अनवट किल्ल्यांच्या या मालिकेतील सांगली जिल्ह्यातील उर्वरीत किल्ल्यांचा घेतलेला हा एकत्रित आढावा. अपवादात्मक प्रसंग सोडले तर फार मोठ्या एतिहासिक घटना या परिसरात झालेल्या नाहीत. तसे हे छोटे भुईकोट आहेत. यांचा आढावा आपण या एकाच भागात घेउ आणि दक्षिण महाराष्ट्राची दुर्गयात्रा संपवू.
मिरजः-
मिरजेचे उल्लेख ई.स. दहाव्या शतकापासून येतात. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा चौथा शासक जट्टिगा दुसरा (१०००-१०२०) याला घोषित केले. त्याचा मुलगा मारसिंह (१०५०-१०७५) याच्या ताब्यात करहाटक (कऱ्हाड), मिरींजा (मिरज) आणि कोकण हा परिसर होता. परंतु १०३७ च्या हुसुर शिलालेखाप्रमाणे चालुक्य राजा जयसिंह ( दुसरा ) याने पन्हाळा, ह्या शिलाहारांच्या राजधानीचा ताबा घेतला व जाट्टीगावर विजय मिळवला.
पुढे १२१६ मधे यादवांच्या आक्रमणात मिरज ताब्यात गेले. १३१८ पर्यंत यादवांच्या ताब्यात राहिल्यानंतर पुढे मिरजेचा किल्ला बहामनी राज्यात गेला. पुड्।ए १३४७ मधे मिरजेजवळच्या गानगी गावातील शेख मुहम्मद जुनैदी याचा अधिकारी याने सैन्य उभारुन मिरजेची राणी दुर्गावती हिला पराभुत करुन मिरजेच्या किल्ल्याचा ताबा घेतला. शेख महमदाने शहराचे नाव बदलून "मुबारकाबाद" ठेवले. अर्थात मिरजेचा भुईकोट कोणी बांधला हे नक्की ज्ञात नाही. काहींच्या मते बहामनी सुलतानापैकी एकाने बांधला, परंतु फेरीस्त्याच्या म्हणण्यानुसार बहादुरशहा गिलानी याला गुजरातच्या सुलतानाने म्हणजेच सुलतान मंहमद (दुसरा) याने हरवून किल्ल्यातून जिंवत बाहेर पडण्याचा पर्याय दिला किंवा स्वताच्या सैन्यात सामिल होण्याचा पर्याय दिला. बहादुरशहाने सुलतानाची चाकरी स्विकारली. गोवा आणि दक्षिण कोकण यांच्यावर नजर ठेवण्यास मिरजेचा किल्ला सुलतानला सोयीचा वाटला.
ई.स. १४९० मधे बहामनी साम्राज्य फुटले आणि मिरजेवर आदिलशाही अंमल सुरु झाला. पुढे शिवाजी राजानी १६५८ मधे प्रतापगडावर अफझलखानाला मारले आणि अवघ्या १८ दिवसात नेताजीच्या सैन्याने मिरजेवर हल्ला केला व किल्ल्याला वेढा घातला. मात्र मातीच्या तटबंदीवर तोफांचा मारा यशस्वी होइना. तो पर्यंत स्वता शिवाजी महाराज ससैन्य मिरजेला आले आणि नेताजी पन्हाळा घ्यायला निघून गेले. शिवाजी राजांनी वेढा देउन सुध्दा मिरजेचा किल्ला पडला नाही. तोपर्यंत सिध्दी जोहर विजापुरमधून निघाल्याच्या बातम्या आल्याने महाराज तातडीने पन्हाळ्याकडे निघून गेले.
पुढे संभाजीराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी त्यांच्या कुटूंबाला मिरजेच्या किल्ल्यात सुरक्षिततेसाठी ठेवले होते. १६८७ मध्ये विजापूरच्या पराभवानंतर मिरज मुघल यांच्या हातावर तुरुंगात पडले आणि ३ ऑक्टोबर १७३९ रोजी शाहु यांनी तब्बल दोन वर्षां वेढा देउन ताब्यात घेतले. इ.स १७६१ मध्ये मिरजच्या किल्ल्याला पेशवे माधवराव यांनी गोविदाराव पटवर्धन यांना जहागीर म्हणून दिले.
मिरज शहरात आज किल्ला नावाचा विभाग आहे. याठिकाणी या भुईकोटाचे काही अवशेष पहाण्यास मिळतात. या कोटाला खंदक असावा, या शिवाय अब्दुल करीम खाँ व ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब दर्गा हे ही प्रसिध्द आहेत.
सांगलीचा गणेशदुर्ग किल्ला
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली ह्या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या.सांगली या नावाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर सहा गल्ल्या होत्या. त्यावरून त्यास सांगली हे नाव पडले असावे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी जे गाव होते त्याला कानडी भाषेत सांगलकी म्हटले जाई. मराठीमध्ये त्याचे सांगली झाले असावे. अन्य एका आख्यायिकेनुसार वारणा व कृष्णा या नद्यांचा संगम सांगली येथे होतो. संगम या शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली हे नाव पडले असावे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगलीच्या जवळ असलेले हरिपूर हे सांगलीपेक्षाही मोठे गाव होते. त्यावेळी हरिपूरची लोकसंख्या २,००० तर सांगलीची लोकसंख्या फक्त १,००० होती. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर पटवर्धन कुटुंबात अंतःकलह निर्माण झाल्याने मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून अलग झाले. तत्पूर्वी सांगलीचा समावेश मिरज जहागिरीमध्ये होत असे. पेशवाईच्या काळात या भागावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. त्यांपैकी चिंतामणराव पटवर्धन यांनी या भागाचा चांगला विकास घडवून आणला.१८०१ साली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं तरी सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघाबरोबरची आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध गणेशदुर्ग बांधला.
चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीचे एक वैशिष्ट्यच ! किल्ल्याचे बरेचशे भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असले तरीही तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे.पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी देऊळ हवंच, म्हणून १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं.याच गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.किल्ल्याचा उत्तर फक्त एकच दरवाजा होता. आता दक्षिण आणि पूर्व बाजूस अनुक्रमे दोन अधिक प्रवेशद्वार आहेत.आता किल्ल्याचा व त्याच्या परिसरात विविध सरकारी कार्यालये आहेत ज्यात जिल्हाधिकारी यांचे भांडार, केंद्रीय जेल, स्वच्छताविषयक उपविभाग, सार्वजनिक आरोग्य, होमगार्ड इ. परिसरात एक बी.टी. कॉलेज, एक हायस्कूल व एक छोटेखानी पण प्रेक्षणीय संग्रहालय आहे. गावातच महानगरपालिकेच्या ईमारतीजवळ आपल्याला गणेशदुर्गाचे प्रवेशद्वार व बुरुज पहाण्यास मिळतात.
रामगड
जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका आहेत. याच तालुक्याच्या गावाजवळ जत-कवठे महांकाळ रस्त्यावर जत पासून अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अपरितीच किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या मागच्याच टेकडीवर हा छोटेखानी किल्ला आहे.
हि टेकडी इतकी छोटी आहेत कि आपण टेकडी चढायला सुरवात करे पर्यंत किल्ल्याच्या महादरवाज्यात येऊन पोहोचतो. किल्ल्याची उंची आहे जेमतेम १५० फुट.
रामपूर गावाच्या मागे एक पाण्याची टाकी आहे येथे पायउतार होऊन अगदी पाचच मिनिटात आपण गडाच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किंवा प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करू शकतो. एक मात्र खरे कि इथल्या स्थानिकांना या किल्ल्याबद्दल कोणतीही आस्था दिसत नाही हे किल्याच्या दुरावस्थेवरूनच लक्षात येते. किल्ल्यामध्ये बाभळीचे भयंकर रान माजले आहे त्यामुळे येथे चालताना खूप काळजी घ्यावी लागते.
किल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून तटबंदी मात्र बरीचशी ढासळली आहे. तटबंदीमधेच एक दरवाजा अगदी साधेपणाने बांधलेला आहे ज्याची कमान अजून तरी टिकून आहे. याच्या बांधणीवरून हा पेशवेकालीन (१८ व्या शतकातला) असावा असे वाटते. दरवाज्यातील पहारेकर्याच्या देवड्या व पायऱ्या पुर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.
गडाच्या डाव्या बाजूला तटबंदीमधून वेगळा असलेला एक उंच टेहाळणी बुरुज आहे ज्यावर भगवे निशाण लावलेले आहे. या टेहाळणी बुरुजा व्यतिरिक्त या किल्ल्याला दुसरा कोणताही बुरुज नाही. गडाच्या मागच्या बाजूस एक तलाव आहे व येथे गडाची तटबंदी अगदी त्या तलावपर्यंत खाली बांधत नेलेली आढळते. याच ठिकाणी एक चोर दरवाजा व तलाव पर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या दिसतात.
मात्र बाभळीच्या प्रचंड झाडीमुळे खाली उतरता येत नाही. किल्ल्यामध्ये वाड्याचे अथवा सदरेचे वाटावे असे काही अवशेष दिसतात.
किल्ल्याच्या मध्यभागी एक सुंदर हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराला अर्धमंडप व गाभारा असून मंडपातील खांब घडीव दगडाचे आणि गोलाकार आहेत.
मंदिरा शेजारच्या बाभळीच्या झुडूपात एक उखळ दडलेला आहे. गडाची तटबंदी ठिकठिकाणी ढासळली असली तरी गडाचे अवशेष अजूनही पाहण्यासाखे आहेत.
गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण शिवाजी महाराज इथे येवून गेल्याचे स्थानिक आवर्जून सांगतात. पण नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी आदिलशाहीवर केलेल्या अनेक बेधडक आणि धाडसी मोहिमांचा इतिहास पाहता या गडाला त्यांचेही वास्तव्य लाभले असण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील हेमाडपंती शिवमंदिर मात्र या टेकडी किंवा या किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देते.
जत हे डफळे सरकारांच्या ताब्यातील संस्थान होते. ह्या घराण्याचे मुळ राजस्थानातील हाडा-चौहान घराणे आहे. या घराण्याचे मुळ संस्थापक एदलोजी हे विजापुरच्या सरदार अब्दुल करीम बहलोलखान याच्या पदरी होते. हा परिसर याच घराण्याची जहागीर होता.
यांचा जत शहरातील वाडा आजही पहाण्यास मिळतो. या शिवाय जतजवळ उमराणी हे गाव आहे. याच ठिकाणी प्रतापराव गुजरांनी बहलोलखानाचे पाणी अडवून त्याला शरण येण्यास भाग पाडले, पण त्याच वेळी खाशा बहलोलखानाला धर्मवाट देण्याची चुलही केली. याचा परिणाम नेसरीची ती ईतिहासप्रसिध्द लढाई आणि सहा सरदारांसद प्रतापरावांचे बलिदान. उमराणी गावातच डफळे सरकारांची गढी आहे. साधारण औरस-चौरस आकाराची ही गढी ही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. समोरून पाहता कलाकुसरीचा दरवाजा दोन बुरुज आणि समोर काही ऐतहासिक बांधकामाचे अवशेष दिसतात. या गावात ग्रामस्थांनी उमराणीच्या विजयाची आठवण जपण्यासाठी विजयस्तंभ उभारला आहे.
शिराळा किल्ला
शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले आहेत शिराळा आणि प्रचीतगड.
शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९०० च्या पूर्वीपासून आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोरक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच बत्तीस शिराळा. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.
शिराळा हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे.शिराळा हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. ते मुंबई पासून ३५० किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.
बागणी किल्ला
वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो.
आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्यासारखे काही शिल्लक नाही.बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्घ आहे. कवठेएकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.
जुना पन्हाळा :-
सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवरील गिरीलिंग डोंगरावर इ. स. तिसऱ्या ते तेराव्या शतकादरम्यानच्या प्राचीन बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन लेण्या आढळून आल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रात आजपर्यंत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात प्राचीन बौद्ध लेण्या सापडल्या आहेत. सांगली जिल्ह्यात बौद्ध लेण्या आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर व सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर यांनी गेल्या वर्षभरापासून अभ्यास करून हा लेण्यांचा समूह शोधला आहे. मिरज इतिहास संशाधेन मंडळाच्या या संशोधनामुळे जिल्ह्याच्या इतिहासात भर पडली आहे. तसेच या परिसराच्या प्राचीन परंपरा उलगडण्यास यामुळे मदत होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर गिरीलिंगाचा डोंगर आहे. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या डोंगरास 'जुना पन्हाळा' या नावानेही ओळखले जाते. या डोंगरावर मोठे पठार असून, येथे सुमारे चारशे एकर शेतजमीन आहे. प्राचीन लेखांमध्ये या डोंगराचा उल्लेख 'वुंद्रगिरी' असा आहे. स्थानिक लोक यास 'उंदरोबा' असेही म्हणतात. डोंगराच्या पश्चिमेकडील भागास 'गिरीलिंग' तर पूर्वेकडील डोंगरास 'गौसिद्ध' डोंगर असेही म्हणतात.
डोंगराच्या या दोन्ही विभागांच्या सीमेवर दगडी तटबंदीसारखी रचना करण्यात आली आहे. त्याला जुन्या पन्हाळ्याचा खंदक, असे स्थानिक लोक संबोधतात. या खंदकसदृष्य रचनेमुळे पूर्वी येथे किल्ला होता, असे सांगण्यात येते. शिलाहार राजांनी गड बांधणीसाठी पाहणी केली होती. नंतर बांधकाम अर्धवट सोडून कोल्हापूरजवळ पन्हाळ्याची उभारणी केली. म्हणून हा जुना पन्हाळा.
गडकोटप्रेमी व गिर्यारोहक आजवर येथील किल्लासदृष्य बांधकामाची चर्चा करीत आले आहेत. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या लेण्या आजवर दुर्लक्षित होत्या. डोंगरावरील पठाराच्या बाजूस कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) या गावाच्या दिशेस तोंड करून उत्तराभिमुख चार लेण्या आहेत. तर डोंगराच्या पूर्वेकडील बेळंकी व कदमवाडी (ता. मिरज) या गावांकडे तोंड करून दक्षिणाभिमुख दोन लेण्या आहेत. येथील गिरीलिंग व गौसिद्ध या नावने ओळखल्या जाणाऱ्या दोन लेण्या ग्रामस्थांना परिचित होत्या मात्र, इतर चार लेण्यांची कोणतीही माहिती नव्हती. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांनी गेल्या वर्षभरापासून या लेण्यांचा अभ्यास केला. या लेण्या बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन लेण्या असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
स्तुपयुक्त लेणे, बौद्ध चैत्यगृह व विहार या प्रकारातील ही लेणी आहेत. येथे बौद्ध स्तुपाचे भग्नावशेषही आढळून आले आहेत. लेण्याबरोबरच पाण्याचे टाकेही येथे आहेत. यापैकी काही लेण्यांमध्ये कोणतेच कोरीव काम अथवा शिल्पावशेष नाहीत. काही लेण्यांतील शिल्पावशेष अन्यत्र हलविण्यात आल्याचे दिसते. मिरज इतिहास संशोधन मंडळाने या लेण्याबाबत केलेल्या प्राथमिक अभ्यासात इ. स. तिसऱ्या ते पाचव्या शतकापासून तेराव्या शतकातील यादव काळापर्यंत या लेण्यांचा विकास होत गेल्याचेही समोर आले आहे. लेण्यांवर आधारीत शोधनिबंधही मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांनी काही दिवसांपूर्वी सादर केला आहे.
महाराष्ट्रात इसवी सनापूर्वीच्या लेण्या आढळतात. यात बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन अशा तीन प्रकारच्या लेण्यांचा समावेश आहे. दक्षिण महाराष्ट्रात आजवर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात बौद्ध लेणी आढळून आली आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यात बौद्ध लेणी समूह आढळून आला नव्हता. मिरज इतिहास संशोधन मंडळाने सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगराच्या पूर्वेस असणाऱ्या गिरीलिंग (जुना पन्हाळा) या डोंगरावर नव्याने सहा लेण्यांचा शोध लावला आहे. नव्या सहा लेण्यांच्या शोधामुळे प्राचीन इतिहासावर प्रकाश पडला आहे.
दंडोबा :-
सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुका हा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. ही ठिकाणं अनेकांची श्रद्धास्थानं आहेत. काहीसा दुष्काळी असूनही इथली पर्यटनस्थळं ही एका दिवसाचे पिकनिक स्पॉट ठरली आहेत. या ठिकाणांचा विकास होण्याची गरज आहे. याच तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला दंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण आहे.
दंडोबाचं वैशिष्ट्य म्हणजे हेदेखील जांभ्या खडकात कोरलेलं लेणे मंदिर आहे. कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे लेणे ५८ फूट लांब आणि ३६ फूट रुंद असं सणसणीत आहे. इथल्या शिलालेखानुसार सातव्या शतकात इ.स. ६८९ ला कौडण्यपूरच्या राजा सिंघणने हे लेणे खोदवले आहे. मात्र, अभ्यासकांच्या मते हे लेणे १२व्या ते १४व्या शतकात देवगिरी यादव राजा सिंघण याने कोरले असावे. द्वारपाल मूर्तींच्या खाली दोन मराठी शिलालेख आहेत. एकात इ.स. १७७३ असा उल्लेख आहे. सिनप्पा आणि बाळप्पा तटवते अशी नावे कोरली आहेत. गाभाऱ्यात नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. गर्भगृहाभोवती मोठ्ठाले आधारखांब सोडून, पाच फूट रुंदीचा प्रदक्षिणा मार्ग कोरून काढला आहे. इथे टाकळी ढोकेश्वरच्या लेणेमंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची अवश्य आठवण होते. श्री भवानी, लक्ष्मी आणि वीरभद्र अश्या मूर्ती आहेत. लेण्याच्या माथ्यावरच्या डोंगरावर एक उंच स्तंभ बांधला आहे. दंडोबा म्हणजे कोरीव लेणे मंदिर, धनगर समाजाचं आराध्य आणि दुष्काळी भागातील सुरेख गिरीस्थळ.
पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून; सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रं आता कालौघानं पुसट झाली आहेत.
डोंगरावर सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा मनोरा आजही सुस्थितीत इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभं आहे. डोंगरावर विविध मंदिरं असून एक दिवसाच्या सहलीसाठी येणाऱ्यांची संख्याही खूप आहे. या डोंगराचा 'क' दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये समावेश होऊनही म्हणावा तसा विकास न झाल्याची खंत या भागाला भेट दिल्यावर सतावत राहते. डोंगरमाथ्यावरचा मनोरा आश्चर्यकारक आहे. इथले पुजारी आणि देवस्थानच्या मते हे शिखर मंदिराचं आहे. याची रचना पहिली तर हे लक्षात येतं, की त्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणूनही करता यावा.
हा मनोरा पाच माजली असून; सर्वांत वरचा भाग आहे तिथं चार ते पाच माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढं वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तिथं एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येतं. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगलं असेल तर इथं उभं राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं. दंडोबाचा डोंगर एक उंचीवरचं देवस्थान असून इथं कोणताही किल्ला नाही. इथं किल्ला नसल्यामुळे या शिखराचं बांधकाम नेमकं कोणत्या हेतूनं आणि कोणाच्या काळात झालं आहे याचे संदर्भ कुठेही उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं नसावं, कारण बांधकामाची शैली पाहून आपण हे सांगू शकतो. तसंच हा भाग जास्त काळ आदिलशहाच्या राज्यामध्ये होता. शिवछत्रपतींनी हे बांधलं असतं तर इथं एखादा छोटासा का होईना, किल्ला नक्कीच बांधला असता.
( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार. हावाई प्रकाशचित्रे साभार, श्री. गोपाळ बोधे )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा:- सतिश अक्कलकोट
२ ) डोंगरयात्रा- आनंद पांंळदे
३ ) सांगली जिल्हा गॅझेटियर
४ ) www.sahyadripratishthan.com हि वेब साईट
५ ) www.discoversahyadri.com हि वेब साईट
६ ) www.fortsinindia.com हि वेब साईट
७ ) www.vatadya.com हि वेब साईट
८ ) महाराष्ट्र टाईम्सचे संकेतस्थळ
प्रतिक्रिया
17 Nov 2017 - 12:30 pm | mayu4u
नेहमीप्रमाणेच!
17 Nov 2017 - 4:25 pm | एस
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
17 Nov 2017 - 5:02 pm | कंजूस
फारच छान लेख आणि फोटो!
17 Nov 2017 - 5:47 pm | सतिश पाटील
आमच्या कवठे महांकाळ तालुक्यात अणि भवताली एवढे ऐतिहासिक स्थळ आहेत, हे आज कळले,
पुढच्या आठवद्यात जाणार आहे गावाला तेव्हा नक्की पाहून घेतो.
21 Nov 2017 - 7:16 pm | दुर्गविहारी
जाउन आल्यानंतर फोटो शक्य झाल्यास धाग्यावर टाका. काही नवीन समजले असल्यास ते ही लिहा. बर्याचदा आपल्या परिसरातील अश्या अनवट जागांची आपल्याला माहिती नसते म्हणूनच हि लेखमाला मी सुरू केली. अश्या पध्दतीने वाचकांना आपल्याच परिसरातील नवीन काही समजत असेल तर लेखमालेचे सार्थक झाले असे म्हणायला हवे.
28 Nov 2017 - 4:54 am | दिपस्तंभ
आपलं गाव कोणतं पाटील साहेब
18 Nov 2017 - 8:06 am | तुषार काळभोर
शीर्षकातील इंग्रजी भाग काढता येईल का?
(शीर्षक खूप मोठे झाल्याने मेन बोर्डावर लेखक व प्रतिसाद संख्या हे कॉलम खूप उजवीकडे सरकलेत.)
21 Nov 2017 - 7:09 pm | दुर्गविहारी
सर्वप्रथम प्रतिसादाबध्दल धन्यवाद. गुगलमधे या किल्ल्यांवर शोध घेताना मि.पा. वरचा धागा वर असावा यासाठी ईंग्रजी शीर्षक देतो. या धाग्यात अनेक किल्ल्यांची माहिती एकत्र दिल्याने शीर्षक थोडे मोठे झाले आहे. थोडी गैरसोय झाली त्याबध्दल क्षमस्व.
18 Nov 2017 - 8:35 am | प्रचेतस
ह्या पूर्णपणे अपरिचित किल्ल्यांची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
रामगडचे ध्वस्तावशेष आणि आतले प्राचीन मंदिर पेडगावच्या बहादूरगडाची आठवण करुन देत आहेत.
18 Nov 2017 - 10:06 am | मनो
याला काही कागदपत्रांचा आधार आहे का?
छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.
21 Nov 2017 - 7:25 pm | दुर्गविहारी
या विषयी सविस्तर प्रतिसाद मी नंतर टाकतो. याच विषयावर मि.पा.वर पुर्वी एक धागा आला होता, सध्या त्याची लिंक देतो.
छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
22 Nov 2017 - 7:02 am | मनो
होय तो धागा पहिला होता आणि जेधे शकवलीचा प्रतिसाद मी टाकला होता असं आठवते. मी अवरंगझेबाचे अप्रकाशित अस्सल फर्मान संभाजी राजांच्या मृत्यूनंतरचे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात मार्च २०१८ मध्ये प्रकाशित करणार आहे. त्यामुळे काही नवीन माहिती असेल तर जरूर टाका अथवा व्य नि तुन कळवा.
21 Nov 2017 - 7:39 pm | दुर्गविहारी
सर्वच वाचकांचे आणि mayu4u, एस, कंजुस काका, सतिश पाटील, पैलवान, मनो आणि वल्लीदा या सर्वांचे मनापासून धन्यवाद. या धाग्याबरोबरच दक्षीण महाराष्ट्राची अनवट किल्ल्याची सफर बरीचशी संपली. फक्त पावनगड राहिला आहे, त्याची माहिती पुन्हा एकदा पावनगडावर जाउन आल्यानंतर लिहीन. या खेरीज पन्हाळा व विशाळगड यांची माहिती उन्हाळी भटकंतीत लिहीन.
25 Nov 2017 - 10:08 pm | पैसा
एक अतिशय उत्तम दस्तऐवज तुम्ही तयार करता आहात. यातल्या बहुतेक किल्ल्यांची माहिती कोणालाही नसते.
26 Nov 2017 - 7:55 pm | अभिजीत अवलिया
+१
26 Nov 2017 - 10:20 am | संजय पाटिल
अतिशय महितीपुर्ण व सविस्तर लेखन! संपुर्ण मालिका वाचली, आवडली!
27 Nov 2017 - 2:51 am | दिपस्तंभ
आमच्या क. महांकाळ मध्ये इतकी ऐतिहासिक ठिकाणे असतील असं माहित नव्हतं.. धन्यवाद
माझे गाव क. महांकाळ पासून ७,८ किमी मळणगाव नावाचं आहे तिथेही शिंदे सरकार ची जुनी पड गढी आहे.. पूर्वी इथं लोक पांढरी माती घराला सारवण्यास नेत. तेव्हा काही जुन्या वस्तू सापडल्याचा ऐकिवात आहे
27 Nov 2017 - 8:28 pm | दुर्गविहारी
या परिसरात अनेक जुन्या गढ्या आहेत. तुम्ही सांगताय ती गढी माझ्या माहितीत नाही. शक्य झाल्यास पहाण्याचा प्रयत्न करेन.