी झाडे लावली आहेत. याचे पर्यावरणावर दुष्परिणाम दिसूनही अशा गोष्टी का केल्या जातात, कोणास ठावूक. अर्थात सध्या तरी झाडीचा गारवा आणि सावली गडावर असल्याने फिरणे आल्हाददायक होते.
smn21
डांबरी सडकेने आत गेल्यानंतर सर्व प्रथम डाव्या हाताला सलग तटबंदीत असलेला झेंडा बुरूज लागतो. या ठिकाणी ध्वजस्तंभ आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे या दिवशी या ठिकाणी झेंडावंदन होते. याच्या पुढे घरांचे काही चौथरे लागतात.
smn22
थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या हातालाच अंधारबाव लागते. प्रंचड खोल अशी हि विहीर असून शेजारीच एक कातळ कोरीव पायर्‍यांचा जिना खाली उतरतो.
smn23
एका कोपर्‍यात आणखी एक चौकोनी आकाराची खोल विहीर आहे.
smn25
smn52
यानंतर साधारण गडाच्या मध्यावर आपण येतो. ह्या ठिकाणी आधी असे साधे कौलारू मंदिर होते.
smn27
पण सामानगड "क वर्ग पर्यटनस्थळ" घोषीत झाल्यानंतर काही विकासकामे झाली,त्यात या मंदिराचे रुपडे पालटून असे नवीन मंदिर उभारलेले आहे.
smn28
याच्याच बरोबर हा यात्री निवास, उपहारगृह, बालद्यान अशी अन्य काही नवीन बांधकामे झाली आहेत. एकूणच एक दिवसाच्या सहलीसाठी हे आदर्श ठिकाण झाले आहे.
smn29
मंदिराशेजारी एक खोल विहीर असून त्याला काठानेच उतार व त्यावर पायर्‍या कोरल्या आहेत. या खोल विहीरीत अजून एक छोटी चौकोनी विहीर आहे. विहीरीमधे विहीर ह्या प्रकारची विचित्र रचना याच भागातल्या किल्ल्यावर दिसून येते.
smn30
यानंतर आपण गडाच्या मुख्य आकर्षणाकडे येतो. ईंग्रजी एल आकाराची विहीर.
smn35
याला खाली उतरण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. सात कोरीव कोरीव पायर्‍यातून जिन्याच्या वाटेने आपण खाली जातो. विहीरीतील पाणी मात्र खराब आहे. याठिकाणी एक भुयार असून याच्या आत पाणी आहे. मात्र पुढे जाता येत नाही.
smn37
याठिकाणी कैद्याना ठेवले जात होते असे मानले जाते. मात्र मला हा तर्क पटत नाही. एखाद्या कैद्याला देहांत दिल्यानंतर त्याला थेट मॄत्यु दिला जात असे. ज्यांना कैदेची शिक्षा आहे त्यांना कैद संपेपर्यंत जिवंत ठेवणे आवश्यक असताना या अश्या आडमुठ्या ठिकाणी कैदेत ठेवले तर त्यांना अन्न व ईतर वस्तु कश्या पुरवणार? शिवाय नैसर्गिक विधी आणि पळून जाण्याची शक्यता विचारात घेतली तर हे कैदखाने असतील असे वाटत नाहीत. शिवाय शिलाहारांच्या अन्य किल्ल्यावर उदा.-पन्हाळा असे कैदखाने दिसत नाहीत. कदाचित ज्या वस्तु गारव्याच्या ठिकाणी साठवायच्या आहेत त्यांची हि कोठारे असावीत, उदा- चुना.
smn49
रायगडावरच्या मुख्य महाला शेजारी असणार्‍या धान्य कोठारांना गैरसमजाने अंधारकोठडी मानले जाते, तसेच ईथेही झाले असावे.
smn33
सध्या वनखात्याने या विहीरीत चुकून कोणी पडू नये म्हणून रेलींग लावलेले आहे.
smn38
याच्यानंतर तटबंदीवरून आपली फेरी सुरु करुया. तटबंदीची उंची थोडकीच म्हणजे आठ ते दहा फुट आहे. विशेष म्हणजे या तटबंदी बाहेर दुधाच्या बाटलीच्या आकाराचे खांब तटबंदीला समांतर उभे केलेले दिसतात. ह्या खांबांचे नेमेके कारण समजत नाही. माझ्या अंदाजाने गडावर काही संकट किंवा ईतर काही कारणाने आजुबाजुच्या परिसरातील लोकांना ईशारा द्यायचा असेल तर या खांबावर पलिते पेटवून ठेवले जात असावेत.
smn38
यानंतर आपण तसेव पुढे चालत राहिलो कि किल्ल्याच्या पुर्व टोकाकडच्या बुरुजाकडे येतो. ह्या चिलखती बुरूजाला बंदुका रोखण्यासाठी जंग्या आहेत. माचीच्या या निमुळत्या आकारामूळे स्थानिक लोक या बुरुजाला "सोंड्या बुरुज" म्हणतात. गडाच्या विकासकामामधे या बुरुजावर पर्यटकांना बसण्यासाठी आधुनिक पध्दतीच्या छत्र्या उभारल्या आहेत. इथे बसून मस्त वार्‍याचा अनुभव घेत दुरवरचा प्रदेश निरखता येतो. लांब आग्नेयाला हिडकल धरणाच्या पाण्याचा फुगवटा दिसतो आणि त्याच्या काठावरचा कातळमाथ्याचा हुन्नुरगड दिसतो. माचीच्या या भागात आणखी एक विहीर आहे. निरनिराळ्या आकाराच्या आणि रचनेच्या विहीरी हे सामानगडाचे वैशिष्ट्य मानता येईल. मात्र इतक्या सार्‍या विहीरी असून ही या विहिरींचे पाणी चांगले नसल्यामुळे आपणाला पाणी सोबत ठेवावे लागते.
smn39
इथून समोर टेकडी दिसते तीला "मोगल टेकडी" म्हणतात. या मागची कथा अशी, मोगलांचा गडावर हल्ला झाला, तेव्हा त्यांना याबाजूने तोफांचा मारा करण्यासाठी योग्य जागा मिळेना, म्हणून प्रत्येक सैनिकाने एक मुठभर माती आणून टाकायला सुरवात केली. सैन्यच ईतके प्रचंड होते कि सर्व सैनिकानी माती टाकली तेव्हा त्याची एक टेकडी तयार झाली व यावरुन हल्ला करुन मोघलांनी गड जिंकला असे मानले जाते. तीच हि मोगल टेकडी.
smn39
सोंड्या बुरुज पाहून तटबंदीच्या कडेकडेने निघालो कि हि चोरवाट दिसते. इथून उतरणारी वाट थेट चिंचेवाडी गावात उतरते.
smn44
यानंतर आपण येतो उत्तरटोकाकडच्या वेताळ बुरुजावर. इथून लांबवर गडहिंग्लज शहर, तर वायव्येला संकेश्वर, पवनचक्क्या असणारा हरगापुर उर्फ वल्लभगड, तसेच कमळभैरीचा डोंगर दिसतो.
smn41
एकूणच सामानगडाची सुखावह सहल आटोपून मी चालतच चिंचेवाडी गाठले. गावातच भल्यामोठ्या विहीरीशेजारी दोन फिरंगी बांधणीच्या तोफा पाहिल्या.काही वर्षापुर्वी तिलारीच्या जंगलातल्या हत्तीनी आजरामार्गे या भागात गोंधळ घालून सामानगडावर मुक्काम ठोकला होता, त्याच्या हकिगती गावकर्‍यांनी मला सांगितल्या. एका खाजगी जीपने चन्नेकुपीमार्गे भडगाव गाठले.
smn42
तिथून एस.टी. ने नेसरी गाव गाठले.गावातल्या प्रमुख चौकात नरवीर प्रतापराव गुजरांचा हा आवेशपुर्ण पुतळा आहे.
smn45
तो पाहून चालतच अर्ध्यातासात प्रतापराव गुजरांचे स्मारक गाठले. याला नेसरी खिंड का म्हणतात याचा उलगडा होत नव्हता. एक स्थानिक व्यक्ति भेटली, त्यांनी या परिसराची आणि स्मारक उभारणीची माहिती तर दिलीच पण दोन छोट्या टेकड्यांमुळे खिंड कशी तयार झालेली आहे ते दाखविले. वरच्या फोटोत काळ्या रंगाने त्या टेकड्या मी स्पष्ट दाखविल्यात.
त्या दोन टेकड्यामधून पाणी वाहुन ओढा तयार झालेला आहे. "ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा" याचा अर्थ उमगला.
smn47
याच्या काठावर प्रतापरावांचे स्मारक उभारलेले आहे. मधोमध ढाल व ती पेलणार्‍या सात तलवारी अशी कल्पना आहे.
smn49
गडहिंग्लज तालुक्यातील नुल या गावचे सुपुत्र श्री. श्रीकांत चौगुले यांच्या कल्पनेतून साकारलेले हे शिल्प प्रत्येक शिवप्रेमीनी आवर्जुन पहावे आहे असे.
smn48
या परिसरात उभारल्या नंतर त्या सात उल्का सेनासागरात कशा नाहीश्या झाल्या असतील याची आपण कल्पनाच करु शकतो. इतके दिवस केवळ एकून थरार जाणविणारी सात हि कुसुमाग्रजांची कविता आज जिवंत अनुभवून काहीशा खिन्न मनस्थितीत मी परत निघालो.
smn50
सामानगडाचा नकाशा.
( सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
३ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2017 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट सहल ! वर्णन, फोटो आणि नकाशांंमुळे आम्हीच तुमच्याबरोबर फिरत असल्याचा भास होत होता.

सुरुवातीच्या इतिहासाच्या मजकूराने तर या सहलिचे वर्णन वाचण्याची मजा अजूनच वाढली !

दुर्गविहारी's picture

1 Jul 2017 - 7:23 am | दुर्गविहारी

आपल्यासारख्या दिग्गजाने दाद दिल़ी अजून काय हव़े

दुर्गविहारी's picture

1 Jul 2017 - 7:23 am | दुर्गविहारी

आपल्यासारख्या दिग्गजाने दाद दिल़ी अजून काय हव़े

लेखन खूप अफाट आहेच, पण सोबतची जुनी नवी माहिती व छायाचित्रे या लेखाला एका अश्या उंच जागी नेऊन ठेवत आहे की, बोलायला आणि लिहायला शब्द कमी पडत आहेत.

*बाकी, तुम्ही व मी एकाच गावचे.. कोल्हापूरकर. पार राधानगरी पासून कर्नाटकात चिकोड्डी, कागवाड पर्यंत सर्वत्र आमचे पाहुणे पसरले आहेत. :D

** आणि सोने पे सुहागा म्हणजे आपला पिंड पण भटकंतीचा आहे, तुम्हाला भेटायला व तुमच्यासोबत ट्रेक करायला आवडेल, जर तुमची हरकत नसेल तर.. :)

बाकी खरडवही मध्ये बोलू.

दुर्गविहारी's picture

1 Jul 2017 - 7:27 am | दुर्गविहारी

प्रतिक्रिये बध्दल मनापासून धन्यवाद ़ खरेतर ट्रेकिंग ची आवड असणाऱ्या सर्वच मिपाकरांबरोबर ट्रेक करायला मल़ा आवडेल ़
सविस्तर ख.व. मधे बोलूच.

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Jul 2017 - 7:23 pm | स्वच्छंदी_मनोज

तुमच्यासारखेच म्हणतो. माझाही पिंड भटकण्याचाच.. थोडीफार भटकंती मीही केल्यामुळे तुमच्याशी आणी दशानन ह्यांच्या विचारांशी जुळतेच विचार आहेत.

खरेतर ट्रेकिंग ची आवड असणाऱ्या सर्वच मिपाकरांबरोबर ट्रेक करायला मल़ा आवडेल >>> तुमच्या सारख्या जाणत्या आणी दर्दी ट्रेकर्स बरोबर एखादा ट्रेक करायला नक्कीच आवडेल.

दुर्गविहारी's picture

4 Jul 2017 - 10:12 am | दुर्गविहारी

नक्कीच प्लॅन करूया.

पद्मावति's picture

1 Jul 2017 - 1:48 am | पद्मावति

वाह! फारच सुंदर.
तुमची लेखमाला अप्रतिम आहेच पण तुम्ही जे प्रत्येक भागाला वेगवेगळे आणि अगदी चपखल शीर्षक देता तेही खूप छान वाटतं.

प्रचेतस's picture

1 Jul 2017 - 11:43 am | प्रचेतस

उत्तम माहिती.
कोल्हापूरच्या शिलाहारांनी ह्या प्रदेशांत असंख्य बांधकामे उभारली. प्रदेश अगदी बळकट केला. त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांची सैर तुम्ही घडवून आणत आहात त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद.

अतिशय उत्तम मालिका, आणि तुमची लेखनाची पद्धत तर लाजवाब

लई भारी's picture

1 Jul 2017 - 1:05 pm | लई भारी

माझ्या गावापासून २५ एक किमी आणि आजोळ तसेच इतर पाहुणे या भागात असल्यामुळे खूप वेळा या भागातून जाणं झालं आणि वर वर मंदिर वगैरे बघून झालं पण इतकी सुरेख माहिती मिळाली नव्हती.
आपल्या जवळच्या गोष्टींची किंमत नाही हे खरंय.
आपण उल्लेख केलेल्या श्रीकांत चौगुले काकांशी तर अगदी घरचे संबंध आहेत.
माझी मला लाज वाटली इतके 'कोरडे पाषाण' राहिल्याबद्दल.
आपल्यासोबत ट्रेक करायला आवडेल.

रच्याकने: संकेश्वर मध्ये खाजा खाल्ला नाही कधी पण स्टँड वर एसटीत बसूनच चिरमुरे-शेंगदाणे घेऊन एक काका यायचे. जाम भारी लागायचे. काही वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा ते काम करत होता, काका वारले म्हणाला.

धन्यवाद.

भटकीभिंगरी's picture

1 Jul 2017 - 2:39 pm | भटकीभिंगरी

खुपच छान माहीती.. आणी त्याला अनुरुप अशी छायाचीतत्रे vअसल्यामुळे वाचताना मजा येते अतीशय माहितीपुर्ण ... असेच लिहीते रहा ..

संपूर्ण माहिती, फोटोंसह मस्तच.

प्रसाद_१९८२'s picture

1 Jul 2017 - 6:38 pm | प्रसाद_१९८२

माहितीपूर्ण ट्रेक वृतांत.
पुलेशु.

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Jul 2017 - 7:20 pm | स्वच्छंदी_मनोज

हाही भाग मस्तच जमलाय हो..
प्रत्येक भागागणीक पुढे काय ही उत्कंठा लागून राहीलेय..
लवकरच पुढचा भाग टाका..

जेव्हा केव्हा कोल्हापुर भागात ट्रेक करीन तेव्हा तुमच्याच लेखांचा आधार घेणार हे नक्की.

प्रीत-मोहर's picture

3 Jul 2017 - 8:34 pm | प्रीत-मोहर

मस्तच होतेय ही मालिका!!

दुर्गविहारी's picture

4 Jul 2017 - 10:16 am | दुर्गविहारी

येत्या आठवड्यात गुरूपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने विशेष धागा टाकणार आहे.
पुढच्या आठवड्यात या मालिकेतील पुढचा धागा टाकेन .

मिपावरील काही धागे निव्वळ लेखकाचं नाव बघून उघडायचे असतात, तुम्ही त्यापैकी एक आहात. सुंदर माहिती.